Wednesday, 1 June 2022

इट्स अ मॕड मॕड मॕड मॕड वर्ल्ड

 इट्स ए मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड

------------

कल्पना करा की एक्काच सिनेमात हॉलिवूडच्या १९६०च्या दशकातले रंगभूमी, टेलीव्हीजन आणि स्टँडअप कॉमेडी सारख्या वेगवेगळ्या फिल्डमधले  डझनभर बिनीचे सुपरस्टार्स एकत्र आले आणि त्यांच्या जोडीला त्या सिनेमात पाहुणे कलाकार म्हणून आणखी चाळीसपन्नास धम्माल कॉमेडी सुपरस्टार्संनी हजेरी लावली - तर काय अशक्य धुमाकूळ घडेल नै? 


"इट्स ए मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड" हा सिनेमा आपल्याला तोच लाफ-रायटचा अनुभव देतो..


डायरेक्टर स्टॅनली क्रॅमर तसं पाहिलं तर कॉमेडी जॉन्रसाठी ओळखला जात नव्हता; पण त्याने १९६३ साली "इट्स अ मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड" हा सिनेमा बनवला, जो सिनेमांच्या इतिहासात एक "तुफ्फान विनोदी धुमाकूळ सिनेमा" म्हणून अजरामर झाला! अगदी ज्याला लँडमार्क कल्ट मूव्ही म्हणता येईल असा!


एका चोरीच्या घबाडामागे लागलेले काही भाबडे सामान्य नागरिक आणि त्यांच्या त्या घबाड मिळवण्याच्या धांदलीतून उलगडत जाणारी, एकसोएक हास्यस्फोटक प्रसंगांनी खचाख्खच भरलेली, आपलं टायटल सिद्ध करणारी धमाल कॉमेडी! 


सगळ्यांनी मिळून एकत्रच शोध घेऊन त्या पैशांची धड वाटणी करणं शक्य नसल्याची जाणीव झाल्यावर, ज्यानंत्यानं एकमेकांवर कुरघोडी करत त्या घबाडापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नांतून निर्माण होणाऱ्या गफलतींचं स्लॅपस्टिक अंगाने केलेलं चित्रीकरण बघताना आपण तीन तास हसत लोटपोट होत राहतो!


मेट्रो गोल्डवीन मेयर स्टुडिओची ही भव्य निर्मिती. दिग्दर्शक स्टॅनली क्रॅमरने त्या वेळच्या जवळपास सगळ्याच फेमस कमेडीयन्सना छोट्यामोठ्या भूमिकेत उभं केलं. विल्यम उर्फ बिल रोझ नं त्याच्या अचाट पटकथेतून एकेक पात्र, एकेक नमुना जबरस्त उभा केलाय. प्रत्येकाचा स्वभाव आणि देहबोली बघण्यासारखीच! १९६०च्या दशकातल्या अमेरिकेतल्या वेगवेगळ्या सामाजिक स्तरातल्या लोकांची इंग्लिश भाषेची गंमतही अनुभवण्याजोगी! "कॉमेडी इज ए डेंजरस मिशन, कॉमेडी इज समथिंग इन टायमिंग.." ह्यावर विश्वास असणा-या स्टॅनली क्रॅमरने सांगितलंय, की "शूटींगच्या पहिल्याच दिवशी शूटिंग सुरू होण्याआधी रिहर्सलसाठी जमलेल्या सर्वांची जणू एकमेकांकडे एकटक बघण्याची काँटेस्टच सुरू होती! जमलेली सर्व ग्रेट कॉमेडियन मंडळी माझ्याकडे एकटक बघतायत आणि मी त्यांच्याकडे, की आता ही सर्व दिग्गज मंडळी काय भाव ओतणार आपापल्या भूमिकांमध्ये?! पण त्यांनी जे काही अभिनयातून दिलंय ते बघताना खूपच मस्त वाटत होतं!"..


सिनेमाची सुरुवात होते, तेव्हा कॅलिफोर्नियाच्या "स्टेट हायवे-७४" वरून आपापल्या वाहनामधून प्रवासाला निघालेली काही मंडळी आपल्याला दिसतात. त्यात फर्निचरची ने-आण करणारा एक ट्रकसुद्धा आहे...अचानकच कुणीतरी सुसाट वेगाने सर्वांना मागे टाकत, प्रचंडा वेगातच कार्समधून वाट काढत ओव्हरटेक सर्वांच्या पुढे जायला लागतो. सर्व जण हैराण! च्यामारी ह्याला कसली एवढी घाई म्हणून! पण त्याचा तुफानी वेग त्याला कंट्रोल होत नाही आणि एका वळणावर बाजूचं रेलींग तोडून त्याची कार हवेत झेपावते आणि कोलांट्या उड्या खात खात उतारावरून खाली जाते... 


डोळ्याची पापणी लवते न लवते, तोच इतक्या वेगात हे घडतं, की त्यामुळे हादरलेले सर्वजण दचकून आपापल्या कार्स तिथेच बाजूला थांबवतात! तीन कार्स आणि एका ट्रकमधली ती मंडळी! सर्व पुरुष खाली जाऊन त्या अपघातग्रस्त माणसाला मदत करण्याचा निर्णय घेऊन उतारावरून खाली जातात (भारतात असं काही मदतीला जाणं हे प्रत्यक्षात सोडा, सिनेमांत तरी घडेल?)...तिथे त्या कारमधून बाहेर बाजूला फेकला गेलेला म्हातारा स्मायलर ग्रॉगन हा कुविख्यात चोर शेवटच्या घटका मोजतोय! "मरण्यापूर्वी माणूस खरं बोलतो" या उक्तीनुसार तो

भोवती जमलेल्या मंडळींना आपण काही वर्षांपूर्वी डल्ला मारलेली तीन लाख पन्नास हजार डॉलर्स (लक्षांत घ्या हं १९६३ सालचे!!) इतकी प्रचंड रक्कम आपण सॅन्टा रोसिटा पार्कमधल्या एका ‘बिग डब्ल्यू’खाली पुरून ठेवल्याची माहिती देतो.. आणि पायाजवळ पडलेल्या बादलीला लाथ मारून प्राण सोडतो! (इंग्लिश भाषेत ‘किकिंग दी बकेट’ हे माणूस मरणाच्या संदर्भात वापरलं जातं त्याचा मार्मिक आविष्कार त्या सीनमधे!) 


आधी सुन्न झालेल्या त्या सर्वांचा कानावर विश्वासच बसत नाही. तीन लाख पन्नास हजार डॉलर्स? खरं असेल हे? पण खरं असेल तर मज्जाच हे आपल्याला मिळाले तर? आयुष्याची चांदीच की!!...झालं!! सर्व जण उतार चढून पुन्हा वर येतात. सर्वांचं कोंडाळं जमतं आणि त्यांच्यात ते घबाड सर्वांनी मिळून मिळवायचं आणि मग वाटणी करुन घेण्यावर खल सुरू होतो. 


त्या जमलेल्यांमधे आहेत डिंग बेल (मिकी रुनी) आणि बेन्जी (बडी हॅकेट) ही एका कारमधली मित्रांची दुक्कल, ट्रक घेऊन एकटाच निघालेला लेनी पाइक (जॉनथन विन्टर्स), आपली बायको एमेलीन (डोरोथी प्रोव्हीन) आणि खाष्ट कटकटी सासू मिसेस मार्कस ला (एथेल मर्मन) बरोबर घेऊन निघालेला रसेल फिंच (मिल्टन बर्ल) आणि मोनिका (एडी अॕडम्स) या आपल्या देखण्या बायकोबरोबर निघालेला मेल्व्हिल क्रम्प (सिड सीझर) अशी सारी मंडळी!!..ती प्रचंड रक्कम आता सर्वांनी मिळून शोधायची आणि सापडल्यावर त्याची वाटणी कशी करायची यासंबंधीचं त्यांचं डिस्कशन हाही धम्माल सीन!..उतारावरून उतरून त्या चोरापर्यंत जाणाऱ्या प्रत्येकाला एकेक वाटा मिळावा, शिवाय त्या रक्कमेला चार वाहनांच्या संख्येने म्हणजे चारने भागून वाटे करावे, तर  ट्रकमधल्या एकांड्या लेनीला जास्त पैसे मिळणार. बरं सर्व माणसांच्या संख्येने भागायचं, तर रसेलच्या कारमध्ये तिघे म्हणून लेनीवर अन्याय होणार. मग प्रत्येक वाहन अधिक सर्व माणसं अशा हिशेबाने भागून आलेली रक्कम वाटून घ्यावी की... आणखी काही प्रकारे वाटणी करावी?...ह्यावर सगळ्यांची हिरिरीनं चर्चा!...हाईट म्हणजेत भाबडा नागरिक असणारा लेनी म्हणतो, "मिळालेल्या रकमेवर टॅक्स भरायला हवा"...झालं! अससे अनेक फाटे फुटता फुटता शेवटी "जो जीता वोही सिकंदर" ह्या न्यायाने ज्याने त्याने स्वतंत्र प्रयत्न करावेत असं ठरतं आणि सुरू होते ते प्रचंड घबाड मिळवण्याच्या ईर्ष्येपायी एकमेकांवर कुरघोडी करून तिथपर्यंत पोहोचण्याची सगळ्यांची धुमाकूळ वेगवान शर्यत!


आता मजा म्हणजे त्या अपघातात मेलेल्या स्मायलर ग्रॉगनच्या मागावर असणारा धूर्त पोलीस इन्स्पेक्टर कॅप्टन कलपेपर (स्पेन्सर ट्रेसी) या सगळ्यांच्या हालचालीची बित्तंबातमी ठेवून आहे हे कुणालाच ठाऊक नाही..


इतर कुणाच्याही सर्वांत आधी त्या पार्कमध्ये पोहोचून संपत्ती हस्तगत करायला निघालेल्या प्रत्येकावर काही ना काही मजेशीर संकटं येत जातात आणि ती पाहताना आपली हसून हसून मुरकुंडी वळते... 


क्रम्प आणि मोनिकाला त्या मानाने तिथपर्यंत वेगात जाण्यासाठी एक विमान मिळतं खरं; पण ते असतं १९१६ सालचं मरतुकडं विमान! (ते विमान टेकऑफ घेताना त्या पायलटची बायको ‘देवच रक्षण करो’ अशा अर्थी छातीवर क्रॉसची खूण करत त्यांना ‘अलविदा’ देते ती पुन्हा धमालच)....पुढे त्या ठिकाणच्या विमानतळावर सर्वांच्या आधी दोघं पोहोचून, खड्डा खणण्यासाठी सामान घ्यायला दोघं  जातात, तर तिथल्या हार्डवेअरच्या दुकानाच्या तळघरातच लाॕक होऊन अडकून पडतात. त्यांची तिथून सुटण्याची धमाल धडपड बघण्यासारखी...


इकडे दुसऱ्या कारमधल्या रसेल फिंच ला त्याच्या सासूच्या बडबडीने आणि कटकटीने वात आणलेला आहे. त्यातच त्यांना एका ब्रिटिश कर्नल अल्जेर्नोन हॉथॉर्नबरोबर प्रवास करायची वेळ येते. एकमेकांच्या देशावरून आणि वागणुकीवरून त्यांनी एकमेकांना घातलेल्या शिव्या आणि नंतर त्यांच्यात झालेली फाइट भलतीच मजेशीर! अर्थातच त्या ब्रिटिश कर्नललाही त्या घबाडाविषयी कळून तोही शोधमोहिमेचा भाग होतो हे सांगायला नकोच!!..पुढे रसेलची सासू जावयावर फारसा विश्वास नसल्याने भरीस भर म्हणून आपल्या अत्रंग मुलाला - सिल्व्हेस्टरला (डिक शॉन) आपल्याबरोबर हट्टाने यायला भाग पाडते..आणि त्या संपत्ती मिळवण्याच्या शर्यतीत आणखीच धमाल भर पडते...


ट्रक ड्रायव्हर लेनीवर तर भलताच बाका प्रसंग ओढवतो...ट्रक नादुरुस्त झाल्यानं एका लहान मुलांच्या सायकलवरून हायवे पार करण्याची पाळी त्याच्यावर येते. वाटेत भेटलेला ऑट्टो मेयर (फिल सिल्व्हर्स) त्याची हकीकत ऐकून घेऊन त्या खजिन्याच्या मोहापायी त्याला कारमध्ये घेतो खरा; पण त्याची रस्त्यात पडलेली सायकल उचलून बाजूला करण्यासाठी त्याला उतरवतो आणि भोळ्या लेनीने सायकल उचलून रोडच्या बाजूला फेकल्यावर त्याला तिथेच रस्त्यात टाकत वर वाकुल्या दाखवत कार भरधाव सोडत पसार होतो, कारण त्यालाही आता सर्वांत आधी तिथे पोहोचून तीन लाख पन्नास हजार डॉलर्स हडप करायचेत..पण एका पेट्रोल पंपावर त्याला पेट्रोलसाठी थांबावं लागतं...तेव्हढ्यात ती लहान मुलांची सायकल हाणत रागाने धुमसणारा लेनी तिथे येऊन पोहोचतो आणि त्याला मारायला धावतो...."आपण वेड्यांचे डॉक्टर असून लेनी हा एक माथेफिरू असल्याचं" पंपावरच्या कामगारांना सांगत ऑट्टो मेयर त्या पंपावरच्या दोघांकडे मदत मागतो आणि त्यांनी लेनीला पकडून बांधेपर्यंत तिथून सटकतो...एव्हाना दांडग्या लेनीचा संताप अनावर झालाय. तो स्वतःची सुटका करून घेतो आणि त्याची त्या पेट्रोल पंपावरच्या दोघांशी धुमश्चक्री सुरू होते...प्रचंड धमाल मारामारी आणि लेनी तो संपूर्ण  पेट्रोल पंप उद्ध्वस्त करूनच शांत होतो...तो सारा प्रसंगच धुमाकूळ विनोदी.!! 


तिकडे बेन्जी आणि डिंगीची तर हालतच खराब होते...ते लवकर पोहोचण्यासाठी एका छोट्या प्रायव्हेट जेटने निघतात!..नेमका त्या छोट्या विमानाचा पायलट दारू ढोसून त्या नशेत हलणा-या विमानात डोकं आपटून बेशुद्ध पडतो आणि बेन्जी आणि डिंगीवरच आयत्यावेळी विमान चालवण्याची आफत ओढवते..आणि एक धम्माल थरार सुरू होतो...कंट्रोल टॉवरच्या माणसाने दिलेल्या सूचनांचं कसंबसं पालन करत त्यांची विमान चालवण्यातली तारांबळ...त्या वेळची दोघांची फेशल एक्स्प्रेशन्स तर कमालीची हास्यस्फोटक!!...मुळात बडी हॅकेटचा गोलगोल चेहराच विनोदी, त्यात बेन्जीच्या रोलमध्ये पायलट म्हणून विमान कंट्रोल करण्यातला त्याने आणलेला कसनुसा आव पाहताना आपण हसून वेडे होतो!


अशा सगळ्या अडचणींतून जात जात ती सर्व मंडळी एकदाची सॅन्टा रोसिटाच्या पार्कात पोचतात. ...एव्हाना त्यांच्या त्या मोहिमेत त्यांना तिथपर्यंत नेणारे कॅब ड्रायव्हर्ससुद्धा सामील झालेले असतात... आणि अशा तऱ्हेने एव्हाना संपत्ती मिळवण्याच्या धडपडीत प्रत्यक्षात इच्छुकांच्या संख्येत बरीच वाढ झालेली असते. पार्कात ‘बिग डब्ल्यू’ शोधण्याची प्रत्येकाची धडपड बघण्यासारखी...अजूनही जो तो दुसऱ्याला चुकवूनच खजिन्याचा शोध घेतोय;...पण ‘बिग डब्ल्यू’ म्हणजे काय आणि तो कुठाय ते कुणालाच कळलेलं नाही...


थकलेली एमेलीन पाणी प्यायला वाकते आणि तिला सर्वांत आधी ‘बिग डब्ल्यू’ दिसतो...माडाच्या चार झाडांनी बनलेलं इंग्लिश लेटर W! ..पण तेवढ्यात पार्कात ऑट्टो मेयर दिसल्यावर त्याला मारायला धावणारा लेनी त्याच माडाच्या झाडांखालून धावताना त्यालाही ती निसर्गाची कमाल जाणवते. आणि मग?....मग काय? प्रचंड गलका...सर्व जण हर्षोल्हासाने बेभान होऊन तिथे खणायला सुरुवात करतात.. आणि... आणि.. खरोखरच ती नोटांनी खच्चून भरलेली सूटकेस मिळते....प्रत्येकाचा चेहरा प्रचंड आनंदाने आणि साऱ्या धडपडीचं चीज झालं म्हणून फुलतो.. 


पण त्या गर्दीत सर्वांच्या मागावर असणारा आणि नकळतच सामील झालेला कॅप्टन कलपेपर आपण पोलीस इन्स्पेक्टर असल्याचं उघड करून ती सूटकेस ताब्यात घेऊन निघतो. आपल्या सांगण्यावरून कोर्टात त्यांना फार शिक्षा होऊ न देण्याचं वचनही देतो. हातातोंडाशी आलेला मोठा घास गमावलेले सर्व जण हताश होऊन त्याच्या कारच्या मागे जायला सुरुवात करतात; पण लवकरच त्यांना कळून चुकतं की हा गडीसुद्धा चलाख आहे आणि रक्कम पोलिसांत भरती न करता परस्पर लांबवण्याचा त्याचा डाव आहे!... मग मात्र सगळे जण मिळून त्याच्या मागे लागतात आणि पुन्हा सुरू होतो अकरा जणांचा एक तुफान विनोदी पाठलाग! 


त्यांना गंडवून स्वतःच ती सुटकेस घेऊन पळ काढू पाहणा-या कॕप्टन कलपेपरच्या मागे लागलेले सर्वच जण एका भलत्याच आपत्तीत सापडून सिनेमा एका तुफानी क्लायमॅक्सकडे जातो. 


सर्वांच्या तावडीतून सुटण्यासाठी कलपेपर एका लिफ्ट नसलेल्या जुन्या बिल्डिंगमध्ये जिने चढत चढत जात राहतो; पण शेवटी गच्चीत पोहोचून सर्व मार्ग बंद झाल्याने, निरुपायाने मागच्या बाजूच्या फायर एक्झिटसाठी असणारा लोखंडी जिना गाठतो. त्याच्यामागोमाग पैशासाठी हपापलेले सर्व इच्छुक!... त्या जुन्या फायर एक्झिटला इतक्या साऱ्या लोकांची धावपळ आणि वजन सहन होत नाही आणि तो जिना भिंतीपासून तुटून सुटायला सुरुवात होते...


दरम्यान फायर ब्रिगेडचं आगमन...सुटकेचे क्षीण प्रयत्न; पण इतक्या साऱ्या लोकांनी त्या बंबाच्या शिडीवर उड्या मारल्याने त्या लोकांच्या भाराने फायर ब्रिगेडची ती शिडीही तुटते...सिनेमा तुफान विनोदी क्लायमॅक्सकडे जातो... तो बघण्यातच मजा!... तीन तास हसून हसून आपलं पोट दुखायला लागलेलं असतं...


या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे डझनभर प्रमुख व्यक्तिरेखा असूनही पाहुणे कलाकार म्हणून वर्णी लावलेले हॉलिवूडचे जवळजवळ ५० कलाकारसुद्धा आपल्या ओझरत्या दर्शनातल्या एकेका सीनमध्ये चांगलेच लक्षात राहतात...


मग ते कॅब ड्रायव्हर म्हणून चमकलेले पीटर फॉक आणि एडी अँडरसन असोत, बडी हॅकेटला गाइड करणारा एअर ट्रॅफिक कंट्रोलर कार्ल रिनर असो किंवा कारमधून जाताना रस्त्याच्या मधोमध पडलेली हॅट पाहून मुद्दाम कार तिच्यावरून नेत तिला चिरडून टाकताना होताना चेहऱ्यावरचा आसुरी आनंद ती हॅट पोलीस चीफची आहे आणि तो खिडकीतून आपल्या नावे शंख करतोय हे कळून पोपट झालेला चेहरा दाखवणारा दी ग्रेट जेरी लुइस असो... सगळेच भारी!! 


जगातल्या कुठल्याही कॉमेडी अॕक्टरला ज्या सिनेमात आपण असायलाच हवं अशी धारणा होते अशी ही ‘मस्ट वॉच’ ऑल टाइम क्लासिक कॉमेडी! 


बघितली असेल, तर या आठवणींना उजाळा देत पुन्हा बघा आणि काही कारणाने बघायची राहिली असेल तर...तर मात्र मुळीच वेळ दवडू नका!

No comments:

Post a Comment