-------
माझ्या लहानपणी बोरिवलीच्या आमच्या सोसायटीच्या गच्चीत आम्ही मित्र मित्र रात्री झोपायला जायचो. त्यावेळी मध्यरात्री सामसूम झाल्यावर (माझ्या लहानपणी आजच्यासारख्या स्कायस्रॕपर्स आणि टोलेजंग टाॕवर्स नसल्यामुळे-) आसमंतात ब-यापैकी काळोख दाटलेला असायचा!..आणि मग पडल्यापडल्या आकाशातला ता-यांचा सडा बघताना एखादा रशिया/ आमेरिकेचा सॕटेलाईट हळूsss जाताना दिसायचा.. बारीक बारीक हजारो ता-यांच्या बॕकग्राउंडवर तो मंदगतीनं सरकणारा ठिपका बघताना क्काय क्काय कल्पना डोस्क्यात यायच्या...त्यावेळी मला स्पेस-अॕस्ट्राॕनाॕमीचं प्रचंड वेड होतं आणि शाळेच्या लायब्ररीच्या कृपेनं निरंजन घाट्यांच्या खूप विज्ञानकथा वाचलेल्या असायच्या..ना.वा.कोगेकर, सोवनी वगैरे मंडळींमुळे आणि सृष्टीज्ञान सारख्या मासिकांमुळे परग्रहावरची जीवसृष्टी...युफो..असलं कायकाय डोक्यात भिनलेलं असायचं...मग आम्ही सगळे झोपलेलो असताना आमच्या बरोब्बर डोक्यावर (ख-स्वस्तिकाकडून) एक यान येऊन स्थिर झालंय..आणि त्यातनं एक पिवळसर तांबूस सोनेरी प्रकाशझोत (टाॕर्चमधनं पडतो तस्सा) सरळ रेषेत खालती खालती येत इतर कोणावरही न पडता थेट माझ्यावरच पडलाय...आणि त्यातल्या एका अनामिक शक्तीनं मी वर वर उचलला जात थेट त्या यानापर्यंत गेलोय..आणि अचानक एक झडप बाजूला होऊन मला आत शोषलं जातंय..आत चित्रविचित्र प्रकारचे परग्रहवासी आहेत ..त्यांनी मला घेरलंय...ते माझी तपासणी करतायत.,,आता माझी भिती जाऊन त्याची जागा कुतुहलानं घेतल्येय ...मी त्यांना न्याहाळतोय...अतर्क्य शेप्स आहेत त्यांचे....हे होईस्तो खालती गच्चीत बोंबाबोंब झाल्ये कारण त्या पिवळ्या झोतातनं वरवर खेचल्या जाणा-या मला मित्रांनी पाहिलंय...मग एकच गोंधळ...राडाच!...वगैरे वगैरे...असलं काही डोस्क्यात यायचं... ;-)
पृथ्वीवर अंतराळातून आलेले पाहुणे आहेत आणि खूप खूप काळापास्नं येत राहिलेत ह्यावर माझा गाढा विश्वास आहे तेव्हापासूनच!!
पण थोडा धांडोळा घेतला तर लक्षात आलंय की - आगदी ख्रिस्तपूर्व काळापासून ते अगदी दुस-या महायुद्धाच्या काळापर्यंत ज्यांविषयी ठोस काही explaination देता येत नाही अश्या अनेक चमत्कारिक वस्तू अनेक लोकांनी शतकानुशतकं बघितल्यायत आणि त्याविषयी लिहूनही ठेवलेलं आहे! अगदी गेल्या शतकात म्हणजे २४ जून १९४७ रोजी ढळढळीत असं काही बघितल्याचं छातीठोकपणे सांगितलंन् ते हौशी अमेरिकन पायलट-बिझिनेसमन केनेथ आर्नल्डनं! त्यानं माऊंट रेन(अ)रजवळ प्रायव्हेट विमानातनं जाताना अत्यंत वेगाने उडत जाणा-या बशीच्या किंवा तबकड्यांसारख्या नऊ वस्तू पाहिल्या आणि "बशीसारख्या" असं वर्णन केल्यामुळे सुरुवातीला त्यांना उडणा-या बश्या म्हणून 'फ्लाईंग साॕसर्स' असं म्हटलं गेलं..पण त्याआधीचे शेकडो वर्षांपासूनचे लिखित संदर्भ आणि नंतरही पाहिल्या गेलेल्या विचित्र आकाराच्या वस्तू म्हणून मग अश्या वस्तूंना "UFO म्हणजेच अनआयडेंटिफाईड फ्लाईंग आॕब्जेक्ट्स" असं म्हणायला सुरुवात झाली...पण अलीकडे काहींनी त्यातले काही प्रकार हे पृथ्वीच्या आयनोस्फीअरमुळे घडू शकणारे नैसर्गिक प्रकारही असू शकतात असं वाटल्यामुळे त्यांना UFO ऐवजी "UAP अनआयडेंटिफाईड एअरियल फनाॕमिना" असं म्हणायला सुरुवात झाल्ये आणि अमेरिकेत तर एक स्पेशल टास्क फोर्सच बनवला गेलाय "UAP अनआयडेंटिफाईड एअरियल फनाॕमिना"चा वेध घेण्यासाठी!!
परवापरवाच "पेंटॕगाॕन" आणि ह्या "UAP Task Force" ने अमेरिकन नेव्हीच्या फायटर पायलट्सनी २०१७ पासून जितक्यांदा अशा प्रकारच्या UFO/ UAP पाहिल्या आणि त्याचं रेकाॕर्डिंग केलं, त्यापैकी काही टेप्स डि-क्लासिफाईड करुन प्रेससमोर आणल्यात!! त्या १४४पैकी बहुतेक केसेस ह्या "नैसर्गिक चमत्कार" म्हणून फेटाळून लावल्या तरी एक रेकाॕर्डिंग मात्र काही वेगळंच दाखवतंय...त्या रेकाॕर्डिंगमधे अफाट प्रचंड वेगाने सरसरत जाणारी ती तबकडीसदृश्य वस्तू ही चीन किंवा रशियाचं एखादं "फ्युचरिस्टिक वैज्ञानिक उपकरण आहे की खरोखरचं युफो" याविषयी संदिग्धता आहे!! पण पँन्टॕगाॕनने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार त्यांच्या माहितीनुसार तशी टेक्नाॕलाॕजी त्यांच्या शत्रुंकडे (रशिया, चीन) सध्या नाही!..मग तसं असेल तर त्या नेव्हीच्या फायटर पायलट्सनी जो UAP (Unidentified Aerial Phenomena) बघितला तो खरोखरच परग्रहवासियांचं प्रचंड वेगाने जाणारं यान होतं?...म्हणजे पृथ्वीवर ते आॕलरेडी आलेत? आहेत?...त्या UAPsवर भन्नाट तर्क लढवले जातायत - कुणी म्हणतंय ते आपल्यासारख्याच मानवांनी भविष्यातनं (टाईम वार्पमधनं) उलटा कालप्रवास करत आपल्याला दिलेलं दर्शन असेल...किंवा मग दूरच्या एखाद्या तारामंडळातल्या ग्रहावरनं आलेले प्रगत परग्रहवासी असावेत ते?!!!
एक नक्की की अमेरिकन गव्हर्न्मेंट त्याविषयी गंभीरतेनं माहिती गोळा करतंय! अमेरिकेचे सर्वमाजी आणि आजी प्रेसिडेंट्ससुद्धा सिरियस दिसतायत!..,मागे बराक ओबामांनी हे म्हटलं होतं की "हो आकाशात तसंकाही दिसल्याचे पुरावे नक्कीच आहेत, पण आपल्याला सांगता येत नाही "ते" नक्की काय आहे म्हणून!!..र नुकत्याच झालेल्या निवडणुकीआधी ट्रंम्प त्यासंदर्भात काही गोपनीय माहिती फोडण्याच्या बेतात होते पण इस्राएलच्या संरक्षण खात्याच्या प्रमुखांच्या विनंतीवरुन ते थांबले असं WION न्यूज चॕनलची बातमी होती!..
अगदी १९५१ सालच्या "द डे द अर्थ स्टूड स्टिल" पासून अगदी अलीकडच्या "अॕव्हेंजर्स" सारख्या मूव्हीजपर्यंत हाॕलीवूडमधे युफो आणि एलीयन्सवर ( परग्रहवासी) अनेक मूव्हीज बनत आलेत!!
मी या विषयावर पाहिलेला पहिला मूव्ही होता "द क्लोज एनकाऊंटर्स आॕफ द थर्ड काईंड"! स्टीव्हन स्पीलबर्गचा!! ज्यामधे युफोमधनं आलेल्या परग्रहवासियांनी पृथ्वीवर येऊन उचललेल्या काही माणसांना, प्राण्यांना परत एका लँन्डिंग साईटवर सोडल्याची चित्तथरारक कथा होती..त्यात भारतातल्या धरमशालाजवळच्या साधूंचाही सहभाग दाखवल्याचं आठवतंय! जे.अॕलन हायनेकने अशा युफो आणि एल्यन्सबरोबरच्या 'क्लोज एनकाऊंटर्स'चे पाच kinds प्रकार सांगितलेत - (१) साईटिंग किंवा दर्शन (२) एव्हिडन्स किंवा पुरावा (३) काँन्टॕक्ट किंवा संपर्क (४) अॕब्डक्शन किंवा माणसांना, प्राण्याःना युफोमधनं पळवून नेणं (५) कम्युनिकेशन किंवा परग्रहवासियांनी मानवाशी थेट बोलणं!!
हे सारं अद्भूत आहे. पण माझा पॕरलल वर्ल्ड्स, टाईम ट्रॕव्हल, स्पेसटाईम-वार्पवरही विश्वास आहे. आपली अॕस्ट्रल बाॕडी (सूक्ष्म देह) असा प्रवास करते ह्यावरही विश्वास आहे (अॕस्ट्रल बाॕडी पुन्हा ज्जड देहात शिरतानाचा जर्क तर मी बेडवर पडल्यापडल्या अनेकदा अनुभवलाय!)...
एकीकडे हे UFO किंवा UAP ..आणि दुसरीकडे आपल्या भारतातल्या आनेक महान योग्यांना ज्ञात असणा-या अष्टसिद्धी ...क्रियायोग...ह्याविषयी खूप खूप कुतूहल वाटून वाचन चालू आहे...
No comments:
Post a Comment