"रेडिओ आणि मी!"
---------
त्यातल्यात्यात, जुन्यात्जुनी आठवण आठवायचीच झाली, तर ती माझ्या अग्ग्द्दी लहानपणची!! आमचं माटुंगा रोडचं घर तसं मोठं आणि आमचा हॉलही बऱ्यापैकी मोठा होता आणि तिथेच जरा उंचावर एका फळीवर मर्फीचा आडवा मोट्ठा रेडिओ ऐटीत बसलेला असायचा! घर मुळात माणसांनी भरलेलं आणि तश्यात कोकणातून मुंबईत येणारे पाहुणेही बऱ्याचदा राहायला असायचे. त्यामुळे कधीही बघावं तर, घरातलं कोणीना कोणी त्यावर काहीना काही ऐकत असायचंच! त्या रेडिओचं वैशिष्ट्य म्हंजे तो “व्हॕल्व्ह” रेडिओ होता. माझा हट्ट पुरवायला मग, जो कुणी तो ‘ऑन’ करायचा, तो मला कडेवर उचलून रेडिओच्या अगदी जवळ चिकटायला न्यायचे कारण मला, त्या व्हॕल्व्हच्या काचेवर माझं चिमुकलं बोट ठेवून ती हळूहळू गरम होत हिरवट रंगाची होत जाणारी, उभट दंडगोल काच बघणं आणि तिचा तो उबदार स्पर्श भारी आवडायचं! मी हॉलमध्ये असताना कोणी रेडिओ लावला की मी “उच्चूउच्चू” करायला लावून त्या वॉंल्व्ह च्या गरम ग्लासला हात लावून खुश व्हायचो असं आठवतंय ...
शिवाय कुणाच्या तरी कडेवर बसून त्या अॕनालॉग रेडिओचा माझ्या बाळमुठीएव्हढा असणारा तो डार्क चॉकलेटी ढोल्या नॉब गोल गोल फिरवत, त्या रेडिओची उभी काडी भर्रकन डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे फिरवून, आतल्या माणसांचे बदलत जाणारे आवाज ऐकायला गम्मत वाटायची मला!!
मोठा होत गेल्यावर जाणवलं की ठराविक वेळेला ठराविक गाणी ऐकायला मिळतात रेडिओवर. अर्थातच मराठी गाणी आणि हिंदी गाणी ज्यास्त ऐकली जायची आणि मग बाकी श्रुतीकाबितीका.,पण त्यातही त्यावेळी सुरु झालेली बिनाका गीतमाला ऐकायला सगळे उत्साही असायचे हे आठवतंय!!
पुढे माझे दादा (वडिल) आपल्या कुटुंबासह म्हणजे आम्हाला घेऊन बोरिवलीत वझिरा नाक्याला आले आणि तो मर्फीचा ढोला “व्हॕल्व्ह” रेडिओ विसरून आता आंम्ही नवीन घरात फिलिप्सच्या स्कीपर ‘ट्रान्झीस्टर’ रेडिओवर प्रोग्राम्स ऐकायला लागलो. पण तरीही मला रेडिओचं वेड किंवा व्यसन लागलं नव्हतं. कारण मी हिंदी गाणी किंवा काव्याकडे लक्ष देत नव्हतो. तो बदल माझ्यात घडला तब्बल मी दहाव्वीत गेल्यावर आणि मी रेडिओकडे इतका ओढला जाण्याला कारणीभूत ठरली शाळेतली एक आवडती मैत्रिण!.....
त्याचं असं झालं - दहावीच्या पहिल्या प्रिलीमनंतर आमच्या शाळेची ट्रीप गेली होती गोव्याला! खचाखच विद्यार्थांनी भरलेल्या त्या बसमध्ये माझ्या पुढच्याच सीटवर 'ती' खिडकीत बसलेली होती. प्रवासात कधीतरी 'ती', तिची मैत्रीण आणि माझ्या शेजारचे दोघे मित्र ह्यांच्यात गाण्यांच्या भेंड्या सुरु झाल्या. मी भान हरपून तिची गाणी ऐकत होतो शुद्ध यडबंबूसारखा!! कारण मला एक्कही गाणं धड पाठ नव्हतं आणि हाईट म्हंजे तोपर्यंत ‘लता आणि सुमन’ ह्यातला फरक सोडाच, पण ‘लता आणि आशा’च्या आवाजातला फरकही कॉन्फीडेंटली सांगता येत नव्हता इतका माठ होतो मी!! माझ्या मित्राला बऱ्यापैकी जुनी गाणी माहीत होती. त्याने पंकज मलिकचं “आई बहार ...बहार आयी...आयी बहार आहांs..” वगैरेही म्हणून झालं होतं. अचानक माझ्या 'त्या' मैत्रिणीने एक जुनं गाणं म्हणायला सुरुवात केली – “डॉ.कोटणीस की अमर कहानी” मधलं - “नयी दुल्हन..नयी दुल्हन...मै हुं नन्ही नयी दुल्हन....”मी ते ऐकून वेडाच!'तिच्या'विषयीचा आदर प्रचंड वाढला आणि स्वतः ची प्रचंड लाज वाटली - च्यायला, मला अशी कोणतीच जुनी गाणी म्हणता येऊ नयेत? काहीच माहिती असू नये? असा इज्जत चा फालुदा व्हावा? तोही 'त्या' मैत्रिणीसमोर? श्शीट! ती ट्रीप संपली आणि त्यां ट्रीपच्या मधुर आठवणीबरोबर मी माझ्या पचक्याची आठवणही डोक्यात ठेवूनच परतलो आणि त्यां दिवसापास्न रेडिओ ऐकायचा धडाका लावला....
आमच्याकडच्या फिलीप्सच्या “स्कीपर” मॉडेल मधून मग MW, SW1, SW2 वर काय वाट्टेल त्यां फ्रीक्वेन्सीज पकडून मी रेडिओ ऐकत गेलो! अगदी एकलव्य स्टाईलने रेडिओला गुरुच केला माझा आणि हावरटासारखी, अधाश्यासारखी एकेक स्टेशन्स पकडून दिवसरात्र रेडिओला चिकटून बसायला लागलो...
सकाळ झाली की हा भैरू उठायचा तो थेट (ब्रश हातात घायच्याही आधी-) रेडिओ ऑन करतच!! आणि मग मुंबई अ/ ब, सिलोन, विविधभारती, बडोदा, राजकोट, अहमदाबाद, जयभारती, ऑल इंडिया रेडिओ...वगैरे वगैरे इत्यादी असं काय काय! जित्थे म्हणून गाणी ऐकायला मिळतील अश्या सर्व शक्याशक्यता पडताळत, अक्षरशः पागल होऊन रेडिओ ऐकत गेलो आणि असं करताकरता मग जरा कुठे "शिरीष कणेकर, कैलास झोडगे, इसाक मुजावर, विजय जानोरकर, विजय पाडळकर, अंजनकुमार, माधव मोहोळकर"प्रभृतींच्या पायाशी बसता येण्याइतपत नॉलेज गाठीशी आलं!
पहिल्यापासूनच १९४९पासूनची गाणी त्यांच्यात ओतप्रोत भरलेल्या मेलडीने भारून टाकत होती! त्यामुळे साहजिकच १९४९ ते ७३ मधल्या सुवर्णयुगातली गाणी ज्यास्त ऐकायला मिळतील असे रेडिओ सिलोनवरचे आणि विविधभारतीवरचे जुन्या गाण्यांचे प्रोग्राम्स शोधू शोधून ऐकत गेलो..
रेडिओ सिलोनवर सकाळी ७ पासून रात्रीपर्यंत अक्षरशः एक्सोएक गाण्यांची बहार असायची! ”एक ही फिल्म के गीत”, ”पुरानी फिल्मो के गीत” (ज्याचा शेवट हमखास सैगल च्या गाण्याने व्हायचा!), ”आप ही के गीत”, ”अनोखे बोल” (ज्याची सुरुवात ‘दुम्बक दुम्बाsss’ अश्या काही मजेशीर शब्दांच्या साथीने व्हायची!) नावाचा अत्यंत युनिक कार्यक्रम होता. ज्या गाण्यात कवीने नं लिहिलेले (किंवा गम्मत म्हणून टाकलेले) पण गाण्याच्या चालीत धम्माल आणणारे असे काही अनोखे शब्द असतील अशी गाणी त्यात लावली जायची...आणि असेच कितीतरी छान छान कार्यक्रम - “बेहेनो की पसंद”, ”जाने पेह्चाने गीत", .“हमेशा जवां गीत”, .”एस कुमार्स का फिल्मी मुकद्दमा" आणि अर्थातच जिचा जुनून कायम आपल्या मनावर राहिलाय ती “बिनाका गीतमाला”!!.त्यातली ती विविध पायदानं आणि हमीद सायानीच्या कृपेने रेडिओच्या जगात अजरामर झालेलं, त्याच्या लहान भावाचं अमीन सायानीचं खास स्टाईलमधलं निवेदन!! अमीन सायानीबरोबर इतरही ग्रेट निवेदक होते त्यावेळी - मनोहर महाजन, गोपाल शर्मा वगैरे...मी अक्षरश: भान हरपून तासनतास सिलोन ऐकत बसायचो - स्वर्गीय सुख होतं ते!!...
एकीकडे सिलोन शॉर्ट वेव्हवर असतानाच मिडीयम वेव्ह फ्रिक्वेन्सीवर, सिलोन च्या कॉम्पिटिशनमध्ये असायची “विविभारती”!! अर्थात त्यांच्या गाण्यांच्या प्रोग्राम्समध्ये साम्य असणं साहजिकच होतं! पण तरीही लहानपणापासून..म्हंजे आठवतंय तेंव्हापासून कित्येक प्रोग्राम्स आणि त्याच्या ट्युन्स तशाच आहेत!.अज्जुनही!!..
अजूनही “संगीत सरिता”चं धीरगंभीर उच्चारण आणि पाठोपाठ ती सरगम...”हवामहाल”ची अनाउन्समेंट आणि ती ट्यून...”जयमाला” म्हटलं की लग्गेच ती मिलिटरीचं संगीत...’विशेष जयमाला’ ऐकताना इतके मजेशीर किस्से ऐकायला मिळायचे त्या आलेल्या पाहुण्या सेलेब्रिटीकडून! रविवार तर विविधभारतीचा खास असायचा! हरीश भिमानीच्या बरोबर “कोहिनूर गीत गुंजार”...मग जनरल नॉलेज वाढवायला अमीन सायानीबरोबर “बोर्नव्हिटा क्विझ कॉन्टेस्ट”...दुपार सरता सरता “क्रिकेट विथ विजय मर्चंट”...
असं काय काय आठवतंय आणि शिवाय त्या काळात खास रेडिओसाठी बनवले गेलेले “रेडिओप्रोग्राम्स” ज्यात नवीन किंवा येणाऱ्या फिल्म्सचे रेडिओ-ट्रेलर असायचे ..ज्यात “त्या पिक्चरची माहिती, गाण्यांची आणि डायलॉगची झलक”...असा मालमसाला असायचा...तबस्सुम कुणाकुणाच्या मुलाखती घायची किंवा तिचा अजून एक कार्यक्रम होता ती ज्योक्स सांगायची तो...मग एक “सँटोजन की मेहफिल” असायची..
आजतागायत विविधभारती मला आवडत्ये ती म्हंजे जुन्या गाण्याच्या खजिन्यासाठी (कारण आता सिलोनचा खजिना ऐकायला मिळतंच नाही)..आजही रात्री 9.30 पासून “एक ही फनकार”, ”छायागीत", आप की पसंद” आणि “बेला के फूल” अश्या क्रमाने गाणी ऐकत जाण्यात काय मझा आहे तो “जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे” असाच!!!!!!..
आणि रेडिओचं आणखीन एक वैशिष्ट्य प्रचंड भावायचं ते म्हंजे दोन कार्यक्रमांमधला वेळ भरायला Filler म्हणून इनॉक डेनियलने पियानो किंवा अकॉर्डीयन वर वाजवलेली किंवा व्हॕन शिप्लीने गिटारवर वाजवलेल्या जुन्या हिट गाण्यांच्या धून लावायचे..विविधभारतीकडे इंन्स्ट्रुमेंटल म्युझिक स्वरूपात जे काही हज्जारो जुन्या गाण्यांचे तुकडे आहेत त्याला तोडच नाही! केवळ लाजवाब प्रकरण आहे ते!! कधी अचानक वाजणारा तो पीस इनॉक डॅनिअलचं पियानोवर आपल्याला डोलायला लावणारं एसजेचं वॉंल्त्झवर आधारित गाणं असतं...कधी देशपांडेची सतारीवर मदनमोहनची मेस्मेरायझिंग चाल...कधी शामराज किंवा मनोहारीने सॅक्सोफोनवर लताचा बेहेतरीन कॅब्रे “आ जाने जाssss”च्या मदहोशीने आपल्याला वेडं केलेलं असतं, तर कधी आश्चर्याने तोंडात बोटं घालायला लावणारी व्हॅन शीप्लेच्या हवाईअन गिटारची करामत असते! "व्हॕन शीप्" हा लखनौला संगीतमय घराण्यात जन्मलेला बाप माणूस! तो उस्ताद विलायत खां चा क्लासमेट होता. कॉलेजमध्ये भेटलेल्या तलत मेहमूदने त्याला ऑल इंडिया रेडिओवर नेलं. उस्ताद अल्लाउद्दीन खां आणि अली अकबर खां कडून तो व्हायोलीन शिकला होता. हुस्नलाल भगतराम यांनी त्याला प्रथम वाजवायची संधी दिली होती. पुण्यातल्या उमेदवारीच्या काळात तो चक्क गुरुदत्त आणि देवसाब बरोबर रूम शेअर करायचा! पुढे त्याला अण्णा चितळकर, गुलाम हैदर, अनिल विश्वास, सचिनदा सगळ्यांनीच संधी दिली आणि गडी सुटलाच!! मग राज कपूरकडे गेल्यावर त्याचं सोनं आणखीनच झळाळून उठलं! “बरसात”चं फेमस व्हायोलीन त्यानेच वाजवलंय!! ”आवारा”तलं स्वप्नंदृश्याच्या वेळचं गिटार त्याचंच! त्याचं “जिया ओ जिया ओ जिया कुछ् बोल दो”चं फास्ट गिटार कोण विसरेल? पुढे १९५५-५६ च्या आसपास त्याला ग्रेटेस्ट अकॉर्डीअन मॕस्त्रो इनॉक डॅनिअल्स भेटले आणि मग दोघांनी अक्षरशः धुमाकूळ घातला हिंदी फिल्म म्युझिक मध्ये!! इनॉक भाऊंचं काय विचारता? असा अॕकॉर्डीअन प्लेयर आणि म्युझिक अरेंजर होणे नाही!!..
त्या काळची ती सगळीच माणसं बाप होती आणि अश्या कित्येक नोन-अननोन माणसांनी विविधभारतीकडे त्या अजरामर गाण्यांचा इंन्स्ट्रुमेंटल म्युझिक फॉर्ममध्ये जो काही “प्र-चं-ड साठा” करून दिलाय नं त्यामुळे विविधभारतीच्या आसपासही हल्लीचं कुठलंच एफेम च्यानेल येऊ शकत नाही
मात्र विविधभारतीने गाण्यांविषयी प्रचंड माहिती देतादेता, एक भयंकर पीडा मात्र गेली अन्न्न्न्नेक वर्षं चालवल्ये आणि ही पीडा ज्या कुण्या रेम्याडोक्याच्या टाळक्यातून निघाल्ये त्याला जनतेचे मानसिक हाल चालवल्याबद्दल शिक्षाच ठोठावली पाहिजे ते म्हंजे “आप की फर्माईश” किंवा “आप की पसंद” नावाच्या कार्यक्रमात तब्बल २-३ मिनिटं भारतातल्या, आपलं ज्यांच्याशी सुतराम देणंघेणं नाही अश्या - “पप्पू, मुन्नू, बिना, टीना, रानी, विमलाकुमारी, सुरज और उनके परिवार के सभी सदस्य” किंवा मग “हसीना, अब्दुल, अशफाक, चांद, कमाल, सलीम, मुन्नी...” आणि वर “उनके बहोत सारे साथी” अश्शी नावं घेत सुटायचं आणि तेही महाभाग आयदर “चांदनी चौक” चे, नाहीतर मग थेट “बर्काकाना, झुमरीतलैय्या” अश्या भारताच्या नकाशावर शोधून सापडणं मुश्कील अश्या अगम्य ठिकाणचे!!...बरं ह्या सग्गळ्या “उनके परिवारके सभी सदस्यांची” किंवा त्यांच्या “बहोत सारे साथी”वाल्यांची पसंत अच्चूक्क एककच गाणं कसं काय ब्बोवा असू शकतं? – हे ही मला एकदा विविधभारतीवर जाऊन ती सारी पत्र (आताश्या एसेमेस) बघून शहानिशा करायच्ये!!..आणि जर का ती नावं बोगस असतील आणि केवळ एक उपचार म्हणून घायची असतील तर त्यापेक्षा, त्यावेळात २-३ मिनिटांची ३-४ गाणी वाजवा ना लेको!!! पण नाही!! हां सरकारी मामला असल्याने “हम नही सुधरेंगे!” कोणीतरी बाबा आदमच्या जमान्यात पाडलेली प्रथा आम्ही उद्या माणूस मंगळावर वस्तीला गेला तरी सुरूच ठेवणार!! तरी नशीब की विविधभारतीवरच्या बहुतेक गाण्यांच्या कार्यक्रमांचे निवेदक किंवा प्रोग्राम्स्चे प्रस्तुत्कर्ते हे “काहीएक किमान IQ level ” असणारे असतात – आजकालच्या पेव फुटलेल्या एफेम च्यानेल वरच्या “ IQ-less” मूर्ख बडबड करणाऱ्या आरजे सारखे नसतात!!! ह्या आजकालच्या मठ्ठ आरजें ना कुणी सांगत का नाहीत की “सतत-संतत-अव्याहत-अविरत-अथक” तोंडाची टकळी चालू ठेवण्यात शहाणपणा नसतो तर त्यां गाण्यातलं काही उलगडून दाखवणे किंवा काही किस्से सांगणे हे महत्वाचं असतं किंवा असायला हवं! किंवा ते येत नसेल तर मुकाट गाण्याची अनाउन्समेंट करून गाणं लावा नं तिच्यायला.! उग्गच हिंग्लीश किंवा मिंग्लिश बडबड कशाला? कानांवर नस्ते अत्याचार च्यामारी?!!...
विविधभारती आणि सिलोन इतकाच मी तुडुंब एन्जॉय केला तो “वर्ल्ड स्पेस रेडिओ” !! ह्यासाठी महिन्याला ठराविक पैसे भरून घरावर एक चिंटू डिश लावायला लागे आणि मग satellite जरिये आपल्यापर्यंत २४ तास चालणारे विविध भाषांतले DTH च्यानेल्स ऐकायला मिळायचे!! २४ तास!!वेड लागायचं! २४ तास जुनी गाणी ऐकाय्च्येत? ऐका “फरिश्ता” च्यानेल! २४ तास गझल्स ऐकाय्च्यात? ऐका “फलक” च्यानेल!..२४ तास शास्त्रीय संगीत ऐकायचं? मग ऐका “गंधर्व” च्यानेल ..२४ तास मराठी गाणी ऐकाय्चेय्त? मग ऐका “सुरभी” च्यानेल..आणि चुकून 'नवीन चालू' गाणी ऐकाय्च्येत २४ तास (बाप रे!!) मग ऐका “झंकार”...याशिवाय अमेरीकन, युरोपियन, जाझ्झ, ब्ल्यू...असं सग्गळ विपुल असायचं!! आणि मला सर्वात आवडायचं ते म्हंजे आपण सबस्क्राईबर असल्याने त्यांच्या वेबसाईटचा अक्सेस असायचा ज्यावर खूप सारी माहिती असायची आणि आपण ही तिथे लिहू शकायचो..(मीही लिहिलं होतं ;-) ). पण अफसोस!! हे सर्व व्याप चालवणारी कंपनी युएसमध्ये बँकरप्ट डिक्लेअर झाली आणि आयुष्यातला एक महत्वाचा साथीदार गमावला मी!!..
रेडिओच्या त्यावेळच्या आणखी अविस्मरणीय आठवणी म्हणजे त्यां काळात टीव्ही नसल्याने रेडिओवरून ऐकायला मिळणारी क्रिकेटची कॉमेंटरी !! त्यावेळचे लाडकी मंडळी म्हंजे सुरेश सरईय्या, आनंद सेटलवाड आणि मराठीत वि.वी.क. आणि बाळ पंडित! आमचं दैवत सुनीलची (सचिन पेक्षा अज्जूनही तोच आवडतो!!) सेन्चुरी ऐकायला आम्ही रेडिओला खिळून असायचो आणि मग आपल्या, केवळ आपल्याच नव्हे तर, कोणत्याही देशाचे सामने ऐकायला आम्ही मित्रमंडळी एखाद्याच्या हातातल्या छोट्या ट्रान्झीस्टरभोवती कोंडाळं करून असायचो...आताश्या क्रिकेट मधला इंटरेस्टच गेल्यामुळे आणि टीव्हीमुळे रेडिओवर क्रिकेट ऐकणं संपलंच आहे..पण अजूनही रेडिओ आमच्या हॉलमध्ये सदासर्वदा चालू असतोच!!...
त्यामुळे विविधभारतीवर आपली आवडती जुनी गाणी किंवा मग एफेमच्यानेलवर अज्जीबातच 'पुरानी नसलेली' (याने की आरडीच्या काळातली आरडीचीच!) गाणी “पुरानी जीन्स” नावाच्या कार्यक्रमात चालू असतात. पुण्यातली विविधभारती अजूनही खूप छान गाणी लावत्ये रात्री..मराठी निवेदन पण गाणी हिंदी!..
एकुणात काय तर - रेडिओ हां खूप जवळचा मित्र होता, आहे आणि राहिलंच!! रेडिओचा एक अतिशय महत्वाचा फायदा म्हंजे तो चालू ठेवूनही आपल्या आलेल्या पाहुण्यांशी व्यवस्थित गप्पा होऊ शकतात, ज्या आपण टीव्हीसमोर बसलो तर गप्पा बंद पडून टीव्हीकडे नजर जाऊ शकते.. (रेडिओ चालू ठेवून गप्पा सोडाच अभ्यास करणारेही आसायचेच की!) ;-) ..रेडिओ तो रेडिओच!! पूर्वी ‘रेडिओग्राम’ स्वरूप असणारा व्हॕल्व्ह रेडिओ- नंतर ट्रान्झीस्टर रेडिओ झाला. नंतर डेक किंवा म्युझिक सिस्टीमच्या रुपाने नव्याने अवतरला...नंतर त्याचे विविध छोटे अवतार आले....आणि आता तर मोबाईल क्रांतीमुळे तो आपल्या तळव्यात मावेल असं छोटं रूप घेऊन असतोच आपल्याजवळ!!...
मी नेहेमी सगळ्यांना माझ्या ८ जीवनावश्यक गरजा सांगतो –
“अन्न, वस्त्र, निवारा, पाणी;
पुस्तकं, नाटकसिनेमे, मित्रमैत्रिणी, गाणी!”
त्यांपैकी माझी “गाणी ऐकण्याची” मुलभूत गरज भागवणारा माझा साथी – रेडिओ!!
आणि आताश्या मोबाईलमधेसुद्धा विनाजाहिराती, विनाब्रेक आखंड 24 तास सलग सतत गाणी ऐकवणारं Tunein Radio हे अफलात्तून अॕप आणि त्यावरचं Hits of Bollywood सिलेक्ट केलं की हवं तेव्हा गाणी ऐकता येतातच!
No comments:
Post a Comment