Friday, 18 June 2021

उर्दू??..इथे सालं हिंदीसुद्धा झेपत नाहीये..

खर तर जुने मुस्लीम सोशल सिनेमे बघितले आणि साहीर, शकीलची वगैरे गाणी ऐकली किंवा क्वचित कुणाच्या शेरोशायरीच्या पोस्ट्स वाचल्या किंवा सूखनसारखा कार्यक्रम (5-6 वेळा) बघितला की मला उर्दू शिकण्याची ज्याम हुक्की येते!

पण मग जाणवतं की ज्याचं हिंदीच मुद्दलात भीषण आहे त्याला उर्दू म्हंजे कित्ती भलताच खडतर मामला आहे तो!! त्यामुळे तो रीतसर उर्दू शिकण्याचा बेत मी वारंवार पोस्टपोन करत आलोय! खरं तर हिंदी सिनेमातली गाणी कळतात असा माझा समज आहे बरं. (अर्थात त्याला काही सोप्प्या गाण्यांचे अपवाद आहेत ज्यामुळे मला हिंदीतरी धड आकळत्ये की नै याची शंका यायला लागते. उदा. कविश्रेष्ठ आनंदराव बक्षी यांची शोलेतली ती महान रचना "कोई हसिना जब रुठ...."  आणि त्यातली ती आजरामर ओळ -"स्टेशनसे गाडी जब छूट जाती है तो - एक दो तीन हो जाती है"!!! ..मला आजतागायत त्याचा आर्थ उमगला नाहीये. लहानपणी "नौ दो ग्यारह होना" हा वाक्प्रचार अभ्यासला होता पण "एक दो तीन होना" हे कधीच नव्हतं हिःदीच्या पुस्तकात....

आनंद बक्षीहून वरच्या फळीतले म्हणजे मजरुह सुलतानपुरी!...पण त्यांचीही एक ओळ बुचकळ्यात पाडते. हम किसी से कम नही या कव्वालीतल्या एका शेरात आशाबाई गातात-"भेस मजनू का लिया मैने जो लैला होकर, रंग लाया है दुपट्टा मेरा मैला होकर"...मी बुचकळ्यात. मी लैला होऊन मजनूचा भेस कसा घेणार??..आणि समजा मी मजनू आसेन तर मी दुपट्टा का घेईन आंगावर जो रंग लाणारे??...की त्या वाक्यात भेंस नसून भैंस आहे..आणि त्या झीनतने काही काळ  लैला बनून मजनूची भैंस उधार घेतली ज्यामुळे आनंदीआनंद गडे होत्साता तिच्या दुपट्ट्याने रंग लाया??..
काय की....

माझं हिंदी कधी सुधारणार आणि मला उर्दू कधी जमणार हे आसं सोपंसोपंपण कळत नसेल तर??.....

श्शी बाबा!! कठीणचै एकूण!! ;-) :-D

No comments:

Post a Comment