Thursday, 17 June 2021

नायग्रा

नायग्रा
-------
मागे माझ्या वडिलांविषयी लिहिताना मी एक किस्सा सांगितला होता, की माझ्या वडिलांनी त्यांच्या तरुणपणी सिनेमाच्या वेडापायी चक्क दिग्दर्शनाच्या ट्रेनिंगसाठी नाव दाखल केलं होतं आणि तेही कुठे तर - साक्षात चेतन आनंद आणि देव आनंद यांनी सांताक्रूझला सुरु केलेल्या "मोशन पिक्चर आर्ट्स अकॅडमी"मध्ये!! दोन वर्षांचा दिग्दर्शनाचा कोर्स होता. तिथे त्यांना कोर्सनिमित्त छोटे छोटे प्रसंग दिग्दर्शित करायला लावायचे आणि त्यांचं परीक्षण व्हायचं. दादांनी एकदा एक प्रसंग दिग्दर्शित केला आणि नेमकी त्यावेळी त्या इन्स्टिट्यूटला भेट द्यायला "जीन पीटर्स" ही हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री आली होती. तिने चक्क दादांची ती शॉर्ट फिल्म पाहून त्यांचं कौतुक केलं होतं!!! त्याचा त्यांना कोण आनंद झाला होता!!! (मात्र त्यावेळी काही परिस्थिती उद्भवून दादांनी तो दिग्दर्शनाचा कोर्स पूर्ण न करता अर्धवटच सोडला आणि ते जे शिक्षण क्षेत्राकडे वळले ते कायमचे आणि त्यांनी पुन्हा सिनेमा क्षेत्रात जाण्याचं नावही नाही काढलं!! आता वाटतं दादा तिथेच रमते तर, आम्ही फिल्मी फॅमिली झालो असतो! 😉 ... (पण त्यामुळे, परांजपे विद्यालयाला आणि एकूणच शिक्षण क्षेत्राला एक हाडाचा आणि नि:स्पृह बाण्याचा प्रिन्सिपॉल मिळाला हेही महत्वाचं!!) - तर हे आठवायचं कारण म्हणजे त्याच जीन पिटर्सच्या मेरिलिन मन्रो बरोबरच्या गाजलेल्या सिनेमाविषयी आज बोलावसं वाटतंय - "नायग्रा"!!
------------------------------------
मेरिलिन मन्रोच्या बेस्ट सिनेमांपैकी "नायग्रा" हा नक्कीच टॉप फाईव्हमधला! त्यावेळी टाटा स्कायवर भारतातला दी बेस्ट "TCM (टर्नर क्लासिक मुव्हीज)" चॅनेल होता आणि हॉलिवूडच्या सुवर्णकाळातले एकसोएक अफलातून मुव्हीज बघायला मिळायचे! (त्यावेळी वाटायचं माझ्याकडे चिक्कार पैसा असता तर नोकरीबिकरी न करता कायम TCM चॅनेलच बघत बसलो असतो! 😃 ) तर त्याकाळात TCMच्या कृपेने माझ्या डार्लिंग इन्ग्रिड बर्गमनबरोबरच एव्हा गार्डनर, ग्रेस केली, ऑड्री हेपबर्न, लिझ टेलर, कॅथरीन हेपबर्न, लेस्ली कॅरॉन, लाना टर्नर, ऑलिव्हीया डी हेविलँड वगैरेंच्या बरोबरीनेच मेरिलिन मन्रोचे मुव्हीज बघायला मिळायचे. आणि अर्थातच त्यावेळी हा "नायग्रा" बघताना मला हटकून वडिलांचा किस्सा आठवे कारण त्यात मेरिलिन मन्रो आणि जोसेफ कॉटनच्या जोडीने "जीन पीटर्स"चा महत्त्वाचा रोल आहे!!! जीन  तर छान दिसलीच आहे पण मेरिलिन?..अहाहा!! रंभा, उर्वशी, अप्सरा, रती वगैरेंविषयी वाचलेलं असतं, त्या तिच्यारख्याच असणार हे नक्की! सौन्दर्य कित्ती मादक आणि घायाळ करणारं असावं त्याचं उत्तर म्हणजे या सिनेमातली सोनेरी केसांची लालचुटुक लिपस्टिकी ओठांची हॉट हॉट मेरिलिन मन्रो!!...    

सिनेमाची टायटल्स संपताक्षणी नायग्राचा उंचावरुन घेतलेला शॉट!! कोसळणाऱ्या पाण्याच्या तुफानी धारांमध्ये लपेटलेलं इंद्रधनुष्य! खालती त्या प्रपाताच्या जवळ मातकट जमिनीवरून चालत निघालेल्या एका माणसाची ठिपक्यांसदृश्य मूर्ती. जॉर्ज लुमीस (जोसेफ कॉटन) चालत चालत "नायग्रा"च्या अगदी जवळ जाऊन उभा आणि बॅकग्राऊंडला त्याचं मनोगत  -

"... Why should the Falls drag me down here at 5 o'clock in the morning? To show me how big they are and how small I am? To remind me they can get along without any help?

All right, so they've proved it. But why not? They've had 10,000 years to get independent. What's so wonderful about that? I suppose I could, too, only it might take a little more 

time..." ... विमनस्क अवस्थेत जॉर्ज एकटाच तिथून चालत नायग्रासमोरच्याच त्यांच्या कॉटेजमध्ये येतो. आत त्याची अफाट सुंदर मादक पत्नी रोझ (मेरिलिन मन्रो) आहे. लावण्यवती, मूर्तिमंत सौन्दर्याची खाण अशी रोझ! ती सिगारेट पीत जागी आहे पण त्याची चाहूल लागल्यालागल्या सिगारेट विझवून झोपेचं सोंग करते. तोही येऊन झोपतो....त्यांची जोडी बघताक्षणी ते किती विजोड आहेत आणि  ऑल ईज नॉट वेल असं जाणवून देणारी सिनेमाची अशी ही सुरुवात.... काहीशी गूढच!.. 

नायग्रासमोरच्या त्याच कॉटेज-हॉटेलमधे आणखी एक जोडपं येतं. खूप गोड आणि आकर्षक दिसणारी पॉली कटलर (जीन पीटर्स) आणि तिचा नवरा रे कटलर (केसी ऍडम्स). त्यांनी नेमकी तीच केबिन बुक केल्ये. तिथला मॅनेजर दार ठोठावतो तेव्हा रोझ (मेरिलिन) दरवाजा उघडून आपला नवरा आजारी आहे आणि झोपलेला आहे त्यामुळे आणखी काही दिवस तिथे राहण्याची परवानगी मागते. भल्या दिलाची पॉली दुसऱ्या कॉटेजमधे जाण्याचं मान्य करते. दरम्यान रोझ त्या मॅनेजरला झोपलेल्या आणि मानसिक रुग्ण असणाऱ्या नवऱ्यावर लक्ष ठेवायला सांगून "मार्केटमध्ये जाऊन येते" सांगून जरा टकाटकच बनून बाहेर पडते...

सामान कॉलेजमधे टाकून पॉली आणि रे कटलर मोठ्या उत्साहात नायग्रा बघायला जातात. मग 'मेड ऑफ द मिस्ट'मधून ते टीपीकल कोट घालून त्यांची नायग्रच्या अगदी जवळून सफर..त्यावेळची रोमांचक दृश्य... ती सफर संपवून दोघं लगबगीने "हॉर्स-शू फॉल्स"च्या खालची "सिनिक टनेल ट्रिप" करण्यासाठी त्या बोगद्यात शिरतात. पॉली तिथले गमबूट घालून आणि पिवळ्या रेनकोटमध्ये! एका ठिकाणी वरच्या बाल्कनीतून रे कॅमेरा सरसावत खालती उभ्या पॉलीचा फोटो चांगला येण्यासाठी तिला मागे मागे जायला सांगतो. ती अगदी कडयाच्या टोकाला मागे येते आणि सहज डावीकडे बघते तर ....तर...तिथे एका आडोश्याचा फायदा घेऊन रोझ लुमीस एका तरुणाच्या आलिंगनात, चुंबनसमाधीत दंग?!!!...मार्केटमध्ये सांगून निघालेली रोझ इथे? अश्या परक्या पुरुषाच्या मिठीत तिला पाहून पॉली चपापते पण तिला चाहूल लागू न देता तिथून धावतच वरती येते आणि घाईघाईतच रे ला जवळ बोलावते. "अगं वर कशाला आलीस घाईनं? मीच खालती येणार होतो.." रे म्हणेस्तोवर पॉली त्याला घाईतच विचारते -

"Wasn't Mrs. Loomis going shopping?"
"Yeah. Why?"
"Well, she sure got herself an armful of groceries! Come on" .. रे ला कळतच नाही त्याचा अर्थ! तो बुचकळ्यात!!.... 

पुढच्या दृश्श्यात कॉटेजवर परतलेली रोझ शॉवर घेत्ये. जॉर्ज तिला "सिगारेट्स आणल्यात का?" विचारतो. ती "कोटाच्या खिशातनं घे" म्हटल्यावर तो सिगारेटचं पाकीट काढायला जातो आणि त्याला त्यातच "नायग्राच्या सिनिक टनेल"मध्ये प्रवेशासाठी काढावं लागणारं "तिकीट" मिळतं! तो क्षणभर संशय येऊन स्तब्ध. पण रोझ बाथरूम मधून बाहेर येण्याच्या आत पटकन, तो ते तिकीट आपल्या खिशात सारतो....

रात्री रोझ त्या हॉटेलच्या डान्स फ्लोअरवर अत्यंत दिलखेचक अवतारात उतरते. मेरिलिनचं खल्लास करणारं सौन्दर्य म्हणजे काय प्रकार होता ते कळण्यासाठी रसिकांनी हा सिनेमा बघाच! मेरिलिन या सीनमध्ये अफाट मादक दिसल्ये की बघतच राहावं! "किस मी..होल्ड मी टाईट" वगैरे सजेस्टिव्ह शब्द असलेल्या गाण्याची रेकॉर्ड लावायला सांगून ती त्या डार्क गुलाबी ड्रेसमध्ये लहरत शेजारच्या कॉटेजबाहेर बसलेल्या पॉली आणि रे जवळ येऊन बसते....दरम्यान, खिडकीतून ते सारं बघणारा जॉर्ज तावातावाने तिथे येतो आणि सर्वांसंमोर ती रेकॉर्ड उचलून तिचे तुकडे तुकडे करतो आणि तसाच तावातावाने कॉलेजमधे निघून जातो... पॉली आणि रे हैराण... पण रेकॉर्डचे तुकडे करताना त्याच्या हतला झालेली जखम पॉलीने पाहिल्ये.. ती चटकन उठून मर्क्युरीक्रोम घेऊन धावतच जॉर्जला बँडेज बांधायला त्याच्या कॉटेजमध्ये जाते ..तिथे जॉर्ज तिला रोझचं वागणं न आवडल्याची कबुली देतो...तिच्यासमोर बोलताना तो काहीसा भावुक होतो - डिकीतून समोर दिसणाऱ्या रात्रीच्या नायग्राचं अद्भुत रूप न्याहाळत तिला सांगतो -

"पॉली तू तरुण आहेस. नवऱ्याच्या प्रेमात आहेस. पण सांभाळ. गोष्टी कधीही हाताबाहेर जाऊ देऊ नकोस.त्या समोरच्या धबधब्यासारख्या!त्याच्यावरच्या भागातली नदी पाहिलीस? किती शांत आणि संथ वाह्त्येय! त्यात एखादा ओंडका टाक..तो  तरंगेल..पाणी जसजसं कड्याकडे जाईल तसतशी त्याची गती वाढेल.. काही खडकांवर आदळत तो पुढे पुढे जाईल आणि मग? जगातली कुठलीही ताकद त्याला अडवू शकणार नाही आणि तो त्या जोरदार प्रवाहात सापडून खालती झेप घेईल..."

त्याच्या त्या बोलण्यावर गोड हसत पॉली त्याला सांगते, "माझी काळजी करून नकोस..मी त्या वरच्या संथ पाण्यातच शांतपणे तरंगणारा ओंडका आहे...." 

हा सीन खूप छान आहे दोघांचा... 

सिनेमा जसजसा पुढे सरकतो तसतसं कळतं की जॉर्ज आणि रोझचं बिनसलंय आणि रोझ दुसऱ्या कुणालातरी चोरून भेटत्येय. ती आपल्या प्रियकराबरोबर जॉर्जला ठार मारण्याचा कट रचते आणि जॉर्जने आत्महत्या केली असं दाखवण्यासाठी तो मनोरुग्ण असल्याचं जगाला सांगत राहते. ठरल्याप्रमाणे कटाची सिद्धता होते पण झटापटीत जॉर्जऐवजी रोझचा प्रियकरच मारला जातो. जॉर्जही आपण स्वतः धबधब्याकडे नाहीसा झाल्याचं भासवून, रोझला ठार मारायचं ठरवून  परततो. तिकडे पोलिसांना धबधब्याच्या बाजूला मिळालेला मृतदेह ओळखायला गेलेली रोझ तो आपल्या प्रियकराचा आहे पाहून आणि जॉर्ज जिवंत आहे हे उमगून तिथेच मूर्च्छित होते... 

जॉर्ज रोझला मारण्यासाठी कॉटेजच्या मागच्या किचनकडच्या दरवाजाने आत येतो आणि सूरी उचलून बेडरूम मध्ये शिरतो. जागा बदलून नवऱ्यासह तिथे शिफ्ट झाल्याने पॉली तिथे असते. सूरी घेऊन आलेल्या जॉर्जला जिवंत पाहून ती किंचाळते. जॉर्ज सटकतो. लोकं जमा होतात. रे सुद्धा तिथे पोहोचतो आणि पॉलीला भास झालाय असंच त्याचं मत होतं. दुसऱ्या दिवशी पॉली जॉर्ज जिवंत असल्याचं पोलिसांना कळवते. जॉर्ज सावध होतो. 

मित्रमंडळींबरोबर रे आणि पॉली "नायग्राच्या" रौरवामागे लपलेली "Cave of the Winds" बघायला जातात त्या ठिकाणी जॉर्ज पाॕलीला गाठतो आणि आपल्यावर हल्ला होताना बचावासाठी केलेल्या झटापटीत रोझच्या प्रियकराचा मृत्यू झाल्याचं सांगतो. आणि  विनंती करतो," At least I can go somewhere, find a job, get organized, if you'll help me. You're the only one who knows I'm alive. Let me stay dead." आणि  तिथून निघतो. या संपूर्ण सीनमध्ये धुक्याचा प्रचंड पडदा...नायग्राच्या प्रचंड वेगाने कोसळणाऱ्या प्रपातामुळे उडणारे तुषार.. घोंगावणारं वारं, ओला झालेला गुहेकडे जाणारा १८८५ सालापासून अस्तित्वात असलेला लाकडी ब्रिज.. अक्षरशः झोकांड्या खाव्या  लागतील असा वाऱ्याच्या जोर ..याचं केवळ अप्रतिम आणि अद्भुत चित्रीकरण आहे.. 

जॉर्जच्या भयाने तिथून पळण्याच्या बेतात असलेल्या रोझला जॉर्ज गाठतो आणि चित्तथरारक पाठलागानंतर एक क्लॉक टॉवरमध्ये गळा दाबून ठार मारतो आणि तिथून सटकतो. 

कॅनडातून सटकण्यासाठी तो एक मोटरबोट पळवतो. पण त्यात नेमकी रे बरोबर पिकनिकला आलेली पॉली असते. मोटरबोट चोरून कुणी पळतोय पाहून तिथला कर्मचारी पोलिसांना कळवतो आणि सुरु होतो एकी श्वास रोखून धरायला लावणारा थरार.... 

फेसाळ नदी पुढे जाऊन अतिभव्य नायग्रा धबधब्याच्या रौद्र रूपात कोसळत्ये... पोलिसांची बोट पाठलागावर असल्याने वैतागलेला जॉर्ज ... त्या बोटीत त्याच्याबरोबर अडकली गेलेली असहाय्य पॉली... आणि क्षणक्षणाला पुढे काय होणार याची आपल्याला उत्सुकता वाटायला लावणारं उत्कठावर्धक चित्रीकरण... 

शेवट काय  होतो? जॉर्ज आणि पॉलीचं काय होतं?... हे बघण्यासाठी "नायग्रा" जरूर जरूर बघाच!! 😍

No comments:

Post a Comment