Wednesday, 30 June 2021

UFO??...UAP???

UFOs?? UAPs???
-------
माझ्या लहानपणी बोरिवलीच्या आमच्या सोसायटीच्या गच्चीत आम्ही मित्र मित्र रात्री झोपायला जायचो. त्यावेळी मध्यरात्री सामसूम झाल्यावर (माझ्या लहानपणी आजच्यासारख्या स्कायस्रॕपर्स आणि टोलेजंग टाॕवर्स नसल्यामुळे-) आसमंतात ब-यापैकी काळोख दाटलेला असायचा!..आणि मग पडल्यापडल्या आकाशातला ता-यांचा सडा बघताना एखादा रशिया/ आमेरिकेचा सॕटेलाईट हळूsss जाताना दिसायचा.. बारीक बारीक हजारो ता-यांच्या बॕकग्राउंडवर तो मंदगतीनं सरकणारा ठिपका बघताना क्काय क्काय कल्पना डोस्क्यात यायच्या...त्यावेळी मला स्पेस-अॕस्ट्राॕनाॕमीचं प्रचंड वेड होतं आणि शाळेच्या लायब्ररीच्या कृपेनं निरंजन घाट्यांच्या खूप विज्ञानकथा वाचलेल्या असायच्या..ना.वा.कोगेकर, सोवनी वगैरे मंडळींमुळे आणि सृष्टीज्ञान सारख्या मासिकांमुळे परग्रहावरची जीवसृष्टी...युफो..असलं कायकाय डोक्यात भिनलेलं असायचं...मग आम्ही सगळे झोपलेलो असताना आमच्या बरोब्बर डोक्यावर (ख-स्वस्तिकाकडून) एक यान येऊन स्थिर झालंय..आणि त्यातनं एक पिवळसर तांबूस सोनेरी प्रकाशझोत (टाॕर्चमधनं पडतो तस्सा) सरळ रेषेत खालती खालती येत इतर कोणावरही न पडता थेट माझ्यावरच पडलाय...आणि त्यातल्या एका अनामिक शक्तीनं मी वर वर उचलला जात थेट त्या यानापर्यंत गेलोय..आणि अचानक एक झडप बाजूला होऊन मला आत शोषलं जातंय..आत चित्रविचित्र प्रकारचे परग्रहवासी आहेत ..त्यांनी मला घेरलंय...ते माझी तपासणी करतायत.,,आता माझी भिती जाऊन त्याची जागा कुतुहलानं घेतल्येय ...मी त्यांना न्याहाळतोय...अतर्क्य शेप्स आहेत त्यांचे....हे होईस्तो खालती गच्चीत बोंबाबोंब झाल्ये कारण त्या पिवळ्या झोतातनं वरवर खेचल्या जाणा-या मला मित्रांनी पाहिलंय...मग एकच गोंधळ...राडाच!...वगैरे वगैरे...असलं काही डोस्क्यात यायचं... ;-) 

पृथ्वीवर अंतराळातून आलेले पाहुणे आहेत आणि खूप खूप काळापास्नं येत राहिलेत ह्यावर माझा गाढा विश्वास आहे तेव्हापासूनच!!

पण थोडा धांडोळा घेतला तर लक्षात आलंय की - आगदी ख्रिस्तपूर्व काळापासून ते अगदी दुस-या महायुद्धाच्या काळापर्यंत ज्यांविषयी ठोस काही explaination देता येत नाही अश्या अनेक चमत्कारिक वस्तू अनेक लोकांनी शतकानुशतकं बघितल्यायत आणि त्याविषयी लिहूनही ठेवलेलं आहे! अगदी गेल्या शतकात म्हणजे २४ जून १९४७ रोजी ढळढळीत असं काही बघितल्याचं छातीठोकपणे सांगितलंन् ते हौशी अमेरिकन पायलट-बिझिनेसमन केनेथ आर्नल्डनं! त्यानं माऊंट रेन(अ)रजवळ प्रायव्हेट विमानातनं जाताना अत्यंत वेगाने उडत जाणा-या बशीच्या किंवा तबकड्यांसारख्या नऊ वस्तू पाहिल्या आणि "बशीसारख्या" असं वर्णन केल्यामुळे सुरुवातीला त्यांना उडणा-या बश्या म्हणून 'फ्लाईंग साॕसर्स' असं म्हटलं गेलं..पण त्याआधीचे शेकडो वर्षांपासूनचे लिखित संदर्भ आणि नंतरही पाहिल्या गेलेल्या विचित्र आकाराच्या वस्तू म्हणून मग अश्या वस्तूंना "UFO म्हणजेच अनआयडेंटिफाईड फ्लाईंग आॕब्जेक्ट्स" असं म्हणायला सुरुवात झाली...पण अलीकडे काहींनी त्यातले काही प्रकार हे पृथ्वीच्या आयनोस्फीअरमुळे घडू शकणारे नैसर्गिक प्रकारही असू शकतात असं वाटल्यामुळे त्यांना UFO ऐवजी "UAP अनआयडेंटिफाईड एअरियल फनाॕमिना" असं म्हणायला सुरुवात झाल्ये आणि अमेरिकेत तर एक स्पेशल टास्क फोर्सच बनवला गेलाय "UAP अनआयडेंटिफाईड एअरियल फनाॕमिना"चा वेध घेण्यासाठी!!

परवापरवाच "पेंटॕगाॕन" आणि ह्या "UAP Task Force" ने अमेरिकन नेव्हीच्या फायटर पायलट्सनी २०१७ पासून जितक्यांदा अशा प्रकारच्या UFO/ UAP पाहिल्या आणि त्याचं रेकाॕर्डिंग केलं, त्यापैकी काही टेप्स डि-क्लासिफाईड करुन प्रेससमोर आणल्यात!! त्या १४४पैकी बहुतेक केसेस ह्या "नैसर्गिक चमत्कार" म्हणून फेटाळून लावल्या तरी एक रेकाॕर्डिंग मात्र काही वेगळंच दाखवतंय...त्या रेकाॕर्डिंगमधे अफाट प्रचंड वेगाने सरसरत जाणारी ती तबकडीसदृश्य वस्तू ही चीन किंवा रशियाचं एखादं "फ्युचरिस्टिक वैज्ञानिक उपकरण आहे की खरोखरचं युफो" याविषयी संदिग्धता आहे!! पण पँन्टॕगाॕनने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार त्यांच्या माहितीनुसार तशी टेक्नाॕलाॕजी त्यांच्या शत्रुंकडे (रशिया, चीन) सध्या नाही!..मग तसं असेल तर त्या नेव्हीच्या फायटर पायलट्सनी जो UAP (Unidentified Aerial Phenomena) बघितला तो खरोखरच परग्रहवासियांचं प्रचंड वेगाने जाणारं यान होतं?...म्हणजे पृथ्वीवर ते आॕलरेडी आलेत? आहेत?...त्या UAPsवर भन्नाट तर्क लढवले जातायत - कुणी म्हणतंय ते आपल्यासारख्याच मानवांनी भविष्यातनं (टाईम वार्पमधनं) उलटा कालप्रवास करत आपल्याला दिलेलं दर्शन असेल...किंवा मग दूरच्या एखाद्या तारामंडळातल्या ग्रहावरनं आलेले प्रगत परग्रहवासी असावेत ते?!!!

एक नक्की की अमेरिकन गव्हर्न्मेंट त्याविषयी गंभीरतेनं माहिती गोळा करतंय! अमेरिकेचे सर्वमाजी आणि आजी  प्रेसिडेंट्ससुद्धा सिरियस दिसतायत!..,मागे बराक ओबामांनी हे म्हटलं होतं की "हो आकाशात तसंकाही दिसल्याचे पुरावे नक्कीच आहेत, पण आपल्याला सांगता येत नाही "ते" नक्की काय आहे म्हणून!!..र नुकत्याच झालेल्या निवडणुकीआधी ट्रंम्प त्यासंदर्भात काही गोपनीय माहिती फोडण्याच्या बेतात होते पण इस्राएलच्या संरक्षण खात्याच्या प्रमुखांच्या विनंतीवरुन ते थांबले असं WION न्यूज चॕनलची बातमी होती!..

अगदी १९५१ सालच्या "द डे द अर्थ स्टूड स्टिल" पासून अगदी अलीकडच्या "अॕव्हेंजर्स" सारख्या मूव्हीजपर्यंत हाॕलीवूडमधे युफो आणि एलीयन्सवर ( परग्रहवासी) अनेक मूव्हीज बनत आलेत!!

मी या विषयावर पाहिलेला पहिला मूव्ही होता "द क्लोज एनकाऊंटर्स आॕफ द थर्ड काईंड"! स्टीव्हन स्पीलबर्गचा!! ज्यामधे युफोमधनं आलेल्या परग्रहवासियांनी पृथ्वीवर येऊन उचललेल्या काही माणसांना, प्राण्यांना परत एका लँन्डिंग साईटवर सोडल्याची चित्तथरारक कथा होती..त्यात भारतातल्या धरमशालाजवळच्या साधूंचाही सहभाग दाखवल्याचं आठवतंय! जे.अॕलन हायनेकने अशा युफो आणि एल्यन्सबरोबरच्या 'क्लोज एनकाऊंटर्स'चे पाच kinds प्रकार सांगितलेत - (१)  साईटिंग किंवा दर्शन (२) एव्हिडन्स किंवा पुरावा (३) काँन्टॕक्ट किंवा संपर्क (४) अॕब्डक्शन किंवा माणसांना, प्राण्याःना युफोमधनं पळवून नेणं (५) कम्युनिकेशन किंवा परग्रहवासियांनी मानवाशी थेट बोलणं!!

हे सारं अद्भूत आहे. पण माझा पॕरलल वर्ल्ड्स, टाईम ट्रॕव्हल, स्पेसटाईम-वार्पवरही विश्वास आहे. आपली अॕस्ट्रल बाॕडी (सूक्ष्म देह) असा प्रवास करते ह्यावरही विश्वास आहे (अॕस्ट्रल बाॕडी पुन्हा ज्जड देहात शिरतानाचा जर्क तर मी बेडवर पडल्यापडल्या अनेकदा अनुभवलाय!)...

एकीकडे हे UFO किंवा UAP ..आणि दुसरीकडे आपल्या भारतातल्या आनेक महान योग्यांना ज्ञात असणा-या अष्टसिद्धी ...क्रियायोग...ह्याविषयी खूप खूप कुतूहल वाटून वाचन चालू आहे...







Wednesday, 23 June 2021

So difficult to be simple..

"It is so simple to be happy but it is so difficult to be simple.."
--------------------
काल ब-याच काळनंतर चॕनल बदलताना "बावर्ची" समोर आला आणि मग जी फ्रेम समोर होती तिथपास्नं पुन्हा ब-यापैकी बराच वेळ बघत गेलो. बावर्ची राजेश खन्नाच्या तोंडचे गुलजारजींचे डायलाॕग्ज ऐकताना जणु वपुंचीच वाक्यं ऐकत असल्याचा फील येत होता. अगदी सहजसुंदर तत्वज्ञान साध्यासाध्या बोलण्यातनं!

एका प्रसंगात कुटुंबातल्या मधल्या भावाशी बोलताना बावर्ची सहज बोलून जातो-" It is so simple to be happy but it is so difficult to be simple.." आणि हा डायलाॕग घुसलाच एकदम मनात!....

थोडं गुंतागुंतीचं आहे नैय हे वाक्यं? "आनंदी असणं/राहणं फारच सहजसोपं" पण "सहजसोपं असणं/राहणं फारच कठीण (पुण्याच्या भाषेत "अवघड"!)"!...व्वा....पण म्हंजेच एकापरी आनंदी राहणंही कठीणच नं?...

हे वाक्य डोक्यात संध्याकाळी रुंजी घालत असतानाच मी शाळेच्या ग्रुपच्या काही मित्रमैत्रिणींना भेटलो आणि काही मित्रांच्या जुन्या आठवणी निघाल्या आसताना गेल्या ३०-३५ वर्षांत न भेटलेल्या एका मित्राचा विषय निघाला आणि आमच्या त्या मित्राने ३५ वर्षांपूर्वीच्या शेवटच्या भेटीत सिंम्पल राहणीमानावरनं बोलताना त्याने गंमतीशीर इंग्लीशमधे पण काँन्फिडेंटली टाकलेलं वाक्य आठवलं "प्रसन्न तुला सांगतो सिंम्प्लीसिटी इज द बेस्ट सिटी!"..

आणि बावर्चीचं "सिंम्पल राहणंच डिफिकल्ट" असण्याचं मनात घोळणारं वाक्य पुन्हा प्रकर्षानं समोर आलं..

खरंच..आपण डिफिकल्ट करुन टाकलंय सिंम्पल असणं...सिंम्पल राहणं...आजकालच्या जगात.....!

पूर्वी चाळ, वाडा संस्कृतीमधली छोटी घरं (फार्फार तर 1BHK) असताना आणि रेडिओ ते एकचॕनलीय टीव्ही असण्याच्या काळात किती सिंम्पल आसायचं जीवन! मी नेहेमी म्हणत आलो मला "श्रीमंती"पेक्षा "समृद्धी" आवडते! तसंच असायचं ते जीवन. Rich नसलं तरी Enriched!!.... त्याकाळातली १९५५ ते १९७५ मधली जुनी वर्तमानपत्र काढून बघितली तरी त्यावेळचा समाज आणि एकुण आयुष्य लुभावतं. आनंद सिंम्पल...समाधान सिंम्पल...सुख सिंम्पल...इतकंच काय प्राॕब्लेम्स किंवा समस्याही तश्या सिंम्पलच!!

१९५५ ते १९७५ मधली नाटकं, सिनेमेही सिंम्पल. राजकीय आणि सामाजिक उलथापालथही सिंम्पल. कथाकादंब-या लेखनही सिंम्पल. 

गोची सुरु झाली ती १९७५ नंतर ख-या अर्थानं. मग सिंम्प्लीसिटी काँम्प्लेक्स होत गेली. राजकारण, समाजजीवनात भलत्याच उलथापालथी होत गेल्या. सिंप्लीसिटी कमी होत गेली....

आणि आता??....आता तर सगळंच काँम्लेक्स..व्यामिश्र...सगळंच...आणि मग त्यात सुख, समाधान, हॕप्पी असणं/ राहणंही काँम्प्लेक्स होऊन बसलंय...

इतकंच काय..पण हे साधं फेसबुकवर सिंम्पल असणं/राहणं/लिहिणंही सिंम्पल नसतंय...किंवा सिंम्पल असून चालत नाही बहुदा. खूप जड...काहींचे लेख..कविता वाचल्या की जाणवतं...कसं काय बुवा जमतं काँम्प्लेक्स लिहिणं इतकं सहज काहीजणांना?...मला तर ज्याम जमत नाही...आणि नर्व्हस व्हायला होतं त्यांचं वाचताना...विचार करताना बावर्चीचं ते मनात घुसलेलं वाक्य जास्तच पटलं - "It is so simple to be happy but it is so difficult to be simple.." ;-) 

Time is money

"Time is Money" नक्की का?
--------------------------
खरं तर हे प्रोव्हर्ब खूप वर्षं ऐकत आलोय आणि टीव्ही, सिनेमांसाठीच्या एक्केक सेकंदाच्या जाहिरातीचे रेट्स ऐकल्यावर निदान त्यानुषंगाने हे खरंही आहे! पण आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात हे misnomerच वाटतं!

म्हंजे बघा ना - मी कित्येकदा खूप सारे 'पैसे' खर्च करतो 'वेळ' वाचवण्यासाठी. पण "वेळ (time) = पैसा (money)" असेल तर याचा अर्थ होतो मी पैसे 'खर्च करुन' पैसा 'वाचवत' असतो? कमालच की! म्हणजे "पैसे खर्च करा आणि पैसे वाचवा!" गंमतीचं वाक्य ना हे??😉
बरं याच्या उलट तरी बघा - एखाद्या लांबच्या ठिकाणी प्रवासाला जायचं असेल आणि तिथे बस, रेल्वे आणि विमान तीनही प्रकारे जाता येत असेल तर कदाचित काहीजण पैसे वाचवण्यासाठी वेगवान विमानाऐवजी वेळखाऊ साधनं म्हणजे रेल्वे किंवा बसने रोडचा प्रवास निवडतील. म्हणजे पैसे (money) वाचवण्यासाठी वेळ (time) खर्च करतील; पण time is money या प्रोव्हर्बनुसार आपण पैसे (म्हणजेच वेळ) वाचवण्यासाठी वेळ (म्हणजेच पैसे) खर्च करतो! आयला, म्हणजे "वेळ खर्च करा आणि वेळ वाचवा? म्हणजे पुन्हा कमालच की! हेही गंमतीदारच!🙃

पण ही सर्व गंमत जाऊ दे - मला सिरियसली प्रश्न पडतो की खरंच कित्येकांना वेळेची किंमत time (=money)ची value का कळत नाही? आणि माझं दुर्दैव असं की माझ्या नशिबाने मला बऱ्याचदा दिलेली वेळ न पाळणारेच भेटलेत. मी अत्यंत थर्डक्लास नवरा, बेक्कार बाप आणि टुक्कार मित्र असण्याचं कारण म्हणजे मी बायको, मुली आणि मित्रमैत्रिणींशी वेळ न पाळण्यावरून वादावादी  करतो..कचाकचा भांडतोसुद्धा! ते म्हणतात तसं विचार केला तर कितीही झालं तरी घरचे आपल्या प्रचंड हक्काचे आणि बाकीचे मित्रमैत्रिणी किंवा इतर ओळखीचे नाही म्हटलं तरी तसे परकेच - मग होतं काय की मित्रमैत्रिणींना त्यांनी दिलेली वेळ न पाळल्यामुळे मला झालेला मनःस्ताप त्या मानाने रागाचा स्फोट न होता व्यक्त केला जातो पण तेच बायको आणि मुलींवर मी भयंकर चिडून बोलत असतो अगदी त्यांनीं माझ्याशी काही वेळ अबोला धरेपर्यंत! (म्हणूनच मी थर्ड क्लास नवरा आणि बेक्कार बाप आहे!) ...गेली लाख्खो वर्षं माझे मित्र (मैत्रिणी जास्त!) ठरलेली वेळ न पाळून माझी कवटी सटकवत असतात. 

आणि झालंय काय आधीच मी चित्पावन कोब्रा त्यामुळे वेळ पाळण्यात (किंबहुना खूप आधीच रेडी असण्यात माहीर!), तशात मी आयुष्यत काही वर्षं जॅपनीज आणि इटालियन कंपनीत काढून ती मंडळी वेळेची किती भोक्ती असतात ते पाह्यल्याने मला बुवा दिलेली वेळ पाळायला प्रचंड आवडतं! (आम्ही इंडियन नेहेमी मीटिंगला उशिरा जायचो तेव्हा कळलं की त्यांच्या देशात "मिटिंगची वेळ" ही मिटिंग-रूममध्ये शिरायची वेळ नसून, त्याआधी १० मिनिटं तिथे हजर राहून शार्प 'त्या वेळी मिटिंग "सुरु करण्याची" असते म्हणून! ....... ती सवय झाल्यामुळे वेळ न पाळण्यांवर मी कायच्या क्काय चिडत असतो!  

व्हॉल्वोने प्रवास करायची वेळ आली की माझी त्या व्हॉल्वो बस ड्रायव्हरशी नेहेमीच वादावादी होत असते. ते साले मॉलला थांबताना सांगतात अमूकएक मिनिटं (१० किंवा १५ जे काय) बस थांबेल आणि प्रत्यक्षात मात्र शेवटचा माणूस आरामात हादडून हलेडुले येईपर्यंत थांबतात आणि माझी सटकते. माझं म्हणणं असतं की त्या ड्रायव्हरने दिलेली वेळ संपली की सरळ बस सुरु करून निघून जायचं तर ते तो करत नाही आणि त्यावर कडेलोट म्हणजे हलेडुले येणारा ते लेट लतीफ (पुरुष, बायका दोघं) आपल्याच बापाची बस समजून असल्यामुळे आपल्यामुळे बाकीच्यांचा खोळंबा झालाय तर किमान कर्टसी म्हणून सॉरी म्हणून दिलगिरी व्यक्त करतील तर ते हरामखोर भारतीय कसले?!!! मग माझी धूसफूस चालू होते.... बीपीचा त्रास नसल्यामुळे ते अजून वाढलेलं जाणवलं नाही कधी, पण चिडल्यामुळे भडकून कुठेतरी डोक्यात दहाबारा बारीक रक्तवाहिन्या नक्कीच बर्स्ट होत असणार....!! (नशीब अजून भारतीय रेल्वे आणि विमान-कंपन्या तरी प्रवाशांसाठी असं उगाच वाट बघत थांबून राहत नाहीत!) 

मराठी नाटकवाल्यांची पण तशीच बोंब! दिलेल्या वेळी कध्धीच नाटक सुरु करत नाहीत! त्यामुळे मराठी नाटकाचे प्रेक्षकसुद्धा जग्गातले आळशी आणि लेट लतीफ झालेत! त्यांचीही धारणा झाल्ये की नाटक हे दिलेल्या वेळेवर जन्मात सुरु करणार नाहीत म्हणून! असले भिकार मनोवृत्तीचे आपण! लेको करा ना नाटक वेळेवर सुरु - लागू देत शिस्त प्रेक्षकांनाही!! पण हम नही सुधरेंगे! (नशीब - सिनेमाथेट्रात सिनेमा तरी अजूनतरी दिलेल्या वेळेत सुरु होतो! तिथे शेवटचा प्रेक्षक येईपर्यंत थांबत नाहीत!!)
 
तसंच काही मित्रमैत्रिणींच्या बाबतीत! कित्येक मित्रमैत्रिणींना (विशेषतः मैत्रिणींनाच!!) वेळेचं गणितच जमत नाही. त्यांचं "काळ-काम-वेग"वगैरे गणिताची भयंकर बोंब असते! भूगोल (कुठून कुठे जायचंय), जनरल नॉलेज (वाटेत साधारण कुठे किती ट्राफिक आणि अडथळे असू शकतात)  आणि फिजिक्स (किती किलोमीटर पर सेकंडने जायला हवं) - या सगळ्याचं ज्ञान ज्यामच गंडलेलं असतं! त्यामुळे दिलेल्या/ ठरलेल्या ठिकाणी मी आपला (चित्पावन कोब्राच्या) वेळपाळू स्वभावानुसार मस्तपैकी आधीच हजर असतो आणि या खुशाल अर्धातास किंवा कितीही उशिरा येतात! तोपर्यंत माझी वाट पाहून सटकलेली असते त्यात प्रचंड घामट असल्याने (ते "sweating like pig की dog" बदलून 'स्वेटिंग लाईक प्रसन्न' करायला हरकत नाही!)  माझ्या त्या ठिकाणी प्रचंड वेळ माझा पुतळा होऊन तोपर्यंत पाठीच्या पन्हळीतून घामाची नदी खालती प्यांटीपर्यंत शिरायला लागलेली असते! 😠

तर सांगायचं तात्पर्य म्हणजे time is money वगैरे मरूच दे - पण दिलेली वेळ न पाळणारी आणि काही अपरिहार्य कारणाने त्यांची चूक नसताना समजा उशीर होत असेल तर तसं वेळीच न कळवणारी माणसं डोस्क्यात जातात! माझी घरीदारी सर्वात जास्त चिडचिड आणि टोकाचे वाद आणि भांडणं वेळ न पाळण्यावरून होतात. आणि मग क्वचित माझ्या काटकटीमुळे कावलेली, वैतागलेली आणि संतापलेली बायको आम्ही लवकर जाऊन पोहोचल्यावर तो समारंभ काही कारणाने वेळेत सुरु न झाल्यास, मला "जा जा अजून झाडू मारायला लवकर जाऊन बसू!!" वगैरे ऐकवते तरीही मी माझ्या वेळ पाळण्यावर ठाम असतो (तो समारंभ वेळेत सुरु न करणाऱ्यांना मनोमन शिव्यांची लाख्खोली वाहत!) 
 
आजकाल बघितलंय की पत्रिकेत छापलेली वेळ (घटिका की काय ते!) सुद्धा उलटून गेल्यावर लग्न लागतात! मग माझी चिडचिड सुरु! जर का लग्न हा एक गंमतीदार खेळच आहे आणि मजेतच सगळं करायचं असेल तर अशी ती मंडळी लग्नपत्रिकेत वेळच का छापतात in the first place? गरजच काय? पुन्हा तेच काळ-काम-वेग याचा सुतराम संबंध नसल्यामुळे कोणकोण कितीकिती वेळ स्वरचित मंगलाष्टकं गाणारेत वगैरे अंदाजच नसतो ...आणि आपण आपले दिलेल्या लग्नघटिका पाळायची म्हणून काळ काम वेगाची गणितं, ट्रॅफिकचा अंदाज सगळं बघून भरपूर आधीच वेळेत पोहोचलेलो असतो. तर वेळ उलटून जाऊनही लग्न लागत नसल्याचं बघत बसावं लागतं आणि वर कुणातरी काकवा/मावश्यां/आत्याबाईंची चांगली २०-२० कडव्याची (आता संपतील ...आता संपतील... आतातरी संपतील... वाटायला लावणारी ) स्वरचित मंगलाष्टकं ऐकायची पाळी येते कारण ती संपल्याशिवाय भटजीबुवाचं "तारांबळं... " सुरु होणार नसतं! (गंमत म्हणजे दिलेल्या वेळेवर (तास/मिनिट) लग्न न लागून चालत असणाऱ्या त्या फॅमिलीने चक्क पत्रिका आणि ग्रह वगैरे जुळवून सून/जावई आणि लग्नाचा मुहूर्त काढलेला असतो हा जोकच! )...

अशी ती वेळ न पाळणाऱ्यांना हे का कळत नसतं की - बायकोने घराबाहेर काढलंय म्हणून किंवा गोट्या खेळायला घरी किंवा सोसायटीत कुणी मिळालं नाही म्हणून - वेळ घालवायला आम्ही त्या ठिकाणी येऊन तिष्ठत उभे/ बसलेलो नसतो!! आम्हालाही आमच्या वेळेत करण्यासारखं बरंच काही असूच शकतं. नव्हे असतंच!!!! 

म्हणून time is money या वाक्याचा अर्थबिर्थ राहूदे बाजूला पण निदान दुसऱ्यांच्या वेळेचं भान/ चाड बाळगायला शिकलो आपण बहुसंख्य लोक तरी मिळवली!🤓

Tuesday, 22 June 2021

लेह मधले मंतरलेले दिवस!

माझ्या लेह-भेटीची हकिकत नवीन फ्रेंड्ससाठी! 
-------
(१) 
लेहला पोचल्यावर, गार्गी गेले दोन महिने राहत्येय त्या "Rover's Den" ह्या बॕकपॕकर्ससाठी असलेल्या हाॕस्टेलमधेच उतरलो मी आणि निकिता! 

ग्रीष्मा सोले आणि कौस्तुभ दळवी या उत्साही नवराबायकोने इथल्या 'वसिम बारी झरगार' नावाच्या उत्साही पार्टनरबरोबर सुरु केलेलं हे हाॕस्टेल, पाठीवर सॕक टाकून ही देवभूमी एक्स्प्लोअर करायला येणा-या  विमुक्त, भटक्या ट्रेकर्ससाठी आदर्श अशीच जागा!! इथे प्रत्येक रुममधे खालीवर झोपायची सोय असणारे बंकबेड्स आहेत आणि ओपन किचन आहे. त्यांचा कूक तुम्हाला मेन्यू कार्डमधलं बनवून देतोच पण तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही ते ते इनग्रेडिअंट्स आणून किचनचा ताबा घेऊन तुम्हाला हवं ते बनवूच शकता! अट एकच नंतर सगळं आवरुन ठेवायचं! ;-) ...इथल्या भिंतींवर तुमची ग्राफिटी, कलाकारी चितारु शकता..रंग, ब्रश ठेवलेलेच आहेत ट्रंकभर!! आणि  टाकाऊ वस्तू वापरुन एक छान माहोल क्रिएट केलेला आहे! दर शनिवारी रात्री कँम्प फायर ची सोय असते (पाऊस पडून लाकडं ओली न झाल्यास!) 

खरं तर थंड वातावरणात लेह ला 11000 फुटांवर उतरल्यावर अक्लायमेटाईझ व्हायला दीड दिवस तरी द्यावाच म्हणतात..पण "रोव्हर्स डेन हाॕस्टेल"च्या माहोलच्या जादूने एक वेगळाच आॕक्सिजन भरला जातोय फुप्फुसात! ;-) 

माझा काल इथे आल्यापासूनचा आत्तापर्यंत दीड दिवस होत आलाय  आणि तेव्हढ्यातच  बर्रेच मराठी आणि युरोपियन ट्रेकर्स, हायकर्स उतरलेत त्यांच्याशी ओळखी होतायत! 'कबीर राचुरे' गेल्या वर्षीच्या हिमालयन सायकल रॕलीचा विजेता पुन्हा यावर्षीची 600 किमीची (इथल्या रफ टेरेनची) सायकल रॕली जिंकायला आलेला मूळ लातूरकर तरुण! उत्साही आणि बडबड्या! तर कार्तिक महाजन हा नागपूरकर अफ्फलातून वाईल्ड लाईफ फटोग्राफर आणि टायगर एक्स्पर्ट! अशी बाप माणसं भेटून छान वाटतंय!

आता रिफ्रेश होऊन दुपारनंतर जवळच मार्केटमधे फेरफटका मारेन म्हणतोय!
----------------
(२)
सकाळी ब्रेकफास्ट उरकेपर्यंत एहसानभाई आपली इनोव्हा घेऊन "रोव्हर्स डेन"च्या दारात हजर! शेअर बेसिसवर इनोव्हा ठरवली असल्यामुळे आणखी दोनजणांना वाटेत पिकअप करायचं होतं. ते दोघे सहप्रवासीही छान मिळाले. ज्युलीयन हा फ्रेंच तरुण आणि झिनी ही जर्मन तरुणी! पहिल्या "Hi...Hullo"तच गप्पा रंगणार हे स्पष्ट झालं. ज्युलीयन हा कार्ल्सबर्ग या डॕनिश ब्रँण्ड बिअरचा फ्रान्समधला सेल्समन हे कळल्यावर पुढचा अर्धापाऊणतास मस्तपैकी लिकरचे ब्रँड्स आणि जर्मनी, फ्रान्समधल्या माणसांच्या पिण्याच्या आवडीनिवडी वगैरे आवडीच्या विषयावर बोलण्यात गेला! तर झिनी ही जर्मनीत स्पेशल चिल्ड्रेनच्या शाळेत टीचर म्हणून काम करत्येय. झिनीची ही दुसरी भारतवारी तर ज्युलीयनची पहिलीच!..दोघंही जग फिरणारे पण भारतही आवडलाय हे त्यांच्या गप्पांमधून कळलं. मी, निकीता आणि गार्गी आम्ही तिघंही हॕरी पाॕटर, हाॕगवर्ट्स आणि विझार्डींग वर्डचे दिवाणे आणि झिनीसुद्धा! तीसुद्धा आमच्यासारखी नेटफ्लीक्स पाहणारी! पण सध्याची जर्मन जनरेशन-नेक्स्ट बहुंतांशी अमेरिकन फिल्म्सच बघणारी आहे हे तिचं मत! तिच्याशी छान कनेक्ट होत गप्पा रंगल्या. तर ज्युलीयनशी "अॕस्टेरीक्स आणि टीनटीन" काॕमिक्सच्या आवडीमुळे! तश्यात मला "टूर डी फ्रान्स" ही सायकलस्पर्धा बघायला आवडते (विशेषतः ती फ्रान्सच्या ज्या गावांतनं जाते तिथला अमाप, अद्भूत निसर्ग बघायला) तशीच ज्युलीयनलाही! त्यामुळे सायकल रेस, आर्मस्ट्राँग वगैरे गप्पा रंगल्या...दोघांशीही बोलण्यात औपचारिकता राहिलीच नाही..

आमच्या एहसानभाईने सुसाट इनोव्हा सोडली होती, वाटेतल्या सुंदर आणि आखीवरेखीव साबू गावाला मागे टाकून आम्ही लवकरच "सिंधू दर्शन" स्पाॕटला पोहोचलो. पुढचा काही वेळ पवित्र सिंधू नदीला उजवीकडे ठेवतच झाला! आणि नंतर ज्या डोंगर रांगा सुरु झाल्या त्या थेट पँगाँग सरोवरापर्यंत!

बरं तो भाग सगळा उघड्याबोडक्या डोंगररांगांचा!..रस्त्याच्या बाजूला अधनंमधनं तुरळक झाडं असली तरी डोंगरांवर एक झाड असेल तर शप्पथ च्यामारी! डोंगरावरची माती पण चारपाच रंगांची..म्हंजे काही डोंगर मातकट..तर काही पिवळेधम्मक..तर काही पांढरट चाॕकलेटी तर काही सिमेंटने गनायटींग केल्यासारखे तुकतुकीत पांढरट राखाडी घट्ट वाळूची चादर अंगावर ओढून उभे !

पण जाताना एक जाणवलं ती म्हणजे कमालीची स्वच्छता! (अशीच स्वच्छता केरळ ट्रीपमधे अख्ख्या केरळभर पाहून मनोमन कम्युनिस्टांना सलाम ठोकला होता! ) अख्ख्या भारतभर केरळ आणि लडाखइतकी स्वच्छ गावं आणि कागदाचा कपटा आणि प्लॕस्टीकची पिशवी नावापुरतीही आढळली नाही! (असलीच तर ती नक्कीच भारतातल्या इतर राज्यांतनं आलेल्या माजोरड्या, हरामी नागरिकांची देन या गावांना! 100%!!) 

वाटेत आमची तिघांची परमिट्स आणि ज्युलीयन आणि झिनीचे पासपोर्ट्स चेक करुन झाले आणि सुसाट सुटलो. चेमदे माॕनेस्ट्री मागे टाकली आणि जगातल्या दोन नंबर उंच (17688 फूटांवरचा) असलेल्या च्यांगला पास रोडकडे निघालो.

आता मात्र रोड कुठल्याही ड्रायव्हरची परीक्षा घेणारा BRO (बाॕर्डर रोड..)ने बरीच कामं केल्येत तरीही बाजूच्या भयानक अजस्र शिळा आणि दरडी पडू शकणा-या..नव्हे पडणा-या डोंगरांमुळे रस्ते वाईट आहेत! एहसानभाई मात्र सराईतपणे इनोव्हा पळवत होता,,,

आश्चर्य सतत वाटत होतं की इतक्या प्रचंड उंचीवरची जीवघेणी वळणं, अंगावर कधीही पडतील अशा दरडी एका बाजूला तर खोलच खोल दरी दुस-या बाजूला असूनही कुठ्ठेच संरक्षक कठडे/ भिंती वगैरे प्रकारच नाही. आणि हे कमी म्हणून की काय आपल्याला घाबरवायला ठिकठिकाणी "Avelanch prone area" किंवा "शूटींग स्टोन एरिया" आसे बोर्ड्स! ड्रायव्हर चुकला तर थेट मुक्ती!! पण त्यातही एक दोन डोंगरांमधे मला चक्क त्या मॕकेन्ना'ज गोल्डसारख्या घळी दिसल्या ज्यावर त्या उंच सुळक्याची धावती सावली जात थांबते आणि ज्यामधून शेरीफ मॕकेन्ना त्या बदमाष कोलोरॕडो आणि गँगला घेऊन त्या सोन्याच्या खाणीत शिरतो...वगैरे आणि उगाचच वाटून गेलं - न जाणो - सालं आपणही इथे या सावलीच्या घळीत शिरलो तर आतमधे खोल गुहेतून, कपारीतून जात आपल्याला सिनेमातल्या अपाची इंडियनइतक्याच सुरकुतलेल्या एखाद्या लडाखी म्हातार्याचा शापित सुवर्ण खजिना मिळून जायचा..कुणी सांगावं ;-) 

त्यापुढचे डोंगर तर एकदम ताशीव आणि गुळगुळीत तर इतके की कुणाला शिखरावरुन सोडलं तर कुठ्ठेही न आपटता (कारण वाटेत खडकच नाही) तो सरळ घसरत पायथ्याशी यावा!! :-D  

पँगाँग सरोवराशी आलो आणि ..डोळ्यांचं पारणं फिटलं!..केव्हढा तो निळ्याशार, निळ्याभोर, निळ्याचुटूक, निळ्याभडक, निळ्याधम्मक आणि निळ्याजर्द पाण्याचा अथांग पसारा!!! नजर पोचेस्तो सरोवरच सरोवर!!..

इनोव्हातून उतरुन लगेच किना-याजवळ धावलो पण तिथलं दृश्य बघून चीड आली...शिसारी आली..यक्षभूमी वगैरे म्हणवल्या जाणा-या त्या परिसरात ..अगदी पँगाँग सरोवरासमोरच व्यावसायिक धंदेवाल्यांनी त्या स्वर्गीय चमत्कारावर पाssर बोळा फिरवलाय!..किना-यावरच ओळीने ती 3-इडियट्स सिनेमातली तीन रंगांची खूप सारी ढुंगणं ओळीने मांडून ठेवल्येत..आणि बाजूलाच त्याच सिनेमातल्या करिनाच्या पिवळ्या स्कूटर आणि  हेल्मेटसारख्या अनेक स्कुटर्स आणि हेल्मेट्स..आणि पँगाँग बघायला येऊन थांबणा-या अनेक कार्स आणि बसेसमधली अनेक खुळी मंडळी त्या तीन रंगी ढुंगणात बसून मागे वळून त्या ढुंगणाच्या गोलाईवरुन हात फिरवत मागे वळून पोज देतात..मुली करिनाच्या स्कूटर्सवर बसून फोटो काढतात?!! अरे लेको समोर बघा...निसर्गाचा..जगन्नियंत्याचा अद्भूत चमत्कार नजर पोहोचेस्तो पसरलाय तर तुम्ही मागे बघत रंगीत ढुंगणं कुरवाळत पोझेस कसल्या देताय? 😠

आम्हाला त्या वातावरणात 10 मिनिटांच्यावर थांबावसंच वाटलं नाही आणि आम्ही सरळ पुढे निघालो. सरोवराच्या कडेने जात आणखी दोनचार किलोमीटर्स पुढे आल्यावर एका चढावर स्पांगमिक या ठिकाणी एक छान होमस्टे काॕटेज मिळाली रहायला.  क्काय लोकेशन होतं बाकी! खिडकीतून समोर पसरलेलं अथांग पँगाँग सरोवर आणि आमच्या काॕटेजच्या मागच्या बाजूला दोनचार तपकिरी पर्वतांमधून डोकावणारी सुंदर हिमाच्छादित शिखरं !! एक रात्र काढायला याहून आणखी काय हवं?...

संध्याकाळी भयानक बोच-या थंडगार वा-यात पँगाँग सरोवराच्या बाजूने फेरफटका मारला. पाण्याची चवही मी चाखून पाहिली. पण "साॕल्ट लेक" म्हणावं तर चव खारटपेक्षा तुरटच वाटली मला! एकीकडे त्या हाडं गारठवणा-या वा-याचा जोर वाढतच होता. आईशप्पथ! पँगाँगकाठच्या या स्पँगमॕक वस्तीत लिट्रली 24x7 थंडगार वारे वाहतात! एक सेकंद थांबत नाहीत हे अंगाला झोंबणारे वारे!..(इथे खरं तर विंडमिल्स लावायला हव्यात सरकारने म्हंजे रात्री जेमतेम दोनतीस राहणारी वीजसुद्धा इथल्या लोकांना चोवीस तास मिळेल!)..

पहाटे 4.30 ला अचानकच जाग आली.. बेडवरुन झोपलेल्या अवस्थेतच खिडकीबाहेर नजर टाकली. समोर काळोखात लपलेले ध्यानस्थ डोंगर..
वा-यामुळे सरोवरावर उठणारे तरंग.. आणि आकाशात मंद प्रकाशणारी चंद्रकोर. विलक्षण वातावरण. मग झोप उडालीच! मी चक्क खिडकीजवळ मांडी ठोकून बसलो!! एक तास तसाच बसून होतो. समोर बालपणी चित्र शिकताना काढायचो तशी त्रिकोणी डोंगरांची रांग आणि पुढ्यात पँगाँग सरोवराचं पाणी..मग काय..चित्रातल्यासारखा त्या त्रिकोणी डोंगरामागून उगवणारा खर्राखुर्रा सूर्य प्रत्यक्ष अनुभवून मगच बेडवरुन हललो!..

लेहपर्यंतचा परतीच्या प्रवासात ज्युलीयन आणि झीनीबरोबरच्या गप्पांतनं खूप शिकण्यासारखं होतं. दोघंही अठ्ठावीसचे पण कित्ती जग फिरलेत!! दोघांना लहान बहिणी आहेत. पण आपापलं आयुष्य त्यांनी छान प्लॕन केल्याचं जाणवत होतं. त्यांचं फिरणं आणि प्लॕनींग ऐकूनच थक्क झालो! पैसे साठवावेत आणि पृथ्वीच्या पाठीवर भटकंती करावी..वेगवेगळ्या खंडांत...ट्रेकींग करावं...लो काॕस्ट हाॕटेलमधे राहात...वेगवेगळं खाणं ट्राय करावं...हे त्यांच्याकडून शिकावं.

त्यांच्या कंपनीत लेह-पँगाँग-लेह जाऊन येऊनची रोड-ट्रीप खेळीमेळीच्या गप्पांत मस्त पार पडली! त्यांना उद्यापासूनच्या त्यांच्या मर्खा व्हॕली ट्रेकला शुभेच्छा देऊन निरोप घेतला!
-----------------
(३)
संध्याकाळ दोन्ही लेकींबरोबर मार्केट स्क्वेअरमधे फिरत घालवली.

मार्केटमधल्या जुन्या बुद्धीस्ट-टेंम्पलमधे घुसलो. पण बहुदा लेट झाल्यामुळे आपल्या देवांसारखाच, त्यांचाही देव कुलुपबंद होता! मग त्या आवारातच थोडा वेळ फिरलो. या बौद्ध मंदिरात एकुण 89 प्रार्थना-चक्र आहेत आणि त्यांच्यावर दुष्ट शक्तींना आणि निगेटीव्ह वाईब्जना लांब ठेवण्यासाठी काही श्लोक कोरलेले आहेत. मी जरी पापी असलो तरी अश्यावेळी मी पुण्य गोळा करायची संधी सोडत नाही ;-) मी लग्गेच एका बाजूची  दहा प्रार्थना-चक्र (दंडगोल) पटापट फिरवून पाहिली. (आता त्याचा माझ्यावर होणारा चांगला इफेक्ट कळेलच म्हणा! ;-) )

नंतर गार्गीने सुचवल्याप्रमाणे सेंट्रल एशियन म्युझियम जवळच्या आल्ची किचनमधे लडाखी डिशेस खायला गेलो. मी "खंबीर (रोटीसदृश्य खरपूस ब्रेडचा प्रकार) विथ स्क्रॕम्बल्ड एग्ज" घेतलं तर निकिता गार्गीने "स्क्यू" आणि "माॕकमाॕक"वर ताव मारला. नंतर "गुरगुर" हा बटर-टी पिऊन निघालो!

उद्या सकाळी मला आणि निकिताला एका अद्भूत ठिकाणी जायचंय म्हणून जरा लवकरच 12 वाजता झोपलो!
-------
(४)
सकाळी लवकरच उठून तयार झालो. अली नावाचा कोवळा फाटका तरुण, झायलो घेऊन सिगारेट पीत "रोव्हर्स डेन"च्या दारात उभा! साधारणपणे सिगारेटइतकीच किडकिडीत तब्येत कमावलेल्या (!) अलीवर मी जरा डाफरलोच! म्हटलं -"गाडी चालवताना तर प्यायची नाहीच पण एकुण आयुष्यातच सिगारेट प्यायला नाहीस तर तुझं भलंच होईल! 'दम मारो दम'च्या त्या मूर्ख 'कश'मधे खरं तर बिल्कुल 'दम' नसतो"- वगैरे...त्याने मान डोलावली आणि आमच्या स्वा-या एका अद्भूत ठिकाणी निघाल्या!

तुर्तुक!! पाकिस्तानने हडप केलेलं हे ठिकाण पाकव्याप्त बाल्टिस्तानचा 1971 पर्यंत हिस्सा होतं, पण भारताने 1971च्या युद्धात या भागावर कब्जा मिळवला आणि थांग, तुर्तुक आणि त्यॕक्शी भारतात सामील झाले. भारताच्या उत्तर सीमेवरची ही POK ला चिकटून असलेली शेवटची तीन गावं. आणि आज आम्ही त्यातल्याच तुर्तुक मुक्कामी निघालो होतो. प्रवास ज्याम वेळखाऊ असणार होता कारण खारडुंगवरुन पुढे खाली उतरत हुंदरमार्गे जाणारा संपूर्ण रस्ता, डोंगराच्या ओटीपोटावर खाचा करुन बनवलेल्या डेंजरस चिंचोळ्या वाटेवरुन करावा लागणारा आणि आपल्या पेशन्सची परिक्षाच पाहणारा!

त्यात आमचा फुकेश ड्रायव्हर अली, तोंडात धुराबरोबरच जमेल तितका वारा प्यायलाने सुसाट उधळलेला! माझी अक्षरशः तंतरली. मुंबई- पुण्यातल्या कुठल्याच मित्राला किंवा प्रायव्हेट कार्सच्या ड्रायव्हर्सना आपल्या घाटातल्या, समुद्रसपाटीपासून जेमतेम 600 फुट उंचीवरच्या आणि सुरक्षित कठडे आणि रेलींग्ज आसणा-या घाटरस्त्यांवरुन इतक्या सुसाट आणि बिनधास्त वेगाने कार्स चालवताना पाहिलं नाहीये. (बंपर टू बंपर ट्रॕफिकमुळे ते शक्यही नाही म्हणा!)..पण हा अली, त्या लेह ते खारडुंगला रस्त्यावर बेफाम स्पीडने गाडी हाणत होता. आपण लेहच्या 11000 फुटांवरुन खारडुंगलाच्या 18300 फुटांपर्यंत डोंगर चढत जातो. तेही एका बाजूला प्रचंड खोल दरी ठेवत! तेसुद्धा रस्त्याला कठडे, रेलींग नसलेला तीव्र वळणावळणाचा रस्ता! आणि भरीस भर म्हणून दरीच्या विरुद्ध बाजूला आसणारे डोंगर हे कुठल्याही क्षणी खालती कोसळायच्या तयारीत असलेल्या मोठ्ठाल्या खडक, रणगाडासुद्धा चेपला जाईल अश्या अजस्र शिळा आणि दरडींनी भरलेले!! काही खडक तर महाकाय चाकूने चांगले टोक काढून तासल्यासारखे! शप्पथ सांगतो मी घाबरलो आणि चक्क देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. (खोटं कशाला बोलू, अजुनही 'मनासारखं काही जगणं शिल्लक आहे' असं वाटतंचैय! ;-) )

खारडुंगलाच्या समुद्रसपाटीपास्नं 18380 फुट उंचीच्या रस्त्यावर पोचलो. वपु म्हणालेत - "पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये, चांगलं दहा हजार फुटांवरुन पडावं म्हणजे आपण किती उंचीवर पोचलो होतो ते जगाला कळेल!" त्याला स्मरुन - अगदी साताठ मिनीटंच तिथे थांबून, आम्ही तिथे येऊन गेलो हे जगाला कळावं म्हणून काढतात तसे औपचारिक फोटो काढले आणि सुसाट सुटलो. आता 18000 फुटांवरुन तुर्तुकला जवळजवळ निम्म्यावर उतरतच जायचं होतं. उतारामुळे अली आणखीनच पेटला...आणि तेव्हढ्यात...एका ठिकाणी त्याने ब्रेक मारताना गाडी घासल्यासारखा काहीतरी विचित्रच आवाज आला. उजव्या बाजूचा पुढचा टायर त्या घाटात पंक्चर झाला होता. (हे जर "आम्ही 18000 फुटांची चढण सुसाट वेगाने चढत आसताना झालं असतं तर.?" विचाराने मी जरा थरारलोच.)

अलीजवळचा जॕक नेमका लागेचना. आम्ही हैराण. पण थोड्यावेळाने हिमाचलचा एक भला माणूस आमची दया येऊन थांबला आणि त्याच्याकडचा जॕक घेऊन अलीचा स्टेपनी टायर बसवून झाला आणि अली पुन्हा सुटला!खालती उतरत जाणारा रस्ता तसा चांगला पण किचाट वळणावळणाचा होता त्यामुळे वेळ जात होता. तर या पठ्ठ्याने काय करावं? अचानक डांबरी चांगला रस्ता सोडून गाडी खाचखळग्यांनी भरलेल्या डोंगर उतारावरुन खालती न्यायला सुरुवात केली! (मला क्षणभर It's a mad mad mad mad world मधला तो प्रसंग आठवला!) मी माझ्या दिव्य हिंदीत अलीला विचारलं लगेच-
"अबे ये क्या? वो टाररोड छोडके ये पहाडके पत्थर और खड्डोंसे भरे रोडसे क्यूँ?"
"ये शाॕर्टकट है!" तो शांतपणे उत्तरला.
"लेकीन अभीअभी तो वोह टायर फुटा करके तुमने ये स्टेपनीवाला डाला है नं? अब ये भी फुटेगा इस खतरा स्लोपमे इतने पत्थर है तो..."
"वो पहलेवाला चायनीज टायर था. ये सही है!" अली माझ्याकडे न बघता सीटवर डुचमळत म्हणाला. मी हैराण, टायरमधेही चीन घुसलाय हे तोपर्यंत माहीत नव्हतं. पण सुदैवाने आम्हाला जागच्याजागी फार वेळ उडायला न लावता अलीने त्या उतारावरुन फक्त त्यालाच कन्व्हिंन्सिंगली वाटलेला तो शाॕर्टकट संपवून गाडी पुन्हा डांबरी रस्त्यावर आणली.

लवकरच आम्ही डिस्कीट गाव गाठलं. तिथे फोटोकाॕपिंगचं दुकान शोधून आमच्या परमिटच्या आणखी चार काॕपीज काढल्या. कारण लेह ते तुर्तुकमधे किमान तीन ठिकाणी नक्कीच झेराॕक्स द्याव्या लागतात.

पुढचा प्रवास थक्क करणारा होता. जाताना उजव्या हाताला पसरलेल्या हुंदरच्या रुपेरी वाळूच्या टेकड्या...आणि तिथे आसणारे दोन वशिंडंवाले उंट!..(मला वाळुचं फारसं अॕट्रॕक्शन नाही आणि उंटांचं त्याहूनही नाही. तो प्राणी मला कधीच आवडला नाही...एकतर उंटांना कधी आंघोळ करताना मी पाहिलं नाहीये किंवा त्यांच्या मालकांनी त्यांना कधी आंघोळ घातल्याचंही पाहण्यात नाही. बाकी सगळे पाळीव प्राणी घोड्यागाढवासकट सगळ्यांना आंघोळी खरारा वगैरे करतात...त्यामुळे त्या आयुष्यभर पारोश्या राहणा-या  उंटाजवळही जायला मला आवडत नाही. :-D  

त्यामुळे हुंदर गावाला रस्त्यातूनच बाय बाय करुन आम्ही पुढे गेलो. पुढे वाळुमिश्रीत पाण्यामुळे गढुळलेली पण तुफानी रौद्रावतारात वाहणारी श्याँक नदी...आणि लेहमधे कायमच आढळणारे चित्रविचित्र आकारांचे आणि रंगांचे भितिदायक डोंगर...कधीही पडतील आश्या दरडींचा सामना करत आम्ही बोगडांगमार्गे एकदाचं तुर्तुक गाठलं. बोगडांगपासूनच आपल्याला इथल्या लालगुलाबी गालांच्या अनुपम लावण्यवती दिसायला सुरुवात होते. निसर्गाने काय काँम्प्लेक्शन बहाल केलंय इथल्या मुलींना/ स्त्रियांना....वेगळंच आणि विलक्षण सौंदर्य! 😍

तुर्तुकला पोचलो मात्र! इथल्या अनुपम निसर्गसौंदर्याच्या पाहताक्षणीच प्रेमात पडलो!

मी याआधी दोनवेळा कश्मीरला गेलोय एकदा मे आणि एकदा आॕक्टोबरमधे! त्यामुळे कश्मीरचं सौंदर्य हे विसरुच शकत नाही ..ते अतुलनीय आणि अनपॕरलल्ड असंच! तरी तुर्तुकही सुंदरच आहे यात वाद नाही!

गार्गी आधी जाऊन आलेली असल्यामुळे तिने सुचवलेल्या 'सलीम खारमांग गेस्ट हाऊस'वर मी आणि निकिता उतरलो. त्या गेस्टहाऊससाठी काहीसं डोंगरावर चढून जावं लागतं...तेही पांढर्याशुभ्र फेसाळत्या, खळाळत्या नदीवरचा जुना कुचकुच करकरणारा पूल ओलांडून पैलतीरी गेल्यावर! पण चालण्याचे, उंच चढण्याचे श्रम जाणवतच नाहीत कारण तिथे असलेली निसर्गाची लयलूट! भलताच विलक्षण अवर्णनीय निसर्ग आहे तिथला! म्या पामराला, माझ्या काही मित्रमैत्रिणींसारखी नेमक्या आणि नेटक्या, लोभस शब्दसंपत्तीची प्रतिभा लाभलेली नसल्यामुळे, मी तिथलं वर्णन करण्याच्या भानगडीत पडत नाही! त्या निसर्गसौंदर्याचा मझा ज्याने त्याने/ जिने तिने तुर्तुकला जाऊनच घ्यावा (मी परत यायला तयार आहे बरोबर! ;-) )

रुमवर बॕगा टाकून मी आणि निकिता निघालो ते 'नॕचरल फ्रिझींग पाॕइंट' नावाचं अद्भूत ठिकाण पाहायला. तर वाटेतच आम्हाला "Hi" करत तीन निरागस बाल्टीकन्या समोर हजर! निकिताने गोड हसत जिंकलंच त्यांना. मग भीड चेपून तिघी आमच्याशी एकदम गप्पाच मारत सुटल्या. सफीना, सादिया आणि मोबिना अश्या त्या तिघींनीच मग गप्पा मारत मारत आम्हाला एका गुहेसदृश्य कपारीशी नेलं आणि आम्ही उडालोच!..आतमधे शिरताक्षणी त्या मोठ्ठ्या शीळेजवळ कमालीचा थंडावा, गारठा जाणवला आम्हाला!..झिरो पाॕइंट किंवा कोल्ड स्टोरेज असं म्हणताता त्या जागेला! ती किमया कशाची?..आतमधे एखादा बर्फाच्या पाण्याचा झरा लपलाय किंवा कसं हे बाहेरून कळायला मार्गच नाही पण तो निसर्गाचा चमत्कार अद्भूत आहे हे खरंच! दरम्यान सफिया, सादिया आणि मोबिनाने आमची माहिती आम्हाला विचारत धिटाईने स्वतःची माहितीही दिली. पाचवीत शिकणार्या तिघींपैकी एकीला कंम्प्युटर इंजिनीयर व्हायचंय, दुसरीला आयएएस आॕफिसर! तिसरीचं मात्र अजून ठरायचंय! ;-) आमच्या गप्पा रंगल्या असतानाच त्यांच्या नात्यातलेच एक आजोबा आले तिथे! मी "सलाम" केल्यावर त्या अली हुसेन आजोबांनी खुलून येत गप्पाच सुरु केल्या. तेही मूळ बाल्टिस्तानचे. इथली तिन्ही गावं पाकिस्तानात होती आणि 1971 युद्धात भारताने जिंकल्याचं त्यांनी सांगितलं. तुम्हा शहरवाल्यांना नोकरीत बरे पैसे मिळतात म्हणून तुम्ही फिरु शकता, इतक्या दूरवर पाक सरहद्दीवर येऊ शकता,.आम्हाला तसं जमत नाही वगैरे खंत व्यक्त केली त्यांनी! मला दोनच अपत्य आहेत आणि त्याही मुलीच, मुलगा नाही हे कळल्यावर ते भलतेच आश्चर्यचकीत वगैरे झाल्याचं दिसलं! आम्ही नुकतीच पाहिलेली ती अशक्य थंडाव्याची जागा त्यांच्याच मालकीची!..टूरीस्ट्सना तिथे बसण्यासाठी जागा करावी वगैरे त्यांचे प्लॕन्स त्यांनी मला ऐकवले. 

त्यांचा निरोप घेऊन मग मी आणि निकिता निसर्गरम्य वातावरणात फिरत तिथल्या 16व्या शतकातली मशिद बघायला गेलो. अर्थातच निकिता मुलगी म्हणून तिला अल्लाची प्रार्थना करायला आत जायला मज्जाव होता. मी आत शिरुन आतल्या एक दोघांशी गप्पा मारेस्तो निकिताने तिथली पाचसहा चिल्लीपिल्ली गोळा करुन त्यांना चाॕकलेट्स देत गप्पा सुरु केल्या होत्या, (निकिताला ही चांगली नॕक आहे! ;-) ). इथेच जवळ एक म्युझीयमही आहे.

तिथनं आम्ही निघालो आणि अक्षरशः aimlessly भटकत मिळेल ती वाट पकडून तिथल्या गर्द रानावनांत...झ-याच्या बाजूने...शांत गच्च हिरवाईत...गारेगार पाण्याच्या ओहळाच्या बाजूने जात.. एका प्रचंड खळाळत्या पाण्याच्या प्रवाहापाशी आलो. त्याच्यावर एक छोटेखानी टूमदार पूल होता. त्या खळाळत्या पाण्याच्या प्रवाहातल्या एका खडकावर बसून फाॕरेनर्स वाटावेत अश्या एका प्रेमी युगुलाचं कुचीकूs चालू होतं ;-) 

तिथून निघून आम्ही बाल्टि हेरीटेजच्या शोधात पुन्हा खळाळत्या नदीच्या खालच्या अंगाचा मोठा पूल गाठला. पुन्हा समोरच्या वाटेने डोंगर चढत थोडे वर आलो तर समोर एक छोटा स्मार्ट मुग्गा "हलोs" करत आमच्या जणू स्वागताला हजर असल्यासारखा समोर आला! अख्तर हुसेन असं काहीसं मोठ्या माणसाचं नाव असलेला तो पोरगा लाघवी आणि बडबड्या निघाला!..अगदी माझं आणि निकिताचं नावबिव विचारुन मला दोस्तीत आरेतुरे करत गप्पा मारायला सुरुवात त्याची!! ;-) 

त्या गोड पोरानेच आम्हाला बाल्टी हेरीटेज साईटवर नेलं...आता जराजरा आधुनिक जगाला सरावलेल्या तिथल्या बाल्टी लोकांनी शेकडो वर्षांपूर्वीच्या त्यांच्या राहणीमानाच्या, लोकजीवनाच्या खुणा जपून त्यांचा जणु कायमस्वरुपी म्युझियमच केलाय. आम्हाला तिथली माहिती द्यायला आलीया नावाची आत्यंत रेखीव चेह-याची गुलाबीगोरी मुग्गी आली. मग तिची दादीसुद्धा (आज्जी) आम्हाला जाॕईन झाली आणि तिने डिटेलमधे आम्हाला सगळ्या भांड्यांची, कपड्यांची, अवजारांची माहिती दिली. आगदी तो 150 वर्षांपूर्वी वापरात आसलेला चुल पेटवण्याचा भाता कसा वापरतात ते दाखवून!.मजा म्हणजे ते करताना सुरुवातीला तिच्या नातवाने आणि नातीने रडून गोंधळ घातलानतर हिने त्या दोघांना आपण "भोपळा भोपळा" करतो तस्सं पाठीवर बसवून बांधून!..आम्ही निघताना त्या म्हाता-या आज्जीची तिच्याहून बर्रीच म्हातारी असलेली चाची थरथरत वाकत समोर आली...का कोण जाणे मी त्या क्षणी त्या दोन्ही आज्ज्यांना "सलाम" न म्हणता चक्क वाकून नमस्कार केला...गंमतच वाटली त्याचीही दोघींना.... ;-) 

तिथून पुढे काही अंतरावर पोलो ग्राउंड आहे जिथे फक्त मार्च महिन्यात हाॕर्स पोलोच्या टूर्नामेंट होतात. आणि आसपासच्या गावातली तरुण मंडळी पोलो खेळायला जमतात. तिथून आमच्या राहण्याच्या ठिकाणी परत येईपर्यंत आमच्या छोट्या दोस्ताने अख्तर हुसेनने आम्हाला बडबड करत छान साथ दिलीन इतकंच नव्हे तर वाटेत एका कुंपणावर चढून आम्हाला खूपसारे अॕप्रीकाॕट्सही तोडून खिलवले...ते गोडगोड ओंजळभर अॕप्रीकाॕट्स हाणतच आम्ही परतलो..

आजचा दिवस विलक्षणच अनुभव देऊन गेलाय..
-----
(६)
कोकणात जशी समुद्राला लागून वाडी असणार्यांना समुद्राची गाज सतत ऐकू येते, तसंच आम्हाला आमच्या रुमच्या मागेच खालून वाहणार्या बर्फिल्या, फेसाळ नदीच्या खळाळत्या प्रवाहाचा आवाज रात्रभर कानात येत होता. पहाटे साडेचारलाच जाग आली प्रचंड एक्साइटमेंटने, कारण आज पाकिस्तान आॕक्युपाईड कश्मीरच्या बाॕर्डरवर जायचं होतं!

तुर्तुकपासून हे थाँग गाव जेमतेम सात किलोमीटर्सवर. इथे "सियाचेन युनीट 3" च्या अंतर्गत येणार्या मिलीटरी पोस्टशी आम्हाला थांबून परमीट आणि आधार कार्ड्स दाखवावी लागली. आम्हाला 25-30 मिनीटं थांबावं लागेल त्याशिवाय सोडलं जाणार नाही हे ऐकून किंचित खट्टू झालो पण तोपर्यंत तिथल्या पोस्टवर देखरेख करणार्या पंजाब रेजीमेंटच्या अधिकार्याशी (सतवंतसिंग) यांच्याशी छान गप्पा झाल्या.

पंजाब रेजिमेंट इथे दोन वर्ष मुक्कामासाठी आहे. सतवंतसिंग एकदम फिट्ट शरीरयष्टीचा आणि मेजर अभिनंदन स्टाईल मिशा आणि कल्ले राखलेला माणूस! त्यांनी तोपर्यंत मला आणि निकिताला चहा आॕफर करुन चहा पीत छान गप्पा मारल्या. 

त्यांनी सांगितलं की 1971च्या युद्धादरम्यान भारतीय सैन्याने पाकिस्तानव्याप्त प्रदेशात 60 किमीपर्यंत आत मुसंडी मारून थाँग, त्यॕक्शी आणि तुर्तुक अशी तीन गावं जिंकली आणि सैन्य पाकव्याप्त प्रदेशात आणखी पुढे जाणार तितक्यात शस्त्रसंधी (ceasefire) जाहीर झाली आणि मग थाँग गावाशीच लाईन आॕफ कंट्रोल बनली! तिथेच 18000 फुटांवर एक आणि 19000 फुटांवर एक अशी आपल्या सैन्याची दोन ठाणी आहेत! (22000 फुटांपेक्षा जास्त ऊंचीवर बाराही महिने बर्फात तळ ठोकून डोळ्यात तेल घालून पहारा देणारं सियाचेनचं ठाणं हे तिसरं!)..त्यांच्याशी बोलून तिथल्या एका गार्डशीही थोड्या गप्पा झाल्या. मला त्याची "इन्सास रायफल" फारच आवडली! दरम्यान सतवंतसिंग यांनी पुढच्या थाँगच्या पोस्टकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यावर आम्हाला तिथून जायची परवानगी दिली. (सतवंतसिंगांशी हात मिळवून सॕल्यूट करुन निघताना- पुढच्या जन्मी "आपणही तीनपैकी कुठल्याही सैन्यदलातला, पण असाच एखादा हँण्डसम फौजी अधिकारी असावं" असा भाबडा विचार मनाला चाटून गेला!) ;-) 

वाटेत एका स्थानिकाने थाँग मिलीटरी पोस्टपर्यंत लिफ्ट मागितली. त्याला घेऊन निघालो. कारमधे त्याच्याशी गप्पा झाल्या. महम्मद हुसेन! थाँगचा रहिवासी. त्याचे दोन भाऊ 1971च्या युद्धाच्या वेळी पाकिस्तानी सैन्यात होते. ते  नंतर तिकडेच राहिले आणि हा इथे. सध्या त्यॕक्शीमधे असतो, आता त्याची भावांशी भेट नाही येणंजाणंपण  नाही असं म्हणाला...

थाँगपर्यंत कच्चा रस्ता क्षणोक्षणी मनात उत्सुकता वाढवत होता कारण आम्ही आता अगदी LOC पर्यंत जाऊन थडकणार होतो!..समोर पाकव्याप्त कश्मीरचे डोंगर दिसायला लागले आणि एका वळणावर, आपल्या मिलीटरीने लावलेला बोर्ड समोर आला - "You are under enemy observation!"...

आईशप्पथ! ..कस्सला रोमांचक क्षण होता तो!..आजपर्यंत माॕलमधे, दुकानामधे, एअरपोर्टवर, सोसायटी काँम्लेक्समधे "You are under CCTV surveillance" पाटी बघायची सवय..पण इथे थेट अगदी जवळ समोरच दिसणार्या डोंगरातल्या बंकर्समधून, पाक सैनिक आपल्यावर बायनाॕक्युलर्स रोखून आहेत - हे फिलींग विलक्षण होतं!!...

आम्ही शेवटच्या चेकपोस्टवर पोचलो. इथनं भारताचं शेवटचं थाँग गाव दिसलं. फक्त 25 घरं आणि 150 माणसांचं गाव (शहरातल्या एकेका सोसायटीत त्याहून जास्त माणसं राहत आसतात!). समोर पाकव्याप्त कश्मीर. मधे फक्त फेसाळत उधळत निघालेली श्याँक नदी. तीच आपल्याला  आणि शत्रुला वेगळं करणारी नैसर्गिक बाॕर्डर!  तिथल्या चेक पोस्टच्या पुढे जायला मात्र कुणाही नागरिकाला परवानगी नाही. तिथे एक किरकोळ फेन्सिंग दिसतं. LOC!..बघून थरारलो!

समोर आपण बायनाॕक्यूलर्समधून पाकड्यांचे बंकर्स बघू शकतो जिथे ते शस्त्रसज्ज सैनिक असतात. पण आपलेही तत्पर शूर सैनिक तिथे समोरच दिवसरात्र पहारा देत असल्याने, आज माझ्यासारखा सामान्य फाटू नागरिक तिथपर्यंत निर्धास्त जाऊ शकतोय! 

या सियाचेन वाॕरियर्सने ठिकठिकाणी देशप्रेम व्यक्त करणारे सुंदर बोर्ड्स लावलेत! "Indra col to Indira point India is one".."From K2 to Kanyakumari Bharat is one!" किंवा अगदी पर्यावरण जागृतीसाठी "Plastic or Planet"...

पाक सैन्य हिंमत करु नये म्हणून अत्यंत खडतर परिस्थितीत इथल्या सरहद्दीवर अहोरात्र पहारा देणार्या सियाचेन वाॕरीयर्सना आणि एकूणच भारतीय सैन्याला मनापासून कडक सॕल्यूट करताना छाती अभिमानाने भरुन आली आणि सद्गदीत होत डोळ्याच्या कडेला अश्रु उभे राहिले! (जातायेता वाटेत सैनिकांना आणि त्यांच्या सामानाला सरहद्दीकडे घेऊन निघालेल्या मिलिटरी ट्रक्सच्या रांगा लागल्या की भाबडेपणाने मी एक सलाम करायचो!)

मला नेहेमी वाटतं आपण शहरात जगणारे एरवी किती हरामखोर आसतो! आपापल्या वार्षिक अप्रेजल्सनंतर सॕलरीज आणि भत्ते वाढण्याच्या अपेक्षा ठेवताना किती वेळा सरहद्दीवर तैनात आसणार्या सैनिकांच्या भत्त्यांचा
विचार करतो? गदिमांनी म्हटलं होतं त्याचा विचार करता -  "सैनिकहो तुमच्यासाठी सध्याच्या किती भारतीय नागरिकांचा (मी आलोच त्यात बेक्कार माणूस!) घास रोज अडतो ओठी??" आपले यच्चयावत सर्वभाषिक हरामखोर टीव्ही न्यूज चॕनल दाखवत आसलेली सैनिकांवरची दगडफेक आणि ती गोळ्या न झाडता सहन करणारे सैनिक किंवा पुलवामासारख्या हल्ल्यांचं कव्हरेज टीव्हीवर बघताना हातात जेवणाचं ताट असतंच ना भारतीय नागरिकांच्या (मीही नालायक आलोच त्यात!)?? कितीजण न जेवता उपाशी राहतात ती दृश्य बघून..खरोखर घास घशाखाली उतरत नाही म्हणून?...

(हे होतं कारण एकच - भारतीय सैनिक सोडल्यास सामान्य भारतीयाला देशाविषयी आणि तिरंग्याविषयी प्रेमच नाही. उद्या प्रत्येकाला सांगितलं की "उद्यापासून दुप्पट सॕलरी देतो पण कुठल्याही क्षणी गोळी खायची तयारी ठेवून सीमेवर/ कश्मीरात जायचं"- तर कितीजण तयार होतील? आपलं प्रेम म्हणजे सिनेमा थिएटरमधे राष्ट्रगीत लागल्यावर उभं राहायचं आणि ते संपल्यावर कुणी "भारतमाता की ---" असं अर्धवटच बोंबलल्यावर "ज्जय!" म्हणून ते पूर्ण करत समाधानानं खाली बसणं!

हे होतं कारण आपण कोणीच मिलीटरी शिस्त पाहिलेली नसते..कारण "प्रत्येक धडधाकट स्त्री पुरुषाला किमान दोन वर्षं तरी मिलिटरी शिक्षण हवंच" असं ठासून सांगणारे वीर सावरकर कायमच वाळीत टाकले गेले जाणूनबुजून. आणि वहीच्च मार खा गया हिंदोस्तां!! 

पण अजूनही वेळ गेलेली नाही - "आयुष्याची दोन वर्षं प्रत्येक धडधाकट माणसाने मिलीटरी शिक्षण घ्यायचा" कायदा आणायला हवा...असो. भरकटलो लिहिताना...

तिथनं निघालो. येताना डिस्कीटच्या बौद्ध माॕनेस्ट्रीला अगदी धावती भेट दिली आणि थेट लेह गाठलं. हेक्टीक प्रवास पण LOC जवळचे क्षण आयुष्यभर लक्षात राहणारे. माझं सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगणं तुर्तुकला जरुर जा आणि पुढे थाँग ला LOC ला भेट देऊन आपल्या जवानांना एक कडक सॕल्यूट नक्की द्या!! ते तिथे आहेत म्हणून आपण आहोत!!
------------
(7)
आजचा दिवस आरामाचा आणि लेहमधेच जवळपास फिरण्याचा.

सकाळी उशीरा उठून चांस्पा रोडवरच्या आमच्या लाडक्या "La Piazzetta" मधे "काँन्टिनेन्टल ब्रेकफास्ट विथ हाॕट चाॕकोलेट" हाणलं..नंतर सहजच तिथल्या अफाट स्वच्छ वाॕश रुमच्या दारातल्या, अफाट स्वच्छ वाॕश बेसिनमधे थोबाडावर अफाट गार पाणी मारुन, अफाट स्वच्छ आरश्यात, अफाट लख्ख उजेडात स्वःचा थोबडा बघितला....बघतो तर काय?!! 

गेल्या आठवडाभरात गरगर फिरताना पहिल्यांदाच इतक्या अफाट स्वच्छ आरश्यात, लख्ख उजेडात, इतका नीट स्वतःला बघत असावा. तर - गंमत अशी की मी या लडाखी राज्यात, लडाखी हवामानात आणि लडाखी माणसांत जेमतेम आठवडा काढलाय तरी इतक्यातच; जश्या त्यांच्या कपाळावर, डोळ्यांच्या कडांना आणि गालावर सुरकुत्या असतात ना, तश्श्या सुरकुत्या कमावलेल्या दिसल्या मीसुद्धा थोबाडावर!! ;-) 

वाटलं होतं या 11000 फुटांवरच्या थंड हवेने थोबडा तांबूसबिंबूस गोराबिरा होईल- पण कसचं काय; उलट इथल्या कमी आॕक्सिजनमुळे थोबाडभर सुरकुत्याच पांघरुन जास्तच काळवंडून घरी परतणारेय मी च्यामारी!! ;-) When in Rome, do as the Romans do" ही उक्ती आयुष्यभर ऐकत आलोय, पण "When in Leh, wear rinkles on face as the Ladakhis do" ही नवी उक्ती आता माझ्यापास्नंच सुरु होत्ये हां का! :-D 

हादडून झाल्यावर मार्केट स्क्वेअरमधे फेरफटका मारला निकिताच्या खरेदीसाठी! प्रत्येक दुकानात निकिता शिरली की मी दुकानाबाहेर पहारेक-यासारखा उभा! (मी हा रोल आयुष्यभर बायको/मुलींबरोबर खरेदी करायला गेल्यावर करत आलोय! माझ्यात तो ठळ्ळक दोष आहे ..मला बायको/ मुली खरेदीसाठी शिरल्या की काय करायचं समजतच नाही. बरं इकडेतिकडे बघत बसलो तर पुलंसारखा "अंग ना? गोरं आहे की!" किस्सा घडणार हे तर नक्कीच! ;-) त्यापेक्षा गपगुमान बाहेर उभा राहून झुक्याच्या कृपेने लाभलेला फेसबुकनामक अशक्य टाईमपास काय वाईट? (WApp भीषण..त्याबद्दल बोलायलाच नको!)....

मित्रमैत्रिणींना भेट देण्यासाठी प्रेयर फ्लॕग्जपासून फ्रीज मॕग्नेट्सपर्यंत आणि स्लींग बॕग्जपासून हेअर पिन्स आणि नाकात घालायच्या वेसणीपर्यंत (नोज पीन) निकिताची अनगिनत खरेदी झाल्यावर, त्या कश्मीरी दुकानदाराने मला हाक मारत सुहास्य मुद्रेने "साब जी आप नही लेंगे अपने लिये कुछ?" म्हटल्यावर विरघळून, मी का कुणास ठाऊक मला अत्यंत विनोदी दिसणारी अफगाणी टोपी विकत घेतली. ती घालून पुण्यामुंबईत फिरण्याचं तसंही डेअरिंग होणं कठीणैय..पण हे बहुदा माझं कार्मिक देणं असावं त्या कश्मीरी दुकानदाराला. दिलं झालं!! ;-)

नंतर मार्केटजवळच्या टॕक्सीस्टॕण्डकडे मोर्चा वळवून टॕक्सी केली फिरण्यासाठी. टॕक्सी ड्रायव्हरशी अर्थातच माझ्या गप्पा सुरु झाल्या. लडाखच्या जुन्या राजघराण्यातल्या एका राजाचं "त्सेवंग नमग्याल" हे नाव असल्याचा सार्थ अभिमान होता त्याला. नमग्याल म्हणजे युयुत्सु!
आणि त्याने सांगितलं की त्यांच्यात बारश्याला नाव आईवडिल ठेवत नाहीत तर मुलाला घेऊन घरच्यांनी धर्मगुरुंकडे जायचं असतं.आणि मग मुलाचं भविष्य कसं असावं याचा विचार करुन धर्मगुरु देतील ते नावच त्या मुलाला ठेवण्यात येतं त्यानुसार रिंन्पोचे यांनी त्याला हे छान नाव,दिल्याचा त्याला कोण आनंद!!!

त्याच्या टॕक्सीतून आम्ही आधी गेलो थेट शांती स्तुपाकडे!

लेह शहरातलं हे बहुदा सर्वात उंच ठिकाण आणि इथनं सूर्योदय, सूर्यास्त बघायला मजा येते खरं तर! जपानच्या ग्योम्यो नाकामुरां यांनी याची संकल्पना मांडली आणि कुशोक रिन्पोचे यांचं अनुमोदन आणि शुभेच्छा मिळाल्यावर या स्तुपाच्या बांधणीचं काम इथल्या उंच डोंगरावर सुरु झालं. दलाई लामांच्या हस्ते भूमीपूजन होऊन याचं अप्रतिम देखणं स्ट्रक्चर तयार झालंय! या स्तूपाच्या भोवतालच्या गॕलरीच्या कठड्यांवर ठराविक अंतराने दिशादर्शक बाण लावले आहेत आणि त्या बाणांच्या दिशेने नुस्ती नजर टाकली तरी आपल्यला खारदुंग-ला, सिंधूचा संगम, सेमो वगैरे लेहची प्रमुख आकर्षण असणारे 5-6 स्पाॕट्स तात्काळ आयडेंटीफाय करता येतात आणि पाॕवरफूल बायनाॕक्यूलर असेल तर ब-यापैकी दिसतातसुद्धा! 

आमचं पुढचं डेस्टिनेशन वेगळ्या दिशेला होतं. एअरपोर्ट रोडवरचं "हाॕल आॕफ फेम"!! 1947 पासून ते आतापर्यंतची आपल्या आर्म्ड फोर्सेसची विजयगाथा मांडणारी ही अफ्फलातून गॕलरी!! किमान दोन तास इथली सर्व दालनं पाहण्यात आणि आपल्या शूर जवानांच्या शौर्यगाथा वाचण्यात सहज जातात! सुरुवातीच्या पहिल्याच दालनात लडाख राज्याचा इतिहास, इथल्या लोकांना सहन करायला लागलेल्या परकीयांच्या स्वार्या, त्यातून चिवटपणे त्यांनी जपलेली त्यांची संस्कृती आणि एकुणातलं लोकजीवन, चालीरिती यांची भरपूर ओळख आपल्याला होते. मला विशेष गंमत वाटली ते या समाजात अज्जूनही "गांधर्व विवाह" अत्यंत मोकळेपणे स्विकारले जातात याविषयी तिथे दिलेली तपशीलवार माहिती! 😍

पुढच्या दालनात आपण शिरतो आणि पहिल्या पाच सेकंदात अक्षरशः भारावून जातो ते तिथे अत्यंत नेटकेपणे मांडलेल्या (डिस्प्ले केलेल्या) आपल्या 7 परमवीरचक्र विजेत्या आणि 35 महावीरचक्र विजेत्या फौजींच्या शौर्यकथा वाचताना!..मला तर पहिल्या चार कथा वाचल्यानंतर पुढचं वाचताच येईना इतकी डोळे अश्रुंनी डबडबले होते..

हे प्रदर्शन पाहताना विशेषतः सियाचेनमधे 23000 फुटांवर " -20' अंशाखालच्या मरणप्राय थंडगार तापमानात आपले जिगरबाज सैनिक कसे राहतात, त्यांचं तिथलं रोजचं जीवन किती अशक्य कठीण आहे, वर्षभर बर्फात गाडून घेऊन देशाचं रक्षण करणं ही जबाबदारी ते कुठल्या दिलेर वृत्तीनं आणि अचाट धैर्यानं पार पाडतात, त्यांना धड खाता येतं का, झोप मिळते का, इतक्या उंचीवर महिनो न महिने शून्याखालच्या तापमानात कुटुंबापासून, मित्रमैत्रिणींपासून दूर एकटं राहताना किती भयानक मानसिक त्रास होतो, भास आभासांना ते कसे तोंड देतात हे पाहताना, वाचताना आपण अक्षरशः सद्गदीत होतौ आणि डोळ्याच्या कडांना अश्रुंची धार लागते...

या "हाॕल आॕफ फेम"मधे डिस्प्ले केलेली आपल्या जिगरबाज सैनिकांची काही वचनं किंवा स्लोगन्स आपल्या अंगावर रोमांच उभे करतात. जसं की -
"We live by chance, Love by choice and Kill by profession!"

"On the battlefield, the military pledges to leave no Soldier behind!"

"If you can dream it Yo can do it. It always seems impossible Unless it is done!".....

मला राज्यकर्त्यांना सांगावंसं वाटतं की या "हाॕल आॕफ फेम"च्या हुब्बेहुब प्रतिकृत्या भारतभर प्रत्येक राज्यातल्या, किमान मुख्य चारपाच शहरांत असायलाच हव्यात!! हव्यातच!! कारण इतक्या वर्षांच्या भ्रष्ट राजकीय परिस्थितीमुळे हतबल झालेल्या आणि आसपासच्या जातीपातीतल्या (पद्धतशीर लावण्यात येणार्या) विखारी भांडणांमुळे नकारात्मकतेने ढेपाळलेल्या भारतीय जनतेला-  आपल्या शूर फौजींच्या या रोमांचक सत्यकथा, त्यांचे युद्धादरम्यानचे स्फूर्तीदायक फोटोज, अत्यंत खडतर भौगोलिक परिस्थितीत आणि प्रतिकूल भीषण हवामानात पाकिस्तानी आणि चीनी सैनिकांच्या गोळ्यांचा आणि बाँम्ब्सचा मारा अंगावर झेलत त्यांनी बलिदान देत केलेलं भारतीय सीमांचं रक्षण, वेळोवेळी केलेला शत्रुंचा पराभव आणि जिंकलेले प्रदेश यांचं हे प्रदर्शन नक्कीच प्रत्येक नागरिकाच्या मनात जाज्ज्वल्य देशाभिमान जागृत करेल आणि समाजात वाढीला लागलेली आणि काही पुढा-यांकडून खतपाणी घालून वाढवली जाणारी जातीपातीतली दरी दूर होऊन एक सकारात्मकता नक्की जन्माला येईल! 🙏🏻

कुणी सांगावं - जातीपातीत भांडणं लावणा-या, अगदी वेबसाईट्स काढून पद्धतशीरपणे दुस-या जातींवर आगपाखड करणा-या पुढा-यांनी आणि त्यांच्या आदेशांचं अंधपालन करणा-या अनुयायांनी असले भेदाभेद बिल्कुलच न पाळत, तिरंग्याच्या संरक्षणासाठी जातीभेद विसरुन प्रसंगी आपल्या Buddyसाठी आपल्या जिवाची बाजी लावणा-या सैनिकांच्या या शौर्यगाथा वाचल्या/ पाहिल्या तर त्यांनाही त्यांच्या आजपर्यंतच्या हीन कृत्यांची, थर्ड क्लास विचारसरणीची लाज वाटून त्यांचंही मतपरिवर्तन होण्याची शक्यता नक्कीच!!! 

"हाॕल आॕफ फेम"चा पगडा एव्हढा होता की नंतर कुठे जावंसंच वाटेना..त्यात आमच्या डोळ्यांतल्या धारांना साथ द्यायला बाहेर पावसाची रिमझिमही सुरु झाली...

हाॕस्टेलवर परतलो. पाऊस कमी झाल्यावर पुन्हा मार्केट स्क्वेअरला चक्कर टाकून शेवटची किरकोळ खरेदी आटोपली. एका ठिकाणी कुणी युरोपियन एका विचित्र वाद्यावर छान सुरावटी छेडत होता ते ऐकून त्याला बक्षिशी देऊन निघालो. "ला टेरेझा"मधे चायनीज हादडून हाॕस्टेलवर परतलो. एअरटेल ला रेंज मिळाल्यावर काही मित्रमैत्रिणींचे कश्मीरमधल्या परिस्थितीसंदर्भातले आणि काळजीपोटी आलेले मेसेजेस वाचले. आणि मित्रमैत्रिणींना भेटायची ओढ लागली...
.....
(८)

पत्रापत्री

पत्रापत्रीमधल्या भावना  
-----------------------------
कोणे एकेकाळी आम्ही फुलस्केप्स भरभरून पत्रं लिहायचो त्याचा विषय निघाला! खरंच काय मझा असायचा इंटरनेट नसणाऱ्या त्या काळांत! हाताने पत्रं लिहायची मित्रमैत्रिणींना ..क्वचित इनलँडवर पण बहुतेकवेळा फुलस्केप्सवर लिहून, एन्व्हलपमध्ये भरून सील करून ठराविक स्टॅम्प्स चिकटवून जवळच्या पोस्टऑफिसच्या लाल पत्र्याच्या बॉक्समध्ये टाकायची आणि मग ती पोहोचून, मित्रमैत्रिणींकडून येणाऱ्या उत्तराची वाट बघायची!!!....खूप  आनंदी दिवस होते ते!! त्या इंटरनेट आणि ओघानंच फेसबुक नसण्याच्या युगात पेनफ्रेंड नावाचा प्रकार होता.  अनेक मासिकांमधून, साप्ताहिकांमधून खास चौकटी/ स्तंभ असायचे आणि मग त्याजरीये आपण देशविदेशातले मित्रमैत्रिणी मिळवून नंतर त्यांच्याशी त्यांच्याशी वैयक्तिक संपर्क साधून पत्रव्यवहार करू  शकत असू. मग त्यांतून पुस्तकं, स्टॅंप्स, माहितीची देवाण घेवाण होत असे! अशी जमलेली मॆत्रीसुद्धा वर्षानुवर्षं टिकत असे! काहींची तर त्यातूनच आंतरखंडीय लग्नसुद्धा जमायची!... आणि त्या पत्रापत्रीतनं पोस्ट खात्याला चांगलंच उत्पन्न मिळत असे!... आता ते सर्वच इतिहासजमा झालंय ...

काळानुरुप अनेक गोष्टी आउटडेटेड ठरतात आणि ठरत गेल्यात हे जरी अपरिहार्य असलं तरी दोन मनांमधला दुवा सांधणारं पत्र, एकाने हाताने लिहून पोस्ट केल्यावर दुसऱ्याला ते मिळून ते उघडून वाचण्यातून मिळणारा मझा काही औरच होता! आता हे जे इलेक्ट्रॉनिक पत्रापत्री (मेसेजामेसेजी!!) चालते त्यात कितीजण स्वतःच्या उत्कट आणि तरल भावना नेमक्या पोहोचवू शकतात? आणि मग आधीच पूर्णतः स्वतःच्या बुद्धीच्या क्षमतेचा वापर न करता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापर करण्याची दुर्बुद्धी बळावलेल्या आजकालच्या काळात, आयते उपलब्ध असणारे इमोटीकॉन्स आणि इमोजींची मदत घेऊन काम चालवून नेलं जातं.

सहज म्हणून धांडोळा घेतला तर समजलं की अशा प्रकारे चिहनांचा वापर करणं जवळपास १६० वर्षांपूर्वी म्हणजे १८५७ ला सुरु झालं होतं. म्हणजे जेव्हा भारतात १८५७चं बंड होत होतं तेव्हा तिकडे युरोप अमेरिकेत मोर्स कोड वापरून संदेश पाठवणाऱ्यांसाठी द नॅशनल टेलिग्राफिक रिव्ह्यू अँड ऑपरेटर्स गाईडने "73" हा मोर्स कोड "लव्ह अँड किसेस"ची खूण म्हणून वापरायला सुरुवात केली होती. पुढे डॉजने काढलेल्या मॅन्युअल मध्ये त्यासाठी "88" हा नंबर दिला होता. 

त्यानंतर १९१२ साली एंब्रोस बिअर्सने ‿ हे चिह्न हास्य म्हणून वापरायला सुरुवात केली तीच बहुदा पहिली स्माईली!! त्यानंतर मॅड मॅगेझीनने काही अशाच चिह्नाची एक लिस्ट १९६२च्या अंकात टाईपरायटून्स (Typewri-toons) म्हणून दिली आणि लोकांनी ते वापरायला सुरुवात केली. पण आज आपल्याला जागोजागी दिसणारा पिवळ्या गोलातला हसरा चेहरा स्माईली हा मात्र १९६३ साली हार्वे बॉल या फ्रिलान्स आर्टिस्टने जगाला दिला. आणि तो कित्ती प्रचंड लोकप्रिय झाला ते आपण बघतोच बघतोच! पुढे १९७२ साली इलिनॉय युनिव्हर्सिटीने काही इमोटीकॉंन्स त्यांच्या PLATO IV कॉम्प्युटरमधून वापरयाला सुरुवात केली. स्कॉट फामनने तर इमोटीकॉन्सच्या क्षेत्रात क्रांतीच केली होती. पुढे १९९६ साली निकलस लुफ्रानीने 'द स्माईली' कंपनीच स्थापन केली आणि शेकडो स्माईली जगासमोर आणले. पाठोपाठ जपानच्या शिगेताका कुरीताने अफलातून ईमोजींची निर्मिती केली. आणि नंतरच्या काळात कॅट मोमोई, मार्क डेव्हिस, यासुओ किडा आणि पीटर इडबर्गच्या योदाननामुळे हे सर्व इमोटीकॉन्स आणि इमोजींनी आपलं आयुष्य ओसंडून वाहिलेलं पाहतोय!

विचार केला तर यातला फोलपणा जाणवतो. केवळ वेळ वाचावा म्हणून भावना शब्दबद्ध करणं टाळून हे इमोटीकॉन्स आणि इमोजीज वापरले जातायत अगदी फेसबुक, व्हॉट्सऍप सगळीकडे सकाळी उठल्यापासून मध्यरात्री झोपेपर्यंत!!... पण त्यात खरंच आपली सर्व भावना पोचू शकतात? तंतोतंत?? 

ज्ञात माहितीनुसार, एकमेकाला आपल्या भावना कळण्याचा मानवाचा प्रवास इसवी सनापूर्वी ५०० वर्षांपूर्वी पर्शियाच्या राणी ऍटोस्सापासून सुरु झाला खरा; पण आज २०१८ साली आपल्या भावना आपल्याच शब्दांत मांडणारी पत्रं पाठवणं सोडून आपण खुशाल कॉम्युटर/मोबाईलने समोर आणलेल्या चिन्हनांचा आधार घेत सुटलोय. मान्य की एकीकडे जग जवळ येत असताना माणूस माणसाला समोर भेटणं टाळतोय आणि त्यामुळे वपुंनी फार सुंदर शब्दांत मांडलेलय सत्याला ("डोळे आणि स्पर्श हे शब्दांपेक्षा सुंदर बोलतात") आपण पारखे होत चाललोय...

मला स्वतःला फोनवर संवाद साधणं तितकंसं जमत नाही. मला 'तो' किंवा 'ती' समोर हवे असतात, त्याच्या/तिच्या भावना, रेसिप्रोकेशन, म्हणणं समोर बोलून त्यांच्या चेहऱ्यावर उमटून जे कळतं ते फोनवर नाहीच कळू शकत ...आणि माणूस समोर नसेल तर निरुपायाने आपल्या भावना/ म्हणणं हे पत्र लिहूनच कळवावं लागतं आणि या आधुनिक काळात पत्र लिहिणंही मागे पडून मोबाईलवर लिहायची वेळ आल्ये. 

गेले ते रम्य दिवस...आता त्या मित्रमैत्रिणींनाही तितकं मोठं पत्र लिहायला वेळ नसणार.....शेवटी कितीही म्हटलं तरी 'संवाद' समोरासमोर बसून होतो तोच खरा! नै? 😉

Monday, 21 June 2021

योग-दिन

योग-दिन
-------
आज गुगल करत योगाविषयी माहिती घेत होतो. तर काही इंटरेस्टिंग गोष्टी समोर आल्या -

अमेरिकेत भारताप्रमाणेच फिल्मी सिता-यांचा जनमानसावर प्रचंड पगडा आसतो! तर भारतातूनतिथे गेलेल्या योगाचार्यांनी योगाविषयी जितकं कुतूहल निर्माण केलं त्यात प्रचंड भर टाकली ती ग्रेटा गार्बो, इव्ह गेबाॕर, ग्लोरिया स्वॕन्सनसारख्या स्टार्सनी! त्या योगासनांत एक्स्पर्ट होत्याच! पण योगाविषयी प्रचंड आकर्षण निर्माण केलं ते मदनमंजिरी मेरिलीन मन्रो ने! ती म्हणे लीलया योगासनं करु शकायची आणि शिर्षासनात तर हातखंडाच तिचा!

हे वाचून भारी वाटलं. म्हणजे कृष्णम्माचार्य, अय्यंगार सारख्या योगगुरुंनी आणि एकेकाळच्या १९२० च्या दशकात भारतात काम करुन गेलेल्या युजिनिया पीटरसन उर्फ इंद्रादेवी सारख्यांनी अमेरिकेत नेलेला "योग" तिथे रुजवण्यात मेरिलीनच्या ग्लॕमरचंही योगदान महत्त्वाचं ठरलं!

आपल्याकडे मला वाटतं जुन्या जमान्यातल्या फारश्या कुणी योगासनांच्या पोझेस दिलेले फोटोज आठवत नाहीत. हां..त्यातल्या त्यात हेमामालिनीच्या "ओ घटा सांवरी थोडी थोडी बावरी.." सारख्या गाण्यांतल्या मोहक पोझेस...आणि मग थेट अलीकडच्या जमानातल्या शिल्पा शेट्टी आणि मलायका अरोराने दाखवलेलं योग-प्रेम! ;-) 

पूर्वी म्हणजे गद्धेपंचविशी ते चाळीशीपर्यंत जेव्हा खरंतर अलम दुनिया व्यायाम करत असे, तेव्हा मी अंगात काठोकाठ भरलेल्या आळसामुळे व्यायाम केलाच नाही ("व्यायाम करुन काय कुणीही सुदृढ होईल!") आणि त्यावेळी योगासनांविषयी ग्रह होता की योगासनं ही अजिबाsत घाई न करता, सावकाsश, आरामाssत करण्याचे व्यायामप्रकार आहेत म्हणजे ते पन्नाशीनंतर करु..वगैरे.!!..(पण साली पन्नाशी केव्हाच उलटून गेल्येय आणि साठी जवळ आल्ये तरी तो मुहूर्त लागलाच नाही अजून! 

पण आता मात्र चक्क "परमहंस योगानंद" वाचायला घेतल्यावर "योग" प्रकाराचं कुतूहल पुन्हा जागृत झालंय! आजच्या योग-दिनाचं औचित्य साधत "जय रामदेवबाबा" म्हणत बारा सूर्यनमस्कार घालून सुरूवात करतोच कसा!!..(नैत्तरी ढेरी "वाढता वाढता वाढे,." होत चालल्ये आणि कोथरुडभर चाल चाल चालून ती कैय आत जायचं ज्याम नाव घेत नाहीये तिच्यावरही परिणाम होतो का बघू...!!..शुभस्य शीघ्रम्!!) ;-)

Saturday, 19 June 2021

लंडन अंडरग्राऊंड

एक अशीच अविस्मरणीय आठवण ...

१५ ऑक्टोबर २००६ ची रात्र! कंपनीच्या एका दीड महिन्याच्या ट्रेनिंगसाठी आम्ही चौघाजणांनी इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवलं! हिथ्रोवर उतरलो तेंव्हा रात्रीचे ९ वगैरे वाजले असतील. पुढच्या अडीच-तीन तासात कसल्या विलक्षण प्रसंगाला मी सामोरा जाणार आहे ह्याची मला कुठली कल्पना असायला!!...
 
एअरपोर्टवर आम्हाला रिसिव्ह करायला आमच्या कंपनीमधलच तिथला एक भारतीय मॕनेजर आला होता. हिथ्रोवरची प्रचंड गर्दी आणि त्यातले अनेक "सुंदर ब्लॉन्ड चेहरे" टिपत, आम्ही सामान ट्रॉल्यांवर टाकून प्रचंड पायपीट करत ट्यूबचं अंडरग्राउंड स्टेशन गाठलं. "लंडन अंडरग्राउंड उर्फ ट्यूब" हा एक स्तिमित करणारा मानवी चमत्कार!! "ज्युबिली लाईन्स, सर्कल लाईन्स, व्हिक्टोरिया लाईन्स, डिस्ट्रीक्ट लाईन्स, सेन्ट्रल लाईन्स" वगैरे वगैरे विविध नावाच्या ‘लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या’ अश्या विविध रंगीबेरंगी ९-१० रेल्वे लाईन्सचं पृथ्वीच्या पोटात एकाखाली एक आणि लंडनभर पसरलेलं जाळं!! सगळ्या स्टेशनांत पृथ्वीच्या पोटात खोलवर घेऊन जाणारे अजस्र एस्केलेटर्स!! आम्हाला हिथ्रोवरून ब्ल्यू लाईनने साऊथ केन्सिंगटनला जाऊन तिथून दुसऱ्या यलो-लाईनची ट्यूब पकडून लिव्हरपूल स्ट्रीटला जायचं होतं. आम्ही आमच्या प्रत्येकी एक मोठी आणि एक छोटी अश्या दोन दोन ब्यागा घेऊन ट्यूबमध्ये चढलो. गाडी म्हणजे काय तर जेमतेम दोन लांबडे डबे (रेक्स) एकमेकांना जोडलेले. आत शिरल्याशिरल्या खाडकन लागणारे स्वयंचलित दरवाजे. 

आत शिरून मधल्या मोकळ्या जागेत सर्वांच्या ब्याग्स ठेऊन आम्ही उभे राहिलो. दरम्यान जागा मिळाली म्हणून माझे मित्र आणि आम्हाला न्यायला आलेला गौरव शर्मा उजव्या बाजूला बसायला गेले. मी सामान सांभाळत (मुंबईच्या रेल्वेची जुनी सवय असल्याने) तिथेच मधल्या मोकळ्या जागेत उभा राहत आजूबाजूचं निरीक्षण करायला लागलो. रात्र असल्याने गर्दी असली तरी ती एकेक स्टेशनवर कमी कमी होत चाललेली! माझा पहिलाच इंग्लंडचा प्रवास. लंडनमध्ये उतरून जेमतेम अर्धा-एक तास झालेला. त्यामुळे आजूबाजूची माणसं आणि विशेषतः मुली बघून वेडाच झालेलो. आईशप्पथ, एव्हढे देखणे चेहरे असू शकतात जगात?!! समोरच दाराजवळ ट्यूबचे रंगीबेरंगी maps लावले होते. ते ही बघत होतो. असाच काही वेळ गेला... 

पुढचं स्टेशन आलं आणि कुठेतरी बसलेला गौरव शर्मा इतर तिघांना घेऊन अत्यंत घाईघाईत पुढे आला. आम्हाला त्याच स्टेशनवर उतरायचं होतं. मग मात्र आमची ज्यामच धावपळ उडाली. आधी ते चौघे खाली उतरले आणि मी सर्वांच्या बॕग्ज फटाफट त्यांच्याकडे टाकत शेवटी पटकन स्टेशनवर उडी मारली, माझ्या मागे धाड्कन दरवाजा बंद झाला आणि गाडी निघाली. पुढच्या २-३ सेकंदात हाश्यहुश्य करत सामान चेक केल्यावर लक्षात आलं की एक मोठी बॕग त्या धावपळीत गाडीतच राहिल्ये आणि ती नेमकी माझीच आहे!! झ्झालं!! मी त्यांना शिव्यांची लाखोली वाहून झाली- "साल्यांनो, तुम्ही कसे मस्त मजेत बसून आलात, मीच सामान सांभाळत उभा राहिलो ?!! आणि मग च्यु x न्नो, आपलं स्टेशन यायच्या थोडं आधीतरी यायचं पुढे…" वगैरे वगैरे. 

आणि आमचे हे वाद सुरु असतानाच, तेव्हढ्यात त्याच platform वर त्याच्या मागची गाडी आली. मी कसलाही विचार न करता आत उडी मारली आणि दारातून ओरडून त्यांना सांगितलं की, "मी आपल्या पुढे गेलेल्या गाडीचा पाठलाग करत शेवटच्या स्टेशनपर्यंत जाउन बॕग मिळते का बघतो" म्हणून!!...ते हतबुद्ध होऊन पाहेस्तोपर्यंत गाडीचे दरवाजे धडकन बंद झाले आणि गाडीने सटकन वेग घेतला!..

एक दोन क्षण दम खाउन मी भानावर आलो आणि मग मला जाणीव झाली की मी काय करून बसलोय ते! मला अचानक काही गोष्टींचा साक्षात्कार झाला की --> (१) मला लंडनमध्ये उतरून जेमतेम तास झालाय (२) मी लंडनच्या खालती पृथ्वीच्या पोटात एका वेगात जाणाऱ्या ट्यूब मध्ये मित्रांना आणि गौरवला सोडून एकटाच निघालोय (३) ती ट्रेन कुठे जात्ये ह्याची मला सुतराम कल्पना नाहीये (४) माझी बॕग राहिलेली पुढे गेलेली ट्रेन कुठपर्यंत पोचणार आहे ते मला माहित नाहीये (५) ह्या सर्व प्रवासाला किती वेळ लागणार ते मला माहित नाहीये -- हे सर्व जाणवून मला एकदम पोटात खड्डा पडल्यासारखं झालं. घसा कोरडा पडला. पण मी स्वतःला सावरलं..

आणि मग मला जाणीव झाली की मला तीन गोष्टींचा सहारा आहे - एक म्हणजे माझ्याजवळ सुदैवाने घाईघाईत खिशात कोम्बलेलं ट्यूबचं तिकीट आहे, दुसरं म्हणजे माझ्याजवळ माझा पासपोर्ट आणि पौंडाच्या नोटा आहेत आणि तिसरं म्हणजे माझ्या खिशातल्या बंद पडलेल्या पुण्याच्या मोबाईलमध्ये गौरव शर्माचा लंडनचा फोन सेव्ह्ड आहे!!..आणि मग मला थोडा धीर आला!.मी शांत होऊन शेवटचं स्टेशन यायची वाट बघत बसलो.

एकीकडे येणाऱ्या प्रत्येक स्टेशनवर माणसं उतरून डब्यातली गर्दी नाहीशी होत होती. उरलेली माणसं शांत होती. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. शेवटचं स्टेशन आलं तेंव्हां उरलीसुरली दोन माणसं ही उतरून वरच्या जमिनीच्या दिशेने नाहीशी झाली. मी झपाझप पावलं टाकत पुढे जाणाऱ्या मोटरमनला गाठलं आणि त्याला थोडक्यात माझी हकीकत सांगितली. त्याने मला अक्षरशः आपादमस्तक न्याहाळलं आणि वरती ऑफिसमध्ये जायला सांगितलं. धावतधावत मी ते वरच्या मजल्यावरचं ऑफिस गाठलं आणि तिथल्या दोघांना पुन्हा माझी कहाणी ऐकवली. त्यांना मी विनंती केली की "त्यांनी एकवार त्या लाईनवरच्या मोटरमन्सना शक्य असल्यास बॕग विषयी कल्पना द्यावी आणि मधल्या स्टेशनवर अनाउन्समेंट करून सांगावं वगैरे…". त्यांनी माझं बोलणं ऐकून माझ्यासमोर एक फॉर्म टाकला आणि तो भरून द्यायला सांगितलं आणि पुढे म्हटलं की मी एकदोन दिवसात "Lost and Found Dept" मध्ये जाऊन बॕग मिळते का ते पाहावं वगैरे..निराश होत्साता मी पुन्हा खालती उतरून platform गाठला. मागचीच आलेली गाडी पुन्हा उलटी निघाली होती मी मागचा पुढचा विचार न करता त्यात उडी मारली. .

किती वाजले होते कुणास ठाऊक. बॕगची आशा सोडून मी आता मित्रांना कुठे आणि कसं गाठता येईल त्याचा विचार सुरु केला. एव्हढं माहित होतं की मला पुन्हा साऊथ केन्सिंगटन स्टेशन गाठून तिकडून दुसऱ्या लाईन ची गाडी पकडायच्ये!. आता गाडीत मगाशी आलो त्यापेक्षाही कमी माणसं होती...पण त्यात ही मी माणसांचे विचित्र नमुने पाहिले. एक 'लेस्बियन कपल' होतं. दोघी प्रचंड चिकण्या पण तरी विचित्रच मेकअप केलेल्या. त्यांचे मधूनच चाळे सुरु होते...डब्यातली तुरळक माणसं तिकडे साफ दुर्लक्ष करून होती...दरम्यान एका स्टेशनवर एक फॕमिली आत शिरली. एक कपल आणि त्यांचं छोटं पोर! शिरल्यापासून ते नवरा बायको एकमेकात शिवीगाळ करून भांडत सुटले. "बास्टर्ड, बिच"...अश्या "ब" कारी शिव्या!! थोड्यावेळाने तो माणूस तर पिसाटल्यासारखाच करायला लागला. लोक त्यांच्याकडे अर्थातच दूर्लक्ष करून होते. पण मला मात्र त्याची भीतीच वाटायला लागली. एका क्षणी तर तो खिशातून गनबिन काढून तिला गोळीच घालणार की काय असा त्याचा आविर्भाव होता...

असं काय काय बघत मी एकदाचा साऊथ केन्सिंगटनवर पुन्हा परतलो. स्टेशनवर माझ्या मित्रांचा पत्ता नव्हता. रात्र होऊन ट्यूबची सर्व्हिस बंद होण्यापूर्वी मला लिव्हरपूल स्ट्रीट स्टेशन गाठायचं होतं. मी एकवार तिथला ट्युबचा map न्याहाळला आणि एक एस्केलेटर गाठून त्यावर आणखी खोल भुयारात उतरून दुसऱ्या लाईनच्या platform वर आलो आणि आलेल्या गाडीत उडी टाकली. दरवाजा बंद झाला आणि मटकन तिथल्या बेंचवर बसकण मारली . धावपळ करून मी अक्षरशः थकून गेलो होतो. आणि एव्हाना पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती. मग समोरचा ट्युबचा map पाहत असताना माझ्या लक्षात आलं की मी त्या धावपळीत दुस-याच लाईनची गाडी पकडल्ये जी मला भलत्याच दिशेला घेऊन चालली होती. आता मात्र माझा धीरच सुटला! आईशप्पथ! रात्रीचे ११ वाजून गेले असावेत आणी मी काहीही माहिती नसताना लंडन मध्ये उतरल्यापासूनचे पुढचे दोन तास पृथ्वीच्या पोटात कुठेतरी फिरत बसलो होतो. देश अनोळखी.. माणसं अनोळखी...रात्रीची वेळ..मी एकटा...सामान हरवलेलं..आणि भुकेलेला!!..

त्याही ट्यूबमधे माणसं कमीच होती. पण पुढे येणारं स्टेशन हे जंक्शनचं होतं म्हणजे जिथून दुसऱ्या क्रॉस लाईनची ट्यूब पकडता येऊ शकली असती. मग एका सौम्य चेहऱ्याच्या माणसाला मी पुन्हा एकदा थोडक्यात माझी हकीकत सांगून मला डायरेक्शन देण्याची विनंती केली. त्याने मला त्या स्तेशांवरून उतरून पुन्हा कुठच्या लाइनची (कुठल्या लाल. का पिवळ्या रंगाची) गाडी पकडायची ते सांगितलं आणि वरती हे ही बजावलं कि ती लिव्हरपूल स्ट्रीटला जाणारी 'रात्रीची शेवटची ट्यूब' असेल म्हणून!!..त्याचे आभार मानून पुन्हा त्या एस्केलेटरवर खालती-वर जात आणि एक दोन स्टेशन्स बदलून मी कशीतरी ती राईट ट्रेन पकडली आणि लिव्हरपूल स्ट्रीट स्टेशनवर त्या शेवटच्या ट्यूब ने उतरलो! रात्रीचे १२ वाजत आले होते बहुतेक....

इतक्या धावपळीनंतर पहिल्यांदाच मी पृथ्वीच्या पोटातून वर जमिनीच्या लेव्हलला आलो होतो. मग तिथल्या कॉफी शॉप मधून मी पौंडाच्या नोटेचे थोडे सुटे पैसे करून घेतले आणि जवळचा टेलिफोनबूथ गाठला. तर तिथे आधी काही समजायलाच तयार नाही - मग ट्रायल-एरर करत एकदाचा गौरव शर्माला फोन लावला आणि मी लिव्हरपूल स्टेशन एकदाचं गाठल्याचं सांगितलं आणि "स्टेशनबाहेर मला घेऊन जायला या" म्हणून सांगितलं! फोन ठेवला आणि स्टेशन बाहेर आलो तर माझ्या मागे त्या ट्यूब स्टेशनचं मोठ्ठं दार बंद होताना दिसलं. दार बंद करून एक ओव्हरकोटातला, धिप्पाड काळाकभिन्न पोलीस त्यासमोर उभा राहिला. मी बाहेर रस्त्यावर आलो. अखेर बऱ्याच कालावधीनंतर मी जमिनीवरचा मोकळा हवेतला श्वास घेत होतो. रात्री १२ नंतर!!..

रात्री त्या तुरळक गर्दीच्या फुटपाथवर एक दीर्घ श्वास घेतला आणि जाणीव झाली ती भयानक थंडीची! मग लक्षात आलं की मी फक्त जीन्स आणि टी शर्ट घालून त्या लंडनच्या थंडीत काकड्तोय! तेव्हढ्यात एक लाल डबलडेकर सुळकन बाजूने गेली आणि गार वाऱ्याचा सपकार बसला चेहऱ्यावर! त्याही परिस्थितीत थोडसं हसू आलं. इंग्लंडच्या भूमीवर पाय ठेवल्यापास्नं लंडनच्या पहिल्याच रात्री - पृथ्वीच्या पोटात खोलवर - विविध गाड्यामधले काही अविस्मरणीय तास…ते सुंदर देखण्या बायकांचे चेहरे…विविध देशधर्माची माणसं...काही ईरसाल नमुने.. काय काय पाह्यलं होतं मी?!!!! 

थोड्या वेळाने गौरव आणि सिजू मला शोधत आले आणि मी त्यांच्याबरोबर आमच्या मुक्कामाच्या हॉटेलात गेलो...तिथे एकाच रूममध्ये मग एकमेकांना यथेच्छ शिव्या घातल्या. माझ्या बॕगेत माझे सर्व कपडे आणि पुढच्या नॉरीच आणि लेस्टरच्या वास्तव्याचं सामान होतं ते गेल्याचं दु:ख मी व्यक्त करत असतानाच त्यांनी नाट्यमय पद्धतीने "ढ्यँण्ट ss ढ्याँ" वगैरे आवाज करत माझी "हरवलेली" प्बॕग कॉटखालून ओढून माझ्यासमोर ठेवली . मी थक्क होऊन पाहत राहिलो...!! मग उलगडा झाला की मी त्या पाठच्या ट्रेनमध्ये उडी घेतल्यावर त्यांनी साऊथ केन्सिंगटनच्या वरच्या ऑफिसमध्ये जाऊन माझ्यासारखीच अनाउन्समेंटची रिक्वेस्ट तिथल्या संबंधित मंडळींना केली होती. दरम्यान मी त्या शेवटच्या स्टेशनवर जाऊन करवलेले फोन्स आणि ह्यांचे फोन्स ह्याचा एकत्रित परिणाम होऊन त्या गाडीतून गेलेली बॕग कोणीही हात न लावता पुन्हा सुखरूपपणे साऊथ केन्सिंग्टनला पोचवण्यात आली होती आणि ती ताब्यात घेऊन, माझी काही काळ वाट बघून ती मंडळी सरळ आमच्या नियोजित हॉटेलवर पोचली होती....

त्यांनी मग भले माझं कौतुक केलं की "आपण बुवा तुझ्यासारखं - असलं मागच्या गाडीत उडी मारून "पीछा करो" केलं नसतं वगैरे....तरीही माझ्यासाठी ते दोनतीन तास आयुष्यभराची अविस्मरणीय याद ठेवून गेलेत..!!.

सेरेंडिपिटी

मी स्वतः कार्मिक कनेक्शन्स प्रचंड मानतो! काहींच्याबाबतीत अशा कार्मिक भेटी नव्या मैत्रीला जन्म देतात तर काहींजणांना एका अद्भुत प्रेमाची चाहूल देतात! काहीजण कदाचित एकमेकांच्या परिचयाचे असतात पण समोरासमोर आलेले नसतात आणि जेव्हा अशी गाठभेट घडते तेव्हा त्या पहिल्याच भेटीत एक विलक्षण ‘कशीश’ दोघांना जवळ आणते. दोघांचं एकमेकांत गुंतणं होतं. प्रीत उमलते. गेल्या काही वर्षांत मला खूपच म्हणजे प्रचंड आवडून गेलेली ‘सेरेंडिपिटी’ ही फिल्म अशीच ‘पहिल्याच भेटीत उमलणाऱ्या प्रेमा'वर आधारित पण प्रारब्ध, नियतीने घडवलेले योग आणि कार्मिक कनेक्शनच्याभोवती विणलेली एक आगळी प्रेमकहाणी!!
---------------------------------------
फिल्मची सुरूवात होते ती ख्रिसमस सीझनच्या धामधुमीत!! न्यूयॉर्कमधले बहुतेक  सर्वच मॉल्स ग्राहकांच्या अमाप गर्दीने खचाखच भरलेले! सर्वत्र छान सजावट! रंगीबेरंगी दिव्यांचा लखलखाट. रोषणाई. असाच एक भव्य मॉल म्हणजे "ब्लूमिंगडेल्स डिपार्टमेंटल स्टोअर"! तिथल्या कर्मचाऱ्यांची लगबग सुरु आहे. कुणीतरी नवीन आलेल्या बॉक्सेसमधलं सामान स्टँडवर लावण्यासाठी सॉर्टींग करत्येय! एका बॉक्समध्ये एक सुंदर काश्मिरी लोकरीच्या हँडग्लोव्ह्जची जोडी दिसते. कुणीतरी ती स्टँडवर लावण्यासाठी नेतंय. ख्रिसमस अगदीच तोंडावर आलाय. त्यामुळे 'ब्लूमिंगडेल्स'मधे कस्टमर्सची खरेदीसाठी एकच झुंबड उडाल्ये. त्याच धामधुमीत 'ती दोघं' खरेदीला आल्येत. जोनॅथन म्हणजेच ‘जॉन’ ट्रॅगर (जॉन क्युसॅक) आणि सेरा थॉमस (केट बॅकिंन्सेल)! तो दोघं वेगवेगळ्या शहरांत राहणारी. दोघांचे पार्टनर्ससुद्धा ठरलेत; पण त्या दोघांना कुठली कल्पना असायला की नियतीच्या मनात काही वेगळेच प्लॅन्स आहेत दोघांसाठी!! त्यांचं आयुष्यच पार बदलवून टाकणारे?

आपापल्या पार्टनरसाठी काय घ्यावं याचा विचार करत असतानाच दोघांची नजर एकाच वेळी त्या सुंदर काळ्याभोर लुसलुशीत कश्मीर हँडग्लोव्ह्जच्या जोडीवर जाते. दोघंही तिथे जातात आणि एकाच वेळी दोघांचे हात त्या ग्लोव्हजवर पडतात. त्यांची नजरानजर होते. मग नॅचरली दोघं एकमेकांना आउट ऑफ कर्टसी, ‘पहले आप, पहले आप’ करतात आणि तेवढ्यात तिसराच कुणी येऊन ते ग्लोव्ह्ज घेऊ पाहतो आणि मग मात्र दोघं मिळून त्याला कटवतात. आपणच एकमेकांचे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असल्याचं सांगत आणि काहीच्याबाही थापा मारत! हा सीन मजेशीर!! जोनॅथन सेराला ते ग्लोव्ह्ज घ्यायला लावतो. गप्पा मारत दोघं बाजूच्या ‘सेरेंडिपिटी’ पार्लरमध्ये आइस्क्रीम खायला जातात. बोलता बोलता, सेरा जॉनला त्या पार्लरचं ‘सेरेंडिपिटी’ हे नाव त्या शब्दाच्या ‘फॉर्च्युनेट अॅक्सिडेंट’ या अर्थामुळे आवडत असल्याचं सांगते. ती भाबडी आणि दैव, विधिलिखित यावर तिचा विश्वास. त्यावर जॉन पटकन उद्गारतो, ‘म्हणजे थोडक्यात ‘लकी डिस्कव्हरीच’, जशी तू आत्ताच मला त्या स्टोअरमध्ये भेटलीस तशी?’... आइस्क्रीम संपून दोघांची निघायची वेळ होते. जॉन तिच्याकडे सहजच फोन नंबर मागतो.

‘आपण एकमेकांना फोन नंबर देऊ या? जस्ट इन केस!’
‘जस्ट इन केस? कशाला?’
‘बघ ना किती छान वेळ गेला तुझ्यासोबत. पुन्हा भेट होईल न होईल.....म्हणून...’
‘हे बघ नशिबात असेल ना भेट होणं, तर नक्की होईल; पण आत्ता योग्य वेळ नाही ती!’
‘आणि हे बघ आपण नावं पण नाही सांगितली अजून. मी जोनाथन!’
‘मेरी ख्रिसमस जोनाथन’ ... 

एवढं बोलून ती एक गोड झप्पी देऊन निघतेसुद्धा कॅबमधून. या चुटपुट लावून गेलेल्या गोड मुलीच्या तशा वागण्याने निराश झालेला जॉन वैतागून निघतो घरी जायला; पण अंडरग्राउंडच्या जिन्याशी त्याला आठवतं आपण आपला स्कार्फ विसरलोय सेरेंडिपिटी पार्लरमध्ये. चरफडत तो पुन्हा चालत चालत तिथे जातो. बघतो तर तिथे, आपली विसरलेली बॅग न्यायला सेरा आलेली असते आणि त्याचा तिथे राहिलेला स्कार्फ हातात घेऊन विचारच करत असते. त्यांची पुन्हा योगायोगाने ही दुसरी भेट! तो जवळ आल्यावर ती त्याचा स्कार्फ त्याच्या गळ्यात घालते. तो तिला आपल्याबरोबर थोडा वेळ घालवण्याची विनंती करतो. बोलघेवडा जॉन तिला आवडलाय. कुठेतरी नकळत केमिस्ट्री जुळलीय त्या पहिल्याच भेटीत. ती चक्क हो म्हणते!

आइस स्केटिंग रिंक! दोघं गप्पा मारत स्केटिंग करतायत. हिवाळ्याची ती रम्य संध्याकाळ. आइस स्केटिंग रिंक रोषणाईने उजळून निघालीय. पार्श्वभूमीवर रोमँटिक म्युझिक सुरू आहे.

‘हां, तर तू अजूनही मला तुझा नाव सांगणार नाहीस तर. बरं मला सांग, तू मनापासून काय मिस करत्येस?’
‘माझी आई’
‘जर तुझी आई असतो तर मीही तुला मिस केलं असतं.’ (त्याच्या या वाक्यावर ती जराशी लाजते.)
आणि मग चक्कर मारता मारता दोघांची प्रश्नोत्तरं सुरू होतात. त्यातून एकमेकांच्या आवडीनिवडी... एकमेकाला जोखणं सुरू आहे जणू.
‘आवडता सिनेमा?’ ती विचारते.
‘कूल हँड ल्युक’
‘न्यूयॉर्कमधले अविस्मरणीय क्षण?’
‘हा जो जगतोय आत्ता, तो त्या यादीत टॉपला आहे!’
‘ओह...आय अॕम फ्लॅटर्ड’ (त्याच्या हलक्याश्या फ्लर्टींगने ती सुखावल्ये).

.... तेवढ्यात ती धडपडते आणि पडते. तिच्या हाताला खरचटलंय. तिचा हात हातात घेऊन जखम बघताना त्याचं लक्ष तिच्या हातावरच्या छोट्या ठिपक्यांकडे (फ्रेकल्स) जातं.

‘अगं, हे काही नुसते ठिपके नाहीत. नीट बघ ते कॅसिओपिया आहे.’
‘कॅसिओपिया?’
‘तुला नाही माहीत?’ असं म्हणत तो एक स्केचपेन मिळवून ते ठिपके जोडतो. इंग्लिश M किंवा W आकाराच्या कॅसिओपिया (शर्मिष्ठा) नक्षत्राची आकृती तयार होते. तो तिला त्यामागची कथा ऐकवतो. एव्हाना न्यूयॉर्कच्या ख्रिसमस सिझनमध्ये हमखास असणारं भुरूभुरू बर्फ पडायला सुरुवात झालीय. तिच्या केसांवर बर्फाचे हलके कण जमा झालेत. तो अलगद आपल्या बोटानी ते कण उडवतो. दोघांमध्ये एक अत्यंत तरल हळुवार काहीतरी नातं उमलतंय!... तो वाकून हलकेच तिच्या हातावरच्या जखमेचं चुंबन घेतो. हळुवार जवळीक दोघांत!

दोघांची निघायची वेळ होते. ती कशी कुणास ठाऊक एका चिटोऱ्यावर आपलं नाव आणि फोन नंबर लिहायला तयार होते. त्याच्या पाठीवर तो चिटोरा ठेवून ती आपलं नाव आणि नंबर लिहिते. खरं तिचाच स्वतःवर विश्वास बसत नाहीये, की केवळ काही तासांपूर्वी भेटलेल्या एका अनोळखी तरुणाला आपण आपले डिटेल्स देतोय. ती तो चिटोरा त्याच्या हातात ठेवणार... तोच... बाजूने एक  भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकमुळे जोसाचा वारा येऊन तो चिटोरा उडतो आणि रस्त्यावरच्या शेकडो लहान लहान कागदाच्या कपट्यांमध्ये मिसळून जातो. तिच्या भाबड्या मनाला तो दैवाने दिलेला एक संकेत वाटतो. मागे फिरण्याचा! फार न गुंतण्याचा!! तो तिला पुन्हा नंबर आणि नाव परत लिहायची विनंती करतो; पण आता तिच्यातली ती एक भाबडी, भोळी, दैवावर, विधिलिखितावर विश्वास ठेवणारी मुलगी जागृत झालेली असते. आणि मग सुरू होते एक विलक्षण उत्कंठावर्धक क्षणांची मालिका...

ती आपल्या पर्समधून पाच डॉलरची एक नोट काढते आणि त्यावर त्याला त्याचं नाव आणि नंबर लिहून द्यायला सांगते आणि त्याने लिहून दिल्यावर त्या नोटेकडे न बघताच ती समोरच्या स्टोअरमधे जाऊन ती नोट त्या दुकानदाराला देऊन चुइंगगम विकत घेऊन तोंडात टाकते. जॉन वेडाच होतो. त्यावर तिचं म्हणणं, ‘जर का विधिलिखित असेल आणि असेल आपली भेट नशिबात पुन्हा, तर ती नोट कधी ना कधी पुन्हा माझ्या हातात येईलच.’ तो हैराण. तो तिला तिचा नंबर विचारतो, तर त्यावर ती एक पुस्तक काढून दाखवते आणि सांगते, ‘माझं  नाव आणि नंबर आतल्या पानावर लिहून ते पुस्तक मी उद्या सकाळी सेकंड हँड स्टोअरला देईन आणि तुला कधी जर ते मिळालं तर नशिबात आपली भेट असेल!’... यावर तो खूप काही बोलतो – ‘इतके छान भेटलो...इतका छान वेळ एकत्र काढला आणि आता अचानक हे सगळं नशिबावर का सोडायचं?’ वगैरे; पण ती तेवढ्यावरच थांबत नाही. त्याला घेऊन धावत ती समोरच्या बिल्डिंगमध्ये शिरते. एका लिफ्टमध्ये शिरते आणि त्याला समोरच्या लिफ्टच्या दारात उभं करते आणि सांगते, ‘तू आत शिरल्यावर एक दीर्घ श्वास घेऊन रँडमली कुठल्याही मजल्याचं बटन दाब. मीही जर तेच दाबलं असेल, तर आपली भेट होईल. त्याचा अर्थ आपली भेट हे विधिलिखित असेल!’... तो तिच्यावर वैतागत, आणि स्वतःशी चरफडत तेही करायला तयार होतो. ती समोरून त्याच्या हातात काश्मिरी हँडग्लोव्ह्जची बॅग टाकते (ज्याच्यात एकच ग्लोव्ह आहे. कारण दुसरा तिने स्वतःजवळ ठेवलाय) आणि लिफ्टचा दरवाजा बंद होताहोता आपलं नाव सांगते एकदाचं, ‘सेरा. सेरा आहे माझं नाव!’ आणि तिची लिफ्ट निघते. तिने दरम्यान २३व्या मजल्याचं बटन दाबलंय. तो समोरच्या लिफ्टमध्ये एक सेकंद दिङ्मूढ; पण भानावर येऊन ‘अडमतडम’ केल्यासारखं करून नेमकं २३व्या मजल्याचंच बटन दाबतो. आणि सुरू होतात काही उत्कंठावर्धक क्षण...

आपण प्रेक्षक आनंदात की २३व्या मजल्यावर त्यांची भेट होणार म्हणून; पण हाय दैवा!! लिफ्ट १४व्या मजल्यावर पोचल्यावर थांबते आणि सैतानाची वेशभूषा केलेलं एक अत्रंगी कार्ट आपल्या बापाबरोबर आत शिरतं. त्यांनाही वरतीच जायचंय; पण ते अवलक्षणी कार्ट आल्याआल्या आपले हात चालवून सर्वच्या सर्व बटणं धडाध्धड प्रेस करून मोकळं होतं. इकडे २३व्या मजल्यावर पोहोचलेल्या सेराला समोरच्या लिफ्टने जॉनने २३व्या मजल्यावरच उतरून पटकन बाहेर यावं असं वाटतंय; पण त्याची लिफ्ट स्टॉपिंग-अॅट-ऑल फ्लोअर्स करत सावकाश वरती येत्येय. सेराचाही धीर सुटत चाललाय. जॉन आधीच कुठल्यातरी खालच्या मजल्यावर उतरला असेल असं समजून काहीशा दु:खी मनःस्थितीत ती उठून समोरचीच दुसरी लिफ्ट पकडून खालती जायला निघते. तिच्या लिफ्टचं दार बंद होताहोता जॉनची लिफ्ट २३व्या मजल्यावर पोचते; पण सेरा दिसत नाही त्याला तिथे. अत्यंत निराश होऊन तोही पुन्हा ग्राउंड फ्लोअरला येतो. तेव्हा सेरा थोडक्यात वळून गर्दीत दिसेनाशी झालेली असते. जॉनचं नशीब त्याच्यावर रुसलेलं असतं. नियतीने एका सुंदर गोड मुलीला अल्पकाळ आयुष्यात आणून पुन्हा दूर नेलेलं असतं...

आता ती भेट होऊन काही काळ उलटलाय. हॅली ब्यूखॅनन (ब्रिजिट मॉयनाहॅन) या आपल्या पार्टनरबरोबर जॉन न्यूयॉर्कमध्ये, तर सेरा तिचा पार्टनर लार्स हॅमन्डसोबत (जॉन कॉर्बेट) लॉस एंजलीसमध्ये पुढचं लाइफ सुरू करण्याच्या मार्गावर आहेत. पार्टी संपवून घरी निघाल्यावर जॉनला रस्त्याने जाताना सेकंड हँड बुकस्टॉल दिसतो - नकळत त्याची पावलं तिकडे वळतात, सेराने नाव आणि नंबर लिहिलेलं पुस्तक आहे का बघायला... सेरा अजून पूर्णपणे गेली नाहीये त्याच्या मनातून! तर तिकडे लार्सने आणलेली एंगेजमेंट रिंग बोटात चढतच नाही हे पाहून दैववादी सेराच्या मनात शंकेची पाल चुकचुकून गेलेली!....

पुढचा दिवस उजाडलाय तो जॉनसाठी विचित्रच. त्याला वेगवेगळ्या तीन जणांकडून आधी गोल्फ क्लबमध्ये, नंतर सलूनमध्ये आणि नंतर टॅक्सीमध्ये ‘सेरा’ नाव कानांवर पडतं आणि तो हैराण. जणू निसर्गाने चंगच बांधलाय त्याच्या मनातून सेरा हे नाव आणि सेराची आठवण पुसू न देण्याचा! तो तडक त्याच्या जिवलग मित्राकडे डीनकडे (जेरेमी पिव्हेन) जाऊन त्याला हा विलक्षण योगायोग सांगतो. एकापाठोपाठ एक तिघांकडून सेराचंच नाव कानावर का पडावं? ‘तिला शोध’ असंच तर नियती नसेल सांगत? त्याच्या तोंडून ते ऐकताना डीन हैराण! तो त्याला म्हणतोदेखील, भल्या गृहस्था तुझं लग्न ठरलंय, नव्हे तीन दिवसांवर आलंय आणि हे काय खूळ आता डोक्यात? तू आहे ते रिलेशन का धोक्यात घालतोयस कुठल्या त्या सेरा नावाच्या मृगजळामागे धावत?’ पण जॉन त्याला समजावतो, ‘हे बघ, हॅली म्हणजे गॉडफादर पार्ट २ आहे समज. जो बेस्टच आहे; पण तो किती चांगला किंवा कसा आहे हे समजण्यासाठी ओरिजिनल गॉडफादर बघावा ना?..तरच ठरवता येईल ना दुसरा किती चांगला आहे किंवा कसे?’ ..... बिचारा डीन नाईलाजाने जॉनला मदत करायला तयार होतो... पण कसे शोधणार ते नुसत्या सेरा नावावरून तिला अमेरिकेत?... आणि नियतीकडून एक संकेत मिळतो जॉनला. हॅलीने सांगितल्याप्रमाणे हनिमूनसाठी कपड्यांची आवराआवर करत असताना त्याला सेराने जाताजाता दिलेली ती ब्लूमिंगडेल्स स्टोअरची छोटी पिशवी आणि तो काळा हँडग्लोव्ह मिळतो आणि बरोबर त्या वेळची खरेदीची रिसीट!.... बस्स! तिथून जॉनची थरारक ‘सेरा शोध’मोहीम सुरू होते...

तिकडे लॉसएंजलिसमध्ये सेरालासुद्धा नियतीकडून एक संकेत मिळतो. आधीच लार्सने दिलेली रिंग बोटात जात नसते, त्यात त्याला त्यांच्या हनिमूनच्या डेट्स पोस्टपोन करायच्या असतात स्वतःच्या फ्लूट कॉन्सर्टसाठी! सेरा बिचारी त्यावर काहीच न बोलता तिथून निघते आणि पावसात एका ठिकाणी थांबते तर समोर ‘कुल हँड ल्युक’चं पोस्टर... जो जॉनचा आवडता सिनेमा म्हणून त्याने सांगितलेलं असतं. लार्सवर चिडलेल्या त्या मनःस्थितीत सेरासुद्धा हा नियतीचा संकेत मानून, लार्सशी लग्न करण्याआधी जॉनला शोधण्याचा एक शेवटचा प्रयत्न करायचं ठरवून तिच्या मैत्रिणीकडे, ईव्हकडे (मॉली शॅनन) जाते आणि न्यूयॉर्कला जाऊन जॉनला शोधण्यासाठी तिच्याकडे मदत मागते....

पुढे काय घडत जातं ते बघण्यात मझा येतो...

जॉन आणि सेरा - दोघांचंही आपापल्या पार्टनरबरोबर काही दिवसांवर येऊन ठेपलेलं लग्न... पण त्याआधी जॉनने डीनला घेऊन सेराचा पत्ता मिळवण्यासाठी ब्लूमिंगडेल्सपासून सुरुवात करून केलेला आटापिटा.... शेवटी एका अशक्य योगायोगाने त्याला सेराने नाव आणि फोन नंबर लिहिलेलं पुस्तक मिळतं आणि त्याद्वारे सेराचा पत्ता मिळवून त्याने सॅन फ्रान्सिस्कोला जाऊन घेतलेला तिचा शोध आणि कळलेलं निराशाजनक सत्य, ज्यामुळे खचून जाऊन त्याने थांबवलेला तिचा शोध..

आणि इकडे सेराने ईव्हला घेऊन न्यूयॉर्कमध्ये येऊन जॉनसाठी चालवलेली शोधमोहीम... लग्न ठरलेलं असूनही मी हे का करतेय ते ईव्हला सांगते तेही अशा शब्दांत -

‘I’ve just spent the entire flight staring into the sky, thinking. Not about my fiance, but about this mystery guy I met a million and a half hours ago. A guy I don’t even remember, except for this... vague picture I have inside my head. It was just a few seconds. A fragment, really. And it was like...in that moment,the whole universe existed just to bring us together. That’s why I’m here. That’s why I’m gonna let fate take me wherever it wants to go.  Because when all this is over,at least I’m never gonna have to think of him ever again...’

रस्त्यात खरेदी केलेल्या दोघींच्या ‘प्राडा मनीपर्स’ची अदलाबदल होते आणि परतीच्या प्रवासात विमानात बसल्यावर सेराला चक्क त्या पर्समध्ये ती पाच डॉलरची नोट मिळते, जीवर जोनाथनचं नाव आणि फोन नंबर असतो. मग काय? सेराची धावपळ. त्या नंबरच्या साह्याने ती जॉनच्या घरापर्यंत जाऊन पोहोचते. तिथे कळतं, की त्याचं लग्न थोड्याच वेळात होतंय वोल्डॉर्फ अस्टॉरीया हॉटेलमध्ये. नियतीने इतक्या जवळ आणून असं त्याला दूर करणं कसं शक्य आहे? मिळेल ती टॅक्सी पकडून जिवाच्या आकांताने सेरा धावत सुटते. हॉटेलच्या हॉलमध्ये पोहोचल्यावर तिला कळतं, की का कुणास ठाऊक पण जॉनने लग्न मोडलं. त्यामुळे समारंभ झालाच नाही तिथे.... सेराच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू... आनंदाचे ...आणि एका होऊ शकत असणाऱ्या मिलनाच्या शक्यतेचे?!!! म्हणजे?.... दैवाला त्यांचं एकत्र असणंच मान्य आहे तर!!!.... काही वर्षांपूर्वी त्या अनोळखी तरुणाला नियतीने समोर आणून उभं केलं होतं, त्यामागे काही विवक्षित प्लॅन होता तर नियतीचा?...

... इकडे जॉनने लग्न मोडून सेराचा शोध घेण्याच्या निर्णयावर डीनने चक्क एक लंबचौडं पत्र लिहिलंय, जे तो जॉनच्या हातात ठेवतो आणि त्याचा निरोप घेतो. पत्रात त्याने लिहिलंय -

‘life is not merely a series of meaningless accidents or coincidences. But rather it’s a tapestry of events... that culminate in an exquisite, sublime plan..... to live life in harmony with the universe, we must all possess a powerful faith in what we refer to as destiny. Destiny!!’

पत्र वाचून संपतं, तेव्हा जॉन त्याच स्केटिंग रिंकशी पोचलाय जिथे तो सेराबरोबर आला होता. थोडा वेळ तिथे घालवावा वाटून तो तिथे जातो आणि तिथल्या बर्फावर आडवा होतो. त्याच्या हातात तिने दिलेला काळा हँडग्लोव्ह आहे. संध्याकाळची वेळ. पुन्हा भुरूभुरू बर्फ पडायला सुरुवात झाली आहे. मिचमिचल्या डोळ्यांनी तो आकाशातून होणाऱ्या त्या बर्फवृष्टीकडे पाहत असतानाच वरून एक काळ हँडग्लोव्ह सरसरत त्याच्या दिशेने येताना दिसतो. तो दचकून उठून बसतो. बाजूला बघतो तर त्याचा ग्लोव्ह तिथे असतो. मग हा दुसरा कसा आला इथे?... म्हणजे सेरा?... सेरा आलीय इथे?... माझी सेरा?.... मला शोधत?.... तो  उभा राहून वळून बघतो... होय! त्याची सेरा... नियतीने जिच्याशी गाठ बांधून दिलीय तीच सेरा तिथे उभी असते.... आनंदाने तिच्याही डोळ्यांतून अश्रू पाझरतायत... तिचा सोलमेट भेटलाच तिला अखेर!! 

पुढच्या दृश्यात दोघं ब्लूमिंगडेल्स स्टोअरमध्ये आपल्या पुनर्भेटीची अॅनिव्हर्सरी साजरी करतायत आणि..... दी एंड!

खूप भावतो हा सिनेमा. नियती.... सोलमेट्स... कार्मिक देणं असलं, की भेटी होतातच.... आपलं असणारं सच्चं प्रेम आपल्याला मिळतंच हे सांगणारा! जॉन क्यूसॅक आणि केट बेकीन्सलची जोडी तर घुसतेच मनात....मला खूपच आवडतो हा सिनेमा! प्रेमावर प्रेम करणाऱ्या तुम्हालाही आवडावा...

स्पेस आणि अॕस्ट्रॉनॉमी (भाग ५)

स्पेस आणि अॕस्ट्रॉनॉमी (भाग ५) 
----------------------
शहराबाहेर दूर एखाद्या पठारावर, माळरानावर किंवा एखाद्या गडावरच्या मोकळ्या जागेत, अंधारात बसून आकाशाकडे  नजर टाकल्यावरचा पहिला क्षण खरं तर मनांत प्रचंड कल्लोळ निर्माण करणारा असतो!! चहूबाजूंनी क्षितिजापर्यंत टेकणारा तो काळ्याकभिन्न अवकाशाचा अवाढव्य Dome आणि त्यावरचा कोट्यावधी चमचमणाऱ्या ताऱ्यांचा अंगावर येणार सडा, पहिलेछूट मनांत धडकीच भरवून जातो! एरवीच्या आयुष्यात उगाचच इगो बाळगून टिवटिव करणारे, शहाणपणा मिरवणारे आपण मानव, त्या ब्रह्माण्डाच्या अफाट पसाऱ्यापुढे किती क्षुद्र ठिपक्यासारखे आहोत याची जाणीव होते! मला तर वाटतं ज्या ज्या माणसांना (बिझिनेसमन असोत की राजकीय पुढारी, मोठे बिल्डर असोत की गुंठामंत्री, शिक्षणसम्राट असोत की सेलिब्रिटीज) - ज्यांना ज्यांना मनात स्वतःच्या कर्तृत्त्वाचा, कमाईचा, लोकप्रियतेचा अहंभाव किंवा अहंगंड निर्माण झाला असेल त्यांनीं एकदा असं शहराबाहेर दूर एखाद्या पठारावर, माळरानावर  मिट्ट काळोखात बसून सातआठ तास आकाशदर्शन करावं - मग आपल्या या नश्वर जीवनातला, बेगडी सुखातला, ऐश्वर्यातला, प्रसिद्धीच्या हव्यासातला वैय्यर्थ्य उमगेल! आकळेल!! अब्जावधी सजीवांनी भरलेल्या पृथ्वीवरच्या, एका भारतनामे देशातल्या, अमुकेक शहरातल्या, कोट्यवधी माणसांमधले आपण त्या नजरेच्या टप्प्यात न मावणाऱ्या कोट्यवधी तारे, लक्षावधी सूर्यमाला, इतकी सारी नक्षत्रं, शेकडो धूमकेतू, हजारो उल्का आणि कित्येक कृष्ण विवरांनी बनलेल्या त्या अफाट आणि अचाट ब्रह्माण्डात किती नगण्य आहोत याची जाणीव होईल! 

हे अथांग, अनंत ब्रह्माण्ड आणि ते सर्व निर्माण करणारा आणि तोलून धरणारा तो कोण आहे? कुठे आहे? हे सारं का निर्माण झालंय? त्याचा लय कधी होणार? आधी काय होतं? पुढे काय होणार? अशी उत्तरं न सापडणाऱ्या प्रश्नांची रांगच लागते मग मनात आणि आपण जगन्नियंत्यापुढे, नियतीपुढे नस्तमस्तक कधी होऊन जातो ते आपलं आपल्यालाही समजत नाही... 

तर आता ज्यांना आपण इतक्या प्रेमळ नजरेने, तासंतास टक लावून  बघणारोत त्यांची धावती ओळख करून घेऊ!

स्पेस म्हणजे पृथ्वीच्या वातावरणाबाहेर असलेलं 'अवकाश किंवा अंतराळ' आणि त्याचा अभ्यास करण्याचं शास्त्र म्हणजे खगोलशास्त्र (अॕस्ट्रॉनॉमी) हे तर आपल्याला माहितीच आहे! आता, हे अंतराळ इतकं अफाट आणि कल्पनेपलीकडे अथांग आहे की त्यांबद्दल बोलताना, आपली पृथ्वीवरची नेहेमीची मैल, किलोमीटर वगैरे अंतरांची मापं चालतच नाहीत! आपल्या सूर्यमालेतली अंतरं सांगताना पृथ्वी आणि सूर्यामधल्या अंतराचा आधार घेतला जातो. ते अंतर आहे जवळपास १५ कोटी किलोमीटर आणि त्याला म्हणतात एक अॕस्ट्रॉनॉमिकल युनिट! पण डोळ्यांसमोर चमचमणारा एखादा तारा किंवा तारकासमूह (नक्षत्र) किंवा टेलिस्कोपमधून दिसणारी आकाशगंगा प्रत्यक्षात इsssतकीsss कॕयच्यॕ कॕय दूर आहे की त्यासाठी हे अॕस्ट्रॉनॉमिकल युनिटच्या भाषेतही नाही सांगता येत! मग त्यासाठी अजून एक एकक (युनिट) वापरतात. त्याला म्हणतात प्रकाशवर्षं! 

हे जे  दूरवर चमकणारे तारे दिसतात तर त्यासंदर्भात, मानवाला सोडाच पण मानवाला ज्ञात असणाऱ्या सर्वात वेगवान प्रकाराला, म्हणजे प्रकाशालाही तिथे पोहचायला किंवा त्या ताऱ्यापासून किंवा आकाशगंगेपासून निघालेल्या प्रकाशाला आपल्यालापर्यंत पोहोचायला "कित्येक वर्षं" लागत असतात!!!! आता गंमत बघा-

मुळात प्रकाशाचा वेगच जर "सेकंदाला ३ लाख किलोमीटर्स" इतका महाप्रचंड आहे, तर  एका वर्षात म्हणजेच ( ३६५ दिवस x २४ तास x  ६० मिनिटं x  ६० सेकंद) म्हणजेच ३ कोटी १५ लाख ३६ हजार सेकंदात प्रकाश कित्ती दूर अंतरापर्यंत जाईल??? अबबबब!!!!! आकड्याची व्याप्ती डोळे फिरवणारी आणि आपल्याला जेव्हा कळतं की एखादा तारा आपल्यापासून अमुकेक 'प्रकाशवर्ष दूर अंतरावर' आहे म्हणजेच प्रकाश एका वर्षात जितकं अंतर प्रवास करेल त्यानुसार तमुकेक वर्षं प्रवास करून त्याचा प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचून तो तारा आपल्याला दिसतोय!! (म्हणजे कल्पना करा की एखादा तारा पृथ्वीपासून ३४६ प्रकाशवर्ष दूर असेल तर ३४६ वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन निघालेला प्रकाश तिथे आत्ता पोहोचत असेल.. म्हणजेच तिथे असणा-या माणसांना ३४६ वर्षांपूर्वीची पृथ्वी आत्ता दिसत असेल ...म्हणजेच तिथली मंडळी आत्ता ३४६ वर्षांपूर्वीचा महाराजांचा राज्याभिषेक आत्ता बघत असतील! :-D ...

आणि असे अब्जावधी तारे आणि लक्षावधी आकाशगंगा असणारं अंतराळ आपल्या डोळ्यांसमोर वर डोक्यावर आहे..जिथले तारे लक्षावधी प्रकाशवर्षं दूर आहेत ..म्हणजेच आपण त्यांना आत्ता जे बघतोय तो त्यांचा तितक्या वर्षांपूर्वीचा भूतकाळ बघतोय!...फार कशाला आपला 'मित्र' सूर्यनारायण आपल्यापासून ज्या अंतरावर आहे तिथून त्याचा प्रकाशआपल्यापर्यंत पोहोचायला ८ मिनिटं लागतात..म्हणजेच आपणा रोज जो सूर्य ज्या क्षणी बघतो तो आठ मिनिटांपूर्वीचा त्याचा भूतकाळ असतो...(म्हणजेच जर आपल्याला पृथ्वीवर फिरणारे डायनाॕसाॕर्स खर्रेखुर्रे फिरताना बघायचे असतील तर आपल्याला पृथ्वीपासून ६.५ कोटी प्रकाशवर्ष अंतरावरच्या ठिकाणी आत्ता असायला हवं जिथे त्याकाळी पृथ्वीवरुन निघालेला प्रकाश आत्ता पोहोचत असेल.).. 

म्हणजेच काय अफाट पसारा आहे नैय विश्वाचा?अमावास्येच्या रात्री, काळोखात त्या भव्यतेची आपल्याला कल्पना येते! निसर्गाच्या, जगन्नियंत्याच्या त्या कमाल निर्मितीपुढे भान हरपून, स्तिमित होत्साते मग आपण आकाशदर्शनाचा मझा लुटतो!

काय काय बघू शकतो आपण? - नुसत्या डोळ्यांनी (naked eyes) ग्रह, तारे, नक्षत्र तर बघूच शकतो पण काही कापसाच्या पुंजक्यांसदृश्य असणाऱ्या नेब्युला म्हणजे दीर्घिकासुद्धा पाहू शकतो फक्त त्या कुठे असतात ते एकदा माहित झालं की बस्स! आणि मग टेलीस्कोपचा वापर करून ग्रहांचे उपग्रह, शनीची कडी, चंद्राचा पृष्ठभाग आणि अशा खूप साऱ्या अद्भुत गोष्टी आपल्याला रात्रभर बघायच्या बघायच्या आहेत!

आधी अगदी थोडक्यात त्यांचा परिचय -- 

शाळेत असताना "सूर्य आणि सर्व ग्रह, उपग्रह, धूमकेतू, उल्का" वगैरेंची माहिती आपल्याला अगदी तोंडपाठ असते, पैकीच्यापैकी मार्क्स मिळवलेले असतात. रात्रीचं आकाश पाहताना ते तर डोक्यात असतंच पण  मजा येते ती दूरवरचे तारे, नक्षत्र यांच्या कहाण्या जाणून घेतल्या तर!! गॅलॅक्सी, नेब्युला, ब्लॅक होल, मॅगलोनिक क्लाउड यांविषयी जुजबी माहिती मिळवली तर!  

आकाशगंगा -> अंतराळाच्या अवाढव्य, महाप्रचंड पोकळीत हजारो आकाशगंगांचे (गॕलक्सीज) समूह आहेत. प्रत्येक आकाशगंगेमधे शेकडो तारे, सूर्यमाला, धुळीचे आणि वायूचे ढग, धूमकेतू अशा अनेक गोष्टी असतात. टेलिस्कोपमधून दिसणाऱ्या आकाशगंगा आकाशगंगा प्रत्यक्षात सर्पिलाकार, लंबवर्तुळाकार किंवा  अनियमित आकाराच्या असू शकतात.  

नेब्युला -> अंतराळ पोकळीतला दोन आकाशगंगांमधला किंवा दोन ताऱ्यांमधला हायड्रोजन, हेलियमसारख्या वायूंनी आणि धूलिकणांनी बनलेला पुंजका! हे पुंजके कित्येक प्रकाशवर्षं अंतरापर्यंत पसरलेले असू शकतात. असं मानलं जातं की अशा नेब्यूलांमधून काही प्रक्रिया घडून ताऱ्यांचा आणि सूर्यमालांचा जन्म होतो. 

ब्लॅक होल ->  असं मानतात की एखादा तारा मृत होताना त्याच्यातला किरणोत्सर्ग थांबतो आणि  गुरुत्वशक्ती प्रचंड वाढून अंतराळात तो जणू दिसेनासा होतो आणि त्या अचाट गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे कोणतीही वस्तू किंवा पदार्थ त्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. अर्थात हा प्रकार काही आपल्याला आकाशदर्शनादरम्यान कधी दिसत नाही. 

नक्षत्रं -> काही असे तारकासमूह आकाशात हज्जारो वर्षं दिसत आलेत ज्यांना काल्पनिक रेषांनी जोडल्यावर काही आकृत्या तयार होतात आणि मग त्या आकृत्या वेगवेगळ्या संस्कृतींनुसार काही कथांशी जोडल्या गेल्याहेत.  आपण काही ठळक नक्षत्र आणि त्यांच्या भारतीय आणि  ग्रीक पुराणांतल्या इंटरेस्टिंग कथा बघू...!

स्पेस आणि अॕस्ट्रॉनॉमी (भाग ४)

स्पेस आणि अॕस्ट्रॉनॉमी (भाग ४) 
------------------------------
आकाशदर्शन करायचं तर डोकं मागे पाठीला टेकवायचा प्रयत्न करत सतत वर बघून उपयोगाचं नाही कारण त्याने काहीच मिनिटांत मानेला सणसणीत रग लागून भलतीच व्याधी मागे लागायची. झोपून बघायचं म्हटलं तर आपण कुठे डोंगरावर असू किंवा एखाद्या उंच पठारावर तर तशी छान मोकळी जागा असायला हवी. त्यामुळे साधारणपणे पश्चिम क्षितिजापासून सुरुवात करून तिथून आपल्या डोक्यावर असणाऱ्या आकाशाच्या भागाकडे (ख-स्वस्तिक) बघत बऱ्यापैकी चांगलं निरीक्षण होऊ शकतं. अर्थात त्याचवेळी डाव्याउजव्या दक्षिणोत्तर दिशांकडे आणि मागच्या पूर्वेकडे क्षितिजालगतचे तारे आणि नक्षत्र बघायला विसरायचं नाही! 

आकाशदर्शन करताना सर्वात बेसिक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे "उत्तर ध्रुवा"चं स्थान निश्चित करणं. कारण तो अख्खी रात्र, वर्षभर आपलं ठिकाण सोडत नाही आणि त्यामुळे त्याच्या रेफरन्सने मुख्य म्हणजे सर्व दिशा आणि इतरही गोष्टी कळणं सोप्पं होतं. आपल्यासारख्या भारतात किंबहुना उत्तर गोलार्धात राहणाऱ्या ज्याला त्याला/जिला तिला "उत्तर ध्रुव तारा" कोणता कळलं की खूप गोष्टी सोप्या होतात. कारण आकाशात असा तो एकमेव तारा आहे ज्याची स्थिती जन्मांत बदलत नाही, निदान काही हजार वर्षं तरी!  (पण पृथ्वीच्या भोवऱ्यासारख्या फिरण्याच्या गतीमुळे, अनेक तारे हजारो वर्षांच्या गतीचक्रात त्या त्या कालखंडांत "ध्रुव तारा" म्हणून मान मिळवतील. उदाहरणार्थ इसवी सन ३००० साली 'जेम्मा सिफीआय' हा तारा ध्रुव तारा बनेल. आणि आणखी १३००० वर्षांनी 'व्हेगा' हा तारा पृथ्वीसाठी ध्रुव तारा असेल. (असो ते किंचित क्लिष्ट गणित आता बोलायला नको. सध्या तरी आपला नेहेमीचा ओळखीचा ध्रुव तारा आपण मनात ठेवू! :-) )

आपला हा ओळखीचा ध्रुव तारा शोधायचा कसा? तर उगाच उत्तरेला दृष्टी लावून अंदाजपंचेदाहोदर्शे त्यातल्या त्यात जरा प्रखर दिप्तीचा दिसतोय तोच असणार असं करून चालत नाही! मुळात आपला ध्रुव तारा खूप काही ब्राईट नाहीये बरं! तर तो शोधायची ट्रिक म्हणजे आकाशात दिसणारे सप्तर्षी आणि शर्मिष्ठा नक्षत्र आधी शोधायची - जी अत्यंत सहज उठून दिसतातच! (नाहीतर माझ्यासारखा कुणी हौशी तारे दाखवणारा असेलच, त्याला पकडा!) तर सोप्पी ट्रिक म्हणजे सप्तर्षींच्या वरच्या चौकडीतल्या पहिल्या दोन ठळक ताऱ्यांना जोडणारी एक काल्पनिक रेषा आपण आकाशात काढली आणि ती शर्मिष्ठेच्या दिशेने नेऊन जोडली तर त्या रेषेच्या निम्म्या अंतरात जो ठळक तारा असतो तोच आपला ध्रुव तारा! एकदा हा कळला की पुढची गंमत म्हणजे एक कल्पना करायची की आपल्या हातात एक महाकाय काळी छत्री आहे.  

आता कल्पना करा की त्या महाकाय छत्रीचा दांडा आपण हातात धरून, त्या छत्रीचं अणकुचीदार टोक जर ध्रुव ताऱ्याकडे रोखलं आणि कल्पना केली की त्या महाकाय छत्रीचं कापड म्हणजेच हे रात्रीचं आकाश आणि सर्व तारे, नक्षत्र या छत्रीवर आहेत. आता जर का आपण दांडा हातात ठेवून आणि टोक ध्रुव ताऱ्यांकडे रोखलेलं ठेवून छत्री अत्यंत सावकाश गोल फिरवायला सुरुवात केली तर काय होईल? ध्रुव ताऱ्याचं स्थान तेच स्थिर राहून बाकी कापडावरचे सर्व तारे, नक्षत्र गोलाकार फिरत क्रमाक्रमाने आपल्या नजरेसमोर येतील आणि जातील ....आणि ही क्रिया छत्री फिरत राहिस्तोवर होत राहील, बरोबर? ...तर exactly हेच आकाशात घडत असतं आणि घडत आलंय पृथ्वीच्या निर्मितीपास्नं!!!! पृथ्वीचा आस उत्तर ध्रुवाकडे कललेला असल्याने आणि ती स्वतःभोवती हळुवारपणे गोल फिरत राहिल्याने तेच तेच तारे आणि नक्षत्र क्रमाक्रमाने उगवताना आणि मावळताना आपल्याला दिसत राहतात.

आणि पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून ही सर्व आकाशस्थ मंडळी पूर्वेकडे उगवतात आणि पश्चिमेकडे मावळतात. म्हणून आकाशदर्शन करायला बसल्यावर ही पश्चिमेकडून पटकन दिसेनासे होणारी मंडळी miss व्हायला नकोत म्हणून पहिल्यांदा पश्चिम क्षितिज बघून घ्यायचं; कारण पूर्वेकडे उगवणारे पश्चिमेकडे मावळायला येण्यासाठी अख्खी रात्र लागणार असते. पृथ्वी स्वतःभोवती २४ तासांत फिरते म्हणजेच पूर्ण ३६० डिग्री (अंश) फिरायला तिला २४ x ६०=१४४० मिनिटं लागतात. म्हणजेच दर चार मिनिटाला पृथ्वी एक डिग्री (अंश) फिरते. म्हणजेच या गतीने आपल्या डोक्यावरचं तारामंडळ पुढे पुढे सरकत राहतं. त्यामुळे आपल्याला छान वेळ मिळतो बरंच काही पाहायला! 

आता आपल्याला शहराबाहेर जाऊन असं रात्रभर आकाशदर्शन करायचं तर आपल्याकडे पुरेसे उबदार कपडे, थोडा तोंडात टाकायला खाऊ, प्यायला पाणी, थोडा उत्साह राहायला चहा हवा म्हणून गॅसची छोटी शेगडी आणि एक बऱ्यापैकी टेलिस्कोप आणि टेलिस्कोप नसल्याचं तर एखादा चांगला बायनॉक्युलर असला म्हणजे मजा येईल! 

स्पेस आणि अस्ट्रॉनॉमी (भाग ३)

स्पेस आणि अस्ट्रॉनॉमी (भाग ३) :
-----------------------
शाळकरी वयातच "यूफो (UFO - Unidentified Flying Objects) म्हंजे "उडत्या तबकड्यां"विषयी तुफ्फान कुतूहल निर्माण झालं होतं. अंतराळात जर कोट्यवधी आकाशगंगा आणि लक्षावधी तारे आणि सूर्यमाला आहेत, तर पृथ्वीसारखेच जीवसृष्टी असणारे शेकडो ग्रह असणारच यावर माझी आजही नितांत श्रद्धा आहे!!  फक्त त्या ग्रहांवर असणारी जीवसृष्टी आपल्यासारखीच असेल असं मात्र नाही! म्हणजे उदाहरणार्थ - जसा आपला प्राणवायू 'ऑक्सिजन' आहे, तस्सा दुसऱ्या जीवसृष्टीचा प्राणवायू हा 'मिथेन' किंवा 'कार्बनडायॉक्साईड' असू शकेल किंवा आणखी कुठला तरी भलताच गॅस! बरं, तिथे मानवासारखे प्रमाणबद्ध अवयव असणारे सजीव असतील असंही नाहीच! चित्रविचित्र शरीर, मोठ्ठ डोकं, महाकाय देह, दोनऐवजी चार डोळे, पाच हात; पक्ष्यासारखं उडता येणं किंवा प्राण्यांसारखे भीतीदायक सुळे, अस्वलासारखं केसाळ शरीर किंवा एकदमच तुळतुळीत चमनगोटा अशी कॕय्च्याकॕय्य अतर्क्य आकृती असूच शकते परग्रहवासीयांची!..

स्पेस आणि अस्ट्रॉनॉमीचं वेड अगदी लहानपणी लावलं ते जूल्स व्हर्नच्या भा. रा. भागवतांनी अनुवादलेल्या "मुक्काम शेंडेनक्षत्र", "सूर्यावर स्वारी"सारख्या कादंबऱ्यांनी! त्याच सुमारास एच. जी. वेल्सची "टाइम मशीन" इंग्लीशमधूनच वाचली होती. माझ्यासारख्या मराठी मिडियमवाल्याने इंग्लिशमधून वाचलेली तीच पहिली कादंबरी ठरली! पुढे मग आधी म्हटलं तसं मेकर टॉवर्स मधल्या ब्रिटिश कौन्सिल लायब्ररीमधून अॕझिमॉव्ह आणि आर्थर क्लार्कच्या नॉव्हेल्स अधाशासारख्या वाचल्या होत्या. आणि त्याच वेळी एकीकडे सुपरमॅन, बॅटमॅनची कॉमिक्स वाचता वाचता दुसरीकडे क्रिस्तोफर रिव्हचे सर्व सुपरमॅन मुव्हीज पाहून अंतराळ आणि परग्रहावरच्या जीवसृष्टीविषयी कुतूहल वाढतच गेलं.. 

अर्थात परग्रहसृष्टीचं कुतूहल आणि परग्रहवासीयांविषयीची उत्सुकता ही पृथ्वीच्या पाठीवर लक्षावधी लोकांना असतेच आणि त्यातूनच मग UFO किंवा उडत्या तबकड्या बघितल्या असं म्हणणारे जगभर अनेक लोक निघाले! आपल्या आकाशगंगेत आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला आहेत; मग क्षणभर असं गृहीत धरलं की त्या सूर्यमालेतल्या जीवसृष्टी असू शकणाऱ्या ग्रहांवरचे परग्रहवासी आपल्या पृथ्वीपेक्षा प्रचंड प्रगत आणि उन्नत अवस्थेत असतील, आणि म्हणून जर ते त्यांच्या यानांतून लीलया अंतराळात संचार करू शकत असतील तर - ते कदाचित पृथ्वीवर येऊनही गेले असतील किंवा या क्षणीसुद्धा पृथ्वीवर आपल्या नकळत राहातही असतील!!...

आपण बघतो की पृथ्वीवर जमिनीचा भाग किती तर फक्त २९% आणि उर्वरित ७१% भाग हा पाण्याचा आहे. म्हणजेच पृथ्वीच्या ५१ कोटी स्क्वेअर किलोमीटर एरियापैकी ३६ कोटी स्क्वेअर किलोमीटर पाणीच आहे आणि फक्त १४ कोटी स्क्वेअर किलोमीटर जमीन!! त्यामुळे महाप्रचंड अश्या अथांग अफाट पसरलेल्या महासागरांमध्ये, अनोळखी आणि माणूस न पोहोचू शकलेली अशी अनेक ठिकाणं असूच शकतात जिथे हे आपल्यापेक्षा प्रगत असणारे परग्रहवासीय येऊन राहू शकत असतील किंवा कदाचित सुखेनैव राहतसुद्धा असतील अगदी आजसुद्धा, कुणी सांगावं?..

(२१ सप्टेंबर १९९५ला मुंबईत गणपतीच्या अनेक मूर्ती सोंडेतून दूध प्यायला लागल्यावर जी खळबळ उडाली ती आठवत्येय? माझ्या मनात त्यावेळी एक  अचाट कल्पना आली होती की - नैयतरी 'गणपती' म्हणजे गणांचा अधिपती आणि त्याकाळी पृथ्वीवर असे अनेक 'शक्तिशाली गण' पृथ्वीबाहेरून आले असणार - ज्यांचा प्राणवायू हा 'ऑक्सिजन' नसणार,भलताच दुसरा कुठला असणार आणि म्हणून त्यांनी त्यांचा प्राणवायू असणाऱ्या त्या वायूचे सिलिंडर्स पाठीवर घेऊन, तिथून निघालेल्या नळ्या पुढे नाकात घातल्या असणार जी आपण सोंड मानतो आणि असे अनेक गण बऱ्याच देशांत उतरले असणार म्हणून ती वायूची नळी लावलेले ते कोणे एके काळी युफोतनं आलेले सोंडवाले गणपती अनेक खंडांत उतरले आणि म्हणून हा एकच देव असा आहे जो सगळीकडे आढळतो! आणि कदाचित दूध हे त्यांचं ते सिलिंडरच्या फंक्शनिंग किंवा यानासाठी कुठेतरी लागणारं इंधनबिंधन असणार आणि म्हणून त्या मूर्त्या सिम्बॉलिकली (कॅपिलरी अॕक्शनने!) दूध 'पिऊ' लागल्या असतील...?

मला तर बऱ्याचदा वाटतं की आपण ज्याला "भूत" वगैरे मानतो किंवा म्हणतो, म्हंजे थोडक्यात नॉर्मल माणसांसारखं नसणारं जे काही भीतीदायक ते खरे परग्रहवासीय नसतील कशावरुन? कारण भुतांच्या गोष्टी आणि भूत बघितल्याचे अनुभव हे बहुदा दुर्गम, घनदाट झाडांनी वेढलेल्या, जिथे मनुष्यवस्ती फार नाही आणि इलेक्ट्रिसिटीसुद्धा फार पोहोचलेली नाही अश्या ठिकाणी सांगितले जातात. मग आपल्याहून प्रगत असणारे पण वेगळ्या दिसणा-या परग्रहवासीयांचा वावर अशा ठिकाणी असेल- तर मग त्यांना पाहिलेले लोक, आपल्यासारखे नसणाऱ्या, भलतंच काही वेगळं, डोकं नसलेल्या, उलटे पाय असणाऱ्या त्या विचित्र आकृतीला घाबरून 'भूत' ही संज्ञा जन्माला आली असेल? (बाहेरच्या दुनियेतलं कुणी पृथ्वीवर फारफार पुरातन काळी येऊ गेलंय यावर प्रकाश टाकणारं एरिश फॉन डॅनिकेनचं "चॅरिएट्स ऑफ गॉड्स" वाचल्यावर एक वेगळाच अँगल मिळाला होता. मला आठवतंय माझ्या वडिलांनी हळेबीड बेल्लूर की कुठल्याश्या दक्षिणेकडच्या मंदिरात एका शिल्पात एका माणसाची कोरलेली मुद्रा पहिली होती, ज्यामध्ये तो दुर्बिणीतून बघतोय असं काहीसं होतं - म्हणजे आपण जे मानतो की हान्स लिपरशे ने १७व्या शतकात टेलिस्कोपचा शोध लावला वगैरे, पण त्याआधीच कित्येक वर्षं भारतीयांना दुर्बीण माहित होती...? आणि त्यांनी ते अंतराळातल्या ग्रह ताऱ्यांचा वेध घेत होते? कमाल आहे!) 🤔

तर मुद्दा हा की यूफोचं आकर्षण जगभर सर्वच देशांत आहे. त्यातही काहींच्या खऱ्या वाटाव्यात अश्या कहाण्या ऐकून त्यावर चक्क गंभीर संशोधन सुरु झालं. काही ठिकाणी म्हणे तर सकृतदर्शनी त्या कहाण्या खऱ्या वाटाव्या असे पुरावेही सापडले होते!

आपण सगळ्यांनी हे वाचलेलं असतं की भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल सुरु असतानाच्या जस्ट दोन महिने आधी, २४ जून १९४७ ला केनेथ आर्नल्ड स्वतःच माउंट रेनिअरवरनं विमान उडवत असताना त्याला चकाकणा-या चपट्या वस्तू त्याच्या विमानाच्या बाजूने अचाट वेगाने उडताना दिसल्या..त्या Disc सारख्या वाटल्या म्हणून त्याने त्यांचं वर्णन Flying Saucer असं केलं (म्हणून मराठीत 'उडती तबकडी')...पण नंतर जगभर चित्रविचित्र आकाराच्या वस्तू दिसायला लागल्या आणि पुढच्या काळात त्यांना Unidentified Flying Objects (UFO) म्हटलं गेलं...जुलै १९४७ मधे रॉसवेल या ठिकाणी कोसळलेल्या बलूनसदृश्श्य तबकडीसंदर्भावर आधारित चार्ल्स बर्लीट्झने लिहिलेलं "रॉसवेल इन्सिडेंट" आपण वाचलं असेलच. जी एअर फोर्सच्या लोकांनी क्रॕश होताना पाहिली आणि त्यांना त्या ठिकाणी दोन विचित्र प्राणी मिळाले...पण मग अमेरिकेने ती बातमी दाबली...जगभर अशा उडत्या तबकड्या दिसत आल्याहेत. आणि मग परग्रहवासियांची पृथ्वीला भेट या चमकदार कल्पनेवर शेकडो सायन्स फिक्शन कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आणि "क्लोज एनकॉउंटर्स ऑफ द थर्ड काइंड", "ईटी" सारख्य सिनेमांनी "यूफो" आणि परग्रहवासी यांबद्दल लोकांची जिज्ञासा जागृत केली. काही लोकांना युफो उतरुन मग त्यातली विचित्र आकाराचे परग्रहवासीही दिसलेत म्हणे!..आणि मग त्यातूनच नेवाडामधल्या "एरिया-५१" या अत्यंत गूढ, रहस्यमय ठिकाणाविषयी, त्याच्या आसपास लोकांना अधनंमधनं दिसणा-या युफोंविषयी आणि तिथल्या अमेरिकन एअर फोर्सच्या गुप्त तळाच्या आत दडलेल्या रहस्यमय चेंबर्सविषयी प्रचंड बातम्या आणि कहाण्या आपण वाचलेल्या असतात...(विल स्मिथच्या "द इंडिपेन्डन्स डे"च्या शेवटी नाही का अशीच ती पकडलेली युफो आणि त्यातले परग्रहवासी वगैरे दाखवले होते...आणि ती परग्रहावरनं आलेली महाकाय स्पेसशिप आणि अख्ख्या जगभरच्या एअर फोर्सने त्यांना दिलेली टक्कर...?!!)..आणि तसेच ते " MIB - Men in Black मधले युफोतनं उतरुन आपल्यामधे मिळूनमिसळून वागणारे चित्रविचित्र परग्रहवासी?)
..(अगदी अमेरिकन इलेक्शन संपता संपता डाॕनल्ड ट्रंप अमेरिकेशी contact झालेल्या परग्रहवासियांची माहिती फोडण्याच्या बेतात होता पण इस्राएलच्या स्पेस एजन्सीच्या प्रमुखांनी सल्लामसलत केल्यावर ती बातमी दाबण्यात आली..आशीही काही न्यूज वाचली होती..)

मी तर माझ्या शालेय आयुष्यात इतका झपाटलो गेलो होतो म्हणून सांगू? रात्री अनेकदा सोसायटीच्या गच्चीत गेलो तर आकाशाकडे नजर लावून डोळे फाडफाडून बघायचो एखादं स्पेसशिप दिसतंय का? त्यातून प्रकाशझोत येऊन त्यातून कुणी मला उचलून यानात घेऊन जातंय का म्हणून? ;-)  मुंबई दूरदर्शन B&W असताना "फायरबॉल एक्सएल ५" आवडती सिरीयल होती आणि रविवार सकाळच्या "स्टार ट्रेक"ने तर वेडच लावलं होतं! 

त्याकाळी आलेल्या "स्टार वॉर्स" मुव्हीसीरिजचे पहिले तीनही भाग प्रचंड भक्तिभावाने बघितले (आणि २००६ साली इंग्लंडच्या लेस्टरला राहात असताना, तिथल्या स्पेस सेंटरला भेट द्यायला गेलो आणि तिथे अचानकच आलेल्या डार्थ वेडरच्या गॅलॅक्टिक आर्मीने मला घेरलं! त्या क्षणाचा फोटोही मग जपून ठेवला! (तोच फोटो दिलाय या पोस्टबरोबर!) :-D 

अमेरिका, रशिया सारख्या अंतराळक्षेत्रात प्रचंड प्रगती केलेल्या दादा देशांनी अब्जावधी डॉलर्स खर्च करून परग्रहवासीयांच्या शोधासाठी गेल्या शतकापासून वारंवार अनेक अंतराळ मोहिमा आखल्या आणि अजूनही बरेच देश असे अंतराळातले शेजारी शोधायची धडपड करतातच आहेत. आता तर पृथ्वीच्या बाहेर एका कक्षेत कायम स्वरूपी अंतराळ स्थानक फिरतंय (ISS) आणि अनेक देशांतले अंतराळवीर तिथे जाऊन येऊन असतात. शिवाय हबलसारखी शक्तिशाली टेलिस्कोप मानवाच्या मदतीला आहे. अशाच परग्रहावरच्या सृष्टीच्या शोधात अमेरिकेच्या नासाने आधी "पायोनियर 10" आणि नंतर "व्हॉयेजर" यानांची एक महत्त्वाकांक्षी मोहीम आखली आणि आज नासाची ती यानं आपली सूर्यमाला सोडून बाह्यअंतरिक्षात झेपावली आहेत. कुणी सांगावं? त्यांच्या त्या अथक कालप्रवासात ती कुण्या प्रगत जीवसृष्टीच्या हातात पडली किंवा कुण्या प्रगत परग्रहवासियांना मिळाली आणि त्या यानात मुद्दामहून ठेवलेली पृथ्वीवरची काही माहिती त्यांच्या हातात पडून त्यांनी त्याबरहुकूम पृथ्वीवासीयांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलाच भविष्यात तर?

परग्रहवासीयांविषयीचं हे कुतूहलसुद्धा मला स्पेस आणि अॕस्ट्रॉनॉमीची ओढ कायम ठेवायला कारणीभूत आहेच...

तर चला आता पुढच्या भागात काही महत्त्वाच्या अवकाशस्थ इंटरेस्टिंग गोष्टींविषयी बोलूया!