Wednesday, 1 June 2022

स्टॕन्ली डोनन

 स्टॕन्ली डोनन

---------

पहिल्या लाॕकडाऊनपास्नं म्हणजे २४ मार्च २०२० पास्नं ते आजपर्यंत, मी हाॕलीवुडच्या गोल्डन इरामधले म्हणजे १९३० ते १९६० मधले साधारण सत्तरेक मूव्हीज पाहिले! (मेजाॕरिटीली 'यूट्युब'वर चकट-फू!)..


 'कॕरी ग्रँन्ट, ग्रेगरी पेक, जेम्स स्ट्युअर्ट, हंफ्री बोगार्ट, अँन्थनी क्वीन, पाॕल म्युनी, जाॕन वेन, जॕक लेमन, लाॕरेन्स आॕलीव्हिए, डेव्हिड निवेन"सारखे एकसोएक ब्बाप हिरोज आणि "इंग्रीड बर्गमन, मेरीलीन मन्रो, ग्रेटा गार्बो, आॕड्री हेपबर्न, मार्गरेट लाॕकवुड, जेनिफर जोन्स, मेरी अॕस्टर, कॕरोल लोम्बार्ड, अॕन बॕक्स्टर, माॕरीन ओ'हारा, कॕथरीन हेपबर्न, बार्बरा स्टॕनविक, जिंजर राॕजर्स" सारख्या अफलातून हिराॕईन्सना बघताना त्याकाळात हरवून जायचो...


बिली वाईल्डर, व्हिन्सेंट मिनेली, हिचकाॕक, जाॕन फोर्ड, जाॕन ह्यूस्टन, मायकेल कर्टीझ, अर्न्स्ट लुबिश, ब्लेक एडवर्ड्स सारख्या बाप्प डायरेक्टर्सचे एकसोएक अफलातून मूव्हीज पाहताना तो काळ किती विलक्षण होता...काय अचाट मूव्हीज बनायचे...ते सत्तरेक मूव्हीज बघताना मला सारखी हळहळ वाटत होती की मी त्या १९३० ते १९६० मधल्या अमेरिकेत का नाही जन्मलो म्हणून....!!


त्या ब्बाप दिग्दर्शकांच्याच पंक्तीतलं आणखी एक ग्रेट नाव म्हणजे "स्टॕन्ली डोनन"!!..आधी त्याचे "सिंन्गिंग इन द रेन, शराड, इनडिस्क्रीट" पाहून झाले होतेच...त्यातच भर म्हणून गेल्या चार रात्रींपैकी दोन रात्री त्याचेच आणखी दोन धमाल मूव्हीज बघितले -"टू फाॕर द रोड" आणि "अॕरबेस्क"...!!


"टू फाॕर द रोड"

--------

१९६७ सालच्या "टू फाॕर द रोड" मधल्या मार्क वाॕलेसच्या रोलमधला 'अॕल्बर्ट फिनी' हा तरणाबांड हिरोसुद्धा इंम्प्रेसिव्ह वाटला! त्याच्याबरोबर आहे आॕड्री हेपबर्न! त्यांची धमाल सुप्पर्ब केमिस्ट्री! प्रियकर - प्रेयसीच्या पुढे नवरा-बायको नात्यांत बदलणा-या नात्याची आणि भावनिक गुंतागुंतीची ही कथा!...त्यातल्या तणावांची...भूतकाळात एकमेकांप्रती असणा-या तरल भावनेची...थट्टा-मस्करी..लटके राग...आणि...एकमेकांविषयीच्या ओढीची ही विलक्षण कथा! संपूर्ण सिनेमात आपण दोघांबरोबर वेगवेगळ्या रोड ट्रीप्स (आजकालच्या भाषेत लाँग ड्राईव्हज?) अनुभवतो...त्यांच्या त्या वेगवेगळ्या रोड-ट्रीप्समधनं, अनंत फ्लॕशबॕक्समधनं अद्भूत प्रकारे त्यांच्यातलं नातं आपल्यासमोर उलगडत जातं!...डोननच्या अफाट दिग्दर्शनाला भक्कम साथ लाभल्येय ती फ्रेडरिक रॕफेलच्या गुंतागुंतीपूर्ण पटकथेची आणि हेन्री मँन्चिनीच्या भन्नाट म्युझिकची!!...त्यातल्या एका रोड ट्रीपमधे ते मार्कच्याच एका मैत्रिणीबरोबर आणि तिचा नवरा आणि मुलीबरोबर कार शेअर करुन जातात ते प्रसंग धम्मालच!


दोघांच्याही आयुष्यात वेगवेगळ्या वळणांवर तिसरंच कुणी येऊन जातंसुद्धा, पण तरीही त्या त्या वेळचं गुंतणं विसरुन दोघं एकमेकांबरोबरचा संसार पुढे नेतात त्यावेळचे तणाव आणि भाष्यही महत्त्वाचं! 


आॕड्री हेपबर्न ज्यांना आवडते त्यांना तिची एरवीची शिडशिडीत अंगकाठी बघण्याची सवय असल्यामुळे कदाचित या सिनेमातला तिचा कडेलोटी कृशपणा जाणवणार नाही, पण तिचे पंखे नसणा-यांना मात्र ती शुटींगच्या दरम्यान आजारीबिजारी होती का असाच प्रश्न पडावा...पण ते बाजूला सारलं तर तिचा "जोआन" या स्वच्छंदी तरुणीच्या रोलमधला स्क्रीन प्रेझेन्स अवाक् करणाराच्च!...(याआधी 'तेजाब' बघताना वारंवार येणा-या फ्लॕशबॕक्सनी चक्रावून सोडलं होतं..पण तेजाबमधल्या फ्लॕशबॕक्सची संख्या फुसकी ठरेल इतक्या संख्येनं "टू फाॕर द रोड"मधे फ्लॕशबॕक्स येत जातात)...पण त्यातनंच दोघांमधल्या नात्याचा ग्राफ अगदीच स्पष्ट रेखीवपणे जाणवत जातो...


खूप वेगळी ट्रीटमेंट असणारा हा सिनेमा आवडावा तुम्हाला....!!!


"अॕरबेस्क"

-----

ही एक वेगवान रहस्यकथा! ग्रेगरी पेक आणि सोफिया लोरॕनची जोडी!!


 हा सिनेमा तसा काहीसा मसालापटच पण याचीही बांधणीअत्यंत बघणीय आणि आपल्याला खिळवून ठेवणारी!


एका सांकेतिक चित्रलिपीत एक मेसेज लपवला गेलाय ज्याची उकल करण्याचं काम तश्या प्रकारची लिपी जाणणा-या तज्ज्ञ प्रोफेसर डेव्हिडवर (ग्रेगरी पेक) आल्येय. त्या मजकूरामागे अनेकजण हात धुवून लागलेत ...त्यात एक क्रूरकर्मा बिझीनेसमन आहे, एका अरब देशाचा पंतप्रधान आहे आणि गुंड कासीमसुद्धा!..आणि त्यापायी अनेकांचे खूनही होत जातायत...


बिझीनेसमनबरोबर असणारी मादक, सुंदर यास्मीन कोण असते? ती प्रोफेसरला मदत करते का? प्रोफेसरच्या जीवावर कोणकोणती संकटं कोसळतात, त्यांची वेगवान पाठलागांसकट केलेली उकल या सिनेमात पाहायला मिळते....हा ही सिनेमा रंजक आणि ग्रेगरी पेकच्या चाहत्यांना आवडेल असाच!!...


दोन वेगळ्या धाटणीचे सिनेमे आपल्याला स्टॕन्ली डोननचे वेगळे दिग्दर्शकीय अँगल दाखवून देतात !!

No comments:

Post a Comment