Thursday, 17 June 2021

इनडिस्क्रीट

"इनडिस्क्रीट"
--------
मी अनेकदा अनेक ठिकाणी म्हणत आलोय की माझं इंग्रीडशी नक्की कुठल्यातरी जन्मातलं किंवा कुठल्यातरी पॕरलल जगातलं नातं आहे. उगाच नाही ती माझी पृथ्वीतलावरची सर्वात लाडकी अभिनेत्री आहे. नूतनच्याही आधी!! ;-) ...तिला पडद्यावर बघताना मला नेहेमीच वाटत आलंय की आम्ही आधी भेटलोय..कुठेतरी गाठ पडल्ये...काहीतरी सहवास लाभलाय वगैरे...नक्कीच!!...काल रात्री  पुन्हा एकदा माझ्या या डार्लिंग इंग्रीडचा मूव्ही बघितला!..यात तिचा हिरो आहे कॕरी ग्रँन्ट! मला ग्रेगरी पेक खालोखाल आवडणारा हिरो! ..एकेकाळी प्रत्येक अमेरिकन तरुणाला ज्याच्यासारखं असावं वाटे तो हा व्हर्सटाईल देखणा, रुबाबदार अभिनेता!..

कॕरी ग्रँन्ट आणि इंग्रिड सारखी जोडी आणि दिग्दर्शक म्हणून जर स्टॕन्ले डाॕनन असेल तर मग आणखी काय हवं?. .ही तीन ब्बाप माणसं एकत्र आल्यावर साध्या सिंम्पल कथेचं ट्रान्फाॕर्मेशनसुद्धा किती सफाईदार होऊ शकतं..त्याचा हा मूव्ही! "इनडिस्क्रीट"!

अॕना कॕलमन (इंग्रीड) ही रंगभूमीवरची अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री. पण मनासारखा जोडीदार अजून मिळाला नाहीये तिला, त्यामुळे लंडनच्या मोठ्या फ्लॕटमधे एकटी. त्या भल्या मोठ्या फ्लॕटच्या सर्व्हंट क्वार्टरमधे कार्ल आणि डाॕरीस हे तिचे नोकर-नोकराणी तिच्याबरोबर  राहतायत. 

बहिण मार्गरेट (फिलिस कॕल्व्हर्ट) आणि मेव्हणा आल्फ्रेडने (सेसिल पार्कर) त्यांच्या एका पाहुण्याला फिलीप अॕडम्सला (कॕरी ग्रँन्ट) अॕनाच्याच फ्लॕटवर बोलवलंय. फिलीपला 'नाटो'साठी काम करण्याची आॕफर आहे आणि त्यासाठीच तो आल्फ्रेडच्या बोलावण्यावरुन तिथे आलाय. त्या पहिल्या भेटीतच तो उमदा अमेरिकन बँकर तिला आवडतो. तिच्यासारखाच देखणा, रुबाबदार, चार्मिंग आणि साॕफिस्टिकेटेड! त्यांच्या चेहे-यावरुनच कळतं दोघं एकमेकांना आवडल्याचं!

बॕलेला जायचं ठरवून दोघं हाॕटेलमधे भेटतात त्यावेळी 'आपलं लग्न झाल्याचं पण बायको वेगळी राहात असल्याचं' फिलीप तिला सांगतो. त्यांच्या गप्पा रंगल्यात..बॕलेला जायचं कॕन्सल करुन दोघं एकमेकांच्या सहवासात रमतात...त्यातूनच भेटी वाढत जातात..रुजलेलं प्रेम अंकुरायला लागतं. रात्री बेडवर पडल्यावर झोपण्याआधीच्या फोनवरच्या गप्पा सुरु होतात...(हा मूव्ही १९५८ चा..म्हणजे कॕरी ग्रँट त्यावेळी ५४ वर्षांचा आणि इंग्रीड ४३ वर्षांची..पण कसले कमालीचे गोड दिसलेत दोघं या फुलत जाणा-या प्रेमात!)..फिलीपने एव्हाना तिच्याच अपार्टमधे खालच्या मजल्यावर फ्लॕट घेतलाय..

अॕनाचा वाढदिवस जवळ आलाय आणि फिलीपला 'नाटो'तर्फे चार महिन्यांसाठी न्यूयाॕर्कला जाण्यासाठी सांगण्यात येतं. तो सांगतो तिला तसं तिला त्याच्याविना चार महिने काढणं कल्पनाही अशक्य...ती त्याच्यात प्रचंड गुंतल्येय...त्याने वेगळ्या राहणा-या बायकोला घटस्फोट देऊन आपल्याशी लग्न करावं असं बोलण्याच्या आवेगात ती त्याला सांगून जाते. तो तिचं हे रुप बघून चकीत...पण मग तिला स्वतःचंच वाईट वाटतं..ती त्कोसळत माफी मागत रडत्येय.

"रडतानासुद्धा कित्ती सुंदर दिसत्येस तू!"
"माहित्येय मला!"
"मी रात्री बरोब्बर १२च्या ठोक्याला तुला बोटीवरुनच 'विश' करेन. तू कुठे असशील?"
"फायरप्लेसजवळ!..एका नाटकात तसं केलंय मी!"

संध्याकाळी मार्गरेट आणि आल्फ्रेड अॕनाच्या फ्लॕटवर येतात. सर्वांचं पार्टीला जायचं ठरलंय...अॕना आणि मार्गरेट चेंज होण्यासाठी गेल्यावर आल्फ्रेडआणि फिलीपच्या गप्पा. फिलीप सांगतो की बोटीनं जाण्याऐवजी तो विमानाने जाणारेय आणि रात्री १२ च्या ठोक्याला अॕनाला घरीच भेटून सरप्राईझ देणारेय वगैरे. बोलताबोलता आल्फ्रेड फिलीपला एकदम म्हणतो,"नाटो'साठी काम करणा-या प्रत्येकाच्या हालचालीवर लक्ष ठेवून असणा-या स्काॕटलंड यार्डकडून, मला माहिती मिळाल्येय की तुझं लग्न झालेलंच नाही! मग विवाहित असल्याची बतावणी का करतोयस?"
"हे बघ.. एखादा पुरुष जेव्हा एखाद्या स्त्री ला भेटतो आणि त्याला ती आवडते..तेव्हा तिच्याबद्दल त्याला आकर्षण निर्माण होतं. तीही प्रतिसाद देते. दोघं एकमेकात गुंततात.मग ती त्याला लग्नाविषयी विचारते. आणि त्यावेळी तो तिला सांगतो की मी लग्नबंधनात अडकू इच्छित नाही वगैरे - हे चांगलं का?"
"नक्कीच नाही!"
"माझंही तेच आहे. माझ्या डोक्यात लग्न करण्याचं काही नव्हतं म्हणून मी तिला तसं सांगितलं. पण मला तिला गमवायचंही नाहीये. म्हणून मी तिला सांगितलंय की माझं लग्न झालंय पण डिव्होर्स शक्य नाही...पण...पण मी अशक्य प्रेमात आहे तिच्या आता...मला कुणी कपाळावर पिस्तूल रोखून दुस-या कुणाशी लग्न करायला सांगितलं तरी ते शक्य नाहीय आता..."..या प्रसंगात कॕरी ग्रँन्टचा प्रामाणिक प्रेमी..त्याच्यातला सच्चा माणूस खूप सहज दिसतो त्याच्या अभिनयातनं..

दोघांचं बोलणं झाल्यावर फिलीप चेंज होऊन येण्यासाठी खालच्या मजल्यावरच्या त्याच्या फ्लॕटमधे जातो. ..आणि इथे धमाल!.. 

फ्लॕटवर परत आलेला आल्फ्रेड अॕनाला बोलून जातो की फिलिप उद्या बोट पकडून न जाता रात्री तिला सरप्राईझ द्यायला १२ च्या ठोक्याला इथेच येणार म्हणून!...आणि त्यावर मार्गरेटही बोलताबोलता बोलून जाते की तिने आल्फ्रेडच्या टेबलवरचे फिलीपसंबंधीचे कागदपत्र पाहिलेत आणि कळलंय की फिलीप विवाहित असल्याचं खोटं बोललाय!..त्याचं लग्न झालेलंच नाहीये म्हणून!..झ्झालं!!!...आपण त्याला बायकोपासून घटस्फोट घे अशी विनंती केली आणि असं बोलल्याबद्दल अगदी पायावर पडत माफी मागितली हे आठवत अॕना आता चिडलीच्च आहे एकदम्म!! तिच्या रागाचा स्फोट होतो..

"I was down on my knees asking his forgiveness..Because I asked him to marry me. On my knees!..How dare he make love to me and not be a married man?!!!..." ..(हा प्रसंग इंग्रीडच्या त्या आवताराकडे बघत राहावं असाच!! ;-) )..

आता हे कळल्यावरही ती पार्टीला जायचा बेत कॕन्सल करत नाही...पार्टीत काय होतं? ती फिलीपला धडा कसा शिकवते?..तिथे भेटून रेड रोझ देणारा डेव्हिड कोण असतो? फिलीपला कळल्यावर काय होतं?...सिनेमाचा शेवट कुठल्या वळणावर...?..

यासाठी हा मूव्ही बघाच!! चाळीशीतली माझी डार्लिंग इंग्रीड आणि पन्नाशीतला आवडता कॕरी ग्रँन्ट यांचा त्या प्रौढ प्रेमिकांच्या रुपातला प्रणयाविष्कार!! "इन्डिस्क्रीट"!!!!

No comments:

Post a Comment