तीन देवियाँ
--------
असे फार क्वचितच कुठले सिनेमे असतील की ज्यांच्यामधल्या मेन कॕरॕक्टर्सची नावं ही त्यांची प्रत्यक्ष जीवनातली खरी नावंच असतात. तर या सिनेमात तसं आहे! देवसाबचं नाव देव आनंद, नंदाचं नंदा, कल्पना मोहनचं कल्पना, सिम्मी ग्रेवालचं सिम्मी आणि आय.एस.जोहरचं आय.एस.जोहर अशीच नावं आहेत त्यांनी रंगवलेल्या कॕरॕक्टर्सची!!
अंदरकी बात अशी की हा सिनेमा देवसाबनेच दिग्दर्शित केला होता, पण पडद्यावर डायरेक्शनचं क्रेडीट मात्र त्याने अमरजीतला दिलं!
सिनेमाच्या सुरुवातीला अमीन सायानींच्या आवाजात निवेदन ..ते सांगतायत कुठल्याही पुरुषाच्या आयुष्यातलं स्त्रीचं, प्रेयसीचं महत्त्वं! मग काहींच्या नशिबी "टुडूक्" तर काहींच्या नशिबी "धडाम्"...कभी बात बनती है, कभी बिगडती है...आणि मग अमीनजी सांगतात "आईये ..मिलीये ऐसे एक नौजवानसे जिसकी बात एक नही, दो नही, तीन तीन देवियोंसे बननेवाली है..याने टुडूक्..टुडूक्..टुडूक्..!!"...आणि पुढे खरी गोम कारण प्रत्येक टुडूक्बरोबर एक गोची (उलझन)..कारण देवसाब बिचारा भोळा ..त्याला कुणाला नाही म्हणणं नाहीच जमत!..(हे बाकी माझ्यासारखंच!! ;-) ) ...
म्युझीकल इन्स्ट्रुमेंट्स विकणा-या आय.एस.जोहरच्या कंपनीत काम करणारा देव शायरसुद्धा आहे. त्याच्या आयुष्यात वेगवेगळ्या वळणावर तिघीजणी येतात..त्याच्या प्रेमातही पडतात...आणि मग त्या तीन देवियाँमधनं त्याला एकीची निवड करायची असते त्याचा हा सिनेमा!
तो ज्या लाॕजिंग/बोर्डिंगमधे राहतोय तिथे त्याच मजल्यावर समोरच्या बाजूला नंदा राहत्येय. सिम्पल मुग्गी! त्यांची पहिली भेट ही लता आणि किशोरकुमारच्या आयुष्यात घडलेल्या त्यांच्या पहिल्या भेटीच्या मजेशीर प्रसंगाशी पॕरलल जाणारी! म्हणजे तिला जिथे जायचंय त्याच ठिकाणी तोही निघालाय. तिच्या मागेमागे...तिला वाटतं तो कुणी लोफर, लफंगा तिच्या मागेमागे पाठलागावर...पण मग कळतं तो ती राहत्येय त्याच लाॕजमधे समोरच्याच ब्लाॕकमधे राहायला आलाय...आणि मग त्यांची नजरानजर आणि ते रफीसाबचं अतीव मधाळ गाणं "ऐसे तो ना देखो,."
त्यांची दोस्ती फुलू लागते...
इकडे जोहरने त्याच्या शायरीवर खुष होऊन आपल्या मित्राकरवी देवचं पुस्तक छापलंय आणि देवला प्रसिद्धी मिळू पाहत्येय...देव आपल्या कवितांचं पुस्तक नंदाला भेट देतो...तिच्याबरोबर आऊटिंगला जातो...तिथे त्यांचं मुक्त फिरणं आणि बेमिसाल गाणं "लिख्खा है तेरी आँखोमें..."
दरम्यान नंदापाठोपाठच आणखी दोन देवियाँ देवच्या आयुष्यात येतात...एका योगायोगाने त्याची कल्पनाशी गाठ पडते. कल्पना ही फिल्म इंडस्ट्रीतली अॕक्ट्रेस...तिला देव भावतो कारण तो फिल्म इंडस्ट्रीतल्या इतरांसारखा लाळघोटेपणा न करता तिच्याशी एक मित्रासारखाच वागतो..
सिम्मी त्याला भेटते तीही योगायोगाने. ती एका उच्चभ्रु खानदातली मुलगी!...
कल्पनाबरोबर तो शुटींग बघायला म्हणून आउटडोअरला जातो. त्यावेळी त्यांचं "अरे यार मेरी तुम भी हो गजब" हे धमाल गाणं तर पाठोपाठच सिमीकडच्या पार्टीत "ख्वाब हो तुम या"...हे वेड लावणारं गाणं येतं..
कथेत आता रंग भरायला लागतो आणि आपणही भान विसरत गुंगू लागतो...की ह्या तिघींपैकी त्याला नक्की कोण हव्येय?
पुढे देव सिम्मीबरोबर कश्मीरला जातो. तिथे हाऊसबोटीत त्याला मुशाय-यात शायरी पेश करायला बोलावलं जातं आणि तिथे रफीसाबचं अप्रतिम गीत "कही बेखयाल होकर..."
चिकणा देवसाब म्हटलं की छानछान गाणी ओघानेच आली! माझ्या लाडक्या सचिनदांचं (तमाम भारताच्या मते म्युझिकचा देव वगैरे असणा-या राहुल देवच्या बापाचं) म्युझिक!! एक्काहून एक बेमिसाल गाणी! मला नेहेमीच 'सचिनदा-रफी-देवसाब' हे खल्लास काँम्बिनेशन वाटत आलंय! आणि सचिनदांचं वैशिष्ट्य की ते गाण्याच्या, शब्दांच्या मूडनुसार सिलेक्टीव्ह असायचे! देवसाबसाठी किशोर कधी आणि रफीसाब कधी कुठे हवा त्याबाबतीत!! (मग नौ दो ग्यारहमधे "हम है राही आणि आँखोमे क्या जी" किशोरला असली तरी "सो ज्जा निंदीया की बेला है"साठी रफीसाबच हवा...मुनीमजी, फंटुश, पेईंग गेस्टसाठी किशोर असला तर काला पानी, काला बाझार, मंझील, बात एक रात की, तेरे घर के सामने सलग सगळे रफीसाब असायचे...आणि मग गाईडमधे गाता रहे किशोरचं असलं तरी "तेरे मेरे सपने, दिन ढल जाये आणि क्या से क्या" रफीसाबची...ज्वेलथीफ मधे "ये दिल न होता, आसमाँ के नीचे" किशोरची तरी "दिल पुकारे"साठी रफीसाब!...गँम्बलरमधे "चुडी नही ये मेरा, दिल आज शायर, अपने होठो की बन्सी, दिल तू खिलाडी" किशोरची असली तरी "मेरा मन तेरा प्यासा" रफीसाबचंच!...तसंच या "तीन देवियाँ मधेही -"अरे यार मेरी, ख्वाब हो तुम या, लिख्खा है तेरी" किशोरची असताना "ऐसे तो ना देखो आणि कही बेखयाल होकर मुझे छू लिया किसीने" ही रफीसाबची!!..
"ऐसे तो ना देखो.." हे गाणं सुरुवातीलाच नंदासाठी आणि नंतर ड्रीम सिक्वेन्समधे कल्पना आणि सिम्मीसाठी येतं! (ह्या अख्ख्या ब्लॕक अँड व्हाईट" फिल्ममधे तो हिप्नाॕटिक स्स्पेलमधला ड्रीम सिक्वेन्स तेव्हढा कलर मधे घेतलाय दिग्दर्शक अमरजीतने!)
देवच्या आयुष्यात एकामागोमाग एक आलेल्या तिघींना तो आवडलाय..त्यालाही तिघी आवडल्यात! (मला खूपच ओळखीचंहे कॕरॕक्टर) ;-) ...फक्त एकच..यात देवसाबच्या तोंडी जी कमाल काँन्फिडन्सची ओळ दिल्येय नं मजरुहसाहेबांनी त्याला केवळ सॕल्यूट!! "लिख्खा है तेरी आँखोंमे.." गाण्यात देवसाब नंदाला, "matter of factly सांगतो -"थोडासा हंसीनो का सहारा लेके चलना, है मेरी आदत रोजाना.."!! हे फक्त देवसाबच म्हणू शकतो आणि हे फक्त देवसाबलाच शोभू शकतं!!! (आपण फक्त ही ओळ मनात स्वतःशी म्हणत..मनातल्या मनात स्वतःशी खूष व्हायचं..बस्स! :-D )...
तर सांगायचं म्हणजे देवसाब समोर तिघी लग्नाचा प्रस्ताव ठेवतात..त्याच्यासमोर यक्षप्रश्न ."खरंच आपलं खरं प्रेम कुणावर आहे? नंदावर? कल्पनावर? की सिम्मीवर? ..
आणि मग या कन्फ्युजनमधनं बाहेर पडण्यासाठी देव थेट एका हिप्नाॕटिस्टची मदत घेतो...तीन देवीयाँमधल्या कोणत्या देवीची तो निवड करतो आणि का?..ते शेवटी समजतं..तेही अगदी एका गोड प्रकारे....!!
कुणी पाहिला नसेल तर टाटा स्काय ३१८वर असू शकेलच परत..(नाहीतर यूट्युब झिंदाबाद!)..पण पाहाच्च! देवसाबसाठी! गाण्यांसाठी!!
आणि या ओळीसाठी -"थोडासा हसीनो का सहारा लेके चलना, है मेरी आदत रोजाना..." 😍😍
No comments:
Post a Comment