Monday, 14 June 2021

राजेश खन्ना


२९ डिसेंबर 
---------------------
२९ ला त्याचा जन्मदिन पण त्याच्या आठवणीत  आठ वर्षांपूर्वी तो गेला तेव्हाची जुनी  पोस्ट पुन्हा नव्या मित्रमैत्रिणींसाठी!! -->
-------------
मी ऑफिसमधून नुकताच घरी आलोय! घरी प्रचंड शांतता...एक अनामिक गंभीरता...मंजू शांत,सिरीयस.....आज पृथ्वीतलावरच्या तिच्या सर्वात आवडत्या दोन प्रिय माणसांतला दुसरा गेलाय (पहिले तिचे वडील!)...!

"तो"!! मंजूचा प्रचंड लाडका माणूस! हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार!

“झाले बहु, होतील बहु, परंतु यासमची एक असे हा!” हे वर्णन ज्याला फिट्ट बसतं तो म्हंजे - मंजूचा लाडका! होय! "राजेश"तो एक वादळ ठरला होता!!......तो आला ...त्याने पाहिलं....त्याने जिंकलं!!....

ठाकुरद्वार नाक्यावरच्या ‘सरस्वती सदन’मध्ये राहणाऱ्या चुनिलाल आणि लीलावती खन्नां यांनी त्यांच्या अमृतसरच्या भावाचा दत्तक घेतलेला मुलगा- जतीन खन्ना! सुरुवातीला चक्क पुण्याला वाडिया कॉलेजमध्ये येतो काय...आपटे रोडवर गिरगावातल्या जुन्या ओळखीच्या रमेश भाटलेकरांकडे राहतो काय...दोन वर्षानंतर पुन्हा मुंबईत परतून के.सी.कॉलेजमध्ये शिकता शिकता नाटकात कामं करायला लागतो काय...तिथेच संगीतकार मदन मोहन यांच्या भाचीशी, अंजू महेंद्रूशी नाटकाच्या रिहर्सल दरम्यान प्रेमात पडतो काय...आणि तश्यात अचानक एक दिवस “युनाईटेड प्रोड्युसर्स गिल्ड आणि फिल्मफेअर”ने जाहीर केलेल्या“टॕलंट हंट कॉन्टेस्ट”साठी अर्ज करतो काय...मग परीक्षक - बी आर चोप्रा, शक्ती सामंत, जी पी सिप्पी यांनी दिलेल्या डायलॉगऐवजी आयत्यावेळी आपल्याच एका नाटकातला पाठ असलेला सेंटीमेंटल डायलॉग म्हणून दाखवून, दहा हजार युवकांतून नवीन हिरो म्हणून निवडला जातो काय...त्यांच्या करारानुसार त्याला काही पिक्चर्स “आखरी खत” आणि “राझ”मिळतात काय..अवघ्या चारपाच पिक्चर्सनंतर हातात“आराधना “ येतो काय आणि मग...तोपर्यंत “actors”, “thespians”…”star” ...”ज्युबिलीकुमार” अशी बिरूदं मिळवणाऱ्या इतर मोठ्या ताऱ्यांच्या झगमगत्या दुनियेत “Phenomenon” ह्या सार्थ उपाधीने झळाळत तो पुढच्या अवघ्या पाच वर्षात ओळीने १५ सिनेमे सिल्व्हर /गोल्डन ज्युबिली हिट करून दाखवतो काय!!!...खरंच! राजेश वॉझ अ फेनॉमिनन!!. 

मलाही तसा "तो" आवडायचा. शशीचं स्थान वेगळं आहे माझ्यासाठी पण शम्मी, देव इतकीच "त्याची" ही गाणी प्रचंड आवडतात! 

त्याची केवळ "त्याची ओळख" बनलेली स्टाइल - डोळे मिचकावणं, मान तिरकी करत हसणं, हाताचा पंजा दुमडत तो ओठाजवळ ठेवत मिश्कील चेहरा करणं...

स्वतःच देखणेपण कायमच जपणं मग भूमिकेकी मांग' काहीही असो!! 😝 ...तेही इतकं की गाण्याच्या पिक्चराइझेशनच्या वेळी वारा डावीकडून वाहत असेल तर केसाचा भांग नेहेमीचा (डावीकडून उजवीकडे) ठेवणं, पण वारा उलट्या दिशेने वाहत असेल तर केसाचा भांग लगेच उलटा पाडून (उजवीकडून डावीकडे) कॅमेर्याला सामोरं जाणं (उदाहरणार्थ - "यूँही तुम मुझसे बात करती हो" किंवा "जिंदगी कैसी है पहेली हाये" किंवा "जिस गली मे तेरा घर" आणि अश्या अनेक गाण्यांत आणि काही सीन्समधे...), गळाबंद गुरुशर्ट घालणं, आणि बुशशर्ट घातला तर तो 'इन' न करता 'आउट' ठेवून जाड बेल्ट प्यँन्टीच्या लूप्समधनं न घालता, त्या शर्टा'वरून' घालणं, मोठ्ठा गॉगल घालून तो नाकाच्या शेंड्यावर आणून त्यावरून तिरकं बघत डोळा मारणं - असं काय काय आणि किती किती!! हे फक्त तोच करू जाणे आणि त्यालाच शोभायचं!!

"तो" आला १९६६ साली, तेंव्हा शशीचा "जब जब फूल खिले" आला होता आणि त्यातल्या बेबी नंदाबरोबरच्या मुंबईच्या तरूणाचं काम करणाऱ्या नटाचं नावही "जतीन खन्ना"च होतं म्हणून मग ह्याने "राजेश" नाव घेतलं आणि त्यानंतरच्या काळात "तो" स्वतः इssतका गाजला, इssतका लोकप्रिय झाला की १९६८ ते १९७५ ह्या सातआठ वर्षात भारतात जन्मलेल्या दहापैकी नऊ मुलांची नावं "राजेश"च ठेवली गेली!!😉

शशीचं आणि त्याचं काहीतरी अजब कार्मिक देणं असावं!! "आनंद"च्या रोलसाठी एन एन सिप्पींनी शशीची निवड करूनही आयत्यावेळी शशीऐवजी हृषीदांनी त्याला निवडलं होतं.(नाहीतर शशी-अमिताभ जोडी १९७५ ऐवजी चार वर्ष आधीच जमती!). शशी त्यावेळी स्टेजवरून आल्याने भूमिकेबाबत चूझी होता आणि म्हणून शशीने "हाथी मेरे साथी" नाकारला, "आराधना" हातातून गेला...आणि ते दोन्ही सिनेमे हस्तगत करून "तो" मात्र रातोरात सुपरस्टार बनला. भरीस भर म्हणून शशीच्या डेट्स जुळत नसल्याने "सच्चा झूठा"ही "त्या"लाच मिळाला आणि अर्थातच त्याने त्या सर्वच भूमिकांचं सोनं केलं. (बॉबी हिट्ट झाल्यावर डिम्पलचा पुढचाच सिनेमा शशीबरोबर फ्लोअरवर गेला होता, पण राजेशने तिला लग्न करून पळवली आणि तिने पुढची ११ वर्षं काम करणंच थांबवलं, नाहीतर ऋषी कपूर-डिम्पल पाठोपाठ शशी कपूर-डिम्पल जोडी पडद्यावर येती!)...पण तरी त्याची शशीशी दोस्ती होती आणि म्हणूनच बहुदा शशीने "प्रेमकहानी"च्या वेळचे त्याचे टँन्ट्रम्स चालवून घेतले होते आणि शेवटीशेवटी त्याच्यासाठी 'अलग अलघ'चा दुय्यम रोलसुद्धा केला होता...

सुरुवातीला राजेशला रफीसाबच्या आवाजात हिट्ट गाणी मिळूनही, आराधनाची दोन ड्युएट्स रेकाॕर्ड करुन रफीसाब तीन महिन्यांच्या परदेश दौर्यावर गेले आणि त्याचवेळी नेमके सचिनदा आजारी पडून त्यांच्याऐवजी जबाबदारी सांभाळणार्या आरडीने रफीसाब परत येईपर्यंत न थांबता आपल्याच आवडत्या आणि वंगबंधु किशोरकुमारकडून उरलेली गाणी रेकाॕर्ड करुन घेतली!,..किशोरचं आणि राजेशचं अक्षरशः जन्मजन्मांतरीचं नातं जुळलं (आणि जवळजवळ १९५० पासून ते १९६९ पर्यंत १८-१९ वर्ष सर्वच हिरोंनी आणि म्युझिक डायरेक्टर्सनी अव्हेरलेला किशोरकुमार नंतरची २० वर्ष "त्याच्यासाठी" आणि मग कोणाहीसाठी गा गा गात सुटला.)

राजेशचे ओळीने १५-१६ पिक्चर्स सुपरहीट झाले आणि नंतरच्या अमिताभला किंवा कोणत्याच नटाला कधीही लाभू शकलं नाही - इतकं आबालवृद्धांच, लहान मुलींपासून म्हाताऱ्या आज्ज्यांपर्यंत, तरुणांपासून आजोबांपर्यंत सर्वांचं प्रचंड प्रेम "त्याला" अवघ्या पाच वर्षांत लाभलं. त्याने "आनंद" ही जणू केवळ आणि केवळ त्याच्यासाठीच निर्माण केली गेलेली व्यक्तिरेखा अमर करून ठेवली. (इतकी की, पुढे साक्षात शिरवाडकरांनी त्याच सिनेमावर लिहीलेलं आणि त्यांच्या ग्रेट काव्यासहित साकारलेलं नाटक आणि त्यातला सतीश दुभाषीने साकारलेला 'आनंद'सुद्धा लोकांनी स्वीकारला नाही....!!)

.........आता जरा घरचं वातावरण शांत होतंय! सर्व चॅनेल्सवरून "त्याच्याविषयी" भरपूर ऐकून मंजूही आता जरा ओके झाल्ये. मी जरा बाहेर राउंड मारायला निघतोय...पण "त्याचा" आनंद काळजातून साद घालत म्हणतोय -

"बाबूमोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में है जहापनाह. जिसे ना आप बदल सकते है ना मै - हम सब तो इक रंगमंच की कठपुतलिया है जिसकी डोर उपरवाले के हाथ बंधी है - कब , कौन, कैसे उठेगा - यह कोई नहीं जानता...हा! हा! हा!!......." !!!!! ....."तो" - द ग्रेट फेनॉमिनन सुपरस्टार - राजेश खन्ना!!".....त्याच्या स्मृतींना कुर्निसात!!....

जाताजाता ---->> त्याच्यासारखं युनाईटेड प्रोड्युसर्सच्या टॅलंट हंटमध्ये जिंकलेल्या बबिताने त्याच्याबरोबर केलेल्या त्याच्या दुसऱ्याच पिक्चरमधलं रफीसाब आणि कृष्णा कल्ले यांनी "गुणगुणलेलं" गाणं - "सोचता हूं की, तुम्हे मैने कही देखा है.." - ह्यात म्युझिक नाही. नुसती सुंदर चाल! आणि कृष्णा कल्ले यांचा आशाबाईंशी जबरदस्त साधर्म्य साधणारा खल्लास आवाज....!!

https://youtu.be/97wyhqXIC0k

No comments:

Post a Comment