-----------
पृथ्वीतलावरची, माझ्या इंग्रीडखालोखाल मला आवडणारी अभिनेत्री म्हणजे नूतन!
इंग्रीडप्रमाणेच सुंदर गोड चेहेरा आणि खणखणीत अभिनय!! नूतननेही इंग्रीडसारखीच अॕक्टिंगसाठीची प्रतिष्ठेची अवाॕर्ड्स अन्नेकदा मिळवल्येत!
तब्बल ११वेळा 'फिल्मफेअर' नॉमिनेशन मिळवून त्यापैकी 'सहावेळा फिल्मफेअर अवॉर्ड' जिंकलंय आणि त्याशिवाय तीनवेळा 'बंगाल फिल्म जर्नलिस्ट्स असोसिएशन'ची अवॉर्ड्स मिळवल्येत, तीसुद्धा मीनाकुमारी, वहिदा रेहमान, साधना, नंदा, माला सिन्हा, वैजयंतीमाला, सुचित्या सेन आणि मधुबाला ऐन भरात असताना, त्यांच्यासमोर! १९५० ते १९९० अशी चाळीस वर्षं, तिनं आपल्या अभिनयाच्या जादूने बॉलिवूडमध्ये आपला अमीट ठसा उमटवलान्! तिचं अभिनय सामर्थ्य अमिया चक्रवर्ती, बिमल रॉय, राज खोसला, विजय आनंद, ए.सुब्बाराव, हृषिकेश मुखर्जी सारख्या ख्यातनाम दिग्दर्शकांनी लोकांसमोर आणलं!
इंग्रीडप्रमाणेच नूतननंसुद्धा आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं ते लग्न होऊन मूल झाल्यावर, सिनेमे करत असताना!! मोतीलालच्या छायेत वाढलेल्या नूतनचा अभिनय त्याच्याइतकाच सहजसुंदर, उत्स्फूर्त असायचा!!.तिचा श्यामल वर्ण, “गोड” ह्या शब्दाच्या पलीकडचा गोड रेखीव चेहेरा, त्यां ठळक भिवया, जादुई हसू आणि अत्यंत बोलके डोळे...सरसर बदलत जाणारे विभ्रम...ती लाजवाब एक्स्प्रेशन्स!! मी कायम प्रेमात आहे तिच्या!!
वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी घरच्याच प्रॉडक्शनमधून ('हमारी बेटी') तिने कारकिर्दीला सुरुवात केली आणि वयाच्या २३व्या वर्षी लेफ्टनंट कमांडर रजनीश बहलशी लग्नसुद्धा केलं!..तिचे १९५५ च्या “सीमा” पासून ते १९६८ च्या “सरस्वतीचंद्र” पर्यंतचे ३३ पैकी २० सिनेमे बघितलेत मी!! आणि नंतरही ती आईचे रोल करायला लागल्यावरही बरेचसे!!...
..तशी ती माझ्या आधीच्या पिढीतली! पण जसजसे तिचे सिनेमे पाहत गेलो तसतशी ती अधिकाधिक आवडत गेली. बालपणी सोसायटीच्या मैदानात, पांढऱ्या पडद्यावर पाहिलेला तिचा पहिला सिनेमा होता "मिलन". "हमतुम युग युग से ये गीत मिलन के गाते रहे है, गाते रहेंगे.." हे गाणं बालवयापासून कोरलं गेलं होतं मनावर आणि क्वचित ट्रेनने सेंट्रल लाईनने नातेवाईकांकडे जाताना कुणीतरी पारसिकचा बोगदा आला, की बोगद्यावर कुठेतरी हवेत मुंब्र्याच्या डोंगरावर बोट दाखवून "नूतनचा तिथे बंगला आहे" अशी माहिती हटकून देत असत तेही चांगलंच लक्षात राहिलं होतं...मग कॉलेज काळात एकीकडे मुंबई दूरदर्शनवर तिच्या 'सरस्वतीचंद्र, सीमा, बंदिनी, सुजाता' मधल्या थक्क करणाऱ्या भूमिका पाहिल्या आणि नंतर थ्री रूट रेल्वे पास काढून अख्खी मुंबई पालथी घालत तिचे अनेक सिनेमे मॅटीनी आणि मॉर्निंग शोजला पाहिल्याचं आठवतंय - विशेषतः 'पेइंग गेस्ट, तेरे घर के सामने, लाटसाब, अनाडी आणि दिल्ली का ठग' वगैरे!! तेव्हाच तिचा अत्यंत लोभस आणि मोहक चेहेरा, सोज्ज्वळ रूप, खट्याळ हास्य आणि झरझर बदलणाऱ्या चेहेऱ्यावरच्या हावभावांतून आणि बोलक्या डोळ्यांतून भिडणारी तिची कमालीची सहजसुंदर आणि अफलातून ऍक्टिंग मनांत घुसली आणि टीपीकल भारतीय पुरुषांच्या मनातल्या स्त्री-सौन्दर्याच्या कल्पनेनुसार, तोपर्यँत सर्वात आवडती अभिनेत्री म्हणून मधुबालाची असणारी हृदयातली जागा नूतनने तेव्हा जी घेतली, ती कायमचीच! पुढे इंग्रीडचे सहा-सात सिनेमे वारंवार बघून, इंग्रीड जरी डार्लिंग झाली तरी नूतनचं स्थान तिच्याबरोबरीने मनांत अढळ राहिलंय!
मनांत घर करून असणाऱ्या तिच्या किती किती म्हणून अदा आठवायच्या? "देखो रुठा ना करो" गाण्यातल्या कडव्यात तोल जाऊन पडता पडता सांभाळून "..जानपर मेरी बनी आपकी ठहरे हंसी.." म्हणत देववरचा लटका राग आणि फुरंगटलेले हावभाव असोत, किंवा "सीमा" मधली तिची अॕक्टींग! आधीची चिडकू, जगावर वैतागलेली म्हणून जेवणाचं ताटही भिरकावून देणारी आणि नंतर शांत मवाळ होत जाणारी गौरी! स्वतः खिसेकापू असणारी पुतली (शुभा खोटे) धाडसाने सायकलवरून, चोराचा पाठलाग करून त्याला पकडते आणि तिच्या नेक कामाच्या बदल्यात तिला आश्रमाकडून शिवणयंत्र भेट मिळाल्यावर म्हणते,'आजतक मै लोगोंकी जेबे काटती रही हूं, अब सीनेकी कोशिश करुंगी" त्यावर खुश झालेली नूतन, शुभाचाच पेटंट डायलॉग तिलाच ऐकवते,"क्याs ब्बाssत हैs " पण त्या तीन शब्दांत कौतुक, अभिमान, आनंद सगळं इतकं गोड प्रकारे दाखवलंय नूतनने!!.. “इक घर बनूंगा बनाऊंगा तेरे घर के सामने” ह्या गाण्यात देव जेंव्हा व्हिस्कीच्या ग्लासात तिला बघताना बर्फाचा खडा टाकतो, तेंव्हा त्या गार स्पर्शाने तिचं शहारणं आणि त्याला बर्फाचा खडा काढायला लावणं..."तारे सजाऊंगा तेरे घर के सामने" म्हणत देव ग्लासवर हलकेच टिचकी मारतो, तेव्हा ती टिचकी नाकावर बसल्याची अमाप गोड रिऍक्शन....देव तिला शोधत “तू कहां ये बता” म्हणत गल्लीबोळ धुंडाळत फिरतोय...एकदाचा त्याचा आवाज तिच्यापर्यँत पोचतो...ती धावत घराच्या बाल्कनीत येते...त्याला पाहून प्रेमभराने दोन्ही हात फैलावते...तिचं दर्शन होऊन तो खुशीसे पागल झालाय...पण घरच्यांना सुगावा लागु नये म्हणू ती त्याला थांबायची खुण करत पटकन धावत जाऊन कानोसा घेत खोलीचा दरवाजा ओढून घेते आणि पुन्हा बाल्कनीत येऊन त्याच्याकड अत्यंत प्रेमभरल्या नजरेने पाहत हाताची घडी घालून उभी राहते...जणू त्याला नजरेनेच सांगत्ये-“बघ राजा...मी आहे तुझ्यासाठी...तुझीच...तुझ्याकडे बघत..तुझ्यासमोर...बोल काय बोलायचं ते....”...त्या गाण्यात नूतनने हे जे कमालीचे एक्स्प्रेशन्स दिलेत त्याला तोडच नाही!! पेइंग गेस्टच्या "छोड दो आंचल" गाण्यात तिचे इतके गोड गोड क्लोज अप्स आहेत (कानातल्या बदलत्या इअररिंग्ज दाखवत जणू!) ..'मंझील'मध्ये गीता दत्तच्या मधाळ आवाजात ती कविता वाचते,"चुपके से मिले प्यासे प्यासे कुछ हम कुछ तुम" आणि देव मग रफीसाबच्या बेमिसाल आवाजात ते गाणं गातो.... कित्ती गोड विभ्रम तिचे!.. तिच्या त्या अदा पाहताना देवचा हेवाच वाटतो!...'सोने की चिडिया'च्या "सच बता तू मुझपे फिदा" गाण्यात तर ती तिच्या रूपाने घायाळ करते...आणि राज कपूर बरोबरचे गाजलेले “अनाडी, कन्हैय्या, छलिया आणि दिल ही तो है”..अनाडीत तिने शुभा खोटेबरोबर केलेली धमाल...राज दुखावून निघून गेल्यावर तिचं पिळवटून गाणं-“तेरा जानाs दिल के अरमानो का लूट जानाs...”...अगदी खर्रखुर्र आतून फुटून आलेलं रडू...आणि 'सीमा' मधलं तिचं “मनमोहना बडे झुटे...” हे गाणं लतादिदींनी गायलंय हे माहित्येय म्हणून, अन्यथा पडद्यावर ताना घेत शास्त्रीय गाणं सादर करण्याचा, इतका उच्च आणि जिवंत अभिनय ना त्याआधी कुणाला जमलाय नं त्यानंतर...! नूतन ही बिमलदांची लाडकी अभिनेत्री होती. ते तिला आपल्या खास स्टाईलने 'नोतून' अशी हाक मारायचे. तर अमिया चक्रवर्ती तिला 'एंजल' म्हणून हाक मारत असत...
अमिया चक्रवर्तींच्या 'सीमा'पाठोपाठ बिमलदांच्या 'सुजाता'मुळे तिला दुसरं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. ब्राह्मण कुटुंबाने दत्तक घेऊन वाढवलेल्या दलित अस्पृश्य मुलीच्या भूमिकेतला तिचा अप्रतिम अभिनय कोण विसरेल?.. दरम्यान तिचं लग्न झालं आणि तिने सिनेसृष्टीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. अशातच बिमलदांकडे 'बंदिनी'ची कथा आली आणि तो रोल फक्त आणि फक्त नूतनच निभावू शकेल या खात्रीने ते तिच्याकडे गेले. पण त्यावेळी लग्न झालेल्या नूतनला नुकते दिवसही गेलेले. तिने नकार दिल्यावर बिमलदांनी दु:खी होत तो सिनेमाच न बनवण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांच्यामते दुसरी कोणतीही अभिनेत्री त्या भूनिकेला न्याय देऊ शकली नसती. शेवटी बिमलदांच्या दृढेच्छेला बळ दिलं ते नूतनच्या पतीने- कमांडर रजनीश बहल यांनी आणि मग आपणा प्रेक्षकांचं दैव थोर म्हणून पतीच्या विनंतीला मान देऊन नूतन 'बंदिनी'मधली कल्याणी साकारायला तयार झाली आणि भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात एक अजरामर भूमिका दाखल झाली!.. मितभाषी कल्याणीच्या भूमिकेत नूतनने जीव ओतला. तिच्या भावविभोर डोळ्यांनी आणि एक्स्प्रेशन्सनी दर्शकांच्या मनावर गारुड केलं आणि 'सीमा' आणि 'सुजाता'पाठोपाठ तिला सर्वश्रेष्ठ अभिनयासाठीचं तिसरं फिल्मफेअर अवॉर्ड कल्याणीच्या भूमिकेने मिळवून दिलं.
कुमारसेन समर्थ आणि शोभना समर्थ या मराठी कलाकारांची नूतन ही सर्वात मोठी मुलगी..तिच्या बालपणीची एक विशेष हकीकत ऐकली होती की ती तान्ही असताना रडून रडून आकांत करायची तेव्हा एका ज्योतिष्याने आणि सिद्धपुरुषाने तिच्या आईला, शोभना समर्थ यांना सांगितलं होतं की "खरं तर हा मोक्षाकडे निघालेला महान आत्मा आहे, ज्याला हा जन्म घ्यायचाच नव्हता पण काही कार्मिक देणी फेडण्यासाठी हा जन्म घ्यावा लागलाय" म्हणून! तनुजा आणि चतुरा या दोन लहान बहिणी आणि जयदीप या सर्वात धाकट्या भावाची नूतन मोठी ताई! आई नूतनला लाडाने 'मीरा' हाक मारायची. पुढे असंही एक अद्भुत घडलं की लहानपणी नूतनच्या हाताला आणि कानाच्या मागे चंदनाचा वास येत असे आणि अंगाला घाम यायचा तोसुद्धा चंदनासारखाच पिवळसर असायचा...
तिचं शिक्षण पेडर रोडवरच्या आयडियल स्कुलमध्ये झालं. त्याकाळात तिने पंडित जगन्नाथ यांच्याकडे शास्त्रीय गायन आणि मोहनलाल पांडे यांच्याकडे कथ्थकचे धडे घेतले होते. ती कविताही उत्तम करत होती आणि स्वतःच्या कवितांना चाली लावून गातही असायची. चौदाव्या वर्षांपासून ते सोळाव्या-सतराव्या वर्षांपर्यन्त तीनचार सिनेमे करून ते फ्लॉप ठरल्यावर ती पुढच्या शिक्षणासाठी जवळपास वर्षभर स्वित्झर्लंडमध्ये होती. हा तिच्या आयुष्यातला अत्यंत सुखद काळ होता.
नंतर तिने देव आनंदबरोबर 'बारीश' आणि 'पेइंग गेस्ट' हे सिनेमे तर किशोर कुमार बरोबर 'दिल्ली का ठग' सिनेमा केला आणि ते सर्व हिट ठरले. 'दिल्ली का ठग'मध्ये तिने बिकिनीत दर्शन दिलं होतं. त्याच्या पुढच्याच वर्षी तिने राज कपूरबरोबर 'अनाडी' आणि 'कन्हैय्या' गाजवले तर शम्मी कपूरबरोबर 'बसंत' हा ओपी नय्यरच्या धमाल गाण्यांचा सिनेमा केला. लग्नानंतर पुन्हा सिनेमांत कामं करायला सुरुवात केल्यावरचं १९६३ हे वर्षं तिच्या तीन सुपरहिट सिनेमांचं ठरलं - 'बंदिनी, दिल ही तो है आणि तेरे घर के सामने'!... 'दिल ही तो है' रोशनच्या गाण्यांनी गाजला. "तुम गर मुझको ना चाहो" मधले तिचे एक्स्प्रेशन्स केवळ लाजवाब! 'निगाहे मिलाने को जी चाहता है" हे गाणं तर आशाबाईंसाठी गायिका म्हणून आणि तिच्यासाठी खास स्पेश्यल कव्वाली म्हणून यादगार ठरलं!.. धर्मेंद्रबरोबर बंदिनीत जोडी जमल्यावर त्या दोघांचे 'दिल ने फिर याद किया' आणि 'दुल्हन एक रात की' असे लागोपाठ दोन सिनेमे आले आणि दोन्ही सिनेमे अप्रतिम गाण्यांसाठी विशेष गाजले. पाठोपाठ आला 'मीलन'! पुनर्जन्मावर आधारित या कथेत नूतनने आपल्या सहजसुंदर नैसर्गिक अभिनयाने असे काही रंग भरले की ती भूमिका तिला सर्वश्रेष्ठ अभिनयाचं चौथं फिल्मफेअर अवॉर्ड देऊन गेली. त्याच्या पुढच्याच वर्षी आलेल्या 'सरस्वतीचंद्र' मधली तिची कुमुदची व्यक्तिरेखाही गाजली. गोवर्धनभाई त्रिपाठी यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर आधारित या सिनेमाच्या संगीताबद्दल कल्याणजी आनंदजी यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. नूतनने अर्थातच दु:खी प्रेमिका, व्यभिचारी पतीची सोशिक प्रिया आणि पुन्हा प्रियकर समोर उभा ठाकल्यावर मनांत उभं राहिलेलं द्वंद्व अशी कुमुदची अनेकपदरी भूमिका अर्थातच समरसून केली..
एव्हाना ती पस्तिशीत जाऊन पोंहोचली होती आणि दरम्यान 'देवी' सिनेमाच्या शूटिंग दरम्यान संजीवकुमारच्या काही गैर वागण्याचा राग येऊन तिने भर सेटवर त्याच्या थोबाडीत मारल्याच्या घटनेला तुफान प्रसिद्धी मिळाली...नंतर मात्र तिने अगदी मोजकेच एखाद दोन सिनेमे केले. पण त्यातही अमिताभबरोबरच्या 'सौदागर' मधली त्यच्या पत्नीची भूमिका आणि 'अनुराग'मधल्या कॅन्सरग्रस्त मुलाच्या आईची भूमिका दर्शकांना भावुक करून गेली. सौदागरमधल्या भूमिकेबद्दल तिला बंगाल फिल्म जर्नलिस्ट्स असोसिएशनचं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं अवॉर्ड मिळालं. त्यानंतर पाच वर्षांच्या गॅपने तिचा "मै तुलसी तेरे आंगन की" हा राज खोसला दिग्दर्शित सिनेमा आला. चंद्रकांत काकोडकरांच्या मूळ मराठी कादंबरीवर आधारित या सिनेमातल्या संयुक्ता या भूमिकेने नूतनला सर्वश्रेष्ठ अभिनयासाठीचं पाचवं फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून दिलं. त्यानंतर 'साजन बिना सुहागन' आणि 'साजन की सहेली' अशा दोनचार भूमिका केल्यावर तिचा सशक्त अभिनय लोकांसमोर आला तो 'युद्ध, मेरी जंग, कर्मा' सारख्या सिनेमातल्या आईच्या भूमिकेतून! 'मेरी जंग' सिनेमातल्या तिच्या आईच्या भूमिकेबद्दल तिला सहावं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं.. पुढे "मुजरीम हाजीर" सारख्या दूरदर्शन मालिकेतून आणखी एक दमदार परफॉर्मन्स देऊन नूतन कॅन्सर सारख्या असाध्य आजारामुळे आपल्यातून निघून गेली. पण तिचा सोज्ज्वळ चेहेरा, मोहक खळी, कमालीचे बोलके डोळे आणि अभिजात अभिनय हृदयात कायमच कोरलेला राहील.
नूतन उत्तम गायिका तर होतीच पण एक उत्तम कवयित्रीसुद्धा होती. तिने हिंदीत लिहिलेली ही कविता तिचा एक बुद्धिमान कवयित्री म्हणून अनोखा पैलू दाखवून देते -
"उन्हें संग उठाने की आदत वही है
हमें सिर उठाने की आदत वही है
सितमगर सितम कर चला दिल से खंजर
हमें जख्म खाने की आदत वही है
नहीं डर के दिल पे रहेगा न काबू
इसे टूट जाने की आदत वही है
गीले शिकवे होठोंपे आते भी कैसे
हमें चुप उगने की आदत वही है
हमें आ गया है संभलकर भी चलना
मगर लड़खड़ाने की आदत वही है
गमो का ये बोझ अब बढे भी तो क्या गम
हमें मुस्कुराने की आदत वही है
अभी तक बुरे है भले लोग 'नूतन'
हमारे ज़माने की आदत वही है !"
...............
इंग्रीडला जाऊन ३६ वर्षं आणि नूतनला जाऊन २७ वर्षं झाल्येत पण माझ्या हृदयात मात्र दोघी तितक्याच घट्ट घर करून आहेत!! 'झाल्या बहू होतील बहू' पण या दोघींसारख्या गोड, देखण्या आणि अत्युत्कृष्ट अभिनेत्री पुन्हा होणे नाही!!!
No comments:
Post a Comment