पॕटन
-----
आर्मी जनरल कसा असावा? सैनिकांमधे स्फुल्लींग चेतवणारा, दिलेर, रांगडा आणि निडर योद्धा!! दुसर-या महायुद्धाच्या काळात अमेरिकेला अगदी असाच एक कणखर जनरल लाभला ज्याने युद्धकाळात आपली अमीट छाप सोडली त्याची कहाणी!
----------
तो होताच मुळी झंझावाती व्यक्तिमत्त्वाचा!! इतिहासानंच जणू या खंबीर फौजीला योग्य वेळी योग्य ठिकाणी धाडायची बुद्धी अमेरिकेला दिली होती!
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी प्रामुख्याने उत्तर आफ्रिका, इटली, फ्रान्स आणि जर्मनीमध्ये आपल्या नेतृत्वाने नाझी सैन्याचा पाडाव करणारा "जॉर्ज पॅटन" हा अमेरिकेचा निधड्या छातीचा आर्मी जनरल! त्याची ही सत्यकथा रूपेरी पडद्यावर पेश करण्यासाठी तितक्याच तोलामोलाचा रांगडा अभिनेता हवा होता. रॉड स्टिगर, ली मर्विन आणि बर्ट लँकॅस्टरने नाकारलेल्या या भूमिकेसाठी जॉन वेन, रोनाल्ड रेगन, रॉबर्ट मिचम यांसारखे अभिनेतेही चर्चेत होते; पण शेवटी या ऐतिहासिक भूमिकेची माळ जॉर्ज सी. स्कॉटच्या गळ्यात पडली! त्याने जबरदस्त जोशात ही भूमिका नुसती पेललीच नाही, तर तो ती अक्षरशः जगला आणि हॉलीवूडच्या इतिहासात त्याची ही भूमिका अजरामर झाली.
अर्थातच या अस्सल, खणखणीत अभिनयासाठी जॉर्ज सी. स्कॉटला अभिनयाचं ऑस्कर निर्विवादपणे मिळालं आणि या सिनेमाला एकूण सात ऑस्कर मिळाले. ही फिल्म दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रत्यक्ष घडलेल्या घटनांवर आधारित आहे, ‘बायोपिक’ म्हणतात तशी!
मित्रराष्ट्रांतर्फे आफ्रिकेमधल्या युद्धासाठी इंग्लंडतर्फे सर्वोच्च अधिकारी बर्नार्ड माँटगोमेरी आणि त्याच्या बरोबरीने अमेरिकेतर्फे जॉर्ज पॅटन हा मिलिटरी जनरल पाठवला गेला होता. त्या युद्धाच्या वेळी पॅटन कसा वागला...कसा बोलला,..कसा चालला...कसा जगला...त्यानं आपल्या काहीशा मस्तवाल गुर्मीत, पण धडाडीनं विजय कसे मिळवून दिले...त्याला क्वचित डावललं कसं गेलं....या सर्वांतून त्यानं सैन्यांचं नेतृत्व कशा कणखरतेने आणि निर्भीडतेनं केलं, ते या सिनेमात बारकाईनं चित्रित केलं गेलंय. अभिनयाचा मूर्तिमंत वस्तुपाठ म्हणावा असाच हा जॉर्ज सी. स्कॉटने साकारलेला 'जनरल पॅटन!'
या फिल्मची सुरुवात मोठी विलक्षण! पूर्ण ७० एमएमचा भव्य पडदा व्यापणारा "स्टार्स अँड स्ट्राइप्स" हा अमेरिकेचा राष्ट्रध्वज आणि त्या विशाल झेंड्याच्या पार्श्वभूमीवर जनरल पॅटनची मूर्ती! संपूर्ण लष्करी गणवेशातला रुबाबदार जनरल सॅल्युटच्या पोजमध्ये ताठ उभा! डाव्या हातात त्याची ती वेताची स्टिक! छातीवर किमान १४-१५ शौर्यपदकं. कॅमेरा त्याच्या सर्वांगावरून फिरत त्याच्या हस्तिदंती मुठीच्या रिव्हॉल्व्हरवर क्षणभर स्थिरावतो. आणि पुन्हा पॅटनच्या हिरव्यागार भेदक डोळ्यांवर! ट्रम्पेटचा आवाज थांबतो. पॅटन सैन्याला उद्देशून भाषण द्यायला सुरुवात करतो तीच मुळी अशा खणखणीत वाक्यांनी - "Now I want you to remember that no bastard ever won a war by dying for his country. He won it by making the other poor dumb bastard die for his country.." सैन्याकडून असणाऱ्या देशवासीयांच्या अपेक्षा आणि नाझी सैन्याचा पराभव करण्यासाठी सैनिकांमध्ये स्फूर्ती आणि चेतना निर्माण करणारं ते बेधडक आणि घणाघाती भाषण बघण्यालायक! त्याचा फौजी जोश "All Americans love to fight. All Real Americans love to stay in the battle..." अशा वाक्यांतून अधिकच ठळकपणे समोर येतो!!!
युद्धभूमीवरचा सीन! दुसऱ्या महायुद्धाचा १९४३चा काळ. ट्युनिशियाच्या कॅसरीनच्या खिंडीत अमेरिकन सैन्यानं जर्मनीकडून मार खाल्लाय आणि त्यांच्यात जान ओतण्यासाठी जनरल पॅटनची स्वारी तिथे पोहोचली आहे. (पुढचं दृश्य चक्क या टेन्स वॉरफिल्ममध्ये आपल्या चेहऱ्यावर क्षणिक का होईना स्मित फुलवणारं!).
रॉयल एअरफोर्सबरोबरच्या मीटिंगमध्ये पॅटन तक्रार करतो, की आर्मीला एअरफोर्सचं पुरेसं कव्हर न मिळाल्यानंच आधीच्या पराभवाला सामोरं जावं लागलंय असं कळलंय! त्यावर ब्रिटिश एअरमार्शल कॉनिंगम प्रौढी मिरवतो, "I sincerely apologize that remark, whosever made it. (इथे पॅटनची रिअॅक्शन बघण्यासारखी), and I promise you one thing General, You will see no more German planes!!" आणि त्याचं वाक्य पुरं होतं न होतं तोच - जर्मन प्लेन्सचा त्यांच्या छावणीवर तुफान बॉम्बवर्षाव सुरू होतो! ;-) त्या फायटर प्लेन्सच्या तुफानी बॉम्बवर्षावाच्या आणि गोळीबाराच्या तडाख्यातून वाचण्यासाठी दोन्ही ब्रिटिश अधिकाऱ्यांना आणि पॅटनला टेबलखाली सूर मारून स्वतःचा बचाव करावा लागतो. त्या उद्ध्वस्त खोलीतल्या टेबलखाली जमिनीवर लोळण घेतलेल्या अवस्थेत पॅटन मग त्या एअरमार्शलला हिणवण्याची संधी कसली सोडतोय? तो त्या मार्शलला ऐकवतो, "हां, तर तू एअर सुप्रीमविषयी काहीतरी सांगत होतास? ;-) .." .... पुढची काही मिनिटं ती जर्मन फायटर्स वारंवार त्यांच्या छावणीवर फेऱ्या मारत, प्रचंड बॉम्बफेक करत सगळं उद्ध्वस्त करत असताना, चिडलेला पॅटन त्या बिल्डिंगच्या खिडकीतून बाहेर उभ्या असलेल्या ट्रकवर उडी मारून खाली रस्त्यावर येतो. जमिनीवर पाय रोवून उभा राहत, समोरून अंगावर येणाऱ्या त्या विमानांवर शेलक्या शिव्या घालत जागचा न हलता, कमरेचं पिस्तुल काढून गोळ्या घालत सुटतो, ते दृश्य मनात घर करतं!!!
पुढच्याच ‘अल कतर’च्या लढाईत तो नाझी सैन्याला धूळ चारतो; पण त्या विजयात त्याला खंत राहते, त्या वेळी समोर नाझींचा "डेझर्ट फॉक्स (रोमेल)" स्वतः लढाईत नसतो त्याची! त्या विजयानंतर एकदा आपल्या सहकारी जनरल ब्रॅडलीशी पॅटन बोलत असताना आपल्याला कळतं, की त्याची कुठे तरी पुनर्जन्मावर श्रद्धा आहे आणि तो स्वतः कुठल्या तरी गेल्या जन्मात याच आफ्रिकेच्या भूमीत रोमन आणि कार्थेजिअन्सच्या लढाईत लढल्याची त्याची ठाम समजूत आहे. पुढे उत्तर आफ्रिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवल्यावर पॅटन आपला मोहरा वळवतो इटलीच्या सिसिलीकडे!!
पण तिथे गेल्यावर त्याला कळतं, की त्या मोहिमेचा प्रमुख सूत्रधार तो नसून ब्रिटिश फिल्ड मार्शल मॉन्टगोमेरी असणार आहे आणि त्याच्या हातात फक्त त्या सैन्याला सपोर्ट करण्याची कामगिरी देण्यात आली आहे. हाडाच्या लढवय्या पॅटनला तसली दुय्यम भूमिका सहनच होत नाही. ती संथ गतीनं चाललेली चढाई त्याच्या उसळत्या रक्ताला सहनच होत नाही आणि तो त्याला मिळालेले आदेश झुगारून आपल्या सैन्याला वायव्येकडून घुसण्याचे आदेश देतो आणि पालेर्मो शहरावर ताबा मिळवून तिथून मसिनाकडे चाल करतो. तो त्यादरम्यान प्रचंड आक्रस्ताळा झालाय आणि काहीसा उद्विग्नदेखील! दरम्यान, तो एका मिलिटरी हॉस्पिटलच्या तंबूमध्ये जखमी जवानांना भेट द्यायला गेलेला असताना आपल्याला त्याची दोन रूपं दिसतात. पूर्ण जखमी होऊन बँडेज बांधलेल्या जवानाच्या कॉटजवळ बसला असताना तो दोन क्षण विवश होतो. स्वतःला सावरून तो उठतो आणि दोन पावलांवर त्याला एक धडधाकट जवान चक्क हुंदके देताना दिसतो. तो त्याच्याजवळ जातो. त्याची विचारपूस करायला.
त्याला विचारतो,
"What’s the matter with you?"
तो जवान उत्तरतो,
" I...I guess I just can’t take it Sir!"....
हे ऐकल्यावर तो चमकून त्या जवानाच्या आणखी जवळ जातो. त्याला पुन्हा विचारतो,
"What did you say?"
तो जवान हुंदके सावरत म्हणतो,
"It’s my nerves Sir....I..I just can’t stand the shelling anymore..."
झालं!! पॅटनच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात.
"Your nerves?...eh?...My hell...you are just goddaam coward!...."
आणि मग पॅटनचा संयम सुटतो! आजूबाजूच्या कॉटवर बाकीचे शूर जवान जखमी होऊन पडलेले असताना यानं असं रडलेलं त्याला सहन होण्यापलिकडचंच! आणि तो पुढच्याच क्षणी हातातल्या ग्लोव्हजनी त्या रडणाऱ्या जवानाच्या डोक्यावर थाडथाड मारतो त्याला शिव्या घालत...त्याची निर्भर्त्सना करत!..... पॅटनचा तो आवेशही आपल्या मनात घर करतो!....
या वागण्याबद्दल पॅटनवर चहूबाजूंनी टीका होते. त्याच्या अशा वागण्यामुळे आणि प्रेससमोर बिनधास्त व्यक्त होण्यापायी त्याला मुख्य लढाईतून थोडं बाजूला हटवण्यात येतं. पुढे त्याचाच सहकारी आता त्याचा वरिष्ठ म्हणून समोर आल्यावर तो त्याला विनंती करतो कसंही करून युद्धात सहभागी करण्याविषयी आणि त्याला फ्रान्सच्या चढाईवर पाठवण्यात येतं. अर्थातच शौर्य गाजवून तो ती चढाई तो यशस्वी तर करतोच, पण पुढे जाऊन सरळ जर्मनीवर चाल करतो.
जर्मनी शरण आल्यावर एका पार्टीत रशियन जनरलबरोबर असताना दुभाष्या त्याला विनंती करतो, की त्यानं जर्मनीची शरणागती रशियन जनरलबरोबर ड्रिंक घेऊन साजरी करावी, तर पॅटन आपल्या गुर्मीत ती विनंती धुडकावून लावतो आणि तीही गोड हसत आणि अशा शब्दांत, "My compliments to the General. But inform him that I don’t care to drink with him or any other Russian son-of-a-bitch!"... ते शब्द ऐकून दुभाष्या हादरतो... "सर, हे मी कसं सांगणार त्यांना?"...त्यावर पॅटन, ते सर्व न कळल्यामुळे हसणाऱ्या रशियन जनरलकडे पुन्हा गोड हसून बघत, त्या दुभाष्याला सांगतो, "You tell him that word for word!" त्यानं ते भाषांतर करून सांगितल्यावर अवाक झालेला रशियन जनरल त्याच भाषेत पॅटनला प्रत्युत्तर देतो. त्यानंही आपल्याला "son-of-a-bitch" म्हणून प्रत्युत्तर दिलंय हे पाहून पॅटन त्याच ताठ्यात मान वर करून जोरात हसतो आणि 'आपण दोघंही एकाच माळेचे मणी' अशी भावना व्यक्त करत खूश होऊन रशियन जनरलबरोबर 'टोस्ट' करतो. हा सीनही बघण्यासारखा!...
फिल्मच्या शेवटच्या दृश्यात एका बर्फाच्छादित डोंगरासमोरचं मोकळं पठार....भग्न इमारतीमधल्या वाटेवरून दूरवरच्या एका पवनचक्कीच्या दिशेने जाणारा ओव्हरकोट घातलेला पॅटन आपल्याला दिसतो. बरोबर त्याचा कुत्रा आहे. आणि पार्श्वभूमीवर सूत्रधाराचा धीरगंभीर आवाज .... "हजारो वर्षांपूर्वी युद्ध जिंकून घरी परतणाऱ्या जगज्जेत्या रोमन सेनापतींना त्याच्या विजयाबद्दल मानाची सलामी मिळे...जयघोषात त्यांचं स्वागत होई...विजयी भव्य मिरवणूक निघे...वाद्ये वाजत असत...त्यांनी जिंकून आणलेला खजिना त्यांच्याबरोबर असे....तो विजयी सेनानी एका भव्य रथात असे...त्याच्यामागे जिंकून आणलेले गुलाम साखळदंडात ओढू नेले जात...आणि त्या जगज्जेत्याच्या कानात कुणीतरी हळूच पुटपुटत असे, "लक्षात असू दे.....हे सगळं ऐश्वर्य क्षणभंगुर आहे...." !!!.."आणि कॅमेरा ताठ चालणाऱ्या पॅटनच्या चेहऱ्यावर... पॅटन चालतोय त्या विस्तीर्ण पठारावर... समोरच्या बर्फाच्छादित डोंगराच्या दिशेने... आणि त्याच्या उजव्या बाजूला असणाऱ्या त्या महाकाय पवनचक्कीची अजस्र पाती वाऱ्यावर हळुवार फिरत त्याला जणू मानवंदना देतायत... सिनेमा संपतो!
एकाहून एक अशा विलक्षण दृश्यांनी युद्धभूमीवरच्या खंबीर आणि दिलेर जनरल पॅटनची "लार्जर दॅन लाइफ" प्रतिमा आपल्यासमोर उभी राहते. स्वतःला कुठल्या तरी गेल्या जन्मात कधी रोमन योद्धा, तर कधी ग्रीक योद्ध समजणारा... तर कधी नेपोलियनबरोबर त्याच्या रशियातल्या माघारीच्या वेळी त्याच्याबरोबर परतणारा सैनिक समजणारा पॅटन!
फ्रँकलीन शॅफनरने दिग्दर्शित केलेली आणि जेरी गोल्डस्मिथच्या जबरदस्त पार्श्वसंगीतानं युद्धप्रसंग अंगावर आणणारी ही फिल्म केवळ आणि केवळ जॉर्ज सी. स्कॉटने साकारलेल्या त्या निधड्या, रांगड्या जनरल पॅटनसाठी बघावीच अशी!!
No comments:
Post a Comment