Tuesday, 6 July 2021

न ये जमीन थी न आसमाँ था...

अनेकदा म्हटल्याप्रमाणे माझी Soul Groups याने की, आत्म्याचे कळप या विषयावर गाढ श्रद्धा आहे! 

आपल्याला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर शेकडो लोकं भेटत असतात. पण त्यातले काहीच मोजकीच मंडळी आपल्याला 'जवळची' होतात..."आपली" वाटतात. अशी माणसं भेटताक्षणी आपलं हृदय/ मन कौल देतं 'येस्स हा/ही - तुझ्या टाईपची आहे' म्हणून! त्यांच्या सान्निध्यात आपल्याला विलक्षण मोकळेपणा वाटतो. एक अतर्क्य कम्फर्ट झोन तयार होतो पाह्तापाहता - जो कदाचित इतर माणसं कित्येक वर्षांपासून आपल्या आसपास आपल्याबरोबर असूनही त्यांच्या बाबतीत आपण मेहसूस नाही करत. 

असे आपल्याच आत्म्याच्या कळपातले जे असतात त्यांच्याशी आपलं सूत बाकी छान जमून जातं. कोरडेपणा किंवा औपचरिकता उरत नाही. त्यांच्या सान्निध्यात आपण बिनधास्त असतो...मनसोक्त गप्पा रंगतात...आपण त्यांच्या संगे खूप हसतो...टाळ्या देतो...त्यांचा सहवास आपल्याला आवडतो...बोलाण्य्साठी विषय काढावे लागत नाहीत...ते एकापाठोपाठ एक येत राहतात. आपण आपलं आख्ख आयुष्य विनासंकोच त्यांच्यासमोर उलगडू शकतो....जणू आपण एकाच फ्रीक्वेन्सीने ट्यून झालेलो असतो अश्यांशी! त्यालाच मग केमिस्ट्री जुळणं किंवा वेव्हलेंग्थ जुळणं म्हणतो आपण! अशा व्यक्तींमुळे आपल्याला सुधारायला मदत होते...आपल्यातले चांगले गुण प्रकर्षाने झळाळून उठतात...अर्थात या सर्वांमागे कार्मिक कनेक्शन महत्त्वाचं जे आपल्याला पुढे कुठेतरी जाऊन आकळतं. 

आणि गंमत म्हणजे हे सर्व अशा तर्हेने एकत्र आलेले आणि भेटणारे आत्मे फक्त याच जन्मांत नव्हे तर जन्मोजन्मी भेटलेलो असतो आणि पुढे भेटत राहणार असतो. 

हे डोस्क्यात यायचं कारण- "सगाई" मधलं राजेंद्रकृष्ण यांचं गीत! हे त्यांना का आणि कसं सुचलं असेल? का याच शब्दांत लिहावसं वाटलं असेल? कारण वरकरणी अशक्यप्राय वाटणाऱ्या या गाण्याच्या दोन ओळींत त्यांनी खूपच खोल वैश्विक सत्य मांडलंय! -

"न ये जमीन थी, न आसमां था, न चांदतारो का ही निशां थां - मगर येह सच है, की उन दिनों भी, तेरा मेरा प्यार यूँ ही जवां था.." 

आता विचार केला तर तो तिला किती महत्त्वाचं आणि ठामपणे सांगतोय की हे प्रिये जेव्हा ही जमीन नव्हती, हे आकाश नव्हतं, हा चंद्र, हा सूर्य, हे दिसणारे असे तारे नव्हते - त्याकाळात सुद्धा आपलं प्रेम होतं..असंच ..आणि इतकंच गहिरं!.....म्हणजे बघा ही पृथ्वीच नव्हती...हा सूर्य ही नव्हता...किंबहुना ही आकाशगंगेची स्थिती आत्ता आहे तशी नव्हती आणि त्यावेळी सुद्धा आपलं प्रेम मात्र असंच होतं! म्हणजे मग ते कुठे होतं?..कुठल्या तरी दुसऱ्या आकाशगंगेत?..वेगळ्याच ग्रहांवर?..वेगळ्याच जीवसृष्टीत?..पण आपण मात्र तेव्हाही एकत्रच होतो?!!!!!..म्हणजे पुन्हा सेम सोल ग्रुप्स?!!!...

क्या ब्बात!!.....व्वा, राजेंद्रकृष्णजी! हॅट्स ऑफ!!....भल्या भल्यांना समजावयाला कठीण अशी संकल्पना तुम्ही तब्बल ५२ वर्षांपूर्वीच्या (१९६६ साल) "सगाई" सिनेमातल्या रफीसाहेबांच्या गाण्यातून इतकी सहज मांडली होतीत?!!!!...नव्हे तुमच्याकडून ते उतरवण्यात आलं होतं ...कुठल्याश्या अद्भुत अंतःप्रेरणेने?....आता तर मला अजून मजा येत्येय कार्मिक कनेक्शन, सोल ग्रुप्स, पॅरॅलल युनिव्हर्स, मल्टीव्हर्स, री-इन्कार्नेशन्स सारख्या विषयांचा अभ्यास करायला.... ! 😉

1 comment: