Monday, 14 June 2021

अलविदा शशी!

अलविदा शशी!!
---------
४ डिसेम्बर २०१७ ची संध्याकाळ! ऑफिसमधून मी निघायच्या तयारीत आणि गार्गीचा फोन. "बाबा तुमचा शशी गेला!" ..."क्कायss?" मी ओरडेपर्यंत तितकंच सांगून तिने फोन ठेवला. मी जागच्या जागी गोठलोय. दोन क्षण सुन्नावस्थेत. ..लगेचच मी पुण्याहून निघतो. रात्री ११.३० वाजता जुहूला "पृथ्वी"वर पोहोचतो. शशीचं पार्थिव दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलमधून आणतील इतकी माहिती मिळवतो आणि माटुंगा रोडला काकाच्या घरी जातो...

५ डिसेम्बरची सकाळ...मी सकाळीच 'पृथ्वी थिएटर' गाठलंय...मुंबईत 'ओख्खी' वादळाने आणलेल्या पावसाचं थैमान.. पावसाची सतत आणि संतत धार...उदास आसमंत आणि भकास पृथ्वी थिएटर!..माझ्या लाडक्याला घरी आणतील या प्रतिक्षेत, मी पृथ्वीच्या कॅफेटेरीयाच्या भिंतीला टेकून समोरच्या 'पृथ्वी हाऊस'मधल्या शशीच्या सातव्या मजल्यावरच्या घराकडे एकवार बघतोय ..सुन्न मी..सुन्न भवताल...पण आता वेगवेगळ्या चॅनल्सचे पत्रकार आपापले कॅमेरामन्स घेऊन तयारीने दाखल होत्साते...

माझ्या डोळ्यांसमोरुन शशीचा अख्खा जीवनपट झरझर फिरतोय...बालपणी शिवाजी पार्कला क्रिकेट खेळायला निघालो असताना राजा बढे चौकातल्या सिग्नलला मला जवळजवळ चिकटलेली त्याची कार आणि आत स्टिअरिंग व्हीलवरचा तो जगातला सर्वात देखणा, राजबिंडा पुरूष! .मदनाचा पुतळा!..आणि नंतर आयुष्यभर पुनःपुन्हा पाहात आलेलो ते त्याचे सारेच सिनेमे!!! गेल्या वर्षी माझ्या लाडक्याला पृथ्वीच्या कँफेटेरियात भेटलो...त्याच्याजवळ बसलो ते क्षण!...त्याची गाणी...त्याच्या अदा...त्याच्या लांबसडक पापण्या...गालावरची खळी आणि तो डब्बल तुटका दात दाखवत केलेलं खल्लास स्माईल...समोरच्याला आपल्या प्रेमात पाडायला लावणारं त्याचं राजस मिश्कील रुपडं...खूप काही आठवतंय...! 

दरम्यान पृथ्वीचा एव्हाना ओळखीचा झालेला मॅनेजर ललित सुचवतो, "इथे थांबण्यापेक्षा सांताक्रुझच्या हिंदू स्मशानभूमीत थांबणं चांगलं"...त्याचा सल्ला ऐकून मी सांताक्रुझला धाव घेतो...

तिथे पोलीस फक्त 'व्हीआयपी'जना आत सोडतायत...सामान्य जनतेबरोबरच सगळे मीडियावालेसुद्धा पावसात भिजत स्मशानाच्या भिंतीबाहेर रस्त्याच्या समोरच्या बाजूला उभे... मी केविलवाणा...त्या मुसळधार पावसात मला अक्षरशः रडू फुटलेलं...काय करावं सुचत नाहीये....पण पुण्याहून रातोरात धावत येऊन माझी शशीला शेवटचं भेटण्याची, त्याच्या पायांवर एकदा डोकं ठेवण्याची तीव्र इच्छा देवालाही मान्य असावी....नव्हे शशीच्या आत्म्याला जाणवली असावी...मी त्या मुसळधार पावसात भिजत, रडवेला आभाळाकडे नजर लावतो आणि आतून तीव्र मागणं मागतो...आणि चमत्कार होतो...'त्यानेच जणू पाठवलेल्या' एका देवदुतामुळे (बासरीवाले जोशीकाका) अचानकच मला एकट्याला, मी बॉलिवूडमधला कुणी स्टार व्हीआयपी किंवा कपूर खानदानापैकी नसूनसुद्धा त्या सर्व मिडीयावाल्या कॕमेरामेनसमोर आणि पोलिसांच्या डोळ्यांदेखत आत प्रवेश मिळतो!!..पूर्ण भिजून मी आत त्या 'जुहू हिंदू स्मशानभूमी'च्या पॉश वेटिंगरूममध्ये शिरलोय...एव्हाना हिंदी सिनेसृष्टीतले एकेक दिग्गज यायला सुरुवात झाल्ये...गोविंद निहलानी...श्याम बेनेगल...प्रेम चोप्रा...रणधीर कपूर ..सचिन..सुमित राघवन...पूनम धिल्लाँ...नंदीता दास...सगळे माझ्या आसपासच...पण कुणी कुणाशी बोलत नाहीये..सगळेच मूक..,तितक्यातच ऋषी कपूर एका स्पेश्शल सजवलेल्या अँम्ब्युलन्समधनं माझ्या शशीचं पार्थिव प्रचंड पोलीस बंदोबस्तात घेऊन आलाय...अनेक इन्स्पेक्टर्स आणि रायफलधारी पोलिसांची त्या पावसात धावपळ...आज शशीला "स्टेट ऑनर"मध्ये अलविदा करणारेत...कारण तो साधासुधा स्टार नाहीये - तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पदमभूषण' तसंच 'दादासाहेब फाळके' पुरस्काराने सन्मानित मोठा सितारा आहे तो!!.. त्याची तिन्ही मुलं, तिन्ही पुतणे आणि नातेवाईकांच्या गराड्यात गुरुजी मंत्रोच्चारण सुरु करतात...मी त्याच्यापासून खूप जवळ उभा असूनही तो मात्र माझ्यापासून अनंत योजने दूर...तिथले विधी संपतात आणि आता आतल्या मोठ्या हॉलमध्ये आम्ही सर्वजण जातो...इथे त्याला आता इलेक्ट्रिक फर्नेसमध्ये जाणाऱ्या रोलर्सवर ठेवलंय...आता अगदी शेवटचे मोजके विधी..आता मात्र मला खूप खूप रडावसं वाटतंय..डोळे भरलेत पाण्यानं.. पण मी अश्रू थोपवून त्याच्याकडे एकटक बघत राहिलोय...

अचानक चिरनिद्रेत असलेल्या शशीवरुन, माझ्या अगदी शेजारीच काही हालचाल जाणवते म्हणून मी नजर वळवतो आणि थरारतोच!.. माझ्यापासून जेमतेम दोन फुटांवर "तो" आपल्या मुलाबरोबर येऊन ऊभा राहीलाय...तो!.. महानायक!!..माझ्या शशीचा दोस्त!..तेव्हढ्यात गुरुजीं उपस्थित सर्वांना हात जोडून, डोळे मिटायला सांगतात आणि मृत्युंजय मंत्र सुरु करतात.."ॐ त्र्यंबकम् यजामहे सुगंधी पुष्टी वर्धनम्"...मंत्र संपतो...सर्वजण निःशब्द आणि स्तब्ध!...मी हळूच मान वळवून बाजूलाच उभ्या 'त्या'च्याकडे पाहतो...त्या काळ्या जॅकेटमधल्या टॉवरींग पर्सनॅलीटीची नजर काळ्याभोर चष्म्यातून समोर शांत झोपलेल्या शशीवर खिळल्ये...मला गलबलून येतं.."त्या"च्या मनात कसल्याकसल्या आणि किती आठवणी दाटल्या असतील आत्ता???..अगदी 1970 सालापासूनच्या?...शशीच्या "बाँम्बे टॉकी"मधे एक्स्ट्रा म्हणून उभं राहणार्यांच्या गर्दीत "त्या"ला पाहून शशीने त्याला रोखलं होतं.."ही असली कामं करु नकोस..."..शशीला तेव्हाच पारख झाली होती...मग "रोटी,कपडा, मकान" पासून दोघांनी एकत्र यायला सुरुवात झाली ती थेट "सिससिला"पर्यंत ..तब्बल 12 सिनेमे आणि सगळेच सुपरहिट्ट!!!..मी समोर पाहतो...ऋषी, रणधीर, राजीव आपल्या लाडक्या काकाच्या जवळ उभे आहेत...पण हा तसाच एकटक...शांत नजरेने शशीकडे पाहतोय!...अभिषेक पुढे होऊन रणबीरला मिठी मारुन विचारपूस करतोय...हा तिथे फक्त एक कटाक्ष टाकतो आणि पुन्हा तस्साच निश्चल!....स्थिर...शशीकडे बघत!!..दोघांचे वाचलेले किस्से आठवतायत...गुरुजीं नमस्कार करुन घ्यायला सांगतात ..सर्वजण रांगेत शिस्तीने...मी माझ्या लाडक्या शशीचे पाय धरुन डोकं टेकवतो मात्र!..मला आतून फुटून रडू येतं ...मी बेबंद ओघळणा-या अश्रुंना आता अडवू शकत नाहीये.. आवंढा गिळत मी बाजूला सरकतो आणि पुन्हा हळूच एकदा त्याच्याकडे आणि एकदा शशीकडे असं पुनःपुन्हा पाहतो...त्यांच्यातल्या मूक संवादांची कल्पना करतो..

तेव्हढ्यात पोलीस बँड सुरु होतो आणि पाठोपाठ गोळ्यांच्या दणदणाटी आवाजात शासकीय इतमामात शशीला गन सॅल्यूट दिला जातो!!...शशीचं पार्थिव ट्रॉलीवरुन आत फर्नेसकडे जातं...शशीला अलविदा.. संपलं! ...एका देखण्या, राजस, मिश्किल, लाघवी पर्वाचा अस्त!!.. आंत कुठेतरी खूप गलबलून आलंय...आजूबाजूला फिल्म इंडस्ट्रीतले तमाम स्टालवर्ट्स उभे.. .आम्ही शांतपणे एकामागोमाग निघतो..निघतांना दारात हात जोडून सर्वांचं सांत्वन स्वीकारत दुतर्फा 'कुणाल, करण, संजाना,रणधीर, ऋषी, प्रेम चोप्रा' अशा शशीच्या घरच्या मंडळींबरोबरच "तो" सुद्धा उभा आहे...शांत,.गंभीर..चष्म्याच्या फ्रेममागची भावविभोर नजर...आणि हात जोडलेले....एक सेकंद आमची नजरानजर होते...मीही हात जोडत त्याला अभिवादन करत बाहेर पडतो....पण आज डोळ्यांतल्या अश्रुंच्या पडद्यांतून शशी-अमिताभची पडद्याबाहेरची दोस्ती काही वेगळीच "दिसल्ये"....!!!!! 😔🙏

No comments:

Post a Comment