Monday, 14 June 2021

द सिक्रेट आॕफ सँन्टा व्हिट्टोरिया

द सिक्रेट आॕफ सँन्टा व्हिट्टोरिया
-------------
नऊ दिवसांपूर्वीच त्याचा स्मृतीदिन होता!! दोन लग्नाच्या बायका आणि दोन अफेअर्समधनं तब्बल बारा मुलांचा बाप असणारा अँन्थनी क्वीन हा अॕक्टिंगमधेसुद्धा ब्बापच होता! मी याआधी त्याचे दोनच मूव्हीज बघितले होते -"झाॕर्बा द ग्रीक" आणि "गन्स आॕफ नेव्हराॕन". पण काल रात्री बघितलेला "द सिक्रेट आॕफ सँन्टा व्हिट्टोरिया"मधला त्याचा इटालीयन माणसाचा रोल म्हणजे परकाया प्रवेशाचं उत्तम उदाहरणच!

मी स्वतः इटालियन कंपनीत इटालियन बाॕसेसबरोबर नऊ वर्षं काम केलंय त्यामुळे इटालियन लोकांची बोलण्याची पद्धत आणि हातवारे लक्षात होते...ते अँन्थनी क्वीनने इतके मूर्तीमंत उचललेत की क्या केहने!

"गावक-यांकडची वाईन लुटायला आलेल्यांंना गावकरी वाईन मिळू देत नाहीत" - ह्या वन- लाईनवर दोन तास वीस मिनिटांचा मजेदार सिनेमा बनू शकतो हे निर्माता आणि दिग्दर्शक स्टॕन्ली क्रेमरने दाखवून दिलंय! स्टॕन्ली क्रेमरचा त्याआधी साडेतीन तासांचा धुमाकूळ हसवणारा "इट्स ए मॕड मॕड मॕड मॕड वर्ल्ड" खूपवेळा पाहिल्यामुळे तो अफलातून दिग्दर्शक आहे ते माहित होतंच!..

कथा घडते इटलीमधल्या डोंगराळ भागातल्या सँन्टा व्हिट्टोरिया ह्या छोट्याश्या गावात! दुस-या महायुद्धाचा काळ. मुसोलीनीची फॕसिस्ट राजवट संपल्याची बातमी गावात पोहोचते आणि फॕसिस्ट पार्टीला सामील असणा-या गावच्या कौन्सिलला आपली सद्दी संपल्याची जाणीव होते.

बाँम्बोलिनी (अँन्थनी क्वीन) हा गावातला बेवडा. त्याला गावात अज्जिबात किंमत नाही. गावाचं सोडाच त्याची बायको रोझादेखील (अॕना मॕग्नानी) त्याला विचारत नाही. त्याच्या सततच्या नशेबद्दल तीसुद्धा त्याला घालून पाडून बोलत असते. मारतसुद्धा असते.

फॕसिस्ट राजवट गेल्याच्या आनंदात बाँम्बोलिनी दारुची बाॕटल घेऊन पीतपीतच गावच्या उंचच उंच पाण्याच्या टाकीवर चढतो. त्याचं अचाट साहस पाहायला तमाम गावकरी खालती जमलेले. (शोलेमधला धर्मेंद्रचा 'सुसाईड'चा सीन ह्यावरुनच बेतलाय!!) पण इतक्या उंचावरनं त्याला उतरणं अशक्य. दोनदा तर तो बोलताबोलता पडेलच असंही वाटून जातं!..तो सगळा तमाशा दुरुन बघणारी रोझा तर "तो मेला तर मी सुटेन"म्हणण्याइतकी निबर झाल्येय!

पण घडतं धमालच!..त्या प्रसंगातनं तो उलटा हिरोच बनतो आणि गावकरी त्याला डोक्यावर घेतात. कौन्सिलची माणसं ती संधी साधत गावक-यांमधे पाॕप्युलर बनलेल्या त्याला नवा मेयरच बनवून टाकतात!..गंमत म्हणजे त्याच्या सिध्यासाध्या खोपडीतनं एक अजब शक्कल निघते आणि तो लहानमोठ्या कामांसाठी भरपूर वेगवेगळी खाती बनवून, गावातल्या बहुतेक सा-या महत्त्वाच्या मंडळींना त्या त्या खात्याचे मंत्री म्हणून जाहीर करतो. सगळे मनातनं खूष!..आधीच्या फॕसिस्टांना साथ देणा-या कौन्सिलच्या सभासदांना त्यांनी मुसोलिनीला दिलेली साथ आठवून नजरकैदेत टाकलं जातं!

बाँम्बोलिनी मेयर बनल्याबनल्या गावावर एक आफत ओढवते! अजून पुरता पाडाव न झालेल्या नाझी सैन्याची एक तुकडी गावात शिरुन गाव ताब्यात घेते. त्यांचा उद्देश एकच असतो वाईन-निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेल्या सँन्टा व्हिट्टोरियातनं वाईनचा मोठ्ठा साठा जर्मन सैन्यासाठी घेऊन जायचा...पण शहरात गेलेल्या बाँम्बोलिनीच्या विश्वासातल्या फॕबिओने (गिआनिनी) ती खबर आधीच गावात आणलेली असते. मूळ इटालिअन फौजेतनं गावात आलेल्या कार्लोच्या (सर्जिओ फ्रँको) आणि गावातल्या प्रत्येक स्त्री-पुरुषाच्या मदतीने, मेयर बाँम्बोलिनी अत्यंत धाडसी पण डोकेबाज प्लॕन आखतो आणि सगळे गावकरी दिवसरात्र मेहनत करुन गावातल्या तब्बल १० लाख वाईनच्या बाॕटल्स गावाजवळच्या डोंगराच्या गुहेत लपवून तो भाग कुणाच्या लक्षात येणार नाही अशाप्रकारे बंद करुन टाकतात! (पण एकीकडे गावात एक्कही बाॕटल नाही म्हणून जर्मनांना टोकाचा संशय येऊ नये म्हणून त्यांना सहजासहजी मिळू शकतील अशा ३ लाख वाईन बाॕटल्स गावातच ठेवून!) त्यासाठी गावकरी गावापासून ते डोंगराच्या गुहेपर्यंत मानवी साखळी करतात आणि रात्रंदिवस शिफ्ट्समधे कामं करुन १० लाख वाईन बाॕटल्स तिथे लपवण्यात यशस्वी होतात. ते कठीण काम गावक-यांच्या मदतीनं बाँम्बोलिनी पार पाडतो तेव्हा त्याच्या बायकोचा,  रोझाचा त्याच्यावरचा राग किंचित कमी होतो. पण किंचितच! ...ही सर्व दृश्य आपली कथेतली उत्कंठा वाढवणारीच...

गावाता आलेल्या जर्मन तुकडीचा प्रमुख फाॕन प्रुम (हार्डी क्रुगर) हा इतर कुप्रसिद्ध नाझींइतका क्रुरकर्मा नाही. त्याचे आणि मेयर बाँम्बोलीनीचे ब-यापैकी सभ्य पातळीवर संवाद घडत असतात. पण बाँम्बोलिनी "Therw is no wine" हेच सांगत राहतो..दरम्यान फाॕन प्रुमची नजर शहरातनं गावात परत आलेल्या  कॕटरिना ह्या सुंदर युवतीवर पडते. तिने आपल्या घरात इटालियन सैन्यातनं परत आलेल्या सैनिक कार्लोला आसरा दिलाय आणि त्यांच्यात प्रेमसंबंधही निर्माण झालेत...

अखेर जर्मन सैन्याला वायनरी उत्पादकांच्या रेकाॕर्ड्समधनं खात्रीलायक माहिती मिळते की सँटा व्हिटौटोरियया गावात आणखी दहा लाख बाॕटल वाईन असायलाच हवी...मग मात्र फाॕन प्रुम घराघरात शिरुन झडती घ्यायला सुरुवात करतो आणि तरीही वाईन सापडता सापडत नाही...त्याच्यापास्नं सगळं लपवण्यात बाँम्बोलिनीची उडणारी त्रेधा अँन्थनी क्वीनने जबरदस्तच दाखवल्येय!...

जर्मन अधीका-याःकडनं गावक-यांपैकी रँडम कुणाचा छळ करुन माहिती काढून घेण्याचा प्रयत्न होतो...पाठोपाठच कार्लोला भर चौकात गोळ्या घालण्याचं जाहीर होतं ...सँन्टा व्हिट्टोरिया गावाने जपलेलं सिक्रेट आखेर फुटतं का? जर्मन सैन्याला दहा लाख वाईन बाॕटल्सचा छडा लागतो का? मेयर बाँम्बोलिनीवरही भर चौकात गोळी घालण्याचा फाॕन प्रुमच्या धमकीचा काय परिणाम होतो?..गावचं इटॕलियन स्पिरीट..गावक-यांची एकी जर्मन सैन्याला कशी दिसते?..

या सगळ्याची उत्तरं मिळवण्यासाठी हा मूव्ही पाहा!!..अँन्थनी क्वीन हा तसा राकट, रांगड्या पर्सनॕलिटीचा अभिनेता. त्याने साकारलेला दारुडा, बिनकामाचा नवरा ते मेयर झाल्यावरची त्याची देहबोली आणि इटालियन अभिनेत्री अॕना मॕग्नानी ने त्याच्या खाष्ट बायकोच्या, रोझाच्या भूमिकेत भरलेले गहिरे रंग...लाजवाबच!!

No comments:

Post a Comment