Wednesday, 1 June 2022

आ वाॕक इन द क्लाउड्स

 अ वाॕक इन द क्लाऊड्स"

---------------

माझ्यासारख्या रोमँन्टिक जाॕन्र आवडणा-या तुमच्यातल्या बहुतेकांनी हा सिनेमा 'किमान एकदा' तरी नक्कीच पाहिला असेल?!! रोमँन्टिक जाॕन्रमधेसुद्धा तसे उप-जाॕन्र असतातच नै का?..म्हणजे असं की - एकीकडे "रोमन हाॕलीडे, कॕसाब्लांका"सारखे मूव्हीज जिथे दोन प्रेमी जीव अखेरीस एकत्र नाही येऊ शकत किंवा मग "नाईट्स इन रोडॕन्थी, टायटॕनिक, आॕटम इन न्यूयाॕर्क"सारखे जिथे दोघांपैकी एकाचा कहानी अधुरी ठेवत मृत्यू असतो किंवा मग "प्रिटी वूमन, नाॕटिंग हिल, अॕन अफेअर टू रिमेंम्बर, इट हॕपन्ड वन नाईट"सारखे जिथे अमीर- गरीब जोडीचं फुलत गेलेलं प्रेम असतं किंवा मग "सेरेंडिपिटी"सारखे कार्मिक योगायोगातनं जमणारं प्रेम सांगणारे मूव्हीज...


"अ वाॕक इन द क्लाऊड्स" हा त्यांपेक्षा किंचित वेगळ्या रोमँन्टिक जाॕन्रचा मूव्ही! कदाचित ब-याच मंडळींच्या "टाॕप-10 रोमँन्टिक मूव्हीज किंवा लव्ह स्टोरीजच्या लिस्ट"मधे हा नसेलही, पण तरीही हा आपल्या मनाच्या कोप-यात जपला जाणारा मूव्ही नक्कीच आहे!


डोंगर-द-यांमधली थंडगार झुळूक' असा आपल्या नावाचा अर्थ असणारा केआनू रीव्हज ह्यात आहे, माझा खूप आवडता अभिनेता अँन्थनी क्वीन ह्यात आहे, मुलीवरच्या प्रचंड प्रेमापोटी, काळजीपोटी चिडका बिब्बा, तापट बाप रंगवणारा जांन्कार्लो जान्निनी ह्यात आहे, अत्यंत निसर्गरम्य नापा व्हॕली आणि द्राक्षांचे नयनमनोरम मळे ह्यात आहेत, एकमेकांना घट्ट बांधून असणारं भलं मोठं मेक्सिकन कुटुंब ह्यात आहे, प्रेयसीला आर्त साद घालणारं मेक्सिकन प्रीती-गीत ह्यात आहे आणि या सर्वातनं उलगडत जाणारी 'एका विवाहित तरुणाची आणि प्रियकराकडून फसवलं जाऊन प्रेग्नंट राहिलेल्या एका भोळ्या सुंदर तरुणीची' हळूवार प्रेमकथा ह्यात आहे!! माझ्यासारख्या 'प्रेमाच्याच प्रेमात' असणा-यांला हे इतकं पुरेसं आहे! 🥰


पाॕल सटन (केआनू रीव्हज) हा अनाथालयात वाढलेला तरुण नुकताच दुस-या महायुद्धातली आपली कामगिरी बजावून सॕन फ्रॕन्सिस्कोच्या घरी परतलाय. युद्धावर जाण्यापूर्वीच त्याने जिच्याशी काहीश्या घाईतच लग्न केलं होतं, त्या बेट्टी ला (डेब्रा मेसिंग) मात्र त्याच्याविषयी फार काही ओढ, असोशी असल्याचं दिसत नाही, कारण त्याने युद्धभूमीवरुन तिला जवळपास रोजच लिहिलेली पत्रं तिने फोडून वाचण्याचा उत्साहच दाखवलेला नाही. (हां, मात्र ती 'न फोडलेली सारी पत्रं' जशीच्या तशी तिने एका ट्रंकेत नीट जपून मात्र ठेवल्येयत!)..पाॕल परतल्यावर बेट्टी त्याला, तो पूर्वी करत असलेली चाॕकलेट्स- सेल्समनची नोकरीच पुन्हा चालू करण्याचा आग्रह धरते...पण त्याला वेगळं काही करुन पाहायचाय आणि तो आपल्या गावाला सॕक्रमेन्टाॕ ला एकवार भेट देण्यासाठी निघालाय...


ट्रेनमधे त्याची गाठ व्हिक्टोरिया अरॕगाॕनशी (आईताना सँचेझ) पडते (आणि त्या भेटीतच ती प्रेग्नंट असल्याचं प्रेक्षकांच्या लक्षात येतं). व्हिक्टोरिया आपल्या कुटुंबाच्या भव्य इस्टेटीवर काॕलेजची सुट्टी घालवायला निघाल्ये..योगायोगानं त्यांच्या ट्रेनच्या तिकीटाचा घोळ होऊन, पुढे दोघांचा प्रवास एकाच बसमधनं सुरु राहतो. बसमधे तिला छेडणा-या दोन मवाल्यांना पाॕलने  चोपल्यावर त्या दोघांबरोबरच पाॕलचीसुद्धा बसमधनं गच्छंन्ती होते. पण काही अंतर पायी चालल्यावर, एका गर्द झाडांनी वेढलेल्या निसर्गरम्य वळणावर त्याला व्हिक्टोरियासुद्धा बसमधनं उतरलेली दिसते. तिच्या बोलण्यातनं त्याला कळतं की ती काॕलेजच्या प्रोफेसरच्या प्रेमात पडून त्याच्यापास्नं प्रेग्नंट राहिल्येय पण त्या भ्याड माणसाने नंतर मात्र जबाबदारी झटकून तिच्याबरोबर तिच्या तापट, कोपीष्ट वडिलांसमोर यायला नकार दिलाय...तिला आता वडिलांना तोंड कसं द्यायचं ह्या भितीनं कापरं भरलंय...


ते ऐकून सरळमार्गी, सज्जन हाडाचा सैनिक असणारा पाॕल त्या असहाय्य व्हिक्टोरियाला अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी, तिचा 'औट घटकेचा नवरा' बनून तिच्याबरोबर एक दिवस त्यांच्या इस्टेटीवर यायला तयार होतो..आणि असं ठरतं की त्याने एक रात्र तिथे काढून दुस-या दिवशी तिच्या घरनं गायब व्हायचं...


दोघे मग गप्पा मारत चालतच त्या निसर्गरम्य रानातल्या रस्त्यानं मैलोनमैल द्राक्षाचे मळे पसरलेल्या त्या रमणीय पठाराकडे जातात...आणि इथे आपल्यासमोर अचानकच येते ती "क्लाऊड" नावानं प्रसिद्ध असलेली तिच्या वडिलांची ती द्राक्षांच्या मळ्यांबरोबर ऊभी देखणी भव्य इस्टेट! 


आपली लेक कुण्या अनोळखी तरुणाबरोबर अचानक आलेली पाहून तिच्या रागीट बापाला अल्बर्टो अरॕगाॕन ला (जांन्कार्लो जान्निनी) राग अनावर होतो. त्यातच लेकीने ह्या अनाथालयात वाढलेल्या तरुणाशी लग्नही केलंय हे कळून तो आणखीच वैतागतो...पण व्हिक्टोरियाच्या आई ला मारिया जोस ला(अँजेलिका) आणि आजोबांना डाॕन पेद्रो ला (अँन्थनी क्वीन) हा तरणाबांड, लाघवी जावई आवडलाय. त्याचं जोरदार स्वागत होतं. पाॕल त्यांना आपल्या अनाथालयातल्या एकांड्या आयुष्याविषयी सांगतो...आपण रोज रात्री आकाशस्थ ता-यांकडे एकटक बघत भरलेल्या घराची स्वप्न बघायचो ते सांगतो..तेव्हा आजोबा डाॕन पेद्रो कमालीच्या प्रेमळ भावनेनं त्याला आश्वस्त करतात - "You are an orphan no longer.!"


 (पण रात्री मुलीला गुडनाईट करायला आलेल्या अल्बर्टोच्या नजरेतनः त्या पलंगापलीकडे  जमिनीवर पडलेली चादर/ पांघरुण पाहून सारं काही आलबेल नसल्याची जाणीव होते...)


ठरल्यानुसार पाॕल भल्या पहाटे निघणार तेव्हा नेमका प्रेमळ डाॕन पेद्रो आजोबांच्या तावडीत सापडतो...पाॕलकडच्या चाॕकलेटच्या मझा घेत त्याला इस्टेटीवर दाखवत फिरणा-या अँन्थनी क्वीनने तो सीन आपल्या सहजसुंदर अभिनयानं कमालीचा रंजक केलाय...


एका प्रसंगी डाॕन पेद्रो (अँन्थनी क्वीन) त्याच्या खास अंदाजात म्हणून जातो-"Clothes are like family. You have to live in them for awhile before you have the perfect fit. But you are doing great." ..तर दुस-या एका प्रसंगात तरुण जोडप्याविषयीचं त्याचं आँब्झर्वेशन गंमतीदारच -"Newlyweds. What else do they do but make love and war?"..


दरम्यान पाॕल तिथनं सटकायची संधी शोधत असतानाच दोन गोष्टी घडतात. एक म्हणजे अचानकच एका रात्री हिमवर्षाव झाल्यामुळे द्राक्षाचा मळा आणि सगळी झाडं धोक्यात येतात आणि मग ते जमलेले हिमकण काढण्यासाठी तेलाचे पेटत्या दिव्यांची उष्णता हातात फुलपाखराच्या पंखांच्या आकाराचे भलेमोठे पंखे बांधून लयबद्धपणे हलवत झाडांना उष्णता देण्यासाठी संपूर्ण इस्टेटीवरच्या माणसांचे प्रयत्न आणि त्या दरम्यान पाॕल आणि व्हिक्टोरियाचं खूप गोड प्रकारे निकट येणं...


एका प्रसंगी तिच्यावर वैतागलेल्या बापाला अल्बर्टोला पाॕल च इतकं सहज बोलून जातो -"I know that she is good and strong and deserves all the love this world has to give. Can't you see that, how wonderful, how special she is?" ."Why can't you just love her? She's so easy to love." ..आतनं आलेली ती भावना केआनू रीव्हजने खूप छान व्यक्त केल्येय..


आणि दुसरा प्रसंग म्हणजे ग्रेप्स-स्टाँम्पिंगचा बेभान नाच! तयार झालेली द्राक्ष खुडून ती एका अवाढव्य टाकीत जमा करायची आणि मग त्यात कुटुंबातल्या सर्व स्त्रियांनी अनवाणी उतरुन उत्फुल्ल आनंदी संगीताच्या तालावर अनवाणी पायांनी त्यातच नाचत गात त्या द्राक्षांचा चुराडा करत वाईन बनवाण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करुन द्यायची...हा प्रसंग दिग्दर्शक अल्फाॕन्सो एराॕ ने फारच बहारदार शूट केलाय...त्या डान्सच्या वाढत जाणा-या रिदमबरोबर पाॕल आणि व्हिक्टोरीयाचं बेभान बेछूट नाचणं आणि मग तिथनं पळून एकांत शोधत दोघांची घट्ट आलिंगनात हरवून जात दीर्घ चुंबनसमाधी...


पण पाॕल ला व्हिक्टोरियात जास्त न अडकता आपल्या बायकोकडे बेट्टीकडे परतण्याचं भान आहे...


पाॕल आणि व्हिक्टोरियाचं ती दोघं नवरा-बायको नसल्याचं बिंग फुटतं का? पाॕल बेट्टीकडे परत जातो का? अल्बर्टोच्या रागाची परिणती कशात होते? व्हिक्टोरियाचं प्रेम तिला परत मिळतं का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी हा गुंतवून ठेवणारा प्रेमाचा मूव्ही जरुर पाहा!..अमेरिकेत सेटल झालेल्या मेक्सिकन फॕमिलीच्या अंतरंगात डोकावत एक तरल, हळूवार उलगडणारा रोमान्स बघत नक्की मेस्मेराईझ्ड व्हाल. माझ्याइतकेच्च!!

No comments:

Post a Comment