------------------
धर्मेंद्रचे स्वतःचे चिक्कार फॅन्स असले तरी गंमत म्हणजे इतर कुठल्याही स्टारच्या फॅन्सनासुद्धा तो आवडतोच!
गेल्या काही वर्षांत सलमान, आमिर, हृतिक, अक्षय आणि जॉनसारख्यांनी काही फिल्म्समधून बेअरबॉडी शॉट्स दिले असले तरी ५२ वर्षांपूर्वीच्या (१९६६सालच्या) 'फूल और पत्थर'च्या पोस्टरमधल्या धर्मेंद्रच्या उघड्या शरीराची जेवढी चर्चा झाली त्याची सर, या पिढीच्या मंडळींना नाहीच! तो इंडस्ट्रीचा खऱ्या अर्थाने पहिला 'ही-मॅन' होता आणि राहील!!
वाट्टेल तश्या माऱ्यामाऱ्या आणि साहसं त्याला शोभून दिसायची! मुळात 5600 वर्षांपूर्वी भीमाने दुःशासनाला उद्देश्यून फेमस केलेला काॕपीराईट डायलाॕग -"कुत्ते, कमीने मै तेरा खून पी जाऊँगा!" त्याच्यानंतर केवळ धरमच्याच तोंडी शोभायचा! ;-)
७०च्या दशकातल्या त्याने केलेल्या वाघ आणि सिंहाबरोबरच्या फाइट्स आणि जग्गा शेट्टीबरोबरच्या फाईट्स!! हा माणूस तसल्या फाइट्स खरोखर करूच शकेल असाच कुणालाही विश्वास असायचा!
१९५८ ते २०१८ अशी तब्ब्ल साठ वर्ष हा माणूस फिल्म इंडस्ट्रीत आहे हे खरंच वाटणार नाही! शशी कपूर, मनोजकुमार, जॉय मुखर्जी, विश्वजीत, सुनील दत्त यांचा तो समकालीन पण त्या सर्वांपेक्षा त्याचं फॅन फॉलोईंग जबरदस्त होतं. ऍक्शनपट तर त्यालाच शोभायचे, पण त्याने काही सिरीयस आणि विशेषतः विनोदी भूमिकांमधून आपला चाहता वर्ग तयार केला आणि A ग्रेड स्टार झाला!अर्थात त्याला त्यावेळी मिळून गेलेल्या रफीसाबच्या गाण्यांनी हातभार लावला होताच!
शशी कपूर, मनोजकुमारबरोबर तोसुद्धा निर्मात्यांच्या दारात पोर्टफोलिओ घेऊन बसलेला असे. एकदा गंमत झाली. एकदा 'पिकनिक'सिनेमासाठी ऑडिशन सुरु होती. नेहेमीप्रमाणे हे तिघे तिथे भेटले. एव्हाना धर्मेंद्रची शशी शी दोस्ती झाली होती. तो हळूच शशीच्या कानात पुटपुटला,'हा रोल मला मिळाला नाही तर निदान तुला मिळायला हवा, पण त्या मनोजकुमारला मिळायला नको'!! पण गंमत म्हणजे तो रोल या दोघांना ना मिळता मनोजलाच मिळाला होता. (पुढे खूप वर्षांनी धर्मेंद्र आणि शशी एकत्र आले ते 'क्रोधी" फिल्ममध्ये)...शशी आणि धर्मेंद्रच्या बाबतीतला आणखीन एक किस्सा - बिमल रॉय यांनी १९६२-६३ ला एकाचवेळी बंदिनी आणि प्रेमपत्र च्या स्क्रिप्टवर काम सुरु केलं होतं आणि त्यांच्या डोळ्यांसमोर धर्मेंद्र आणि शशी कपूर दोघंही होते. नेमकं आधी प्रेमपत्र सिनेमावर काम सुरु होऊन तो शशीला मिळाला आणि पाठोपाठचा बंदिनी धर्मेंद्रच्या पारड्यात पडला. (मला राहून राहून कधी कधी वाटतं की ते उलटं घडतं आणि नूतन शशीबरोबर असती तर?..(तशीच अजून एक हळहळ म्हणजे जोरात मुहूर्त आणि काही शाॕट्स होऊन बंद पडलेली "एक दो तीन चार" ही विजय आनंदची महत्त्वाकांक्षी फिल्म. यात धर्मेंद्रबरोबर देव आनंद, शशी कपूर, ऋषी कपूर, हेमामालीनी, राखी, परवीन आणि टीना मुनीम आशी तगडी स्टारकास्ट होती)...असो!
तर, नवख्या धर्मेंद्रचे पुढल्या काळातले सिनेमे खूपच चालले -- कधी बेमिसाल गाण्यांमुळे कधी हिरॉइन्सच्या तगड्या अदाकारीमुळे..हळूहळू त्याच्याही ऍक्टिंगमध्ये प्रगती होत गेली आणि पुढचा इतिहास आपल्या सर्वांना ठाऊकच आहे! आयी मिलन की बेला, काजल, आकाशदीप, देवर, अनुपमा, सत्यकाम ...ते थेट सीता और गीता, जीवनमृत्यू..... ते पुढे एव्हरग्रीन शोले आणि चुपके चुपके!!!!आणि मग इतरही कित्येक मल्टीस्टारर्स....
मेरे हमदम मेरे दोस्त, आय सावन झुमके, आये दिन बहार के, दिल ने फार याद किया, बहारे फिर भी आयेगी - सारख्या त्याच्या फिल्म्समधून रफीसाहेबानी त्याच्यासाठी एकसोएक गाणी गायली आणि त्यांची जोडी जमली! ....
धर्मेंद्रच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या अनेक गाण्यांमधून माझ्या मते त्याला लाभलेलं हे 'धी बेस्ट' गाणं -
https://youtu.be/IHPxU4TgnvE
No comments:
Post a Comment