-----------------
CNN-IBN वर वहिदा रेहमानची मुलाखत चालू होती. बोलता बोलता तिने एक जुना किस्सा सांगितला. देव आनंदच्या बंगल्यात कुठल्यातरी इस्श्युवरून सर्व फिल्मवाल्यांची मिटींग सुरु होती.
आघाडीचे कलाकार एकेक करून येत होते. नंदाबरोबर वहिदा होती. सुनील दत्त, नर्गिस, दिलीपकुमार, राजेंद्रकुमार असे जमायला लागले होते. वहिदाला पाहिल्यावर नटमंडळी तिच्याजवळ जाऊन “हलो वहिदा” करून तिला विश करत होते. पण वहिदा मात्र संकोचून, खांदे आक्रसून नमस्कार करून काहीशी बाजूलाच सरकत होती. एव्हढ्यात दस्तुरखुद्द देवने त्याच्या स्टाईलमध्ये एन्ट्री घेतली. “हल्लो नंदाss”…”हाssय” करत करत तो वहिदाजवळ आला आणि तिच्या खांद्याभोवती एक हात टाकत तिला “हल्लो वहिदा” करून पुढे गेला. ती साहजिकच गोड हसली. ते पाहून सुनील दत्त, राजेंद्रकुमार आदी तिला विचारते झाले,”हे काय? आम्ही एव्हढ्या प्रेमाने जवळ आलो, तर तू खांदे झटकलेस आणि हा देव येऊन तुझ्या गळयाबिळयात हात टाकून ‘हल्लो..” म्हणाला तर तू अगदी खुशीत हसत्येस? ह्याला काय अर्थ आहे?” 😲
त्यावर वहिदा गोड हसून म्हणाली,”हो!कारण तो एक Decent Flirt आहे!”- हा किस्साऐकला आणि मला त्या शब्दाची गम्मत वाटली.Decent Flirt! म्हंजे फ्लर्टीन्गमधेसुद्धा काही पातळ्या असू शकतात तर!...
मग विचार करता करता लक्षात आलं की “अरेच्या, खरंच आहे की ते!” मुळात, फ्लर्टीन्ग किती प्रकारे केलं जातं ते आपण बघतोच, आणि ते ज्या उद्देश्याने केलं जातं ते ही किती भिन्न असू शकतात! पण आपल्या समाजात फ्लर्टीन्गकडे एका negative connotation नेच का बघतो नेहेमी? खरं तर प्रत्येकजण कळत नकळत आयुष्यात कधी ना कधी फ्लर्टीन्ग करत असतातच की! कोणी गंमतीत...कोणी मस्करीत...कोणी प्रेमाची पहिली पायरी चढण्यासाठी...कोणी प्रियाराधनेचा एक आविष्कार म्हणून...कोणी उगाचच “imp” मारायला...तर कोणी चक्क त्याची परिणीती सेक्सपर्यंत नेण्यात...!
बरं, फक्त माणूसच नव्हे तर पशु-पक्षी, इतकंच काय वनस्पतीसुद्धा फ्लर्टीन्ग करतातच की! प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळ्या...साधनं वेगळी...पण इप्सित साध्य एकच – “तिला जिंकणं”!..एक मजेशीर वाक्य वाचलं होतं –“फ्लर्टीन्ग हे मासेमारी करण्यासारखं आहे. गळाला ‘ती’ लागायला हवी!” ;-)
फ्लर्टीन्ग ची नेमकी व्याख्या काय करावी बरं? मला वाटतं –“ नजरेतून, शब्दांतून, हावभावांतून आणि स्पर्शातून आपली प्रेमभावना किंवा जिव्हाळा व्यक्त करणं – ज्यायोगे त्या दोन जीवांमध्ये एक प्रेमाचं, गोड मैत्रीचं नातं निर्माण होईल!”..आणि त्यातूनच कदाचित काहींच्या बाबतीत शारीरिक जवळीक निर्माण होत असावी! आणि हे असं ‘शब्दांतून, नजरेतून, स्पर्शातून’ व्यक्त होणं आपण आयुष्याच्या विविध टप्प्यांवर पाहत असतो. अनुभवत असतो. कित्येकदा दुरून, तर कित्येकदा प्रत्यक्ष सहभागी होऊन. आणि त्यासाठी टेलरमेड सिचुएशन हवीच असंही काही नाही. दोन जीवांचा सहवास घडला, तर त्यांच्यातली केमिस्ट्री जुळायला, वेव्हलेंग्थ जुळायला – त्यांना एकमेकांविषयी ‘काही वाटणं’ व्यक्त करायला कुठलही ठिकाण चालतं. पार्टीत, हॉटेलमध्ये, गर्दीत, पिकनिकला, ट्रेनमध्ये, बसमध्ये, कट्ट्यावर, बिल्डींगमध्ये, भर ऑफिसमध्ये!..अक्षरशः कुठेही फ्लर्टीन्गला स्कोप असतो.फ्लर्टीन्गमध्ये अर्थातच म्हटलं तसं ‘डोळे, स्पर्श आणि शब्द’ यां तीन गोष्टींना प्रचंड महत्त्व असतं!
पुरुषांच्या फ्लर्टीन्गची पहिली पायरी अर्थात ‘दृष्टादृष्ट होणे’ किंवा ‘नजरेत नजर मिसळणे’. एकदा हे जमलं की त्यातून मग थोडं धीटपणा वाढून मग ‘शब्दांचा’ आधार. काही इंटरेस्टिंग बोलणं..गप्पा...ज्योक्स...किस्से वगैरे. मग हावभावांतून, gestures मधून ...हलकासा स्पर्शाचा आधार!..आणि हे सर्व अत्यंत सहज होत असतं. नजरेत नजर मिसळता मिसळता दुसरीकडे वळवून पुन्हा तिच्या डोळ्यांत मिसळणं..डोळे मिचकावत किंवा डोळा मारत बोलणं...”तुझा आवाज किती गोड आहे”..”तुझ्या डोळ्यांचा रंग किती सुरेख आहे” ...”तुझे केस किती सिल्की आहेत”...”काय सुंदर कॉम्प्लेक्शन आहे तुझं “ – वगैरे वगैरे..आणि हे सर्व बघणं-बोलणं चालू असताना हातावर टाळी देणं किंवा खांद्याला हलकासा स्पर्श करणं – यांतून ती अभिप्रेत असलेली ‘जवळीक’ जाणवून जाते. हे झालं मुलांचं, पुरुषांचं फ्लर्टीन्ग!!......मुलींच्या, बायकांच्या फ्लर्टीन्गची तऱ्हा काही औरच!...
त्या मुद्दामहून मुलांच्या समोर नाचतील...काहीतरी टोमणे मारून हसतील किंवा चिडवल्यासारखं बोलतील. त्या मुलाने पाहिलंच तर भलतीकडेच बघतील. नवीन ड्रेस घातला असेल किंवा नट्टापट्टा केला असेल तर तो त्या मुलाच्या लक्षात येईपर्यंत मुलांच्या समोर चकरा काय मारतील!...
थोडक्यात, ‘विशेष लक्षवेधी अभिनेत्री’ बनतील!..त्या मुलाकडून शब्दांत किंवा नजरेतून पसंतीची पावती मिळेपर्यंत त्यांचं हे बागडणं चालू असतं. कधीकधी तर असंही होतं की तिच्या आसपास बरेच handsome मित्रअसतात तरी बाजूला त्यामानाने साधारण दिसणारा पण अभ्यासाबिभ्यासात हुशार असणारा मुलगा तिच्याकडे लक्ष न देता बसला असला, तर अश्यावेळी हटकून इर्षेने ती challenge घेतल्यागत त्याचं लक्ष वेधूनघेण्यासाठी शब्दाचे, नजरेचे विभ्रम करत राहते ... त्यांचं लक्ष वेधून घेईपर्यंत!...त्याला –so called “वश करेपर्यंत”! (आणि मग त्यांचं पटलंच , तर मग कधीकधी आपल्याला अश्या विजोड जोड्या बघायला मिळतात!)...थोडक्यात म्हंजे मुलींचं फ्लर्टीन्ग हे खूपच निराळं...’वशीकरण’ विद्येचं चालतंबोलतं उदाहरणच!!...
फ्लर्टीन्गमध्ये कधीकधी दोघांकडून कळतनकळत अत्यंत तरल आणि संयत पातळीवर एकमेकांमध्ये गुंतणंही होतं. यासंदर्भात एक अत्यंत गोड सीन आठवतोय. मला खूपच आवडलेल्या “सेरेंडीपिटी” सिनेमाच्या सुरुवातीला होणारी हिरो-हिरोईनची भेट. एक विलक्षण योगायोगांची मालिका. असं होतं – हिरो (जॅक क्युसॅक) आणि हिरोईन (केट बेकिंसेल) हे क्रिसमस सीझनच्या धामधुमीत न्युयॉर्कमधल्या ब्लूमिंगडेल मॉंलमध्ये आपापल्या होणाऱ्या जोडीदारासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला आलेत. दोघांचीही नजर एकाचवेळी जाते ती एका सुंदर हंड्ग्लोव्ह्जच्या जोडीवर! दोघांचेही हात एकाचवेळी त्या ग्लोव्हजवर पडतात. मग एक गोड स्मित. नजरानजर. त्या साध्याश्या योगायोगातून त्यांचं बोलणं...गप्पा...मग थोडावेळ आहेच तर आईस्क्रीम खाण्यासाठी दोघं “सेरेंडीपिटी” पार्लरमध्ये...मग आणखी गप्पा...दोघं तिथून निघतात. बाहेर पडल्यावर दोघांनाही काहीतरी विसरून आल्याची जाणीव. तो त्याचं मफलर न्यायला आलाय. बघतो तर ती तिथे पोचून आपलं सामान उचलून त्याचाच विसरलेला मफलर न्याहाळत्येय..तो पुढे येतो...ती त्याचं मफलर त्याच्या गळ्यात घालते. ..इथे कुठेतरी मैत्री अन्कुरल्ये...तिथून दोघं स्केटिंगरिंकवर जातात. ..स्केटिंग करता करता एकमेकांच्या आवडीनिवडी जाणण्याचा प्रयत्न...एव्हढ्यात ती घसरून पडते...थोडंसं हाताला खरचटलय. तो तिचा पुलओव्हर मागे सारून खरचटलेलं बघताना त्याची नजर तिच्या हातावरच्या गुलाबी ठिपक्यांवर. ते फ्रेकल्स बघताना तो एकदम “कॅसिओपिया” म्हणतो...ती गोंधळल्ये...तो स्केचपेनने ते ठिपके जोडून ‘M’ आकाराचं कॅसिओपिया (शर्मिष्ठा) नक्षत्र पूर्ण करतो आणि तिला कॅसिओपियाची कहाणी ऐकवतो...त्यांचे सूर जुळायला लागलेले...एव्हाना किंचित भुरभूर बर्फ पडायला सुरुवात झालेली...आपल्या होणाऱ्या जोडीदाराचा विसर पडून ती दोघं त्या क्षणापुरतं एकमेकांत गुंतलेली...तो हलकेच तिच्या डोक्यावर पडणारे बर्फाचे कण अलगद बोटं फिरवून उडवतो...मग दोघं बेंचवर बसून गप्पा मारताना – त्याचं तिच्या हाताचं हलकंसं चुंबन घेणं...पुढे??..
पुढचं सगळं सांगत बसत नाही, पण तुमच्या लक्षात आलं असेल की फ्लर्टीन्गमध्ये अभिप्रेत असलेली सर्वच लक्षणं सिनेमाच्या त्या पहिल्याच सीनमध्ये अत्यंत तरल, संवेदनशील पद्धतीने आपल्या समोर येतात...त्याची ती योगायोगाने झालेली भेट...नजरानजर...स्मितहास्याची देवाणघेवाण..आश्वासक जवळीक..एकत्र आईस्क्रीम खाणं...त्याच्या गळ्यात तिने मफलर घालणं...एकत्र स्केटिंग...हस्तस्पर्श...तिच्या केसातून त्याने हात फिरवणं...हाताचं चुंबन..खरंच!! एक हळुवार सुंदर पद्धतीने – गोड फ्लर्टीन्गने फुलत गेलेलं नातं!...खूपच गोड!..
फ्लर्टीन्गची हीच तर गम्मत आहे. ते काही ठरवूनबिरवून नाहीच करता येत. ती एक सहजप्रवृत्ती आहे. ज्यांना जमतं त्यांना जमतं. ज्यांना नाही जमत, त्यांना नाहीच जमत! It’s that simple!...कुणी असं ठरवलं की “अमुकअमुक मुलीजवळ बसून मी पुढची पाच मिनिटं फ्लर्टीन्ग करतो हां का” – तर त्याचा पचका होण्याचीच शक्यता ज्यास्त! कारण अश्या ओढूनताणून इम्प्रेशन मारण्याच्या नादात, फ्लर्टीन्गमधली ती निरुपद्रवी पातळी ओलांडली जाऊन ‘छेडछाडीचं’ स्वरूप येऊन नसता गोंधळ होण्याची शक्यताच ज्यास्त! छेडछाडीवरून आठवलं. छेडछाड असते बरं का फ्लर्टीन्गमध्ये! पण ती डायरेक्ट अंगाशी जाऊन नव्हे तर थट्टामस्करीच्या अंगाने! उदाहरणच द्यायचं झालं तर श्रीकृष्णाचं! श्रीकृष्णाच्या कथांमध्ये तो, स्नान करत असलेल्या गोपींची, गवळीणींची वस्त्र पळवून लपवून ठेवायचा आणि त्यांनी विनंती आर्जवं केली की त्यांना परत द्यायचा अशी वर्णनं आहेत. त्या दूध, लोणी विकायला निघाल्या की त्यांना अडवणं आणि लोण्याच्या गोळ्याचे, दूधाचे ‘टोल वसूल’ केले की त्यांना सोडणं हे ही त्याच्या गंमतीशीर फ्लर्टीन्गचा भाग होतं!..
फ्लर्टीन्गची खूप जवळून ओळख आपल्याला होते ती सिनेमे बघून! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात हिरोने काहीतरी गमतीशीर कॉमेंट करून, डोळेबिळे मिचकावत गाणं म्हणून किंवा वेश बदलून, रूप पालटून हिरोईनबरोबर मस्ती करणं – यातून अनेकदा सिनेमातली प्रेमप्रकरणं सुरु होतात. कधीकधी ती दूर असताना गाणीबिणी गाऊन त्या गाण्यातून तिची मनधरणी करणं हे ही एक प्रकारचं फ्लर्टीन्गच! पटकन उदाहरणं सांगायची तर रेल्वेच्या खिडकीत बसलेल्या हिराॕईनला उद्देश्यून रस्त्यातून जात “जिया ओ जिया ओ जिया कुछ् बोल दो” किंवा “मेरे सपनो की रानी कब आयेगी तू” सारखी गाणी...किंवा डोक्यावर बुरखा पांघरून बसलेल्या हिरोईनला म्हणणं “अपने रुख पर निगाह करने दो, खुबसुरत गुनाह करने दो..” वगैरे वगैरे...
काही काही प्रसंगातून संयत फ्लर्टीन्गही दिसतं. ‘आनंद” मध्ये बाबूमोशाय लाजरा...तो काही बोलायला तयार नाही, म्हणून आनंदच बाबुमोशायला आवडणाऱ्या मुलीला त्याच्या भावना सांगून टाकतो. बाबुमोशायला हे कळल्यावर तो तिला विचारतो,” क्या आपने आनंदकी बातोंका यकीन तो नही किया?” आणि त्यवर ती नकारार्थी मान हलवताच त्याच्या तोंडून पटकन शब्द बाहेर येतात “क्यू नही किया?”....खूप भावतं हे संयत प्रेम.
तसाच अजून एक सीन “कभी कभी” मधला...“मै पल दो पल का शायर हूँ” ऐकून त्याच्या शायरीवर फिदा झालेली पूजा अमितची स्वाक्षरी घेण्यसाठी वही पुढे करते. तेंव्हा तिचा ‘पूजा’ हे नाव ऐकून अमित चटकन म्हणतो,” तो क्या मेरा नाम ‘पुजारी’ नही हो सकता?” ही झाली उदाहरणं शाब्दिक फ्लर्टीन्गची!...कधी कधी शब्दांबरोबर किंचित धिटाईही जोडीनं येते. जसं “त्रिशूल” सिनेमात. हेमामालीनिशी झालेल्या पहिल्याच भेटीत तिच्यावर लट्टू झालेलं शशीकपूर तिच्याशी बोलताना..त्यांच्या गप्पातून तिचं कर्तुत्व ऐकून आणि त्याच्या आवडीनिवडी जुळत असल्याचं लक्षात आल्यावर तिचा हात पुनःपुन्हा हातात घेऊन तिचं अभिनंदन करत तिला थेट सांगतो “आपके हमारे खयालात कितने मिलतेजुलते है! वैसे आप आज शाम को क्या कर रही हो?”...
हे पुन्हा सगळ्यांना जमतच असंही नाही. व.पुं.चं एक मार्मिक वाक्य आहे –“डोळे आणि स्पर्श, शब्दांपेक्षा छान बोलतात.” मला वाटतं हे वाक्य खूपच बोलकं आहे, कारण कित्येकदा असं घडतं की दोघं एकत्र आहेत अगदी भर गर्दीत! आसपास माणसांचा महासागर. अश्यावेळी शब्दांतून काही सांगण्याची गरज नसते. बस्स, तिच्या डोळ्यांत डोळे मिसळायचे..हातात हात गुंफायचे..आणि मग दोघांचे डोळेच डोळ्यांशी संवाद साधतात. गुंफली गेलेली बोटं ..तो स्पर्श खूप काही सांगून जातो. त्यांचं “एकमेकांसाठी असणं” हे ती नजर आणि तो स्पर्श इतकं छान व्यक्त करतात की आपण जणू जन्मजन्मांतरीचे Soulmates असल्याची खात्री त्या दोघांना पटते. फ्लर्टीन्गचा हा खूप तरल अविष्कार. त्या ‘नजरेवर’ गुलझारजींची एक त्रिवेणी प्रसिद्ध आहे..शांताबाईंनी गोड अनुवाद केलाय –
“डोळ्यांना सांग तुझ्या, इतक्या लोकांत
एव्हढ्या मोठ्याने बोलू नका माझ्याशी –
लोकांना माझे नाव ओळखू यायचे कदाचित!”
नजरेच्या यां खेळावरून आठवते तो “शोले” मधली अमिताभची, विधवा जयाच्या डोळ्यांत डोळे घालून खूप काही बोलणारी नजर!...
फ्लर्टीन्गमध्ये मिश्कीलताही असते आणि टिपणारे ‘इक घर बनाउन्गा तेरे घर के सामने” आणि “देखी रुठा ना करो बात नजरोन की सुनो”ह्या दोन गाण्यांतले देव आणि विशेषतः नूतन चे गोड विभ्रम!! ती फ्लर्टेशस एक्स्प्रेशन्स क्या केहने? लाजवाब!!.......
सिनेमातल्या फ्लर्टीन्गविषयी बोलताना शम्मी कपूरचा उल्लेख तर यायलाच हवा.त्याच्या बहुतेक सर्वच सिनेमात त्याचं हिरोईनला पटवणं हे फ्लर्टीन्गचे एकसोएक इरसाल नमुनेच आणि जोडीला बेमिसाल गाणी! ती हिरोईन अश्या फ्लर्टच्या प्रेमात पडली नसती तर नवल! काव्यमय फ्लर्टीन्गचा एक वेगळा तरल अनुभव देणारा सिनेमा म्हंजे “कॅसाब्लांका”.
इंग्रीड बर्गमन योगायोगाने हम्फ्री बोगार्टच्या कॅफेत आल्ये. त्यांचं जुना दोस्त Sam तिथे दिसलाय. आणि मग जुन्या प्रेमाच्या स्मृती जागृत होऊन, रिकच्या आठवणीत ती Sam ला तो पूर्वी म्हणायचा तेच गाणं पियानोवर वाजवायला सांगते-“प्ले इटSam, फॉर ओल्ड टाईम् ससेक!” –Sam ते गाणं गायला लागतो आणि ते ऐकून हादरलेला रिक धावतच तिथे पोचतो तो त्याच्या लाडक्या ‘कीड’ समोरच! त्यांची नजरानजर....तो सीन बघण्यात मजा आहे....
मी पशुपक्ष्यांचा उल्लेख केला. आपण लाक्खो वेळा या संदर्भातल्या फिल्म्स किंवा व्हिडीओज हे ‘डिस्कव्हरी’ किंवा ‘अनिमल प्लानेट’ वर पाहिलेले असतील. सुंदर पिसं / पिसाराकिंवा मानेवरचे, अंगावरचे रंग गर्वाने फुलवत तिला ‘impress’ करायला धडपडणारे नर पक्षी किंवा आपल्या चालीने, डरकाळीने, डौलदार आवेशाने आपलं physique दाखवत तिला‘impress’करु पाहणारे प्राणी आपण पाहिले असतील. मी मध्यंतरी माझ्या मैत्रिणीच्या घरी कासवांची जोडीचे उद्योग पाहिले होते. तो नर कासव त्या कासविणीच्या चेहेर्याजवळ आपल्या हाताचे पंजे आणि नख्या यांचं फ्लटरिंग (Fluttering) करून तिला ‘impress’ करु, पटवू पाहत होता.,.त्यांचं ते फ्लर्टीन्ग अद्भुतच!!..
वनस्पतीसृष्टीत तर फ्लर्टीन्गसाठी विधात्याने अनंत रंगांची, सुगंधाची उधळणच केलेली दिसते. त्यांचं फ्लर्टीन्ग हे दुसऱ्या वनस्पतीशी नाही तर थेट कीटकांशी, पक्ष्यांशी चालतं – आणि ते इतकं यशस्वी होतंय म्हणून तर परागीभवनाची क्रिया अथक चालू राहून हे जीवचक्र चालू राहतंय पृथ्वीवर!.....
शेवटी मला एक मात्र सांगायचंय – की फ्लर्टीन्गने प्रेम किंवा टोकाला जाऊन प्रेम-सेक्स अश्या पायऱ्या जरी गाठता नाही आल्या तरी सुंदर मैत्र – दोस्ताना नक्कीच लाभू शकतो!!
So, Happy Flirting!!!..😍☺️🤣
पूर्वप्रसिद्धी: पुरुषउवाच दिवाळी अंक'१४
तुमची लेखणी देखील flirting करते वाचकांशी आणि खिळवून टाकते त्यांना. 👌👌👌
ReplyDelete