-------
कधीकधी ज्याम प्रश्न पडतात!
हिंदू धर्मात 'अविनाशी' आत्म्याची संकल्पना आहे.
भगवद्गीतेत "वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णा- न्यन्यानि संयाति नवानि देही" - वगैरे वाचून आपल्याला कळलेलं असतं की मनुष्य जसा देहावरची जीर्ण वस्त्रं बदलतो, तसा आत्मा देह बदलतो...पण तो स्वतः अमर असतो!
राॕय किणीकरांची चारोळी आपल्याला पाठ असते-
"हा देह तुझा, या देहातील तू कोण?
हा देह तुझा, या देहावीण तू कोण?
हा देह जन्मतो, वाढत जातो, सरतो.
ना जन्म, मरण ना, या देहातील 'तो' म्हणतो"
मी यासंदर्भात थोडं वाचन केलेलं आहे...मेधाशी तर तिच्या डाॕक्टरेटचा आणि "आत्म्याचा प्रवास आणि मृत्युपश्चात जीवन" पुस्तकाच्या प्रवासाचा साक्षीदार असताना आमच्या गप्पांमधे वेळोवेळी 'आत्मा, पुनर्जन्म आणि तत्संबंधी' विषय येऊन जात असत...
मी असं काही वाचतो किंवा ह्याविषयी बोलायला लागतो तेव्हा-"प्रसन्न काहीतरी वेड्यासारखं वाचतो आणि बडबडतो..." अश्याच साधारण नजरेनं समोरचा/ समोरची बघतात...
आज एक ताजाताजा विचार आलाय डोस्क्यात!
जाणकारांनी प्रकाश टाकावा म्हणून लग्गेच मनात आल्याआल्या लिहून मोकळा होततोय as usual
हां तर, हे आपल्याला ठाऊक आहेच की - पृथ्वीचं वय साधारणपणे ४.५ अब्ज (बिलियन) वर्ष आहे असा वैज्ञानिकांचा कार्बन डेटींग किंवा रेडिओमेट्रिक डेटींगवरुन काढलेला अभ्यास सांगतो. आणि पृथ्वीवर सायनोबॕक्टेरियांचं अस्तित्व आलं साधारण २.५ अब्ज (बिलियन) वर्षांपूर्वी!..आणि पुढे मग पृथ्वीवरच्या वातावरणातलं आॕक्सीजनचं प्रमाण वाढत गेलं...सायनोबॕक्टेरिया हेच पहिले सजीव मानले आणि त्यांच्यापासून पुढे सगळ्या वनस्पती आणि जलचर-भूचर-उभयचर (सूक्ष्मजीव, जीवाणू, मासे, प्राणी, पक्षी, कीटक, माणसं..सगळ्या ८४ लक्ष योनी Genus ) जन्मले मानलं...तर मग पृथ्वीवरच्या त्या सा-या सजीवांमधे आत्मा शिरला तेव्हाच त्यांना जीवन प्राप्त झालं असणार. बरोबर?
पण मग जसजसे अब्जावधी वनस्पती आणि प्राणीपक्षीमासेकीटकमाणसं जन्मत गेले आणि त्यांचं पुनरुत्पादन होतहोत पृथ्वीवर त्यांची संख्या अनेक अब्ज-अब्ज-अब्जांत जाऊन पोहोचली तर त्या इतक्या सा-या सजीवांच्या देहांमधे ते जे सारे आत्मे शिरले ते तोपर्यंत होते कुठे पृथ्वीचा जन्म होऊन मग पृथ्वीच्या पाठीवर जीवन अवतरेपर्यंत?
म्हणजे ते ह्या ब्रह्मांडातच फिरत होते??
पण म्हणजे ते इतके अब्जावधी आत्मे तोपर्यंत ह्या आपल्या सध्याच्या पृथ्वीवर नव्हते तर मग कुठे विहरत होते? पृथ्वीवर कुठून आले इतक्या सा-या सूक्ष्मजीवांपास्नं ते माणसांपर्यंतच्या उत्क्रांत सजीव साखळीच्या देहांत शिरण्यासाठी? कसे आले? टाईम-वार्प मधून? Worm Hole मधून? आणि पृथ्वीवरच्या इतक्या अब्ज अब्जावधी देहांत शिरण्यासाठी ते आले त्याअर्थी त्याआधी कुठल्या तरी अब्जावधी देहांचा त्याग करूनच आले असणार? म्हणजेच पृथ्वीचा जन्म होण्याआधी बाहेरही सजीव सृष्टी असणारच जिथे इतक्या आब्ज अब्जावधी मृतदेहांचा खच पडला असणार?
पण मग विश्वाची उत्पत्तीच जर मुळात एका सिंग्युलॕरिटीतनं झाल्ये बिग बँग होऊन, तर मग त्या सिंग्युलॕरिटीच्या वेळी हे इतके सारे आत्मे होते तरी कुठे? कुठल्या मितीत?
की जसं नवीन जीव जन्माला येताना पेशींचं मल्टीप्लीकेशन होतहोत कोट्यवधी पेशी तयार होत शरीरांचे विविध अवयव बनतात तसंच मूळ कुठल्या तरी एकेक आत्मा split होतहोत इतके सारे आत्मे बनत गेलेत?
म्हणून मी जे माझ्यासारखेच अनेक प्रसन्न वेगवेगळ्या पॕरलल वर्ल्ड्समधे असणार असं मानतोय त्या सर्वांमधे एकाच आत्म्याचे तुकडे आहेत असं मानत आलोय, त्याहीपेक्षा जास्त तुकडे आणखी कुठल्याकुठल्या देहांत असणारेत?
म्हणजेच ट्वीन सोल किंवा ट्वीन फ्लेममधे आपण जे एकाच आत्म्याचे दोन तुकडे मानतो, ते ट्वीन सोलही केवळ "दोन" नसू, केवळट्वीन्सनसून खरं तर खूप खूपसारे तुकडे असणारेत विश्वातल्या वेगवेगळ्या आकाशगंगांमधल्या वेगवेगळ्या सूर्यमालेतल्या वेगवेगळ्या ग्रहांवरच्या सजीवांच्या देहात असणारे??
तुम्ही म्हणाल "प्रसन्न हे काय चाललंय यडचापसारखं?"..पण आय स्वेअर...काल रात्रीपास्नं ह्यावरच विचार चाललाय डोस्क्यांत...
Atishay Sundar!!
ReplyDelete