ते चित्र आणि हे चित्र!
तेव्हा
----
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट.
आम्ही बहुतेक सगळे मित्र टीनएज संपलंय आणि ग्रॕज्युएशन संपून नोकरी लागत्ये न लागत्ये त्या वयात..अखंड वेळ खालती सोसायटीच्या मैदानात किंवा कट्ट्यांवर आमचा वेळ जायचा!..तेव्हा टीव्हीवर फक्त मुंबई दूरदर्शन आणि डीडी मेट्रो (की नॕशनल) असे दोनच चॕनल्स. काही ठराविकच प्रोग्रॕम्स बघायला आम्ही घरी असू. त्यामुळे काहींच्या अगदीच दोनचार घरचे अपवाद वगळता, आम्ही बहुतेकजण आपापल्या घरी फक्त जेवायला आणि झोपायलाच असायचो... बाकी सगळा वेळ घराबाहेर मित्रांबरोबर... त्यामुळे घरच्यांशी संवाद "त्या विशीच्या वयात" अत्यंत कमी असायचा. आणि का माहित नाही पण त्याचं फारसं काही वाटायचंही नाही..म्हंजे खेद किंवा अपराधी भावना की आपण घरच्यापेक्षा जास्त वेळ बाहेरच असतोय..आईवडिलांशी संवाद फारच कमी होतोय वगैरे..
आता
------
त्यावेळी माझे आईवडिल होते त्या वयाचा मी आहे आणि त्यावेळी मी होतो त्या वयाच्या (किंवा थोड्या मोठ्याच!) माझ्या मुली आहेत..आणि त्याकाही मी त्या वयाचा असताना जितका वेळ बाहेर काढायचो तितका बाहेर काढत नाहीत..ब-यापैकी घरी असतात...पण माझा जसा माझ्या आईवडिलांशी संवाद कमी व्हायचा तसा माझ्या मुलींचाही आताश्या माझ्याशी त्यामानाने कमीच होतो..म्हंजे त्यांच्या शाळकरी वयात माझ्याशी व्हायचा त्याच्या तुलनेत तर खूपच कमी...माझ्या विशीच्या वयात मी संवादासाठी फारसा घरीच नसल्यामुळे माझ्या आईवडिलांना काय वाटायचं माहित नाही..पण आता मुली घरातच (त्यांच्या बेडरुममधे) असूनही रोजचं जेवण, चहा वगैरे एकत्र घेणं सोडलं (किंवा पाहुणे असतानाचे अपवाद वगळता) तसा आमचाही संवाद त्यामानाने कमीच होतो...मुली त्यांच्या बेडरुममधे मोबाईल, लॕपटाॕप किंवा जे काय...त्यात रमलेल्या..
त्यावेळी माझ्या घरातच नसण्याने माझ्याशी फार संवाद न होणारे आईवडिल ज्या एंडला होते त्या एंडला आज मी आहे..
संवाद साधारण त्याच प्रपोर्शनमधे तसाच कमी!
ते चित्र...आणि... हे चित्र...
बदललंय काय?..दोन्ही पिढ्यांची वयं तशीच..जनरेशनमधली गॕप तितकीच...नाती तशीच..तितकीच घट्ट...पण मग फरक टेक्नाॕलाॕजीचा?..बदललेल्या काळाचा?...
मग उगाचच माझं स्वतःवर चिडणं..पूर्वीसारख्या खूप गप्पा होत नाहीत म्हणून...आणि मग कधीमधी "बिंदिया"तल्या बलराज साहनीच्या गाण्याची ओळ डोस्क्यात येते -"मै अपने आप से घबरा गया हूँ..मुझे ऐ जिंदगी दिवाना कर दे..."
No comments:
Post a Comment