'बात एक रात की' मध्ये मनमौजी देव आनंद गात असतो -'अकेला हूं मै, इस दुनिया में, कोई साथी है तो मेरा साया...अकेला... " पण शेवटी तो पडला देवसाब; त्याचं एकटेपण घालवायला वहिदासारखी गोड नायिका येणार असते तिथे पडद्यावर! पण आपल्यासारख्या सामान्यांच्या प्रत्यक्ष जीवनात, असं 'अकेलेपण मेहसूस' करणाऱ्या बिचाऱ्या पुरुषाला कुठे जमणारे असा आपला 'साया' साथीला घेऊन गायला? तो 'अकेला' असतो तेव्हा अक्षरशः, शब्दशः अकेलाच, एकटाच असतो! त्याला नसते कुणाची साथबीथ!
बरं, हे एकटं असणं किंवा एकटेपणा म्हणजे नक्की काय? बरोबर कुणी नाही म्हणून एकटा? शरीराने असतो एकटा म्हणून? मला वाटतं एकाकीपण हे शरीरापेक्षा मनाचं असतं आणि ते अर्थातच जास्त भीषण असतं. कारण पुरुष जेव्हा देहाने एकटा असतो तेव्हा मनानेही एकटा असतोच असं नाही आणि देहाने कळपात असतो तेव्हा मनानेही कळपातच असतो असंही नाही!!... तो शरीराने एकटा, एकांतात असताना मनामध्ये कुणी साथीला असू शकतं आणि त्या मनोविश्वात तो त्या कुणा एकीचं सानिध्य, सहवास अनुभवू शकतो, रमू शकतो अगदी गप्पाही होऊ शकतात मनोमनी!... आणि याउलट कळपात, ग्रुपमध्ये तो असतांना, कदाचित त्याचं मन त्या ग्रुपच्या गप्पांमध्ये नाही रमू शकत आणि तो असून नसतो तिथे! --- या दोन्ही बाबी तशा विचित्रच.
एकटेपणाला कितीतरी कंगोरे आणि त्याच्या कितीतरी तऱ्हा असतात! काही पुरुष वेगळ्या अनोळखी देशात, प्रदेशात असल्यामुळे एकटेपण अनुभवतात तर काही पुरुष त्यांना हवी तशी माणसं न भेटल्यामुळे एकटेपण अनुभवतात. काही पुरुष दैवाच्या फेऱ्यांमुळे देहाचं एकलेपण अनुभवतात. नव्हे, नियतीच त्यांच्यावर ती पाळी आणते. काहींच्या बाबतीत अगदी जवळची सख्खी माणसं आजाराने किंवा अपघातात मृत्युमुखी पडल्यामुळे आलेलं एकटेपण असतं. काहींना नोकरीनिमित्त जवळच्यांपासून दुरावून परदेशात गेल्यामुळे आलेलं एकटेपण असतं. काही थोडे पुरुष हे प्राणीप्रेमी असतात आणि अशांना जर प्राण्यांची (कुत्री, मांजरं, घोडे किंवा इतर कुठलाही पेट!) सोबत नसेल तर असे पुरुष एकटेपणा अनुभवतात. तर काही पुरुषांना नातेवाईक किंवा मित्रपरिवार नसतो आणि म्हणूनही ते खऱ्या अर्थाने एकटे असतात. बऱ्याचदा हे एकटेपण त्यांनीच ओढवून घेतलेलं असतं, कारण असे पुरुष जन्मतः अबोल किंवा मितभाषी असतात. त्यांना दुसऱ्या माणसांत रस नसतो. बोलण्याची, गप्पांची आवड नसते आणि साहजिकच मग अशांच्या वाट्याला बाकीचेही कुणी फिरकत नाहीत आणि असे पुरुष मग असा ओढवून घेतलेला एकटेपणा अनुभवतात. काही फार थोडे पुरुष त्यांना भेडसावणाऱ्या लैंगिक समस्यांमुळे आणि त्याबद्दल धड कुणाशी बोलू शकत नसल्याच्या आलेल्या वैफल्यातून एकटेपण ओढवून घेतात. काहींजण इतकं काम ओढवून घेतात किंवा इतके वर्कहोलिक असतात की त्यांना स्वतःचं असं खाजगी आयुष्य जगायलाही मिळत नाही आणि मग ते वैयक्तिक आयुष्यात एकटेच पडतात. तर काहींना मानसिक दुर्बल्यामुळे कसला ना कसला फोबिया असतो आणि मग त्यातून आलेल्या भयगंडामुळे ते अवतीभवती माणसं असूनही एकटेपणा अनुभवतात...
शेवटी, कुणाही पुरुषासाठी देहाच्या एकटेपणापेक्षा भयाण असतं मनाचं एकटेपण! ते देहाच्या एकटेपणामुळे येऊ शकतं, पण त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे ते बऱ्याचदा मनं जुळणारी माणसंच न सापडल्याने आलेलं एकटेपण असू शकतं. 'अकेला हूं मैं हमसफर ढुंढता हूं, मोहोब्बतकी मैं रेहगुजर ढुंढता हूं' म्हणणाऱ्या काहीजणांच्या आयुष्यात 'ती' कुणीतरी चालून येते - पण तो सहवास क्षणभंगुर ठरून, प्रेमभंग वाट्याला आल्यावर मात्र असा पुरुष उध्वस्त होतो. अशांना आलेलं वैफल्य पचवणं जड जातं. 'जायचंच होतं तर का आलीस आयुष्यात?' असाच प्रश्न पडतो. 'मैं अकेले यूंही मजेमे था, मुझे आप किस लिये मिल गये...मुझे दर्द-ए-दिल का पता न था...' अशा विकल भावनिक अवस्थेत त्याचं एकटेपण सुरु होतं. ती स्थिती फार जीवघेणी असते. ही स्थिती इमॅजिन नाही करता येत, ह्यातून जो गेला त्यालाच त्यातली तीव्रता कळू शकते. 'जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे' हेच खरं! ते एकटेपण - ते भंगलेलं प्रेम - तो घायाळ करून गेलेला घाव पचवणं प्रचंड अवघड असतं. त्या एकटेपणातून सावरणं फार कठीण! काहीजण भ्रमिष्ट होतात, काहीजण त्या आठवणी विसरण्यासाठी स्वतःला दारूत बुडवून घेतात. बिमल रॉय यांचा 'देवदास' आठवतो? चंद्रमुखीचं प्रेम समजू न शकणारा देवदास पारोच्या प्रेमात विव्हळ होऊन आपलं एकटेपण दारूत बुडवत असतो. पारोने अव्हेरल्यामुळे आलेलं हे एकटेपण आणि त्यापायी दारूचा घेतलेला सहारा चंद्र्मुखीला सांगताना देवदासच्या तोंडचा तो प्रसिद्ध डायलॉग -'कौन कम्बख्त है जो बरदाश्त करने को पिता है, मैं तो पिता हूं कि बस सांस ले सकू..' . काही पुरुष अशा एकटेपणातूनच पुढे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊलही उचलतात. पण हे झालं तरुण अविवाहित पुरुषांच्या प्रेमभंगी अवस्थेतून आलेलं एकटेपण!
संसारी पुरुषांच्या बाबतीत वेगळालं एकटेपण असू शकतं. काही पुरुषांची लाईफ पार्टनर ही अगदीच विरुद्ध आवडीनिवडी असणारी, टोकाचे स्वभाव असणारी किंवा त्यांच्याशी IQ आणि EQ अगदीच न जुळणारी असते आणि मग ते जाणवल्यावर होणारी घालमेल त्यांच्यात दरी निर्माण करू शकते. बायकोला नवरा पटत नाही, त्याला ती भावत नाही आणि मग आपोआप त्यांच्यात एक प्रकारचा दुरावा येत जातो. असे पुरुष मग क्वचित कोशात जातात. काहीजण कळत नकळत त्यांच्या टाईपच्या, त्यांच्याशी मनं जुळणाऱ्या मैत्रिणी बाहेरच्या दुनियेत शोधतात. अशांना त्यांचं मन जाणणाऱ्या, त्यांच्या मतांचा आदर करणाऱ्या कुणी बाहेर भेटूही शकतात. पण घरी पार्टनरशी पटत नसल्याने असे पुरुष घरी मात्र एकाकीपण मेहसूस करतच जगतात. बहुसंख्य पुरुषांच्या बाबतीत त्यांची अशी लग्नानंतरची मैत्री समजणारी, जाणणारी आणि मानणारी माणसं फार थोडी असतात. आपल्याला स्वतःला पुरुष मित्र असावेत हे मानणाऱ्या बायकांना, आपल्या नवऱ्याला मैत्रिणी असलेल्या मात्र नाही चालत! आणि मग ना धड अशा बायकोशी पटत आणि ना मैत्रिणीशी बोलता येत अशा पुरुषांची हालत तर केवीलवाणीच होते. आपले मित्र नवऱ्याने स्वीकारावेत वाटणाऱ्या बायका, जेव्हा नवऱ्याच्या मैत्रिणी म्हणजे जणू सवतीच अशा थाटात पुरुषांशी वागतात तेव्हा त्या कोंडीत सापडलेल्या पुरुषांचं एकटेपण हे वेगळया दर्दभरं ठरतं! बिचारा बायकोच्या मित्रांशी अगदीच छान मैत्री करून त्यांना आपलं मानून आगतस्वागत करतो पण तेच त्याच्या स्वतःच्या मैत्रिणींना घरी बोलवायचं म्हटलं की बायकोच्या कपाळावरच्या आठ्या आणि एकूण आविर्भाव बघून त्याचा उत्साहच मावळतो. आणि त्यातून कदाचित मैत्रिणींचाही रोष पदरी येतो ते वेगळंच! थोडक्यात तो एकाचवेळी बायकोची दादागिरी सहन करत आणि मैत्रिणींच्या दोस्तीला पारखा होत जवळपास एकटाच राहतो! ह्यावरून सुधीर मोघ्यांच्या कवितेतली ओळ आठवली - 'बायको चांगली जेव्हा ती मैत्रीण असते, मैत्रीण फारच चांगली कारण ती कधीच बायको नसते...' अर्थात,
सर्वच संसारी पुरुषांची ही व्यथा नसते. बरेच पुरुष संसारात, आपल्या बायकोमुलांत व्यवस्थित रमूनही एकटेपणा अनुभवतात पण तो त्यांच्या वैयक्तिक घालमेलींमुळे! कधी पैशाची अडचण, कधी नोकरीचं टेन्शन, कधी त्याच्या वृद्ध आईवडिलांच्या काळजीने तर कधी मुलांच्या भविष्याच्या काळजीने, त्याच्या जीवाची आतल्याआत तगमग होत असते. पण ते बायकोला सांगून तिला आणखी नव्याने टेन्शन देणं त्याला जमणारं नसतं, मुलं बिचारी नकळत्या वयातली आणि त्यामुळे तो कर्ता पुरुष विचित्र अवघडलेपण अनुभवतो आपल्या संसारात असूनही भोगाव्या लागणाऱ्या एकटेपणाने!
मानसशास्त्राच्या दृष्टीने जगात ढोबळ मानाने माणसांचे मुख्य तीन प्रकार असतात. बहुसंख्य माणसं ही 'नॉर्मल' कॅटेगरीत मोडणारी. त्यांच्यापेक्षा टक्केवारीने कमी भरणारी काही 'क्रिएटिव्ह' या सदरात मोडणारी, तर काही फारच थोडी माणसं 'गिफ्टेड' प्रकारात मोडणारी असतात. आणि बऱ्याचदा अशा गिफ्टेड, प्रचंड बुद्धिमत्ता असणाऱ्या पुरुषांच्या वाट्याला एकटेपणा आलेला आपण पाहतो. त्यांना त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची विद्वत्ता आणि त्यांच्या विचारांची खोली जाणून घेऊन त्यांच्याशी तितक्याच तोलामोलाने संवाद साधू शकणारे, त्यांच्याशी आवडीनिवडी जुळणारे कदाचित अभावानेच आढळतात. साहजिकच त्यांना एकटेपणाचा अनुभव घ्यावा लागतो आणि तो पुढे गंभीर रूप धारण करू शकतो. त्यातल्या काहीजणांना त्या गंभीर एकटेपणातच मृत्यू आल्याचीही उदाहरणं आहेत.
साहिरसारखे काही सुप्रसिद्ध शायर, जॉन कीट्ससारखा सुप्रसिद्ध कवी, गुरुदत्तसारखे काही अफलातून कलावंत, सीएनएन चॅनेलवरचा सुप्रसिद्ध शेफ अँथनी बोर्डेन, अचाट कथाकादंबऱ्या लिहिणारे एडगर अॅलन पोसारखे कादंबरीकार अशी अनेक उदाहरणं आहेत. तर काही पुरुषांच्या बाबतीत एकटेपणा हा त्यांना डिप्रेशन, नैराश्याकडे घेऊन गेल्याची आणि त्यातूनच मग अर्नेस्ट हेमिंग्वेसारखा अफाट लेखक, वन गॉगसारखा ग्रेट आर्टिस्ट, मायकेल जॅकसनसारखा तरुणाईचा लाडका गायक, रॉबिन विल्यम्ससारखा कॉमेडियन आणि हीथ लेजरसारख्या अभिनेत्यांनी मृत्यूला कवटाळल्याची उदाहरणं समोर येतात...
पुरुषांच्या मानसिक एकटेपणा कदाचित त्यांच्या न्यूनगंडातून आलेला असू शकतो. काहीजण शरीराने दुर्बल असतात, काहींना अभ्यासात गती नसते, काहीजणांना संवादकौशल्य नसतं, काहींना कुठलाच खेळ धड जमत नसतो, काहीजण दिसायला सामान्य असतात, काही गरिबीने पिचलेले असतात, काहीजण दुर्दैवाने जन्मतःच व्यंग घेऊन आलेले असतात - आणि मग अशा तर्हेतर्हेच्या समस्यांमुळे 'समाज आपल्याला स्वीकारेल की नाही?' या प्रश्नाचा बागुलबुवा समोर उभा राहून त्यांना छळतो. त्यामुळे काही पुरुष कोशात जातात. अशांची ही एकटेपणाची मानसिक समस्या पुढे फार मोठं स्वरूप धारण करते आणि मग अशा पुरुषांना मानसिक समुपदेशनाची निकड भासते. याचं ऊत्तम उदाहरण म्हणजे किशोर वयात आईवडिलांच्या नोकरी व्यवसायामुळे घरात एकटी राहणारी आणि त्यातून एकलकोंडी झालेली तरुण मुलं. पूर्वीसारखे भरल्या घरात आजीआजोबा आता असत नाहीत, घरी माणसांची वर्दळ नसते आणि अशातून एकटेपणातून पौगंडावस्थेत येताना, त्यांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने एकटेपणा सुसह्य करायला(?) त्यातले काही तरुण ड्रग्जकडे तर काहीजण पॉर्नसारख्या विकृतीकडे वळतात! काही उदाहरणं अशीही दिसतात की एकटेपणातून बाहेर पडण्यासाठी काही पुरुषांनी चक्क ओशोसारखे गुरु किंवा कुणी स्वामी / योगी यांच्या सत्संगाची कास धरलेली आढळते. त्याचबरोबर काही थोडी उदाहरणं अशीही आहेत जिथे सुपीरिअरिटी कॉम्प्लेक्समुळे एकटेपण जन्म घेतं.
असे पुरुष स्वतःला प्रचंड शहाणे समजत असतात, सर्व जग त्यांना त्यांच्यापुढे तुच्छ वाटत असतं. दुनियेशी ते आपणहून फटकून वागतात आणि साहजिकच आसपासची माणसं दुरावल्याने ते एकटे पडतात. पुरुषांच्या एकटेपणाच्या संदर्भात काही उदाहरणं अशीही आहेत जिथे ते पुरुष कायमच जगावर कावलेले दिसतात. त्यांना सतत जगाच्या, आसपासच्या माणसांच्या चुका दिसत राहतात. आख्खा जन्म ते दुसऱ्यांवर टीका करण्यात आणि त्यांना दूषणं देण्यात घालवतात. असे पुरुष कुणाला आवडणार? त्यामुळे समाजच अश्याना वाळीत टाकतो आणि असे पुरुष मग एकटेच पडत जातात. असेही काहीजण असतात ज्यांना दुसऱ्याचं प्रेम बघवत नाही किंवा स्वतः दुसऱयांवर प्रेम करणंही जमत नाही. आणि मग तशी माणसंही आयुष्यात एकटी पडत जातात. आणि हो, एकटेपण जपणारे किंवा एकटेपणात रमणारे असेही काही महान पुरुष असतात जगात ते म्हणजे लोकांपासून दूर कुठेतरी जंगलात किंवा डोंगरात राहून, गुहेबिहेत बसून तप करणारे साधू, बैरागी आणि योगी मंडळी! त्यांना आपलं सामान्य माणसांचं जग मिथ्या वाटतं, माया वाटते. मग ती मंडळी अज्ञाताच्या शोधात स्वतःला जगापासून अलिप्त करून घेऊन, दूर पर्वतांच्या कुशीत एकटेच बसून ध्यानधारणेच्या मागे लागतात. त्यांचं मानसशास्त्र सामान्यांना कळणं कठीण.
थोडक्यात सांगायचं तर पुरुष नशिबाने, विधिलिखिताने, कर्माने किंवा स्वेच्छेने एकटे पडू शकतात. आणि हे त्यांचं शारीरिक आणि मानसिक एकटेपण हा एक दारुण, भीषण किंवा क्वचित एक वेगळाच साक्षात्कारी अनुभव ठरू शकतो. 'पुरुष एकटेपणा स्वीकारतो का?' या प्रश्नाला खरं पाहता 'नाही' असंच उत्तर अपेक्षित असतं पण दुर्दैवाने त्याला अपवाद असणारे जगात कित्येक पुरुष आहेत. त्यांची ती एकटेपणाची अवस्था नक्कीच वाईट आणि त्यातून येणारं नैराश्य हे तर महाभयंकर! म्हणून मग अशांनी आपापल्या एकटेपणाची कारणं शोधून त्या एकटेपणांतून बाहेर येण्यासाठी - स्वतःला कसल्या ना कसल्या छंदात अडकवून घेण्याचा प्रयत्न करावा, लेखनात जीव रमवावा, संगीताचा, चांगल्या पुस्तकांचा/वाचनाचा आधार घ्यावा, भरपूर प्रवास करावा, निसर्गात रमावं...नव्याने मैत्री करावी!...चक्क प्रेमात पडावं! फिरून नव्याने... ! नै का? 😍
--------------------------
प्रसन्न पेठे (पूर्वप्रसिद्धी- पुरुषउवाच दिवाळी २०१८)
No comments:
Post a Comment