आॕफ ह्युमन बाँन्डेज
-------------
मला पार्ले काॕलेजला बाराव्वी सायन्सला असताना हायर इंग्लीश होतं आणि एकाहून एक क्लासिक्स lessons असायचे त्या पुस्तकात!..सायन्सला असलो तरी लिटरेचरची आवड होतीच, त्यात मुंडले सर इंग्लीश शिकवायला! मझा यायचा. त्यातूनच मग एकीकडे कीट्स, शेली, बायरन, ब्राऊनिंग, फ्राॕस्ट, वर्ड्सवर्थची आणि दुसरीकडे थॕकरे, शेक्सपियर, डिकन्स आणि माॕमसारख्यांची ओळख झाली. पुढे इंजिनियरींगला गेलो तरी चर्चगेटला ब्रिटीश कौन्सिल लायब्ररी आणि अमेरिकन लायब्ररीमुळे उत्तमोत्तम लेखक वाचायला मिळाले. त्याचवेळी साॕमरसेट माॕमची "आॕफ ह्युमन बाँडेज" कादंबरी वाचली होती...
काल रात्री त्याच कादंबरीवरचा १९३४ सालचा लेस्ली हाॕवर्ड आणि बेट्टी डेव्हीसचा मूव्ही पाहिला! मनाला भिडणारी प्रेमकथा!..खरंतर बाँडेज म्हणजे गुलामी!..पण ह्याठिकाणी कथानायक गुलाम आहे तो एकतर्फी प्रेमपाशात अडकून होणा-या विचित्र मानसिकतेचा! जिच्यावर तो प्रेम करतोय तिला त्याची किंमत नाहीये आणि तो जिला आवडलाय तिला तो धुत्कारतो त्याच त्या पहिल्या प्रेमापायी! हे infatuation at times घातकच! 'मोहोब्ब्त-प्यार- इश्क'चे टप्पे गाठण्याआधी ही 'उल्फत'ची पहिली पायरी फार सांभाळावी लागते. तिची गुलामी, ते पाश उलथापालथ घडवतात आयुष्यात नाहीतर!
फिलीप कॕरे चा (लेस्ली हाॕवर्ड) एक पाय विचित्र प्रकारे वळून मुडपल्यामुळे अधू आहे आणि त्यामुळे त्या पायासाठी स्पेशल बूट वापरत त्याला काहीसं लंगड्या चालीनं चालावं लागतं. त्याची चित्रकला उत्तम आहे आणि त्यासाठी तो पॕरीसला नशीब आजमावायला आलाय. पण तिथल्या एका निष्णात चित्रकाराने त्याची पेंटींग्ज बघून त्याला निरुत्साहीत केल्यावर तो सरळ लंडनला परततो आणि अंकलने केलेल्या पैशाच्या मदतीच्या आधारे डाॕक्टर बनण्यासाठी मेडिकलला प्रवेश घेतो.
मेडीकलच्याच विद्यार्थी मित्राबरोबर चहा प्यायला हाॕटेलमधे गेलेला असताना तो मिल्ड्रेड राॕजर्स (बेट्टी डेव्हीस) ह्या वेट्रेसच्या प्रथमदर्शनीच प्रेमात पडतो. खरं तर ते infatuation किंवा तारुण्यसुलभ आकर्षणच! आपल्या अधु पायाचं व्यंगामुळे अपराधी मन घेऊन वावरणारा फिलीप तिच्याबरोबर डेटींग करायला लागतो. ती मात्र त्याला केवळ मौजमजेसाठी कंपनी देत राहते, त्याच्याशी तुटकच बोलत आणि तुसडेपणानं वागत! त्याच्या प्रेमाचा आणि लग्नासाठीचा प्रस्ताव धुडकावत ती हाॕटेलमधे नेहेमी येणा-या एका श्रीमंत माणसाबरोबर लग्न करुन निघून जाते.
फिलीपचं अभ्यासातलं मन उडतं. तो त्यवर्षी नापासही होतो. दरम्यान त्याच्या आयुष्यात नोरा (के जाॕन्सन) येते. तिला फिलीप आवडलाय. मिल्ड्रेडच्या निघून जाण्याने दुखावलेला फिलीप तिच्या संगतीत ते दुःख विसरण्याचा प्रयत्न करतोय. नोरा त्याला लग्नासाठीही विचारते पण तेव्हढ्यातच त्या श्रीमंत माणसाने फसवून सोडून दिलेली आणि प्रेग्नंट राहिलेली मिल्ड्रेड त्याच्याकडे येते सहारा मागत. फिलीप नोराचं प्रेम ठोकरुन मिल्ड्रेडला सहारा देतो. ती आपली होईल अशी कुठेतरी आशा वाटत आसते बिचा-याला...पण बाळाला जन्म देऊन आणि दुसरीवर सोपवून मुक्त झालेली उच्छ्रृंखल मिल्ड्रेड फिलीपच्याच काॕलेजमधल्या मित्राबरोबर प्रेमाचे रंग उधळते. फिलीपने दिलेला सहारा विसरत त्याच मित्राबरोबर राहायला निघून जाते.
फिलीप पुन्हा एकाकी..हा प्रेमभंग त्याला खूपच जिव्हारी लागलाय...दरम्यान फिलीप उपचार करत असलेला एक पेशंट थ्रोप अॕथल्नी (रेजिनाल्ड ओवेन) त्याला आपल्या गावातल्या घरी पाहुणचाराचं आमंत्रण देतो. तिथे फिलीपची गाठ त्याच्या तरुण मुलीशी सॕली शी (फ्रॕन्सिस डी) होते. सॕली खूपच लाघवी मुलगी आहे. तिला फिलीप आवडलाय. फिलीपलाही तिचा ऋजू स्वभाव भावतो.
फिलीप शिक्षण पूर्ण करण्यासाठी परतल्यावर त्याला पुन्हा एक धक्का बसतो जेव्हा मिल्ड्रेड तिच्या बाळाला घेऊन पुन्हा एकदा आसरा मागत त्याच्या घरी येते. तो तिला नाही म्हणू शकत नाही. ती त्याच्या घरी राहायला सुरुवात करते. पण आता मात्र फिलीपने तिचा स्वभाव ओळखलाय. तिला आपल्या प्रेमाची काडीमात्र किंमत नाही हे त्याने जाणलंय. आणि म्हणून तो निग्रहानं तिचं गळ्यात पडणं अव्हेरतो ..त्या प्रेमातले पाश तोडतो..ती गुलामी झुगारतो...चवताळलेली मिल्ड्रेड तो घरी नसताना त्याची सर्व चित्र फाडून टाकते...घराची नासधूस करते..इतकंच नव्हे तर शिक्षणासाठी त्याच्या अंकलने पाठवलेल्या बाँण्ड्सचे पेपर्स जाळून निघून जाते...फिलीप परतल्यावरा ते बघून सुन्न होतो..आता त्याला काॕलेजही सोडणं भाग असतं.. पण जाण्याआधी त्याचे तिथले दयाळू डाॕक्टर प्रोफेसर त्याच्या अधू पायावर यशस्वी शस्त्रक्रिया करुन त्याचा पाय बरा करुनच त्याला निरोप देतात!
फिलिपला आसरा मिळतो तो सॕलीच्या बाबांकडून आणि ते काम करत आसलेल्या स्टोअरमधे नोकरीदेखील. आणि अशातच पुन्हा एकदा मिल्ड्रेडकडनं मदतीची हाक येते. पण ती आता टीबी पेशंट झाल्येय..तिला पैशांची जुजबी मदत करुन फिलीप तिचा अखेरचा निरोप घेऊन निघतो...मिल्ड्रेड त्या आजारातच जाते.
इकडे फिलीपला काकांनी मरणापूर्वी काही पैसे त्याच्या नावे ठेवल्याचं कळतं..त्याचं डाॕक्टर होण्याचं स्वप्नं पूर्ण होतं आणि सॕलीसारखी त्याला जपणारी जीवनसाथीही मिळते. शेवट गोड,
No comments:
Post a Comment