Monday, 14 June 2021

कसे कसे राहायाचे?

कसे कसे राहायाचे..
----------------------
खानोलकरांची क्षमा मागून त्यांचे कवितेतले शब्द बदलत म्हणतो -  

"कसे कसे राहायचे 
राहायाचे आहे मला... 
राहायाचे
कुठे? कुठे आणि केव्हा?
कसे? आणि कुणापास?....

मागे बोलताना मी माझ्या जवळच्या मित्रांशी असा विषय काढला होता की आमच्या त्या टोळक्यातले सर्वजण रिटायर झाले, मुलंमुली मोठ्या होऊन त्यांचे त्यांचे संसार सुरु झाले की सर्व मित्रांनी एकत्र येऊन कुठेतरी शांत, गजबज नसलेल्या ठिकाणी एखादी मोठीशी जागा घेऊन तिथे एका मोठ्या गोलात छानपैकी छोटी घरं बांधायची..एक सुंदर कम्यून!! घरं म्हणजे काय तर एकाच पद्धतीच्या एकेक रूम्स!  फक्त एक मोठा हॉल त्यात हवी असेल तशी टीव्ही, रेडिओची सोय आणि टॉयलेट बस्स! फक्त आपापल्या पार्टनर बरोबर राहण्यापुरती सोय!! कम्यूनच्या गोलातच एक मोठ्ठी कॉमन डायनिंगची सोय जिथे कॉमन किचन (व्हेज/नॉन व्हेज स्वयंपाक करायला अर्थातच एक्स्पर्ट पगारी बायका/पुरुष) आणि पंगत बसेल अशी टेबल खुर्च्यांची सोय! मोठ्ठया गोलाच्या मधोमध कॉमन अंगण आणि भली मोठ्ठी पार-सद्दृश्य पण पाऊस लागू नये म्हणून पुरेसं छत असलेली, सर्वांनी एकत्र बसून गप्पा छाटायची कॉमन टाइमपासची जागा किंवा क्लब हाऊसवजा अशी सोय जिथे पत्ते, कॅरम, चेस वगैरे असेल..लायब्ररी असेल..(एका कोपऱ्यात हवातर छोटेखानी बारसुद्धा! 😜 ) आणि मग सर्व मित्रांनी आपलं उर्वरित आयुष्य तिथे त्या कम्युनमध्ये एकत्र काढायचं... सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आवडत्या मित्रांची साथ आणि संगत!...ऊठा मित्रांच्या संगे आसपासच्या निसर्गात भटका.. जवळच्या गावातून भाजीपाला खरेदी करा.. मग गप्पागाणी ...धमाल.. एकत्र चहा..एकत्र जेवण... एकत्र हंसाहशी... एकत्र चर्चा... हवं तेव्हा उठून आपापल्या मुलामुलींच्या देशात/ शहरात/ गावात त्यांच्या घरी जाऊन त्यांच्यात/ नातवंडांच्यात रमून पुन्हा कम्यूनमध्ये राहायला परत या... क्वचित मुलंमुली किंवा नातवंड (सर्वांचीच सर्वांच्या ओळखीचे असल्याने-) कम्युनमध्ये राहायला आली तर त्यांचं स्वागतच!! ... 

माझी ही कल्पना आवडल्ये सर्वांना ..आता अंमलांत आणता येणं कितपत शक्य आहे हा प्रश्न आहेच! कारण मुख्य समस्या जागेची! म्हणजे कोकणात असं काही कम्यून उभं करावं की थेट लेह-लडाखसारख्या थंड हवेच्या प्रदेशात? म्हातारपणी झेपेल असं हवामान हवं हे तर आहेच पण मुलाबाळांना वाटलं भेटावसं तर त्या दृष्टीने अडचणीचंसुद्धा नको..नै का?आणि पुढेमागे लागणारी दवाखान्याची/ हॉस्पिटल्सची सोयही फार काही मैलांवर नको...(परांजपे बिल्डर्सनी "अथश्री" नावाने सिनीअर सिटिझन्ससाठी सोसायट्या बांधल्यात...पण माझ्या कल्पनेतल्या त्या कम्युनमध्ये उंच बिल्डिंगऐवजी एकाच गोलात एकमेकांना फेसिंग रूम्स असाव्यात असं वाटतं..

(एक प्रॉब्लेम तिथे राहणाऱ्या प्रत्येकच मित्रमैत्रिणीच्या आयुष्यात अपरिहार्यपणे येणार तो म्हणजे पार्टनरचा मृत्यू! पण त्यांतून सावरायलाही कम्यूनमधले मित्रमैत्रिणीची बळकट साथच उपयोगी पडेल...आणि दुसरा प्रश्न म्हणजे एखाद्या घरातले दोघेही जाऊन त्यांचं घरच रिकामं झालं तर त्या प्रॉपर्टीची व्यवस्था त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलामुलींना विचारून कशी करायची (तिथे दुसरं कुणी मेम्बर घ्यायचं किंवा कसं?)  असे काही प्रश्न जरूर असणार पण म्हणून आयडियाच निकालात काढायला नको नाही का...?? )

एक असं शान्त सुंदर कम्यून जिथे सध्या भारतात सर्वत्र बोकाळलेले कान किटवणारे डीजेंचे राक्षसी अक्राळविक्राळ अकांडताडवी भीषण कर्कश्य गोंगाट नसतील... भारतभर असणारे जातीपातींवरून होणारे राडे नसतील... भारतभर रोजरोज टाकले जाणारे तंबाखू/गुटख्या/ माव्याच्या थुंक्याचें किलोकिलो सडे नसतील...वैतागवाडी ट्रॅफिक नसेल किंवा खूप कमी असेल... स्वच्छ सुंदर शांत वातावरण असेल.. असं कम्यून! 

आवडत्या, लाडक्या मित्रमैत्रिणींबरोबर ..ज्यांच्याशी सूर जुळलेत, विचार जुळतात..आवडीनिवडी जुळतात अशा मित्रमैत्रिणींच्या संगतीत रिटायरमेंटनंतरचं आयुष्य घालवता येण्यासारखं सुख नाही, नैय? 😍❤️

(हा विषय मांडायचा इथे म्हणून गुगलवर काही फोटोज पाहिले तर मिळाल्या इमेजेस माझ्या आयडियाच्या जवळपास जाणाऱ्या, म्हणून ते फोटोज (गुगलच्या सौजन्याने) उचललेत!)

No comments:

Post a Comment