------
डोंगरउतारावरच्या त्या मळ्यातल्या तळ्याजवळ, देव साधनाची वाट बघत बसलाय! तिचेच विचार मनात चालू असल्यामुळे, तळ्यातल्या स्तब्ध पाण्यातसुद्धा त्याला तिचाच चेहरा दिसतो. तो 'भास आहे' असंच समजून देव एक खडा भिरकावतो पाण्यात आणि मग...त्या उमटत जाणा-या तरंगांमधंनं सिनेमाची टायटल्स येतात...ती संपता संपता बराssच वेळ तिची वाट पाहून हैराण झालेल्या देवला, अचानक "ते फेमस लायटरमधलं म्युझिक" कानावर येतं..,'ती आल्ये' ह्या भावनेनं देव उठतो आणि आसपासच्या वृक्षराजीत डोकावतो... ती दिसत नाही...पण तरीही पुनःपुन्हा लायटरमधलं म्युझिक मात्र कानावर पडतंय..आणि मग तिचं खळाळतं हंसू!.. आणि...आणि...देवला ती दिसते!…पण मग त्याची स्वारी रुसते!...तिला मनगटावरच्या घड्याळाकडे निर्देश करत तो हावभाव करतो "क्काय हे? किती उशीर? आता मी चाललो!".. आणि मग लटक्या रागात एका झाडाला टेकून, खिशातून एक रेशमी रिबिनीचं गुंडाळं काढून ते उलगडत बसतो...साधना त्याच्याजवळ येते...त्याचा लाडका सिगार काढून त्याच्या ओठात कोंबते आणि तो म्युझिकवाला लायटर काढून तो शिलगावते.. देव खुशीत ती लायटरची भेट स्वीकारतो! मग दोघे शेजारी बसून राहतात...ध्यानस्थ निसर्ग.!! मधूनच किंचित किलबिलाट...देव शांsत पहुडलाय...साधना बाजूलाच बसल्ये…किती वेळ झालाय कुणास ठाऊक!… साधना भानावर येते आणि 'आता निघायला हवं' ह्या जाणीवेनं उठते...डोळे मिटून पडलेल्या देवला 'डिस्टर्ब करायला नको' ह्या आविर्भावात चोरपावलानंs हळूच्च उठून निघते.. तेंव्हा लक्षात येतं की देवने - पठ्ठ्याने - तिची नजर चुकवून, तिच्या केसांच्या पोनीटेलला त्या उलगडलेल्या रिबिनीचं एक टोक बांधून, दुसरं आपल्या हातात ठेवलंय!.. त्यामुळे ती निघाल्यावर त्या रिबिनीच्या हिसक्यानं स्वारी डोळे उघडते आणि सिनेमा सुरु झाल्यापास्नं पहिली सात मिनिटं होईस्तो, इतका वेळ - एक्कही डायलॉगविना संपूर्ण शांsत असलेल्या पडद्यावरून - रफीसाबच्या मधाळ स्वरात देव गाऊ लागतो - "अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही"...
१९६१ सालच्या "हम दोनो"ची ही विलक्षण प्रेमभरली सुरुवात!! त्यावेळी देव होता ३८ वर्षांचा चाॕकलेट हिरो आणि साधना जेमतेम २० वर्षांची सुंदरी!..१९३१ सालच्या 'आलम-आरा' पासून तोपर्यंतच्या तीसेक वर्षांत हिंदी रुपेरी पडद्यानं 'देव-मधुबाला' आणि 'देव-नूतन' अशा दोन 'कमालीच्या गोड' जोड्या पाहिल्या होत्या. १९६१ साली देव-साधनाची जोडीसुद्धा तशीच गोड, देखणी जोडी म्हणून समोर आली ती ह्या "हम दोनो" सिनेमातनं! पुढे ही जोडी पुन्हा एकत्र आली ती "असली नकली"मधे...पण नंतर त्यांचा तिसरा सिनेमा "साजन की गलीयाँ" मात्र सुरु होऊन दोन गाणी चित्रित होऊनही पुढे पूर्ण होऊ शकला नव्हता...
सचिनदांचे आसिस्टंट म्हणून काम करणा-या जयदेवजींनी, स्वतंत्रपणे संगीत द्यायला सुरुवात केल्यावरचा त्यांचा हा चौथाच सिनेमा!! क्काय अफाट, अजरामर चाली दिल्याहेत त्यांनी यातल्या सहाच्या सहा गाण्यांना!!!! आणि साहिरजींच्या शायरीबद्दल क्काय बोलावं? या सिनेमातल्या एकाहून एक लाजवाब आणि अर्थपूर्ण गाण्यांवर तर स्वतंत्रपणे भरपूर बोलावं, इतका भन्नाट करिश्मा आहे साहिरजींच्या शायरीचा!!
मोठ्या हट्टानं आपल्या मित्राला "अमरजीत"ला या सिनेमाची दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवलेल्या विजय आनंदला, नंतर मात्र पस्तावायची पाळी आली होती, कारण त्याने व्हिज्युअलाईझ केल्याप्रमाणे अमरजीतला काही केल्या तसं 'शूट' करणं जमेचना! काही प्रसंगी तर विजय आनंदने सीनचं संपूर्ण डिटेलींग करुन दिलं..अगदी कॕमेरा कुठे हवा, त्याची प्लेसमेंट वगैरे..तरीही अमरजीतचा गोंधळ उडायला लागला, मग मात्र विजय आनंदने स्वतःच मैदानात उतरुन, सूत्र हातात घेतली आणि आपल्यासमोर आज दिसतोय त्या रुपात "हम दोनो" तयार झाला! पण विजय आनंदला सलाम! कारण इतकं होऊनही "दिग्दर्शक" म्हणून आपल्या मित्राचंच, अमरजीतचंच नाव कायम ठेवण्याचा दिलदारपणा त्याने दाखवलान्!..
तर, आपण वळूया "हम दोनो"कडे!
हिंदी सिनेमांत ब-याचदा आढळते तशी गरीब तरुण आणि श्रीमंत तरुणीच्या प्रेमानं सिनेमाची सुरुवात होते! काळ आहे दुस-या महायुद्धाचा! आपल्या म्हाता-या आईबरोबर पडक्या घरात राहणा-या गरीब आनंदचं आणि धनाढ्य बापाची बेटी मीताचं एकमेकांवर प्रेम आहे. अर्थातच कुठल्याही बापाला "आपला जावई किमान आपल्या लेकीला नीट पोसेल असाच हवा" हे वाटणं हे साहजिकच! तिच्या वडिलांना आनंदची दरिद्री परिस्थिती कळते. पण त्यांच्यातला लेकीवर जीवापाड प्रेम करणारा पिता मनाविरुद्ध का होईना त्यांच्या लग्नासाठी तयार होतो पण त्याआधी ते त्याला चार शब्द सुनावतात की त्यांनी ज्या प्रेमात, ऐषोआरामात तिला वाढवलंय ते तो तिला देऊ शकेल? नुसत्या प्रेमावर भाकरतुकडा खात ती किती काळ संसार रेटेल? शेवटी पैसे लागतातच ना संसाराला? ..
इगो हर्ट झालेला आनंद तिथनं उठून निघतो..विमनस्क अवस्थेत भटकताना त्याला "सैन्यभरती"चा बोर्ड दिसतो आणि तिरीमिरीत तो थेट सैन्यात भरती होण्याचा निश्चय करतो. मीताच्या वडिलांनी डिवचलेल्या त्याच्या इगोला आता स्वतःला सिद्ध करणं महत्त्वाचं असतं...त्यामुळे मिताचं प्रेम मनात ठेवत तो घर सोडून निघतो...
आणि तिथनं सिनेमा एकदमच्च वळण घेतो.
कट टू - 'वाॕरफ्रंट'वरचं त्याचं कुठेतरी झालेलं पोस्टींग! आणि तिथे असताना "गम और खुशीमें फर्क न महसूस हो जहां, मै दिल को उस मकाम पे लाता चला गया.." अशी अफ्फलातून, गजब की फिलाॕसाॕफी मांडणारी साहिरची बेमिसाल रचना!.. तिथे योगायोगाने त्याची भेट होते मेजर वर्माशी जो "मिशी आणि केसांचा भांग सोडला" तर हुबेहुब त्याचंच प्रतिरुप असतो! दोघांची दोस्ती होते. योगायोगात भर म्हणून की काय दोघं एकाच गावचेही निघतात! (पण सिनेमा बहुदा मनमोहन देसाईंचा नसल्यामुळे ते लहानपणी जत्रेत हरवलेले जुळे भाऊ वगैरे मात्र नसतात बरं का!😝)..एकमेकांशी एकमेकांच्या कहाण्यांचं शेअरिंग होतं. इथे या सिनेमातली साहिरची अद्वितीय रचना- "कौन रोता है किसी और की ख़ातिर ऐ दोस्त, सबको अपनी ही किसी बात पे रोना आया..कभी खुद पे कभी हालात पे रोना आया..." आनंद गाताना दिसतो..
आणि मग कहानी मे ट्विस्ट येतो...
बर्मा फ्रंटवरच्या ऐन धुमश्चक्रीत मेजरच्या आज्ञेनुसार कॕप्टन आनंदला युद्धभूमीवरुन मागे हटायला लागतं...मेजर युद्धात गेल्याची बातमी घेऊन एव्हाना बढती मिळून स्वतः 'मेजर' झालेला आनंद, मेजर वर्माच्या घरी जातो खरा..पण तिथे मेजरच्या पत्नीला, रुमा ला सौम्य हार्ट अटॕक आल्याचं डाॕक्टरकडनं कळल्यावर तिची नाजूक तब्येत लक्षांत घेऊन पुढचा धोका टाळण्यासाठी, त्याला डाॕक्टरच्या सांगण्यावरनं मेजर वर्माच्या रुपात तिथे वावरणं भाग पडतं..आणि सुरु होते त्याची कात्रीत सापडलेली अवस्था!..
एकीकडे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आणि इतक्या वर्षांनंतर भेटलेली लाडकी प्रेयसी मिता आणि दुसरीकडे त्यालाच पती समजून त्याच्या आगमनाने खुष होऊन नव्याने उभारी घेतलेली रुमा!..एकीकडे प्रेयसीवरचं आत्यंतिक प्रेम आणि दुसरीकडे मानवतेच्या दृष्टीनं करावं लागणारं, मेजर वर्माच्या पत्नीबरोबरच्या प्रेमाचं नाटक...
ह्या घालमेलीतनं मेजर आनंदची सुटका होते का?..दोघींपैकी कुणाचा जोडीदार बनणं त्याच्या नशिबात असतं? सिनेमाचा शेवट सुखान्त होतो की सिरीयस?..
या सगळ्याची उत्तरं हवी असतील तर "हम दोनो" पाहायलाच हवा!...
"हम दोनो" येण्याआधी "लव्ह इन सिमला आणि परख" या दोन सिनेमांतनं साधनाने रसिकांचं लक्ष आपल्याकडे वळवलं होतं...या सिनेमात साधना खूपच लोभस दिसल्येय आणि तिच्या वाट्याला आलेली भूमिका तिने खूपच तन्मयतेनं साकारल्येय....साधनाआधी किमान चार वर्षांपास्नं सिनेसृष्टीत "भाभी, धुल का फूल, छोटी बहन, उसने कहा था, कालाबाजार" सारखे यशस्वी सिनेमे गाठीशी असलेली नंदा तशीही तिला सिनियर आणि "हम दोनो"तही तिला साधनाइतकाच किंबहुना जास्त कंगोरे असलेला रोल आहे! कारण देवचा ह्यात डबल रोल! एक कॕप्टन तर दुसरा मेजर! नंदाने मेजरच्या पत्नीचा रोल केलाय! लताबाईंच्या आवाजातली "प्रभू तेरो नाम" आणि "अल्ला तेरो नाम" ही दोन अप्रतिम भक्तिगीतं तिला ह्यात गायला मिळाली आहेत. मेजरबरोबरचे घरगुती प्रेमळ प्रसंग किंवा एकीकडे स्वतःचं आजारपण सांभाळत मेजरच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या रुमाचं कातर, हळवेपण आणि त्यच्यावरचं आत्यंतिक प्रेम नंदाने फारच सुरेख साकार केलंय!
देवनेही खूप मन लावून अॕक्टींग केल्याचं जाणवतंय यात!!. अगदी डबल रोल करताना मॕनरीझम्स आणि संवादफेकही दोन्ही व्यतिरेखांची जाणीवपूर्वक वेगळी ठेवल्येय त्याने!!..आणि हो, कमाल म्हणजे "हर फिक्र को धुएँ मे उडाता चला गया.." म्हणताना, त्याआधी आणि नंतरही बहुतेक सिनेमांत वरपर्यंतची बटणं लावून गळाबंद शर्ट घालणा-या देवने स्वतःच्या शिडशिडीत देहयष्टीची "फिक्र न करता" चक्क "शर्टलेस उघड्या अंगानं" एक कडवं गायलंय चक्क!!
आता जरी त्याची रंगवलेली प्रिंट बाजारात आणली गेल्ये तरी मूळ ब्लॕक अँण्ड व्हाईटचा मझा औरच हे मात्रं निश्चित!!..
नवकेतन बॕनरचे हुकुमी सचिनदां म्युझिकसाठी नसले तरी त्याकाळात त्यांचेच असिस्टंट म्हणून काम केलेल्या जयदेवजींनी विलक्षण मधूर संगीत दिलेली एकाहून एक अजरामर गाण्यांनी सजलेला हम दोनो हा देव आनंदचा स्वतःचाही आवडता सिनेमा होता...
या सिनेमात दोनतीनवेळा केलेला "डायलाॕग्जविना शांततेचा" वापर सुरेखच!! आणि सिनेमा शेवटाकडे जातानाचा तो दोन मेजर्सचा जवळजवळ सहासात मिनिटांचा सीन! खरंच खूप मनापास्नं रंगवलाय देव ने!...शेवटची तीन मिनीटं ख-या अर्थानं क्लायमॕक्सची!!..
"हम दोनो" हे टायटल सार्थ करणारा या कथेचा हृद्य शेवट आपल्याला भावूक करुन जातो...
शेवट सांगत नाही. तुम्ही पाहा आणि आधी पाहिला असेल तर पुन्हा तितकंच रंगून जाऊन पुनःप्रत्ययाचा आनंद घ्या! शेवटी आपल्या लाडक्या देवसाबचा महत्त्वाचा मूव्ही आहे हा!!