"आॕपरेशन पेटीकोट"
-------------
मी मार्चच्या लाॕकडाऊनपास्नं इतके सारे सिनेमे बघत सुटलोय...आणि आता असं लक्षात येतंय की त्यातले मेजाॕरिटी 'कॕरी ग्रँट'चेच आहेत!..त्याआधी लाॕकडाऊनपर्यंत त्याचे फक्त दोनच मूव्हीज बघितले होते (नटोरीयस आणि नाॕर्थ बाय नाॕर्थ वेस्ट) आणि पहिल्या लाॕकडाऊनपास्नं आजपर्यंत अचानकच त्याचेच दहाबारा पाहून झालेत! मला ज्यामच्च आवडायला लागलाय हा गडी! अत्यंत प्रसन्न, रुबाबदार व्यक्तीमत्त्वं, सहजसुंदर धमाल अॕक्टींग आणि एक आश्वासक आवाजाची फेक!
सिनेमा धमाल मनोरंजक आहे आणि त्याची झलक त्याच्या द्व्यर्थी टायटलपासूनच होते! "आॕपरेशन पेटीकोट"मधे अर्थातच स्त्रियांच्या त्या अंतर्वस्त्रासंबंधी प्रसंगही आहेत आणि रंगांचा हात- "coat of a paint" अशाही संदर्भाने प्रसंग खुलतात!
"पार्टी, पिंक पँथर, 10, ब्रेकफास्ट अॕट टिफनी'ज" सारखे धमाल सिनेमे बनवणा-या, दिग्दर्शक ब्लेक एडवर्ड्सचा हा 1959 सालचा सिनेमा! दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर एक अतार्किक पण अत्रंगी कथा विनोदी डूब देऊन मांडल्येय यात त्याने!
सिनेमा संपूर्ण फ्लॕशबॕक तंत्राने उलगडतो. पाणबुडीच्या छोट्या गोलाकार खिडकीतनं दिसणा-या पाण्यातल्या विविध माश्यांवर आणि इतर समुद्री जीवांच्या बॕकग्राउंडवर येणारी टायटल्स संपतात. डाॕकयार्डचा सीन. पहाटेची वेळ आहे. कमांडर मॕट शेर्मन (कॕरी ग्रँट) डाॕकयार्डमधे उभ्या असलेल्या "सी टायगर" पाणबुडीजवळ येतो. पहाटे 6 वाजता त्याला तिथे बघून तिथला नवशिक्या खलाशी बुचकळ्यात पडलाय. पण त्याचा सिनियर त्याला समजावतो की सकाळी 9 वाजता कमांडर मॕट शेर्मनला ही जुनी मोडकळीला आलेली पाणबुडी भंगारात काढण्याच्या आॕर्डरवर सही करायच्येय...पण याच पाणबुडीचं त्याने दुस-या महायुद्धाच्या काळात नेतृत्व केलं असल्याने त्याच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्यात या पाणबुडीशी! त्यामुळे तो शेवटचा 'अलविदा' करायला आलाय. आता संपूर्ण रिकाम्या, ओक्याबोक्या असलेल्या पाणबुडीत खालती उतरुन कमांडर शेर्मन त्याच्या एकेकाळच्या केबिनमधे येतो. बरोबर आणलेलं लाॕगबुक उघडतो. त्याकाळचं! 10 डिसेंबर 1941 चा तो दिवस!..आणि त्याच्या डोळ्यांसमोर तो सगळा काळ उभा राहतो. फ्लॕशबॕकला सुरुवात...!!
फिलीपिन्सजवळ उभ्या असलेल्या अमेरिकेची "सी टायगर" पाणबुडी संध्याकाळी 7 वाजता शत्रुची जहाजं बुडवण्याच्या कामगिरीवर निघणार असते. पण अचानकच जपानी बाँम्बर विमानांचा हल्ला होतो आणि काही मिनीटांतच पाणबुडी बुडल्यातच जमा होते. रेडिओ, जायरो, टाॕर्पिडो, इंजिन रुम, वायरिंग सगळ्याची पार वाट लागते. ती पुन्हा युद्धसज्ज करायची तर तिथनं आधी समुद्रातनं नेण्याच्या योग्यतेची करुन मग 2000 मैल दूरच्या नाविक तळावर नेणं भाग असतं. मॕट कसंबसं तिथल्या त्याच्या सिनीयरला पटवतो की तो "सी टायगरची" दोन आठवड्यात डागडुजी करुन ती तिथनं हलवून त्या नाविक तळावर नेण्यायोग्य बनवेल अन्यथा तिला तिथेच बुडवण्यात यावं! त्यातच पाणबुडीवरचे तीन क्र्यू मेंबर्स नसल्याने रिप्लेसमेंट हवी असते. मॕटचा बाॕस जमेल तशी रिप्लेसमेंट देण्याचं कबूल करतो..
आणि मग सुरु होते पाणबुडी दुरुस्तीची एकच धांदल! आणि अश्यातच मॕट आणि पाणबुडीला रिप्लेसमेंट चालून येते ती गुलझार, गुलछबू हँण्डसम लेफ्टनंट निक होल्डनच्या (टोनी कर्टिस) रुपानं! त्याच्या अवतारावरनं कळलेलं असतंच की त्याला प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव नसतोच. पण त्याच्याकडे असे काही "गुण (?!)" असतात की तो कमांडर मॕट आणि पाणबुडीवरच्या सहका-यांना आश्चर्याचे एकामागून एक धक्के द्यायला सुरुवात करतो.
पाणबुडीच्या दुरुस्तीसाठी लागणारी सामग्री खूप काळ प्रतिक्षा करुनही न मिळाल्याने मोठीच समस्या असताना, हा पठ्ठ्या आपल्या "सप्लाय आॕफिसर" या नवीन पदाला जागत, दोन साथीदारांना घेऊन तिथल्या आसपासच्या आर्मी स्टोअरमधून सर्व सामान चक्क ढापून आणतो!! ती धमाल बघण्यासारखीच!
पुढे कशीबशी डागडुजी झालेली ती पाणबुडी प्रवासाला निघते खरी पण पुन्हा काही बिघाड होऊन वाटेतल्या एका छोट्या बेटाजवळ थांबवावी लागते! यावेळी हा तरणाबांड "सप्लाय आॕफिसर" कमालच करतो आणि बेटावरुन सामान घेऊन परतताना तिथे अडकलेल्या दोस्त राष्ट्रांच्या नर्सेसना "स्त्री दाक्षिण्य" दाखवत चक्क पाणबुडीवर घेऊन येतो!..मग काय?..
महिनोनमहिने स्त्रीचं दर्शन नसणारे ते सर्व खलाशी त्या टकाटक सुंद-यांना बघून वेडेच्च होतात. आणि मग त्या पाणबुडीच्या आत जे काही धुमाकूळ प्रसंग सुरु होतात ते इथे लिहित नाही..प्रत्यक्षच बघा!!
काही चावट...काही वात्रट...काही द्व्यर्दथी संवादांतनं...पाणबुडीचा कमांडर या नात्याने मॕट ला सर्व सुंदर नर्सेसना आपल्याच खलाश्यांपासून त्या पाणबुडीतल्या अपु-या, अरुंद जागेत सुरक्षितही ठेवायचं असतं आणि त्यातल्या सर्वात मादक दिसणा-या लेफ्टनंट डाॕलोरसपासून (जोन ओ'ब्रायन) आणि तिच्या वेंधळ्या हालचालींपासून स्वतःला वाचवायचंही असतं!! मॕटवर गुदरणारे काही प्रसंग कमाल!!
पुढे आणखी एका प्रसंगी अश्याच एका छोट्या बेटावरनं इतर सामान शिताफीनं पळवताना, लेफ्टनंट होल्डन, वाटेत दिसलेल्या एका तबेल्यातून एक गुबगुबीत डुक्कर पळवतो आणि पाणबुडीपर्यंत आणतो..तो प्रसंगही अफलातूनच! 😆
आणि हा सगळा गोंधळ कमी म्हणून की काय पुढच्या छोट्या हाॕल्टमधे निक होल्डन त्या बेटावर अडचणीत असणा-या काही गरोदर स्त्रियांना पाणबुडीतल्या नर्सेसची मदत होईल म्हणून त्यांनाही घेऊन येतो. कमांडर मॕट पुरता हैराण..तश्यात त्या बायका बाळंत व्हायला सुरुवात होते.. 🙄🤔🤪
तुम्ही कल्पना करु शकता त्या पाणबुडीच्या त्या अरुंदश्या केबिन्समधे काय काय धमाल घडत असेल!!!!
दरम्यान त्या पाणबुडीला रंग देणं जरुरीचं असतं पण राखाडी रंग उपलब्ध नसल्याने पांढ-या रंगात लाल मिसळून तयार झालेला "गुलाबी" रंग देणं भाग पडतं..आणि आशात-हेनं दुस-या महायुद्धाच्या ऐन धामधुमीत ती सहजच लक्षात येणारी "गुलाबी रंगाचा कोट" दिलेली पाणबुडी प्रवास चालू ठेवते. शत्रु राष्ट्रांच्या विमानांना ती दिसतेच पण मित्र राष्ट्रांच्या फ्रीगेटला ती आपलीच म्हणून ओळखू न आल्याने ते दणाद्दण बाॕम्ब वर्षाव करुन "सी टायगर"ला जेरीस आणतात!..शेवटी आपण निःशस्त्र आहोत आणि दोस्त राष्ट्रांचेच आहोत हे दाखवण्यासाठी पाणबुडीतनं "काही सामान" समुद्राच्या पृष्ठभागावर सोडलं जातं..काय असतं ते? ;-)
टोनी कर्टिस आणि कॕरी ग्रँटची जुगलबंदी अफ्फाटच!! माझ्यासारख्या कॕरी ग्रँटच्या चाहत्यांसाठी हा धुमाकूळ सिनेमा मस्ट-सी च आहे! जरुर बघा!!
No comments:
Post a Comment