Wednesday, 1 June 2022

प्यार किये जा

 प्यार किये जा

-------

काही सिनेमे आपण त्यांतल्या सुपरहिट्ट गाण्यांसाठी पुनःपुन्हा बघतो, तर काही सिनेमे त्यातल्या दमदार डायलाॕग्जसाठी वारंवार बघावेसे वाटतात. काही सिनेमे त्यांतल्या भव्यतेसाठी आपण पुन्हा बघायला जातो तर काही सिनेमे त्यांतल्या अभिनेत्यांच्या जुगलबंदीसाठी आपल्याला पुनःपुन्हा पाहावेसे वाटतात. काही सिनेमे त्यांतल्या व्हिज्युअल इफेक्ट्स, कॕमेरा इफेक्ट्सनी आपल्याला भुरळ घालतात, तर काही थोडे सिनेमे त्यातले प्रसंगनिष्ठ विनोद आणि जोडीला सर्वच प्रमुख कलाकारांची जमलेली भट्टी यामुळे कित्तीही वेळा बघायची आपली तयारी असते! "प्यार किये जा" ही अशीच धम्माल विनोदी 'आॕल टाइम क्लासिक काॕमेडी' म्हणता येईल असा सिनेमा!!


१९६६ सालच्या ह्या धम्माल काॕमेडीची जादू आज ५५ वर्षांनंतरही तितकीच ताजी, टवटवीत आहे! ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे तीन हिरो, तीन हिराॕईन्स आणि तीन बाप अश्या साधारणपणे ९ प्रमुख पात्रांभोवती फिरणारी धमाल कथा! मुख्यत्वे धनाढ्य रामलालच्या ऐसपैस प्राॕपर्टीमधे घडणारी! 


रामलाल (ओमप्रकाश) हा एक धनाढ्य माणूस त्याची रामनगरला प्रचंड मोठी इस्टेट आहे. मालती (कल्पना) आणि निर्मला (साऊथची राजश्री) ह्या त्याच्या लाडावलेल्या कन्या आणि आत्मा (मेहमूद) हा त्याला न जुमानणारा, सिनेमा बनवण्याचं भूत डोक्यात घेऊन फिरणारा मोठा मुलगा! रामलाल ला मुलींची लग्न तोलामोलाच्या श्रीमंत घराण्यातल्या मुलांशीच करुन द्यायच्येत...आत्मा कडून त्याला फारश्या अपेक्षाच नाहीत...कार्टा फक्त पैसे उधळण्यात जन्म घालवणार ह्याची त्याला खात्री आणि म्हणूनच चिंताही आहे!!


मुंबईत शिकणा-या मालतीचं श्यामवर (किशोरकुमार) प्रेम आहे. श्यामचे वडिल देवराज (चमन पुरी) हे सुद्धा मोठे उद्योगपती आहेत. (चमन पुरी हा नट म्हणजे मदन पुरी आणि अमरीश पुरी या अॕक्टर्सचा मोठा भाऊ!)..श्याम त्यांच्याबरोबर बिझीनेस सांभाळतो आहे,


"We know Art is an ocean and we row for the novel creation!" अशी हट-के अक्षरं पडद्यावर झळकत चित्रालयचा हा सिनेमा सुरु होतो. दिग्दर्शक सी.व्ही.श्रीधर यांनी आपल्याच १९६४ सालच्या मूळ तमीळ सिनेमावरनं अक्षरशः फ्रेम टू फ्रेम हा सिनेमा हिंदीत पेश केलाय. त्यांचीच मूळ कथा आणि दिग्दर्शन तर लाजवाबच्च!..


सिनेमाच्या सुरुवातीलाच "दिल हमने दे दिया- क्यूं तुमने ले लिया" ह्या गाण्यातनं श्याम आणि मालतीच्या प्रेमप्रकरणाची कल्पना येते. 


श्यामचा परममित्र अशोक (शशी कपूर) हा एका मास्तरचा (शिवराज) मुलगा. रामलालच्या इस्टेटवर आसिस्टंट मॕनेजर म्हणून रुजू झालाय आणि एक सेकंड हँड खटारा गाडी घेऊन रामनगरला गेलाय.


मालती आणि निर्मला दोघी बहिणी सुट्टीसाठी रामनगरला आल्यात. तिथे एका ठिकाणी अशोकची गाडी त्यांच्या कारला टक्करुन त्यांच्यात वादावादी होते. त्या कोणाच्या मुली हे माहित नसलेला अशोक त्यांना आपली वट दाखवण्यासाठी मोठ्या रुबाबात आपण रामलाल इस्टेटचा असिस्टंट मॕनेजर असल्याचं सांगतो.


झालं! चिडलेल्या दोघी बंगल्यावर परतल्यापरतल्या बापाकडे अशोकची तक्रार करतात आणि त्याला नोकरीवरुन काढून टाकायला लावतात. रामलाल धनाढ्य असला तरी मनाने चांगला आहे ..त्याला असं छोट्या कारणावरनं अशोकला काढून टाकणं पटत नसतं पण लेकींच्या दादागिरीपुढे त्याचा नाईलाज होतो. 


केवळ 'लेकींच्या सांगण्यावरनं रामलालने डच्चू दिला' ह्या आपल्यावरच्या अन्यायाचा बदला म्हणून अशोक तिथेच त्यांच्या बंगल्यासमोर तंबू उभारत आंदोलन सुरु करतो. त्यावेळी त्याच्याशी वाद घालायला आलेल्या रामलालबरोबरचा शशीचा प्रसंग झक्कच जमलाय! आणि मग अशोकचं (शशीचं) धम्माल गाणं "कहनेकी नही बात मगर अब जोर से कहना है...जुल्म अमीरोंका अब सहकर चूप नही रहना है"..ह्या गाण्याच्या शुटींग दरम्यान शशीला रणरणत्या उन्हात अनवाणी पायानं शुटींग करायला लागल्यामुळे तळपायाला नंतर टरारून फोड आले होते आणि त्याला बँगलोरला भेटायला आलेल्या जेनिफरला ते पाहून रडू आवरेनासं झालं होतं..)


आशोकच्या एकंदर आवेशाने त्याच्यावर खुश झालेला आत्मा त्यालाच आपल्या "वाह वाह प्राॕडक्शन"चा स्क्रीनप्ले लिहायला राजी करतो..हिराॕईन म्हणून त्याने रामलालच्या मॕनेजरच्या मुलीला मीना प्रियदर्शीनी (मुमताज) तयार केलंय...


कथानक पुढे सरकतं आणि निर्मला अशोकच्या प्रेमात पडते ..तिचं "किसने पुकारा मुझे मै आ गयी" हे एक सुंदर सोलो गाणं आणि दोघांचं "फूल बन जाऊँगा शर्त ये है मगर" त्यांच्यातलं प्रेम घट्ट करत नेतात...दरम्यान तिचा नवरा श्रीमंतच हवा ही रामलालची अट कळल्यावर अशोकने आपला हरहुन्नरी दोस्त श्याम ला आपल्या खोट्या धनाढ्य बापाचं गंगाप्रसादचं सोंग वठवायला बोलावून घेतलंय..


त्यातच अशोकचं मालती आणि निर्मला दोघींबरोबर "गोरे हाथोंपर ना जुल्म करो हाजीर है ये बंदा हूकूम करो" हे शशीच्या चाहत्यांना सुखावणारं गाणं येऊन जातं...


आणि इथनं स्टोरी धुमाकूळ वळण घेते. अशोकचा श्रीमंत बाप बनून आलेला श्याम (गंगाप्रसादच्या रोलमधलं किशोरकुमारचं ऊईहुईउईहुईहुई धमाल आवाज काढत बोलणं...)


त्यात रामलालच्या इस्टेटवर श्यामच्या वडिलांचं धनराजचं येणं आणि ते रामलालचेच मित्र निघणं...श्यामचं आपल्याच वडिलांसमोर बिंग फुटू न देता सावरण्यातली धांदल...आणि बापाची भूमिका वठवत असताना समोर प्रेयसी मालती येणं...


अशोकच्या श्रीमंत बापावर इम्प्रेशन पाडण्यासाठी आणि त्यांच्याकडनं फायनान्स मिळवण्याच्या प्रयत्नात मेहमूद आणि मुमताजचं धमाल गाणं "ओ मेरी मैना तू मान ले मेरा कहना.."..मुमताज इथे छा जाते आपल्या मनात,..


पुढचा सिनेमा केवळ आणि केवळ धमाल काॕमेडीची आतषबाजी...अशोकच्या ख-या गरीब वडिलांचं आगमन आणि मग अशोक-श्यामची बनवाबनवी उघडकीला येत सिनेमा धमाल क्लायमॕक्सकडे जातो..


ज्यांनी मूळ तामीळ सिनेमा पाहिलाय त्यांना जरी फ्रेम टू फ्रेम काॕपी आसली तरी राजेंद्रकृष्ण यांनी गाण्यांबरोबरच संवादलेखक म्हणून केलेल्या अफलातून कामगिरीला दाद द्यावी लागेल!


ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य काय? विनोदी कथा-प्रसंग, सफाईदार दिग्दर्शन आणि धुमाकूळ हास्यस्फोटक संवाद तर झालंच पण मुख्य अॕसेट ठरलेत ते म्हणजे मुख्य चार कलाकार!! शशी कपूर, किशोरकुमार, मेहमूद आणि ओमप्रकाशने जे काही कॕरॕक्टरायझेशन दिलंय ते अफाटच्च!!..


खास उल्लेख अर्थात मुमताजचा! खरं तर तिला शशीची हिराॕईन निर्मलाच्या रोलसाठी घेणार होते पण तोपर्यंत ती आगदीच सी ग्रेड सिनेमात काम करत असल्याने शशीने तिला नाकारत मूळ तमीळ सिनेमातल्या साऊथच्या राजश्रीलाच हिंदीमधे पुन्हा तीच भूमिका करायला लावली... शशीने बरोबर काम करायला नकार दिल्याचा राग पुढे मुमताजने आनेक वर्षं मनात ठेवला होता आणि पुढे जितेंद्र आणि राजेश खन्नाबरोबर सुपरहिट्ट सिनेमांमुळे आघाडीची हिराॕईन बनल्यावर शशीलाही इंगा दाखवलान्...तिने पुढे शशीबरोबर दोनच सिनेमे केले "चोर मचाये शोर" आणि दुसरा "प्रेमकहानी" ज्यात राजेश मेन हिरो होता...पण प्यार किये जा मधे तिने आपल्या वाट्याला आलेली छोटीशीच भूमिका वस्सूलच केल्ये..


हा सिनेमा खरं म्हणजे किमान चारवेळा बघावा. प्रत्येकवेळी ह्यातल्या एकेकाचं बारकाईनं निरीक्षण करत! कारण प्रत्येक फ्रेममधे डायलाॕग बोलताना किंवा डायलाॕग नसताना समोरच्याच्या अॕक्शन्सवर यातल्या प्रत्येकाची रिअॕक्शन अफाट आहे!!! किशोरकुमार, मेहमूद आणि ओमप्रकाश तिघांच्या विनोदाची जातकुळी वेगळी आणि त्यांच्यासमोर शशीनेही तितक्याच तोलामोलाने त्याच्याही भूमिकेतली विनोदी किनार अच्चूक पकडल्येय...शशीसाठीसुद्धा हा सिनेमा बघावा असा!..यातले शशी आणि किशोर, शशी आणि ओमप्रकाश, किशोर आणि ओमप्रकाश, शशी आणि मेहमूद, मेहमूद आणि ओमप्रकाश अशां जोड्यांचा एकमेकांबरोबरचा प्रत्येक प्रसंग हिलॕरियस्स झालाय!!..


यातली एक्केक फ्रेम इतकी धमाल आहे आणि जो तो कॕरॕक्टरमधे घुसलाय मस्तपैकी! उदाहरणार्थ एका सकाळी सकाळी आत्मा आपल्या बापाशी रामलालशी फिल्मसंबंधी बोलत असताना सकाळी सकाळीच मालती आणि निर्मलबरोबर पिकनिकला जाण्यासंबंधी विषय काढायला आलेले अशोक आणि गंगाप्रसाद!! त्यावेळी त्यांच्या पुढे सोफ्यावर गप्पा चाललेल्या असताना मागे येरझारा घालणारा आत्मा म्हणजे मेहमूद त्या फ्रस्ट्रेटींग बेअरिंगमधे हातातल्या नारळाचा प्राॕप म्हणून उपयोग करत त्या सीनमधे जे काही करतोय ते कहर आहे!!


यातला हायलाईट ठरला तो मेहमूद आपल्या बापाला ओमप्रकाशला हाॕरर सीन सांगतो तो प्रसंग!..मेहमूदला फिल्मफेअर अवाॕर्ड न मिळतं तरच नवल...


पुढे १९८५ साली महेश कोठारेने या सिनेमाची नक्कल मराठीत "धुमधडाका" नावाने आणली. तोही चालला पण मूळ सिनेमातल्या चार प्रमुख कलाकारांशी तुलना करता अशोक सराफच त्यातल्या त्यात जवळपास जाणारा ठरला म्हणता येईल...लक्ष्याची ही तशी पहिलीच मेजर विनोदी मोठी भूमिका. आता साक्षात मेहमूदने आजरामर केलेली भूमिका रंगवायची हे मोठंच आव्हान होतं. त्याने त्याच्यापरिने प्रयत्न केलाही पण मराठी धुमधडाकाचे संवाद प्यार किये जा च्या राजेंद्रकृष्ण यांनी लिहिलेल्या संवादाशी बरोबरी नाही करु शकले..


पण कधीही वेळ मजेत घालवावंसं वाटलं तर सी.व्ही.श्रीधर यांची ही किशौरकुमार, शशी कपूर, मेहमूद आणि ओमप्रकाश चौकडीची ही धमाल काॕमेडी अवश्य बघा. प्यार किये जा!!

No comments:

Post a Comment