Wednesday, 1 June 2022

तेरे घर के सामने

 तेरे घर के सामने

--------

१९६३ सालच्या ह्या सिनेमाची कथा तशी खूपच सिम्पल! दिग्दर्शक विजय आनंदमधल्या लेखकाला ही कथा सुचली ती 'मित्रत्वाचं नातं असलेल्या पण नंतर वितुष्ट आलेल्या भारत- चीन देशांच्या १९६२ सालच्या नातेसंबंधांवरुन'! पण त्याला युद्ध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण असल्या गोष्टी पडद्यावर दाखवायच्या नव्हत्या, म्हणून त्याने त्याला दोन देशांऐवजी दोन शेजा-यांमधली मैत्री, चढाओढ, वितुष्ट अशी डूब दिलीन आणि त्या पार्श्वभूमीवर, त्या दोन घरातल्याच पुढच्या तरुण पिढीत फुलणारं प्रेम दाखवत एकापेक्षा एक सुमधुर गाण्यांनी सजलेला म्युझीकल सिनेमा निर्माण केलान!


गुरुदत्तप्रमाणेच दिग्दर्शक विजय आनंदचाही सिनेमातल्या गाण्यांच्या पिक्चरायझेशनचा सेन्स अफाट होता. छायाप्रकाशाचा खेळ आणि कॕमेरा अँगलमधल्या ब्रिलिअन्सबरोबरच, त्या गाण्याच्या शब्दांना पर्फेक्ट न्याय देणारं विजय आनंदचं गाण्यांचं 'टेकींग' अद्भूत असायचं!...."तेरे घर के सामने" हे टायटलचे शब्द असणारं ते क्लबच्या बारमधल्या गाण्याचं टेकींग आठवा! प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमिकाला जळी- स्थळी- काष्ठी- पाषाणी त्याची प्रियतमा दिसत असते. तशी ह्या सिनेमाच्या हिरो देव आनंदला त्याची प्रेयसी नूतन व्हिस्कीच्या पेल्यात दिसते. आणि हो! व्हिस्की पिऊन चढली म्हणून झालेला भास नव्हे, तर पिण्याआधीच! असीम प्रेमापोटी जन्मलेला आभास! जवळपास ६० वर्षांपूर्वी बनलेल्या ह्या सिनेमाच्या काळात आजच्यासारखं VFx किंवा SFx सारखं तंत्र नव्हतं ..तरीही दिग्दर्शक विजय आनंद आणि नवकेतनच्या बहुतेक सर्व सिनेमांचे हुकुमी एक्का असलेले कॕमेरामन वीरेंद्र रत्रा यांनी त्या व्हिस्कीच्या फेसाळ ग्लासात नूतनला दाखवत जो इफेक्ट साधलाय त्याला तोडच्च नाही! .देव जे गाण्यातनं सांगतोय त्यावरचा ग्लासातला नूतनचा अभिनय तर खल्लासच करतो आपल्याला! गाण्यात देव जेंव्हा व्हिस्कीच्या ग्लासात तिला बघताना बर्फाचा खडा टाकतो तेंव्हा त्या गार स्पर्शाने तिचं शहारणं आणि त्याला बर्फाचा खडा काढायला लावणं...'तारे सजाऊंगा तेरे घर के सामने" म्हणत देव ग्लासवर हलकेच टिचकी मारतो तेव्हा ती टिचकी नाकावर बसल्याची अमाप गोड रिऍक्शन....आह्हाच्च...


दिल्लीच्या दक्षिण दिशेला असणा-या कुतुबमिनारला भारतातल्या कोट्यवधी पर्यटकांबरोबर (आपणही आलो त्यात) सर्वांनीच भेट दिली असेल...त्यात हज्जारो प्रेमीयुगुलंही असतील. पण तिथे गोलगोल जिन्यावर एखादं गाणं शूट करण्याची भन्नाट कल्पना विजय आनंदसारख्या जिनियसलाच सुचू जाणे! पण तिथे शूटींगला परवानगी न मिळाल्यामुळे त्याने चक्क मेहबूब स्टुडियोत, कुतुबमिनारच्या आतल्या पाय-यांचा हुबेहुब गोल सेट उभा करुन दहा दिवसांत "दिल का भँवर करे पुकार" सारखं अजरामर अवीट गोड गाणं चित्रीत केलंन्! "सुनिये..खामोशी की आवाज..जैसे भँवरे गूँज रहे हो..." ह्या नूतनच्या म्हणण्यावर "तो आवाज तर माझ्या हृदयातल्या भावनेचा" असं मिश्कील उत्तर देत, देव रफीच्या माधाळ आवाजात ते गाणं गात, कुतुबमिनार उतरत तिच्या हृदयाच्या कप्प्यात जाऊन बसतो ते गाणं अद्वितीय असंच!!


सिनेमाची कथा थोडक्यात सांगायची तर दिल्लीतली दोन धनाढ्य, रईस माणसं म्हणजे ओमप्रकाश आणि हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय. ओमप्रकाशचा मुलगा देव आनंद जो अमेरिकेहून आर्किटेक्ट बनून आलाय. नूतन ही हरिंद्रनाथांची मुलगी. सिनेमाच्या सुरुवातीला दिल्लीतल्या दोन मागेपुढे असणा-या प्लाॕट्सचा लिलाव सुरु असतो आणि एकमेकांवर ईर्ष्येने चढ्या बोली लावत ओमप्रकाश आणि हरिंद्रनातथ ते प्लाॕट्स खरेदी करतात,  दोघांनाही आपापल्या प्लाॕटवर दुस-यापेक्षा भारी बंगला बांधून हवाय आणि दोघांचाही आर्किटेक्ट एकच देव आनंदच आहे. दोन्ही बापांमधे चढाओढीतनं, एकमेकांवर कुरघोडी करणं... 


त्यानंतरच्या मजेशीर घोटाळ्यातनं देव आणि नूतनचा परिचय होतो आणि त्याचबरोबर नूतनचा भाऊ म्हणून राजेंद्रनाथ आणि देवची कलीग म्हणून झरीन कात्रक यांची जोडी समोर येते. (ही झरीन पुढे संजय खानशी लग्न करुन झरीन खान झाली म्हणजेच हृतिक रोशनची सासू!)..हे चौघंही जेव्हा पहिल्यांदा एका हाॕटेलमधे जातात तेव्हा तिथे सिनेमातलं पहिलं गाणं समोर येतं "दिल की मंझील है कुछ ऐसी मंझिल"...स्पॕनिश शब्द वापरुन त्याच अंगाने जाणा-या ट्यूनवरचं हे गाणं सादर केलंय हेल्गा आणि त्यावेळी युरोपियन डान्सेससाठी प्रसिद्ध असणा-या एडविना ने!


या सिनेमाआधी सीमा, सुजाता, अनाडी सारख्या सिनेमांतनं आपल्या जबरदस्त अॕक्टिंगची छाप पाडणारी नूतन, विजय आनंदला या रोलसाठी हवीच होती आणि तश्यात या सिनेमाआधी तिचे देवबरोबरचे बारिश, मंझिल आणि पेइंग गेस्ट गाजलेले आणि लोकांना देव-मधुबालाइतकीच त्यांची गोड जोडीसुद्धा रुपेरी पडद्यावर आवडून गेलेली!! मोतीलाल, बिमल राॕय, अमिया चक्रवर्ती सारख्या दिग्गजांकडे शिकलेल्या नूतनला दिग्दर्शक म्हणून विजय आनंदला एखाद्या सीनमधे काय अपेक्षित आहे हे त्याने समजावून सांगण्याआधीच कळत असे! नूतनचा अभिनय सहजसुंदर, उत्स्फूर्त असायचा!!.तिचा श्यामल वर्ण, “गोड” ह्या शब्दाच्या पलीकडचा गोड रेखीव चेहेरा, त्यां ठळक भिवया, जादुई हसू आणि अत्यंत बोलके डोळे...सरसर बदलत जाणारे विभ्रम...ती लाजवाब एक्स्प्रेशन्स...


देवची आणि तिची केमिस्ट्री तर कमालीची मॕच झालेली दिसते आपल्याला! एका प्रसंगी बंगल्याच्या साईटवर नूतनच्य आईवडिलांबरोबर असताना त्याचवेळी त्याचेही आईवडिल तिथे पोहोचतात आणि मग पुढचा संभाव्य धोका टाळण्यासाठी तो पोटात कळ आल्याचं नाटक करुन नूतनला घेऊन तिथनं पळ काढतो आणि दोघं एकांतात असताना आणखी एक बेमिसाल गाणं समोर येतं - "ये तनहाई हाय रे हाये जाने फिर आये ना आये.."


दोघांच्या बापांसाठी बंगल्यांची डिझाईन्स बनतायत...पण त्यांच्या लपूनछपून होणा-या भेटीं..तिचं घरी उशीरा परतणं.. तिच्या घरी संशयाचं वातावरण आणि तश्यात तिला आईबरोबर सिमल्याला रवाना व्हावं लागणं...


ती सिमल्यात माॕल रोडवर कुठेतरी बंगल्यात आहे...देव तिला शोधत “तू कहां ये बता” म्हणत गल्लीबोळ धुंडाळत फिरतोय...एकदाचा त्याचा आवाज तिच्यापर्यँत पोचतो...ती धावत घराच्या बाल्कनीत येते...त्याला पाहून प्रेमभराने दोन्ही हात फैलावते...तिचं दर्शन होऊन तो खुशीसे पागल झालाय...पण घरच्यांना सुगावा लागु नये म्हणू ती त्याला थांबायची खुण करत पटकन धावत जाऊन कानोसा घेत खोलीचा दरवाजा ओढून घेते आणि पुन्हा बाल्कनीत येऊन त्याच्याकड अत्यंत प्रेमभरल्या नजरेने पाहत हाताची घडी घालून उभी राहते...जणू त्याला नजरेनेच सांगत्ये-“बघ राजा.....मी आहे तुझ्यासाठी...तुझीच...तुझ्याकडे बघत..तुझ्यासमोर...बोल काय बोलायचं ते....”...त्या गाण्यात नूतनने जे हे कमालीचे एक्स्प्रेशन्स दिलेत त्याला तोडच नाही...


देखो रुठा ना करो" गाण्यातल्या कडव्यात तोल जाऊन पडता पडता सांभाळून "जानपर मेरी बनी आपकी ठहरे हंसी" म्हणत देववरचा लटका राग आणि फुरंगटलेले हावभाव तिनेच द्यावेत...


सिनेमात चार बेमिसाल गाणी इतक्या पटापट आपल्यासमोर येतात की आधीच्या गाण्याची नशा उतरेपर्यंत पुढचं तितकंच धुंद करणारं गाणं समोर हजर होतं आणि त्यात आपला लाडका मदनाचा देखणा पुतळा देवसाब आणि आपल्या नटखट अदांनी त्याला साथ देणारी लोभस नूतन...!!


दोघांच्या बापांचा वाढत जाणारा बेबनाव हा देव-नूतनच्या प्रेमातला अडसर...आपल्या वैयक्तिक हेव्यादाव्यांपायी आपल्या मुलामुलीचं लग्न होऊ न देण्यापर्यंत निर्णय घेतले जातात..सिनेमा शेवटाकडे येताना हे अवघड वळण?...शेवट काय होतो? देवच्या "सुन ले तू दिल की सदा..प्यार से प्यार सजा..." ही फरयाद त्या कठोर हट्टी बापांचं मन वळवण्यात कामयाब होते का?


या प्रश्नांच्या उत्तरासाठी जरुर जरुर बघा १९६३ सालचा नवकेतन बॕनरचा हा म्युझीकल एंटरटेनर -"तेरे घरके सामने"...

No comments:

Post a Comment