कॕरी......
------
काल रात्री उशीरा हा १९५२ सालचा सिनेमा पाहिला. भारावून गेलो. ज्यांना प्रेमकथा बघायला आवडतात त्यांना नक्कीच आवडेल हा मूव्ही!
सर लाॕरेन्स आॕलिव्हिएविषयी मला नितांत कुतूहल आहे. "अ ब्रीज टू फार", "रिबेक्का" आणि "बाॕईज फ्राॕम ब्राझील" हे त्याचे तीनच मूव्हीज मी त्याआधी पाहिले होते. अफाट कपॕसिटी असलेला आणि शेक्सपियरच्या सर्वच व्यक्तिरेखा लीलया पेलणारा हा ब्रिटीश रंगभूमीवरचा ब्बाप अभिनेता! (मामा तोरडमलांनी त्याच्यावर आणि इंग्रीड बर्गमनवर (माझी जगातली सर्वात लाडकी!) "एक सम्राट, एक सम्राज्ञी" हे फार सुंदर पुस्तक लिहिलंय ते बहुतेकांनी वाचलं असेलच!!)...
"सिस्टर कॕरी" ही थिओडोर ड्रायसरची प्रचंड गाजलेली कादंबरी! त्याच कादंबरीवर बेतलेला हा सिनेमा, गावाकडून शहरात काम मिळवण्यासाठी आलेल्या आणि स्वतःला सिद्ध करताना धडपडत असतानाच एका प्रौढ पुरुषाच्या प्रेमात पडलेल्या सुंदर तरुणीची कथा मांडतो. विल्यम उर्फ विली वायलर या ग्रेट दिग्दर्शकाने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय! या ग्रेट दिग्दर्शकाचे दोन अद्भूत मूव्हीज- "बेनहर" आणि "रोमन हाॕलीडे" मी पाहिले होते. "कॕरी" मला खूपच आवडलाय!..परत एकदा बघणारेय मी!
१८८९ सालची ही कथा. कोलंबिया ह्या छोट्या शहरातनं कॕरी मीबर (जेनिफर जोन्स) आपलं नशिब आजमावायला शिकॕगोसारख्या मोठ्या शहरात जायला निघाल्ये. ट्रेनच्या प्रवासात तिला चार्ल्स ड्रुएट (एडी अॕल्बर्ट) हा स्मार्ट बडबड्या तरुण हेरतो. आणि तिच्याशी ओळख करुन घेतो. शिकॕगो मोठं शहर आहे. तिथे ती बहिणीकडे उतरते खरी, पण बहिणीचा नवरा तिला राहण्याचे पैसे द्यायला भाग पाडतो. कॕरीला एका शिवणकामाच्या कारखान्यात काम मिळतं, पण कामावर बोटात सुई घुसल्यानं अपघात होऊन निष्काळजीपणाबद्दल कामावरुन काढलं जातं..
बिचारी जाॕबच्या शोधात भटकत असताना तिची गाठ पुन्हा एकवार चार्ल्सशी पडते. तो तिला काम मिळेपर्यंत आसरा देण्याचं औदार्य दाखवत, पण प्रत्यक्षात तिला वश करण्यासाठी आपल्या फ्लॕटवर राहण्यासाठी घेऊन जातो. तो आपल्याबरोबर लग्न करेल ह्या आशेने ती त्याच्याबरोबर राहायला सुरुवात करतेही..
पुढे एकदा त्यांच्या ठरलेल्या "डेट"नुसार ती एका पाॕश हाॕटेलमधे जाते जिथे तिची गाठ तिथल्या मुख्य मॕनेजरशी जाॕर्ज हर्स्टवूडशी (लाॕरेन्स आॕलिव्हिए) पडते.. जाॕर्ज हा त्या उच्चभ्रु मंडळींच्या हाॕटेलमधे अनेक वर्ष काम करणारा सुस्थितीतला प्रौढ माणूस. त्याचं लग्न झालंय. दोन मोठी मुलं (मुलगा, मुलगी) आहेत. पण त्याचं कौटुंबिक आयुष्य सुखाचं नाही. पैशातच सुख मानणारी बायको आणि आपापलं सुख पाहात श्रीमंत जोडीदार पटवलेले त्याची मुलगी आणि मुलगा दोघं..जाॕर्ज भावनिकदृष्ट्या कुठेतरी एकाकीपण महसूस करतोय...
कॕरीचं सौंदर्य आणि निष्पापपणा त्याला पहिल्याच भेटीत भावलाय! त्याची आणि चार्ल्सची ओळख झाल्यावर, चार्ल्स त्याला फ्लॕटवर पार्टीसाठी आमंत्रण देतो. अर्थातच जाॕर्ज ते स्विकारुन त्याच्याकडे जातो. तिथे ती संध्याकाळ मौजमजेची ठरते. जाॕर्ज कॕरीच्या सहवासात अधिकच गुंततो. चार्ल्स नसताना तिला "कमिल"सारखी ट्रॕजिक नाटक पाहायला नेतो.. त्याचं भावनाशील मन, हळवेपण कॕरीलाही भावतं. तीही त्याच्यात गुंतते. मात्र आपण विवाहीत आहोत आणि दोन मोठी मुलं आहेत हे जाॕर्ज तिच्यापासून लपवतो..
यथावकाश त्यांच्या भेटींची जाॕर्जच्या बायकोला कुणकुण लागते...आॕब्व्हियसली दोघांमधे वाद, भांडणं होतात..तिकडे त्या हाॕटेल मालकालाही जाॕर्जचं वागणं पसंत पडत नसतं...
एकीकडे बायकोशी भांडण झालेला आणि दुसरीकडे कॕरीशिवाय एकेक क्षण राहणं असह्य झालेला जाॕर्ज, त्या उद्विग्नावस्थेत मालकाच्या तिजोरीत त्या दिवशीचा हिशेब, कागदपत्रं ठेवत असताना त्याची नजर तिजोरीतल्या नोटांच्या बंडलवर जाते. त्याला क्षणिक मोह सुटतो. ते बंडल हातात घेतल्यावर ती टायमर असणारी तिजोरी आॕटोमॕटिकली बंद होते...हातात मोठं घबाड आहे...मालकाला सांगावं का चुकून हातात आलं आणि तिजोरी बंद झाली म्हणून?..काय करावं?..कॕरीबरोबर राहायला पैसे तर हवेत...अशा मनाच्या दोलायमान अवस्थेत जाॕर्ज ते बंडल कोटाच्या खिशात टाकून तिथनं सटकतो...
वैवाहिक जीवनात सुखी नसणारा आणि कॕरीच्या आत्यंतिक प्रेमात असणारा जाॕर्ज सरळ चार्ल्सच्या फ्लॕटवर कॕरीकडे जातो आणि "चार्ल्सला अॕक्सीडेंट झालाय" असं खोटंच सांगून तिला घेऊन निघतो...पण तिला खरं काय ते कळतं ..जाॕर्ज तिला फसवून घेऊन चालल्याचं मान्य करतो पण ह्यापुढे तिच्याचबरोबर आयुष्य काढणार आसल्याचं सांगतो...त्याच्या प्रेमात असणारी कॕरी त्याला नाही म्हणू शकत नाही...त्यांचं प्रेम इथनं वेगळं वळण घेतं...
दोघं न्यूयाॕर्कला जातात..आणि नवरा-बायकोसारखं राहायला सुरुवात करतात...पण हाॕटेलमधल्या पैशांच्या अपहाराचा माग काढत डिटेक्टिव्ह त्यांच्यापर्यंता पोहोचतो आणि जाॕर्जकडून चोरीची रक्कम वसूल करुन जातो..त्यांच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु होतात..
जाॕर्जकडचे पैसे असे अचानक संपलेत...तो त्याही परिस्थितीत कॕरीला "एका देणेक-याचे पैसे दिले पण नंतर मला माझे शिकॕगोतले पैसे मिळतील तोपर्यंत मी इथेच न्यूयाॕर्कमधे काम शोधतो" असं खोटंच सांगत मिळेल त्या रेस्तराँमधे काम शोधायला जातो...पण मिळालेलं कामही हातचं जातं...
दोघांची आर्थिक परिस्थिती तंगीची बनल्येय. तश्यात जाॕर्जची बायको वकील घेऊन त्यांच्या घरी येऊन थडकते...कॕरीला प्रचंड धक्का बसतो...जाॕर्ज बायकोला घटस्फोट देण्याचं मान्य करत बदल्यात सर्व इस्टेटीवर पाणी सोडतो...बायको निघून जाते..पण इकडे जाॕर्जला धड नोकरी मिळणं वाढत्या वयामुळे मुश्कील..त्याची चिडचिड..पण तरी कॕरी ते समजून घेते...तश्यात ती बाळंतपणातच बाळ गमावते...
कॕरी नाटकाच्या ग्रुपमधे छोट्याछोट्या भूमिका मिळवत थोडे पैसे कमवायला लागते...जाॕर्जचा मुलगा न्यूयाॕर्कमधे आल्याचं जाॕर्जला पेपरमधल्या बातमीवरुन समजतं..तो त्याला भेटायला जायचं ठरवतो...कॕरीला वाटतं तो मुलाला भेटून पुन्हा शिकॕगोला नशीब आजमावायला निघालाय...पण कफल्लक, भिकारी जाॕर्ज मुलाला तोंड दाखवू शकत नाही..तो घरी परततो तर कॕरी घर सोडून गेलेली असते...
आता जाॕर्जला भणंग अवस्थेत जिणं नशिबी येतं...तिकडे कॕरीचे ग्रह पालटायला सुरुवात झालेली असते...तिला चांगल्या भूमिका..चांगले पैसे मिळायला लागतात आणि जाॕर्ज रस्त्यावर राहात असतो....
पुन्हा दोघांची भेट होते का?..कोणत्या परिस्थितीत? आपण जाॕर्जला गैरसमजातनं सोडलं हे कळून कॕरी काय पाऊल उचलते?..शेवट काय होतो??
वैवाहिक आयुष्यात सुखी नसणारा आणि तरुण कॕरीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या जाॕर्जचा रोल लाॕरेन्स आॕलिव्हिएने जबरदस्त रंगवलाय!! त्याच्या बेहेतरीन भूमिकांमधली ही एक! ...कॕरीच्या भूमिकेत जेनिफर जोन्स खूप आवडली मला...हा मस्ट सी मूव्ही आहे. जरुर पाहा!
No comments:
Post a Comment