Sunday, 18 July 2021
राजेश-रफीसाब!
Wednesday, 14 July 2021
फ्लर्टीन्ग.....फ्लर्टीन्ग...!!”
Thursday, 8 July 2021
द लेडी व्हॕनिशेस
Tuesday, 6 July 2021
चालणं : जोडप्यांचं x एकेकट्याचं
न ये जमीन थी न आसमाँ था...
Saturday, 3 July 2021
“भारतीय सिनेसृष्टीतले बदलते ट्रेंड्स!”
----------
भारताच्या कानाकोपऱ्यात, वेगवेगळ्या जातीधर्मात विखुरलेल्या मंडळींना एकत्र बांधून ठेवणारा कुठला एकच दुवा असेल तर तो म्हणजे हिंदी सिनेमा! गंमत म्हणजे एरवी भारताच्या राष्ट्रगीतालाही विरोध करणारे लोक, ते राष्ट्रगीत जिथे वाजवलं जातं तो सिनेमा एन्जॉय करण्यासाठी मात्र उत्साहाने जात असतात. त्यासाठी सर्वांकडे वेळ आणि पैसा असतो. ज्यांच्याकडे तो तुलनेने कमी असतो तेसुद्धा सिनेमासाठी प्रसंगी कळ सोसून किंवा खिशाला चाट सहन करून त्याचा आनंद घेतातच! हिंदी सिनेमा हे जगातलं एक 'अद्भुत'च म्हणता येईल! तो बनवताना जगातल्या सर्वच्या सर्व ६४ कलांचा त्यात वापर केलेला आढळतो. आणि त्यात काय वाट्टेल ते असू शकतं. अनेक अतर्क्य गोष्टी यात लीलया घडू शकतात. सुंदर आणि देखणे हिरो हिरॉईन्स आणि त्यांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, झेलावी लागणारी टोकाची संकटं, श्रीमंत-गरीब यातला संघर्ष, कल्पनेपलीकडचे खलपुरुष, हिरोहिरॉइन्सचे नातेवाईक, मधूनच चमकून जाणारे विनोदवीर आणि यात भरीस भर म्हणून अचानकच कध्धीही, कुठेही सुरु होणारी गाणी अशा अनेक गंमतीजंमतीने भरलेली कथा! पण तो सर्व मसाला अशा तर्हेने पेश केलेला असतो की येणारा दर्शक त्यात रंगून जावा आणि त्याला तीन तासांकरता जगाचा विसर पडावा! भारतीय सिनेसृष्टी ही भारताच्या स्वातंत्र्यकाळापेक्षाही जुनी! आज भारतीय सिनेसृष्टीने ११८ वर्षं पूर्ण केल्येत. या प्रदीर्घ वाटचालीमध्ये सिनेसृष्टीने अनेक चढउतार पाहिले. त्यातही १९४९ ते १९७३पर्यंतचा २५ वर्षांचा काळ खऱ्या अर्थाने 'सुवर्णयुग' मानला गेला कारण सर्वोत्तम कथा, सर्वोत्तम दिग्दर्शन, सर्वोत्तम अभिनेते/अभिनेत्री, सर्वोत्तम गाणी, सर्वोत्तम संगीतकार आणि सर्वोत्तम गायक याच २५ वर्षांत केवळ हिंदीच नव्हे तर भारतातल्या सर्वच भाषांमधल्या चित्रपटसृष्टीने दिले आणि लोकांनी अनुभवले. पण एकुणात या ११८ वर्षांचा धावता आढावा घ्यायचा म्हटला तर आपल्याला प्रकर्षाने वेळोवेळी बदलत गेलेले काही ठळक ट्रेंड्स नक्कीच जाणवतात!! आणि त्याचा आढावा रंजक ठरावा!
मुळात पारतंत्र्याच्या काळात भारतीयांना मनोरंजनाचं साधन म्हणून नाटक, बाहुल्यांचे खेळ, नृत्यकला किंवा लोककला काय त्या माहित! १८८० च्या दशकात महादेवराव पटवर्धन यांनी शाम्बरिक खरोलिकाच्या (मॅजिक लँटर्न) साहाय्याने काचेच्या पट्टीवरची चित्र दाखवायला सुरुवात केली होती. अश्यातच सात जुलै १८९६ या दिवशी मुंबईच्या वॅटसन हॉटेलमध्ये फ्रान्सच्या ल्युमिए बंधूंनी सहा छोट्या छोट्या फिल्म्स लोकांना दाखवल्या. त्या पाहून शोला हजर असलेले हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर हे फोटो स्टुडियोचे मालक भारावून गेले आणि त्यांनी २१ गिनी खर्च करून (साधारणपणे २२ पाउंड, ११८ वर्षांपूर्वीचे!) लंडनहून कॅमेरा आणि प्रोजेक्टर मागवला. १८९९ सालची ती गोष्ट! मुंबईत एका कुस्तीच्या मॅचचं चित्रीकरण करून त्यांनी 'द रेस्टलर' ही भारतातली पहिली छोटी डॉक्युमेंटरी बनवली. तीच भारतीय सिनेसृष्टीची सुरुवात मानता येईल. ब्रिटिशांची राजवट असल्याकारणाने ब्रिटिश मंडळी भारतात राहत होतीच. त्यामुळे युरोपमधून छोट्या छोट्या फिल्म्स भारतात आणून प्रदर्शित होत होत्या आणि त्यामुळे भारतीयांनाही या माध्यमाचं आकर्षण वाटायला लागलं होतं. १९१२ साली दादासाहेब तोरणे यांनी 'पुंडलिक' हा लघुपट बनवला. आणि पुढच्याच वर्षी १९१३ साली दादासाहेब फाळके यांनी पूर्ण लांबीचा "राजा हरिश्चंद्र" हा पहिलावहिला सिनेमा बनवला. त्या मूकपटापासून सिनेमाची मोहिनी भारतीयांना पडायला सुरुवात झाली. पुढे १४ मार्च १९३१ साली अर्देशीर ईराणी यांच्या 'आलम आरा' या पहिल्या बोलपटापासून सिनेमा बोलायला लागला, पाठोपाठ त्याच वर्षी ‘प्रल्हाद’ आणि ‘कालिदास’ या अनुक्रमे तेलगू आणि तामिळ फिल्म्सनी दक्षिणेकडे बोलपटांची सुरुवात केली तर ‘जमाइ षष्ठी’ पासून बंगाली फिल्मस बोलू लागल्या. 'आलमआरा'च्या पाठोपाठ १९३२ साली जमशेदजी मादन यांनी तयार केलेल्या 'इंद्रसभा' सिनेमाने तब्ब्ल ७२ गाण्यांची लयलूट करत चित्रपटात संगीताचं महत्त्वाचं स्थान निर्माण केलं. यात आणखी बहार आली ती १९३५ सालच्या 'धूप छाव'पासून ज्यामधून 'पार्श्वगायना'ची नांदी झाली. पुढची आठेक वर्ष भारतात वर्षाला २७ सिनेमे या गतीने सिनेमे बनत गेले. त्यात आणखीन रंग भरत गेले ते १९३७ साली ‘किसान कन्या’ या रंगीत सिनेमापासून. एकीकडे स्टुडियोनीं मूकपटापासून बोलपटाकडे जाताना जशी कात टाकली तशी दुसरीकडे सिनेमा थिएटर्ससुद्धा साउंडप्रूफ बनत गेली. सुरुवातीच्या काळात सिनेसृष्टी ही मुख्यतः मूठभर नावाजलेल्या स्टुडिओ मालकांच्या हातात होती. अर्देशीर इराणी यांचा इंपिरिअल स्टुडिओ, हिमांशू रॉय यांचा बॉम्बे टॉकीज, दामले-फत्तेलाल -शांताराम यांचा प्रभात स्टुडिओ, बी एन सरकार यांचा न्यू थिएटर्स, होमी वाडिया यांचा वाडिया मुव्हिटोन, सोहराब मोदी यांचा मिनर्व्हा मुव्हिटोन, चंदुलाल शहांचा रणजित स्टुडिओ हे सुरुवातीच्या काळातले प्रमुख स्टुडिओज होते. या काळात ऐतिहासिक, भक्तिमय, पोषाखी आणि अरेबियन नाईट्सच्या कथांसारख्या चमत्कृतीपूर्ण आणि अद्भुत कथांच्या सिनेमांची निर्मिती ज्यास्त होत होती. मोहिनी भस्मासुर, लंका दहन, श्रीकृष्णजन्म, कालियामर्दन, गोपालकृष्णपासून ते शिरी फरहाद, अल्लाउद्दीन और जादुई चिराग, हिमालय की बेटी सारख्या सिनेमांची रीघ लागलेली असायची. पण पुढे १९३० चं दशक संपता संपता सामाजिक आशयाचे आणि ऍक्शनपॅक्ड सिनेमे येऊ लागले. एकीकडे साथी, स्त्री, जमाना सारखे तर दुसरीकडे टारझन की बेटी, तुफान एक्स्प्रेससारखे मारधाड सिनेमे येत गेले. फियरलेस नादियाचे धाडसी स्टंट्स असणारे हंटरवाली, पंजाब मेल, लुटारू ललना त्याच काळातले!
त्यात वेगळं वळण दिलं ते १९४३ सालच्या बॉम्बे टॉकीजच्या 'किस्मत'ने. अशोककुमार यांच्या अँटी हिरोने चांगलीच खळबळ उडवून दिली होती. लहानपणी हरवलेली भावंडं मोठेपणी सापडणं हे याच सिनेमापासून सुरु झालं. ब्रिटिशांच्या सेन्सॉरशिपला चकवा देत भारतीयांमध्ये देशभक्ती जागृत करणारं 'दूर हटो दूर हटो ऐ दुनियावालो हिंदोस्तान हमारा है" या गाण्याने तर पब्लिकला वेड लावलं. याचे संगीतकार अनिल विश्वास यांनी आणि पाठोपाठ नौशाद यांनी पुढची पाच सहा वर्षं आपल्या संगीताने सिनेसृष्टी गाजवली आणि अवघ्या जनतेला आपल्या गाण्यांवर डोलायला लावलं. मात्र भारतीय सिनेमा हा आशय, विषय आणि सादरीकरणाच्या बाबतीत प्रचंड वेगाने दौडत गेला तो १९४९पासून! अत्यंत मधुर गाणी आणि अप्रतिम शायरीने नटलेल्या गाण्यांसाठी लोक सिनेमांना गर्दी करू लागले आणि कथानकाच्या बरोबरीने संगीत हा भारतीय सिनेसृष्टीचा अत्यंत महत्त्वाचा घटक बनला तो हे ४०च दशक संपतासंपता! १९४९ पासून ऐतिहासिक आणि भक्तिमय विषयांतून बाहेर पडून सिनेमातल्या प्रेम, प्रणय आणि रहस्य अशा विषयांनी प्रेक्षकांवर गारुड केलं. उत्तमोत्तम दिग्दर्शकांच्या बरोबरच आगळे विषय, देखणे आणि संवेदनशील कलाकार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिनेमांच्या यशात महत्त्वाची कामगिरी बजावणारं संगीत (गाणी) यांमूळे १९४९ पासून १९७३ पर्यंतची तब्ब्ल २५ वर्षं हिंदी सिनेसृष्टीत 'सुवर्णयुग' अवतरलं.त्या पंचवीस वर्षांतल्या सिनेमांचं सिंहावलोकन करताना काही महत्वाच्या गोष्टी डोळ्यांसमोर येतात त्या म्हणजे १९४९पासून म्हणजे स्वातंत्र्यानंतर अवघ्या तीन वर्षांत बदलत गेलेली दर्शकांची मानसिकता, सिनेमा बनवण्याचं बदलत गेलेलं तंत्र, वेगवेगळ्या जॉन्रचे येणारे सिनेमे, सिनेमांतून वापरले जाणारे भव्यदिव्य सेट्स, सिनेसंगीतातून सुरु झालेलं ऑर्केस्ट्रेशन, एकाहून एक प्रतिभावान संगीतकार, अद्भुत आवाज लाभलेले विलक्षण गायक आणि गायिका, उत्तमोत्तम कथा-कादंबऱ्यांवर बनवले गेलेले आशयघन सिनेमे आणि स्वातंत्र्यपूर्व काळात असणारी स्टुडियोंची मक्तेदारी संपून सुरु झालेली स्टार सिस्टम! यात एका ठळक गोष्टीची पडलेली भर म्हणजे भारताच्या फाळणीनंतर लाहोर आणि बंगालमधून आणि एकूणच भारताच्या सर्वच मोठ्या राज्यांतून आणि शहरांतून मुंबईच्या मोहमयी सिनेसृष्टीत येऊन दाखल झालेले अनेक गुणी लेखक, कवी, दिग्दर्शक आणि कलाकार! या सर्वांनीच हिंदी सिनेसृष्टीला आपल्या बुद्धिमत्तेनं आणि मेहेनतीनं अफाट आणि दैदिप्यमान सिनेमांची देणगी दिली. सुरुवातीला उर्दू भाषेचा प्रचंड प्रभाव सिनेसृष्टीवर होता आणि बहुतांश सिनेमांच्या श्रेयनामावलीत सिनेमांचा नावसुद्धा इंग्लिशच्या जोडीने उर्दू लिपीतही असायचंच!
१९४९ ते १९७३ मधल्या सुवर्णयुगात सोहराब मोदी, मेहबूब खान, बिमल रॉय, राज कपूर, व्ही.शांताराम, गुरुदत्त, राज खोसला, बी.आर.चोपडा, यश चोपडा, असित सेन, नितीन बोस, विजय आनंद सारख्या दिग्दर्शकांनी सातत्याने उच्च दर्जाचे सिनेमे दिले. त्यांच्या सिनेमांतून अशोककुमार, दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, शम्मी कपूर, धर्मेंद्र, शशी कपूर, मनोज कुमार, राजेश खन्ना, जितेंद्र सारख्या बिनीच्या अभिनेत्यांबरोबरच भारत भूषण आणि प्रदीपकुमार यांनी पडद्यावरचा आदर्श हिरो साकारला तर नर्गिस, मीनाकुमारी, नूतन, गीता बाली, मधुबाला, वहिदा रहमान, माला सिन्हा, वैजयंतीमाला, साधना, शर्मिला टागोर, नंदासारख्यानी पडद्यावरच्या कशी सोशिक तर कधी तडफदार हिरॉइन्स साकारल्या. त्यांना साथ द्यायला जॉनी वॉकर, मेहमूद, धुमाळ, सुंदर, राजेंद्रनाथ, शुभ खोटे, टूनटूनसारख्या कॉमेडीयन्सनी विनोदाची बाजू सांभाळली तर प्राण, के.एन.सिंग, जयंत, नादिरा, शशिकला, ललिता पवार सारख्यांनी खलप्रवृत्ती आपल्या अभिनयानं जिवंत केली. प्रमुख हिरॉइन्ससह कक्कू, हेलन, मिनू मुमताज, कुमकुमसारख्यांनी नृत्याची जादू दाखवली. आणि या सर्वांच्या कामगिरीत भर घातली आणि सिनेमाला रिपीट ऑडियन्स मिळवून देण्यात अत्यंत महत्त्वाचा वाटा उचलला तो सी.रामचंद्र, नौशाद, अनिल विश्वास, शंकर जयकिशन, ओपी नय्यर, सचिनदेव बर्मन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, हेमंतकुमार, रवी, चित्रगुप्त, खय्याम, जयदेव, लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुल देव बर्मनसारख्या अफाट प्रतिभेच्या संगीतकारांनी, साहिर, मजरुह, शकील, हसरत, शैलेंद्र, गुलजार, कैफी आझमी, राजेंद्रकृष्णसारख्या अलौकिक बुद्धिमान शायरांच्या गीतांनी आणि त्या गीतांना अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या लता मंगेशकर, रफी, आशा भोसले, किशोरकुमार, मुकेश, तलत, सुमन कल्याणपूर, मन्ना डेसारख्या स्वर्गीय आवाजाच्या गायक गायिकांनी!! खरंच असं सुवर्णयुग पुन्हा होणे नाही! या १९४९ ते १९७३ मधल्या सुवर्णयुगात ऐतिहासिक, भक्तिरसपूर्ण, सामाजिक समस्या मांडणारे, निखळ प्रेमकथा मांडणारे, कामगार आणि शोषितांची दु:ख मांडणारे आणि हसून लोटपोट करणारे असे वेगवेगळे जॉन्र समर्थपणे हाताळणारे अनेक उत्तमोत्तम सिनेमे आले. पण एक दुवा सर्व सिनेमांत सारखा राहिला तो म्हणजे सुमधुर संगीत! त्याकाळच्या सिनेमांत सात-सात आठ-आठ गाणी असली तरी ती सर्वच गुणगुणावी अशी आणि लक्षात राहून जाणारी. १९७३ नंतर ते जवळपास पुढची वीस वर्षं म्हणजे १९९३ पर्यंत भारतीय सिनेमा हा सूडकथा, गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड यांभोवती फिरत राहिला आणि संगीताचं, गाण्यांचं महत्त्व कमी होत जाऊन अँग्रीयंग मॅन हिरो अशी इमेज असणारे नायक आणि त्यांनी घेतलेला अन्यायाचा बदला अशाच कथा प्रामुख्याने लोकांसमोर येत गेल्या. अमिताभ, धर्मेंद्र, विनोद खन्ना, शशी कपूर, शत्रुघ्न सिन्हा, जितेंद्र पासून ते पुढे जॅकी श्रॉफ, अनिल कपूर पर्यचे अनेकांनी या प्रकारचे सिनेमे केले. अर्थात याही काळात काही सन्माननीय अपवाद होते आणि त्यांनी वेगळी वाट चोखाळली ज्याला आर्ट फिल्म्स किंवा समांतर सिनेमा म्हटलं गेलं. नासिरुद्दीन, अमोल पालेकर, ओम पुरी, फारुख शेख, स्मिता पाटील, शबाना आझमी यांनी अशा प्रकारच्या सिनेमांतून जबरदस्त अभिनयाने आपली छाप टाकली. एकीकडे शोले सारख्या सूडकथेने इतिहास घडवला तर दुसरीकडे श्याम बेनेगल, बासू चॅटर्जी, गोविंद निहलानी, अमोल पालेकर सारख्या दिग्दर्शकांच्या लो बजेट सिनेमांनीही चांगलं यश मिळवलं. १९९३ पासून पुढे अगदी आजपर्यंत (२०१८ सालापर्यंत) भारतीय सिनेमांत अनेक स्थित्यंतरं घडली. संगीतात बदल, कॅमेरा टेक्निकमध्ये बदल, सिनेमाच्या टेकिंग मध्ये बदल आणि एकाच कथेच्या सिनेमांचे पुढे अनेक सिक्वेल्स येणं सुरु झाला. एकाच सिनेमासाठी अनेक संगीतकारांनी संगीत देणं किंवा एकाच सिनेमांत अनेक दिग्दर्शकांनी आपापल्या कथा मांडणं असे प्रयोगही झाले.
भारतीय सिनेसृष्टीतले हे शंभरेक वर्षांतले बदलते ट्रेंड्स आपण कथावस्तू, दिग्दर्शक, कलाकार, संगीत, टेक्निक, फॅशन आणि निर्मिती खर्च अशा अनेक अंगांनी बघूया.
१) कथानक किंवा आशय - भारतीय सिनेसृष्टीच्या सुरुवातीच्या काळात (३०चं संपूर्ण दशक आणि ४० च्या दशकाच्या सुरुवातीला) सिनेमांची कथा ही समाजासमोर आदर्श ठरलेल्या पौराणिक, ऐतिहासिक आणि काही दंतकथांमधल्या व्यक्तिरेखांवर आधारित असायची. त्यामुळे ट्रेक सीन्स, जोशपूर्ण संगीत आणि काहीश्या नाटकी आविर्भावात संवाद म्हणणाऱ्या नटनट्या पाहायला मिळायच्या. ४०च्या उत्तरार्धात हे चित्र बदललं. एकीकडे सामाजिक आशय मांडणारे ‘अछूत’, ‘बंधन’ सारखे सिनेमे तर ‘किस्मत’सारखी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारी कथानकं सादर होत असतानाच प्रेमाचा त्रिकोण मांडणारा ‘अंदाज’ आणि पुनर्जन्माची गूढकथा मांडणारा ‘महल’ सारखा सिनेमा प्रचंड यश मिळवत होता. ५०च्या दशकात प्रेमकथा आणि सामाजिक आशयाच्या सिनेमांनी पडदा गाजवला. शरदचंद्र चॅटर्जी, रबिन्द्रनाथ, प्रेमचंद, बिमल मित्र, बिभूतिभूषण बंदोपाध्याय यासारख्या देशभरातल्या उत्तमोत्तम साहित्यिकांच्या कथा आणि कादंबऱ्यांवर आधारित सिनेमा येत गेल्याने हे दशक दर्जेदार कथानकांसाठी लक्षात राहिलं. ऑल टाइम ग्रेट सिनेमांच्या यादीत स्थान मिळवणारे सत्यजित रे यांचे अपूच्या कहाणीवरचे तीन सिनेमे, गुरुदत्तची अमर प्रेमकथा प्यासा, बिमल रॉय दिग्दर्शित दु:खी प्रेमकहाणी देवदास आणि गरीब शेतकऱ्याची हृदयद्रावक कथा मांडणारा दो बिघा जमीन, मेहबूब खान यांचा भारतीय स्त्रीशक्तीचा अविष्कार मदर इंडिया आणि भारताबाहेर लोकप्रियता मिळवणारा राज कपूरचा आवारा याच कालखंडातले! ६०चं दशक संपून ७०चं दशक सुरु झालं आणि गुन्हेगारी, स्मगलिंग आणि मारधाड कथानकाच्या सिनेमांनी सिनेसृष्टी व्यापली ती पुढे ८० चं दशक संपेपर्यंत कायम राहिली. ९० च्या दशकात पुन्हा सिनेमाची कथानकं प्रेम आणि रोमान्सभोवती केंद्रित होत गेली. थोडक्यात म्हणजे काही काळ धिटाईने वेगळे प्रयोग करणारी काही कथानकं वगळता, एकुणात कथेच्या बाबतीत भारतीय सिनेमांनी मनोरंजन हेच निखळ उद्दिष्ट ठेवलं होतं. मजा म्हणजे बहुतेक सिनेमांच्या कथेत हिरोला वडील नसायचे तर हिरॉईनची आई नसायची. हिरो श्रीमंत असला तर हिरॉईन हटकून गरीब असायची किंवा व्हाइसे वर्सा!! पण तरीही सगळे अडथळे पार करत, गाणीबिणी म्हणत दोघे शेवटी एकत्र यायचेच. मेजॉरिटी सिनेमांमधून एक पथ्य कटाक्षाने पाळलं जायचं ते म्हणजे शेवटी सत्याचा विजय होणं किंवा काही आशावादी घडणं!! नवीन ट्रेंड्सनुसार काल्पनिक आणि सत्यकथांबरोबरच हयात असलेल्या काही व्यक्तीच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांवर आधारित बायोपिक्ससुद्धा लोकांसमोर येऊ लागल्याहेत. मधल्या काळात कमालीच्या शहरीकरणामुळे शहरी आणि परदेशी झगमगाटी दुनियेच्या कथा मांडणारा सिनेमा आता पुन्हा छोट्या छोट्या गावातल्या कथाही मांडू पाहात आहे आणि बरेली की बर्फी, दम लगा के हैशा किंवा आँखो देखी सारखे छोट्या गावातले सिनेमेही प्रेक्षकांना पसंत पडताना दिसताहेत. पाश्चात्य सिनेसृष्टीप्रमाणेच आता भारतातही यशस्वी सिनेमांचे सिक्वेल येणं (पुढचे भाग) सुरु झालंय आणि त्यासाठी कथाकार आणि पटकथाकार शक्कल लढवून नवनवीन रूपात लोकांसमोर त्याच कथानायकांच्या कथा सादर करत आहेत. क्रिश, धूम, बाहुबली, सरकार, दबंग, गोलमाल, हेराफेरी सारख्या सिनेमांचे सिक्वेल्स यशस्वी ठरल्याचीही उदाहरणं आहेत. याचबरोबर एक आगळावेगळा प्रयोग होताना दिसतोय तो म्हणजे अँथॉलॉजी फिल्म्स ज्यात एका थीमवर आधारित किंवा एखाद्या विचारावर/ मुद्यांवर आधारित चारपाच छोट्या फिल्म्स त्याही वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या एक फिल्म म्हणून रिलीज केल्या जातात आणि त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतोय.
२) दिग्दर्शक - अगदी सुरुवातीपासून सिनेतंत्राची उत्तम जाण, संगीताचा कान आणि समाजमनाचं भान असणारे एकाहून एक दिग्गज दिग्दर्शक सिनेसृष्टीला मिळत गेले. पीसी बरुआ हे सुरुवातीच्या काळचे प्रयोगशील दिग्दर्शक होते. त्यांनींच सर्वप्रथम १९३१ साली ‘अपराधी’मधून कृत्रिम प्रकाशात शूटिंगची सुरुवात केली आणि १९३४ साली ‘रुपलेखा’मधून फ्लॅशबॅक तंत्राचा वापर केला. तिकडे १९३३ साली मल्याळम दिग्दर्शक पीव्ही राव यांनी ‘मार्थण्ड वर्मा’ सिनेमातून पहिलं चुंबन दृश्य दाखवण्याचं धाडस केलं. त्याआधी १९२६ साली फातिमा बेगम हिने पहिली स्त्री दिग्दर्शिका म्हणून सिनेसृष्टीत इतिहास रचला. सिनेमा बोलायला लागल्यावर गाण्यांची रेलचेल असणारे सिनेमे येण्याच्या काळातच जमशेद वाडिया यांनी ‘नौजवान’ हा गाणं-विरहित रहस्यप्रधान सिनेमा बनवला होता. सोहराब मोदींनी ऐतिहासिक आणि पोषाखी सिनेमांची परंपरा राखली, राज कपूरने भाबड्या हिरोच्या नजरेतून समाजातल्या विसंगती टिपल्या, बिमल रॉय यांनी एकाहून एक ताकदीच्या कथांमधल्या व्यक्तिररेखा पडद्यावर जिवंत केल्या, व्ही.शांताराम यांनी समाजभान राखत आपले सिनेमे बनवले. गुरुदत्तच्या सिनेमांचं सातासमुद्रापार कौतुक झालं, श्याम बेनेगल, मणी कौल, गोविंद निहलानी, केतन मेहता, सईद अखतर मिर्झा यांनी जबरदस्त कलात्मक सिनेमा पेश केला. बासू चॅटर्जी, हृषीकेश मुखर्जी, गुलझार यांनी हलके फुलके सिनेमे बनवले तर मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा सारख्यांनी तद्दन मसाला फिल्म्सची रांग लावली. आधी विजय आनंद, नासिर हुसेन आणि नंतर यश चोपडा सारख्यांनी दर्जेदार यशस्वी सिनेमे दिले. आजच्या ताज्या दमाच्या पिढीतही झोया अख्तर, मेघना गुलझार, फरहान अख्तर, आशुतोष गोवारीकर सारखे काहीजण काही वेगळा आशय घेऊन तरुण पिढीसमोर येत आहेत. तिकडे बंगालमध्ये सत्यजित रे, ऋत्विक घटक, मृणाल सेन, ऋतुपर्ण घोष, अपर्णा सेन; मराठीमध्ये राजा परांजपे, सई परांजपे, अमोल पालेकर, राजदत्त, सुमित्रा भावे-सुनील सुखठणकर तर मणीरत्नम, के विश्वनाथ, प्रियदर्शन, शंकर सारख्ये दाक्षिणात्य दिग्दर्शकांनी वर्षानुवर्षं सिनेमे गाजवले आहेत. या सर्वांचीच सिनेमा तंत्रावर घट्ट पकड असल्याचं जाणवतं आणि राकेश मेहरा, राजकुमार हिरानी, राकेश रोशन, करण जोहर सारख्यांना आजच्या आजच्या प्रेक्षकांची नस अचूक समजल्याचंही त्यांच्या दिग्दर्शनातल्या सफाईतून जाणवतं. काही दिग्दर्शक वेगवेगळे प्रयोग करू पाहत आहेत. चक्क मोबाईलवर फिल्म शूट करून ती युट्युबवरून किंवा नेटफ्लिक्स वरून रिलीज करण्याचे धाडसी प्रयोग होताना दिसतायत.
३) कलाकार - भारतीय सिनेमांच्या शंभर वर्षांच्या इतिहासात अक्षरशः शेकडो जबरदस्त कलाकार वेगवेगळ्या भाषांमधून लोकांसमोर येत गेले आणि त्यांनी आपल्या अदाकारीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवला. सुरुवातीच्या ४०च्या दशकात सोहराब मोदी, चंद्रमोहन, पृथ्वीराज कपूर, मुराद सारख्या भारदस्त आवाजाच्या अभिनेत्यांनी आपली छाप पाडली, तर ५० आणि ६०च्या दशकात देखण्या चेहेऱ्याच्या आणि जोडीला चांगला अभिनय करणाऱ्या राज, दिलीप, देव, राजेंद्रकुमारसारख्या कलाकारांनी. त्यांच्याच जोडीला अंगात उत्तम रिदम असल्याने गाणं जिवंत करणारे शम्मी, जितेंद्र, शशीसारखे कलाकार लोकांना भावले. त्याच काळात दक्षिणेला शिवाजी गणेशन यांनी एकाच सिनेमात नऊ भूमिका साकारण्याचा विक्रम केला. तर सुनील दत्तने आपल्याच ‘यादे’ सिनेमातून संपूर्ण सिनेमा फक्त स्वतःची एकट्याची एकच भूमिका ठेवून लोकांसमोर आणायचं धाडस केलं. पुढे ज्यांना ‘मचो’ म्हणता येईल अशा, व्यायामाने कमावलेलं पिळदार शरीर असणाऱ्या धर्मेंद्र,विनोद खन्नासारख्या अभिनेत्यांची फळी आली आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत पुढे अक्षयकुमार, सलमान, आमिर आणि ह्रितिक रोशनने आपली छाप पाडली. भारतीय सिनेमातल्या अभिनेत्री या मात्र नेहेमीच सुंदर दिसणाऱ्या ( मधुबाला,साधना), उत्तम नृत्य करू शकणाऱ्या (वॆजयंतीमाला, आशा पारेख, हेमामालिनी) असाव्यात अशी निर्माता/ दिग्दर्शकांइतकीच बहुदा प्रेक्षकांचीही अपेक्षा असायची. पण नूतन,नर्गिस, मीनाकुमारी, वहिदा, गीता बालीची परंपरा राखत स्मिता पाटील, शबाना, तब्बूपासून अगदी नवीन पिढीच्या आलीया भटने अभिनयात उत्तम कामगिरी केलेली दिसते. कथेमधल्या पात्रांना पडद्यावर जिवंत करण्याची कामगिरी करताना यातल्या काहीजणांची आपली स्वतःची अशी एक विशिष्ट अभिनयशैलीसुद्धा तयार झाली होती. अनेक वर्षं त्या त्या काळातल्या लोकप्रिय नट-नटयांनी वय वाढलं तरीसुद्धा कॉलेजकुमार/कुमारिकेच्या केलेल्या भूमिका खपून जात होत्या, पण ९०च्या दशकानंतर मात्र कॉलेजचा काळ दाखवण्यासाठी ऐन विशी-पंचविशीतलेच हिरो-हिरॉईन आवर्जून घेण्याचा प्रघात सुरु झाला. पण राजकुमार, देव आनंद, अमिताभ, शत्रुघ्न सिन्हाच्या विशिष्ट लकबीत बोलल्या जाणाऱ्या संवादफेकीला जशी लोकप्रियता होती तशी मात्र नंतरच्या काळात कुण्या अभिनेत्याच्या वाट्याला आली नाही. नूतन, वहिदा, मीनाकुमारीच्या चेहेऱ्यावरचा हावभावांतून, बोलक्या डोळ्यांतून ज्या समर्थपणे भावना प्रकट व्हायच्या आणि तीच त्यांच्या अभिनयाची ओळख बनायची तशी मात्र पुढल्या पिढ्यातल्या अनेक अभिनेत्रींना तयार करता आली नाही. पूर्वी गाण्यातल्या भावना समजून उमजून त्याप्रमाणे हिरोहिरॉइन्स ते गाणं साकार करावं लागे. आणि त्यातूनही त्यांची काव्याची आणि गाण्याची समज दिसून येत असे, उदाहरणार्थ ‘सीमा’ मध्ये नूतन जेव्हा ‘मनमोहना बडे झुटे’ गाते तेंव्हा गाणं लता गात नसून तीच गात्ये असा जबरदस्त आभास निर्माण करण्याची ताकद नूतनमध्ये होती. नंतरच्या काळात गाण्याचे बोल काहीही असोत, अर्थ काहीही निघो पण २५-३० सहकलाकारांच्या साथीने हिरो-हिरॉईनने कुठेतरी बागेत, डोंगरपठारावर किंवा समुद्रकिनाऱ्यावर कवायती सदृश्य नाचणे असं गाणं सादर होऊ लागलं. पडद्यावरच्या कलाकारांना पूर्वी शालीनतेच्या एका मर्यादेपर्यंत सीमित असायला लागायचं तेसुद्धा पुढच्या काही वर्षांतच बदलत गेलं आणि आता तर (सेन्सॉरशिप जवळजवळ संपुष्टात आल्याने-) अत्यंत बोल्ड आणि स्फोटकदृश्य (विशेषतः नेटफ्लिक्स किंवा वेब्सिरीजसारख्या माध्यमांतून) अगदीच सहजतेने देणारे कलाकार या सिनेजगतात बहुतांशाने आढळतात.
४) संगीत - भारतभर खेड्यापाड्यांतून, गावागावातून, शहरांतून जन्मणारं मूल हे कुठेना कुठे चालू असलेलं संगीत ऐकतच जन्मतं. आणि या संगीताचा प्रभाव इतका की माणसाच्या आयुष्यातल्या सर्वच प्रसंगात संगीत हे अविभाज्य भाग बनून जातं आणि परिणामस्वरूप सिनेमांमध्ये कुठल्याही प्रसंगात (जन्म, बारसं, झोपेची वेळ, बागेतले खेळ, तरुणपणातलं प्रेम, लग्न, हनिमून, सुहाग रात, राखी पौर्णिमा, भाऊबीज, होळी, गणपती, दिवाळी, ईद) गाणी ही अपरिहार्यपणे येतातच! भारतीय सिनेमांतली गाणी ही सर्व प्रकारच्या वाहनांतून म्हटली गेलेली आढळतात. अगदी सायकल, बैलगाडी, टांगा, स्कुटर, बाईक, कार, जीप, बस, होडी, जहाज, रेल्वेपासून ते हेलिकॉप्टर आणि विमानापर्यंत सर्वत्र! सुरुवातीच्या बोलपटांच्या काळात सिनेमांचं संगीत हे नाटकी किंवा लोककलेच्या ढंगाने जाणारं होतं. अनिल विश्वास आणि नौशाद सारख्यांनी केलेले संगीतातले प्रयोग पुढे शंकर-जयकिशन जोडीने कुठल्या कुठे नेऊन पोहोचवले. सहसा मोजक्या वादकांसह असणारा ऑर्केस्ट्राचा ताफा त्यांनी प्रचंड मोठा करत एकाचवेळी शेकडो वादकांचे ताफे वापरून पार्शवसंगीतात क्रांतीच केली. अण्णा चितळकर उर्फ सी.रामचंद्र यांनी पाश्चात्य रॉक एन रोल पद्धतीच्या धमाल चाली वापरून पब्लिकला वेडं केलं तर ओपी नय्यरनी टांग्याच्या एकाच साध्या सोप्प्या ठेक्यावर एकापाठोपाठ एक अनेक गाणी लोकप्रिय करून दाखवली. सचिनदा, सलिलदा, हेमंतकुमार यांनी पारंपरिक लोकधून आपल्या चालींतून जिवंत केल्या. रोशन यांनी कव्वाली प्रकार लीलया हाताळला तर मदन मोहन यांनी गझलांवरची आपली हुकूमत दाखवत लोकांना वेडं केलं. कल्याणजी आनंदजी, लक्ष्मीकांतप्यारेलाल सारख्या जोड्यांनी मेलडीची साथ सोडली नाही. पुढे राहुलदेव बर्मन यांनी पाश्चिमात्य सुरावटी आणि इंस्ट्रुमेंट्स वापरून संगीत लोकप्रिय केलं. सुरुवातीपासून पहिली तब्ब्ल पन्नासेक वर्षं, एका सिनेमांत शक्यतो एकाच गायकाचा आवाज हिरोसाठी तर एकाच गायिकेचा आवाज हिरॉईनसाठी वापरण्याचा प्रघात होता आणि त्यामुळे रफी, किशोर कुमार, मुकेश, लतासारख्यां गायक गायिकांच्या विशिष्ट हिरोंहिरॉइन्ससाठी जोड्याही बनत गेल्या आणि लोकांच्या मनांत रुजल्या. पण ९० च्या दशकानंतर मात्र हे चित्र मोडीत निघालं आणि एकाच सिनेमांत हिरो किंवा हिरॉइन्स हे अनेक गायक/ गायिकांच्या आवाजात गाणी गाताना दिसू लागले आणि हिरो-हिरॉईन्सचं गायक/गायिके बरोबर पूर्वी हमखास असणारं नातं तुटलं. आरडीने प्रथम स्टिरिओ आणि डॉल्बीचा वापर सुरु केला. नंतरच्या जमान्यात मात्र कॉम्प्युटराइझ्ड संगीत लोकांना आवडत गेलं आणि ट्रॅक म्युझिकचा जमाना आला. एकेकाळी प्रामुख्याने लोकसंगीत आणि शास्त्रीय रागदारींवर बांधलेल्या चाली असत, पूर्वीसारखी मेलडी, हार्मनी आता दुर्मिळ झाल्ये आणि हाय पिच आणि कॉम्प्युटराईझ्ड वाद्यमेळाचा आणि रिमिक्सेसचा जमाना आलेला आपण पाहतो. पाश्चात्य प्रकारच्या चाली आणि डान्सप्रकार संगीतात अवतरले. आजच्या पिढीत एआर रेहमानने संगीतात क्रांतीच केल्ये. ३००० स्क्वेअर फुटाच्या चेन्नईमधल्या त्याच्या स्वतःच्या रेकॉर्डिंग स्टुडियोमध्ये आश्चर्यकारक इक्विपमेंट्स आहेत आणि त्याचा वापर करून रहमान काही जादुई संगीत तयार करत असतो.
५) फॅशन - फॅशन्सचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे काळानुरूप आणि जगभरच्या ट्रेंड्सप्रमाणे बदलत राहणं आणि नेमकं तेच भारतीय सिनेसृष्टीत आपल्याला पाह्यला मिळतं. त्याची ठळक, जाणवणारी आणि लोकांना पसंत पडून लोकांकडून आचरणात आणली जाणारी पहिली सोप्पी फॅशन म्हणजे हेअरस्टाईलची! देव आनंदचा कोंबडा आणि पुढे अमिताभ, शशी कपूर, विनोद खन्ना स्टाईल कान झाकून मानेपर्यन्त रुळणारे केस सेट करून घेण्यासाठी लोकं सलूनमध्ये जायला लागली. मुलींमध्ये साधना कट तर प्रचंड लोकप्रिय होता. (आताश्या, फ्लॉवरचा गड्ड्याप्रमाणे किंवा कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे दिसणाऱ्या मश्रुम नामक भीषण हेअरस्टाईलचा जमाना आलाय म्हणे!) ब्रिटिशांच्या काळात शर्ट (झब्ब्याप्रमाणे डोक्यातून घालायचा सदरा) लोकप्रिय होता तो मागे पडून अनेक बटणांच्या बुश-शर्टची फॅशन आली. अंगात जर्किन किंवा स्वेटर आणि गळ्यात स्कार्फ किंवा मफलर घालणाऱ्या हिरोंचा जमाना आला. ७० नंतरच्या दशकांत तर हिरो कितीही गरीब असला तरी त्याला वाट्टेल त्या फॅशनचे कपडे, रेक्झीनची जॅकेट्स, शूज वगैरे परवडायचे! राजेश खन्नासारख्या अफलातून फेनॉमिनन सुपरस्टारच्या क्रेझमुळे त्याच्यासारखा नाकाच्या शेंड्यावर गॉगल घालून आणि त्यानेच लोकप्रिय केलेला बंद गळ्याचा गुरुशर्ट घालून फिरणारे हज्जारो तरुण भारतभर दिसायला लागले होते. कालानुरूप आधी हिरोची पॅण्ट टाईट फिटिंगची आणि नॅरो बॉटमची असायची ती अचानकच ७०-८०च्या दशकात बेलबॉटम होऊन रस्ते झाडायला लागली. कमरेचे बेल्ट्ससुद्धा आधी बारीक, मग भलतेच जाडजूड आणि मग पुन्हा बारीक असे बदलत गेले. मुलींमध्येसुद्धा पडद्यवरच्या लाडक्या हिरॉइन्सप्रमाणे सुरुवातीच्या काळात ब्लाउज आणि साड्यांची फॅशन आणि पुढे पुढे हिरॉइन्सच्या फॅशन्सनुसार ड्रेसेसची फॅशन येत गेली. चष्मा-गॉगल्सच्या फ्रेमसुद्धा सिनेमात असतील त्याप्रमाणे रस्त्यावरच्या मुलामुलींच्या डोळ्यांवर दिसायला लागल्या होत्या. कपड्यांचं तर विचारायलाच नको. पूर्वी एक गाणं संपेपर्यंत एकाच ड्रेसमध्ये वावरणारे हिरोहिरॉइन्स नंतर मात्र गाण्याच्या प्रत्येक कड्व्यांत वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये दिसायला लागले आणि त्यांच्या ड्रेसेससाठी ख्यातनाम फॅशन डिझायनर्सना कामं मिळायला लागली.
६) टेक्निक आणि निर्मिती खर्च - याबाबतीत तर सिनेक्षेत्रात कमालीची क्रांती झालेली दिसून येते. मूकपटातून बोलपटाकडे झालेला प्रवास निर्मितीखर्चात वाढ करून गेला पण सिनेमांवर लोकांच्या उड्या पडायला लागल्यावर निर्मात्यांना भरभरून पैसेही मिळायला लागले. यातूनच पुढे सढळपणे खर्च करून सिनेनिर्मिती सुरु झाली. सुरुवातीला बहुतांशी स्टुडियोतच सेट्स उभे करून चित्रित केली जाणारे सिनेमे त्यानंतर मात्र आउटडोअर लोकेशन्सवर जाऊन पोहोचले. भारतभरची खास निसर्गरम्य ठिकाणं प्रेक्षकांना बघायला मिळू लागली. कथानकाच्या गरजेनुसार गावात जाऊन, डोंगरकपारीत जाऊन शूटिंग्ज होऊ लागली. ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या सिनेमांसाठी थेट किल्ल्यांमध्ये जाऊन शूटिंग होउ लागलं. एके काळी स्टुडियोत कश्मीरचे सीन्स उभे राहायचे त्याच कश्मीरमध्ये जाऊन मुक्काम ठोकून शेकडो फिल्म्स मधली गाणी आणि कथेचे प्रसंग शूट होऊ लागले. राज कपूरसारख्या शो-मन ने तर थेट युरोपचं दर्शन ‘संगम’मधून समोर आणलं. ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना जाऊन बहुतांशी सिनेमे हे इस्टमनकलर मध्ये किंवा टेक्निकलरमध्ये चित्रित होऊ लागले.सिनेमा हे माध्यमच मुळी स्वप्नरंजन करणारं त्यामुळे कथा भलेही भारतात घडणारी असो तरी त्यातल्या हिरोहिरॉईनच्या तोंडच्या गाण्यात मात्र दोघंही सातासमुद्रापार अमेरिका, इंग्लंड,स्वित्झर्लंड, इटली, इजिप्त, ऑस्ट्रलिया अक्षरशः कुठेही क्षणार्धात पोहोचून एकेक कडवं गाऊ लागले. ३५ मिमीचा सिनेमा आधी वाईड अँगल सिनेमास्कोप आणि नंतर ७०मिमी चा बनला. पुढे पुढे तर त्यात तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे ३-डी , ४-डी, ५-डी इफेक्ट्स मिळणं सुरु झालं. ध्वनीतंत्रात थक्क करणारी प्रगती होऊन सराउंड साउंड टेकनॉलॉजीमुळे प्रेक्षकांना विलक्षण जिवंत आवाजाचा अनुभव मिळायला लागला. सिनेमॅटोग्राफीमध्ये कल्पनेपलीकडचे तांत्रिक आविष्कार आले. ग्राफिक्स आली. ते तंत्र वापरून बनलेला बाहुबलीसारख्या सिनेमाने लोकांना अक्षरशः वेड लावलं. सुरुवातीच्या काळात बनणारे सिनेमे मोठ्या बजेटचे नसत. ७०च्या दशकात तर NFDC सारख्या सरकारी संस्थांच्या आर्थिक पाठबळामुळे न्यू वेव्ह सिनेमे येऊ शकले होते. पण आता मात्र सिनेमांचा निर्मितीखर्च शेकडो आणि हजारो कोटींच्या घरात जाऊन पोहोचला आहे. महागडं तंत्रज्ञान, अद्ययावत सिनेमॅटोग्राफी आणि भव्यदिव्य सेट्स त्यामुळेच पाहायलाही मिळत आहेत. कथा, दिग्दर्शक आणि कलाकार यांच्याहूनही त्यांना पूरक असणारी कास्टिंग, सिनेमॅटोग्राफी, मेकअप, ड्रेस डिझाईन, सेट डिझाईन अशा विभागांची स्वतःचीच एक मोठी इंडस्ट्री बनल्ये.
पूर्वी कधी नव्हते एव्हढ्या संख्येने भारतभरच्या विविध भाषांमध्ये आता दरवर्षी फिल्म महोत्सव आयोजित होत आहेत. अशाप्रकारे आज जागतिक स्तरावर जाऊन पोहोचलेली भारतीय सिनेसृष्टी नित्यनवे ट्रेंड्स अंगीकारत वेगाने बदलत जाताना आपण पाहत आहोत...!!