"अभिनेत्री"
----------
हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासात अत्यंत देखण्या आणि कमालीच्या लोभस जोड्या म्हणजे १९५० आणि १९६० च्या दशकांतल्या "देव आनंद- मधुबाला" आणि "देव आनंद- नूतन" ह्या दोनच जोड्या खरं तर!! नंतर मात्र त्यांच्या जवळपास जाणारी, एकमेकांना अनुरुप आणि अतीव गोड जोडी दिसली ती थेट १९७० सालच्या "अभिनेत्री"मधे माझ्या शशी आणि हेमामालिनीच्या रुपात!!...
सुबोध मुखर्जींनी हा सिनेमा बनवला तेव्हा अत्यंत देखणा शशी आॕलरेडी एस्टॕब्लीश झालेला स्टार होता. त्याचे "जब जब फूल खिले, कन्यादान, प्यार का मौसम, प्यार किये जा" हिट्ट झाले होते, तर हेमामालिनीने जेमतेम दोन वर्षं आधी राज कपूरबरोबर "सपनों का सौदागर" मधून पदार्पण करुन मग शशीबरोबरच "जहां प्यार मिले" केला होता. दोघांमधे खूपच छान अंडरस्टँण्डींग होतं. हेमामालिनी तिच्या ह्या सिनेमाच्या शुटींगच्या आठवणी सांगताना म्हणाल्येय की, "शुटींगचे ते दिवस अविस्मरणीयच होते. शशी कधीही स्वतः सिनियर असल्यासारखा वागला नाही, उलट हसतखेळत चेष्टामस्करीतच आमचं शुटींग चालत असे"...
दोघांची जोडी अप्रतिम देखणी आणि कमालीची अनुरुप दिसल्येय या सिनेमात! त्यांची एकमेकांबरोबरची केमिस्ट्री आणि वागण्यातला मोकळेपणा कमालीचा लोभस उतरलाय!...
सिनेमाची कथा थोडीशी वेगळी आणि उत्तरार्धात शेवट गोड करण्याच्या नादात एक प्रश्न अनुत्तरीत ठेवून गेलेली...
अंजना (हेमामालिनी) ही एक उत्कृष्ट नर्तिका. तिला स्वतःची आयडेंटिटी आहे. फॕन फाॕलोइंग आहे. ती हिंमतवान आहे. करियर सांभाळत मोठ्या बंगल्यात एकटीच राहत्येय.
शेखर (शशी कपूर) हा टीपीकल वर्कहोलिक सायंटिस्ट. डाॕ.दास यांच्या लॕबमधे काम करणारा सरळमार्गी तरुण. दूर गावात राहणा-या आईचा (निरुपा राॕय) लाडका मुलगा. काहीसा ममा'ज बाॕय टाईप्!..
शेखर आणि अंजना प्रेमात पडून लग्न करतात खरं, पण पुढे 'करिअरिस्ट' बायको आणि 'वर्कहोलिक' नव-यामधला भावनिक संघर्ष उभा राहतो. आणि त्यावेळच्या १९७० च्या म्हणजे तब्बल ५१ वर्षांपूर्वीच्या काळाच्या मानाने, अंजनाने 'करिअरसाठी शेखरला सोडून वेगळं राहायला सुरुवात करणं' ही काहीशी धाडसी मूव्हसुद्धा ह्या सिनेमात दाखवलेली आहे!
सिनेमा अडीच तासांचा किंचित संथ असला तरी शशी-हेमाचं निव्वळ 'असणं आणि दिसणं' ..त्यांचा देखणा वावरच आपल्याला खिळवून ठेवतो.!!
सुरुवातीच्या सहा मिनिटांतच अंजनाचं (हेमामालिनी) अतीव गोड गाणं आपल्यासमोर येतं -"ओ घटा सांवरी..थोडी थोडी बावरी.." (इतक्या देखण्या हेमाला स्वप्नसुंदरी ड्रीमगर्ल हा खिताब न मिळता तरच नवल!)...बाहेर पाऊस कोसळतोय...गाणं संपून ती बंगल्याच्या व्हरांड्यात येते दिव्याचं बटन दाबायला, तितक्यात जोराच्या वा-याने हाॕलचा दरवाजा धडामकन बंद होतो. तिला तो उघडता येत नसतो. दरम्यान जोराचा पाऊस म्हणून आस-यासाठी तिच्या बंगल्याच्या पोर्चमधे आलेला शेखर तिला दिसतो...'हा कोण घुसलाय बंगल्यात' म्हणून आधी ती त्याला जाब विचारते, पण नंतर त्यालाच दार उघडून द्यायची विनंती करते...जोराचा धक्का मारुन दार उघडण्याच्या प्रयत्नात दार उघडलं जाऊन फोर्सने आत फेकल्या गेलेल्या शेखरला थोडं खरचटतं आणि त्याची पँन्टसुद्धा ढुंगुवर फाटते...हा प्रसंग कमालीचा रंजक...त्यच्या फजितीत हेमाचं खळाळून हसणं तर कुणालाही तिच्या प्रेमात पाडणारंच..☺️
शेखरचं तिथे कोट विसरुन जाणं आणि मग अंजनाने कोट देण्यासाठी स्वतः डाॕ.दासच्या लॕबमधे येणं...आणि डाॕ.दास यांच्या भाषेत 'केमिकल रिअॕक्शनमधे जे काम एखादा कॕटलीस्ट करतो', ते काम त्या कोटने शेखर- हेमाच्या एकत्र येण्यात करणं... ;-)
पुढे दोघांच्या भेटी...शेखरने तिला आपल्या आईला भेटवण्यासाठी गावाला नेणं...तिथले तिघांचे ते हलकेफुलके आणि गंमतीदार घरगुती प्रसंग...त्यातनं शेखर-अंजनाचं एकमेकांविषयीचं प्रेम आणखीच घट्ट होत जाणं..
अंजनाने पुन्हा शेखरच्या आईकडे राहायला जाणं..त्यातनं शेखरचा सहवास...जवळीक...आणि मग लग्न!...हनिमून इन कश्मीर!...कश्मीरचा निसर्ग..दल लेक...शिका-यातनं फिरणं..
कश्मीरच्या बागेत तिचा त्याला गाण्याचा आग्रह...त्याला येत नाही म्हणून गाणं शिकवणं "सारेगमप प प प प प ध म रे..."...हे गाणं बघताना त्या पहिल्या कडव्याच्या शेवटी ती म्हणते "ध म ध, तू काला, म रे म, मै गोरी- ले ले मेरा रंग मेरे साजना.."..त्यावेळी ही मद्रदेशीय स्वप्नसुंदरी ह्या खानदानी पंजाबी लालबुंद गो-या चिकण्याला "तू काला मै गोरी, ले ले मेरा रंग.." ऐकवते तेव्हा एक सेकंद (तिच्या तुलनेत ;-) ) गोराच असणारा शशी दचकून क्षणभर थबकतो, तेव्हा त्याच्या चेहे-यावर फ्रॕक्शन आॕफ सेकंद आश्चर्य तरळून जातं ते बघताना मजा वाटते...😉
हनिमूनहून परतून दोघांचा राजा-राणीचा सोनेरी- गुलाबी संसार सुरु होतो...त्यांचं ते 'लाघवी प्रेमात डुंबणं' बघत राहण्यासारखंच...! त्यांचे घरगुती प्रसंग पाहताना आपण "शशी-हेमा"ला पाहतोय अस्सं कुठेही न वाटता एक प्रेमात डुंबलेल्या आपल्यातल्याच जोडप्याला बघतोय इतके सहज रंगलेत दोघांचे इंटिमेट सीन्स...
(शशी- हेमाची केमिस्ट्री आणि एकमेकांबरोबरचे प्रेमप्रसंग फारच जेन्युईन वाटतात...मला स्वतःला त्यांचे सगळेच सिनेमे बघताना हे जाणवलंय की आपल्या ख-या नव-याखेरीज धर्मेंद्रखेरीज, हेमा कधी दुस-या कुणाशी प्रेमप्रसंगातही कमालीची मोकळीढाकळी असते ती फक्त शशीबरोबरच!!).
पण शेखरचं सदासर्वदा अंजनात गुंतणं त्याच्या कामावर परिणाम करतं आणि डाॕक्टरसाहेबांकडून त्याला ऐकून घ्यावं लागतं..मग मात्र तो पुन्हा कामाकडे लक्ष वळवतो आणि हळुहळू अंजनाकडे त्याचं चक्क दुर्लक्ष व्हायला लागतं...ती खोटीनाटी नाटकं करत त्याचं मन वळवू पाहतेसुद्धा (त्यावेळी एक सुंदर गाणं "खिचें हमसे सावरे इतने क्यूं हो?") ..पण हा गडी पुन्हा कामात डुंबायला लागतो...अर्थातच आपलं नृत्यातलं करियर आणि प्रतिष्ठा त्याच्या प्रेमासाठी, संसारासाठी सोडलेल्या अंजनाला ते सहन होईनासं होतं...त्याचा त्रास व्हायला लागतो..ते बाहेर डिनरला जातात तेव्हा तिच्या चाहत्यांचा त्रास त्याला सहन होत नाही...ती पुन्हा एकदा स्टेजवर पर्फाॕर्म करु का विचारते तेव्हा तो चक्क नकार देतो..त्यांच्यात वाद होतात..तिचं परपुरुषांबरोबर जवळीकीनं स्टेजवर नाचणं त्याला सहन होत नाही...आणि शेखर चक्क "करियर किंवा मी" असा सवाल करतो तेव्हा ती दुःखद निर्णय घेत त्याच्या घरातून बाहेर पडते...
पण काही काळाने शेखरची आई त्याच्याकडे राहायला येणार समजल्यावर मात्र आईसाठी अंजनाने मनाविरुद्ध का होईना पण पुन्हा परत यावं असं शेखर तिला सांगतो...ती परत येतेसुद्धा...
पुढे काय घडतं?..त्यांच्यातल्या बेबनावाचा आईला सुगावा लागतो का? त्यांची मनं पुन्हा सांधली जातात का? करियरसाठी बाणेदारपणे नव-यापास्नं दूर राहायला सुरुवात करणारी अंजना काय निर्णय घेते? शेखरला तिचा निर्णय मान्य होतो का?
या प्रश्नांच्या उत्तरासाठी "अभिनेत्री" जरुर पाहा!! "सजना..ओss सजना.." सारख्या हेमाच्या खूप गोड गाण्यासाठी! हेमा-शशीच्या अफलातून केमिस्ट्रीसाठी! आणि माझ्या मते देव-मधुबाला आणि देव-नूतन नंतरच्या एकमेव अनुरुप गोड जोडीसाठी!!
आणि हो, हा Zee5 वर चकट-फू आहे!😍
No comments:
Post a Comment