Wednesday, 8 September 2021

देहातील "तो"

देहातील "तो"
-------
कधीकधी ज्याम प्रश्न पडतात!

हिंदू धर्मात 'अविनाशी' आत्म्याची संकल्पना आहे.

भगवद्गीतेत "वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही" - वगैरे वाचून आपल्याला कळलेलं असतं की मनुष्य जसा देहावरची जीर्ण वस्त्रं बदलतो, तसा आत्मा देह बदलतो...पण तो स्वतः अमर असतो!

राॕय किणीकरांची चारोळी आपल्याला पाठ असते- 

"हा देह तुझा, या देहातील तू कोण?
हा देह तुझा, या देहावीण तू कोण?
हा देह जन्मतो, वाढत जातो, सरतो.
ना जन्म, मरण ना, या देहातील 'तो' म्हणतो"

मी यासंदर्भात थोडं वाचन केलेलं आहे...मेधाशी तर तिच्या डाॕक्टरेटचा आणि "आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्चात जीवन" पुस्तकाच्या प्रवासाचा साक्षीदार असताना आमच्या गप्पांमधे वेळोवेळी 'आत्मा, पुनर्जन्म आणि तत्संबंधी' विषय येऊन जात असत...

मी असं काही वाचतो किंवा ह्याविषयी बोलायला लागतो तेव्हा-"प्रसन्न काहीतरी वेड्यासारखं वाचतो आणि बडबडतो..." अश्याच साधारण नजरेनं समोरचा/ समोरची बघतात...

आज एक ताजाताजा विचार आलाय डोस्क्यात!
जाणकारांनी प्रकाश टाकावा म्हणून लग्गेच मनात आल्याआल्या लिहून मोकळा होततोय as usual 

हां तर, हे आपल्याला ठाऊक आहेच की - पृथ्वीचं वय साधारणपणे ४.५ अब्ज (बिलियन) वर्ष आहे असा वैज्ञानिकांचा कार्बन डेटींग किंवा रेडिओमेट्रिक डेटींगवरुन काढलेला अभ्यास सांगतो. आणि पृथ्वीवर सायनोबॕक्टेरियांचं अस्तित्व आलं साधारण २.५ अब्ज (बिलियन) वर्षांपूर्वी!..आणि पुढे मग पृथ्वीवरच्या वातावरणातलं आॕक्सीजनचं प्रमाण वाढत गेलं...सायनोबॕक्टेरिया हेच पहिले सजीव मानले आणि त्यांच्यापासून पुढे सगळ्या वनस्पती आणि जलचर-भूचर-उभयचर (सूक्ष्मजीव, जीवाणू, मासे, प्राणी, पक्षी, कीटक, माणसं..सगळ्या ८४ लक्ष योनी Genus ) जन्मले मानलं...तर मग पृथ्वीवरच्या त्या सा-या सजीवांमधे आत्मा शिरला तेव्हाच त्यांना जीवन प्राप्त झालं असणार. बरोबर?

पण मग जसजसे अब्जावधी वनस्पती आणि प्राणीपक्षीमासेकीटकमाणसं जन्मत गेले आणि त्यांचं पुनरुत्पादन होतहोत पृथ्वीवर त्यांची संख्या अनेक अब्ज-अब्ज-अब्जांत जाऊन पोहोचली तर त्या इतक्या सा-या सजीवांच्या देहांमधे ते जे सारे आत्मे शिरले ते तोपर्यंत होते कुठे पृथ्वीचा जन्म होऊन मग पृथ्वीच्या पाठीवर जीवन अवतरेपर्यंत?

म्हणजे ते ह्या ब्रह्मांडातच फिरत होते??

पण म्हणजे ते इतके अब्जावधी आत्मे तोपर्यंत ह्या आपल्या सध्याच्या पृथ्वीवर नव्हते तर मग कुठे विहरत होते? पृथ्वीवर कुठून आले इतक्या सा-या सूक्ष्मजीवांपास्नं ते माणसांपर्यंतच्या उत्क्रांत सजीव  साखळीच्या देहांत शिरण्यासाठी? कसे आले? टाईम-वार्प मधून?  Worm Hole मधून? आणि पृथ्वीवरच्या इतक्या अब्ज अब्जावधी देहांत शिरण्यासाठी ते आले त्याअर्थी त्याआधी कुठल्या तरी अब्जावधी देहांचा त्याग करूनच आले असणार? म्हणजेच पृथ्वीचा जन्म होण्याआधी बाहेरही सजीव सृष्टी असणारच जिथे इतक्या आब्ज अब्जावधी मृतदेहांचा खच पडला असणार?

पण मग विश्वाची उत्पत्तीच जर मुळात एका सिंग्युलॕरिटीतनं झाल्ये बिग बँग होऊन, तर मग त्या सिंग्युलॕरिटीच्या वेळी हे इतके सारे आत्मे होते तरी कुठे? कुठल्या मितीत? 

की जसं नवीन जीव जन्माला येताना पेशींचं मल्टीप्लीकेशन होतहोत कोट्यवधी पेशी तयार होत शरीरांचे विविध अवयव बनतात तसंच मूळ कुठल्या तरी एकेक आत्मा split होतहोत इतके सारे आत्मे बनत गेलेत?

म्हणून मी जे माझ्यासारखेच अनेक प्रसन्न वेगवेगळ्या पॕरलल वर्ल्ड्समधे असणार असं मानतोय त्या सर्वांमधे एकाच आत्म्याचे तुकडे आहेत असं मानत आलोय, त्याहीपेक्षा जास्त तुकडे आणखी कुठल्याकुठल्या देहांत असणारेत? 

म्हणजेच ट्वीन सोल किंवा ट्वीन फ्लेममधे आपण जे एकाच आत्म्याचे दोन तुकडे मानतो, ते ट्वीन सोलही केवळ "दोन" नसू, केवळट्वीन्सनसून खरं तर खूप खूपसारे तुकडे असणारेत विश्वातल्या वेगवेगळ्या आकाशगंगांमधल्या वेगवेगळ्या सूर्यमालेतल्या वेगवेगळ्या ग्रहांवरच्या सजीवांच्या देहात असणारे??

तुम्ही म्हणाल "प्रसन्न हे काय चाललंय यडचापसारखं?"..पण आय स्वेअर...काल रात्रीपास्नं ह्यावरच विचार चाललाय डोस्क्यांत...

Friday, 3 September 2021

"हम दोनो"

"हम दोनो"
------
डोंगरउतारावरच्या त्या मळ्यातल्या तळ्याजवळ, देव साधनाची वाट बघत बसलाय! तिचेच विचार मनात चालू असल्यामुळे, तळ्यातल्या स्तब्ध पाण्यातसुद्धा त्याला तिचाच चेहरा दिसतो. तो 'भास आहे' असंच समजून देव एक खडा भिरकावतो पाण्यात आणि मग...त्या उमटत जाणा-या तरंगांमधंनं सिनेमाची टायटल्स येतात...ती संपता संपता बराssच वेळ तिची वाट पाहून हैराण झालेल्या देवला, अचानक "ते फेमस लायटरमधलं म्युझिक" कानावर येतं..,'ती आल्ये' ह्या भावनेनं देव उठतो आणि आसपासच्या वृक्षराजीत डोकावतो... ती दिसत नाही...पण तरीही पुनःपुन्हा लायटरमधलं म्युझिक मात्र कानावर पडतंय..आणि मग तिचं खळाळतं हंसू!.. आणि...आणि...देवला ती दिसते!…पण मग त्याची स्वारी रुसते!...तिला मनगटावरच्या घड्याळाकडे निर्देश करत तो हावभाव करतो "क्काय हे? किती उशीर? आता मी चाललो!".. आणि मग लटक्या रागात एका झाडाला टेकून, खिशातून एक रेशमी रिबिनीचं गुंडाळं काढून ते उलगडत बसतो...साधना त्याच्याजवळ येते...त्याचा लाडका सिगार काढून त्याच्या ओठात कोंबते आणि तो म्युझिकवाला लायटर काढून तो शिलगावते.. देव खुशीत ती लायटरची भेट स्वीकारतो! मग दोघे शेजारी बसून राहतात...ध्यानस्थ निसर्ग.!! मधूनच किंचित किलबिलाट...देव शांsत पहुडलाय...साधना बाजूलाच बसल्ये…किती वेळ झालाय कुणास ठाऊक!… साधना भानावर येते आणि 'आता निघायला हवं' ह्या जाणीवेनं उठते...डोळे मिटून पडलेल्या देवला 'डिस्टर्ब करायला नको' ह्या आविर्भावात चोरपावलानंs हळूच्च उठून निघते.. तेंव्हा लक्षात येतं की देवने - पठ्ठ्याने - तिची नजर चुकवून, तिच्या केसांच्या पोनीटेलला त्या उलगडलेल्या रिबिनीचं एक टोक बांधून, दुसरं आपल्या हातात ठेवलंय!.. त्यामुळे ती निघाल्यावर त्या रिबिनीच्या हिसक्यानं स्वारी डोळे उघडते आणि सिनेमा सुरु झाल्यापास्नं पहिली सात मिनिटं होईस्तो, इतका वेळ - एक्कही डायलॉगविना संपूर्ण शांsत असलेल्या पडद्यावरून - रफीसाबच्या मधाळ स्वरात देव गाऊ लागतो - "अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही"...

१९६१ सालच्या "हम दोनो"ची ही विलक्षण प्रेमभरली सुरुवात!! त्यावेळी देव होता ३८ वर्षांचा चाॕकलेट हिरो आणि साधना जेमतेम २० वर्षांची सुंदरी!..१९३१ सालच्या 'आलम-आरा' पासून तोपर्यंतच्या तीसेक वर्षांत हिंदी रुपेरी पडद्यानं 'देव-मधुबाला' आणि 'देव-नूतन' अशा दोन 'कमालीच्या गोड' जोड्या पाहिल्या होत्या. १९६१ साली देव-साधनाची जोडीसुद्धा तशीच गोड, देखणी जोडी म्हणून समोर आली ती ह्या "हम दोनो" सिनेमातनं! पुढे ही जोडी पुन्हा एकत्र आली ती "असली नकली"मधे...पण नंतर त्यांचा तिसरा सिनेमा "साजन की गलीयाँ" मात्र सुरु होऊन दोन गाणी चित्रित होऊनही पुढे पूर्ण होऊ शकला नव्हता...

सचिनदांचे आसिस्टंट म्हणून काम करणा-या जयदेवजींनी, स्वतंत्रपणे संगीत द्यायला सुरुवात केल्यावरचा त्यांचा हा चौथाच सिनेमा!! क्काय अफाट, अजरामर चाली दिल्याहेत त्यांनी यातल्या सहाच्या सहा गाण्यांना!!!! आणि साहिरजींच्या शायरीबद्दल क्काय बोलावं? या सिनेमातल्या एकाहून एक लाजवाब आणि अर्थपूर्ण गाण्यांवर तर स्वतंत्रपणे भरपूर बोलावं, इतका भन्नाट करिश्मा आहे साहिरजींच्या शायरीचा!! 

मोठ्या हट्टानं आपल्या मित्राला "अमरजीत"ला या सिनेमाची दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवलेल्या विजय आनंदला, नंतर मात्र पस्तावायची पाळी आली होती, कारण त्याने व्हिज्युअलाईझ केल्याप्रमाणे अमरजीतला काही केल्या तसं 'शूट' करणं जमेचना! काही प्रसंगी तर विजय आनंदने सीनचं संपूर्ण डिटेलींग करुन दिलं..अगदी कॕमेरा कुठे हवा, त्याची प्लेसमेंट वगैरे..तरीही अमरजीतचा गोंधळ उडायला लागला, मग मात्र विजय आनंदने स्वतःच मैदानात उतरुन, सूत्र हातात घेतली आणि आपल्यासमोर आज दिसतोय त्या रुपात "हम दोनो" तयार झाला! पण विजय आनंदला सलाम! कारण इतकं होऊनही "दिग्दर्शक" म्हणून आपल्या मित्राचंच, अमरजीतचंच नाव कायम ठेवण्याचा दिलदारपणा त्याने दाखवलान्!..

तर, आपण वळूया "हम दोनो"कडे!

हिंदी सिनेमांत ब-याचदा आढळते तशी गरीब तरुण आणि श्रीमंत तरुणीच्या प्रेमानं सिनेमाची सुरुवात होते! काळ आहे दुस-या महायुद्धाचा! आपल्या म्हाता-या आईबरोबर पडक्या घरात राहणा-या गरीब आनंदचं आणि धनाढ्य बापाची बेटी मीताचं एकमेकांवर प्रेम आहे. अर्थातच कुठल्याही बापाला "आपला जावई किमान आपल्या लेकीला नीट पोसेल असाच हवा" हे वाटणं हे साहजिकच! तिच्या वडिलांना आनंदची दरिद्री परिस्थिती कळते. पण त्यांच्यातला लेकीवर जीवापाड प्रेम करणारा पिता मनाविरुद्ध का होईना त्यांच्या लग्नासाठी तयार होतो पण त्याआधी ते त्याला चार शब्द सुनावतात की त्यांनी ज्या प्रेमात, ऐषोआरामात तिला वाढवलंय ते तो तिला देऊ शकेल? नुसत्या प्रेमावर भाकरतुकडा खात ती किती काळ संसार रेटेल? शेवटी पैसे लागतातच ना संसाराला? ..

इगो हर्ट झालेला आनंद तिथनं उठून निघतो..विमनस्क अवस्थेत भटकताना त्याला "सैन्यभरती"चा बोर्ड दिसतो आणि तिरीमिरीत तो थेट सैन्यात भरती होण्याचा निश्चय करतो. मीताच्या वडिलांनी डिवचलेल्या त्याच्या इगोला आता स्वतःला सिद्ध करणं महत्त्वाचं असतं...त्यामुळे मिताचं प्रेम मनात ठेवत तो घर सोडून निघतो...

आणि तिथनं सिनेमा एकदमच्च वळण घेतो. 

कट टू - 'वाॕरफ्रंट'वरचं त्याचं कुठेतरी झालेलं पोस्टींग! आणि तिथे असताना "गम और खुशीमें फर्क न महसूस हो जहां, मै दिल को उस मकाम पे लाता चला गया.." अशी अफ्फलातून, गजब की फिलाॕसाॕफी मांडणारी साहिरची बेमिसाल रचना!.. तिथे योगायोगाने त्याची भेट होते मेजर वर्माशी जो "मिशी आणि केसांचा भांग सोडला" तर हुबेहुब त्याचंच प्रतिरुप असतो! दोघांची दोस्ती होते. योगायोगात भर म्हणून की काय दोघं एकाच गावचेही निघतात! (पण सिनेमा बहुदा मनमोहन देसाईंचा नसल्यामुळे ते लहानपणी जत्रेत हरवलेले जुळे भाऊ वगैरे मात्र नसतात बरं का!😝)..एकमेकांशी एकमेकांच्या कहाण्यांचं शेअरिंग होतं. इथे या सिनेमातली साहिरची अद्वितीय रचना- "कौन रोता है किसी और की ख़ातिर ऐ दोस्त, सबको अपनी ही किसी बात पे रोना आया..कभी खुद पे कभी हालात पे रोना आया..." आनंद गाताना दिसतो..

आणि मग कहानी मे ट्विस्ट येतो...

बर्मा फ्रंटवरच्या ऐन धुमश्चक्रीत मेजरच्या आज्ञेनुसार कॕप्टन आनंदला युद्धभूमीवरुन मागे हटायला लागतं...मेजर युद्धात गेल्याची बातमी घेऊन एव्हाना बढती मिळून स्वतः 'मेजर' झालेला आनंद, मेजर वर्माच्या घरी जातो खरा..पण तिथे मेजरच्या पत्नीला, रुमा ला सौम्य हार्ट अटॕक आल्याचं डाॕक्टरकडनं कळल्यावर तिची नाजूक तब्येत लक्षांत घेऊन पुढचा धोका टाळण्यासाठी, त्याला डाॕक्टरच्या सांगण्यावरनं मेजर वर्माच्या रुपात तिथे वावरणं भाग पडतं..आणि सुरु होते त्याची कात्रीत सापडलेली अवस्था!..

एकीकडे त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आणि इतक्या वर्षांनंतर भेटलेली लाडकी प्रेयसी मिता आणि दुसरीकडे त्यालाच पती समजून त्याच्या आगमनाने खुष होऊन नव्याने उभारी घेतलेली रुमा!..एकीकडे प्रेयसीवरचं आत्यंतिक प्रेम आणि दुसरीकडे मानवतेच्या दृष्टीनं करावं लागणारं, मेजर वर्माच्या पत्नीबरोबरच्या प्रेमाचं नाटक...

ह्या घालमेलीतनं मेजर आनंदची सुटका होते का?..दोघींपैकी कुणाचा जोडीदार बनणं त्याच्या नशिबात असतं? सिनेमाचा शेवट सुखान्त होतो की सिरीयस?..

या सगळ्याची उत्तरं हवी असतील तर "हम दोनो" पाहायलाच हवा!...

"हम दोनो" येण्याआधी "लव्ह इन सिमला आणि परख" या दोन सिनेमांतनं साधनाने रसिकांचं लक्ष आपल्याकडे वळवलं होतं...या सिनेमात साधना खूपच लोभस दिसल्येय आणि तिच्या वाट्याला आलेली भूमिका तिने खूपच तन्मयतेनं साकारल्येय....साधनाआधी किमान चार वर्षांपास्नं सिनेसृष्टीत "भाभी, धुल का फूल, छोटी बहन, उसने कहा था, कालाबाजार" सारखे यशस्वी सिनेमे गाठीशी असलेली नंदा तशीही तिला सिनियर आणि "हम दोनो"तही तिला साधनाइतकाच किंबहुना जास्त कंगोरे असलेला रोल आहे! कारण देवचा ह्यात डबल रोल! एक कॕप्टन तर दुसरा मेजर! नंदाने मेजरच्या पत्नीचा रोल केलाय! लताबाईंच्या आवाजातली "प्रभू तेरो नाम" आणि "अल्ला तेरो नाम" ही दोन अप्रतिम भक्तिगीतं तिला ह्यात गायला मिळाली आहेत. मेजरबरोबरचे घरगुती प्रेमळ प्रसंग किंवा एकीकडे  स्वतःचं आजारपण सांभाळत मेजरच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या रुमाचं कातर, हळवेपण आणि त्यच्यावरचं आत्यंतिक प्रेम नंदाने फारच सुरेख साकार केलंय! 

देवनेही खूप मन लावून अॕक्टींग केल्याचं जाणवतंय यात!!. अगदी डबल रोल करताना मॕनरीझम्स आणि संवादफेकही दोन्ही व्यतिरेखांची जाणीवपूर्वक वेगळी ठेवल्येय त्याने!!..आणि हो, कमाल म्हणजे "हर फिक्र को धुएँ मे उडाता चला गया.." म्हणताना, त्याआधी आणि नंतरही बहुतेक सिनेमांत वरपर्यंतची बटणं लावून गळाबंद शर्ट घालणा-या देवने स्वतःच्या शिडशिडीत देहयष्टीची "फिक्र न करता" चक्क "शर्टलेस उघड्या अंगानं" एक कडवं गायलंय चक्क!!

आता जरी त्याची रंगवलेली प्रिंट बाजारात आणली गेल्ये तरी मूळ ब्लॕक अँण्ड व्हाईटचा मझा औरच हे मात्रं निश्चित!!..

नवकेतन बॕनरचे हुकुमी सचिनदां म्युझिकसाठी नसले तरी त्याकाळात त्यांचेच असिस्टंट म्हणून काम केलेल्या जयदेवजींनी विलक्षण मधूर संगीत दिलेली एकाहून एक अजरामर गाण्यांनी सजलेला हम दोनो हा देव आनंदचा स्वतःचाही आवडता सिनेमा होता...

या सिनेमात दोनतीनवेळा केलेला "डायलाॕग्जविना शांततेचा" वापर सुरेखच!! आणि सिनेमा शेवटाकडे जातानाचा तो दोन मेजर्सचा जवळजवळ सहासात मिनिटांचा सीन! खरंच खूप मनापास्नं रंगवलाय देव ने!...शेवटची तीन मिनीटं ख-या अर्थानं क्लायमॕक्सची!!..

"हम दोनो" हे टायटल सार्थ करणारा या कथेचा हृद्य शेवट आपल्याला भावूक करुन जातो...

शेवट सांगत नाही. तुम्ही पाहा आणि आधी पाहिला असेल तर पुन्हा तितकंच रंगून जाऊन पुनःप्रत्ययाचा आनंद घ्या! शेवटी आपल्या लाडक्या देवसाबचा महत्त्वाचा मूव्ही आहे हा!!

Friday, 20 August 2021

इंटरस्टेलर

"इंटरस्टेलर"
----------
काही विशेष कारण नसताना काहीकाही गोष्टी आपल्या हातनं त्या त्या वेळेला होत नाहीत...पण काही काळ उलटल्यावर का होईना त्या होतात आणि मग एक विलक्षण पूर्तीचा, काहीतरी अचिव्ह केल्याचा, एक प्रकारचा कृतकृत्यतेचा जो काही आनंद मिळतो नं तो अवर्णनीयच असतो...शब्दांत मांडणं मुश्कील!...

मला आलेयत् असे अनुभव आयुष्यात! म्हंजे मला हवी तेव्हा न भेटलेली काही माणसं उशीरानं, पण अतर्क्य प्रकारे भेटणं, काही विलक्षण स्थळं जिथे खूप वर्षांपूर्वी जायचं राहून गेलं होतं त्या ठिकाणी ध्यानीमनी नसताना जायला राहायला मिळणं, खूप पूर्वीपास्नं डोक्यात असलेली काही पुस्तकं उशीराने का होईना आचानकच हातात येणं आणि तसंच काही सिनेमे -- जे खरं कधीच पाहायला हवे होते - पण आता उशीरा का होईना ते एंजाॕय करायला मिळणं! उदाहरणार्थ - काल रात्री पाहिलेला क्रिस्तोफर नोलानचा "इंटरस्टेलर"!!

हा सिनेमा २६ आॕक्टोबर २०१४ रोजीचा! म्हणजे चक्क सात वर्षं जुना!!..पण डोस्क्यातल्या लिस्टमधे जे शेकडो मूव्हीज "बघायचेच्च/ Must see" म्हणून ठेवलेत त्यात तो साठून राहिला होता...काल अचानकच 'तोच्च पाहावा' असं डोस्क्यात आलं...पाहिला..आणि वेडाच्च झालो!

रिलेटिव्हिटी, स्पेस-टाईम, ब्लॕक होल, टाईम ट्रॕव्हल आणि वर्म होलसारख्या एकेक विलक्षण सायंटिफिक कल्पना आणि त्या सर्वांचं एक अतिशय कंन्व्हिन्सिंग असं भन्नाट सादरीकरण!

ब-यांचदा सायन्स-फिक्शन (Sci-Fi) मूव्हीज म्हणजे प्रचंड स्पेशल इफेक्ट्स (SFx) वापरुन केलेलं रोमांचक, थ्रिलिंग, वेगवान सादरीकरण असतं...आपल्याला गुंगवणारं..पण तरी काहीसं वरवरचं!...पण "इंटरस्टेलर" वरवरचा राहात नाही तो कमालीचा भिडतो आणि घुसतोच्च मनांत! आरपार...

"अद्भूताचं, पॕरलल वर्ल्ड, स्पेस/अॕस्ट्राॕनाॕमीचं" वेड आसणा-या माझ्यासारख्याला तो जरा जास्तच भावला कारण त्याला कन्व्हिंन्सिग स्टोरीबरोबरच, 'बाप-लेकीच्या नात्यातला बंध' हा कणखर गाभा असल्यामुळे!

तसं पाहिलं तर कथा एका वाक्यात मांडता येणारी - "पृथ्वीवरचं मानवाचं अस्तित्वं एहाना धोक्यात आल्यानं, पृथ्वी सोडून अंतराळात प्रचंड अंतरं पालथी घालत मानवजातीला कायमची वस्ती करण्यायोग्य ग्रह शोधणा-या कथानायकाची कथा"!

पण या वाक्याला नोलान नं जी ट्रीटमेंट दिल्ये ती पाहताना....नव्हे, अनुभवताना आपण अचंबित होतो! 

तसं तर या सिनेमाच्या तब्बल ४६ वर्षं आधी म्हणजे १९६८ साली, स्टॕन्ले क्युब्रिकनं "2001: A Space Odyssey" हा काळाच्या पुढचा, अचाट सिनेमा बनवला होता...आणि तेव्हापास्नं ते "इंटरस्टेलर" येईपर्यंतच्या मधल्या ४६ वर्षांमधे "स्टार ट्रेक, स्टार वाॕर्स (चार भाग),  इ.टी., एल्यन्स, बॕक टू द फ्युचर (तीन भाग), क्लोज एनकाउंटर्स आॕफ द थर्ड काईंड" असे कितीतरी मूव्हीज येऊन गेले आणि मी ते सगळेच अधाश्यासारखे बघत गेलो होतो त्या त्या वेळी..अगदी मुंबईतली फोर्ट साईडची थिएटरं पालथी घालत...त्या सगळ्या मूव्हीजमधे टेक्नीकल सफाई होती, व्हिज्युअल इफेक्ट्स होते ..स्टार वाॕर्सला तर 'द ग्रेट' "जाॕन विल्यम्स"चं अफलात्तून म्युझिक होतं..

पण तरी हा काल पाहिलेला "इंटरस्टेलर"चा इंम्पॕक्ट काही आगळाच म्हणता येईल!!...एकतर SFx , VFx चं तंत्रज्ञान त्या आधीच्या सगळ्या मूव्हीजच्या तुलनेत २०१४ पर्यंत कॕयच्यॕकॕय अॕडव्हान्स झालेलं, त्यामुळे यातली 'वर्म-होल'मधे शिरल्यानंतरची दृश्यं...जिथे स्पेस-टाईमचं एक अद्भूत रसायन तयार होऊन स्पेसशिप कल्पनातीत गतीनं आपल्या आकाशगंगेतनं वेगळ्याच आकाशगंगेत शिरते...आणि पुढे जाऊन नायक एका विचित्र कालमितीत अडकतो आणि एकाचवेळी भूतकाळ आणि वर्तमानाचा अनुभव घेतो...वगैरे..ते जे काही पडद्यावर दाखवलंय त्याला तोडच्च नाही!..

मुख्य म्हणजे आपल्या मुलीवर आत्यंतिक प्रेम असणा-या ह्या अंतराळप्रवासी कूपरचा (मॕथ्यू मॕकाॕनहे) आपल्या लेकीला मर्फी ला (मॕकन्झी फाॕय) सोडून पाय निघत नसतानाही, केवळ कर्तव्य म्हणून, मानवजातीच्या भविष्यातल्याअस्तित्वासाठी स्पेसशिपमधे बसून वर्म होलमधून आरपार जात वेगळे वस्तीलायक ग्रह धुंडाळण्यासाठी तो निघतो तेव्हाची त्याची घालमेल...बाबा सोडून गेला म्हणून लेकीचः रडणं हे तर डोळ्यात पाणी उभं करणाराच प्रकार सगळा...

वर्महोलमधून जाणं हे इतकं बेफाट दाखवलंय..(एव्हाना आपल्यापैकी बहुतेकांना 'ब्लॕक होल' आणि 'वर्म होल' कंन्सेप्ट्समधला फरक माहित झाला असेल! एका वाक्यात सांगायचं तर - ब्लॕक होल म्हणजे ब्रह्मांडातली अशी जागा जिथे कोणतीही वस्तू/ पदार्थ आत शिरले की गिळंकृत केले जातात, पुन्हा तिथनं बाहेर येऊ शकत नाहीत, व्हेअरअॕज, "वर्म होल" असा एक बोगदा जिथनं तुम्ही वेगळ्या प्रकारचा कालप्रवास करत एकाआकाशगंगेतनं कल्पनातीत वेगानं दुस-या आकाशगंगेत जाता आणि त्याच बोगद्यातनं पुन्हा विशिष्ट कालप्रवास घडत आपल्या आकाशगंगेत परतही येऊ शकता!)...

अश्या अचाट, अद्भूत गतीनं कालप्रवास करणा-यासाठी काळ जणू थबकतोच...मग तो कथानायक परततो तेव्हा त्याचं वय तेव्हढंच पण इथे त्याची वाट बघणारी लेक नुस्ती मोठीच नाही तर म्हातारी होत जाऊन मृत्यूशय्येवर...हे सर्व आपण आ वासत बघत राहतो...

या सिनेमातले काही डायलाॕग्ज सुन्न करत आपल्या काळजाचा ठाव घेणारे -

"After you kids came along, your mom, she said something to me I never quite understood. She said, "Now, we're just here to be memories for our kids." I think now I understand what she meant. Once you're a parent, you're the ghost of your children's future."

"Mankind Was Born On Earth. It Was Never Meant To Die Here"

आणि सर्वात सर्वात काळजात रुतलेला आणि विचारात पाडून गेलेला डायलाॕग -

"Love Is the one thing we're capable of perceiving that transcends dimensions of Time And Space".....कित्ती खरंय ना हे?!❤️☺️

Sunday, 18 July 2021

राजेश-रफीसाब!

राजेश-रफीसाब!
------------
नव्या पिढीला हे ठाऊक असावं म्हणून -->>

सुरुवातीच्या १९६६/६७/६८ मधल्या "आखरी खत, औरत, राझ, बहारों के सपने" ह्या चार फ्लाॕप ठरलेल्या सिनेमांनंतर १९६९ साली राजेशचा "आराधना" आला!

आराधनाची दोन ड्युएट्स - "गुनगुना रहे है भँवर" आणि "बागोमें बहार है" - ही आधी रेकाॕर्ड झाली होती आणि आणखी तीन गाणी रेकाॕर्डिंगसाठी बाकी होती. त्यावेळी ही दोन ड्युएट्स रेकाॕर्ड करुन रफीसाब तीन महिन्यांच्या परदेश दौ-यावर गेले..आणि त्याचवेळी इकडे सचिनदा नेमके आजारी पडले!.. त्यांच्याऐवजी जबाबदारी सांभाळणा-या आरडीने रफीसाब परत येईपर्यंत न थांबता, आपल्याच आवडत्या मित्राकडून, वंगबंधु किशोरकुमारकडून उरलेली तीन गाणी रेकाॕर्ड करुन घेतली!..आणि इतिहास घडला!..किशोरचं आणि राजेशचं जन्मजन्मांतरीचं असावं असं काहीएक नातं जुळलं आणि मग त्यानंतर आलेल्या "मेहबुब की मेहंदी, आन मिलो सजना, हमशकल" मधली रफीसाबची गाणी सोडली, तर पुढच्या बहुतेक सर्वच सिनेमात राजेश-किशोरकुमार हे समीकरण राज कपूर- मुकेश आणि शम्मी कपूर- रफीसाब इतकंच घट्ट होऊन गेलं!!!!

राजेश खन्नाचं नाव घेतलं की -'लगेच किशोरकुमारची गाणी गायला सुरुवात करणा-या, फक्त नवनवीन एफएम चॕनल्स फाॕलो करणा-या आणि विविधभारती अजिबातच न ऐकणा-या'- नव्या पिढीला रफीसाबनी राजेशसाठी गायलेली बेमिसाल गाणी माहित असूद्यात म्हणून ही "निवडक २० गाणी" ->>
----------------------
१) सोचता हूँ की तुम्हे मैने कही देखा है

https://youtu.be/97wyhqXIC0k

२) और कुछ देर ठहर, और कुछ देर न जा

https://youtu.be/6pHGlkbUz28

३) अकेले है चले आओ जहाँ हो

https://youtu.be/IkrLvHqMv4A

४) ये रेशमी जुल्फे, ये शरबती आँखे

https://youtu.be/q9aMSJGAkeY

५) यूँ ही तुम मुझ से बात करती हो

https://youtu.be/U-YQkFTi1Zk

६) छुप गये सारे नजारे ओय क्या बात हो गयी 

https://youtu.be/1lyJyjSezC8

७) सजना साथ निभाना

https://youtu.be/KhEN6wTczC4

८) गुलाबी आँखे जो तेरी देखी

https://youtu.be/I5t894l5b1w

९) मुझ से भला ये काजल तेरा

https://youtu.be/otq9Ddn-ZrU

१०) ये जो चिलमन है

https://youtu.be/VCcd42LHgoA

११) इतना तो याद है मुझे

https://youtu.be/QEMlo1H9wX8

१२) पसंद आ गयी है इक कफिर हसिना

https://youtu.be/atsfvBWfX_w

१३) काहे को बुलाया मुझे बार बार

https://youtu.be/UFWAqvIvxg8

१४) अब आन मिलो सजना

https://youtu.be/yyKkyFYskpo

१५) कोई नजराना लेकर आया हूँ मै

https://youtu.be/nbejxMsGCnQ

१६) येह रात है प्यासी प्यासी

https://youtu.be/iZ0aLW-BtIE

१७) गुनगुना रहे है भँवर

https://youtu.be/l5ZSoNAXnV

१८) बागो में बहार है

https://youtu.be/flzChjE_62w

१९) नफरत की दुनिया को छोडकर

https://youtu.be/4kBLExOafhQ

२०) जमाने ने मारे जवाँ कैसेकैसे

https://youtu.be/CAek1_h5aFY

Wednesday, 14 July 2021

फ्लर्टीन्ग.....फ्लर्टीन्ग...!!”

“फ्लर्टीन्ग.....फ्लर्टीन्ग...!!”  
-----------------                                             
CNN-IBN वर वहिदा रेहमानची मुलाखत चालू होती. बोलता बोलता तिने एक जुना किस्सा सांगितला. देव आनंदच्या बंगल्यात कुठल्यातरी इस्श्युवरून सर्व फिल्मवाल्यांची मिटींग सुरु होती.

आघाडीचे कलाकार एकेक करून येत होते. नंदाबरोबर वहिदा होती. सुनील दत्त, नर्गिस, दिलीपकुमार, राजेंद्रकुमार असे जमायला लागले होते. वहिदाला पाहिल्यावर नटमंडळी तिच्याजवळ जाऊन “हलो वहिदा” करून तिला विश करत होते. पण वहिदा मात्र संकोचून, खांदे आक्रसून नमस्कार करून काहीशी बाजूलाच सरकत होती. एव्हढ्यात दस्तुरखुद्द देवने त्याच्या स्टाईलमध्ये एन्ट्री घेतली. “हल्लो नंदाss”…”हाssय” करत करत तो वहिदाजवळ आला आणि तिच्या खांद्याभोवती एक हात टाकत तिला “हल्लो वहिदा” करून पुढे गेला. ती साहजिकच गोड हसली. ते पाहून सुनील दत्त, राजेंद्रकुमार आदी तिला विचारते झाले,”हे काय? आम्ही एव्हढ्या प्रेमाने जवळ आलो, तर तू खांदे झटकलेस आणि हा देव येऊन तुझ्या गळयाबिळयात हात टाकून ‘हल्लो..” म्हणाला तर तू अगदी खुशीत हसत्येस? ह्याला काय अर्थ आहे?” 😲

त्यावर वहिदा गोड हसून म्हणाली,”हो!कारण तो एक Decent Flirt आहे!”- हा किस्साऐकला आणि मला त्या शब्दाची गम्मत वाटली.Decent Flirt! म्हंजे फ्लर्टीन्गमधेसुद्धा काही पातळ्या असू शकतात तर!...

मग विचार करता करता लक्षात आलं की “अरेच्या, खरंच आहे की ते!” मुळात, फ्लर्टीन्ग किती प्रकारे केलं जातं ते आपण बघतोच, आणि ते ज्या उद्देश्याने केलं जातं ते ही किती भिन्न असू शकतात! पण आपल्या समाजात फ्लर्टीन्गकडे एका negative connotation नेच का बघतो नेहेमी? खरं तर प्रत्येकजण कळत नकळत आयुष्यात कधी ना कधी फ्लर्टीन्ग करत असतातच की! कोणी गंमतीत...कोणी मस्करीत...कोणी प्रेमाची पहिली पायरी चढण्यासाठी...कोणी प्रियाराधनेचा एक आविष्कार म्हणून...कोणी उगाचच “imp” मारायला...तर कोणी चक्क त्याची परिणीती सेक्सपर्यंत नेण्यात...!

बरं, फक्त माणूसच नव्हे तर पशु-पक्षी, इतकंच काय वनस्पतीसुद्धा फ्लर्टीन्ग करतातच की! प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळ्या...साधनं वेगळी...पण इप्सित साध्य एकच – “तिला जिंकणं”!..एक मजेशीर वाक्य वाचलं होतं –“फ्लर्टीन्ग हे मासेमारी करण्यासारखं आहे. गळाला ‘ती’ लागायला हवी!” ;-) 

फ्लर्टीन्ग ची नेमकी व्याख्या काय करावी बरं? मला वाटतं –“ नजरेतून, शब्दांतून, हावभावांतून आणि स्पर्शातून आपली प्रेमभावना किंवा जिव्हाळा व्यक्त करणं – ज्यायोगे त्या दोन जीवांमध्ये एक प्रेमाचं, गोड मैत्रीचं नातं निर्माण होईल!”..आणि त्यातूनच कदाचित काहींच्या बाबतीत शारीरिक जवळीक निर्माण होत असावी! आणि हे असं ‘शब्दांतून, नजरेतून, स्पर्शातून’ व्यक्त होणं आपण आयुष्याच्या विविध टप्प्यांवर पाहत असतो. अनुभवत असतो. कित्येकदा दुरून, तर कित्येकदा प्रत्यक्ष सहभागी होऊन. आणि त्यासाठी टेलरमेड सिचुएशन हवीच असंही काही नाही. दोन जीवांचा सहवास घडला, तर त्यांच्यातली केमिस्ट्री जुळायला, वेव्हलेंग्थ जुळायला – त्यांना एकमेकांविषयी ‘काही वाटणं’ व्यक्त करायला कुठलही ठिकाण चालतं. पार्टीत, हॉटेलमध्ये, गर्दीत, पिकनिकला, ट्रेनमध्ये, बसमध्ये, कट्ट्यावर, बिल्डींगमध्ये, भर ऑफिसमध्ये!..अक्षरशः कुठेही फ्लर्टीन्गला स्कोप असतो.फ्लर्टीन्गमध्ये अर्थातच म्हटलं तसं ‘डोळे, स्पर्श आणि शब्द’ यां तीन गोष्टींना प्रचंड महत्त्व असतं!

पुरुषांच्या फ्लर्टीन्गची पहिली पायरी अर्थात ‘दृष्टादृष्ट होणे’ किंवा ‘नजरेत नजर मिसळणे’. एकदा हे जमलं की त्यातून मग थोडं धीटपणा वाढून मग ‘शब्दांचा’ आधार. काही इंटरेस्टिंग बोलणं..गप्पा...ज्योक्स...किस्से वगैरे. मग हावभावांतून, gestures मधून ...हलकासा स्पर्शाचा आधार!..आणि हे सर्व अत्यंत सहज होत असतं. नजरेत नजर मिसळता मिसळता दुसरीकडे वळवून पुन्हा तिच्या डोळ्यांत मिसळणं..डोळे मिचकावत किंवा डोळा मारत बोलणं...”तुझा आवाज किती गोड आहे”..”तुझ्या डोळ्यांचा रंग किती सुरेख आहे” ...”तुझे केस किती सिल्की आहेत”...”काय सुंदर कॉम्प्लेक्शन आहे तुझं “ – वगैरे वगैरे..आणि हे सर्व बघणं-बोलणं चालू असताना हातावर टाळी देणं किंवा खांद्याला हलकासा स्पर्श करणं – यांतून ती अभिप्रेत असलेली ‘जवळीक’ जाणवून जाते. हे झालं मुलांचं, पुरुषांचं फ्लर्टीन्ग!!......मुलींच्या, बायकांच्या फ्लर्टीन्गची तऱ्हा काही औरच!...

त्या मुद्दामहून मुलांच्या समोर नाचतील...काहीतरी टोमणे मारून हसतील किंवा चिडवल्यासारखं बोलतील. त्या मुलाने पाहिलंच तर भलतीकडेच बघतील. नवीन ड्रेस घातला असेल किंवा नट्टापट्टा केला असेल तर तो त्या मुलाच्या लक्षात येईपर्यंत मुलांच्या समोर चकरा काय मारतील!...

थोडक्यात, ‘विशेष लक्षवेधी अभिनेत्री’ बनतील!..त्या मुलाकडून शब्दांत किंवा नजरेतून पसंतीची पावती मिळेपर्यंत त्यांचं हे बागडणं चालू असतं. कधीकधी तर असंही होतं की तिच्या आसपास बरेच handsome मित्रअसतात तरी बाजूला त्यामानाने साधारण दिसणारा पण अभ्यासाबिभ्यासात हुशार असणारा मुलगा तिच्याकडे लक्ष न देता बसला असला, तर अश्यावेळी हटकून इर्षेने ती challenge घेतल्यागत त्याचं लक्ष वेधूनघेण्यासाठी शब्दाचे, नजरेचे विभ्रम करत राहते ... त्यांचं लक्ष वेधून घेईपर्यंत!...त्याला –so called “वश करेपर्यंत”! (आणि मग त्यांचं पटलंच , तर मग कधीकधी आपल्याला अश्या विजोड जोड्या बघायला मिळतात!)...थोडक्यात म्हंजे मुलींचं फ्लर्टीन्ग हे खूपच निराळं...’वशीकरण’ विद्येचं चालतंबोलतं उदाहरणच!!...

फ्लर्टीन्गमध्ये कधीकधी दोघांकडून कळतनकळत अत्यंत तरल आणि संयत पातळीवर एकमेकांमध्ये गुंतणंही होतं. यासंदर्भात एक अत्यंत गोड सीन आठवतोय. मला खूपच आवडलेल्या “सेरेंडीपिटी” सिनेमाच्या सुरुवातीला होणारी हिरो-हिरोईनची भेट. एक विलक्षण योगायोगांची मालिका. असं होतं – हिरो (जॅक क्युसॅक) आणि हिरोईन (केट बेकिंसेल) हे क्रिसमस सीझनच्या धामधुमीत न्युयॉर्कमधल्या ब्लूमिंगडेल मॉंलमध्ये आपापल्या होणाऱ्या जोडीदारासाठी काहीतरी गिफ्ट घ्यायला आलेत. दोघांचीही नजर एकाचवेळी जाते ती एका सुंदर हंड्ग्लोव्ह्जच्या जोडीवर! दोघांचेही हात एकाचवेळी त्या ग्लोव्हजवर पडतात. मग एक गोड स्मित. नजरानजर. त्या साध्याश्या योगायोगातून त्यांचं बोलणं...गप्पा...मग थोडावेळ आहेच तर आईस्क्रीम खाण्यासाठी दोघं “सेरेंडीपिटी” पार्लरमध्ये...मग आणखी गप्पा...दोघं तिथून निघतात. बाहेर पडल्यावर दोघांनाही काहीतरी विसरून आल्याची जाणीव. तो त्याचं मफलर न्यायला आलाय. बघतो तर ती तिथे पोचून आपलं सामान उचलून त्याचाच विसरलेला मफलर न्याहाळत्येय..तो पुढे येतो...ती त्याचं मफलर त्याच्या गळ्यात घालते. ..इथे कुठेतरी मैत्री अन्कुरल्ये...तिथून दोघं स्केटिंगरिंकवर जातात. ..स्केटिंग करता करता एकमेकांच्या आवडीनिवडी जाणण्याचा प्रयत्न...एव्हढ्यात ती घसरून पडते...थोडंसं हाताला खरचटलय. तो तिचा पुलओव्हर मागे सारून खरचटलेलं बघताना त्याची नजर तिच्या हातावरच्या गुलाबी ठिपक्यांवर. ते फ्रेकल्स बघताना तो एकदम “कॅसिओपिया” म्हणतो...ती गोंधळल्ये...तो स्केचपेनने ते ठिपके जोडून ‘M’ आकाराचं कॅसिओपिया (शर्मिष्ठा) नक्षत्र पूर्ण करतो आणि तिला कॅसिओपियाची कहाणी ऐकवतो...त्यांचे सूर जुळायला लागलेले...एव्हाना किंचित भुरभूर बर्फ पडायला सुरुवात झालेली...आपल्या होणाऱ्या जोडीदाराचा विसर पडून ती दोघं त्या क्षणापुरतं एकमेकांत गुंतलेली...तो हलकेच तिच्या डोक्यावर पडणारे बर्फाचे कण अलगद बोटं फिरवून उडवतो...मग दोघं बेंचवर बसून गप्पा मारताना – त्याचं तिच्या हाताचं हलकंसं चुंबन घेणं...पुढे??..

पुढचं सगळं सांगत बसत नाही, पण तुमच्या लक्षात आलं असेल की फ्लर्टीन्गमध्ये अभिप्रेत असलेली सर्वच लक्षणं सिनेमाच्या त्या पहिल्याच सीनमध्ये अत्यंत तरल, संवेदनशील पद्धतीने आपल्या समोर येतात...त्याची ती योगायोगाने झालेली भेट...नजरानजर...स्मितहास्याची देवाणघेवाण..आश्वासक जवळीक..एकत्र आईस्क्रीम खाणं...त्याच्या गळ्यात तिने मफलर घालणं...एकत्र स्केटिंग...हस्तस्पर्श...तिच्या केसातून त्याने हात फिरवणं...हाताचं चुंबन..खरंच!! एक हळुवार सुंदर पद्धतीने – गोड फ्लर्टीन्गने फुलत गेलेलं नातं!...खूपच गोड!..

फ्लर्टीन्गची हीच तर गम्मत आहे. ते काही ठरवूनबिरवून नाहीच करता येत. ती एक सहजप्रवृत्ती आहे. ज्यांना जमतं त्यांना जमतं. ज्यांना नाही जमत, त्यांना नाहीच जमत! It’s that simple!...कुणी असं ठरवलं की “अमुकअमुक मुलीजवळ बसून मी पुढची पाच मिनिटं फ्लर्टीन्ग करतो हां का” – तर त्याचा पचका होण्याचीच शक्यता ज्यास्त! कारण अश्या ओढूनताणून इम्प्रेशन मारण्याच्या नादात, फ्लर्टीन्गमधली ती निरुपद्रवी पातळी ओलांडली जाऊन ‘छेडछाडीचं’ स्वरूप येऊन नसता गोंधळ होण्याची शक्यताच ज्यास्त! छेडछाडीवरून आठवलं. छेडछाड असते बरं का फ्लर्टीन्गमध्ये! पण ती डायरेक्ट अंगाशी जाऊन नव्हे तर थट्टामस्करीच्या अंगाने! उदाहरणच द्यायचं झालं तर श्रीकृष्णाचं! श्रीकृष्णाच्या कथांमध्ये तो, स्नान करत असलेल्या गोपींची, गवळीणींची वस्त्र पळवून लपवून ठेवायचा आणि त्यांनी विनंती आर्जवं केली की त्यांना परत द्यायचा अशी वर्णनं आहेत. त्या दूध, लोणी विकायला निघाल्या की त्यांना अडवणं आणि लोण्याच्या गोळ्याचे, दूधाचे ‘टोल वसूल’ केले की त्यांना सोडणं हे ही त्याच्या गंमतीशीर फ्लर्टीन्गचा भाग होतं!..

फ्लर्टीन्गची खूप जवळून ओळख आपल्याला होते ती सिनेमे बघून! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात हिरोने काहीतरी गमतीशीर कॉमेंट करून, डोळेबिळे मिचकावत गाणं म्हणून किंवा वेश बदलून, रूप पालटून हिरोईनबरोबर मस्ती करणं – यातून अनेकदा सिनेमातली प्रेमप्रकरणं सुरु होतात. कधीकधी ती दूर असताना गाणीबिणी गाऊन त्या गाण्यातून तिची मनधरणी करणं हे ही एक प्रकारचं फ्लर्टीन्गच! पटकन उदाहरणं सांगायची तर रेल्वेच्या खिडकीत बसलेल्या हिराॕईनला उद्देश्यून रस्त्यातून जात “जिया ओ जिया ओ जिया कुछ् बोल दो” किंवा “मेरे सपनो की रानी कब आयेगी तू” सारखी गाणी...किंवा डोक्यावर बुरखा पांघरून बसलेल्या हिरोईनला म्हणणं “अपने रुख पर निगाह करने दो, खुबसुरत गुनाह करने दो..” वगैरे वगैरे...

काही काही प्रसंगातून संयत फ्लर्टीन्गही दिसतं. ‘आनंद” मध्ये बाबूमोशाय लाजरा...तो काही बोलायला तयार नाही, म्हणून आनंदच बाबुमोशायला आवडणाऱ्या मुलीला त्याच्या भावना सांगून टाकतो. बाबुमोशायला हे कळल्यावर तो तिला विचारतो,” क्या आपने आनंदकी बातोंका यकीन तो नही किया?” आणि त्यवर ती नकारार्थी मान हलवताच त्याच्या तोंडून पटकन शब्द बाहेर येतात “क्यू नही किया?”....खूप भावतं हे संयत प्रेम. 

तसाच अजून एक सीन “कभी कभी” मधला...“मै पल दो पल का शायर हूँ” ऐकून त्याच्या शायरीवर फिदा झालेली पूजा अमितची स्वाक्षरी घेण्यसाठी वही पुढे करते. तेंव्हा तिचा ‘पूजा’ हे नाव ऐकून अमित चटकन म्हणतो,” तो क्या मेरा नाम ‘पुजारी’ नही हो सकता?” ही झाली उदाहरणं शाब्दिक फ्लर्टीन्गची!...कधी कधी शब्दांबरोबर किंचित धिटाईही जोडीनं येते. जसं “त्रिशूल” सिनेमात. हेमामालीनिशी झालेल्या पहिल्याच भेटीत तिच्यावर लट्टू झालेलं शशीकपूर तिच्याशी बोलताना..त्यांच्या गप्पातून तिचं कर्तुत्व ऐकून आणि त्याच्या आवडीनिवडी जुळत असल्याचं लक्षात आल्यावर तिचा हात पुनःपुन्हा हातात घेऊन तिचं अभिनंदन करत तिला थेट सांगतो “आपके हमारे खयालात कितने मिलतेजुलते है! वैसे आप आज शाम को क्या कर रही हो?”...

हे पुन्हा सगळ्यांना जमतच असंही नाही. व.पुं.चं एक मार्मिक वाक्य आहे –“डोळे आणि स्पर्श, शब्दांपेक्षा छान बोलतात.” मला वाटतं हे वाक्य खूपच बोलकं आहे, कारण कित्येकदा असं घडतं की दोघं एकत्र आहेत अगदी भर गर्दीत! आसपास माणसांचा महासागर. अश्यावेळी शब्दांतून काही सांगण्याची गरज नसते. बस्स, तिच्या डोळ्यांत डोळे मिसळायचे..हातात हात गुंफायचे..आणि मग दोघांचे डोळेच डोळ्यांशी संवाद साधतात. गुंफली गेलेली बोटं ..तो स्पर्श खूप काही सांगून जातो. त्यांचं “एकमेकांसाठी असणं” हे ती नजर आणि तो स्पर्श इतकं छान व्यक्त करतात की आपण जणू जन्मजन्मांतरीचे Soulmates  असल्याची खात्री त्या दोघांना पटते. फ्लर्टीन्गचा हा खूप तरल अविष्कार. त्या ‘नजरेवर’ गुलझारजींची एक त्रिवेणी प्रसिद्ध आहे..शांताबाईंनी गोड अनुवाद केलाय –

“डोळ्यांना सांग तुझ्या, इतक्या लोकांत

एव्हढ्या मोठ्याने बोलू नका माझ्याशी –

लोकांना माझे नाव ओळखू यायचे कदाचित!”

नजरेच्या यां खेळावरून आठवते तो “शोले” मधली अमिताभची, विधवा जयाच्या डोळ्यांत डोळे घालून खूप काही बोलणारी नजर!...

फ्लर्टीन्गमध्ये मिश्कीलताही असते आणि टिपणारे ‘इक घर बनाउन्गा तेरे घर के सामने” आणि “देखी रुठा ना करो बात नजरोन की सुनो”ह्या दोन गाण्यांतले देव आणि विशेषतः नूतन चे गोड विभ्रम!! ती फ्लर्टेशस एक्स्प्रेशन्स क्या केहने? लाजवाब!!.......

सिनेमातल्या फ्लर्टीन्गविषयी बोलताना शम्मी कपूरचा उल्लेख तर यायलाच हवा.त्याच्या बहुतेक सर्वच सिनेमात त्याचं हिरोईनला पटवणं हे फ्लर्टीन्गचे एकसोएक इरसाल नमुनेच आणि जोडीला बेमिसाल गाणी! ती हिरोईन अश्या फ्लर्टच्या प्रेमात पडली नसती तर नवल! काव्यमय फ्लर्टीन्गचा एक वेगळा तरल अनुभव देणारा सिनेमा म्हंजे “कॅसाब्लांका”.

इंग्रीड बर्गमन योगायोगाने हम्फ्री बोगार्टच्या कॅफेत आल्ये. त्यांचं जुना दोस्त Sam तिथे दिसलाय. आणि मग जुन्या प्रेमाच्या स्मृती जागृत होऊन, रिकच्या आठवणीत ती Sam ला तो पूर्वी म्हणायचा तेच गाणं पियानोवर वाजवायला सांगते-“प्ले इटSam, फॉर ओल्ड टाईम् ससेक!” –Sam ते गाणं गायला लागतो आणि ते ऐकून हादरलेला रिक धावतच तिथे पोचतो तो त्याच्या लाडक्या ‘कीड’ समोरच! त्यांची नजरानजर....तो सीन बघण्यात मजा आहे....

मी पशुपक्ष्यांचा उल्लेख केला. आपण लाक्खो वेळा या संदर्भातल्या फिल्म्स किंवा व्हिडीओज हे ‘डिस्कव्हरी’ किंवा ‘अनिमल प्लानेट’ वर पाहिलेले असतील. सुंदर पिसं / पिसाराकिंवा मानेवरचे, अंगावरचे रंग गर्वाने फुलवत तिला ‘impress’ करायला धडपडणारे नर पक्षी किंवा आपल्या चालीने, डरकाळीने, डौलदार आवेशाने आपलं physique दाखवत तिला‘impress’करु पाहणारे प्राणी आपण पाहिले असतील. मी मध्यंतरी माझ्या मैत्रिणीच्या घरी कासवांची जोडीचे उद्योग पाहिले होते. तो नर कासव त्या कासविणीच्या चेहेर्याजवळ आपल्या हाताचे पंजे आणि नख्या यांचं फ्लटरिंग (Fluttering) करून तिला ‘impress’ करु, पटवू पाहत होता.,.त्यांचं ते फ्लर्टीन्ग अद्भुतच!!..

वनस्पतीसृष्टीत तर फ्लर्टीन्गसाठी विधात्याने अनंत रंगांची, सुगंधाची उधळणच केलेली दिसते. त्यांचं फ्लर्टीन्ग हे दुसऱ्या वनस्पतीशी नाही तर थेट कीटकांशी, पक्ष्यांशी चालतं – आणि ते इतकं यशस्वी होतंय म्हणून तर परागीभवनाची क्रिया अथक चालू राहून हे जीवचक्र चालू राहतंय पृथ्वीवर!.....

शेवटी मला एक मात्र सांगायचंय – की फ्लर्टीन्गने प्रेम किंवा टोकाला जाऊन प्रेम-सेक्स अश्या पायऱ्या जरी गाठता नाही आल्या तरी सुंदर मैत्र – दोस्ताना नक्कीच लाभू शकतो!!

So, Happy Flirting!!!..😍☺️🤣

पूर्वप्रसिद्धी: पुरुषउवाच दिवाळी अंक'१४

Thursday, 8 July 2021

द लेडी व्हॕनिशेस

द लेडी व्हॕनिशेस....
----------
कल्पना करा -
ट्रेन सुटल्येय. आदल्या रात्री तुम्हाला हाॕटेलात भेटलेली म्हातारी तुमच्या समोरच्या सीटवर आहे. फारसा परिचय नसूनही ती प्रेमळ आहे हे मात्र जाणवलंय. तुम्हाला किंचित चक्करल्यासारखं होतं तेव्हा ती तुम्हाला ट्रेनच्या पँन्ट्रीत नेते. तिने बरोबर आणलेल्या खास वेगळा हर्बल चहाचा पुडा वेटरला देऊन तो बनवायला सांगते. तुम्ही तिच्याबरोबर गप्पा मारत पुन्हा कंपार्टमेंटमधे परतता...ती तुमच्या समोरच्याच सीटवर बसल्ये. तुमचे डोळे मिटलेत. थोड्या वेळाने जाग आल्यावर तुम्ही समोर बघता तर ती दिसत नाही. बाजूच्या जोडप्याला विचारता तर ते म्हणतात '"तिथे कुणी नव्हतंच आणि तुम्हाला भास झाला असावा" म्हणून...तुम्ही मग पँन्ट्रीपर्यंत जाता...ब-याच जणांना विचारता पण जो भेटतो तो हेच सांगतो की "अशी कुणी म्हातारी ट्रेनमधे नव्हतीच" म्हणून!! आता मात्र तुम्ही गोंधळलाय आणि घाबरलायसुद्धा! अशी अचानक "अदृश्य" कशी होईल ती म्हातारी??..तुम्ही तिचा ट्रेनमधे शोध घेऊ पाहता आणि सुरु होतो एक थरार...

सस्पेन्सचा बादशहा हिचकाॕकचा तब्बल ८३ वर्षांपूर्वीचा, १९३८ सालचा हा उत्कंठावर्धक, थरारक मूव्ही "द लेडी व्हॕनिशेस"!!

युरोपमधला "व्हॕन्ड्रेका" नावाचा एक छोटासा (काल्पनिकच) देश! मूव्हीला सुरुवात होते तेव्हा "नुकत्याच झालेल्या हिमस्खलनामुळे तिथून निघणारी ट्रेन खूपच उशीरा निघणारेय आणि प्रवाश्यांना नाईलाजाने जवळच्या हाॕटेलात रात्र काढावी लागणारेय" असं कळतं. आयरीस हेंडरसन (मार्गरेट लाॕकवूड) त्या प्रवाशांपैकीच एक. लंडनला निघाल्येय. तिचं लग्न ठरलंय. मैत्रिणींबरोबर थट्टामस्करी करत ती तिच्या रुममधे झोपायला जाणार इतक्यात वरच्या मजल्यावरुन जोरजोरात गाण्यांचे आवाज आणि त्या तालावर धाडधाड नाच सुरु होऊन तिची झोपमोड होते. तक्रार करायला ती रुमचं दार उघडते तेव्हा तिला एक इंग्लीश म्हातारी दिसते. मिस फ्राॕय (डेम मे व्हिट्टी). दोघीजणी मॕनेजरकडे तक्रार करतात तेव्हा त्या गोंधळ घालणा-या गिल्बर्टशी (मायकेल रेडग्रेव्ह) परिचय होतो. पण तो को-आॕपरेशन तर सोडाच उलट आयरीसच्याच रुममधे घुसून आगाऊपणा करतो. तिकडे मिस फ्राॕयच्या बॕल्कनीखाली एक विशिष्ट म्युझीक वाजवणा-याचा अचानकच कुणीतरी गळा दाबून खून करतं.

दुस-या दिवशी सगळे हाॕटेलमधे रात्रीपुरते आश्रयाला आलेले प्रवासी ट्रेन पकडायला जातात तेव्हा आयरीसला पुन्हा एकदा मिस फ्राॕय भेटते. त्या ट्रेनमधे जाणार तितक्यात वरुन कुणाचातरी धक्का लागून खालती पडणारी (की मुद्दाम धक्का देऊन पाडवलेली) कुंडी लागून गरगरतं. तेव्हा मिस फ्राॕय तिला आधार देऊन ट्रेनमधे बसवते आणि स्वतः तिच्यासमोरच बसते. 

आणि मग सुरुवातीला सांगितला तो प्रसंग घडतो. आयरीसचा संशय बळावतो की मिस फ्राॕयच्या वाईटावर आसणा-या कुणीतरी तिचा घातपात तर घडवला नसेल? कशासाठी? त्या म्हातारीला मारुन काय मिळणार असेल?

आणि मग आयरीसचा चालत्या ट्रेनमधेच शोध सुरु होतो. तिला गिल्बर्टची साथ मिळते. आणि आपल्याला धक्क्यावर धक्के बसायला सुरुवात होते. ट्रेनमधे आसणा-या डाॕक्टर हार्ट्झच्या कंपार्टमेंटमधे एक नखशिखान्त बँडेज गुंडाळलेला पेशंट आणि नर्स असतात. डाॕक्टर हार्ट्झ आणि नर्सचं वागणं संशयास्पद. 

आयरीसच्याच हाॕटेलमधे रात्रीपुरते आलेले आणि नंतर शेवटपर्यंत प्रवासात साथ देणारे क्रिकेटवेडी पक्क्या इंग्लिशमनची जोडी मिस्टर चार्टर आणि मिस्टर कॕल्डिकाॕट यांचे संवाद धमाल आणि त्यांच्यामुळे या रहस्यपटात विनोदाचा शिडकावा!

पुढे काय घडतं? मिस फ्राॕय ही म्हातारी कोण असते? बँडेजमधला पेशंट कोण असतो? डाॕ.हार्ट्झ खरा कोण असतो? सगळ्या मंडळींवर ट्रेनमधे कोणती संकटं कोसळतात? 

अशा सर्व रहस्यांचा उलगडा हिचकाॕकच्या नेहेमीच्या सफाईदार दिग्दर्शनात उलगडतो. 

वेगवान आणि आणि गुंगवून ठेवणारा आहे हा मूव्ही. अवश्य पाहा. . 

Tuesday, 6 July 2021

चालणं : जोडप्यांचं x एकेकट्याचं

चालणं : जोडप्यांचं x एकेकट्याचं
----------------
आमच्या एरियात राहणारे बहुतेकजण मला आणि मंजूला वेगवेगळं चालताना बघतात!..(एकत्र हातात हात घालून आमचं चालणं लग्नाआधी दोन वर्षं आणि लग्नानंतर निकिता-गार्गी शाळेत जायला लागल्यावर इतिहासजमाच झालंय...)..पण नुसतंच एकत्र वाॕकला जाणंही होत नाही आणि मग बायका मंजूला पिडतात "हे काय? आम्ही तुम्हाला दोघांना एकत्र वाॕकला जाताना पाहिलंच नाही कधी?" ..सुरुवातीला मंजू वैतागायची ते ऐकून आणि मग सांगायची त्यांना -"अहो हा सकाळी ६.१५ ला घर सोडतो आणि कंपनीतनं संध्याकाळी ६.३० च्या पुढेच घरी येतो ..मग मूड नसतो त्याचा परत बाहेर वाॕकसाठी पडायचा" वगैरे...

आणि ते खरंच होतं ..कारण पुण्यात आल्यापास्नं मी तीन कंपन्या बदलल्या आणि सगळ्याच मयूर काॕलनीपास्नं वेगवेगळ्या दिशांना किमान ३४ वगैरे किलोमीटर दूर...भले कंपनीची मिनीबस असायची पण संध्याकाळी घरी परतेपर्यंत पकायचो....पण गेल्या पाचसहा वर्षांपास्नं (अर्ली रिटायरमेंट घेतल्यावर) तसा माझ्याकडे वेळ असतो...पण तरी आमच्या एकत्र चालण्याच्या "वेळा" आणि "वेग" जुळत नाही त्यामुळे निव्वळ व्यायाम म्हणून एकत्र चालणं नाहीच होत..

मंजूला आधी वाईट वाटायचं "कस्सला यूसलेस नवरा आहे आपला!...जरा बायकोबरोबर वाॕकला जायला म्हणून नको...बाकीची जोडपी बघा कशी छान एकत्र जातात..." वगैरे...पण नंतर तिचंही संध्याकाळचं शेड्युल बदललं आणि ते दुःख किंवा सल कमी झाला!....

मला ते पटत होतं पण समहाऊ नाही बाबा जमलं!!..एकतर मंजू ब-यापैकी हळु चालते आणि तिच्या गतीने चालताना व्यायाम कुठचा..गप्पाच मारणं होणार...मग मी आपला एकटाच कोथरुडभर फिरतो वेगवेगळ्या एरियात...सुरुवातीला मंजूनेच सुचवलं म्हणून अजंठा अॕव्हेन्यू जवळच्या 'थोरात उद्याना'त जायचो...पण तिथली एक राऊंड जेमतेम ५००-६०० मीटरची..म्हणजे किमान चार किलोमीटर चालायचं, तर आठवेळा तिथे गोलगोल ट्रॕकवर फिरत बसा...मग प्रत्येक फेरीत 'तेच तेच चेहरे' समोर येणार...मला ती मोनोटोनी डोस्क्यातच जायची...मग सरळ मयूर काॕलनीतनं बाहेर कर्वे रोडवर येऊन वेगवेगळ्या दिशेला चालायला सुरुवात केली..काय मझा असतो त्यात..कधी नवसह्याद्री..कधी डीपी रोड...कधी शिवाजी पुतळ्यावरुन डहाणूकर..कधी राहूल नगर...कधी सिटीप्राईड...कधी चक्क नळस्टाॕप वरनं सीडीएसएसवरनं ..कधी पोतनीस परिसर...अशा वेगवेगळ्या रुट्सला चालताना मस्त वाटतं!...

पण हे मात्र मान्यच की रोज न चुकता जोडीने वाॕकला जाणा-या नवराबायकोंचं मला आदरमिश्रीत कुतूहल आणि कौतुकमिश्रीत औत्सुक्य वाटत राहतं!..इतकीss वर्षं त्यांनी जे पराकोटीचं प्रेम टिकवलेलं असतं त्याबद्दल साष्टांग दंडवतच त्या सा-या जोडप्यांना!..(एक क्रुकेड विचारही आला होता मनात की - इतकी वर्षं अगदी रिटायर होऊनही म्हातारे सिनीयर सिटीझन झाले तरी एकत्र वाॕकला जातात त्यांना आपला पार्टनर हाच/ हिच जगातली एकमेव जवळचा मित्र/ मैत्रिण असतात??? दुसरे मित्रमैत्रीण नसतात की गरजही नसते??)...अशी सर्व जोडपी जी वर्षानुवर्ष एकत्र वाॕकला जातात त्यांना कसंकाय जमतं इतक्या अशक्य प्रेमात रोज एकत्र वाॕकला जाणं?!!...खरंच ग्रेट बाबा ही कपल्स!..

(इथे मी मंजूबरोबर सलग दोनतीन दिवस गेलो तरी चौथ्या दिवशी तीच म्हणेल "ए, आज तू एकटाच जा किंवा दुसरा मित्रमैत्रिण पकड बाबा!" ..कारण सलग एक तास रोजरोज माझ्यासारख्याबरोबर वाॕकला जाताना कुठेतरी असा एखादा विषय निघणारच की ज्यावर आमचं एकमत नसणार..की झ्झालं...!! ) 😆

गंमत म्हंजे इतर नवराबायको कसे प्रेमाने कायम एकत्र चालतात त्यावरुन मला टोमणे मारणा-या मंजूला मध्यंतरी तीनचार मैत्रिणी भेटल्या आणि त्या मिळूनच मग एकत्र वाॕकला जायला लागल्या...मग मला चान्स मिळाला मंजूला बोलायला-"बघ त्या तुझ्याबरोबर येतायत..म्हणजे जगात सगळ्यांचीच प्रेमं सतत ऊतू जात नाहीत रोजरोज वाॕकला एकत्रच जाण्यासाठी भले एरवी ते २४ तास अखंड प्रेमात डुंबलेले असले तरी..!!!" 😉😄

असो..पण सध्यातरी वेगवेगळे वाॕक घेण्याचं रुटीन सेट झालंय आमचं! 😍☺️

न ये जमीन थी न आसमाँ था...

अनेकदा म्हटल्याप्रमाणे माझी Soul Groups याने की, आत्म्याचे कळप या विषयावर गाढ श्रद्धा आहे! 

आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर शेकडो लोकं भेटत असतात. पण त्यातले काहीच मोजकीच मंडळी आपल्याला 'जवळची' होतात..."आपली" वाटतात. अशी माणसं भेटताक्षणी आपलं हृदय/ मन कौल देतं 'येस्स हा/ही - तुझ्या टाईपची आहे' म्हणून! त्यांच्या सान्निध्यात आपल्याला विलक्षण मोकळेपणा वाटतो. एक अतर्क्य कम्फर्ट झोन तयार होतो पाह्तापाहता - जो कदाचित इतर माणसं कित्येक वर्षांपासून आपल्या आसपास आपल्याबरोबर असूनही त्यांच्या बाबतीत आपण मेहसूस नाही करत. 

असे आपल्याच आत्म्याच्या कळपातले जे असतात त्यांच्याशी आपलं सूत बाकी छान जमून जातं. कोरडेपणा किंवा औपचरिकता उरत नाही. त्यांच्या सान्निध्यात आपण बिनधास्त असतो...मनसोक्त गप्पा रंगतात...आपण त्यांच्या संगे खूप हसतो...टाळ्या देतो...त्यांचा सहवास आपल्याला आवडतो...बोलाण्य्साठी विषय काढावे लागत नाहीत...ते एकापाठोपाठ एक येत राहतात. आपण आपलं आख्ख आयुष्य विनासंकोच त्यांच्यासमोर उलगडू शकतो....जणू आपण एकाच फ्रीक्वेन्सीने ट्यून झालेलो असतो अश्यांशी! त्यालाच मग केमिस्ट्री जुळणं किंवा वेव्हलेंग्थ जुळणं म्हणतो आपण! अशा व्यक्तींमुळे आपल्याला सुधारायला मदत होते...आपल्यातले चांगले गुण प्रकर्षाने झळाळून उठतात...अर्थात या सर्वांमागे कार्मिक कनेक्शन महत्त्वाचं जे आपल्याला पुढे कुठेतरी जाऊन आकळतं. 

आणि गंमत म्हणजे हे सर्व अशा तर्हेने एकत्र आलेले आणि भेटणारे आत्मे फक्त याच जन्मांत नव्हे तर जन्मोजन्मी भेटलेलो असतो आणि पुढे भेटत राहणार असतो. 

हे डोस्क्यात यायचं कारण- "सगाई" मधलं राजेंद्रकृष्ण यांचं गीत! हे त्यांना का आणि कसं सुचलं असेल? का याच शब्दांत लिहावसं वाटलं असेल? कारण वरकरणी अशक्यप्राय वाटणाऱ्या या गाण्याच्या दोन ओळींत त्यांनी खूपच खोल वैश्विक सत्य मांडलंय! -

"न ये जमीन थी, न आसमां था, न चांदतारो का ही निशां थां - मगर येह सच है, की उन दिनों भी, तेरा मेरा प्यार यूँ ही जवां था.." 

आता विचार केला तर तो तिला किती महत्त्वाचं आणि ठामपणे सांगतोय की हे प्रिये जेव्हा ही जमीन नव्हती, हे आकाश नव्हतं, हा चंद्र, हा सूर्य, हे दिसणारे असे तारे नव्हते - त्याकाळात सुद्धा आपलं प्रेम होतं..असंच ..आणि इतकंच गहिरं!.....म्हणजे बघा ही पृथ्वीच नव्हती...हा सूर्य ही नव्हता...किंबहुना ही आकाशगंगेची स्थिती आत्ता आहे तशी नव्हती आणि त्यावेळी सुद्धा आपलं प्रेम मात्र असंच होतं! म्हणजे मग ते कुठे होतं?..कुठल्या तरी दुसऱ्या आकाशगंगेत?..वेगळ्याच ग्रहांवर?..वेगळ्याच जीवसृष्टीत?..पण आपण मात्र तेव्हाही एकत्रच होतो?!!!!!..म्हणजे पुन्हा सेम सोल ग्रुप्स?!!!...

क्या ब्बात!!.....व्वा, राजेंद्रकृष्णजी! हॅट्स ऑफ!!....भल्या भल्यांना समजावयाला कठीण अशी संकल्पना तुम्ही तब्बल ५२ वर्षांपूर्वीच्या (१९६६ साल) "सगाई" सिनेमातल्या रफीसाहेबांच्या गाण्यातून इतकी सहज मांडली होतीत?!!!!...नव्हे तुमच्याकडून ते उतरवण्यात आलं होतं ...कुठल्याश्या अद्भुत अंतःप्रेरणेने?....आता तर मला अजून मजा येत्येय कार्मिक कनेक्शन, सोल ग्रुप्स, पॅरॅलल युनिव्हर्स, मल्टीव्हर्स, री-इन्कार्नेशन्स सारख्या विषयांचा अभ्यास करायला.... ! 😉

Saturday, 3 July 2021

“भारतीय सिनेसृष्टीतले बदलते ट्रेंड्स!”

“भारतीय सिनेसृष्टीतले बदलते ट्रेंड्स!” 

----------

भारताच्या कानाकोपऱ्यात, वेगवेगळ्या जातीधर्मात विखुरलेल्या मंडळींना एकत्र बांधून ठेवणारा कुठला एकच दुवा असेल तर तो म्हणजे हिंदी सिनेमा! गंमत म्हणजे एरवी भारताच्या राष्ट्रगीतालाही विरोध करणारे लोक, ते राष्ट्रगीत जिथे वाजवलं जातं तो सिनेमा एन्जॉय करण्यासाठी मात्र उत्साहाने जात असतात. त्यासाठी सर्वांकडे वेळ आणि पैसा असतो. ज्यांच्याकडे तो तुलनेने कमी असतो तेसुद्धा सिनेमासाठी प्रसंगी कळ सोसून किंवा खिशाला चाट सहन करून त्याचा आनंद घेतातच! हिंदी सिनेमा हे जगातलं एक 'अद्भुत'च म्हणता येईल! तो बनवताना जगातल्या सर्वच्या सर्व ६४ कलांचा त्यात वापर केलेला आढळतो. आणि त्यात काय वाट्टेल ते असू शकतं. अनेक अतर्क्य गोष्टी यात लीलया घडू शकतात. सुंदर आणि देखणे हिरो हिरॉईन्स आणि त्यांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, झेलावी लागणारी टोकाची संकटं, श्रीमंत-गरीब यातला संघर्ष, कल्पनेपलीकडचे खलपुरुष, हिरोहिरॉइन्सचे नातेवाईक, मधूनच चमकून जाणारे विनोदवीर आणि यात भरीस भर म्हणून अचानकच कध्धीही, कुठेही सुरु होणारी गाणी अशा अनेक गंमतीजंमतीने भरलेली कथा! पण तो सर्व मसाला अशा तर्हेने पेश केलेला असतो की येणारा दर्शक त्यात रंगून जावा आणि त्याला तीन तासांकरता जगाचा विसर पडावा! भारतीय सिनेसृष्टी ही भारताच्या  स्वातंत्र्यकाळापेक्षाही जुनी! आज भारतीय सिनेसृष्टीने ११८ वर्षं पूर्ण केल्येत. या प्रदीर्घ वाटचालीमध्ये सिनेसृष्टीने अनेक चढउतार पाहिले. त्यातही १९४९ ते १९७३पर्यंतचा २५ वर्षांचा काळ खऱ्या अर्थाने 'सुवर्णयुग' मानला गेला कारण सर्वोत्तम कथा, सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम अभिनेते/अभिनेत्री, सर्वोत्तम गाणी, सर्वोत्तम संगीतकार आणि सर्वोत्तम गायक याच २५ वर्षांत केवळ हिंदीच नव्हे तर भारतातल्या सर्वच भाषांमधल्या चित्रपटसृष्टीने दिले आणि लोकांनी अनुभवले. पण एकुणात या ११८ वर्षांचा धावता आढावा घ्यायचा म्हटला तर आपल्याला प्रकर्षाने वेळोवेळी बदलत गेलेले काही ठळक ट्रेंड्स नक्कीच जाणवतात!! आणि त्याचा आढावा रंजक ठरावा!

मुळात पारतंत्र्याच्या काळात भारतीयांना मनोरंजनाचं साधन म्हणून नाटक, बाहुल्यांचे खेळ, नृत्यकला किंवा लोककला काय त्या माहित! १८८० च्या दशकात महादेवराव पटवर्धन यांनी शाम्बरिक खरोलिकाच्या (मॅजिक लँटर्न) साहाय्याने काचेच्या पट्टीवरची चित्र दाखवायला सुरुवात केली होती. अश्यातच सात जुलै १८९६ या दिवशी मुंबईच्या वॅटसन हॉटेलमध्ये फ्रान्सच्या ल्युमिए बंधूंनी सहा छोट्या छोट्या फिल्म्स लोकांना दाखवल्या. त्या पाहून शोला हजर असलेले हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर हे फोटो स्टुडियोचे मालक भारावून गेले आणि त्यांनी २१ गिनी खर्च करून (साधारणपणे २२ पाउंड, ११८ वर्षांपूर्वीचे!) लंडनहून कॅमेरा आणि प्रोजेक्टर मागवला. १८९९ सालची ती गोष्ट! मुंबईत एका कुस्तीच्या मॅचचं चित्रीकरण करून त्यांनी  'द रेस्टलर' ही भारतातली पहिली छोटी डॉक्युमेंटरी बनवली. तीच भारतीय सिनेसृष्टीची सुरुवात मानता येईल. ब्रिटिशांची राजवट असल्याकारणाने ब्रिटिश मंडळी भारतात राहत होतीच. त्यामुळे युरोपमधून छोट्या छोट्या फिल्म्स भारतात आणून प्रदर्शित होत होत्या आणि त्यामुळे भारतीयांनाही या माध्यमाचं आकर्षण वाटायला लागलं होतं. १९१२ साली दादासाहेब तोरणे यांनी 'पुंडलिक' हा लघुपट बनवला. आणि पुढच्याच वर्षी  १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी पूर्ण लांबीचा "राजा हरिश्चंद्र" हा पहिलावहिला सिनेमा बनवला. त्या मूकपटापासून सिनेमाची मोहिनी भारतीयांना पडायला सुरुवात झाली. पुढे १४ मार्च १९३१ साली अर्देशीर ईराणी यांच्या 'आलम आरा' या पहिल्या बोलपटापासून सिनेमा बोलायला लागला, पाठोपाठ त्याच वर्षी ‘प्रल्हाद’ आणि ‘कालिदास’ या अनुक्रमे तेलगू आणि तामिळ फिल्म्सनी दक्षिणेकडे बोलपटांची सुरुवात केली तर ‘जमाइ षष्ठी’ पासून बंगाली फिल्मस बोलू लागल्या.  'आलमआरा'च्या पाठोपाठ १९३२ साली जमशेदजी मादन यांनी तयार केलेल्या 'इंद्रसभा' सिनेमाने तब्ब्ल ७२ गाण्यांची लयलूट करत चित्रपटात संगीताचं महत्त्वाचं स्थान निर्माण केलं. यात आणखी बहार आली ती  १९३५ सालच्या 'धूप छाव'पासून ज्यामधून 'पार्श्वगायना'ची नांदी झाली. पुढची आठेक वर्ष भारतात वर्षाला २७ सिनेमे या गतीने सिनेमे बनत गेले. त्यात आणखीन रंग भरत गेले ते १९३७ साली ‘किसान कन्या’ या रंगीत सिनेमापासून. एकीकडे स्टुडियोनीं मूकपटापासून बोलपटाकडे जाताना जशी कात टाकली तशी दुसरीकडे सिनेमा थिएटर्ससुद्धा साउंडप्रूफ बनत गेली. सुरुवातीच्या काळात सिनेसृष्टी ही मुख्यतः मूठभर नावाजलेल्या स्टुडिओ मालकांच्या हातात होती. अर्देशीर इराणी यांचा इंपिरिअल स्टुडिओ, हिमांशू रॉय यांचा बॉम्बे टॉकीज, दामले-फत्तेलाल -शांताराम यांचा प्रभात स्टुडिओ, बी एन सरकार यांचा न्यू थिएटर्स, होमी वाडिया यांचा वाडिया मुव्हिटोन, सोहराब मोदी यांचा मिनर्व्हा मुव्हिटोन, चंदुलाल शहांचा रणजित स्टुडिओ हे सुरुवातीच्या काळातले प्रमुख स्टुडिओज होते. या काळात ऐतिहासिक, भक्तिमय, पोषाखी आणि अरेबियन नाईट्सच्या कथांसारख्या चमत्कृतीपूर्ण आणि अद्भुत कथांच्या सिनेमांची निर्मिती ज्यास्त होत होती. मोहिनी भस्मासुर, लंका दहन, श्रीकृष्णजन्म, कालियामर्दन, गोपालकृष्णपासून ते शिरी फरहाद, अल्लाउद्दीन और जादुई चिराग, हिमालय की बेटी सारख्या सिनेमांची रीघ लागलेली असायची. पण पुढे १९३० चं दशक संपता संपता सामाजिक आशयाचे आणि ऍक्शनपॅक्ड सिनेमे येऊ लागले. एकीकडे साथी, स्त्री, जमाना सारखे तर दुसरीकडे टारझन की बेटी, तुफान एक्स्प्रेससारखे मारधाड सिनेमे येत गेले. फियरलेस नादियाचे धाडसी स्टंट्स असणारे हंटरवाली, पंजाब मेल, लुटारू ललना त्याच काळातले! 

त्यात वेगळं वळण दिलं ते १९४३ सालच्या बॉम्बे टॉकीजच्या 'किस्मत'ने. अशोककुमार यांच्या अँटी हिरोने चांगलीच खळबळ उडवून दिली होती. लहानपणी हरवलेली भावंडं मोठेपणी सापडणं हे याच सिनेमापासून सुरु झालं. ब्रिटिशांच्या सेन्सॉरशिपला चकवा देत भारतीयांमध्ये देशभक्ती जागृत करणारं 'दूर हटो दूर हटो ऐ दुनियावालो हिंदोस्तान हमारा है" या गाण्याने तर पब्लिकला वेड लावलं. याचे संगीतकार अनिल विश्वास यांनी आणि पाठोपाठ नौशाद यांनी पुढची पाच सहा वर्षं आपल्या संगीताने सिनेसृष्टी गाजवली आणि अवघ्या जनतेला आपल्या गाण्यांवर डोलायला लावलं. मात्र भारतीय सिनेमा हा आशय, विषय आणि सादरीकरणाच्या बाबतीत प्रचंड वेगाने दौडत गेला तो १९४९पासून! अत्यंत मधुर गाणी आणि अप्रतिम शायरीने नटलेल्या गाण्यांसाठी लोक सिनेमांना गर्दी करू लागले आणि कथानकाच्या बरोबरीने संगीत हा भारतीय सिनेसृष्टीचा अत्यंत महत्त्वाचा घटक बनला तो हे ४०च दशक संपतासंपता! १९४९ पासून ऐतिहासिक आणि भक्तिमय विषयांतून बाहेर पडून सिनेमातल्या प्रेम, प्रणय आणि रहस्य अशा विषयांनी प्रेक्षकांवर गारुड केलं. उत्तमोत्तम दिग्दर्शकांच्या बरोबरच आगळे विषय, देखणे आणि संवेदनशील कलाकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिनेमांच्या यशात महत्त्वाची कामगिरी बजावणारं संगीत (गाणी) यांमूळे १९४९ पासून १९७३ पर्यंतची तब्ब्ल २५ वर्षं हिंदी सिनेसृष्टीत 'सुवर्णयुग' अवतरलं.त्या पंचवीस वर्षांतल्या सिनेमांचं सिंहावलोकन करताना काही महत्वाच्या गोष्टी डोळ्यांसमोर येतात त्या म्हणजे १९४९पासून म्हणजे स्वातंत्र्यानंतर अवघ्या तीन वर्षांत बदलत गेलेली दर्शकांची मानसिकता, सिनेमा बनवण्याचं बदलत गेलेलं तंत्र, वेगवेगळ्या जॉन्रचे येणारे सिनेमे, सिनेमांतून वापरले जाणारे भव्यदिव्य सेट्स, सिनेसंगीतातून सुरु झालेलं ऑर्केस्ट्रेशन, एकाहून एक प्रतिभावान संगीतकार, अद्भुत आवाज लाभलेले विलक्षण गायक आणि गायिका, उत्तमोत्तम कथा-कादंबऱ्यांवर बनवले गेलेले आशयघन सिनेमे आणि स्वातंत्र्यपूर्व काळात असणारी स्टुडियोंची मक्तेदारी संपून सुरु झालेली स्टार सिस्टम! यात एका ठळक गोष्टीची पडलेली भर म्हणजे भारताच्या फाळणीनंतर लाहोर आणि बंगालमधून आणि एकूणच भारताच्या सर्वच मोठ्या राज्यांतून आणि शहरांतून मुंबईच्या मोहमयी सिनेसृष्टीत येऊन दाखल झालेले अनेक गुणी लेखक, कवी, दिग्दर्शक आणि कलाकार! या सर्वांनीच हिंदी सिनेसृष्टीला आपल्या बुद्धिमत्तेनं आणि मेहेनतीनं अफाट आणि दैदिप्यमान सिनेमांची देणगी दिली. सुरुवातीला उर्दू भाषेचा प्रचंड प्रभाव सिनेसृष्टीवर होता आणि बहुतांश सिनेमांच्या श्रेयनामावलीत सिनेमांचा नावसुद्धा इंग्लिशच्या जोडीने उर्दू लिपीतही असायचंच! 

१९४९ ते १९७३ मधल्या सुवर्णयुगात सोहराब मोदी, मेहबूब खान, बिमल रॉय, राज कपूर, व्ही.शांताराम, गुरुदत्त, राज खोसला, बी.आर.चोपडा, यश चोपडा, असित सेन, नितीन बोस, विजय आनंद सारख्या दिग्दर्शकांनी सातत्याने उच्च दर्जाचे सिनेमे दिले. त्यांच्या सिनेमांतून अशोककुमार, दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, शम्मी कपूर, धर्मेंद्र, शशी कपूर, मनोज कुमार, राजेश खन्ना, जितेंद्र सारख्या बिनीच्या अभिनेत्यांबरोबरच भारत भूषण आणि प्रदीपकुमार यांनी पडद्यावरचा आदर्श हिरो साकारला तर नर्गिस, मीनाकुमारी, नूतन, गीता बाली, मधुबाला, वहिदा रहमान, माला सिन्हा, वैजयंतीमाला, साधना, शर्मिला टागोर, नंदासारख्यानी पडद्यावरच्या कशी सोशिक तर कधी तडफदार हिरॉइन्स साकारल्या. त्यांना साथ द्यायला जॉनी वॉकर, मेहमूद, धुमाळ, सुंदर, राजेंद्रनाथ, शुभ खोटे, टूनटूनसारख्या कॉमेडीयन्सनी विनोदाची बाजू सांभाळली तर प्राण, के.एन.सिंग, जयंत, नादिरा, शशिकला, ललिता पवार सारख्यांनी खलप्रवृत्ती आपल्या अभिनयानं जिवंत केली. प्रमुख हिरॉइन्ससह कक्कू, हेलन, मिनू मुमताज, कुमकुमसारख्यांनी नृत्याची जादू दाखवली. आणि या सर्वांच्या कामगिरीत भर घातली आणि सिनेमाला रिपीट ऑडियन्स मिळवून देण्यात अत्यंत महत्त्वाचा वाटा उचलला तो सी.रामचंद्र, नौशाद, अनिल विश्वास, शंकर जयकिशन, ओपी नय्यर, सचिनदेव बर्मन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, हेमंतकुमार, रवी, चित्रगुप्त, खय्याम, जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुल देव बर्मनसारख्या अफाट प्रतिभेच्या संगीतकारांनी, साहिर, मजरुह, शकील, हसरत, शैलेंद्र, गुलजार, कैफी आझमी, राजेंद्रकृष्णसारख्या अलौकिक बुद्धिमान शायरांच्या गीतांनी आणि त्या गीतांना अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या लता मंगेशकर, रफी, आशा भोसले, किशोरकुमार, मुकेश, तलत, सुमन कल्याणपूर, मन्ना डेसारख्या स्वर्गीय आवाजाच्या गायक गायिकांनी!! खरंच असं सुवर्णयुग पुन्हा होणे नाही! या १९४९ ते १९७३ मधल्या  सुवर्णयुगात ऐतिहासिक, भक्तिरसपूर्ण, सामाजिक समस्या मांडणारे, निखळ प्रेमकथा मांडणारे, कामगार आणि शोषितांची दु:ख मांडणारे आणि हसून लोटपोट करणारे  असे वेगवेगळे जॉन्र समर्थपणे हाताळणारे अनेक उत्तमोत्तम सिनेमे आले. पण एक दुवा सर्व सिनेमांत सारखा राहिला तो म्हणजे सुमधुर संगीत! त्याकाळच्या सिनेमांत सात-सात आठ-आठ गाणी असली तरी ती सर्वच गुणगुणावी अशी आणि लक्षात राहून जाणारी. १९७३ नंतर ते जवळपास पुढची वीस वर्षं म्हणजे १९९३ पर्यंत भारतीय सिनेमा हा सूडकथा, गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड यांभोवती फिरत राहिला आणि संगीताचं, गाण्यांचं महत्त्व कमी होत जाऊन अँग्रीयंग मॅन हिरो अशी इमेज असणारे नायक आणि त्यांनी घेतलेला अन्यायाचा बदला अशाच कथा प्रामुख्याने लोकांसमोर येत गेल्या. अमिताभ, धर्मेंद्र, विनोद खन्ना, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, जितेंद्र पासून ते पुढे जॅकी श्रॉफ, अनिल कपूर पर्यचे अनेकांनी या प्रकारचे सिनेमे केले. अर्थात याही काळात काही सन्माननीय अपवाद होते आणि त्यांनी वेगळी वाट चोखाळली ज्याला आर्ट फिल्म्स किंवा समांतर सिनेमा म्हटलं गेलं. नासिरुद्दीन, अमोल पालेकर, ओम पुरी, फारुख शेख, स्मिता पाटील, शबाना आझमी यांनी अशा प्रकारच्या सिनेमांतून जबरदस्त अभिनयाने आपली छाप टाकली. एकीकडे शोले सारख्या सूडकथेने इतिहास घडवला तर दुसरीकडे श्याम बेनेगल, बासू चॅटर्जी, गोविंद निहलानी, अमोल पालेकर सारख्या दिग्दर्शकांच्या लो बजेट सिनेमांनीही चांगलं यश मिळवलं. १९९३ पासून पुढे अगदी आजपर्यंत (२०१८ सालापर्यंत) भारतीय सिनेमांत अनेक स्थित्यंतरं घडली. संगीतात बदल, कॅमेरा टेक्निकमध्ये बदल, सिनेमाच्या टेकिंग मध्ये बदल आणि एकाच कथेच्या सिनेमांचे पुढे अनेक सिक्वेल्स येणं सुरु झाला. एकाच सिनेमासाठी अनेक संगीतकारांनी संगीत देणं किंवा एकाच सिनेमांत अनेक दिग्दर्शकांनी आपापल्या कथा मांडणं असे प्रयोगही झाले. 

 भारतीय सिनेसृष्टीतले हे शंभरेक वर्षांतले बदलते ट्रेंड्स आपण कथावस्तू, दिग्दर्शक, कलाकार, संगीत, टेक्निक, फॅशन आणि निर्मिती खर्च अशा अनेक अंगांनी बघूया. 

१) कथानक किंवा आशय - भारतीय सिनेसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात (३०चं संपूर्ण दशक आणि ४० च्या दशकाच्या सुरुवातीला) सिनेमांची कथा ही समाजासमोर आदर्श ठरलेल्या पौराणिक, ऐतिहासिक आणि काही दंतकथांमधल्या व्यक्तिरेखांवर आधारित असायची. त्यामुळे ट्रेक सीन्स, जोशपूर्ण संगीत आणि काहीश्या नाटकी आविर्भावात संवाद म्हणणाऱ्या नटनट्या पाहायला मिळायच्या. ४०च्या उत्तरार्धात हे चित्र बदललं. एकीकडे सामाजिक आशय मांडणारे ‘अछूत’, ‘बंधन’ सारखे सिनेमे तर ‘किस्मत’सारखी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी कथानकं सादर होत असतानाच प्रेमाचा त्रिकोण मांडणारा ‘अंदाज’ आणि पुनर्जन्माची गूढकथा मांडणारा ‘महल’ सारखा सिनेमा प्रचंड यश मिळवत होता. ५०च्या दशकात प्रेमकथा आणि सामाजिक आशयाच्या सिनेमांनी पडदा गाजवला. शरदचंद्र चॅटर्जी, रबिन्द्रनाथ, प्रेमचंद, बिमल मित्र, बिभूतिभूषण बंदोपाध्याय यासारख्या देशभरातल्या उत्तमोत्तम साहित्यिकांच्या कथा आणि कादंबऱ्यांवर आधारित सिनेमा येत गेल्याने हे दशक दर्जेदार कथानकांसाठी लक्षात राहिलं. ऑल टाइम ग्रेट सिनेमांच्या यादीत स्थान मिळवणारे सत्यजित रे यांचे अपूच्या कहाणीवरचे तीन सिनेमे, गुरुदत्तची अमर प्रेमकथा प्यासा, बिमल रॉय दिग्दर्शित दु:खी प्रेमकहाणी देवदास आणि गरीब शेतकऱ्याची हृदयद्रावक कथा मांडणारा दो बिघा जमीन, मेहबूब खान यांचा भारतीय स्त्रीशक्तीचा अविष्कार मदर इंडिया आणि भारताबाहेर लोकप्रियता मिळवणारा राज कपूरचा आवारा याच कालखंडातले! ६०चं दशक संपून ७०चं दशक सुरु झालं आणि गुन्हेगारी, स्मगलिंग आणि मारधाड कथानकाच्या सिनेमांनी सिनेसृष्टी व्यापली ती पुढे ८० चं दशक संपेपर्यंत कायम राहिली. ९० च्या दशकात पुन्हा सिनेमाची कथानकं प्रेम आणि रोमान्सभोवती केंद्रित होत गेली. थोडक्यात म्हणजे काही काळ धिटाईने वेगळे प्रयोग करणारी काही कथानकं वगळता, एकुणात कथेच्या बाबतीत भारतीय सिनेमांनी मनोरंजन हेच निखळ उद्दिष्ट ठेवलं होतं. मजा म्हणजे बहुतेक सिनेमांच्या कथेत हिरोला वडील नसायचे तर हिरॉईनची आई नसायची. हिरो श्रीमंत असला तर हिरॉईन हटकून गरीब असायची किंवा व्हाइसे वर्सा!! पण तरीही सगळे अडथळे पार करत, गाणीबिणी म्हणत दोघे शेवटी एकत्र यायचेच. मेजॉरिटी सिनेमांमधून एक पथ्य कटाक्षाने पाळलं जायचं ते म्हणजे शेवटी सत्याचा विजय होणं किंवा काही आशावादी घडणं!! नवीन ट्रेंड्सनुसार काल्पनिक आणि सत्यकथांबरोबरच हयात असलेल्या काही व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांवर आधारित बायोपिक्ससुद्धा लोकांसमोर येऊ लागल्याहेत. मधल्या काळात कमालीच्या शहरीकरणामुळे शहरी आणि परदेशी झगमगाटी दुनियेच्या कथा मांडणारा सिनेमा आता पुन्हा छोट्या छोट्या गावातल्या कथाही मांडू पाहात आहे आणि बरेली की बर्फी, दम लगा के हैशा किंवा आँखो देखी सारखे छोट्या गावातले सिनेमेही प्रेक्षकांना पसंत पडताना दिसताहेत. पाश्चात्य सिनेसृष्टीप्रमाणेच आता भारतातही यशस्वी सिनेमांचे सिक्वेल येणं (पुढचे भाग) सुरु झालंय आणि त्यासाठी कथाकार आणि पटकथाकार शक्कल लढवून नवनवीन रूपात लोकांसमोर त्याच कथानायकांच्या कथा सादर करत आहेत. क्रिश, धूम, बाहुबली, सरकार, दबंग, गोलमाल, हेराफेरी सारख्या सिनेमांचे सिक्वेल्स यशस्वी ठरल्याचीही उदाहरणं आहेत. याचबरोबर एक आगळावेगळा  प्रयोग होताना दिसतोय तो म्हणजे अँथॉलॉजी फिल्म्स ज्यात एका थीमवर आधारित किंवा एखाद्या विचारावर/ मुद्यांवर आधारित चारपाच छोट्या फिल्म्स त्याही वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या एक फिल्म म्हणून रिलीज केल्या जातात आणि त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतोय.  

२) दिग्दर्शक - अगदी सुरुवातीपासून सिनेतंत्राची उत्तम जाण, संगीताचा कान आणि समाजमनाचं भान असणारे एकाहून एक दिग्गज दिग्दर्शक सिनेसृष्टीला मिळत गेले. पीसी बरुआ हे सुरुवातीच्या काळचे प्रयोगशील दिग्दर्शक होते. त्यांनींच सर्वप्रथम १९३१ साली ‘अपराधी’मधून कृत्रिम प्रकाशात शूटिंगची सुरुवात केली आणि १९३४ साली ‘रुपलेखा’मधून फ्लॅशबॅक तंत्राचा वापर केला. तिकडे १९३३ साली मल्याळम दिग्दर्शक पीव्ही राव यांनी ‘मार्थण्ड वर्मा’ सिनेमातून पहिलं चुंबन दृश्य दाखवण्याचं धाडस केलं. त्याआधी १९२६ साली फातिमा बेगम हिने पहिली स्त्री दिग्दर्शिका म्हणून सिनेसृष्टीत इतिहास रचला. सिनेमा बोलायला लागल्यावर गाण्यांची रेलचेल असणारे सिनेमे येण्याच्या काळातच जमशेद वाडिया यांनी ‘नौजवान’ हा गाणं-विरहित रहस्यप्रधान सिनेमा बनवला होता. सोहराब मोदींनी ऐतिहासिक आणि पोषाखी सिनेमांची परंपरा राखली, राज कपूरने भाबड्या हिरोच्या नजरेतून समाजातल्या विसंगती टिपल्या, बिमल रॉय यांनी एकाहून एक ताकदीच्या कथांमधल्या व्यक्तिररेखा पडद्यावर जिवंत केल्या, व्ही.शांताराम यांनी समाजभान राखत आपले सिनेमे बनवले. गुरुदत्तच्या सिनेमांचं सातासमुद्रापार कौतुक झालं, श्याम बेनेगल, मणी कौल, गोविंद निहलानी, केतन  मेहता, सईद अखतर मिर्झा यांनी जबरदस्त कलात्मक सिनेमा पेश केला. बासू चॅटर्जी, हृषीकेश मुखर्जी, गुलझार यांनी हलके फुलके सिनेमे बनवले तर मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा सारख्यांनी तद्दन मसाला फिल्म्सची रांग लावली. आधी विजय आनंद, नासिर हुसेन आणि नंतर यश चोपडा सारख्यांनी दर्जेदार यशस्वी सिनेमे दिले. आजच्या ताज्या दमाच्या पिढीतही झोया अख्तर, मेघना गुलझार, फरहान अख्तर, आशुतोष गोवारीकर सारखे काहीजण काही वेगळा आशय घेऊन तरुण पिढीसमोर येत आहेत. तिकडे बंगालमध्ये सत्यजित रे, ऋत्विक घटक, मृणाल सेन, ऋतुपर्ण घोष, अपर्णा सेन; मराठीमध्ये राजा  परांजपे, सई परांजपे, अमोल पालेकर, राजदत्त, सुमित्रा भावे-सुनील सुखठणकर तर  मणीरत्नम, के विश्वनाथ, प्रियदर्शन, शंकर सारख्ये दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी वर्षानुवर्षं सिनेमे गाजवले आहेत. या सर्वांचीच सिनेमा तंत्रावर घट्ट पकड असल्याचं जाणवतं आणि राकेश मेहरा, राजकुमार हिरानी, राकेश रोशन, करण जोहर सारख्यांना आजच्या आजच्या प्रेक्षकांची नस अचूक समजल्याचंही  त्यांच्या दिग्दर्शनातल्या सफाईतून जाणवतं. काही दिग्दर्शक वेगवेगळे प्रयोग करू पाहत आहेत. चक्क मोबाईलवर फिल्म  शूट करून ती युट्युबवरून किंवा नेटफ्लिक्स वरून रिलीज करण्याचे धाडसी प्रयोग होताना दिसतायत. 

३) कलाकार - भारतीय सिनेमांच्या शंभर वर्षांच्या इतिहासात अक्षरशः शेकडो जबरदस्त कलाकार वेगवेगळ्या भाषांमधून लोकांसमोर येत गेले आणि त्यांनी आपल्या अदाकारीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला. सुरुवातीच्या ४०च्या दशकात सोहराब मोदी, चंद्रमोहन, पृथ्वीराज कपूर, मुराद सारख्या भारदस्त आवाजाच्या अभिनेत्यांनी आपली छाप पाडली, तर ५० आणि ६०च्या दशकात देखण्या चेहेऱ्याच्या आणि जोडीला चांगला अभिनय करणाऱ्या राज, दिलीप, देव, राजेंद्रकुमारसारख्या कलाकारांनी. त्यांच्याच जोडीला अंगात उत्तम रिदम असल्याने गाणं जिवंत करणारे शम्मी, जितेंद्र, शशीसारखे कलाकार लोकांना भावले. त्याच काळात दक्षिणेला शिवाजी गणेशन यांनी एकाच सिनेमात नऊ भूमिका साकारण्याचा विक्रम केला. तर सुनील दत्तने आपल्याच ‘यादे’ सिनेमातून संपूर्ण सिनेमा फक्त स्वतःची एकट्याची एकच भूमिका ठेवून लोकांसमोर आणायचं धाडस केलं. पुढे ज्यांना ‘मचो’ म्हणता येईल अशा, व्यायामाने कमावलेलं पिळदार शरीर असणाऱ्या  धर्मेंद्र,विनोद खन्नासारख्या अभिनेत्यांची फळी आली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पुढे अक्षयकुमार, सलमान, आमिर आणि ह्रितिक रोशनने आपली छाप पाडली. भारतीय सिनेमातल्या अभिनेत्री या मात्र नेहेमीच सुंदर दिसणाऱ्या ( मधुबाला,साधना), उत्तम नृत्य करू शकणाऱ्या (वॆजयंतीमाला, आशा पारेख, हेमामालिनी) असाव्यात अशी निर्माता/ दिग्दर्शकांइतकीच बहुदा प्रेक्षकांचीही अपेक्षा असायची. पण  नूतन,नर्गिस, मीनाकुमारी, वहिदा, गीता बालीची परंपरा राखत स्मिता पाटील, शबाना, तब्बूपासून अगदी नवीन पिढीच्या आलीया भटने अभिनयात उत्तम कामगिरी केलेली दिसते. कथेमधल्या पात्रांना पडद्यावर जिवंत करण्याची कामगिरी करताना यातल्या काहीजणांची आपली स्वतःची अशी एक विशिष्ट अभिनयशैलीसुद्धा तयार झाली होती. अनेक वर्षं त्या त्या काळातल्या लोकप्रिय नट-नटयांनी वय वाढलं तरीसुद्धा कॉलेजकुमार/कुमारिकेच्या केलेल्या भूमिका खपून जात होत्या, पण ९०च्या दशकानंतर मात्र कॉलेजचा काळ दाखवण्यासाठी ऐन विशी-पंचविशीतलेच हिरो-हिरॉईन आवर्जून घेण्याचा प्रघात सुरु झाला. पण राजकुमार, देव आनंद, अमिताभ, शत्रुघ्न सिन्हाच्या विशिष्ट लकबीत बोलल्या जाणाऱ्या संवादफेकीला जशी लोकप्रियता होती तशी मात्र नंतरच्या काळात कुण्या अभिनेत्याच्या वाट्याला आली नाही. नूतन, वहिदा, मीनाकुमारीच्या चेहेऱ्यावरचा हावभावांतून, बोलक्या डोळ्यांतून ज्या समर्थपणे भावना प्रकट व्हायच्या आणि तीच त्यांच्या अभिनयाची ओळख बनायची तशी मात्र पुढल्या पिढ्यातल्या अनेक अभिनेत्रींना तयार करता आली नाही. पूर्वी गाण्यातल्या भावना समजून उमजून त्याप्रमाणे हिरोहिरॉइन्स ते गाणं साकार करावं लागे. आणि त्यातूनही त्यांची काव्याची आणि गाण्याची समज दिसून येत असे, उदाहरणार्थ ‘सीमा’ मध्ये नूतन जेव्हा ‘मनमोहना बडे झुटे’ गाते तेंव्हा गाणं लता गात नसून तीच गात्ये असा जबरदस्त आभास निर्माण करण्याची ताकद नूतनमध्ये होती. नंतरच्या काळात गाण्याचे बोल काहीही असोत, अर्थ काहीही निघो पण २५-३० सहकलाकारांच्या साथीने हिरो-हिरॉईनने कुठेतरी बागेत, डोंगरपठारावर किंवा समुद्रकिनाऱ्यावर कवायती सदृश्य नाचणे असं गाणं सादर होऊ लागलं. पडद्यावरच्या कलाकारांना पूर्वी शालीनतेच्या एका मर्यादेपर्यंत सीमित असायला लागायचं तेसुद्धा पुढच्या काही वर्षांतच बदलत गेलं आणि आता तर (सेन्सॉरशिप जवळजवळ संपुष्टात आल्याने-) अत्यंत बोल्ड आणि स्फोटकदृश्य (विशेषतः नेटफ्लिक्स किंवा वेब्सिरीजसारख्या माध्यमांतून) अगदीच सहजतेने देणारे कलाकार या सिनेजगतात बहुतांशाने आढळतात.    

४) संगीत - भारतभर खेड्यापाड्यांतून, गावागावातून, शहरांतून जन्मणारं मूल हे कुठेना कुठे चालू असलेलं संगीत ऐकतच जन्मतं. आणि या संगीताचा प्रभाव इतका की माणसाच्या आयुष्यातल्या सर्वच प्रसंगात संगीत हे अविभाज्य भाग बनून जातं आणि परिणामस्वरूप सिनेमांमध्ये कुठल्याही प्रसंगात (जन्म, बारसं, झोपेची वेळ, बागेतले खेळ, तरुणपणातलं प्रेम, लग्न, हनिमून, सुहाग रात, राखी पौर्णिमा, भाऊबीज, होळी, गणपती, दिवाळी, ईद) गाणी ही अपरिहार्यपणे येतातच! भारतीय सिनेमांतली गाणी ही सर्व प्रकारच्या वाहनांतून म्हटली गेलेली आढळतात. अगदी सायकल, बैलगाडी, टांगा, स्कुटर, बाईक, कार, जीप, बस, होडी, जहाज, रेल्वेपासून ते हेलिकॉप्टर आणि विमानापर्यंत सर्वत्र! सुरुवातीच्या बोलपटांच्या काळात सिनेमांचं संगीत हे नाटकी किंवा लोककलेच्या ढंगाने जाणारं होतं. अनिल विश्वास आणि नौशाद सारख्यांनी केलेले संगीतातले प्रयोग पुढे शंकर-जयकिशन जोडीने कुठल्या कुठे नेऊन पोहोचवले. सहसा मोजक्या वादकांसह असणारा ऑर्केस्ट्राचा ताफा त्यांनी प्रचंड मोठा करत एकाचवेळी शेकडो वादकांचे ताफे वापरून पार्शवसंगीतात क्रांतीच केली. अण्णा चितळकर उर्फ सी.रामचंद्र यांनी पाश्चात्य रॉक एन रोल पद्धतीच्या धमाल चाली वापरून पब्लिकला वेडं केलं तर ओपी नय्यरनी टांग्याच्या एकाच साध्या सोप्प्या ठेक्यावर एकापाठोपाठ एक अनेक गाणी लोकप्रिय करून दाखवली. सचिनदा, सलिलदा, हेमंतकुमार यांनी पारंपरिक लोकधून आपल्या चालींतून जिवंत केल्या. रोशन यांनी कव्वाली प्रकार लीलया हाताळला तर मदन मोहन यांनी गझलांवरची आपली हुकूमत दाखवत लोकांना वेडं केलं. कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांतप्यारेलाल सारख्या जोड्यांनी मेलडीची साथ सोडली नाही. पुढे राहुलदेव बर्मन यांनी पाश्चिमात्य सुरावटी आणि इंस्ट्रुमेंट्स वापरून संगीत लोकप्रिय केलं. सुरुवातीपासून पहिली तब्ब्ल पन्नासेक वर्षं, एका सिनेमांत शक्यतो एकाच गायकाचा आवाज हिरोसाठी तर एकाच गायिकेचा आवाज हिरॉईनसाठी वापरण्याचा प्रघात होता आणि त्यामुळे रफी, किशोर कुमार, मुकेश, लतासारख्यां गायक गायिकांच्या विशिष्ट हिरोंहिरॉइन्ससाठी जोड्याही बनत गेल्या आणि लोकांच्या मनांत रुजल्या. पण ९० च्या दशकानंतर मात्र हे चित्र मोडीत निघालं आणि एकाच सिनेमांत हिरो किंवा हिरॉइन्स हे अनेक गायक/ गायिकांच्या आवाजात गाणी गाताना दिसू लागले आणि हिरो-हिरॉईन्सचं गायक/गायिके बरोबर पूर्वी हमखास असणारं नातं तुटलं. आरडीने प्रथम स्टिरिओ आणि डॉल्बीचा वापर सुरु केला. नंतरच्या जमान्यात मात्र कॉम्प्युटराइझ्ड संगीत लोकांना आवडत गेलं आणि ट्रॅक म्युझिकचा जमाना आला. एकेकाळी प्रामुख्याने लोकसंगीत आणि शास्त्रीय रागदारींवर बांधलेल्या चाली असत, पूर्वीसारखी मेलडी, हार्मनी आता दुर्मिळ झाल्ये आणि हाय पिच आणि कॉम्प्युटराईझ्ड वाद्यमेळाचा आणि रिमिक्सेसचा जमाना आलेला आपण पाहतो. पाश्चात्य प्रकारच्या चाली आणि डान्सप्रकार संगीतात अवतरले. आजच्या पिढीत एआर रेहमानने संगीतात क्रांतीच केल्ये. ३००० स्क्वेअर फुटाच्या चेन्नईमधल्या त्याच्या स्वतःच्या रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये आश्चर्यकारक इक्विपमेंट्स आहेत आणि त्याचा वापर करून रहमान काही जादुई संगीत तयार करत असतो. 

५) फॅशन - फॅशन्सचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे काळानुरूप आणि जगभरच्या ट्रेंड्सप्रमाणे बदलत राहणं आणि नेमकं तेच भारतीय सिनेसृष्टीत आपल्याला पाह्यला मिळतं. त्याची ठळक, जाणवणारी आणि लोकांना पसंत पडून लोकांकडून आचरणात आणली जाणारी पहिली सोप्पी फॅशन म्हणजे हेअरस्टाईलची! देव आनंदचा कोंबडा आणि पुढे अमिताभ, शशी कपूर, विनोद खन्ना स्टाईल कान झाकून मानेपर्यन्त रुळणारे केस सेट करून घेण्यासाठी लोकं सलूनमध्ये जायला लागली. मुलींमध्ये साधना कट तर प्रचंड लोकप्रिय होता. (आताश्या, फ्लॉवरचा गड्ड्याप्रमाणे किंवा कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे दिसणाऱ्या मश्रुम नामक भीषण हेअरस्टाईलचा जमाना आलाय म्हणे!) ब्रिटिशांच्या काळात शर्ट (झब्ब्याप्रमाणे डोक्यातून घालायचा सदरा) लोकप्रिय होता तो मागे पडून अनेक बटणांच्या बुश-शर्टची फॅशन आली. अंगात जर्किन किंवा स्वेटर आणि गळ्यात स्कार्फ किंवा मफलर घालणाऱ्या हिरोंचा जमाना आला. ७० नंतरच्या दशकांत तर हिरो कितीही गरीब असला तरी त्याला वाट्टेल त्या फॅशनचे कपडे, रेक्झीनची जॅकेट्स, शूज वगैरे परवडायचे! राजेश खन्नासारख्या अफलातून फेनॉमिनन सुपरस्टारच्या क्रेझमुळे  त्याच्यासारखा  नाकाच्या शेंड्यावर गॉगल घालून आणि त्यानेच लोकप्रिय केलेला बंद गळ्याचा गुरुशर्ट घालून फिरणारे हज्जारो तरुण भारतभर दिसायला लागले होते. कालानुरूप आधी हिरोची पॅण्ट टाईट फिटिंगची आणि नॅरो बॉटमची असायची ती अचानकच ७०-८०च्या दशकात बेलबॉटम होऊन रस्ते झाडायला लागली. कमरेचे बेल्ट्ससुद्धा आधी बारीक, मग भलतेच जाडजूड आणि मग पुन्हा बारीक असे बदलत गेले. मुलींमध्येसुद्धा पडद्यवरच्या लाडक्या हिरॉइन्सप्रमाणे सुरुवातीच्या काळात ब्लाउज आणि साड्यांची फॅशन आणि पुढे पुढे हिरॉइन्सच्या फॅशन्सनुसार ड्रेसेसची फॅशन येत गेली. चष्मा-गॉगल्सच्या फ्रेमसुद्धा सिनेमात असतील त्याप्रमाणे रस्त्यावरच्या मुलामुलींच्या डोळ्यांवर दिसायला लागल्या होत्या. कपड्यांचं तर विचारायलाच नको. पूर्वी एक गाणं संपेपर्यंत एकाच ड्रेसमध्ये वावरणारे हिरोहिरॉइन्स नंतर मात्र गाण्याच्या प्रत्येक कड्व्यांत वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये दिसायला लागले आणि त्यांच्या ड्रेसेससाठी ख्यातनाम फॅशन डिझायनर्सना कामं मिळायला लागली. 

६) टेक्निक आणि निर्मिती खर्च - याबाबतीत तर सिनेक्षेत्रात कमालीची क्रांती झालेली दिसून येते. मूकपटातून बोलपटाकडे झालेला प्रवास निर्मितीखर्चात वाढ करून गेला पण सिनेमांवर लोकांच्या उड्या पडायला लागल्यावर निर्मात्यांना भरभरून पैसेही मिळायला लागले. यातूनच पुढे सढळपणे खर्च करून सिनेनिर्मिती सुरु झाली. सुरुवातीला बहुतांशी स्टुडियोतच सेट्स उभे करून चित्रित केली जाणारे सिनेमे त्यानंतर मात्र आउटडोअर लोकेशन्सवर जाऊन पोहोचले. भारतभरची खास निसर्गरम्य ठिकाणं प्रेक्षकांना बघायला मिळू लागली. कथानकाच्या गरजेनुसार गावात जाऊन, डोंगरकपारीत जाऊन शूटिंग्ज होऊ लागली. ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या सिनेमांसाठी थेट किल्ल्यांमध्ये जाऊन शूटिंग होउ लागलं. एके काळी स्टुडियोत कश्मीरचे सीन्स उभे राहायचे त्याच कश्मीरमध्ये जाऊन मुक्काम ठोकून शेकडो फिल्म्स मधली गाणी आणि कथेचे प्रसंग शूट होऊ लागले. राज कपूरसारख्या शो-मन ने तर थेट युरोपचं दर्शन ‘संगम’मधून समोर आणलं. ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना जाऊन बहुतांशी सिनेमे हे इस्टमनकलर मध्ये किंवा टेक्निकलरमध्ये चित्रित होऊ लागले.सिनेमा हे माध्यमच मुळी स्वप्नरंजन करणारं त्यामुळे कथा भलेही भारतात घडणारी असो तरी त्यातल्या हिरोहिरॉईनच्या तोंडच्या गाण्यात मात्र दोघंही सातासमुद्रापार अमेरिका, इंग्लंड,स्वित्झर्लंड, इटली, इजिप्त, ऑस्ट्रलिया अक्षरशः कुठेही क्षणार्धात पोहोचून एकेक कडवं गाऊ लागले. ३५ मिमीचा सिनेमा आधी वाईड अँगल सिनेमास्कोप आणि नंतर ७०मिमी चा बनला. पुढे पुढे तर त्यात तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे ३-डी , ४-डी, ५-डी इफेक्ट्स मिळणं सुरु झालं. ध्वनीतंत्रात थक्क करणारी प्रगती होऊन सराउंड साउंड टेकनॉलॉजीमुळे प्रेक्षकांना विलक्षण जिवंत आवाजाचा अनुभव मिळायला लागला. सिनेमॅटोग्राफीमध्ये कल्पनेपलीकडचे तांत्रिक आविष्कार आले. ग्राफिक्स आली. ते तंत्र वापरून बनलेला बाहुबलीसारख्या सिनेमाने लोकांना अक्षरशः वेड लावलं. सुरुवातीच्या काळात बनणारे सिनेमे मोठ्या बजेटचे नसत. ७०च्या दशकात तर NFDC सारख्या सरकारी संस्थांच्या आर्थिक पाठबळामुळे न्यू वेव्ह सिनेमे येऊ शकले होते. पण आता मात्र सिनेमांचा निर्मितीखर्च शेकडो आणि हजारो कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे. महागडं तंत्रज्ञान, अद्ययावत सिनेमॅटोग्राफी आणि भव्यदिव्य सेट्स त्यामुळेच पाहायलाही मिळत आहेत. कथा, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याहूनही त्यांना पूरक असणारी कास्टिंग, सिनेमॅटोग्राफी, मेकअप, ड्रेस डिझाईन, सेट डिझाईन अशा विभागांची स्वतःचीच एक मोठी इंडस्ट्री बनल्ये.  

पूर्वी कधी नव्हते एव्हढ्या संख्येने भारतभरच्या विविध भाषांमध्ये आता दरवर्षी फिल्म महोत्सव आयोजित होत आहेत. अशाप्रकारे आज जागतिक स्तरावर जाऊन पोहोचलेली भारतीय सिनेसृष्टी नित्यनवे ट्रेंड्स अंगीकारत वेगाने बदलत जाताना आपण पाहत आहोत...!!

Wednesday, 30 June 2021

UFO??...UAP???

UFOs?? UAPs???
-------
माझ्या लहानपणी बोरिवलीच्या आमच्या सोसायटीच्या गच्चीत आम्ही मित्र मित्र रात्री झोपायला जायचो. त्यावेळी मध्यरात्री सामसूम झाल्यावर (माझ्या लहानपणी आजच्यासारख्या स्कायस्रॕपर्स आणि टोलेजंग टाॕवर्स नसल्यामुळे-) आसमंतात ब-यापैकी काळोख दाटलेला असायचा!..आणि मग पडल्यापडल्या आकाशातला ता-यांचा सडा बघताना एखादा रशिया/ आमेरिकेचा सॕटेलाईट हळूsss जाताना दिसायचा.. बारीक बारीक हजारो ता-यांच्या बॕकग्राउंडवर तो मंदगतीनं सरकणारा ठिपका बघताना क्काय क्काय कल्पना डोस्क्यात यायच्या...त्यावेळी मला स्पेस-अॕस्ट्राॕनाॕमीचं प्रचंड वेड होतं आणि शाळेच्या लायब्ररीच्या कृपेनं निरंजन घाट्यांच्या खूप विज्ञानकथा वाचलेल्या असायच्या..ना.वा.कोगेकर, सोवनी वगैरे मंडळींमुळे आणि सृष्टीज्ञान सारख्या मासिकांमुळे परग्रहावरची जीवसृष्टी...युफो..असलं कायकाय डोक्यात भिनलेलं असायचं...मग आम्ही सगळे झोपलेलो असताना आमच्या बरोब्बर डोक्यावर (ख-स्वस्तिकाकडून) एक यान येऊन स्थिर झालंय..आणि त्यातनं एक पिवळसर तांबूस सोनेरी प्रकाशझोत (टाॕर्चमधनं पडतो तस्सा) सरळ रेषेत खालती खालती येत इतर कोणावरही न पडता थेट माझ्यावरच पडलाय...आणि त्यातल्या एका अनामिक शक्तीनं मी वर वर उचलला जात थेट त्या यानापर्यंत गेलोय..आणि अचानक एक झडप बाजूला होऊन मला आत शोषलं जातंय..आत चित्रविचित्र प्रकारचे परग्रहवासी आहेत ..त्यांनी मला घेरलंय...ते माझी तपासणी करतायत.,,आता माझी भिती जाऊन त्याची जागा कुतुहलानं घेतल्येय ...मी त्यांना न्याहाळतोय...अतर्क्य शेप्स आहेत त्यांचे....हे होईस्तो खालती गच्चीत बोंबाबोंब झाल्ये कारण त्या पिवळ्या झोतातनं वरवर खेचल्या जाणा-या मला मित्रांनी पाहिलंय...मग एकच गोंधळ...राडाच!...वगैरे वगैरे...असलं काही डोस्क्यात यायचं... ;-) 

पृथ्वीवर अंतराळातून आलेले पाहुणे आहेत आणि खूप खूप काळापास्नं येत राहिलेत ह्यावर माझा गाढा विश्वास आहे तेव्हापासूनच!!

पण थोडा धांडोळा घेतला तर लक्षात आलंय की - आगदी ख्रिस्तपूर्व काळापासून ते अगदी दुस-या महायुद्धाच्या काळापर्यंत ज्यांविषयी ठोस काही explaination देता येत नाही अश्या अनेक चमत्कारिक वस्तू अनेक लोकांनी शतकानुशतकं बघितल्यायत आणि त्याविषयी लिहूनही ठेवलेलं आहे! अगदी गेल्या शतकात म्हणजे २४ जून १९४७ रोजी ढळढळीत असं काही बघितल्याचं छातीठोकपणे सांगितलंन् ते हौशी अमेरिकन पायलट-बिझिनेसमन केनेथ आर्नल्डनं! त्यानं माऊंट रेन(अ)रजवळ प्रायव्हेट विमानातनं जाताना अत्यंत वेगाने उडत जाणा-या बशीच्या किंवा तबकड्यांसारख्या नऊ वस्तू पाहिल्या आणि "बशीसारख्या" असं वर्णन केल्यामुळे सुरुवातीला त्यांना उडणा-या बश्या म्हणून 'फ्लाईंग साॕसर्स' असं म्हटलं गेलं..पण त्याआधीचे शेकडो वर्षांपासूनचे लिखित संदर्भ आणि नंतरही पाहिल्या गेलेल्या विचित्र आकाराच्या वस्तू म्हणून मग अश्या वस्तूंना "UFO म्हणजेच अनआयडेंटिफाईड फ्लाईंग आॕब्जेक्ट्स" असं म्हणायला सुरुवात झाली...पण अलीकडे काहींनी त्यातले काही प्रकार हे पृथ्वीच्या आयनोस्फीअरमुळे घडू शकणारे नैसर्गिक प्रकारही असू शकतात असं वाटल्यामुळे त्यांना UFO ऐवजी "UAP अनआयडेंटिफाईड एअरियल फनाॕमिना" असं म्हणायला सुरुवात झाल्ये आणि अमेरिकेत तर एक स्पेशल टास्क फोर्सच बनवला गेलाय "UAP अनआयडेंटिफाईड एअरियल फनाॕमिना"चा वेध घेण्यासाठी!!

परवापरवाच "पेंटॕगाॕन" आणि ह्या "UAP Task Force" ने अमेरिकन नेव्हीच्या फायटर पायलट्सनी २०१७ पासून जितक्यांदा अशा प्रकारच्या UFO/ UAP पाहिल्या आणि त्याचं रेकाॕर्डिंग केलं, त्यापैकी काही टेप्स डि-क्लासिफाईड करुन प्रेससमोर आणल्यात!! त्या १४४पैकी बहुतेक केसेस ह्या "नैसर्गिक चमत्कार" म्हणून फेटाळून लावल्या तरी एक रेकाॕर्डिंग मात्र काही वेगळंच दाखवतंय...त्या रेकाॕर्डिंगमधे अफाट प्रचंड वेगाने सरसरत जाणारी ती तबकडीसदृश्य वस्तू ही चीन किंवा रशियाचं एखादं "फ्युचरिस्टिक वैज्ञानिक उपकरण आहे की खरोखरचं युफो" याविषयी संदिग्धता आहे!! पण पँन्टॕगाॕनने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार त्यांच्या माहितीनुसार तशी टेक्नाॕलाॕजी त्यांच्या शत्रुंकडे (रशिया, चीन) सध्या नाही!..मग तसं असेल तर त्या नेव्हीच्या फायटर पायलट्सनी जो UAP (Unidentified Aerial Phenomena) बघितला तो खरोखरच परग्रहवासियांचं प्रचंड वेगाने जाणारं यान होतं?...म्हणजे पृथ्वीवर ते आॕलरेडी आलेत? आहेत?...त्या UAPsवर भन्नाट तर्क लढवले जातायत - कुणी म्हणतंय ते आपल्यासारख्याच मानवांनी भविष्यातनं (टाईम वार्पमधनं) उलटा कालप्रवास करत आपल्याला दिलेलं दर्शन असेल...किंवा मग दूरच्या एखाद्या तारामंडळातल्या ग्रहावरनं आलेले प्रगत परग्रहवासी असावेत ते?!!!

एक नक्की की अमेरिकन गव्हर्न्मेंट त्याविषयी गंभीरतेनं माहिती गोळा करतंय! अमेरिकेचे सर्वमाजी आणि आजी  प्रेसिडेंट्ससुद्धा सिरियस दिसतायत!..,मागे बराक ओबामांनी हे म्हटलं होतं की "हो आकाशात तसंकाही दिसल्याचे पुरावे नक्कीच आहेत, पण आपल्याला सांगता येत नाही "ते" नक्की काय आहे म्हणून!!..र नुकत्याच झालेल्या निवडणुकीआधी ट्रंम्प त्यासंदर्भात काही गोपनीय माहिती फोडण्याच्या बेतात होते पण इस्राएलच्या संरक्षण खात्याच्या प्रमुखांच्या विनंतीवरुन ते थांबले असं WION न्यूज चॕनलची बातमी होती!..

अगदी १९५१ सालच्या "द डे द अर्थ स्टूड स्टिल" पासून अगदी अलीकडच्या "अॕव्हेंजर्स" सारख्या मूव्हीजपर्यंत हाॕलीवूडमधे युफो आणि एलीयन्सवर ( परग्रहवासी) अनेक मूव्हीज बनत आलेत!!

मी या विषयावर पाहिलेला पहिला मूव्ही होता "द क्लोज एनकाऊंटर्स आॕफ द थर्ड काईंड"! स्टीव्हन स्पीलबर्गचा!! ज्यामधे युफोमधनं आलेल्या परग्रहवासियांनी पृथ्वीवर येऊन उचललेल्या काही माणसांना, प्राण्यांना परत एका लँन्डिंग साईटवर सोडल्याची चित्तथरारक कथा होती..त्यात भारतातल्या धरमशालाजवळच्या साधूंचाही सहभाग दाखवल्याचं आठवतंय! जे.अॕलन हायनेकने अशा युफो आणि एल्यन्सबरोबरच्या 'क्लोज एनकाऊंटर्स'चे पाच kinds प्रकार सांगितलेत - (१)  साईटिंग किंवा दर्शन (२) एव्हिडन्स किंवा पुरावा (३) काँन्टॕक्ट किंवा संपर्क (४) अॕब्डक्शन किंवा माणसांना, प्राण्याःना युफोमधनं पळवून नेणं (५) कम्युनिकेशन किंवा परग्रहवासियांनी मानवाशी थेट बोलणं!!

हे सारं अद्भूत आहे. पण माझा पॕरलल वर्ल्ड्स, टाईम ट्रॕव्हल, स्पेसटाईम-वार्पवरही विश्वास आहे. आपली अॕस्ट्रल बाॕडी (सूक्ष्म देह) असा प्रवास करते ह्यावरही विश्वास आहे (अॕस्ट्रल बाॕडी पुन्हा ज्जड देहात शिरतानाचा जर्क तर मी बेडवर पडल्यापडल्या अनेकदा अनुभवलाय!)...

एकीकडे हे UFO किंवा UAP ..आणि दुसरीकडे आपल्या भारतातल्या आनेक महान योग्यांना ज्ञात असणा-या अष्टसिद्धी ...क्रियायोग...ह्याविषयी खूप खूप कुतूहल वाटून वाचन चालू आहे...







Wednesday, 23 June 2021

So difficult to be simple..

"It is so simple to be happy but it is so difficult to be simple.."
--------------------
काल ब-याच काळनंतर चॕनल बदलताना "बावर्ची" समोर आला आणि मग जी फ्रेम समोर होती तिथपास्नं पुन्हा ब-यापैकी बराच वेळ बघत गेलो. बावर्ची राजेश खन्नाच्या तोंडचे गुलजारजींचे डायलाॕग्ज ऐकताना जणु वपुंचीच वाक्यं ऐकत असल्याचा फील येत होता. अगदी सहजसुंदर तत्वज्ञान साध्यासाध्या बोलण्यातनं!

एका प्रसंगात कुटुंबातल्या मधल्या भावाशी बोलताना बावर्ची सहज बोलून जातो-" It is so simple to be happy but it is so difficult to be simple.." आणि हा डायलाॕग घुसलाच एकदम मनात!....

थोडं गुंतागुंतीचं आहे नैय हे वाक्यं? "आनंदी असणं/राहणं फारच सहजसोपं" पण "सहजसोपं असणं/राहणं फारच कठीण (पुण्याच्या भाषेत "अवघड"!)"!...व्वा....पण म्हंजेच एकापरी आनंदी राहणंही कठीणच नं?...

हे वाक्य डोक्यात संध्याकाळी रुंजी घालत असतानाच मी शाळेच्या ग्रुपच्या काही मित्रमैत्रिणींना भेटलो आणि काही मित्रांच्या जुन्या आठवणी निघाल्या आसताना गेल्या ३०-३५ वर्षांत न भेटलेल्या एका मित्राचा विषय निघाला आणि आमच्या त्या मित्राने ३५ वर्षांपूर्वीच्या शेवटच्या भेटीत सिंम्पल राहणीमानावरनं बोलताना त्याने गंमतीशीर इंग्लीशमधे पण काँन्फिडेंटली टाकलेलं वाक्य आठवलं "प्रसन्न तुला सांगतो सिंम्प्लीसिटी इज द बेस्ट सिटी!"..

आणि बावर्चीचं "सिंम्पल राहणंच डिफिकल्ट" असण्याचं मनात घोळणारं वाक्य पुन्हा प्रकर्षानं समोर आलं..

खरंच..आपण डिफिकल्ट करुन टाकलंय सिंम्पल असणं...सिंम्पल राहणं...आजकालच्या जगात.....!

पूर्वी चाळ, वाडा संस्कृतीमधली छोटी घरं (फार्फार तर 1BHK) असताना आणि रेडिओ ते एकचॕनलीय टीव्ही असण्याच्या काळात किती सिंम्पल आसायचं जीवन! मी नेहेमी म्हणत आलो मला "श्रीमंती"पेक्षा "समृद्धी" आवडते! तसंच असायचं ते जीवन. Rich नसलं तरी Enriched!!.... त्याकाळातली १९५५ ते १९७५ मधली जुनी वर्तमानपत्र काढून बघितली तरी त्यावेळचा समाज आणि एकुण आयुष्य लुभावतं. आनंद सिंम्पल...समाधान सिंम्पल...सुख सिंम्पल...इतकंच काय प्राॕब्लेम्स किंवा समस्याही तश्या सिंम्पलच!!

१९५५ ते १९७५ मधली नाटकं, सिनेमेही सिंम्पल. राजकीय आणि सामाजिक उलथापालथही सिंम्पल. कथाकादंब-या लेखनही सिंम्पल. 

गोची सुरु झाली ती १९७५ नंतर ख-या अर्थानं. मग सिंम्प्लीसिटी काँम्प्लेक्स होत गेली. राजकारण, समाजजीवनात भलत्याच उलथापालथी होत गेल्या. सिंप्लीसिटी कमी होत गेली....

आणि आता??....आता तर सगळंच काँम्लेक्स..व्यामिश्र...सगळंच...आणि मग त्यात सुख, समाधान, हॕप्पी असणं/ राहणंही काँम्प्लेक्स होऊन बसलंय...

इतकंच काय..पण हे साधं फेसबुकवर सिंम्पल असणं/राहणं/लिहिणंही सिंम्पल नसतंय...किंवा सिंम्पल असून चालत नाही बहुदा. खूप जड...काहींचे लेख..कविता वाचल्या की जाणवतं...कसं काय बुवा जमतं काँम्प्लेक्स लिहिणं इतकं सहज काहीजणांना?...मला तर ज्याम जमत नाही...आणि नर्व्हस व्हायला होतं त्यांचं वाचताना...विचार करताना बावर्चीचं ते मनात घुसलेलं वाक्य जास्तच पटलं - "It is so simple to be happy but it is so difficult to be simple.." ;-) 

Time is money

"Time is Money" नक्की का?
--------------------------
खरं तर हे प्रोव्हर्ब खूप वर्षं ऐकत आलोय आणि टीव्ही, सिनेमांसाठीच्या एक्केक सेकंदाच्या जाहिरातीचे रेट्स ऐकल्यावर निदान त्यानुषंगाने हे खरंही आहे! पण आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात हे misnomerच वाटतं!

म्हंजे बघा ना - मी कित्येकदा खूप सारे 'पैसे' खर्च करतो 'वेळ' वाचवण्यासाठी. पण "वेळ (time) = पैसा (money)" असेल तर याचा अर्थ होतो मी पैसे 'खर्च करुन' पैसा 'वाचवत' असतो? कमालच की! म्हणजे "पैसे खर्च करा आणि पैसे वाचवा!" गंमतीचं वाक्य ना हे??😉
बरं याच्या उलट तरी बघा - एखाद्या लांबच्या ठिकाणी प्रवासाला जायचं असेल आणि तिथे बस, रेल्वे आणि विमान तीनही प्रकारे जाता येत असेल तर कदाचित काहीजण पैसे वाचवण्यासाठी वेगवान विमानाऐवजी वेळखाऊ साधनं म्हणजे रेल्वे किंवा बसने रोडचा प्रवास निवडतील. म्हणजे पैसे (money) वाचवण्यासाठी वेळ (time) खर्च करतील; पण time is money या प्रोव्हर्बनुसार आपण पैसे (म्हणजेच वेळ) वाचवण्यासाठी वेळ (म्हणजेच पैसे) खर्च करतो! आयला, म्हणजे "वेळ खर्च करा आणि वेळ वाचवा? म्हणजे पुन्हा कमालच की! हेही गंमतीदारच!🙃

पण ही सर्व गंमत जाऊ दे - मला सिरियसली प्रश्न पडतो की खरंच कित्येकांना वेळेची किंमत time (=money)ची value का कळत नाही? आणि माझं दुर्दैव असं की माझ्या नशिबाने मला बऱ्याचदा दिलेली वेळ न पाळणारेच भेटलेत. मी अत्यंत थर्डक्लास नवरा, बेक्कार बाप आणि टुक्कार मित्र असण्याचं कारण म्हणजे मी बायको, मुली आणि मित्रमैत्रिणींशी वेळ न पाळण्यावरून वादावादी  करतो..कचाकचा भांडतोसुद्धा! ते म्हणतात तसं विचार केला तर कितीही झालं तरी घरचे आपल्या प्रचंड हक्काचे आणि बाकीचे मित्रमैत्रिणी किंवा इतर ओळखीचे नाही म्हटलं तरी तसे परकेच - मग होतं काय की मित्रमैत्रिणींना त्यांनी दिलेली वेळ न पाळल्यामुळे मला झालेला मनःस्ताप त्या मानाने रागाचा स्फोट न होता व्यक्त केला जातो पण तेच बायको आणि मुलींवर मी भयंकर चिडून बोलत असतो अगदी त्यांनीं माझ्याशी काही वेळ अबोला धरेपर्यंत! (म्हणूनच मी थर्ड क्लास नवरा आणि बेक्कार बाप आहे!) ...गेली लाख्खो वर्षं माझे मित्र (मैत्रिणी जास्त!) ठरलेली वेळ न पाळून माझी कवटी सटकवत असतात. 

आणि झालंय काय आधीच मी चित्पावन कोब्रा त्यामुळे वेळ पाळण्यात (किंबहुना खूप आधीच रेडी असण्यात माहीर!), तशात मी आयुष्यत काही वर्षं जॅपनीज आणि इटालियन कंपनीत काढून ती मंडळी वेळेची किती भोक्ती असतात ते पाह्यल्याने मला बुवा दिलेली वेळ पाळायला प्रचंड आवडतं! (आम्ही इंडियन नेहेमी मीटिंगला उशिरा जायचो तेव्हा कळलं की त्यांच्या देशात "मिटिंगची वेळ" ही मिटिंग-रूममध्ये शिरायची वेळ नसून, त्याआधी १० मिनिटं तिथे हजर राहून शार्प 'त्या वेळी मिटिंग "सुरु करण्याची" असते म्हणून! ....... ती सवय झाल्यामुळे वेळ न पाळण्यांवर मी कायच्या क्काय चिडत असतो!  

व्हॉल्वोने प्रवास करायची वेळ आली की माझी त्या व्हॉल्वो बस ड्रायव्हरशी नेहेमीच वादावादी होत असते. ते साले मॉलला थांबताना सांगतात अमूकएक मिनिटं (१० किंवा १५ जे काय) बस थांबेल आणि प्रत्यक्षात मात्र शेवटचा माणूस आरामात हादडून हलेडुले येईपर्यंत थांबतात आणि माझी सटकते. माझं म्हणणं असतं की त्या ड्रायव्हरने दिलेली वेळ संपली की सरळ बस सुरु करून निघून जायचं तर ते तो करत नाही आणि त्यावर कडेलोट म्हणजे हलेडुले येणारा ते लेट लतीफ (पुरुष, बायका दोघं) आपल्याच बापाची बस समजून असल्यामुळे आपल्यामुळे बाकीच्यांचा खोळंबा झालाय तर किमान कर्टसी म्हणून सॉरी म्हणून दिलगिरी व्यक्त करतील तर ते हरामखोर भारतीय कसले?!!! मग माझी धूसफूस चालू होते.... बीपीचा त्रास नसल्यामुळे ते अजून वाढलेलं जाणवलं नाही कधी, पण चिडल्यामुळे भडकून कुठेतरी डोक्यात दहाबारा बारीक रक्तवाहिन्या नक्कीच बर्स्ट होत असणार....!! (नशीब अजून भारतीय रेल्वे आणि विमान-कंपन्या तरी प्रवाशांसाठी असं उगाच वाट बघत थांबून राहत नाहीत!) 

मराठी नाटकवाल्यांची पण तशीच बोंब! दिलेल्या वेळी कध्धीच नाटक सुरु करत नाहीत! त्यामुळे मराठी नाटकाचे प्रेक्षकसुद्धा जग्गातले आळशी आणि लेट लतीफ झालेत! त्यांचीही धारणा झाल्ये की नाटक हे दिलेल्या वेळेवर जन्मात सुरु करणार नाहीत म्हणून! असले भिकार मनोवृत्तीचे आपण! लेको करा ना नाटक वेळेवर सुरु - लागू देत शिस्त प्रेक्षकांनाही!! पण हम नही सुधरेंगे! (नशीब - सिनेमाथेट्रात सिनेमा तरी अजूनतरी दिलेल्या वेळेत सुरु होतो! तिथे शेवटचा प्रेक्षक येईपर्यंत थांबत नाहीत!!)
 
तसंच काही मित्रमैत्रिणींच्या बाबतीत! कित्येक मित्रमैत्रिणींना (विशेषतः मैत्रिणींनाच!!) वेळेचं गणितच जमत नाही. त्यांचं "काळ-काम-वेग"वगैरे गणिताची भयंकर बोंब असते! भूगोल (कुठून कुठे जायचंय), जनरल नॉलेज (वाटेत साधारण कुठे किती ट्राफिक आणि अडथळे असू शकतात)  आणि फिजिक्स (किती किलोमीटर पर सेकंडने जायला हवं) - या सगळ्याचं ज्ञान ज्यामच गंडलेलं असतं! त्यामुळे दिलेल्या/ ठरलेल्या ठिकाणी मी आपला (चित्पावन कोब्राच्या) वेळपाळू स्वभावानुसार मस्तपैकी आधीच हजर असतो आणि या खुशाल अर्धातास किंवा कितीही उशिरा येतात! तोपर्यंत माझी वाट पाहून सटकलेली असते त्यात प्रचंड घामट असल्याने (ते "sweating like pig की dog" बदलून 'स्वेटिंग लाईक प्रसन्न' करायला हरकत नाही!)  माझ्या त्या ठिकाणी प्रचंड वेळ माझा पुतळा होऊन तोपर्यंत पाठीच्या पन्हळीतून घामाची नदी खालती प्यांटीपर्यंत शिरायला लागलेली असते! 😠

तर सांगायचं तात्पर्य म्हणजे time is money वगैरे मरूच दे - पण दिलेली वेळ न पाळणारी आणि काही अपरिहार्य कारणाने त्यांची चूक नसताना समजा उशीर होत असेल तर तसं वेळीच न कळवणारी माणसं डोस्क्यात जातात! माझी घरीदारी सर्वात जास्त चिडचिड आणि टोकाचे वाद आणि भांडणं वेळ न पाळण्यावरून होतात. आणि मग क्वचित माझ्या काटकटीमुळे कावलेली, वैतागलेली आणि संतापलेली बायको आम्ही लवकर जाऊन पोहोचल्यावर तो समारंभ काही कारणाने वेळेत सुरु न झाल्यास, मला "जा जा अजून झाडू मारायला लवकर जाऊन बसू!!" वगैरे ऐकवते तरीही मी माझ्या वेळ पाळण्यावर ठाम असतो (तो समारंभ वेळेत सुरु न करणाऱ्यांना मनोमन शिव्यांची लाख्खोली वाहत!) 
 
आजकाल बघितलंय की पत्रिकेत छापलेली वेळ (घटिका की काय ते!) सुद्धा उलटून गेल्यावर लग्न लागतात! मग माझी चिडचिड सुरु! जर का लग्न हा एक गंमतीदार खेळच आहे आणि मजेतच सगळं करायचं असेल तर अशी ती मंडळी लग्नपत्रिकेत वेळच का छापतात in the first place? गरजच काय? पुन्हा तेच काळ-काम-वेग याचा सुतराम संबंध नसल्यामुळे कोणकोण कितीकिती वेळ स्वरचित मंगलाष्टकं गाणारेत वगैरे अंदाजच नसतो ...आणि आपण आपले दिलेल्या लग्नघटिका पाळायची म्हणून काळ काम वेगाची गणितं, ट्रॅफिकचा अंदाज सगळं बघून भरपूर आधीच वेळेत पोहोचलेलो असतो. तर वेळ उलटून जाऊनही लग्न लागत नसल्याचं बघत बसावं लागतं आणि वर कुणातरी काकवा/मावश्यां/आत्याबाईंची चांगली २०-२० कडव्याची (आता संपतील ...आता संपतील... आतातरी संपतील... वाटायला लावणारी ) स्वरचित मंगलाष्टकं ऐकायची पाळी येते कारण ती संपल्याशिवाय भटजीबुवाचं "तारांबळं... " सुरु होणार नसतं! (गंमत म्हणजे दिलेल्या वेळेवर (तास/मिनिट) लग्न न लागून चालत असणाऱ्या त्या फॅमिलीने चक्क पत्रिका आणि ग्रह वगैरे जुळवून सून/जावई आणि लग्नाचा मुहूर्त काढलेला असतो हा जोकच! )...

अशी ती वेळ न पाळणाऱ्यांना हे का कळत नसतं की - बायकोने घराबाहेर काढलंय म्हणून किंवा गोट्या खेळायला घरी किंवा सोसायटीत कुणी मिळालं नाही म्हणून - वेळ घालवायला आम्ही त्या ठिकाणी येऊन तिष्ठत उभे/ बसलेलो नसतो!! आम्हालाही आमच्या वेळेत करण्यासारखं बरंच काही असूच शकतं. नव्हे असतंच!!!! 

म्हणून time is money या वाक्याचा अर्थबिर्थ राहूदे बाजूला पण निदान दुसऱ्यांच्या वेळेचं भान/ चाड बाळगायला शिकलो आपण बहुसंख्य लोक तरी मिळवली!🤓

Tuesday, 22 June 2021

लेह मधले मंतरलेले दिवस!

माझ्या लेह-भेटीची हकिकत नवीन फ्रेंड्ससाठी! 
-------
(१) 
लेहला पोचल्यावर, गार्गी गेले दोन महिने राहत्येय त्या "Rover's Den" ह्या बॕकपॕकर्ससाठी असलेल्या हाॕस्टेलमधेच उतरलो मी आणि निकिता! 

ग्रीष्मा सोले आणि कौस्तुभ दळवी या उत्साही नवराबायकोने इथल्या 'वसिम बारी झरगार' नावाच्या उत्साही पार्टनरबरोबर सुरु केलेलं हे हाॕस्टेल, पाठीवर सॕक टाकून ही देवभूमी एक्स्प्लोअर करायला येणा-या  विमुक्त, भटक्या ट्रेकर्ससाठी आदर्श अशीच जागा!! इथे प्रत्येक रुममधे खालीवर झोपायची सोय असणारे बंकबेड्स आहेत आणि ओपन किचन आहे. त्यांचा कूक तुम्हाला मेन्यू कार्डमधलं बनवून देतोच पण तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही ते ते इनग्रेडिअंट्स आणून किचनचा ताबा घेऊन तुम्हाला हवं ते बनवूच शकता! अट एकच नंतर सगळं आवरुन ठेवायचं! ;-) ...इथल्या भिंतींवर तुमची ग्राफिटी, कलाकारी चितारु शकता..रंग, ब्रश ठेवलेलेच आहेत ट्रंकभर!! आणि  टाकाऊ वस्तू वापरुन एक छान माहोल क्रिएट केलेला आहे! दर शनिवारी रात्री कँम्प फायर ची सोय असते (पाऊस पडून लाकडं ओली न झाल्यास!) 

खरं तर थंड वातावरणात लेह ला 11000 फुटांवर उतरल्यावर अक्लायमेटाईझ व्हायला दीड दिवस तरी द्यावाच म्हणतात..पण "रोव्हर्स डेन हाॕस्टेल"च्या माहोलच्या जादूने एक वेगळाच आॕक्सिजन भरला जातोय फुप्फुसात! ;-) 

माझा काल इथे आल्यापासूनचा आत्तापर्यंत दीड दिवस होत आलाय  आणि तेव्हढ्यातच  बर्रेच मराठी आणि युरोपियन ट्रेकर्स, हायकर्स उतरलेत त्यांच्याशी ओळखी होतायत! 'कबीर राचुरे' गेल्या वर्षीच्या हिमालयन सायकल रॕलीचा विजेता पुन्हा यावर्षीची 600 किमीची (इथल्या रफ टेरेनची) सायकल रॕली जिंकायला आलेला मूळ लातूरकर तरुण! उत्साही आणि बडबड्या! तर कार्तिक महाजन हा नागपूरकर अफ्फलातून वाईल्ड लाईफ फटोग्राफर आणि टायगर एक्स्पर्ट! अशी बाप माणसं भेटून छान वाटतंय!

आता रिफ्रेश होऊन दुपारनंतर जवळच मार्केटमधे फेरफटका मारेन म्हणतोय!
----------------
(२)
सकाळी ब्रेकफास्ट उरकेपर्यंत एहसानभाई आपली इनोव्हा घेऊन "रोव्हर्स डेन"च्या दारात हजर! शेअर बेसिसवर इनोव्हा ठरवली असल्यामुळे आणखी दोनजणांना वाटेत पिकअप करायचं होतं. ते दोघे सहप्रवासीही छान मिळाले. ज्युलीयन हा फ्रेंच तरुण आणि झिनी ही जर्मन तरुणी! पहिल्या "Hi...Hullo"तच गप्पा रंगणार हे स्पष्ट झालं. ज्युलीयन हा कार्ल्सबर्ग या डॕनिश ब्रँण्ड बिअरचा फ्रान्समधला सेल्समन हे कळल्यावर पुढचा अर्धापाऊणतास मस्तपैकी लिकरचे ब्रँड्स आणि जर्मनी, फ्रान्समधल्या माणसांच्या पिण्याच्या आवडीनिवडी वगैरे आवडीच्या विषयावर बोलण्यात गेला! तर झिनी ही जर्मनीत स्पेशल चिल्ड्रेनच्या शाळेत टीचर म्हणून काम करत्येय. झिनीची ही दुसरी भारतवारी तर ज्युलीयनची पहिलीच!..दोघंही जग फिरणारे पण भारतही आवडलाय हे त्यांच्या गप्पांमधून कळलं. मी, निकीता आणि गार्गी आम्ही तिघंही हॕरी पाॕटर, हाॕगवर्ट्स आणि विझार्डींग वर्डचे दिवाणे आणि झिनीसुद्धा! तीसुद्धा आमच्यासारखी नेटफ्लीक्स पाहणारी! पण सध्याची जर्मन जनरेशन-नेक्स्ट बहुंतांशी अमेरिकन फिल्म्सच बघणारी आहे हे तिचं मत! तिच्याशी छान कनेक्ट होत गप्पा रंगल्या. तर ज्युलीयनशी "अॕस्टेरीक्स आणि टीनटीन" काॕमिक्सच्या आवडीमुळे! तश्यात मला "टूर डी फ्रान्स" ही सायकलस्पर्धा बघायला आवडते (विशेषतः ती फ्रान्सच्या ज्या गावांतनं जाते तिथला अमाप, अद्भूत निसर्ग बघायला) तशीच ज्युलीयनलाही! त्यामुळे सायकल रेस, आर्मस्ट्राँग वगैरे गप्पा रंगल्या...दोघांशीही बोलण्यात औपचारिकता राहिलीच नाही..

आमच्या एहसानभाईने सुसाट इनोव्हा सोडली होती, वाटेतल्या सुंदर आणि आखीवरेखीव साबू गावाला मागे टाकून आम्ही लवकरच "सिंधू दर्शन" स्पाॕटला पोहोचलो. पुढचा काही वेळ पवित्र सिंधू नदीला उजवीकडे ठेवतच झाला! आणि नंतर ज्या डोंगर रांगा सुरु झाल्या त्या थेट पँगाँग सरोवरापर्यंत!

बरं तो भाग सगळा उघड्याबोडक्या डोंगररांगांचा!..रस्त्याच्या बाजूला अधनंमधनं तुरळक झाडं असली तरी डोंगरांवर एक झाड असेल तर शप्पथ च्यामारी! डोंगरावरची माती पण चारपाच रंगांची..म्हंजे काही डोंगर मातकट..तर काही पिवळेधम्मक..तर काही पांढरट चाॕकलेटी तर काही सिमेंटने गनायटींग केल्यासारखे तुकतुकीत पांढरट राखाडी घट्ट वाळूची चादर अंगावर ओढून उभे !

पण जाताना एक जाणवलं ती म्हणजे कमालीची स्वच्छता! (अशीच स्वच्छता केरळ ट्रीपमधे अख्ख्या केरळभर पाहून मनोमन कम्युनिस्टांना सलाम ठोकला होता! ) अख्ख्या भारतभर केरळ आणि लडाखइतकी स्वच्छ गावं आणि कागदाचा कपटा आणि प्लॕस्टीकची पिशवी नावापुरतीही आढळली नाही! (असलीच तर ती नक्कीच भारतातल्या इतर राज्यांतनं आलेल्या माजोरड्या, हरामी नागरिकांची देन या गावांना! 100%!!) 

वाटेत आमची तिघांची परमिट्स आणि ज्युलीयन आणि झिनीचे पासपोर्ट्स चेक करुन झाले आणि सुसाट सुटलो. चेमदे माॕनेस्ट्री मागे टाकली आणि जगातल्या दोन नंबर उंच (17688 फूटांवरचा) असलेल्या च्यांगला पास रोडकडे निघालो.

आता मात्र रोड कुठल्याही ड्रायव्हरची परीक्षा घेणारा BRO (बाॕर्डर रोड..)ने बरीच कामं केल्येत तरीही बाजूच्या भयानक अजस्र शिळा आणि दरडी पडू शकणा-या..नव्हे पडणा-या डोंगरांमुळे रस्ते वाईट आहेत! एहसानभाई मात्र सराईतपणे इनोव्हा पळवत होता,,,

आश्चर्य सतत वाटत होतं की इतक्या प्रचंड उंचीवरची जीवघेणी वळणं, अंगावर कधीही पडतील अशा दरडी एका बाजूला तर खोलच खोल दरी दुस-या बाजूला असूनही कुठ्ठेच संरक्षक कठडे/ भिंती वगैरे प्रकारच नाही. आणि हे कमी म्हणून की काय आपल्याला घाबरवायला ठिकठिकाणी "Avelanch prone area" किंवा "शूटींग स्टोन एरिया" आसे बोर्ड्स! ड्रायव्हर चुकला तर थेट मुक्ती!! पण त्यातही एक दोन डोंगरांमधे मला चक्क त्या मॕकेन्ना'ज गोल्डसारख्या घळी दिसल्या ज्यावर त्या उंच सुळक्याची धावती सावली जात थांबते आणि ज्यामधून शेरीफ मॕकेन्ना त्या बदमाष कोलोरॕडो आणि गँगला घेऊन त्या सोन्याच्या खाणीत शिरतो...वगैरे आणि उगाचच वाटून गेलं - न जाणो - सालं आपणही इथे या सावलीच्या घळीत शिरलो तर आतमधे खोल गुहेतून, कपारीतून जात आपल्याला सिनेमातल्या अपाची इंडियनइतक्याच सुरकुतलेल्या एखाद्या लडाखी म्हातार्याचा शापित सुवर्ण खजिना मिळून जायचा..कुणी सांगावं ;-) 

त्यापुढचे डोंगर तर एकदम ताशीव आणि गुळगुळीत तर इतके की कुणाला शिखरावरुन सोडलं तर कुठ्ठेही न आपटता (कारण वाटेत खडकच नाही) तो सरळ घसरत पायथ्याशी यावा!! :-D  

पँगाँग सरोवराशी आलो आणि ..डोळ्यांचं पारणं फिटलं!..केव्हढा तो निळ्याशार, निळ्याभोर, निळ्याचुटूक, निळ्याभडक, निळ्याधम्मक आणि निळ्याजर्द पाण्याचा अथांग पसारा!!! नजर पोचेस्तो सरोवरच सरोवर!!..

इनोव्हातून उतरुन लगेच किना-याजवळ धावलो पण तिथलं दृश्य बघून चीड आली...शिसारी आली..यक्षभूमी वगैरे म्हणवल्या जाणा-या त्या परिसरात ..अगदी पँगाँग सरोवरासमोरच व्यावसायिक धंदेवाल्यांनी त्या स्वर्गीय चमत्कारावर पाssर बोळा फिरवलाय!..किना-यावरच ओळीने ती 3-इडियट्स सिनेमातली तीन रंगांची खूप सारी ढुंगणं ओळीने मांडून ठेवल्येत..आणि बाजूलाच त्याच सिनेमातल्या करिनाच्या पिवळ्या स्कूटर आणि  हेल्मेटसारख्या अनेक स्कुटर्स आणि हेल्मेट्स..आणि पँगाँग बघायला येऊन थांबणा-या अनेक कार्स आणि बसेसमधली अनेक खुळी मंडळी त्या तीन रंगी ढुंगणात बसून मागे वळून त्या ढुंगणाच्या गोलाईवरुन हात फिरवत मागे वळून पोज देतात..मुली करिनाच्या स्कूटर्सवर बसून फोटो काढतात?!! अरे लेको समोर बघा...निसर्गाचा..जगन्नियंत्याचा अद्भूत चमत्कार नजर पोहोचेस्तो पसरलाय तर तुम्ही मागे बघत रंगीत ढुंगणं कुरवाळत पोझेस कसल्या देताय? 😠

आम्हाला त्या वातावरणात 10 मिनिटांच्यावर थांबावसंच वाटलं नाही आणि आम्ही सरळ पुढे निघालो. सरोवराच्या कडेने जात आणखी दोनचार किलोमीटर्स पुढे आल्यावर एका चढावर स्पांगमिक या ठिकाणी एक छान होमस्टे काॕटेज मिळाली रहायला.  क्काय लोकेशन होतं बाकी! खिडकीतून समोर पसरलेलं अथांग पँगाँग सरोवर आणि आमच्या काॕटेजच्या मागच्या बाजूला दोनचार तपकिरी पर्वतांमधून डोकावणारी सुंदर हिमाच्छादित शिखरं !! एक रात्र काढायला याहून आणखी काय हवं?...

संध्याकाळी भयानक बोच-या थंडगार वा-यात पँगाँग सरोवराच्या बाजूने फेरफटका मारला. पाण्याची चवही मी चाखून पाहिली. पण "साॕल्ट लेक" म्हणावं तर चव खारटपेक्षा तुरटच वाटली मला! एकीकडे त्या हाडं गारठवणा-या वा-याचा जोर वाढतच होता. आईशप्पथ! पँगाँगकाठच्या या स्पँगमॕक वस्तीत लिट्रली 24x7 थंडगार वारे वाहतात! एक सेकंद थांबत नाहीत हे अंगाला झोंबणारे वारे!..(इथे खरं तर विंडमिल्स लावायला हव्यात सरकारने म्हंजे रात्री जेमतेम दोनतीस राहणारी वीजसुद्धा इथल्या लोकांना चोवीस तास मिळेल!)..

पहाटे 4.30 ला अचानकच जाग आली.. बेडवरुन झोपलेल्या अवस्थेतच खिडकीबाहेर नजर टाकली. समोर काळोखात लपलेले ध्यानस्थ डोंगर..
वा-यामुळे सरोवरावर उठणारे तरंग.. आणि आकाशात मंद प्रकाशणारी चंद्रकोर. विलक्षण वातावरण. मग झोप उडालीच! मी चक्क खिडकीजवळ मांडी ठोकून बसलो!! एक तास तसाच बसून होतो. समोर बालपणी चित्र शिकताना काढायचो तशी त्रिकोणी डोंगरांची रांग आणि पुढ्यात पँगाँग सरोवराचं पाणी..मग काय..चित्रातल्यासारखा त्या त्रिकोणी डोंगरामागून उगवणारा खर्राखुर्रा सूर्य प्रत्यक्ष अनुभवून मगच बेडवरुन हललो!..

लेहपर्यंतचा परतीच्या प्रवासात ज्युलीयन आणि झीनीबरोबरच्या गप्पांतनं खूप शिकण्यासारखं होतं. दोघंही अठ्ठावीसचे पण कित्ती जग फिरलेत!! दोघांना लहान बहिणी आहेत. पण आपापलं आयुष्य त्यांनी छान प्लॕन केल्याचं जाणवत होतं. त्यांचं फिरणं आणि प्लॕनींग ऐकूनच थक्क झालो! पैसे साठवावेत आणि पृथ्वीच्या पाठीवर भटकंती करावी..वेगवेगळ्या खंडांत...ट्रेकींग करावं...लो काॕस्ट हाॕटेलमधे राहात...वेगवेगळं खाणं ट्राय करावं...हे त्यांच्याकडून शिकावं.

त्यांच्या कंपनीत लेह-पँगाँग-लेह जाऊन येऊनची रोड-ट्रीप खेळीमेळीच्या गप्पांत मस्त पार पडली! त्यांना उद्यापासूनच्या त्यांच्या मर्खा व्हॕली ट्रेकला शुभेच्छा देऊन निरोप घेतला!
-----------------
(३)
संध्याकाळ दोन्ही लेकींबरोबर मार्केट स्क्वेअरमधे फिरत घालवली.

मार्केटमधल्या जुन्या बुद्धीस्ट-टेंम्पलमधे घुसलो. पण बहुदा लेट झाल्यामुळे आपल्या देवांसारखाच, त्यांचाही देव कुलुपबंद होता! मग त्या आवारातच थोडा वेळ फिरलो. या बौद्ध मंदिरात एकुण 89 प्रार्थना-चक्र आहेत आणि त्यांच्यावर दुष्ट शक्तींना आणि निगेटीव्ह वाईब्जना लांब ठेवण्यासाठी काही श्लोक कोरलेले आहेत. मी जरी पापी असलो तरी अश्यावेळी मी पुण्य गोळा करायची संधी सोडत नाही ;-) मी लग्गेच एका बाजूची  दहा प्रार्थना-चक्र (दंडगोल) पटापट फिरवून पाहिली. (आता त्याचा माझ्यावर होणारा चांगला इफेक्ट कळेलच म्हणा! ;-) )

नंतर गार्गीने सुचवल्याप्रमाणे सेंट्रल एशियन म्युझियम जवळच्या आल्ची किचनमधे लडाखी डिशेस खायला गेलो. मी "खंबीर (रोटीसदृश्य खरपूस ब्रेडचा प्रकार) विथ स्क्रॕम्बल्ड एग्ज" घेतलं तर निकिता गार्गीने "स्क्यू" आणि "माॕकमाॕक"वर ताव मारला. नंतर "गुरगुर" हा बटर-टी पिऊन निघालो!

उद्या सकाळी मला आणि निकिताला एका अद्भूत ठिकाणी जायचंय म्हणून जरा लवकरच 12 वाजता झोपलो!
-------
(४)
सकाळी लवकरच उठून तयार झालो. अली नावाचा कोवळा फाटका तरुण, झायलो घेऊन सिगारेट पीत "रोव्हर्स डेन"च्या दारात उभा! साधारणपणे सिगारेटइतकीच किडकिडीत तब्येत कमावलेल्या (!) अलीवर मी जरा डाफरलोच! म्हटलं -"गाडी चालवताना तर प्यायची नाहीच पण एकुण आयुष्यातच सिगारेट प्यायला नाहीस तर तुझं भलंच होईल! 'दम मारो दम'च्या त्या मूर्ख 'कश'मधे खरं तर बिल्कुल 'दम' नसतो"- वगैरे...त्याने मान डोलावली आणि आमच्या स्वा-या एका अद्भूत ठिकाणी निघाल्या!

तुर्तुक!! पाकिस्तानने हडप केलेलं हे ठिकाण पाकव्याप्त बाल्टिस्तानचा 1971 पर्यंत हिस्सा होतं, पण भारताने 1971च्या युद्धात या भागावर कब्जा मिळवला आणि थांग, तुर्तुक आणि त्यॕक्शी भारतात सामील झाले. भारताच्या उत्तर सीमेवरची ही POK ला चिकटून असलेली शेवटची तीन गावं. आणि आज आम्ही त्यातल्याच तुर्तुक मुक्कामी निघालो होतो. प्रवास ज्याम वेळखाऊ असणार होता कारण खारडुंगवरुन पुढे खाली उतरत हुंदरमार्गे जाणारा संपूर्ण रस्ता, डोंगराच्या ओटीपोटावर खाचा करुन बनवलेल्या डेंजरस चिंचोळ्या वाटेवरुन करावा लागणारा आणि आपल्या पेशन्सची परिक्षाच पाहणारा!

त्यात आमचा फुकेश ड्रायव्हर अली, तोंडात धुराबरोबरच जमेल तितका वारा प्यायलाने सुसाट उधळलेला! माझी अक्षरशः तंतरली. मुंबई- पुण्यातल्या कुठल्याच मित्राला किंवा प्रायव्हेट कार्सच्या ड्रायव्हर्सना आपल्या घाटातल्या, समुद्रसपाटीपासून जेमतेम 600 फुट उंचीवरच्या आणि सुरक्षित कठडे आणि रेलींग्ज आसणा-या घाटरस्त्यांवरुन इतक्या सुसाट आणि बिनधास्त वेगाने कार्स चालवताना पाहिलं नाहीये. (बंपर टू बंपर ट्रॕफिकमुळे ते शक्यही नाही म्हणा!)..पण हा अली, त्या लेह ते खारडुंगला रस्त्यावर बेफाम स्पीडने गाडी हाणत होता. आपण लेहच्या 11000 फुटांवरुन खारडुंगलाच्या 18300 फुटांपर्यंत डोंगर चढत जातो. तेही एका बाजूला प्रचंड खोल दरी ठेवत! तेसुद्धा रस्त्याला कठडे, रेलींग नसलेला तीव्र वळणावळणाचा रस्ता! आणि भरीस भर म्हणून दरीच्या विरुद्ध बाजूला आसणारे डोंगर हे कुठल्याही क्षणी खालती कोसळायच्या तयारीत असलेल्या मोठ्ठाल्या खडक, रणगाडासुद्धा चेपला जाईल अश्या अजस्र शिळा आणि दरडींनी भरलेले!! काही खडक तर महाकाय चाकूने चांगले टोक काढून तासल्यासारखे! शप्पथ सांगतो मी घाबरलो आणि चक्क देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. (खोटं कशाला बोलू, अजुनही 'मनासारखं काही जगणं शिल्लक आहे' असं वाटतंचैय! ;-) )

खारडुंगलाच्या समुद्रसपाटीपास्नं 18380 फुट उंचीच्या रस्त्यावर पोचलो. वपु म्हणालेत - "पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये, चांगलं दहा हजार फुटांवरुन पडावं म्हणजे आपण किती उंचीवर पोचलो होतो ते जगाला कळेल!" त्याला स्मरुन - अगदी साताठ मिनीटंच तिथे थांबून, आम्ही तिथे येऊन गेलो हे जगाला कळावं म्हणून काढतात तसे औपचारिक फोटो काढले आणि सुसाट सुटलो. आता 18000 फुटांवरुन तुर्तुकला जवळजवळ निम्म्यावर उतरतच जायचं होतं. उतारामुळे अली आणखीनच पेटला...आणि तेव्हढ्यात...एका ठिकाणी त्याने ब्रेक मारताना गाडी घासल्यासारखा काहीतरी विचित्रच आवाज आला. उजव्या बाजूचा पुढचा टायर त्या घाटात पंक्चर झाला होता. (हे जर "आम्ही 18000 फुटांची चढण सुसाट वेगाने चढत आसताना झालं असतं तर.?" विचाराने मी जरा थरारलोच.)

अलीजवळचा जॕक नेमका लागेचना. आम्ही हैराण. पण थोड्यावेळाने हिमाचलचा एक भला माणूस आमची दया येऊन थांबला आणि त्याच्याकडचा जॕक घेऊन अलीचा स्टेपनी टायर बसवून झाला आणि अली पुन्हा सुटला!खालती उतरत जाणारा रस्ता तसा चांगला पण किचाट वळणावळणाचा होता त्यामुळे वेळ जात होता. तर या पठ्ठ्याने काय करावं? अचानक डांबरी चांगला रस्ता सोडून गाडी खाचखळग्यांनी भरलेल्या डोंगर उतारावरुन खालती न्यायला सुरुवात केली! (मला क्षणभर It's a mad mad mad mad world मधला तो प्रसंग आठवला!) मी माझ्या दिव्य हिंदीत अलीला विचारलं लगेच-
"अबे ये क्या? वो टाररोड छोडके ये पहाडके पत्थर और खड्डोंसे भरे रोडसे क्यूँ?"
"ये शाॕर्टकट है!" तो शांतपणे उत्तरला.
"लेकीन अभीअभी तो वोह टायर फुटा करके तुमने ये स्टेपनीवाला डाला है नं? अब ये भी फुटेगा इस खतरा स्लोपमे इतने पत्थर है तो..."
"वो पहलेवाला चायनीज टायर था. ये सही है!" अली माझ्याकडे न बघता सीटवर डुचमळत म्हणाला. मी हैराण, टायरमधेही चीन घुसलाय हे तोपर्यंत माहीत नव्हतं. पण सुदैवाने आम्हाला जागच्याजागी फार वेळ उडायला न लावता अलीने त्या उतारावरुन फक्त त्यालाच कन्व्हिंन्सिंगली वाटलेला तो शाॕर्टकट संपवून गाडी पुन्हा डांबरी रस्त्यावर आणली.

लवकरच आम्ही डिस्कीट गाव गाठलं. तिथे फोटोकाॕपिंगचं दुकान शोधून आमच्या परमिटच्या आणखी चार काॕपीज काढल्या. कारण लेह ते तुर्तुकमधे किमान तीन ठिकाणी नक्कीच झेराॕक्स द्याव्या लागतात.

पुढचा प्रवास थक्क करणारा होता. जाताना उजव्या हाताला पसरलेल्या हुंदरच्या रुपेरी वाळूच्या टेकड्या...आणि तिथे आसणारे दोन वशिंडंवाले उंट!..(मला वाळुचं फारसं अॕट्रॕक्शन नाही आणि उंटांचं त्याहूनही नाही. तो प्राणी मला कधीच आवडला नाही...एकतर उंटांना कधी आंघोळ करताना मी पाहिलं नाहीये किंवा त्यांच्या मालकांनी त्यांना कधी आंघोळ घातल्याचंही पाहण्यात नाही. बाकी सगळे पाळीव प्राणी घोड्यागाढवासकट सगळ्यांना आंघोळी खरारा वगैरे करतात...त्यामुळे त्या आयुष्यभर पारोश्या राहणा-या  उंटाजवळही जायला मला आवडत नाही. :-D  

त्यामुळे हुंदर गावाला रस्त्यातूनच बाय बाय करुन आम्ही पुढे गेलो. पुढे वाळुमिश्रीत पाण्यामुळे गढुळलेली पण तुफानी रौद्रावतारात वाहणारी श्याँक नदी...आणि लेहमधे कायमच आढळणारे चित्रविचित्र आकारांचे आणि रंगांचे भितिदायक डोंगर...कधीही पडतील आश्या दरडींचा सामना करत आम्ही बोगडांगमार्गे एकदाचं तुर्तुक गाठलं. बोगडांगपासूनच आपल्याला इथल्या लालगुलाबी गालांच्या अनुपम लावण्यवती दिसायला सुरुवात होते. निसर्गाने काय काँम्प्लेक्शन बहाल केलंय इथल्या मुलींना/ स्त्रियांना....वेगळंच आणि विलक्षण सौंदर्य! 😍

तुर्तुकला पोचलो मात्र! इथल्या अनुपम निसर्गसौंदर्याच्या पाहताक्षणीच प्रेमात पडलो!

मी याआधी दोनवेळा कश्मीरला गेलोय एकदा मे आणि एकदा आॕक्टोबरमधे! त्यामुळे कश्मीरचं सौंदर्य हे विसरुच शकत नाही ..ते अतुलनीय आणि अनपॕरलल्ड असंच! तरी तुर्तुकही सुंदरच आहे यात वाद नाही!

गार्गी आधी जाऊन आलेली असल्यामुळे तिने सुचवलेल्या 'सलीम खारमांग गेस्ट हाऊस'वर मी आणि निकिता उतरलो. त्या गेस्टहाऊससाठी काहीसं डोंगरावर चढून जावं लागतं...तेही पांढर्याशुभ्र फेसाळत्या, खळाळत्या नदीवरचा जुना कुचकुच करकरणारा पूल ओलांडून पैलतीरी गेल्यावर! पण चालण्याचे, उंच चढण्याचे श्रम जाणवतच नाहीत कारण तिथे असलेली निसर्गाची लयलूट! भलताच विलक्षण अवर्णनीय निसर्ग आहे तिथला! म्या पामराला, माझ्या काही मित्रमैत्रिणींसारखी नेमक्या आणि नेटक्या, लोभस शब्दसंपत्तीची प्रतिभा लाभलेली नसल्यामुळे, मी तिथलं वर्णन करण्याच्या भानगडीत पडत नाही! त्या निसर्गसौंदर्याचा मझा ज्याने त्याने/ जिने तिने तुर्तुकला जाऊनच घ्यावा (मी परत यायला तयार आहे बरोबर! ;-) )

रुमवर बॕगा टाकून मी आणि निकिता निघालो ते 'नॕचरल फ्रिझींग पाॕइंट' नावाचं अद्भूत ठिकाण पाहायला. तर वाटेतच आम्हाला "Hi" करत तीन निरागस बाल्टीकन्या समोर हजर! निकिताने गोड हसत जिंकलंच त्यांना. मग भीड चेपून तिघी आमच्याशी एकदम गप्पाच मारत सुटल्या. सफीना, सादिया आणि मोबिना अश्या त्या तिघींनीच मग गप्पा मारत मारत आम्हाला एका गुहेसदृश्य कपारीशी नेलं आणि आम्ही उडालोच!..आतमधे शिरताक्षणी त्या मोठ्ठ्या शीळेजवळ कमालीचा थंडावा, गारठा जाणवला आम्हाला!..झिरो पाॕइंट किंवा कोल्ड स्टोरेज असं म्हणताता त्या जागेला! ती किमया कशाची?..आतमधे एखादा बर्फाच्या पाण्याचा झरा लपलाय किंवा कसं हे बाहेरून कळायला मार्गच नाही पण तो निसर्गाचा चमत्कार अद्भूत आहे हे खरंच! दरम्यान सफिया, सादिया आणि मोबिनाने आमची माहिती आम्हाला विचारत धिटाईने स्वतःची माहितीही दिली. पाचवीत शिकणार्या तिघींपैकी एकीला कंम्प्युटर इंजिनीयर व्हायचंय, दुसरीला आयएएस आॕफिसर! तिसरीचं मात्र अजून ठरायचंय! ;-) आमच्या गप्पा रंगल्या असतानाच त्यांच्या नात्यातलेच एक आजोबा आले तिथे! मी "सलाम" केल्यावर त्या अली हुसेन आजोबांनी खुलून येत गप्पाच सुरु केल्या. तेही मूळ बाल्टिस्तानचे. इथली तिन्ही गावं पाकिस्तानात होती आणि 1971 युद्धात भारताने जिंकल्याचं त्यांनी सांगितलं. तुम्हा शहरवाल्यांना नोकरीत बरे पैसे मिळतात म्हणून तुम्ही फिरु शकता, इतक्या दूरवर पाक सरहद्दीवर येऊ शकता,.आम्हाला तसं जमत नाही वगैरे खंत व्यक्त केली त्यांनी! मला दोनच अपत्य आहेत आणि त्याही मुलीच, मुलगा नाही हे कळल्यावर ते भलतेच आश्चर्यचकीत वगैरे झाल्याचं दिसलं! आम्ही नुकतीच पाहिलेली ती अशक्य थंडाव्याची जागा त्यांच्याच मालकीची!..टूरीस्ट्सना तिथे बसण्यासाठी जागा करावी वगैरे त्यांचे प्लॕन्स त्यांनी मला ऐकवले. 

त्यांचा निरोप घेऊन मग मी आणि निकिता निसर्गरम्य वातावरणात फिरत तिथल्या 16व्या शतकातली मशिद बघायला गेलो. अर्थातच निकिता मुलगी म्हणून तिला अल्लाची प्रार्थना करायला आत जायला मज्जाव होता. मी आत शिरुन आतल्या एक दोघांशी गप्पा मारेस्तो निकिताने तिथली पाचसहा चिल्लीपिल्ली गोळा करुन त्यांना चाॕकलेट्स देत गप्पा सुरु केल्या होत्या, (निकिताला ही चांगली नॕक आहे! ;-) ). इथेच जवळ एक म्युझीयमही आहे.

तिथनं आम्ही निघालो आणि अक्षरशः aimlessly भटकत मिळेल ती वाट पकडून तिथल्या गर्द रानावनांत...झ-याच्या बाजूने...शांत गच्च हिरवाईत...गारेगार पाण्याच्या ओहळाच्या बाजूने जात.. एका प्रचंड खळाळत्या पाण्याच्या प्रवाहापाशी आलो. त्याच्यावर एक छोटेखानी टूमदार पूल होता. त्या खळाळत्या पाण्याच्या प्रवाहातल्या एका खडकावर बसून फाॕरेनर्स वाटावेत अश्या एका प्रेमी युगुलाचं कुचीकूs चालू होतं ;-) 

तिथून निघून आम्ही बाल्टि हेरीटेजच्या शोधात पुन्हा खळाळत्या नदीच्या खालच्या अंगाचा मोठा पूल गाठला. पुन्हा समोरच्या वाटेने डोंगर चढत थोडे वर आलो तर समोर एक छोटा स्मार्ट मुग्गा "हलोs" करत आमच्या जणू स्वागताला हजर असल्यासारखा समोर आला! अख्तर हुसेन असं काहीसं मोठ्या माणसाचं नाव असलेला तो पोरगा लाघवी आणि बडबड्या निघाला!..अगदी माझं आणि निकिताचं नावबिव विचारुन मला दोस्तीत आरेतुरे करत गप्पा मारायला सुरुवात त्याची!! ;-) 

त्या गोड पोरानेच आम्हाला बाल्टी हेरीटेज साईटवर नेलं...आता जराजरा आधुनिक जगाला सरावलेल्या तिथल्या बाल्टी लोकांनी शेकडो वर्षांपूर्वीच्या त्यांच्या राहणीमानाच्या, लोकजीवनाच्या खुणा जपून त्यांचा जणु कायमस्वरुपी म्युझियमच केलाय. आम्हाला तिथली माहिती द्यायला आलीया नावाची आत्यंत रेखीव चेह-याची गुलाबीगोरी मुग्गी आली. मग तिची दादीसुद्धा (आज्जी) आम्हाला जाॕईन झाली आणि तिने डिटेलमधे आम्हाला सगळ्या भांड्यांची, कपड्यांची, अवजारांची माहिती दिली. आगदी तो 150 वर्षांपूर्वी वापरात आसलेला चुल पेटवण्याचा भाता कसा वापरतात ते दाखवून!.मजा म्हणजे ते करताना सुरुवातीला तिच्या नातवाने आणि नातीने रडून गोंधळ घातलानतर हिने त्या दोघांना आपण "भोपळा भोपळा" करतो तस्सं पाठीवर बसवून बांधून!..आम्ही निघताना त्या म्हाता-या आज्जीची तिच्याहून बर्रीच म्हातारी असलेली चाची थरथरत वाकत समोर आली...का कोण जाणे मी त्या क्षणी त्या दोन्ही आज्ज्यांना "सलाम" न म्हणता चक्क वाकून नमस्कार केला...गंमतच वाटली त्याचीही दोघींना.... ;-) 

तिथून पुढे काही अंतरावर पोलो ग्राउंड आहे जिथे फक्त मार्च महिन्यात हाॕर्स पोलोच्या टूर्नामेंट होतात. आणि आसपासच्या गावातली तरुण मंडळी पोलो खेळायला जमतात. तिथून आमच्या राहण्याच्या ठिकाणी परत येईपर्यंत आमच्या छोट्या दोस्ताने अख्तर हुसेनने आम्हाला बडबड करत छान साथ दिलीन इतकंच नव्हे तर वाटेत एका कुंपणावर चढून आम्हाला खूपसारे अॕप्रीकाॕट्सही तोडून खिलवले...ते गोडगोड ओंजळभर अॕप्रीकाॕट्स हाणतच आम्ही परतलो..

आजचा दिवस विलक्षणच अनुभव देऊन गेलाय..
-----
(६)
कोकणात जशी समुद्राला लागून वाडी असणार्यांना समुद्राची गाज सतत ऐकू येते, तसंच आम्हाला आमच्या रुमच्या मागेच खालून वाहणार्या बर्फिल्या, फेसाळ नदीच्या खळाळत्या प्रवाहाचा आवाज रात्रभर कानात येत होता. पहाटे साडेचारलाच जाग आली प्रचंड एक्साइटमेंटने, कारण आज पाकिस्तान आॕक्युपाईड कश्मीरच्या बाॕर्डरवर जायचं होतं!

तुर्तुकपासून हे थाँग गाव जेमतेम सात किलोमीटर्सवर. इथे "सियाचेन युनीट 3" च्या अंतर्गत येणार्या मिलीटरी पोस्टशी आम्हाला थांबून परमीट आणि आधार कार्ड्स दाखवावी लागली. आम्हाला 25-30 मिनीटं थांबावं लागेल त्याशिवाय सोडलं जाणार नाही हे ऐकून किंचित खट्टू झालो पण तोपर्यंत तिथल्या पोस्टवर देखरेख करणार्या पंजाब रेजीमेंटच्या अधिकार्याशी (सतवंतसिंग) यांच्याशी छान गप्पा झाल्या.

पंजाब रेजिमेंट इथे दोन वर्ष मुक्कामासाठी आहे. सतवंतसिंग एकदम फिट्ट शरीरयष्टीचा आणि मेजर अभिनंदन स्टाईल मिशा आणि कल्ले राखलेला माणूस! त्यांनी तोपर्यंत मला आणि निकिताला चहा आॕफर करुन चहा पीत छान गप्पा मारल्या. 

त्यांनी सांगितलं की 1971च्या युद्धादरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानव्याप्त प्रदेशात 60 किमीपर्यंत आत मुसंडी मारून थाँग, त्यॕक्शी आणि तुर्तुक अशी तीन गावं जिंकली आणि सैन्य पाकव्याप्त प्रदेशात आणखी पुढे जाणार तितक्यात शस्त्रसंधी (ceasefire) जाहीर झाली आणि मग थाँग गावाशीच लाईन आॕफ कंट्रोल बनली! तिथेच 18000 फुटांवर एक आणि 19000 फुटांवर एक अशी आपल्या सैन्याची दोन ठाणी आहेत! (22000 फुटांपेक्षा जास्त ऊंचीवर बाराही महिने बर्फात तळ ठोकून डोळ्यात तेल घालून पहारा देणारं सियाचेनचं ठाणं हे तिसरं!)..त्यांच्याशी बोलून तिथल्या एका गार्डशीही थोड्या गप्पा झाल्या. मला त्याची "इन्सास रायफल" फारच आवडली! दरम्यान सतवंतसिंग यांनी पुढच्या थाँगच्या पोस्टकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर आम्हाला तिथून जायची परवानगी दिली. (सतवंतसिंगांशी हात मिळवून सॕल्यूट करुन निघताना- पुढच्या जन्मी "आपणही तीनपैकी कुठल्याही सैन्यदलातला, पण असाच एखादा हँण्डसम फौजी अधिकारी असावं" असा भाबडा विचार मनाला चाटून गेला!) ;-) 

वाटेत एका स्थानिकाने थाँग मिलीटरी पोस्टपर्यंत लिफ्ट मागितली. त्याला घेऊन निघालो. कारमधे त्याच्याशी गप्पा झाल्या. महम्मद हुसेन! थाँगचा रहिवासी. त्याचे दोन भाऊ 1971च्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्यात होते. ते  नंतर तिकडेच राहिले आणि हा इथे. सध्या त्यॕक्शीमधे असतो, आता त्याची भावांशी भेट नाही येणंजाणंपण  नाही असं म्हणाला...

थाँगपर्यंत कच्चा रस्ता क्षणोक्षणी मनात उत्सुकता वाढवत होता कारण आम्ही आता अगदी LOC पर्यंत जाऊन थडकणार होतो!..समोर पाकव्याप्त कश्मीरचे डोंगर दिसायला लागले आणि एका वळणावर, आपल्या मिलीटरीने लावलेला बोर्ड समोर आला - "You are under enemy observation!"...

आईशप्पथ! ..कस्सला रोमांचक क्षण होता तो!..आजपर्यंत माॕलमधे, दुकानामधे, एअरपोर्टवर, सोसायटी काँम्लेक्समधे "You are under CCTV surveillance" पाटी बघायची सवय..पण इथे थेट अगदी जवळ समोरच दिसणार्या डोंगरातल्या बंकर्समधून, पाक सैनिक आपल्यावर बायनाॕक्युलर्स रोखून आहेत - हे फिलींग विलक्षण होतं!!...

आम्ही शेवटच्या चेकपोस्टवर पोचलो. इथनं भारताचं शेवटचं थाँग गाव दिसलं. फक्त 25 घरं आणि 150 माणसांचं गाव (शहरातल्या एकेका सोसायटीत त्याहून जास्त माणसं राहत आसतात!). समोर पाकव्याप्त कश्मीर. मधे फक्त फेसाळत उधळत निघालेली श्याँक नदी. तीच आपल्याला  आणि शत्रुला वेगळं करणारी नैसर्गिक बाॕर्डर!  तिथल्या चेक पोस्टच्या पुढे जायला मात्र कुणाही नागरिकाला परवानगी नाही. तिथे एक किरकोळ फेन्सिंग दिसतं. LOC!..बघून थरारलो!

समोर आपण बायनाॕक्यूलर्समधून पाकड्यांचे बंकर्स बघू शकतो जिथे ते शस्त्रसज्ज सैनिक असतात. पण आपलेही तत्पर शूर सैनिक तिथे समोरच दिवसरात्र पहारा देत असल्याने, आज माझ्यासारखा सामान्य फाटू नागरिक तिथपर्यंत निर्धास्त जाऊ शकतोय! 

या सियाचेन वाॕरियर्सने ठिकठिकाणी देशप्रेम व्यक्त करणारे सुंदर बोर्ड्स लावलेत! "Indra col to Indira point India is one".."From K2 to Kanyakumari Bharat is one!" किंवा अगदी पर्यावरण जागृतीसाठी "Plastic or Planet"...

पाक सैन्य हिंमत करु नये म्हणून अत्यंत खडतर परिस्थितीत इथल्या सरहद्दीवर अहोरात्र पहारा देणार्या सियाचेन वाॕरीयर्सना आणि एकूणच भारतीय सैन्याला मनापासून कडक सॕल्यूट करताना छाती अभिमानाने भरुन आली आणि सद्गदीत होत डोळ्याच्या कडेला अश्रु उभे राहिले! (जातायेता वाटेत सैनिकांना आणि त्यांच्या सामानाला सरहद्दीकडे घेऊन निघालेल्या मिलिटरी ट्रक्सच्या रांगा लागल्या की भाबडेपणाने मी एक सलाम करायचो!)

मला नेहेमी वाटतं आपण शहरात जगणारे एरवी किती हरामखोर आसतो! आपापल्या वार्षिक अप्रेजल्सनंतर सॕलरीज आणि भत्ते वाढण्याच्या अपेक्षा ठेवताना किती वेळा सरहद्दीवर तैनात आसणार्या सैनिकांच्या भत्त्यांचा
विचार करतो? गदिमांनी म्हटलं होतं त्याचा विचार करता -  "सैनिकहो तुमच्यासाठी सध्याच्या किती भारतीय नागरिकांचा (मी आलोच त्यात बेक्कार माणूस!) घास रोज अडतो ओठी??" आपले यच्चयावत सर्वभाषिक हरामखोर टीव्ही न्यूज चॕनल दाखवत आसलेली सैनिकांवरची दगडफेक आणि ती गोळ्या न झाडता सहन करणारे सैनिक किंवा पुलवामासारख्या हल्ल्यांचं कव्हरेज टीव्हीवर बघताना हातात जेवणाचं ताट असतंच ना भारतीय नागरिकांच्या (मीही नालायक आलोच त्यात!)?? कितीजण न जेवता उपाशी राहतात ती दृश्य बघून..खरोखर घास घशाखाली उतरत नाही म्हणून?...

(हे होतं कारण एकच - भारतीय सैनिक सोडल्यास सामान्य भारतीयाला देशाविषयी आणि तिरंग्याविषयी प्रेमच नाही. उद्या प्रत्येकाला सांगितलं की "उद्यापासून दुप्पट सॕलरी देतो पण कुठल्याही क्षणी गोळी खायची तयारी ठेवून सीमेवर/ कश्मीरात जायचं"- तर कितीजण तयार होतील? आपलं प्रेम म्हणजे सिनेमा थिएटरमधे राष्ट्रगीत लागल्यावर उभं राहायचं आणि ते संपल्यावर कुणी "भारतमाता की ---" असं अर्धवटच बोंबलल्यावर "ज्जय!" म्हणून ते पूर्ण करत समाधानानं खाली बसणं!

हे होतं कारण आपण कोणीच मिलीटरी शिस्त पाहिलेली नसते..कारण "प्रत्येक धडधाकट स्त्री पुरुषाला किमान दोन वर्षं तरी मिलिटरी शिक्षण हवंच" असं ठासून सांगणारे वीर सावरकर कायमच वाळीत टाकले गेले जाणूनबुजून. आणि वहीच्च मार खा गया हिंदोस्तां!! 

पण अजूनही वेळ गेलेली नाही - "आयुष्याची दोन वर्षं प्रत्येक धडधाकट माणसाने मिलीटरी शिक्षण घ्यायचा" कायदा आणायला हवा...असो. भरकटलो लिहिताना...

तिथनं निघालो. येताना डिस्कीटच्या बौद्ध माॕनेस्ट्रीला अगदी धावती भेट दिली आणि थेट लेह गाठलं. हेक्टीक प्रवास पण LOC जवळचे क्षण आयुष्यभर लक्षात राहणारे. माझं सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगणं तुर्तुकला जरुर जा आणि पुढे थाँग ला LOC ला भेट देऊन आपल्या जवानांना एक कडक सॕल्यूट नक्की द्या!! ते तिथे आहेत म्हणून आपण आहोत!!
------------
(7)
आजचा दिवस आरामाचा आणि लेहमधेच जवळपास फिरण्याचा.

सकाळी उशीरा उठून चांस्पा रोडवरच्या आमच्या लाडक्या "La Piazzetta" मधे "काँन्टिनेन्टल ब्रेकफास्ट विथ हाॕट चाॕकोलेट" हाणलं..नंतर सहजच तिथल्या अफाट स्वच्छ वाॕश रुमच्या दारातल्या, अफाट स्वच्छ वाॕश बेसिनमधे थोबाडावर अफाट गार पाणी मारुन, अफाट स्वच्छ आरश्यात, अफाट लख्ख उजेडात स्वःचा थोबडा बघितला....बघतो तर काय?!! 

गेल्या आठवडाभरात गरगर फिरताना पहिल्यांदाच इतक्या अफाट स्वच्छ आरश्यात, लख्ख उजेडात, इतका नीट स्वतःला बघत असावा. तर - गंमत अशी की मी या लडाखी राज्यात, लडाखी हवामानात आणि लडाखी माणसांत जेमतेम आठवडा काढलाय तरी इतक्यातच; जश्या त्यांच्या कपाळावर, डोळ्यांच्या कडांना आणि गालावर सुरकुत्या असतात ना, तश्श्या सुरकुत्या कमावलेल्या दिसल्या मीसुद्धा थोबाडावर!! ;-) 

वाटलं होतं या 11000 फुटांवरच्या थंड हवेने थोबडा तांबूसबिंबूस गोराबिरा होईल- पण कसचं काय; उलट इथल्या कमी आॕक्सिजनमुळे थोबाडभर सुरकुत्याच पांघरुन जास्तच काळवंडून घरी परतणारेय मी च्यामारी!! ;-) When in Rome, do as the Romans do" ही उक्ती आयुष्यभर ऐकत आलोय, पण "When in Leh, wear rinkles on face as the Ladakhis do" ही नवी उक्ती आता माझ्यापास्नंच सुरु होत्ये हां का! :-D 

हादडून झाल्यावर मार्केट स्क्वेअरमधे फेरफटका मारला निकिताच्या खरेदीसाठी! प्रत्येक दुकानात निकिता शिरली की मी दुकानाबाहेर पहारेक-यासारखा उभा! (मी हा रोल आयुष्यभर बायको/मुलींबरोबर खरेदी करायला गेल्यावर करत आलोय! माझ्यात तो ठळ्ळक दोष आहे ..मला बायको/ मुली खरेदीसाठी शिरल्या की काय करायचं समजतच नाही. बरं इकडेतिकडे बघत बसलो तर पुलंसारखा "अंग ना? गोरं आहे की!" किस्सा घडणार हे तर नक्कीच! ;-) त्यापेक्षा गपगुमान बाहेर उभा राहून झुक्याच्या कृपेने लाभलेला फेसबुकनामक अशक्य टाईमपास काय वाईट? (WApp भीषण..त्याबद्दल बोलायलाच नको!)....

मित्रमैत्रिणींना भेट देण्यासाठी प्रेयर फ्लॕग्जपासून फ्रीज मॕग्नेट्सपर्यंत आणि स्लींग बॕग्जपासून हेअर पिन्स आणि नाकात घालायच्या वेसणीपर्यंत (नोज पीन) निकिताची अनगिनत खरेदी झाल्यावर, त्या कश्मीरी दुकानदाराने मला हाक मारत सुहास्य मुद्रेने "साब जी आप नही लेंगे अपने लिये कुछ?" म्हटल्यावर विरघळून, मी का कुणास ठाऊक मला अत्यंत विनोदी दिसणारी अफगाणी टोपी विकत घेतली. ती घालून पुण्यामुंबईत फिरण्याचं तसंही डेअरिंग होणं कठीणैय..पण हे बहुदा माझं कार्मिक देणं असावं त्या कश्मीरी दुकानदाराला. दिलं झालं!! ;-)

नंतर मार्केटजवळच्या टॕक्सीस्टॕण्डकडे मोर्चा वळवून टॕक्सी केली फिरण्यासाठी. टॕक्सी ड्रायव्हरशी अर्थातच माझ्या गप्पा सुरु झाल्या. लडाखच्या जुन्या राजघराण्यातल्या एका राजाचं "त्सेवंग नमग्याल" हे नाव असल्याचा सार्थ अभिमान होता त्याला. नमग्याल म्हणजे युयुत्सु!
आणि त्याने सांगितलं की त्यांच्यात बारश्याला नाव आईवडिल ठेवत नाहीत तर मुलाला घेऊन घरच्यांनी धर्मगुरुंकडे जायचं असतं.आणि मग मुलाचं भविष्य कसं असावं याचा विचार करुन धर्मगुरु देतील ते नावच त्या मुलाला ठेवण्यात येतं त्यानुसार रिंन्पोचे यांनी त्याला हे छान नाव,दिल्याचा त्याला कोण आनंद!!!

त्याच्या टॕक्सीतून आम्ही आधी गेलो थेट शांती स्तुपाकडे!

लेह शहरातलं हे बहुदा सर्वात उंच ठिकाण आणि इथनं सूर्योदय, सूर्यास्त बघायला मजा येते खरं तर! जपानच्या ग्योम्यो नाकामुरां यांनी याची संकल्पना मांडली आणि कुशोक रिन्पोचे यांचं अनुमोदन आणि शुभेच्छा मिळाल्यावर या स्तुपाच्या बांधणीचं काम इथल्या उंच डोंगरावर सुरु झालं. दलाई लामांच्या हस्ते भूमीपूजन होऊन याचं अप्रतिम देखणं स्ट्रक्चर तयार झालंय! या स्तूपाच्या भोवतालच्या गॕलरीच्या कठड्यांवर ठराविक अंतराने दिशादर्शक बाण लावले आहेत आणि त्या बाणांच्या दिशेने नुस्ती नजर टाकली तरी आपल्यला खारदुंग-ला, सिंधूचा संगम, सेमो वगैरे लेहची प्रमुख आकर्षण असणारे 5-6 स्पाॕट्स तात्काळ आयडेंटीफाय करता येतात आणि पाॕवरफूल बायनाॕक्यूलर असेल तर ब-यापैकी दिसतातसुद्धा! 

आमचं पुढचं डेस्टिनेशन वेगळ्या दिशेला होतं. एअरपोर्ट रोडवरचं "हाॕल आॕफ फेम"!! 1947 पासून ते आतापर्यंतची आपल्या आर्म्ड फोर्सेसची विजयगाथा मांडणारी ही अफ्फलातून गॕलरी!! किमान दोन तास इथली सर्व दालनं पाहण्यात आणि आपल्या शूर जवानांच्या शौर्यगाथा वाचण्यात सहज जातात! सुरुवातीच्या पहिल्याच दालनात लडाख राज्याचा इतिहास, इथल्या लोकांना सहन करायला लागलेल्या परकीयांच्या स्वार्या, त्यातून चिवटपणे त्यांनी जपलेली त्यांची संस्कृती आणि एकुणातलं लोकजीवन, चालीरिती यांची भरपूर ओळख आपल्याला होते. मला विशेष गंमत वाटली ते या समाजात अज्जूनही "गांधर्व विवाह" अत्यंत मोकळेपणे स्विकारले जातात याविषयी तिथे दिलेली तपशीलवार माहिती! 😍

पुढच्या दालनात आपण शिरतो आणि पहिल्या पाच सेकंदात अक्षरशः भारावून जातो ते तिथे अत्यंत नेटकेपणे मांडलेल्या (डिस्प्ले केलेल्या) आपल्या 7 परमवीरचक्र विजेत्या आणि 35 महावीरचक्र विजेत्या फौजींच्या शौर्यकथा वाचताना!..मला तर पहिल्या चार कथा वाचल्यानंतर पुढचं वाचताच येईना इतकी डोळे अश्रुंनी डबडबले होते..

हे प्रदर्शन पाहताना विशेषतः सियाचेनमधे 23000 फुटांवर " -20' अंशाखालच्या मरणप्राय थंडगार तापमानात आपले जिगरबाज सैनिक कसे राहतात, त्यांचं तिथलं रोजचं जीवन किती अशक्य कठीण आहे, वर्षभर बर्फात गाडून घेऊन देशाचं रक्षण करणं ही जबाबदारी ते कुठल्या दिलेर वृत्तीनं आणि अचाट धैर्यानं पार पाडतात, त्यांना धड खाता येतं का, झोप मिळते का, इतक्या उंचीवर महिनो न महिने शून्याखालच्या तापमानात कुटुंबापासून, मित्रमैत्रिणींपासून दूर एकटं राहताना किती भयानक मानसिक त्रास होतो, भास आभासांना ते कसे तोंड देतात हे पाहताना, वाचताना आपण अक्षरशः सद्गदीत होतौ आणि डोळ्याच्या कडांना अश्रुंची धार लागते...

या "हाॕल आॕफ फेम"मधे डिस्प्ले केलेली आपल्या जिगरबाज सैनिकांची काही वचनं किंवा स्लोगन्स आपल्या अंगावर रोमांच उभे करतात. जसं की -
"We live by chance, Love by choice and Kill by profession!"

"On the battlefield, the military pledges to leave no Soldier behind!"

"If you can dream it Yo can do it. It always seems impossible Unless it is done!".....

मला राज्यकर्त्यांना सांगावंसं वाटतं की या "हाॕल आॕफ फेम"च्या हुब्बेहुब प्रतिकृत्या भारतभर प्रत्येक राज्यातल्या, किमान मुख्य चारपाच शहरांत असायलाच हव्यात!! हव्यातच!! कारण इतक्या वर्षांच्या भ्रष्ट राजकीय परिस्थितीमुळे हतबल झालेल्या आणि आसपासच्या जातीपातीतल्या (पद्धतशीर लावण्यात येणार्या) विखारी भांडणांमुळे नकारात्मकतेने ढेपाळलेल्या भारतीय जनतेला-  आपल्या शूर फौजींच्या या रोमांचक सत्यकथा, त्यांचे युद्धादरम्यानचे स्फूर्तीदायक फोटोज, अत्यंत खडतर भौगोलिक परिस्थितीत आणि प्रतिकूल भीषण हवामानात पाकिस्तानी आणि चीनी सैनिकांच्या गोळ्यांचा आणि बाँम्ब्सचा मारा अंगावर झेलत त्यांनी बलिदान देत केलेलं भारतीय सीमांचं रक्षण, वेळोवेळी केलेला शत्रुंचा पराभव आणि जिंकलेले प्रदेश यांचं हे प्रदर्शन नक्कीच प्रत्येक नागरिकाच्या मनात जाज्ज्वल्य देशाभिमान जागृत करेल आणि समाजात वाढीला लागलेली आणि काही पुढा-यांकडून खतपाणी घालून वाढवली जाणारी जातीपातीतली दरी दूर होऊन एक सकारात्मकता नक्की जन्माला येईल! 🙏🏻

कुणी सांगावं - जातीपातीत भांडणं लावणा-या, अगदी वेबसाईट्स काढून पद्धतशीरपणे दुस-या जातींवर आगपाखड करणा-या पुढा-यांनी आणि त्यांच्या आदेशांचं अंधपालन करणा-या अनुयायांनी असले भेदाभेद बिल्कुलच न पाळत, तिरंग्याच्या संरक्षणासाठी जातीभेद विसरुन प्रसंगी आपल्या Buddyसाठी आपल्या जिवाची बाजी लावणा-या सैनिकांच्या या शौर्यगाथा वाचल्या/ पाहिल्या तर त्यांनाही त्यांच्या आजपर्यंतच्या हीन कृत्यांची, थर्ड क्लास विचारसरणीची लाज वाटून त्यांचंही मतपरिवर्तन होण्याची शक्यता नक्कीच!!! 

"हाॕल आॕफ फेम"चा पगडा एव्हढा होता की नंतर कुठे जावंसंच वाटेना..त्यात आमच्या डोळ्यांतल्या धारांना साथ द्यायला बाहेर पावसाची रिमझिमही सुरु झाली...

हाॕस्टेलवर परतलो. पाऊस कमी झाल्यावर पुन्हा मार्केट स्क्वेअरला चक्कर टाकून शेवटची किरकोळ खरेदी आटोपली. एका ठिकाणी कुणी युरोपियन एका विचित्र वाद्यावर छान सुरावटी छेडत होता ते ऐकून त्याला बक्षिशी देऊन निघालो. "ला टेरेझा"मधे चायनीज हादडून हाॕस्टेलवर परतलो. एअरटेल ला रेंज मिळाल्यावर काही मित्रमैत्रिणींचे कश्मीरमधल्या परिस्थितीसंदर्भातले आणि काळजीपोटी आलेले मेसेजेस वाचले. आणि मित्रमैत्रिणींना भेटायची ओढ लागली...
.....
(८)