Thursday, 17 June 2021

सिंन्गिंग इन द रेन

सिंन्गिंग इन दी रेन
-----------
आयुष्यात न जमलेल्या बऱ्याच गोष्टी आहेत पण ज्या एका गोष्टीमुळे आयुष्यभर बायकोच्या नजरेत टोकाचा च्यूx ठरत आलोय ती गोष्ट म्हणजे नाच!! या बाबतीत माझं अंगण अगदीच म्हणजे पारच वाकडं!! एखाद्या समारंभात जेंव्हा जमलेले सगळे आणि अर्थातच त्यांच्यात माझी बायकोही धमाल नाचत असते तेव्हा मी भयंकर "ऑड्ड मॅन आऊट" असतो. मी असं ऐकून आहे की माणसाला जे  जमत नाही ते भुताला जमतं आणि त्या न्यायाने काही गोष्टी मला मेल्यावरच भूत होऊन करता येतील अश्या ऑलरेडी लिस्ट केलेल्या आहेत त्यात नाचणेसुद्धा अजेंड्यावर आहे! मला अजिब्बातच रिदम नाही अंगात ..त्यामुळे मला अशा नाचानाचीच्या प्रसंगात भयानक ओशाळं वाटतं (मला अर्धातास कविता ऐकवायला सांगा मी ऐकवेन, एखादं स्वगत किंवा स्किट सादर करायला सांगा मी करेन..इतकंच काय गेला बाजार एखादं गाणंही म्हणेन ..पण नाच?...अ श क्य!!!!!) ते मला मेल्यावर भूत झाल्याशिवाय जमणे नाही आणि म्हणूनच मला छान लयदार सहज रिदम पकडून नाचणाऱ्यांचं अतोनात कौतुक वाटत आलंय. हेवाच म्हणाना! आणि म्हणूनच मला पडद्यावरच्या भगवानदादा, शम्मी, जितेंद्रपासून ..ते... थेट मिथुन, गोविंदापर्यंत मंडळींविषयी अतीव आदर आहे!! 

तसं माझ्या कॉलेजकाळांत पॅट्रिक स्वेझी आणि जॉन ट्रॅव्होल्टा जरी हॉलिवूडमधले खास नाचणारे म्हणून गाजले तरी त्यांचे सिनेमे मुद्दाम थेटरात जाऊन बघणं झालं नव्हतं. पण नंतर मात्र माझ्या आवडत्या TCM चॅनेलमुळे त्यांच्याही आधीच्या काळातल्या दोन थोर डान्सिंग सुपरस्टार्सचे सिनेमे पाहता आले ते म्हणजे फ्रेड अस्टेअर आणि जीन केली चे!!! त्यातही जीन केलीचे सिनेमे जास्त संख्यने पाहिले, त्यांचा टॅप डान्सिंग हा अद्भुत प्रकार ग्रेटच!! "अॕन अमेरिकन इन पॅरिस" आणि "सिंगिंन्ग इन द रेन" अफलातूनच!
---------------------------------
सिनेमा् बोलायला लागला त्या १९२७ सालातली गोष्ट सांगणारी १९५२ सालची फिल्म म्हणजे "सिंगिंग इन दी रेन!" तसं पाहिलं तर "बॉय मीट्स गर्ल" छापाची ही एक हलकीफुलकी कथा. एक सुप्रसिद्ध हिरो एका उदयोन्मुख आणि काम मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या मुलीला भेटतो आणि तिच्या प्रेमात पडतो; पण तो कोणत्या परिस्थितीत तिला भेटतो आणि फिल्म इंडस्ट्रीच्या "मूकपट ते बोलपट" प्रवासाच्या पार्श्वभूमीवर त्यांचं प्रेम विलक्षण गोड नृत्यांच्या साथीनं कसं उलगडत जातं ते "मस्ट वॉच"च!... ‘

जीन केली हा अमेरिकेचा सेन्सेशनल टॅप डान्सिंग स्टार! १९४० ते १९६० ही दोन दशकं त्याने आपल्या अफलातून टॅप डान्सिंगनं पडद्यावर धुमाकूळ घातला! १९५१ सालच्या सहा अॅकॅडमी अॅवॉर्ड विजेत्या "अॅन अमेरिकन इन पॅरिस"मध्ये नवोदित लेस्ली कॅरॉनबरोबर त्याने बहार उडवून दिली होती. व्हिन्सेंट मनेलीचं हातखंडा दिग्दर्शन, भव्य सेट्स आणि जॉर्ज गर्श्विनचं नाचायला लावणारं सळसळतं म्युझिक, तब्बल दहा गाणी आणि त्यापैकी बॅले तर सतरा मिनिटांचा नि डोळ्यांचं पारणं फेडणारा! अशा या जबरदस्त फिल्मच्या पाठोपाठच पुन्हा जीन केलीला घेऊन मेट्रो गोल्डविन मेयरने त्यांची पुढची म्युझिकल फिल्म आणली, ती म्हणजे "सिंगिंग इन दी रेन" आणि तिने तर इतिहासच रचला! यात अत्यंत धमाल अशा बारा गाण्यांची रेलचेल होती. यातली काही गाणी त्याआधी येऊन गेलेल्या सिनेमांतली होती, पण नवीन रूपात पेश केलेली! दिग्दर्शनाची धुरा स्टॅन्ली डोननबरोबर स्वतः जीन केलीने सांभाळली. खूप महत्त्वाची जबाबदारी होती ती कॅमेरामन हॅरॉल्ड रॉसनवर आणि त्याने ५० साली जी कामगिरी केलीय ती अद्भुतच!   

ज्युडी गार्लंड, ज्यून अॅलिसन आणि अॅन मिलरचा विचार झालेला कॅथी सेल्ड्नचा रोल शेवटी अवघ्या सतरा वर्षांच्या डेबी रेनॉल्ड्सला मिळाला. तिला त्याआधी अशा प्रकारच्या नृत्यांची सवय नसल्यामुळे, जीन केलीला तिच्यावर खूपच मेहनत घ्यावी लागली आणि बऱ्याचदा बिचारीला रडू कोसळण्याइतपत त्याचा ओरडा खावा लागला होता. "गुड मॉर्निंग"गाण्याच्या अथक शूटिंगनंतर तर बिचारीला पायातून रक्त आल्यामुळे उचलून ड्रेसिंग रूममध्ये न्यावं लागलं होतं. त्या प्रसंगांची आठवण होऊन तिने पुढे म्हटलं होतं, "माझ्या आयुष्यातल्या सर्वांत कठीण दोन गोष्टी सांगायच्या झाल्या, तर मी म्हणेन की प्रसूतिवेदनांमधून जिवंत राहणं आणि जीन केलीबरोबर हा रोल करणं". डेबीनेच सांगितलंय, "अशीच एकदा नाचणं जमत नाही म्हणून नर्व्हस होऊन मी स्टुडिओमधल्या एका पियानोच्या खाली बसून रडत होते. अचानक जवळ दोन पाय आलेले दिसले. रडतच मी म्हणायला लागले, "नाही...मला नाहीच जमत नाचायला... हे खूप कठीण आहे... मी नाही येणार." तो जो कोणी होता त्याने विचारलं, "कोण रडतंय खाली बसून?’ मी रडतच म्हटलं, "कुणी नाही.. मला नाही यायचं नाचायला.." तेव्हा त्या व्यक्तीने हात देऊन मला उठवलं. तो फ्रेड अस्टेअर होता. त्याचं शूटिंग तिथेच बाजूला होतं. तो मला घेऊन त्याच्या रिहर्सल हॉलमध्ये गेला, जिथे कुणालाच प्रवेश नसायचा. तिथे मी तासभर त्याची मेहनत पाहिली. घामाने निथळून लालबुंद झालेला तो, दमून माझ्याजवळ आला, "हे बघ अशी मेहनत करायची असते. सोपं नसतंच हे!" बस्स. तेव्हा मी सुरुवात केली आणि नंतर त्याच्याबरोबर फिल्म्सही केल्या."

"सिंगिंग इन दी रेन"ची अशीही गंमत सांगतात, की आधी याची गाणी तयार केली गेली आणि मग त्यांना बरोबर न्याय मिळेल अशा तऱ्हेने त्याभोवती कथा विणली गेली. काही असो, शेवटी ही जी काही तयार झालेली म्युझिकल फिल्म आहे, ती केवळ अप्रतिम अशीच! आणि अंगात १०३ डिग्री ताप असून सलग दीड दिवस शूटिंग करत जीन केली नं "सिंगिंग इन दी रेन" या गाण्यात दिलेला परफॉर्मन्स कोण विसरेल? 

सिनेमाला सुरुवात होते ती मॉन्युमेंटल पिक्चर्स या संस्थेच्या "दी रॉयल रास्कल" या नव्या सिनेमाच्या प्रीमिअरच्या समारंभाच्या दृश्याने! थिएटरच्या बाहेर तारेतारकांना बघण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी जमल्ये. लहान-मोठ्या सर्वच नटनट्या आल्या की गर्दीतून आरडाओरडा होतोय. आणि तशात, बहुतेक वेळा होतं तसं, सिनेमाचा हिरो डॉन लॉकवूड (जीन केली) आणि लीना लमॉन्ट (जीन हेगन) एकत्रच एन्ट्री घेतात. खरं तर त्याला ती आवडत नाहीयेl; पण सिनेमा चालण्यासाठी निर्मात्यानं  परस्परच दोघांचं प्रेम जमल्याची बातमी पसरवलीय. प्रीमिअर संपून निघाल्यावर डॉनला चाहते गराडा घालतात, अगदी अंगचटीला येतात, त्याचा शर्ट फाटेपर्यंत! त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी तो एका कारमध्ये उडी टाकतो ती नेमकी कार चालवणाऱ्या कॅथी सेल्ड्नच्या (डेबी रेनॉल्ड्स) शेजारी! 

ती आधी त्याला गुंड समजून पोलिसाला बोलावते; पण तो सिनेमाचा हिरो डॉन लॉकवूड असल्याचं कळल्यावर ती त्याची माफी मागते. नंतर बोलताना तो कुठल्यातरी देमार फाल्तू सिनेमांत कामं करतो म्हणून त्याची टरही उडवते. स्वतःची "कोरसगर्ल" ही खरी ओळख लपवून रंगभूमीवरची अभिनेत्री अशी खोटीच ओळख करून देते. आणि त्याला त्याच्या घरापर्यंत सोडते. 
स्टुडिओचा मालक आर. एफ. सिम्प्सनने एक पार्टी आयोजित केलीय. डॉनला त्याच्या बंगल्याशी सोडून कॅथी तिथे पोहोचते. कारण तिला त्या दिवशी तिथे परफॉर्म करायचंय. चाहत्यांच्या हुल्लडबाजीमुळे फाटलेले कपडे बदलून डॉनसुद्धा नव्या सुटात त्याच पार्टीला आलाय. अर्थातच लीनासुद्धा तिथे आहे. सिम्प्सन उपस्थित पाहुण्यांना येऊ घातलेल्या नव्या तंत्रज्ञानाची झलक म्हणून बोलपटाची एक क्लिप दाखवतो; पण ती उपस्थित मंडळींना तितकी पसंत पडत नाही. शो संपतो. पार्टी सुरू होते तीच एका गाण्याने! एका भल्या मोठ्या केकच्या आतून सरप्राइझ एंट्री घेत, कॅथी आपल्या सहकारी मुलींबरोबर "ऑल आय डू इज ड्रीम ऑफ यू" हे धमाल गाणं सादर करते. डॉन तिच्यावर जाम खूश होतो आणि तिच्याशी बोलायला जातो; पण ती त्याला टाळते. शेवटी तर वैतागून ती त्याच्यावर केक फेकते; पण तो जाऊन लीनाला लागतो. कॅथी तिथून सटकते. पुढचे अनेक दिवस डॉन तिचा शोध घेतो पण ती सापडत नाही. 

दरम्यान, डॉन आणि लीनाच्या नव्या मूकपटाच्या ("दी ड्युएलिंग कॅव्हेलिअर"च्या) शूटिंगला सुरुवात होते. कॉस्मोला त्यात काही विशेष दम आहेसं वाटत नाही आणि तो तसं बोलूनही दाखवतो. डॉनला कॅथीचंही तेच म्हणणं असल्याचं आठवतं. शूटिंग सुरू असतानाच सिम्प्सन घाईघाईने तिथे येऊन ते थांबवतो. कारण वॉर्नर ब्रदर्सने "दी जॅझ सिंगर" हा जगातला पहिला बोलपट (टॉकी) दुनियेसमोर आणलाय आणि तो प्रचंड लोकप्रिय झाल्यामुळे, तोपर्यंत सायलेंट फिल्म्स बनवणाऱ्या सर्वांचं धाबं दणाणलंय! सिम्पसन सर्वांना सांगतो, की आपणसुद्धा आपला सिनेमा आता बोलपटाच्या तंत्रानेच बनवायचा! सगळे त्या तयारीला लागतात. संवाद रेकॉर्ड करण्यासाठी डॉन आणि लीनाला माइक कुठे लपवला आहे त्या बेताने आवाज जाईल या पद्धतीने डायलॉग्ज म्हणायला सांगितलं जातं; पण लीनाला ते टेक्निक काही धड जमत नाही. सिनेमा बनतो खरा पण त्या "बोलपटा’च्या स्पेशल स्क्रीनिंगला आलेल्या मंडळींनी जाम टिंगल केल्याने आवाजाचा (डबिंगचा) प्रयोग सपशेल फसल्याचं सिद्ध होतं. विशेषतः लीनाचा किनरा आणि कर्णकटू आवाज सर्वांना वैतागवाणा वाटलेला असतो. डॉन नर्व्हस होतो. 

मधल्या काळात डॉन आणि कॉस्मोने कॅथीला शोधून आणलेलं असतं. अचानक कॉस्मो तोच फसलेला सिनेमा वेगळ्या स्वरूपात म्हणजे म्युझिकल कॉमेडी म्हणून  बनवण्याची आणि लीनासाठी कॅथीचा आवाज डबिंगसाठी वापरण्याची कल्पना मांडतो आणि ती सर्वांना पसंत पडते. कॅथीसुद्धा एका सिनेमासाठी ते करायला तयार होते; पण लीना मोठी हिरोइन असल्याने कॅथीला डबिंगचं क्रेडिट न देता, तिनेच आपल्यासाठी कायम डबिंग करावं असा हट्ट धरते. सिम्प्सन नाईलाजाने मान्यता देतो. कॅथीच्या आवाजातले लीनाचे डायलॉग्ज आणि गाणी लोकांना बेहद्द आवडतात. 

त्या म्युझिकल सिनेमाच्या प्रीमिअरनिमित्त जमलेले सर्वच लोक लीनाच्या (खरं तर कॅथीच्या) आवाजावर भलतेच खूश होतात. टाळ्यांच्या गजरात लीनाला स्वतःलाच त्यातलं एखादं गाणं लाइव्ह सादर करण्याचा आग्रह केला जातो. आता आली का पंचाईत?!! पण लीनाला स्टेजच्या पडद्यासमोर उभं करून, बंद पडद्यामागे लीनाच्या बरोबर मागे कॅथीला उभं करून गायला सांगितलं  जातं. कॅथीच्या गोड गळ्यातनं गाणं सुरू होतं. लीना नुसतीच त्यावर ओठ हलवते; पण लोकांना वाटतं, की लीनाच इतकी सुंदर गातेय, म्हणून! पण विंगमध्ये उभे असणारे डॉन, कॉस्मो आणि सिम्प्सन कॅथीच्या गाण्यावर खूश होऊन स्वतःही भान हरपून नाचता नाचता, गाणं चालू असतानाच दोघींच्या मधला पडदा दूर करतात. लोकांना खरं काय ते कळून सर्व जण लीनाला हसायला लागतात. तिला काहीच कळत नाही. कारण मागचा पडदा हटलेला तिला ठाऊकच नसतं! तेवढ्यात न राहवून कॅथीच्या हातून माइक घेऊन कॉस्मो गायला सुरुवात करतो. अचानक पुरुषी आवाज आल्यावर मात्र लीनाला फजिती कळते. 

तोंड लपवत ती विंगमध्ये पळते आणि भांबावलेली कॅथी प्रेक्षकात घुसून पळायला बघते; पण डॉन माइक हातात घेऊन खरा प्रकार लोकांना सांगतो आणि तीच खरी या सिनेमाची "सिंगिंग स्टार"असल्याचंही सांगतो. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट... डॉन स्टेजवरूनच आपलं प्रेम व्यक्त करत गातो आणि सद्गदित झालेली कॅथी त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत गात गात प्रेक्षकांमधून पुन्हा स्टेजवर पोहोचून त्याच्या मिठीत विसावते! तिचा लहानपणापासूनचा आयडॉल आता तिचा झालाय आणि तीही त्याच्याबरोबरीने स्टार! 
शेवटच्या दृश्यात "सिंगिंग इन दी रेन" सिनेमाच्या, एका बागेजवळ लावलेल्या भव्य जाहिरातीच्या होर्डिंगसमोर डॉन आणि कॅथी प्रेमभराने एकमेकाच्या मिठीत चुंबन घेत असताना सिनेमा संपतो ....!!

जीन केलीची ही १३वी संगीतिका! आदल्याच वर्षी रिलीज झालेल्या त्याच्या "अॕन अमेरिकन इन पॅरिस"चा बोलबाला असला, तरीही "सिंगिंग इन दी रेन" गाण्यांमुळे, धमाल प्रसंगांमुळे आणि जीन केली, डॉनल्ड ओकॉनर आणि डेबी रेनॉल्ड्सच्या अफलातून डान्सेसमुळे प्रचंड गाजला! "गुड मॉर्निंग टू यू", "मेक देम लाफ", "सिंगिंग इन दी रेन", "ब्युटीफुल गर्ल", "यू वर मेंट फॉर मी", "ऑल आय डू इज ड्रीम ऑफ यू", "यू आर माय लकी स्टार’", "फिट अॅज ए फिडल" अशी एकाहून एक पायाचा ठेका धरत नाचायला लावणारी लेनी हेटन, इग्नॅशिओ ब्राउन आणि आर्थर फ्रीडची धमाल गाणी आणि त्यावरची जीन केली, डेबी रेनॉल्ड्स आणि डॉनल्ड ओकॉनर यांची अफलातून कोरिओग्राफी! 

जगभरच्या तरुणाईला प्रचंड भावणारी आणि अर्थात "चुकवूच नये" (मस्ट  वॉच) अशीच ही फिल्म!! नक्की बघाच!! 😍

No comments:

Post a Comment