"एक हाफ, एक फूल"
---------
एरवी हे शब्द रसवंती गृहात किंवा बीइएसटी/एसटी बसच्या प्रवासात कानावर पडतात...पण आज कुठल्या मूव्हीसंदर्भात मी वापरत असेन बरं? कुठल्या मूव्हीचं टायटलबियटल?...अं हं!..पण एक नाही तर दोन दोन मूव्हीजचा संबंध मात्र आहे!...म्हंजे काल मी लागोपाठ दोन मूव्हीज पाहिले - त्यातला पहिला halfच बघायला मिळाला...मग दुसरा मात्र full म्हणून हे टायटल! ;-)
त्याचं असं झालं....
जनरली असं होत नाही की मी स्वप्नातनं जागा झालोय आणि स्वप्नातलं काहीच्च आठवत नाहीये...कारण स्वप्नं हा एक vivid, 3-D अनुभव असतो माझ्यासाठी. (एक काळ होता जेव्हा मी रात्री पडलेल्या स्वप्नाचं सकाळी उठल्यावर स्केच काढून ठेवायचो आणि अशी तब्बल २०० पानी ड्राॕईंगची वही भरली होती अचाट, अशक्य स्वप्नांनी!) ..पण कालच्या स्वप्नामधला एका "गिल्डा"चा उल्लेख धूसर आठवत राहिला....
काल सकाळी उठलो तो "गिल्डा"ला आठवतच!...पण शप्पथ काहीच आठवेना...कोण होती स्वप्नातली गिल्डा?..काय संदर्भ होता माझ्या स्वप्नात?...गिल्डा ही प्रत्यक्षात कुणी होती? ..कशी होती?..कुठे भेट झाली आमची?..पण मग काहीच का आठवत नाहीये??...हैराण होत्साता मी उठून मेंदूला ताण देऊन देऊन आठवायचा प्रयत्न केला...गिल्डा हे खरं तर जर्मन ओरिजिन असलेलं ब्रिटीश नाव...मग डोक्यात प्रकाश पडला!...येस्स! बहुदा माझ्या विस्मरणात गेलेल्या त्या स्वप्नाचा संबंध गिल्डा नावाच्या अॕक्ट्रेसशी किंवा मूव्हीशी असावा.....
आणि मग थोडा गुगलवर धांडोळा घेतल्यावर माझा 'त्या' नावाचा शोध १९४६ सालच्या मूव्हीशी येऊन थांबला - "गिल्डा!" रिटा हेवर्थने साकारलेली ही अफलातून भूमिका!
रिटा हेवर्थ!..माझ्यासारख्या, १९३० ते १९६० च्या चार दशकांतल्यां हाॕलीवूड मूव्हीजच्या अशक्य प्रेमात हरवून गेलेल्यांसाठी ज्या १५-२० हिराॕईन्सची नाव कायम ओठावर खेळत असतात आणि या ना त्या कारणांसाठी ज्या हृदयात घर करुन असतात, अशांमधली ही एक दिलखेचक सौंदर्यवती!
रिटा हेवर्थ! हाॕलीवुडच्या इतिहासात ४० च्या दशकांतली सर्वाधिक चर्चेतली "लव्ह गाॕडेस!"..भले ती माझ्या डार्लिंग इंग्रिडइतकी कमालीची लोभस नसेल, मेरिलीनसारखी मादक बाँम्बशेल नसेल, इंग्रिड आणि कॕथरिन इतका मास्टरक्लास अभिनय नसेल, आॕड्रीसारखं निरागस सौंदर्य नसेल, लीझ सारखे खल्लास डोळे नसतील, ग्रेटा गार्बोसारखं गूढ स्मित नसेल...पण या सर्वापेक्षा काहीतरी वेगळा चार्म तिच्यात नक्कीच होता...एक वेगळी 'कशीश' नक्कीच होती!..आणि म्हणून तर "लव्ह गाॕडेस ही सार्थ उपाधी तिला लाभली होती!
रिटाचं व्यक्तीगत आयुष्य प्रचंड वादळी होतं...वडिलांकडनं पैशासाठी बालपणापासूनच स्टेजवर अभिनय आणि नृत्य करायची सक्ती...पुढे आयुष्यात ख-या जेन्यूईन प्रेमाच्या शोधात पाच पाच लग्न केलेली...दुस-या नव-याशी आॕर्सन वेल्ससशी तसं चांगलं प्रेम जुळून लग्न होऊनही म्हणावं तसं समाधान न लाभलेली...पण लग्न न करता तिच्यावर मनापासून प्रेम करत आलेला ग्लेन फोर्ड!..(रिटाची कहाणी नंतर लिहिन कधीतरी....)
गिल्डा
-------
स्वप्नातनं जागा झाल्यावरसुद्धा 'गिल्डा' नाव हाँन्ट करत होतं..मग थोडं शोधून रिटा हेवर्थचा हा मूव्ही यूट्युबवर बघायला सुरुवात केली...
ह्यात रिटाबरोबर आहे ग्लेन फोर्ड!..मला जरी ग्रेगरी पेक आणि कॕरी ग्रँट जरा विशेष जवळचे असले, तरी त्याकाळच्या जिमी स्ट्युअर्ट, गॕरी कूपर, क्लार्क गेबल, जाॕन वेन, हंफ्री बोगार्ट, राॕड टेलर बरोबरच हा ग्लेन फोर्डही भावला होताच!..तश्यात रिटाच्या आयुष्यातल्या अनेक प्रेमप्रकरणांपैकी ह्या सिनेमापासून तिचं ग्लेनशी सुद्धा प्रेमप्रकरण रंगलेलं...
चार्ल्स विडाॕर हा ३०-४० च्या दशकातला गाजलेला दिग्दर्शक आणि 'गिल्डा' हा त्याच्या सर्वोत्तम मूव्हीजपैकी!! रिटा हेवर्थ उत्तम अभिनेत्री होती, रुपानं दिलखेचक होती, उत्तम नृत्य करायची आणि हो, गायचीसुद्धा!..ह्या मूव्हीमधे दोघांबरोबर आहे जाॕर्ज मॕकरिडी!
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ह्या मूव्हीच्या सुरुवातीला कळतं की गँम्बलर जाॕनी फॕरेल (ग्लेन फोर्ड) अमेरिकेहून अर्जेंटिनात आलाय. एका क्लबमधे जिंकलेले पैसे घेऊन निघाल्यावर त्याला एक गुंड पिस्तूलाचा धाक दाखवून पैसे लुटायचा प्रयत्न करतो, पण ऐनवेळी तिथे आलेला मिस्टर मंडसन (जाॕर्ज मॕकरिडी) त्याला वाचवतो. आणि जवळच्याच एका कसिनोत पैसे कमवण्याची जास्त चांगली संधी आहे हेही सांगतो. दुस-या दिवशी साॕफिस्टिकेटेड ड्रेस घालून तिथे पोहोचलेला जाॕनी, पत्ते पिसण्यातलं कौशल्य वापरुन पुन्हा घसघशीत पैसे कमावतो...आणि तितक्यात त्याला कसिनोच्या मालकाकडून बोलावणं येतं...तो मालक त्याला वाचवणारा मिस्टर मंडसनच असतो. जाॕनी त्याच्याकडे कसिनो मॕनेजर म्हणून रुजू होतो..दरम्यान जर्मनीचा पाडाव होऊन दुसरं महायुद्ध संपतं ....कथेच्या पुढच्या वळणावर एका ट्रीपनिमित्त अर्जेंटिनाबाहेर गेलेला मंडसन लग्न करुनच परततो..जाॕनीला बंगल्यावर बोलावतो आणि "एक सरप्राईज देतो" सांगत बंगल्याच्या वरच्या बेडरुममधे नेऊन त्याची ओळख आपल्या नवपरिणित पत्नीशी गिल्डाशी (रीटा हेवर्थ) करुन देतो. तिचं कॕमे-याच्या फ्रेममधलं ते पहिलंच दर्शन घायाळ करणारं! (१९४६ सालच्या प्रेक्षकांच्या नजरेतनं बघता नक्कीच!)
गिल्डा आणि जाॕनीची नजरानजर आणि दोघंंही एक क्षण फ्रीझ झालेले! अमेरिकेत असताना जाॕनीचा जिच्याशी ब्रेक अप झालेलं असतं तीच गिल्डा! देखणी...कुणालाही सौंदर्याच्या जोरावर वश करु शकणारी गिल्डा!..ह्या पहिल्याच शाॕटमधे रीटा हेवर्थ 'छा जाते' स्क्रीनवर!...आपली पूर्वीची ओळख मुद्दामच लपवत जाॕनीला डिवचण्यासाठी ती मुद्दामच त्याचा उल्लेख मिस्टर फॕरेल करते आणि नव-यानं त्याचं नाव जाॕनी आहे सांगितल्यावरसुद्धा"ओह् आय अॕम साॕरी...'जाॕनी' इज सच अ हार्ड नेम टू रिमेम्बर!" असंही हसतहसत त्याच्या तोंडावर फेकते तेव्हाच तिच्यातली एक सूक्ष्म सूडभावनेची छटाही झळकून जाते...
एकीकडे आपल्या धंद्यात उजवा हात बनलेल्या जाॕनीवर विश्वास बसलेल्या मंडसनला दुसरीकडे मात्र जाॕनी आणि गिल्डाची पूर्वी ओळख असावी..संबंध असावेत..असा संशय यायला सुरुवात होते...इथपर्यंतचा सिनेमा एका संथश्या पण छान लयीत पुढे सरकत जातो...
(एका दृश्यात कसिनोचा लव्हेबल म्हातारा अटेंडंट सिगारेट ओढणा-या गिल्डाला ऐकवतो ते वाक्य भारी आवडलं मला -
Only frustrated people smoke too much and only lonely people are frustrated.”)
गिल्डा आपला जाॕनीवरचा जुना राग विसरलेली नाहीये आणि म्हणून ती संधी मिळेल तेव्हा, संधी मिळेल तशी जाॕनीला उचकावायच्या ट्रीक्स शोधत राहते...त्याच्यासमोर मुद्दाम भलत्याभलत्या माणसांना भुलवत त्यांच्याबरोबर पार्टीत रमणं..मजा करणं...त्यावेळी दोघं एकमेकांना सुनवायची संधी सोडत नाहीत... ते डायलाॕग्ज ऐकण्यासारखे. ग्लेन फोर्ड डोळ्यांतूनही खूप बोलतो...
एका रात्री (खरं तर पहाटे!) कसिनोच्या वरच्या मजल्यावर झोपलेल्या जाॕनीला डिवचत गिल्डा थेट कसिनोच्या हाॕलमधे भल्या पहाटे पाच वाजता गिटारच्या साथीत गाणं छेडते- "पुट द ब्लेम आॕन मेम.."...डायनिंग टेबलवर एक पाय खालती सोडून, दुसरा पाय त्यावर आडवा टाकून आपल्या कुरळ्या बाॕबकट केसात लपलेल्या गोड चेह-यावर ती मनातली कैफियत मांडत गाणारी गिल्डा!...लव्हलीच दिसल्ये रीटा हेवर्थ यावेळी!...आणि मग तिला तिथनं मंडसनच्या बंगल्यावर भल्या पहाटेच सोडायला गेल्यावर, मंडसनने जाॕनी आणि गिल्डाला पहाटेच्या त्या वेळी एकत्र बंगल्यात शिरताना पकडणं...आणि मग गिल्डाची "आम्ही पहाटे उठून स्विमिंगला गेलो होतो.." वगैरे सारवासारव...
पुढचा कार्निव्हल टाईमचा सीन! कॕसिनोत जय्यत सजावट...तयारी सुरु आहे...आणि अशातच दोन जर्मन माणसं मिस्टर मंडसनला भेटायला येतात...(मंडसनचं कॕसिनोव्यतिरिक्त गुपचुप टंगस्टनची विक्री करणा-या कार्टेलवर नियंत्रण आहे आणि अर्थातच त्य कार्टेलमधे त्याच्याविषयी असंतोष आहे...
पुढे काय घडतं? Unfortuantely यूट्युबवर इतकाच मूव्ही उपलब्ध आहे आणि पुढचे भाग कुण्या दुष्टाने डिलीट केलेत😡
त्यामुळे कधीतरी उर्वरित मूव्ही बघायला मिळो ह्या आशेत मी मग रीटा हेवर्थच्या 'गिल्डा'नं भारला गेलो असल्यानं, तिचा आणखी एक मूव्ही शोधला...आणि गंमत म्हणजे ह्याच दोघांचा ग्लेन फोर्ड आणि रिटा हेवर्थचाच- "द लव्ह्ज आॕफ कारमेन" हा रंगीत मूव्ही गवसला. पुन्हा दिग्दर्शन चार्ल्स व्हिडाॕरचंच!
"द लव्ह्ज आॕफ कारमेन"
--------------
'कारमेन' ह्या अत्यंत उच्छृंखल जिप्सी तरुणीच्या रोलमधे रिटा हेवर्थने धमाल उडवल्येय...आपल्याच १९४६ च्या "गिल्डा"च्या जबरदस्त यशानंतर, दोनच वर्षांत १९४८ ला दिग्दर्शक चार्ल्स विडाॕरनं, प्राॕस्पर मेरीमीच्या १८४५ सालच्या "कारमेन" कादंबरीवरुन ही एक आगळीच लव्ह- हेट रिलेशनशिपची कथा मांडल्येय ती पुन्हा ग्लेन फोर्ड- रिटा हेवर्थला घेऊनच!
हा सिनेमा म्हणजे काहीशी व्हायोलंट लव्हस्टोरी म्हणता येईल...आणि रिटानं जगलेली कारमेन ह्या जिप्सी तरुणीची भूमिका निगेटिव्ह शेडवालीच्च! कारमेनच्या भूमिकेतली रिटा समोर पडद्यावर दिसत असताना आपण तिचे सगळे नखरे, बेछूट, बेधुंद आणि बेताल वागणं डोळे भरुन पाहात राहतो बस्स!...कारमेनच्या प्रेमात वेडा झालेला डाॕन होजे तिची स्वच्छंद दादागिरी सहन करत तिच्याबरोबर राहता यावं म्हणून जे काही सहन करत जातो त्याचा हा मूव्ही!...
स्पेनमधल्या एका छोट्या गावात स्पॕनिश सैनिकांची तुकडी आल्येय. डाॕन होजे (ग्लेन फोर्ड) हा त्यांच्यापैकी एक प्राॕमिसिंग तरणाबांड काॕर्पोरल!..त्याच्या वागणुकीवर आणि रेकाॕर्डवर इंम्प्रेस झालेला त्यांचा कर्नल त्याला दोन दिवसांची सुट्टी देतो आणि तो तिथे नवीन आलेला असल्यानं गाव पालथं घालून तिथल्या वातावरणाशी जानपेहचान करुन घ्यायला सांगतो...
डाॕन होजे बरॕकच्या बाहेर येऊन गावात फेरफटका मारायला निघतो आणि त्याची गाठ पडते एका घराच्या गॕलरीशेजारच्या भिंतीवर पाय हलवत संत्र खात बसलेल्या लालसर सोनेरी केसांच्या, रंगीबेरंगी ड्रेस घातलेल्या एका गोड जिप्सी छोरीशी!..कारमेनची (रिटा हेवर्थ) अशी ही स्क्रीनवरची एंट्री!
आपल्या लोभस अंदाजात ती त्याला घोळात घेते-
(हातातल्या संत्र्याची साल दातांनी उचकटत ती त्याच्याकडे फ्लर्टेशस अंदाजात बघत म्हणते-)
"स्पॕनीश उन्हानं रापलेल्या एखाद्या गोष्टीसारखी टेस्ट नाही दुस-या कशालाच्च! नै?"
(ती हे म्हणत असताना त्याच्या कंबरेच्या पट्ट्याखालून मंद छानसं म्युझिक ऐकू येतं)
"ओह्हो...हा माणूस नुसता देखणाच नाहिये तर त्याच्या अगप्रत्यंगातनं म्युझीकही बाहेर पडतंय!" कारमेन पुन्हा फ्लर्टेशस लूक देत....
"नाही...नाही..हे घड्याळ आहे माझं. ते करतं असा मंजूळ आवाज" (तो घड्याळ दाखवतो.)
"च् च्...टू बॕड! एक क्षण मला वाटलं होतं तुझ्यातच खूप काही अद्भूत दडलंय म्हणून!...असो!..पण आपण फ्रेंड बनूच शकतो. नं?" असं म्हणत ती भिंतीवरुन बसल्या जागी वाकत हात पुढे करते.
तो तिच्या काखेत हात घालून तिला भिंतीवरनं खालती उतरवताना ती त्याच्या बाहुपाशात अडकते...काही सेकंद..दोघांचे चेहरे अगदी जवळ जवळ आलेत... तो क्षण प्रेमाता पडण्याचाच!..आणि ती उतरताना तिने भिंतीवर बसल्याबसल्या शेजारच्या बाईने गॕलरीत ठेवलेल्या टोपलीतली ड्रेसमधे लपवलेली आठदहा संत्री जमिनीवर सांडतात...दोघं मिळून ती गोळा करेपर्यंत त्या बाईच्या लक्षात येऊन ती "चोर...चोर,." म्हणत आरडाओरड करत लोकांना गोळा करेपर्यंत दोघं दोन दिशांना सटकतात...
दुस-या दिवशी डाॕन आपल्या सहकारी शिपायाबरोबर बाजारात उभा....कारमेन कुठे दिसत्ये का शोध घेत..त्याचा मित्रही तिच्याच मागावर...समोरच्या सिगारेटच्या कारखान्याची शिफ्ट सुटते आणि कामगार मुलींचा घोळका बाहेर पडतो..त्यात तीसुद्धा आहे!.आणि मग दोघांची पुन्हा भेट...आदल्या भेटीत तिने त्याचं घड्याळ त्या गडबडीत लंपास केलेलं त्याला कळलेलंही नसतं..ते ती त्याला परत करते आणि रात्री ८ ला पार्टीत भेटू म्हणून सांगते,..
दरम्यान तिची गावातल्या एका मुलीशी बाचाबाची होऊन त्या मारामारी दरम्यान कारमेन त्या मुलीला जखमी करते आणि त्याबद्दल तिला पकडायचं सोडून, डाॕन तिला पळून जायला मदत करतो आणि त्या गुन्ह्यासाठी त्याला गावात मुक्त फिरायला बंदी घालून उलट गस्त घालायची ड्युटी मिळते..साहजिकच त्याचं तिला पार्टीत जाऊन भेटणं शक्य नसतं,.तरीही तो पार्टीच्या ठिकाणीच गेटबाहेर गस्त घालत आत ती दिसते का बघत असताना, नेमका त्या पार्टीत त्यांच्या तुकडीचा कर्नलच तिला घेऊन डान्स करताना बघून डाॕन बिचारा हैराण होतो...
पण संधी साधून कारमेन गेटवर येऊन त्याला भेटते...(त्यावेळी हातातल्या ठिक्क-या वाजवत, त्याला डिवचत प्रेमात आव्हान देत रिटा हेवर्थचा अंदाज बघण्यासारच!)...दोघांचं तिच्या घरी रात्री भेटायचं ठरतं...पण ऐनवेळी कर्नल तिथे टपकतो...डाॕनला बघून तो चिडतो..दोघांच्यात द्वंद्व...आणि त्यात कारमेनच्या चलाखीमुळं कर्नल अडखळून पडतो तो थेट डाॕनची तलवार पोटात आरपार घेतच!...
डाॕन कारमेनला घेऊन गावाबाहेर सटकून जिप्सी लोकांच्या लपण्याच्या ठिकाणी जातो...आणि इथनं मूव्ही एक वेगळंच वळण घेतो...
मुळात सत्प्रवृत्त असणारा डाॕन आता कारमेनच्या प्रेमात वेडा झालाय...आणि तिच्या संगतीत त्या जिप्सींच्या टोळीत राहायला तयार झालाय...सैन्याच्या कर्नलचा खून करुन पळाल्यामुळे त्याच्या डोक्यावर आता मोठं ईनामसुद्धा जाहीर झालंय...पण त्याला फिकीर नाही....आता त्याला कारमेनच्या सहवासात राहायचंय बस्स...मग ती खोटारडी, चोरटी, लोकांना प्रेमात पाडून स्वार्थ साधणारी का असेना...
जिप्सींच्या टोळीचा म्होरक्या, गार्सिया (व्हिक्टर जोरी) एका रात्री तिथं येतो आणि कारमेनला जवळ ओढतो तेव्हा डाॕनला समजतं की त्या टोळीच्या म्होरक्याची ती बायको असल्याचं...तो चरफडतो,.कारमेनवर..मग स्वतःच्या नशिबावर,..कारमेनलाही तो आवडतोय पण गार्सियाविरूद्ध बंड करण्याची तिची हिंमत नाही...
लोकांना ठार मारत, लुटत टोळीबरोबरच डाॕनचं आयुष्य सुरु होतं..त्याच्या डोक्यावरचं ईनामही वाढत जातं...एका रात्री मात्र त्याला आणि कारमेनला एकत्र बोलताना पाहून गार्सियाचा राग अनावर होतो...त्याच्यात आणि डाॕनमधे द्वंद्व आणि डाॕनचा चाकूनं गार्सिया मारला जातो..
कारमेन आता डाॕनबरोबर राहायला सुरुवात करते...पण वेगवेगळ्या गावात लुटण्यासाठी श्रीमंत सावज हेरत असताना ती स्वतःच एका धनाढ्य बुलफायटरवर फिदा होते..
डाॕनला सहन होत नाही....आणि मग शेवट???
शेवट सांगत नाही...तुम्ही बघा हा मूव्ही!
ग्लेन आणि रिटामधल्या केमिस्ट्रीसाठी!..तिच्याविषयी त्याच्या डोळ्यातनं ओसंडून वाहणा-या प्रेमासाठी!..
(ग्लेनचं आणि रिटाचं ख-या आयुष्यातलं प्रेम अलौकिकच म्हणता येईला...त्याचा तिला मोठाच आधार होता...सुरुवातीला दोघंही विवाहित असल्यामुळे एकत्र नव्हते आले पण आश्चर्य म्हणजे पुढच्या चाळीस वर्षाःत ग्लेनंनं घटस्फोट घेतघेत एकूण चार लग्नं केली तर रिटानंही घटस्फोट घेतघेत एकूण पाच!..पण तरीही दोघांनी एकमेकांशी कधीच लग्न केलं नाही आणि तरीही शेवटपर्यंत त्यांचं एकमेकांविषयीचं प्रेम कधीचा कमी झालं नाही...ग्लेननं तर अगदी शेवटीशेवटी तिच्या शेजारचाच बंगला विकत घेतला होता आणि दोघांमधल्या कुंपणामधे एक खास गेटही होतं तिला वाटेल तेव्हा त्याच्या बंगल्यात येण्यासाठी!...हे प्रेम खरंचंच विलक्षण आणि अलौकिकच!)