------------------------------
हिंदी सिनेसृष्टीने पूर्वापार नावांमध्ये "कुमार", "खन्ना", "इंद्र" किंवा मग शक्यतो पूर्ण हिंदू नावं असलेले चिकणेचुपडे हिरोच लोकांसमोर आणले (त्यात १९८८ नंतर "खान"असणं आवश्यकच झालं जणू प्रेक्षकांमुळे!) - पण कपाळावर दोन ठिकाणी आणि ओठांच्या उजव्या बाजूला एक असे ठळक व्रण असणारा, कुठल्याच अँगलने चिकनाचुपडा नसणारा आणि तशात "शत्रुघ्न" असं कठीण नाव असणारा माणूससुद्धा ७०च्या दशकांच्या सुरुवातीला आधी व्हिलन, दशकाच्या मध्यावर साईड हिरो आणि नंतर ते दशक संपता संपता थेट हिरो बनून त्यावेळच्या मेगास्टार /महानायकाइतकी पॉप्युलॅरीटी मिळवतो हे सर्व आश्चर्यजनकच!! खर्जातला आवाज लावून स्टाइलाईझ्ड बोलणं ही त्याची खासियत काही विशिष्ट मंडळींना (जानी राजकुमारचं एकसुरी हेल काढून आणि वाक्याच्या शेवटचा शब्द वर नेत बोलणं आवडणाऱ्यांना ) ज्यामच आवडून गेली!
शत्रू किती पॉप्युलर होता ते मी याची देही याची डोळा थेटरात पाहिलंय! "काला पत्थर"च्या वेळचा किस्सा!! थेटरात अर्थातच मेजॉरिटी माणसं अमिताभचे फॅन्स, उरलेले बहुतेक सारे शत्रूचे फॅन्स आणि बहुदा मी एकमेव शशीसाठी काला पथ्थरच्या वाऱ्या करणारा शशीचा फॅन - अशी साधारणपणे थेटरात विभागणी होती! माझ्या पुढच्या रांगेत अमिताभ आणि शत्रूचे फॅन्स निम्मे निम्मे असावेत. दोघांच्याही रिस्पेक्टिव्ह एंटऱ्या झाल्यावर त्या त्या फॅन्सकडून शिट्ट्या आणि टाळ्या सुरु झाल्या...सिनेमा पुढे सरकायला लागल्यावर पडद्यावर अमिताभ आणि शत्रूचं त्या खाणीजवळच्या कॅन्टीनमध्ये एकमेकांना खुन्नस देणं सुरु झालं आणि त्याचे पडसाद पुढच्या रांगेत उमटायला लागले...होता होता "तिसरे बादशाह हम है" हा शत्रूचा खास खर्जातला डायलॉग आला आणि शत्रूच्या फॅन्सना चेवच चढला. "खाया लंबू को खाया" सुरु झालं ..मग अमिताभवाल्यांनी त्यांना आरडाओरडा करत शिव्या द्यायला सुरुवात केली ..पडद्यावर पुढच्या काही सेकंदात अमिताभ आणि शत्रूचं "ढिश्यूम ढिश्यूम" सुरु झालं आणि पाहतो तर आमच्या पुढच्या रांगेतही अमिताभफॅन्स व्हर्सेस शत्रूफॅन्सची एकमेकांना गुद्दे लागावत मारामारी सुरु झाली.. सर्व प्रेक्षक हैराण!!! कळेचना...पण तेव्हढ्यात पडद्यावर कोठून तरी धावत येऊन माझ्या शशीने त्या दोघांना एकमेकांपासून हाताने दूर करत मारामारी थांबवली आणि त्याचवेळी यश चोप्राने "इंटरव्हल"ची पाटी टाकून सिनेमा थांबवल्याने पुढच्या रांगेतले शत्रूचे फॅन्सही शांत झाले 😆
शत्रू तसा काम ठीकठाक करायचा! क्वचित ओव्हरऍक्टिंग करायचा पण त्याच्या चाहत्यांना ते आवडून जायचं! पण "मेरे अपने, ब्लॅकमेल, खानदोस्त, दोस्त, शैतान" मधली त्याची ऍक्टिंग चांगलीच होती. पुढे सगळे मल्टीस्टारर्स त्याने गाजवले.
मुंबईची आणि आता महाराष्ट्राचीही मुख्य भाषा "हिंदी" बनवण्यात 'हिंदी सिनेमां'चा प्रचंड वाटा आहे, आणि त्यातही श्रीयुत इन्किलाब हरिवंशराय श्रीवास्तव आणि या शत्रुघन भुवनेश्वरीप्रसाद सिन्हा यांचा वाटा भलताच मोठा (त्यांच्या कोटीभर फॅन्सची आवक झाल्याने आणि होत राहिल्याने!)😳🤣
त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचं त्याच्याच खऱ्या आयुष्यातल्या बायकोबरोबरचं हे गाणं!
https://youtu.be/dF1mOl5cD0k

No comments:
Post a Comment