युथनेझिया....!!
नुकत्याच गाजत असलेल्या काही मरणांविषयी ऐकून, वाचून या विषयावर विचार नाहीच करायचा ठरवूनही परत परत अशी काही माणसं येतात समोर की पुन्हा एकदा "इच्छामरण" कायदेशीर हवं हे बोबलून सांगावंसं वाटतं!! माझी ही जुनी पोस्ट नवीन मित्रमैत्रिणींसाठी!!
----------------
९ मार्च २०१८ला भारतात काही "अतिविशिष्ट" स्थितीत असणाऱ्या आजारी माणसांसाठी सुप्रीम कोर्टानं "इच्छामरणाला" मान्यता दिल्येय! पण मला मात्र वैयक्तिकरित्या असं वाटतं की सुप्रीम कोर्टानं ते "अतिविशिष्टतेचं" कलम काढून टाकून पूर्णपणे ज्या त्या व्यक्तीच्या 'सहजेच्छे'वर तो निर्णय सोडावा! एक इंजेक्शन...की बस्स!..इथनं मुक्ति!!...
याचं कारण अलीकडे काही जर्जर, वृद्ध माणसांची अत्यंत दारुण आणि करुण शारीरिक स्थिती पाहिल्यावर मी विचार केला माझ्याचबाबतीत...मी म्हातारा होईपर्यंत जगलोच समजा, तरी मला स्वतःला माझी तितकी आणि तशी जर्जर आणि मुख्य म्हणजे परावलंबी अवस्था झालेली सहनच होणार नाही!! आणि मग - "धड ऐकू येत नाही, दिसत नाही, धड चालत येत नाही, तोल जातो, पाठ कंबरेत काटकोनात वाकून जमिनीला समांतर झालेली" असलं परावरलंबी म्हातारपण नकोच वाटेल!...काही वृद्धांना हॉस्पिटलमध्ये नळ्या घालून त्यातून लिक्विड देत असतात..आणि नाकाला ते सहन होत नसल्याने त्या बिचाऱ्यांची चिडचिड होऊन ते नाकातली नळी काढायचा प्रयत्न करत आसतात..आणि म्हणून चक्क त्यांचे दोन्ही हात बेडला बांधून ठेवलेले असतात.. त्यांनी तसंच बेडला जखडून पडून राहायचं असतं दिवसरात्र...तसंच झोपायचं ..झोपताना हात बांधलेले..जाग आल्यावरही हात बांधलेलेच! .काय मनःस्थिती असेल त्यांची? अश्यांना तरी 'इच्छामरण' हवंच नाया देशात?...अशी स्थिती आपल्यावर नको...नको!..नकोच नको!!
खरं तर तसा मी मरणाला ज्याम घाबरणारा, टरकूच माणूस! म्हणजे भले एकीकडे मला चार्ल्स फ्रॉह्मनचं प्रसिद्ध वाक्यं वाचून पाठबिठ असलेलं - "व्हाय फिअर डेथ? इट्स द मोस्ट ब्युटीफुल अॕडव्हेंचर इन लाईफ!" वगैरे... (हा चार्ल्स फ्रॉह्मन म्हणजे १८९६ ते १९१५ मधल्या २० वर्षांतला अमेरिकेतला अवलिया नाट्यनिर्माता! आपल्या नाटकाची टीम घेऊन तो अनेकदा अमेरिकेहून युरोपच्या वाऱ्या करायचा! ७ मे १९१५च्या दुपारी आरएमएस ल्युसिटानिया या अजस्र जहाजाने तो आपली नाटकाची टीम घेऊन इंग्लंडला निघाला होता. दुपारी डेकवर तो उभा असताना जर्मनांच्या यु-बोटीने ल्युसिटानियावर डागलेले टॉर्पेडो बोटीवर आदळले. एकच हहा:कार उडाला!.... जो तो जमेल तसं प्राण वाचवण्याची धडपड करत गेला पण फारच कमी लोक वाचू शकले. चार्ल्स फ्रॉह्मनने मोठ्या धैर्यानं मृत्यूला कवटाळलं. बोटीबरोबर जलसमाधी घेताना त्याचे शेवटचे उद्गार होते -"व्हाय फिअर डेथ? इट्स द मोस्ट ब्युटीफुल अॕडव्हेंचर इन लाईफ!".. मी तर ते वाचूनच थरारलो होतो! - म्हणे-"मृत्यूला का घाबरा? ते तर आयुष्यातलं सर्वात सुंदर साहस आहे!" ..सुंदर साहस?... सलामच असं म्हणणाऱ्या त्या चार्ल्स फ्रॉह्मनला!). .असो!!...
पण- जगात फार कमी माणसं असतील फ्रॉह्मनइतकी शूर आणि निडर!! बाकी मेजॉरिटी जनता फाटूच असते! मीही त्यांतलाच!...मी छानपैकी घाबरत असतो बाबा मरणाला! ते अटळ आहे आणि कधी ना कधी, कुठल्याही बेसावध क्षणी ते येणारच हे माहित असूनही?!! विचार केला तर - का घाबरतोय मी मृत्यूला एवढा? खूप जगायचं राहिलंय... खूप स्वप्नं पुरी करायची राहिलीत...आवडत्या, लाडक्या व्यक्तींबरोबर खुपसारे क्षण एन्जॉय करायचेत...मुलींबरोबर खूप काही जगायचं राहिलंय म्हणून?..खूप पुस्तकं वाचायच्येत...खूप गाणी ऐकायच्येत...खूप सिनेमे पाहायचेत..खूप नाटकं पाहायच्येत....खूप हिंडायचंय... मित्रमैत्रिणींबरोबर धमाल करायच्येय...म्हणून? ..पण ते सगळं करायला आणि तेही मनसोक्त/ मनःपूत एन्जॉय करायला तसाही हा एक जन्म कुठचा पुरा पडायला?...नुसती जगभरच्या पुस्तकांची / सिनेमांची संख्या पाहिली तर किती जन्म लागतील याची कल्पनाही करू शकत नाही...मग आहे त्यात, मिळतंय त्यातच समाधान मानून येईल तेव्हा मृत्यूला मिठी मारायची हे तर नक्की!!..पण ती 'स्वेच्छेनं'!!
म्हातारपणाला कंटाळलेली, कावलेली, वैतागलेली अशीही माणसं बघतो आसपास की जगात इतकं सगळं भरभरून जगण्यासारखं असताना त्यांचा मात्र बिचाऱ्यांचा जगण्यातला रसच संपलाय आणि ते केवळ "मृत्यूचा बुलावा आया नही" म्हणून जगतायत केवळ! अशी म्हातारी माणसं...ज्यांना वृद्धत्त्वामुळे वाचन शक्य नाहीय...टीव्ही बघावा म्हटलं तर त्यावरच्या सगळ्याच सिरियल्स कपट, कारस्थानं, सूड, लफडी, खुनाखुनी, मत्सर, द्वेष अशाच विकृत भावना घेऊन जगणाऱ्या कुटुंबांनी भरलेल्या...त्यांची नातवंडंपतवंडं कायम बाहेर किंवा आपापल्या मोबाईलमध्ये गर्क...त्यांना आपल्या घरातल्या अशा जर्जर आज्जीआजोबांकडे बघायला वेळच नाही..बरं वेळ काढावा म्हटलं तर विषयच जुळत नाहीत बोलण्यासारखे...काहीजण तर परदेशात वाढतायत आणि इथे भारतातल्या आज्जी आजोबाशी सुतराम कॉन्टॅक्टच नसल्याने ते कसे जगतायत याची त्यांना घंटा काही पडलेली नाही.. आणि मग अशा दयनीय अवस्थेत ती म्हातारी मंडळी कशीबशी दिवस ढकलतायत मृत्यूची वाट बघत...मला ही भीषण दयनीय स्थिती नको (चुकून माकून तितका जगलोच तर!) - म्हणून "इच्छामरणाचे" रुल्स जरा सोप्पे करून हवेत असं वाटतं!! (ऐकताय मोदीजी आणि सुप्रीम कोर्ट?)
पण हां, सध्या तरी ते वय गाठायला अवकाश आहे!...आणि तोपर्यंत जितकं शक्य आहे तितकं आवडीचं सगळं जागून घ्यायचंय!! मग एकीकडे फ्रॉह्मनचं मृत्यूविषयी "इट्स द मोस्ट ब्युटीफुल अॕडव्हेंचर इन लाईफ" हे वाक्य डोक्यात घोंगावत असतानाच राम गणेश गडकऱ्यांचं (तेच महान आणि थोर साहित्यिक ज्यांचा पुतळा फोडतात पुरोगामी पुण्यात!!) अत्यंत अर्थगर्भ वाक्य डोळ्यांसमोर येतं -"जोपर्यंत जगण्यासारखं जवळ काहीतरी आहे तोपर्यंतच मरण्यात खरी मौज आहे!" ..बापरे! राम गणेशांच्या या वाक्यात किती तो महान खोल अर्थ दडलाय?!!! जगण्यासारखं जवळ आहे तरच जगणं सुसह्य आणि मजेत हे तर खरंच की!!...जगण्यासारखं काही उरलं नाही तर मग "वोह जीना भी क्या जीना है लल्लू?" असंच तर सुचवत नसतील राम गणेश? म्हणजे तोंडाचं बोळकं झालंय, डोळे अधू झालेत, कानांना धड ऐकू येत नाही, जिभेला खास चव उरली नाही, डायबेटीसमुळे चांगलंचुंगलं चापता येत नाही - मग ना अन्नाची मजा, ना वाचण्याची, ना ऐकण्याची ...खरंच मग अशावेळी "इच्छामरण"च काय वाईट?...ज्यांना "प्रायोपवेशन" शक्य ते ग्रेट लोक तसं करतही असतील..बाकीच्यांचं काय? केवळ मृत्यूची वाट बघत जगायचं?..पण राम गणेशाच्या ह्याच वाक्यातले पहिले पाच शब्द पुन्हा नीट पाहिले तर "जोपर्यंत जगण्यासारखं जवळ काहीतरी आहे..."मग का सुचवतायत ते मरण्यातली मजा? मग तर उलट घ्या ना जगून असंही वतीनं जातंच की... हे वाक्य वरकरणी समजायला कठीण - खूपच काही सांगून जाणारं हे मात्र नक्की!!...
तर तूर्तास तरी मिळतायत त्या सर्व गोष्टीं "पुरेपूर उपभोगाव्यात" असंच मत बनलंय! अगदीच आला कंटाळा तर बघू भारतात तोपर्यंत इच्छामरणाचा कायदा होतो का ते! तसंही निसर्गात "अनेक प्राणी/ पक्षी मरणाला आपणहून कसे कवटाळतायत" ते गूढ' अजून उकललेलच नाही ..ते उकललं तर त्यांचा मार्ग चोखाळता येईलच म्हणा!!!
तोपर्यंत हे कोरोनासारख्या रोगराईची भिती अज्जिब्बातच्च न बाळगता, मजेत जगण्यासाठी रॉन व्हाईट या अमेरिकन कॉमेडियनचं फेमस वाक्य डोळ्यांसमोर ठेवून जगायला हरकत नसावी -" I believe that if Life gives you lemons, you should make Lemonade... And try to find somebody whose life has given them Vodka, and have a party!!"....नै? 😜😍
No comments:
Post a Comment