Monday, 14 June 2021

बलराज साहनी

“बलराज साहनी” 
-----------------
"कुंदन अपनेको यार की यारी से मतलब है" म्हणणारा, अस्ताव्यस्त वाढलेले केस, कपाळावर उजव्या बाजूला रुळणारी झुल्फं अशा अवतारातला "राज" कोण विसरेल?!....झिया सरहदीच्या "हमलोग"मधल्या शेवटच्या दहा मिनिटांची कोर्टातली दृश्श्य! राज अत्यंत ठामपणे कोर्टासमोर सांगतोय,"ये एक ऐसा सवाल था, जो उसके मुंह से निकला और जमानेभर मे गुंजा! मैने अपने दोस्त कुंदन को बताया, की जमाने को चौपट करने का काम भगवान ने आदमी को सौपां है और आदमी इस काम को बडी शान के साथ पुरा कर रहा है. सब मानते है, सब जानतें है की आजकल का इन्सान, दुनिया के हसीन आंगनमे बरबादी का एक बहोत बडा नाटक रचा रहा है ...इन्सान ने इन्सान की मोहोब्बत गवा दी है और यही आदमी का सबसे बडा कारनामा है" .....राज बेदरकारपणे, ताठ मानेने न्यायाधीशासमोर बोलत जातो आणि आपण अक्षरशः स्तिमित होऊन त्या महान कलाकाराचा अभिनय पाहत राहतो...टाळ्या पिटायचंही भान राहात नाही!

"दो बिघा जमीन"मधला जमीनदार शंभू महातोला त्याची जमीन मागतो आणि बदल्यात कर्जमाफी आणि वर थोडे पैसे देऊ करतो. तेव्हा कळवळून शंभू म्हणतो,"जमीन तो किसान की माँ होती है हजुर! माँ को बेच दूँ?".आणि मग ती दो बिघा जमीन जमीनदाराच्या कचाट्यातून वाचवण्यासाठी कलकत्ता शहरात जाऊन रिक्षा ओढत रोजचे चार रुपये कमावण्यासाठी जीवाचं रान करतो. त्या सिनेमातला एक्केक प्रसंग आपल्या अंगावर येतो. शंभूची तडफड, मुलाचे कष्ट त्याला बघवत नाहीत, उपासमार, आजारी आणि जखमी अवस्थेत रिक्षा ओढणं... त्या सिनेमातल्या प्रत्येक फ्रेममधली शंभू महातोची परवड पाहताना आपल्या नकळत डोळ्यांतून पाण्याची धार लागते...   

‘चांगला अभिनेता तोच जो लेखक-दिग्दर्शकाला अभिप्रेत असणारी व्यक्तिरेखा, आपल्या देहबोलीने, चेहऱ्यावरच्या हावभावांनी आणि परिणामकारक संवादांनी कॅमेऱ्यासमोर हवी तश्शीच उभी करू शकेल!’ - आणि या वर्णनात फिट्ट बसणाऱ्या उच्च दर्जाच्या  भारतीयच नव्हे तर जागतिक अभिनेत्यांत बिनीच्या फळीत ज्याला स्थान मिळेल असा कलावंत म्हणजे बलराज साहनी! त्याचा अभिनय कधी अभिनय वाटलाच नाही इतका तो त्याच्या व्यक्तिरेखा जगत असे! मग तो धरती के लाल मधला "निरंजन" असो, हमलोग मधला "राज" असो, दो बिघा जमीन मधला "शंभू महातो" असो, सीमा मधला अनाथालयाचा प्रमुख "अशोकबाबू" असो, काबुलीवाला मधला "अब्दुल रहमान खान पठाण" असो, वक्त मधला "लाला केदारनाथ" असो, दो रास्ते मधला "नवेंदू गुप्ता"असो, एक फुल दो माली मधला "कैलाशनाथ" असो, गरम हवा मधला "सलीम मिर्झा" असो, लाजवंती मधला "निर्मलकुमार" असो, भाभी मधला "रतनलाल" असो, अनुराधा मधला "डॉ.निर्मल चौधरी" असो, हकीकत मधला "मेजर रणजित सिंग" असो, भाभी की चुडिया मधला "श्याम" असो, पराया धन मधला "गोविंदराम"असो....कित्ती सिनेमे आणि किती भूमिका आठवाव्यात?...बलराज साहनी कायमच त्या त्या व्यक्तिरेखेमुळे ओळखला गेला आणि लक्षात राहिला!! अत्यंत सुसंस्कृत, सुशिक्षित असलेला आणि राजकीय आणि सामाजिक जाणिवांबाबत सजग असणारा हा अभिनेता त्याच्या समकालीनांपेक्षा म्हणूनच वेगळा ठरला आणि उठून दिसला! बोलक्या चेहऱ्यातून साकारलेला संयत आणि नेमका अभिनय हे त्याचं वैशिष्ट्य! त्याची कुठलीच भूमिका कधीही लाऊड झाली नाही किंवा कधी फसलीही नाही. त्याने वाट्याला आलेल्या सर्वच भूमिका अत्यंत ताकदीनं वठवल्या आणि अजरामर केल्या! तो रूढार्थानं देखणा अभिनेता नव्हता, पण रुबाबदार नक्कीच! "आये दिन बहार के"सारख्या त्याच्या चरित्र भूमिकातलं त्याचं रुबाबदार रूपही लोकांना, विशेषतः स्त्रियांना भुरळ घालत होतं हे त्यावेळी त्याला येणाऱ्या मुलींच्या पत्रांतून समजायचं!....  

बलराज सहानीचं बालपण गेलं ब्रिटिशकालीन रावळपिंडीत! तिथे आलेल्या प्लेगच्या साथीमुळे त्यांचं कुटुंब एका गावात स्थलांतरित झालं आणि तिथला काळ त्याच्या मनावर खोल परिणाम करून गेला. त्या लहान वयात पाहिलेल्या काही इंग्लिश मूकपटांनी आणि त्यांतल्या चुंबन दृश्यांनी आणि बोल्ड प्रणय दृश्यांनी त्याच्या बालमनावर परिणाम केला होता! पुढे त्यांच्या जवळच्या भागात "रोझ" थिएटर सुरु झालं आणि उर्दू/ हिंदी सिनेमे बघायची सोय झाली. १९२८ सालचा "हीर रांझा", रुबी मायर्स उर्फ सुलोचनाचा "अनारकली"सारख्या सिनेमांचा त्याच्यावर प्रभाव पडत गेला. सुलोचनाच्या सौन्दर्याने तर तो वेडाच झाला होता. सिनेमाविषयी आकर्षण तेव्हाच निर्माण झालं होतं मनात!  

१९३०च्या सुमारास तो रावळपिंडीहून लाहोरला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आला. पुढे त्याने इंग्लिशमध्ये एम.ए. डिग्री मिळवली. त्याचवेळी त्याचा प्रोफेसर बुखारींमुळे कॉलेजमधल्या नाट्यचळवळीशी संबंध आला आणि त्याची अभिनयाची जाणीव घडायला मदत झाली. ग्रॅज्युएट झाल्यावर घरच्या कापडव्यावसायात काही काळ लक्ष घातल्यावर १९३६च्या आसपास तिथून पळून त्याने कलकत्ता गाठलं. काम मिळेल या आशेने पंडित सुदर्शन यांच्या घरी काही काळ मुक्काम केला पण निराश होऊन त्याला पुन्हा रावळपिंडी गाठावी लागली. दरम्यान त्याचं लग्न होऊन दमयंतीसारखी पत्नी मिळाली. आणि लवकरच हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या ओळखीने पुन्हा कलकत्त्यात शांतीनिकेतन मध्ये इंग्लिश शिक्षकाची नोकरीही मिळाली. दरम्यानच्या काळात "हंस, विशाल भारत" सारख्या मासिकांतून त्याच्या कथा छापून यायला सुरुवात झाली होती. त्यातच त्याला बीबीसी ब्रॉडकास्टींगच्या हिंदी विभागात करण्यासाठी लंडनला जाण्याची संधी मिळाली. 

त्याने लंडनला पाऊल ठेवलं त्याचवेळी हिटलरने पोलंडवर स्वारी केली होती. तिथल्या वास्तव्यात त्याने अगदी जवळून दुसरं महायुद्ध अनुभवलं. त्या महायुद्धाच्या काळात तिथे बघितलेल्या एका रशियन फिल्मने त्याच्यावर मोठा परिणाम केला आणि त्याला नकळत सोव्हिएत रशियाविषयी, कम्युनिझमविषयी आकर्षण वाटायला लागलं. रेडियोवर काम करत असताना त्याची जॉन गिलगूड, टी एस एलियट, जॉर्ज ऑरवेल, हेरॉल्ड लास्की, गिल्बर्ट हार्डींगसारख्या दिग्गजांशी मैत्री जमली होती. त्यांच्या सहवासात  त्याच्या साहित्यविषयक जाणीव प्रगल्भ झाल्या. पुढे १९४४ साली तो लंडनहून मुंबईला आला. तिथे फिरोजशाह मेहता रोडवर बँकेत पैसे काढायला गेला असताना, त्याला अकल्पितपणे चेतन आनंद भेटले. पूर्वी लाहोरच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ते दोघं एकत्र होतेच, त्यामुळे चेतन आनंद यांनी प्रेमाने त्याची विचारपूस केली. आणि एवढंच नाही, तर त्याला मुंबईत आपल्याच पाली हिलवरच्या मोट्ठ्या घरात राहायला बोलावलं. तिथे त्याची भेट त्यांचे दोन भाऊ देव आनंद आणि विजय  आनंद यांच्याशी झाली. आणि त्याच्या जीवनांत एका विलक्षण पर्वाला सुरुवात झाली. 

सकाळ झाली की तो चेतन आनंद यांच्याबरोबर बाहेर पडे आणि थेट फ्लोरा फाउंटन गाठून तिथल्या इंडिया कॉफी हाऊसमध्ये त्यांचा गप्पांचा अड्डा जमे! त्यावेळी तिथे काँग्रेस, कम्युनिस्ट, सोशालिस्ट अशी भिन्न विचारसरणीची मंडळी, कोणकोण पत्रकार, लेखक, चित्रकार अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेकांचा राबता असे. तो माहोल अद्भुत होता त्याच्यासाठी! चेतन आनंदच्या "नीचा नगर" फिल्मसाठी बलराजने सहाय्यकाची भूमिका निभावली. त्याचवेळी तो इप्टा (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) या संस्थेकडे ओढला गेला. ख्वाजा अहमद अब्बास यांनी त्याच्यातले गुण हेरले आणि आपल्या 'जुबेदा" नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्याच्यावर टाकली. त्या  दरम्यान त्याची पत्नी दमयंती पृथ्वीराज कपूर यांच्या पृथ्वी थिएटरसाठी काम करत होती. त्याच्या इप्टाच्या नाटकाच्या तालमी त्यावेळच्या ऑपेरा हाऊसजवळच्या देवधर हॉलमध्ये चालत. ते आयुष्य खूपच रंगतदार होतं.  लंडनमधल्या वास्तव्यात त्याने अनुभवलेल्या रेनेसां चळ्वळीसारखंच त्याला इथेही काही क्रिएटिव्ह जगायला मिळत होतं. "अभिनेता बनण्यासाठी तीक्ष्ण नजर आणि उंच भरारी घेणारी कल्पना लागते" हे त्याचं लाडकं मत आणि त्यानुसार अभिनेत्यांची निवड करून तो नाटकं बसवत गेला. दरम्यान त्याची चेतन आनंदचा धाकटा भाऊ देव आनंदशी ओळख झाली पण का कुणास ठाऊक त्याने देवला सरळ सांगितलं,"यार, तू कभी ऍक्टर बन नही सकता" ...(पण पुढे त्याच देव आनंदला चेतन आनंदच्या नकळत, पुण्याला प्रभात स्टुडिओत जायला त्यानेच प्रवृत्त केलं आणि देव पुढे जाऊन मेगा स्टार बनला आणि इतिहास घडला त्यात बालराजचाही खारीचा वाटा होता हे महत्वाचं! गंमत म्हणजे देव आनंदच्या करिअरमधल्या महत्त्वाच्या सिनेमाची - "बाजी"ची कथा आणि संवादसुद्धा बलराजच्याच लेखणीतून उतरले होते! )

ख्वाजा अहमद अब्बास यांनी १९४३ सालच्या बंगालमधल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर "धरती के लाल" हा सिनेमा बनवला आणि त्यातल्या "निरंजन"च्या भूमिकेत त्याने छाप पाडली. १९५१ साली आलेल्या "हमलोग" मधल्या त्याच्या बेफिकीर, बेदरकार 'राज'ने तर जाणकारांना एक सशक्त अभिनेता उदयाला आल्याची पावती मिळाली! या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान एक विचित्र प्रकार घडला. तो घडला बलराजच्या कम्युनिझमकडच्या ओढ्यामुळे! (त्याने ऑल इंडिया युथ फेडरेशन या कम्युनिस्टांच्या पक्षाची स्थापना पी के वासुदेवन नायर यांच्याबरोबर पुढे केली त्याची सुरुवात होती ती!)  त्यांच्या एका मोर्चात तो सहभागी असल्यामुळे त्याला अटक करून तुरुंगात टाकलं गेलं. आणि मग निर्माता के असिफने कोर्टाकडून स्पेशल परवानगी मिळवल्यावर, त्याच्या भूमिकेच्या सीन्सच्या शुटिंगपुरतं त्याला पोलीस बंदोबस्तात शूटिंगला नेण्यात येई आणि शूटिंग संपलं की त्याची रवानगी पुन्हा जेलमध्ये होई!... 'हमलोग' पाठोपाठ आलेल्या 'बदनाम'ने त्याला हिरो बनवला. त्या फिल्ममध्ये श्यामा त्याची हिरोईन होती तर, शीला रामाणी आणि हेलन या दोघींचं हिंदी फिल्म्समध्ये पहिलं पाऊल त्या सिनेमामधूनच पडलं होतं. त्यादरम्यान बलराजने वाचलेल्या क्लार्क गेबलच्या पुस्तकाचा परिणाम होऊन त्याने गेबलची स्टाईल उतरवायचा प्रयत्न त्यात केला होता. पण तो सिनेमा काही चालला नाही... 

त्यापाठोपाठ दोनच वर्षांनी आलेल्या बिमल रॉय यांच्या "दो बिघा जमीन" मधल्या त्याच्या शंभू महतो या व्यक्तिरेखेने त्याचा अभिनय आंतराराष्ट्रीय स्तरावर वाखाणला गेला! त्या भूमिकेसाठी त्याने जोगेश्वरीमधल्या उत्तर भारतीय आणि बिहारी भय्यांच्या राहणीमानाचा, बोलण्याचा अभ्यास केला होता. त्यात त्याला कलकत्त्याच्या रस्त्यांवर रिक्षा ओढायची होती आणि ते सीन्स जिवंत वाटावेत यासाठी त्याने अनेक दिवस त्या गेटअपमध्ये स्वतः खरोखरच कलकत्याच्या रस्त्यांवर रिक्षा ओढण्याचा सराव केला होता. त्या शूटिंग दरम्यान त्याला भेटलेल्या एका गरीब रिक्षाचालकामधून त्याला आपली व्यक्तिरेखा सापडली आणि मग त्या सिनेमात चार चाँद लावले ते त्याच्या अविस्मरणीय मुद्राभिनयाने!! गरीबीने पिचलेला, परिस्थितीसमोर हरलेला पण तरीही चिकाटीने त्यातून जमेल तशी, जमेल तेव्हढी शर्थ करून पै पै साठवू पाहणारा शंभू आणि इतकं सर्व करूनही शेवटी आपली मातेसमान जमीन हरलेला शंभू आणि त्याच्या डोळ्यांतली ती वेदना बलराजने ज्या अफाट अभिनयाने आपल्यापर्यन्त पोहोचवल्ये त्याला तोडच नाही!....त्याचा पुढचा महत्त्वाचा रोल होता काबुलीवाला!! रबिन्द्रनाथ टागोरांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली एका छोट्या मुलीच्या आणि कबुलीवाल्यामधल्या प्रेमळ नात्याची हृदयस्पर्शी कथा! पैसे कमावण्यासाठी आपल्या लहानग्या मुलीला अफगाणिस्तानात सोडून भारतात आलेला पठाण! येताना आपल्या मुलीच्या मधुर आठवणी त्याने बरोबर आणल्यात  तिच्या हाताच्या ठशांच्या रूपांत! कलकत्त्यात आलेल्या या  सहृदयी पठाणाला अमिनासारखीच एक लहान मुलगी भेटते आणि त्यांच्यात एक विलक्षण गोड नातं उमलतं... या सिनेमातला बलराजचा अभिनय आणि ते सारे भावोत्कट प्रसंग कोण विसरेल? 

नर्गिस, नूतन, लीला नायडू, मीनाकुमारी आणि वैजयंतीमाला अशा त्याकाळच्या बहुतेक प्रमुख अभिनेत्रींनबरोबर नायकाच्या भूमिका साकारल्यावर त्याने चरित्र अभिनेत्याच्या भूमिका निवडल्या आणि त्यांत आपला अमीट ठसा उमटवला! त्याचा शेवटचा सिनेमा ठरलेल्या "गरम हवा" मध्ये फाळणीनंतर पाकिस्तानात न जात ठामपणे भारतातच राहणाऱ्या सलीम मिर्झाच्या भूमिकेत त्याने गहिरे रंग भरलेत. एका नव्या समांतर सिनेमा प्रकाराला सुरुवात करून देणारा हा सिनेमा बलराजसाठी आवर्जून पाहावा असाच! त्याकाळात सिनेमात व्यस्त असूनही त्याने "नयी कहानी" सारख्या मासिकांसाठी आपलं कथालेखनाचं काम चालूच ठेवलं होतं हे विशेष! आपल्या मुलाबरोबर परीक्षित सहानी बरोबर त्यांनी एका राजकीय डॉक्युमेंटरीत काम केलं होतं ज्यात परीक्षित उधमसिंग होता आणि बलराज महात्मा गांधी! 

"तू प्यार का सागर है", "ऐ मेरे प्यारे वतन", "तुझे सुरज कहू या चंदा", "मै अपने आप से घबरा गया हूँ" आणि अर्थातच "ऐय मेरी जोहराजबी" अशी काही बेमिसाल गाणी बलराजने आपल्या सहजसुंदर अभिनयाने पडद्यावर खुलवली. 

हिंदी चित्रपट सृष्टीचा विचार करता साठ हे वय निवृत्तीचं नसतंच. पण १९७३ साली, काळाने त्याच्या वयाच्या साठाव्या वर्षी ओढून नेलेल्या या अफलातून कलाकाराची उणीव सिनेसृष्टीला आणि तमाम प्रेक्षकांना जाणवत राहिली हे नक्कीच! 

(पूर्वप्रसिद्धी - मोहनगरी दिवाळी 2019)

No comments:

Post a Comment