फादर आॕफ द ब्राईड
----------
मला वाटतं पुरुष जास्त हळवे असतात बायकांपेक्षा! दोन्ही लेकींच्या बाबतीत मी तर होपलेसली इमोशनल आहे! मला आठवतंय बोरिवलीहून पुण्यात शिफ्ट झालो त्या सुरुवातीच्या पहिल्या दोनतीन वर्षांतच आम्ही "बालगंधर्व"ला मतकरींचं "जावई माझा भला" पाहायला गेलो होतो. निकिता असेल जेमतेम सातेक वर्षांची आणि गार्गी तर जेमतेम दोनेक वर्षांचीच! स्टेजवर प्रभावळकर, शिल्पा तुळसकर बाप-लेकीच्या भूमिकेत! आमचे बोरिवलीचे प्रिय वसंतभाऊ सोमणसुद्धा होते नाटकात...समोर स्टेजवर चाललेल्या नाटकात 'मुलीवर आत्यंतिक प्रेम असणा-या पित्याची भावना' बघताना इकडे प्रेक्षकांत बसलेला मी रुमाल काढून काढून डोळे पुसत रडत होतो...मला त्या बापाच्या काळजातली भावना हेलावून गेली होती..मंजूला आश्चर्य वाटत होतं की -"निकिता-गार्गी जेमतेम सात वर्ष आणि दोन वर्ष इतक्या लहान आहेत तर जणू दोघींची आजच लग्न होऊन त्या सोडून निघाल्यासारखा हा यडपट इतका का आसवं गाळतोय नाटक बघताना?"..पण मी तिला काय सांगणार?.. मलाच कळत नव्हतं पण प्रभावळकरांच्या भूमिकेशी तादात्म्य पावून मी प्रचंड हळवा झालो होतो खरा त्या दिवशी...(तसाही मी खूप भावनाप्रधान...रडकाच्च माणूस आहे म्हणा....मी आजही कित्येक नाटकं/ सिनेमे बघताना रुमाल ओला होईस्तो रडत असतो प्रेक्षकांत बसून..)..
"जावई माझा भला"च्या त्या प्रयोगाला बावीसेक वर्षं उलटल्येत!..माझ्या मोठ्या लेकीने निकिताने लग्न होऊन नुकतीच तिच्या नव-याबरोबर दूरदेशी आयुष्याच्या नव्या टप्प्याची सुरुवात केल्येय....पण मला मात्र रोज तिचा कालपरवापर्यंतचा घरातला वावर आठवत असतो आणि मग रडायला येत असतं..(मैत्रिणीच्या सांगण्यावरनं नळ स्टाॕपच्या अभिनव चौकातल्या होमीओपॕथीच्या दुकानतनं 'रेस्क्यू रेमेडी, वाॕलनट' सारख्या फ्लाॕरल रेमेडीच्या गोळ्या आणून झाल्यात 'इमोशन्स सप्रेस' करायला पण त्याचा कुठे फायदा होतोय?..लेकीच्या आठवणीत विव्हल होणं कुठे थांबतंय?)..खूप मैत्रिणींनी समजावलंय -"लेकीच्या नव्या छान आयुष्याला सुरुवात झाल्येय..तिला मनपसंद नवरा मिळालाय..तुला उत्तम जावई मिळालाय..ती तिकडे परदेशात नवीन आयुष्य सुरु करत्येय तर तू छान आनंदी असायला हवंस...प्रत्येकच बापाला कधीना कधी लेकीचा वियोग हा अटळ असतोच..उलट आपण छान लांबून त्यांचं सुखी आयुष्य पाहायचं.." वगैरे..वगैरे...ते सगळं सगळं मान्यच!..तिच्या नवीन आयुष्याबद्दल खुश आहेच, तरी रोज तिची आठवण आली की तो क्षण हलवून जातच असतो...गदगदून येतंच...
आज ह्या बॕकग्राऊंडवरच माझ्या आवडीच्या १९३० ते १९६० ह्या हाॕलीवुडच्या सुवर्णकाळातला १९५० सालचा स्पेन्सर ट्रेसी आणि एलिझाबेथ टेलर बाप-लेकीच्या रोलमधे असणारा "फादर आॕफ द ब्राईड" बघितला! अफाट्ट मूव्ही!...प्रत्येक मुलीच्या बापाच्या काळजाला भिडणारा...!!
दिग्दर्शक व्हिन्सेंट मिनेलीने एक्केक प्रसंग रंगतदार केलेत...१९४९ साली आलेल्या एडवर्ड स्ट्रीटर च्या याच नावाच्या कादंबरीवरनं मिनेलीने हा सिनेमा बनवला! फ्रेडरिक मार्च, चार्ल्स लाॕटन आणि वाॕल्टर पिजनसारख्या दिग्गजांचा बापाच्या रोलसाठी विचार झाला होता पण रोल मिळाला द ग्रेट "स्पेन्सर ट्रेसी" ला आणि त्याने सोनं केलंय त्या भूमिकेचं! इतका सहज वापर..अॕक्टींग नाही..खरंच जगलाय तो जणू ती बापाची भूमिका...
सिनेमा उलगडतो फ्लॕशबॕक मधून...आपल्या मुलीचं "के"चा (लीझ टेलर) लग्नसमारंभ संपलाय...आणि बापाला, स्टॕन्ले बँक्सला (स्पेन्सर ट्रेसी) गेल्या तीन महिन्यांपासूनचे आजच्या दिवसापर्यंतचे सारे प्रसंग आठवतायत...ही सुरुवातीची तीन मिनिटं स्टॕन्ले आपल्याशी कॕमे-यात बोलतो...आपण बाप मंडळी कशी बेसावध असतो आणि अचानक "तो क्षण" येतो हे तो सांगतो -"I would like to say a few words about weddings. I've just been through one. Not my own. My daughter's. Someday in the far future I may be able to remember it with tender indulgence, but not now. I always used to think that marriages were a simple affair. Boy meets girl. Fall in love. They get married. Have babies. Eventually the babies grow up and meet other babies. They fall in love. Get married. Have babies. And so on and on and on. Looked at that way, it's not only simple, it's downright monotonous. But I was wrong. I figured without the wedding.”...
आणि मग कहाणी उलगडते...स्टॕन्लेच्या घरचा तो दिवस. स्टॕन्ले आॕफिसमधनं घरी परतल्यावर दोन्ही मुलांचं जुजबी "हाय" करत पळणं..आणि मग त्याची लाडकी देखणी लेक "के" वरच्या मजल्यावरनं खालती येते.तिचं जरा विशेष खुष असणं..दिसणं...तिला कुणीतरी काही प्रेझेंट दिलेलं आसणं...आणि आचानक तो क्षण...'के' नं जेवणाच्या टेबलवर अगदी कॕज्युअली आपण बकले डन्स्टनच्या (डाॕन टेलर) प्रेमात पडलोय आणि त्याच्याशी लग्न करणार असल्याचं जाहीर करणं!...स्टॕन्लेमधल्या बापाला तो मोठ्ठाच धक्का आहे खरं तर...पण हळूहळू त्याला परिस्थिती स्विकारावीच लागते की त्याचं लाडकं पिल्लू आता मोठी मुलगी झाल्येय आणि ती स्वतंत्र निर्णय घेऊ शकत्येय...
त्याची बायको एली (जोन बेनेट) लगेच लेकीच्या लग्नाचे प्लॕन्स आखायला सुरुवातही करते..पण इथे ह्या बापाची रात्रीची झोपच उडालेली असते!..
पण पुढच्या प्रसंगात आपला जावई चांगला उमदा तरुण आहे आणि यशस्वीपणे एका उद्योगाची धुरा सांभाळतोय ऐकून त्याची के च्या भविष्याविषयीची काळजी कमी होते...
आणि मग पुढे लग्न समारंभ ठरवण्याची लगबग...हाताबाहेर चाललेला खर्च...वाढत जाणारी पाहुण्यांची यादी...थोडा ताणतणाव...एका प्रसंगी तर बापानंच लेकीला पळून जाऊन लग्न करण्याचं सुचवणं....पण पुढे सगळं सुरळीत होत तो लग्नाचा दिवस...खुश असणा-या लेकीसाठी खुश असणारा पण आतनं हळवा झालेला पिता....
जास्त लिहित नाही...लिहू शकणारही नाही..पण मी ज्या मनस्थितीतनं गेलो तशीच मनःस्थिती वर्णन करणारं स्टॕन्लेचं सिनेमातलं मनोगत-
..Who giveth this woman? This woman... But she's not a woman. She's still a child. And she's leaving us. What's it going to be like to come home and not find her? Not to hear her voice calling "Hi, Pops" as I come in? I suddenly realized what I was doing. I was giving up Kay. Something inside me began to hurt....
(मला माझ्या लेकीचा लग्नाचा प्रसंग उभा राहिलाय डोळ्यांसमोर हे लिहितालिहिता....लग्न...तिचं नव-याच्या घरी जाणं...आणि आता तर ती देशाबाहेर...अक्षरं धुसर झाल्येत अश्रुंच्या पडद्याआड...)
फादर आॕफ द ब्राईड....!!
No comments:
Post a Comment