Monday, 14 June 2021

सेव्हन ईयर इच

"Seven Year Itch"
----------------
आचार्य अत्र्यांचे शब्द वापरायचे तर -
"ती पाहताच बाला
कलिजा खलास झाला
छातीत इष्कभाला
हा आरपार गेला.."

अशी अवस्था करणा-या मेरिलीन मन्रोचा मूव्ही -"सेव्हन इयर इच!" -- मजेशीर आहेत नं हे शब्द? लग्न झालेल्या जोडप्यांत लग्नानंतरचे, सुरुवातीच्या वर्षांतले गोग्गोड, गुलाबी, सोनेरी दिवस संपले की हळूहळू कुरबुरी सुरु होत ७ वर्षं संपतासंपता, दुस-या कुणाकडे बघावं वाटायला लागतं किंवा लक्ष जातं अशी अवस्था येते तीच "Seven Year itch"!!...(अर्थात हे जरा जुन्या काळातलं!..हल्लीच्या पिढीत तर "ब्रेक-अप" सटासट होताना दिसतात, त्यासाठी सात वर्षं नव्हे, सात आठवडेही पुरतात अशी उदाहरणं दिसतात आसपास...काही तरुण मुलामुलींबाबतीत आईबाबांनी लाख्खो रुपये उधळून केलेल्या साखरपुड्यानंतर त्यांचे पार्टनर दादागिरी सुरु करतात -"तू आता अमक्यातमक्या मित्रांशी बोलायचंच नाही, त्यांच्याशी WApp चॕट करायचंच नाही, फेसबुकवर त्यांना लाईक्स, बदाम द्यायचंच नाही" etc..मग त्यां मुलींना लग्नाआधीच साक्षात्कार होतो की, आपल्याला "स्पेस न देणा-या" ह्या मुलाशी आपलं "जमणं शक्यच नाही" म्हणून! मग लगोलग लग्नाआधीच ब्रेकअप होऊन पुढची लग्नातली उधळपट्टी वाचते!! हुश्श!! अर्थात हे vice versa मुलीकडून मुलाला अश्याच प्रकारे bossing करत त्रास देऊन अगदी हेच होऊच शकतं!)...

दोष कुणात नसतात?..पण सुरुवातीच्या वर्षांमधे पार्टनरच्या वाट्टेल त्या छोट्यामोठ्या 'गुणां'वर लुब्ध असलेल्यांना कालांतराने - "आपल्या पार्टनरमधे 'दोष'सुद्धा आहेत आणि प्रसंगी ते आपल्या डोक्यातही जातायत" हा शोध लागतो! "आपल्यावर अतीव प्रेम करणारी बायको आता डोक्यावर मि-या वाटायला लागल्येय" म्हणून नवरा कावायला सुरुवात होते, तर "सुरुवातीच्या काळात मिठीतून अलगद मुठीत आलेल्या नव-याला, तसाच अडकवून ठेवण्याची घट्ट पकड ढिली होत्येयसं वाटून" बायकोची चिडचिड व्हायला सुरुवात होते. (यामधे अर्थात जी जोडपी सर्वार्थानं आणि खरोख्खरंच "मेड फाॕर इच अदर" असतात त्यां ग्रेट्ट जोडप्यांचा सणसणीत अपवाद!..तसंच उरलेल्यांपैकी ज्यांना विसंवादी मुद्यांतनं बॕलन्स साधून संसार करता येतो तेही भाग्यवानच!)...पण उरलेली काही जोडपी, ज्यांचा केवळ भांडतभांडतच संसार चालू राहतो त्यांना ही "itch" फारच्च जाणवते आणि मग extra marital affair (मराठीत भानगड, लफडं etc) होऊ शकतं...

"Seven year Itch" ही टर्म पन्नासच्या दशकात अमेरिकेत लोकप्रिय झाली होती! तिकडे घटस्फोटाचं प्रमाण 'लग्नानंतर सात वर्षं होत आली' की जरा जास्तच वाढलं होतं त्या काळात त्यामुळेही असेल!..."Itch" शब्दाचा अर्थ आहे खाज...पण इथे तो घ्यायचा irritation चिडचिड, कुरकुर, संताप, पिडा अशा अर्थी!..लग्नानंतर सात वर्षं संपता संपता एव्हाना एक किंवा दोन मुलं झालेली असतात आणि मग नोकरी/ व्यवसाय आणि घर अशी दोन्हीकडचं सांभाळताना दोघांचा त्रागा वाढलेला असतो...'आपला पार्टनर आपल्याला  समजूनच घेत नाहीये' असं फीलींग दोघांनाही यायला सुरुवात होते ती याच काळात!..क्वचित काही जोडप्यांत सेक्सुअल लाईफ थोडं आॕफ्फ-ट्रॕक किंवा बोअरिंग होतं...आणि अशावेळी आपली वैतागवाडी ऐकवायची तरी कोणाला?..मग नवरोबाला नेमकी कुणीतरी छानशी मैत्रिण लाभते आणि बायकोला चांगलासा मित्र भेटतो! त्यांच्याशी दोघं आपापली गा-हाणी शेअर करायला लागतात...पण मग त्यातनं आणखी भलताच प्राॕब्लेम उद्भवू शकतो!..

"Seven Year Itch" हा मूव्ही मुळात हिरो टाॕम इवेलने स्वतःच ब्राॕडवेवर गाजवलेल्या त्याच नावाच्या तीन अंकी नाटकावर बेतलेला आहे. जाॕर्ज अॕक्सलराॕड या नाटकाकाराचं ते पन्नासच्या दशकातलं सर्वात लोकप्रिय नाटक!...तर १९५५ सालच्या, दिग्दर्शक बिली वाईल्डरच्या "Seven Year Itch" ह्या मजेशीर सिनेमामधे - "सात वर्षं लग्नाला झालेल्या आणि कावलेल्या रिचर्ड शेरमनला (टाॕम इवेल) त्याच्या अपार्टमेंटमधे राहायला आलेल्या "ति"ची (मेरिलीन मन्रो) मोहिनी पडते आणि मग कायकाय धमाल उडते" - ती दाखवल्ये! अर्थात हा सिनेमा बघायचा तो मादक सौंदर्याचा अॕटमबाँब 'मेरिलीन मन्रो'साठी आणि ती सब-वे मधल्या एका जाळीवर उभी असताना तिचा पांढरा झगा खालून येणा-या हवेच्या जोरदार झोताने उडतो तेव्हाच्या तिच्या अफलातून दिलखेचक घायाळ पोझसाठी!!! त्याकाळी म्हणजे १९५५ साली मेरिलिन मन्रोच्या या झगा उडण्याच्या सेक्सी पोझचा तब्बल ५२ फुटी कट आउट, टाईम्स स्क्वेअरमधे लावला गेला होता! (याचीच काॕपी म्हणजे १९८४ सालच्या "The Woman in Red" मधली- 'केली लेब्राॕक', पार्कींग लाॕटमधल्या जाळीवर उभं राहून आपला लालचुटूक झगा उडवत त्या कमालीच्या सेक्सी स्टाईलमधे दिसली होती!) :-D 

त्याकाळी बिली वाईल्डरला मेरिलीन मन्रोसारखी कमालीची मादक अप्सरा हिराॕईन म्हणून मिळूनसुद्धा, खूपच 'संयमी सीन्स' घ्यावे लागले होते. काही ठिकाणी सूचक दृश्यं तर प्रामुख्याने रिचर्डला जे वाटतं ते - 'केवळ त्याच्या तिच्याविषयीच्या फँन्टसीज'- म्हणून स्वप्नदृश्य असल्यागत!!..पण तरी अर्थातच धमाल येते हा मूव्ही बघताना!..

ओपनिंग सीन धमालच. कुणाच्या तरी आवाजात कमेंटरी-"मॕनहॕटन बेटाचा इतिहास. त्या प्राचीन काळी तिथे राहणारे मॕनहॕटन(रेड) इंडियन्स दर उन्हाळ्यात आपापल्या बायकोमुलांना उकाड्यापासून दूर थंड ठिकाणी सुट्टी घालवायला पाठवत असत..आणि मग बेटावर एकटे राहात सापळे रचून, सावज हेरून शिकार करत असत" (या ठिकाणी वल्कलं नेसून चाललेल्या एका टंच तरुणीच्या मागे ते सर्व इंडियन्स जाताना दाखवलंय!) वगैरे....आणि आता 500 वर्षांनंतरही साधारणपणे तीच परंपरा चालू दिसत्येय...इतर सर्व माणसांसारखंच रिचर्डसुद्धा आपल्या बायकोला हेलेनला (एव्हिलिन कीज) आणि मुलाला, रिकीला समर व्हेकेशनसाठी स्टेशनवर सोडायला आलाय. मुलाने स्पेससुट घातलाय..रिचर्ड मुलाला टाटा करत पापी घेण्यासाठी त्याच्या डोक्यावरचं ते हेल्मेट सरकवायला जातो तर ते कार्ट बोंबलतं "माॕम..लूक..ही इज कटींग आॕफ्फमाय आॕक्सिजन"..चरफडतच रिचर्ड दोघांना टाटा करतो आणि गडबडीत तिथेच राहिलेलं वल्हं घेऊन आपल्या आॕफिसमधे जातो..

संध्याकाळी घरात एकटा असताना हेलेनने जाताजाता बजावल्याप्रमाणे सिगारेट-दारुपासूनही त्याला दुर राहायचंय ...त्यामुळे तो ते सगळं नजरेपासून दूर लपवून ठेवतो.. स्वतःशी बोलत स्वतःच्या मनाला समजावतोय "मना मना बन दगड"चा जप करतोय...तेव्हढ्यात  त्याच्या अपार्टमेंटची बेल वाजते आणि एका मादक सुंदरीचं (मेरिलिन मन्रो) अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर राहण्यासाठी आगमन होतं!..तिच्या पहिल्याच बेफाट मधाळ दर्शनाने रिचर्ड विरघळलाय
 हे कळतं...

तो घराच्या टेरेसवर काही लिहायला बसतो. तिथे त्याला,"त्याची बायको (हेलेन) समोर बसून काही ऐकवत्येय"- असे भास होतात..तिचा आलेला फोन संपवून तो वळणार तेव्हढ्यात वरच्या मजल्यावरुन एक कुंडी धाड्कन खाली पडते. ती नवीन आलेली तरुणी झाडांना पाणी घालत असताना तो अपघात घडलेला असतो. ती माफी मागते.. जुजबी बोलणं होताहोता रिचर्ड तिला ड्रिंक्ससाठी घरी बोलावतो. ती येते...

आणि मग धमाल घडायला सुरुवात... रिचर्ड जरी एकीकडे हेलेनशी एकनिष्ठ असला तरी ह्या मदमस्त तरुणीचं सौंदर्य त्याची विकेट घेऊन गेलंय...

तिचा सहवास हवाहवासा वाटत असताना मधेमधे त्या अपार्टमेंटच्या सफाई कर्मचा-याचं मधेमधे टपकणं त्याचे प्लॕन्स बिघडवत असतं..एकत्र पियानो वाजवत असताना तिचं चुंबन घेण्याच्या त्याचा प्रयत्नही फसतो..

तिकडे सुट्टीसाठी गेलेल्या हेलेनला दुसरा एक रुबाबदार तरुण भेटलेला असतो..आणि रिचर्डने तिच्यासाठी फोन केल्यावर ती त्या तरुण लेखकाबरोबर फिरायला गेल्याचं कळून रिचर्ड मग "च्यॕयला, मग आपण तरी का ह्या तरुणीपासून दूर पळावं? आपणही करु जरा मजा!" असं म्हणून तिच्याबरोबर मजा करायला जातो...

पुढे काय होतं?..टाॕम घरी टपकतो तेव्हा रिचर्ड आणि त्या तरुणीचं बिंग फुटतं का?..रिचर्ड "किस हद तक आगे" जातो?..हेलेनला कळतं का? सिनेमाचा शेवट??.

सगळं सांगत नाही..पण मेरिलीन सारखी अफाट हाॕट्ट तरुणी आसपास असताना "काय घडू शकतं" त्याची धम्माल कथा!..लग्न झालेल्या साध्या, सरळ, सज्जन, भित्र्या आणि भिडस्त पुरुषाच्या आयुष्यात, लग्नाला सात वर्षं उलटल्यावर एक चिकणू तरुणी येते आणि -"ती पाहताच बाला..." होऊन नंतर काय मजेशीर प्रसंग घडतात त्याची ही हलकीफुलकी कहाणी!

अवश्य पाहा!..पाहाच्च!!

No comments:

Post a Comment