बाँम्बे टाॕकी
--------
आमचे नाटकातले गुरु वसंत सोमण नेहेमी म्हणत,"सौन्दर्याला अभिनयाचा शाप असतो!" ..म्हणजे अति देखण्या चेहेऱ्यांना फार ग्रेट अभिनय जमतो असं नाही आणि बाप अभिनय करणारे सुंदर असत नाहीत -- अर्थात त्यांच्या या विधानाला अपवाद होतेच!...... आणि फार कशाला माझा लाडका शशीच अशा अपवादांपैकी एक होता! शशीला त्याच्या कॅलिबरच्या भूमिका अभावानेच मिळाल्या पण कितीही सॉल्लिड सिनेमा असो वा कित्तीही टुक्कार सिनेमा असो, शशीचा अभिनय वाईट झालाय असं कधीच झालं नाही! शशीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याने अगदी सुरुवातीपासूनच इंग्लिश सिनेमांत कामं करणं चालू केलं होतं आणि त्याने करिअरमध्ये तब्बल १२ इंग्लिश (ब्रिटिश/अमेरिकन) फिल्म्स केल्या ज्या त्याआधी किंवा त्यानंतरही कुणीच केलेल्या नाहीत!
१९६१च्या पहिल्यावहिल्या "धर्मपुत्र" पासून हिट सिनेमा नशिबात नसलेल्या शशीचं रुसलेलं नशीब १९६५च्या "जब जब फुल खिले"पासून हसलं आणि १९७० पर्यंत त्याच्या नावावर "नींद हमारी ख्वाब तुम्हारे, प्यार किये जा, आमने सामने, हसीना मान जायेगी, कन्यादान, प्यार का मौसम आणि अभिनेत्री" सारखे हिट्ट सिनेमे जमा झाले होते आणि त्याच्या अत्यंत देखण्या हँडसम रुपामुळे फिल्म इंडस्ट्रीत आणि भारतभरच्या पब्लिकमध्ये (विशेषतः मुलींमध्ये!) चांगलीच पॉप्युलॅरीटी मिळाली होती! आणि १९७०सालीच त्याचा इंग्लिश सिनेमा आला तोही मुंबईच्या हिंदी सिनेसृष्टीच्या बॅकग्राउंडस्टोरीवर!! त्याची हिरोईन होती त्याचीच प्रिय पत्नी जेनिफर! सिनेमाचं नावच मुळी होतं "बॉम्बे टॉकी"
-----------------------------------
हा त्याचा "द हाऊसहोल्डर, शेक्सपियरवाला आणि प्रिटी पॉली उर्फ अ मॅटर ऑफ इनोसन्स" नंतरचा चौथा इंग्लिश सिनेमा!! त्या काळात शशी हा बिनधास्त हट-के रोल्स करायचा! "बॉम्बे टॉकी" मध्ये तो आहे मुंबईच्या फिल्म जगतातला एक यशस्वी पॉप्युलर फिल्म स्टार! तो देखणा तर आहेच पण घरी बायको असूनही एका अमेरिकन जर्नॅलिस्टच्या प्रेमात पडणारा आणि संसाराचा जुगार खेळायला मागेपुढे न पाहणारा!
सिनेमाची सुरुवात अत्यंत कल्पक!! १९७०सालच्या चर्चगेट भागातले सीन्स. त्यावेळची तुरळक रहदारी, डबल डेकर बेस्ट बसेस, मरीन ड्राईव्ह, लोकल ट्रेन्स, सामोसे/ चणा जोर गरम विकणारे विक्रेते, गेटवे ऑफ इंडिया, ताज महाल हॉटेल आणि त्या सर्वांच्या बॅकग्राऊन्ड्वर अत्यंत सुंदर देखण्या पेंटिंग्जच्या साहाय्याने आपल्यासमोर येणारी सिनेमाची टायटल्स!!
मुंबईची फिल्म इंडस्ट्री पाहायला/अभ्यासायला ल्युसिया लेन (जेनिफर) ही अमेरिकन लेखिका/ पत्रकार आल्येय! एका स्टुडिओत फिल्मच्या गाण्याचं शूटिंग पाहायला ती सेटवर येते आणि त्या फिल्मच्या हिरोच्या, विक्रमच्या (शशी कपूर) अत्यंत देखण्या रूपाने पहिल्या भेटीतच भारावून जाते. पण त्यांचं एकमेकात गुंतणं त्या फिल्मच्या स्क्रिप्ट रायटर हरी ला (पाकिस्तानी कलाकार झिया मोईनुद्दीन) आवडत नाही! तो शशीची टिंगल करायची संधी सोडत नाही! (शशी क्काय दिसलाय या पहिल्याच शॉटमध्ये!!) विक्रमसुद्धा तिला पाहताक्षणी तिच्यावर लट्टू होतो! (त्यावेळी शशीचं हेलेन आणि इतर आर्टिस्ट्सबरोबर एका भव्य टाईपरायटरच्या सेटवर मजेशीर गाणं "टाईपरायटर टिक टिक टिक टिक, टिक टिक टिक टिक करता है, जिंदगी की हर कहानी लिखता है" - फारच देखणा सेट उभारलाय तो!)
त्यांची पुन्हा ताज हॉटेलमध्ये भेट होते. दोघेही एकमेकांना भावलेत! पुढे ल्युसिया विक्रमच्या घरी जाते, पण तिने त्याला दिलेली भेट त्याच्या बायकोला, माला ला (अपर्णा सेन) आवडत नाही आणि ती ल्युसियाला तसं स्पष्टपणे सुनावते. दुखावलेली ल्युसिया तिथून ती भेट (महागडं घड्याळ) झुडुपात भिरकावून चिडून निघते आणि तिची समजूत घालायला विक्रमही तिच्या मागोमाग तिच्या हॉटेलात जातो. तिथे दोघांमध्ये जवळीक वाढते आणि पडद्यावर पहिल्यांदाच शशी आणि जेनिफरचे इंटिमेंट सीन्स! ल्युसिया विक्रमच्या आउटडोअरच्या ठिकाणीही जाते आणि तिथेही त्यांच्यातली लोकांच्या लक्षात येण्याइतकी जवळीक!
पुढे विक्रम तिला घेऊन जुन्या जमानातल्या एका प्रसिद्ध पण आता रिटायर होऊन आपल्याच चमच्यांमध्ये मस्त असणाऱ्या नादिरा (नादिरा) या अभिनेत्रींकडे घेऊन जातो. तो सीन फारच सुरेख जमलाय. नादिराची"बडी मुश्किलसे दिल की बेकरारी को करार आया" गुणगुणणं आणि कुठेतरी आपलं हरवलेलं तारुण्य शशीशी जवळीक साधत मिळवायचा प्रयत्न करणं आणि त्यातून येणारं नैराश्य ...हे सगळंच सिनेसृष्टीतलं वास्तव मांडणारं....
काही कारणाने विक्रमही बेबनाव झालेली ल्युसिया काही काळ एका साधूबाबाच्या (पिंचू कपूर) आश्रमात जाऊन मनःशांती मिळवण्याचा फोल प्रयत्नसुद्धा करून पाहते. पण पुन्हा विक्रमकडे परत येते. मग त्या दोघांचं मनःपूत जगणं..रात्रभर धमाल करत फिरणं...
पण शेवट??.... ते दोघं एकत्र राहू शकतात का? हरीचा जळफळाट कुठल्या थरापर्यंत जातो? माला चं काय होतं ?
या सिनेमातून १९७० च्या आसपासची मुंबई फिल्म इंडस्ट्री, उच्चभ्रूंच्या पार्ट्या, स्वामीबुवांच्या नादी लागणारे श्रीमंत, एक काळ गाजवलेल्या हिरॉईनची उतारवयात होणारी अवस्था, फिल्म इंडस्ट्रीतले हेवेदावे यांचं नेमकं दर्शन घडतं!! फिल्म जरी इंग्लिशमधली असली तरी मुंबईच्या हिंदी सिनेसृष्टीवर त्यामुळे ओळखीचं वाटतं सगळं!
या फिल्मचा एक किस्सा म्हणजे त्यावेळी अमिताभ प्रचंड स्ट्रगल करत होता आणि या फिल्म मध्ये त्याला अगदी पाच पैशाचा फालतू एक्स्ट्राचा रोल होता. त्याची आणि शशीची ओळख झाली होती आणि त्यातला चितेजवळच्या मॉब मध्ये फालतू कलाकार म्हणून उभा राहण्याचा फुटकळ रोल त्याने करू नये असं शशीने त्याला ऐकवलं! (शशी त्यावेळी 'स्टार' होता!!) पण अमिताभने त्याचं ऐकलं नाही आणि त्याने तो शॉट दिला होता. पण त्याचं आणि प्रेक्षकांचं सुदैव की तो शॉट कापला गेला आणि पुढे अमिताभला त्याच्या पुढच्याच वर्षी परवाना, आनंद आणि रेश्मा और शेरा मिळून त्याची गाडी रुळावर आली होती!
No comments:
Post a Comment