Monday, 14 June 2021

फोटोतलं माणूस आवडणं...

फोटोतलं माणूस आवडणं....?!!!
-----------
७० सालपर्यंत ब-याच सिनेमात एक सीन असायचा. की मुलीच्या घरी आलेला एक "ज्योतिषी कम मध्यस्थ" असा टू-इन-वन रोल करणारा कुणी, ष्टोरीला नाट्यमय वळण देण्यासाठी, तिच्या बापाला कुठल्याश्या ओळखीतल्या मुलाचा फोटो दाखवून "तो कसा लायक आहे, दिसायला राजबिंडा आहे, अच्छे खानदान का है" आणि मुख्य म्हणजे त्याने "बी.ए.किया है" वगैरे सांगून त्या फोटोवरच तिचं लग्न ठरायचं! ज्याला फक्त फोटोतच पाह्यलंय तो काही सिनेमात योगायोगाने हिरो असायचा तर काही सिनेमात व्हीलन वगैरे..पण मुलीची किंवा मुलाची आवड ही त्याक्षणी बाजूला ठेवली जायची...त्यांच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेल्या आईवडिलांनीच स्थळ ठरवलेलं असायचं...

आपल्याला एखादं माणूस कधी आवडतं? म्हंजे तसं नुस्तं फोटो बघुनही आपल्याला कुणी आवडूच शकतं. पण नुसत्या त्या 2-D फोटोतनं ती व्यक्ती प्रत्यक्षात कशी असेल ह्याचा अंदाज बांधणं खरं तर कठीण! सिनेमात कसं "भूमिके की माँग"नुसार  असतं ..तिथे देवसाब आशा पारेखला भेटायच्या आधी नुसता तिचा फोटो हातात धरत त्याकडेच वेडा होत बघत म्हणू शकतो -"बिन देखे और बिन पेहचाने तुमपर हम कुर्बान; मोहब्बत इसको कहते है, मोहब्बत इसको कहते है.."

किंवा 

कुलदीप पवार म्हणूच शकतो -""पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले..ना कळे! कधी, कुठे, मन वेडे गुंतलेs..." वगैरे...

पण हे असं नुस्तं फोटो बघून कुणी आवडलं तरी प्रत्यक्ष भेट झाल्याशिवाय मनाची गाठ पडणं जरा कठीण नं खरं म्हंजे?!..हां, एकदा भेटल्यावर त्या पहिल्याच भेटीत 'विकेट जाणं' मात्र होऊच शकतं!..म्हणून तर "लव्ह अॕट फर्स्ट साईट" ही फ्रेझ जगभर मान्य केली गेल्ये. आपल्याही आसपास अशी घडलेली उदाहरणं असतात. अगदी आपल्याही आयुष्यात!! (माझं तरी मंजूबाबतीत वेगळं काय झालंय?! मी मंजूच्या प्रेमात पडल्याचं कळल्यावर, तिच्या सोसायटीत राहणारा, तिला लहानपणापास्नं पाहिलेला माझा मित्र आश्चर्यचकीत होत्साता मला विचारता झाला होता "तू हिला माझ्यापेक्षाही कमी वेळा पाहून हिच्या प्रेमात कधी पडलास?" वगैरे..🙄😝 )

पण हे असं पहिल्याच भेटीत भले आपल्या हृदयात 'ट्रिंग ट्रिंग' झालं, तरी समोरचीच्याही हृदयात झालं तरच मामला पुढे सरकणार ना!...एकंदरीत भारतीय समाजाचा लसावि काढला, तर अगदी एकविसाव्वं शतक सुरु होईपर्यंत (गेल्या वीसेक वर्षांपर्यंत), तरी लव्हमॕरेजेसची संख्या ही अरेंज्ड मॕरेजेसच्या तुलनेत खूप कमी असावी! (हल्लीचं माहित नाही!). तसंही याचं स्टॕटिस्टिक्स मिळणं सालं कठीणच! कारण लव्ह असो वा अरेंज्ड - विधीवत लग्न ज्या हाॕलमधे लागतं तो हाॕल असो वा विधी नसणारी लग्न लागणारं मॕरेज रजिस्ट्रारचं आॕफिस - तिथल्या फाॕर्ममधे तसं फिल्ड नसतं भरायला!! (point to be noted - किमान यापुढे विधीवाल्या लग्नाच्या हाॕलवाल्यांच्या आणि मॕरेज रजिस्ट्रार आॕफिसच्या फाॕर्म्समधे  "लव्ह की अरेंज्ड" हे फिल्ड add करायला हरकत नस्से!..म्हणजे पुढे तरी काही 'लव्ह की अरेंज्ड'चं स्टॕटिस्टीक्स मिळू शकेल!) 😊

तर मुद्दा असा की लव्ह मॕरेजेसच्या तुलनेत अरेंज्ड मॕरेजेसमधे त्यामानाने दोघांनी एकत्र वेळ कमी घालवलेला असतो. प्रेमविवाह करणारे आधी तुलनेनं जास्त फिरलेले, बरीच धमाल केलेले असल्यामुळे ते एकमेकांना ब-यापैकी व्यवस्थित "ओळखून"असतात! त्या तुलनेत बघाबघी करुन लग्न करणा-यांची एकमेकांना त्याअर्थाने ओळख तशी लग्नानंतर एकत्र राह्यला लागल्यावरच पटत असणार...(अर्थात- दोन्ही बाबतीत अपवाद नक्कीच!!..आय मीन - बघाबघी करुन अरेंज्ड मॕरेज केलेल्यांचे 'आत्मे जन्मजन्मांतरीचे एक्काच कळपातले असल्यासारखे' ती दोघं एकमेकांना अगदी कमी सहवासातही अगदीच १००% ओळखलेली असू शकतात आणि अज्जिब्बात न भांडता अशक्य गुण्यागोविंदात नांदा सौख्यभरे होतं आणि त्याउलट काही लव्ह मॕरेजमधे (उदाहरणार्थ माझ्यासारख्यांच्या बाबतीत-) लग्नाआधी खूप भेटून, फिरुन, भरपूर सहवास असूनही नंतर स्वभावातले काही न पटणारे पैलूही आहेत असा शोध लागून "ती तलवार उपसून आणि तो बिचारा ढाल घेऊन कायम डिफेन्सिव्ह स्टान्स घेतलेला" असंही होऊ शकतं..!)..🤔😆🤣

त्यामुळे ते देवसाबचं "बिन देखे और बिन पेहचाने तुमपर हम कुर्बान" असो किंवा कुलदीप पवारचं "पाहिले न मी तुला तू मला न पाहिले" - हे पडद्यावर १००% पटलं तरी प्रत्यक्ष आयुष्य जगताना पोपटी मामला ठरु शकतो!

इन शाॕर्ट फोटो बघून कुणी आवडलं तरी भेटणं...फिरणं..बोलणंचालणं...सहवास घडल्याशिवाय "पुरेशी ओळख" होणं मुश्कीलच!..आणि १००% स्वभावाचा अंदाज यायला तर काही वर्षे लागतील ते पुढचं...

हे असंच.... 😊

No comments:

Post a Comment