विवाहितांचं प्रेम!
--------------
Sometimes magic is the only thing real! प्रेमात पडलेल्यांसाठी किती छान वाक्य आहे हे नं? हा सिनेमाही तसाच...हळूहळू प्रेम रुजत...फुलत...झिरपत नेणारा...प्रेम कुणाला आवडत नाही? मी तर बुवा कायमच प्रेमाच्या प्रेमात! आणि अख्खा सिनेमाच प्रेमाचा म्हटल्यावर तर दिल खुष! प्रेम ही अगदीच सहजस्फूर्त रुजून, अंकुरुन येण्याची बाब! ते अचानकच होतं. कधीही जडतं. कुणावरही. मग ते व्यक्त करणं आणि त्याची परिणीती ज्याने त्याने अनुभवण्याची बाब! तश्यात जर ते लग्न झाल्यावर आपल्या पार्टनरखेरीज दुसर्या कुणावर जडणारं असेल तर? तर मग - त्यातली घालमेल आणि त्यातले प्रॉब्लेम्स जरा काँम्प्लिकेटेडेच नै का?... भारतात असं लग्नाळलेल्या पुरुषाने लग्नाळलेल्या स्त्रीच्या प्रेमात पडणं त्यांच्या घरच्यांना सोडाच, समाजालाही मान्य होणं कठीण!.. पण युरोप, अमेरिकेत मात्र हे घडत आलंय आणि ते त्यांच्या शेकडो सिनेमांतनं अगदीच सहजपणे दिसत राह्यलंय. "फॉलिंग इन लव्ह" हा अशा विवाहित स्रीपुरुषांच्या प्रेमाची गोष्ट सांगणारा १९८४ सालचा गोड सिनेमा!! आणि त्यातल्या प्रेमीजीवांच्या भूमिकेत तरणाबांड "रॉबर्ट डी निरो" आणि आपल्या नूतनसारखा अत्यंत बोलका चेहेरा असणारी गोड "मेरील स्ट्रीप" असल्यावर तो सुंदर अनुभव कोण मिस्स करेल?
-----------------
आर्किटेक्ट फ्रँक रॅफ्टीसचं (रॉबर्ट डी निरो) लग्न झालंय आणि त्याला दोन मुलंही आहेत. कमर्शिअल आर्टिस्ट मार्गरेट 'मॉली' गिल्मोरसुद्धा (मेरील स्ट्रीप) विवाहित आहे. दोघंही न्यूयॉर्कच्या वेस्टचेस्टर भागात राहतायत आणि ट्रेनने कामासाठी ये-जा करतायत. क्रिसमसच्या धामधुमीत आपापल्या जोडीदारासाठी शॉपिंग करताना, त्यांची एका पुस्तकांच्या दुकानात हिंदी पिक्चरस्टाईल गाठ पडते. आपापली खरेदी उरकून पैसे देऊन वळताना टक्कर आणि मग हातातलं सामान खालती पडणं आणि उचलताना पॅकेटची अदलाबदल होणं वगैरे.... दुकानातून निघून आपापल्या मार्गाने जाताना "मेरी ख्रिसमस" म्हणून विश करून निघताना, क्षणभरासाठी दोघांची एकमेकांत अडकलेली नजर...आणि शेवटचं वळून एकमेकांकडे पाहून निघणं..त्यातच बहुदा कुठेतरी त्या क्षणापुरतं का होईना पण एकमेक आवडून गेल्याची अगदीच क्षणिक, अत्यंत पुसटशी जाणीव?... नंतर जोडीदारासाठी प्रेझेंट उघडल्यावर लक्षात आलेला घोटाळा...
एकाच शहरात कामाला असताना दोघांचं एकमेकांजवळ येणं आणि तरीही भेट हुकणं मग ती कधी स्टेशनवर असो की कधी टेलिफोन बुथवर...तर कधी रेस्तराँमध्ये...पण एकदा त्यांव्या ट्रेनच्या रुटीनमुळे दोनतीन महिन्यांनंतर पुन्हा एकाच डब्यात असणं. पुन्हा क्षणिक नजरानजर. तिने त्याला ओळखलेलं नाही, पण त्याला ती आठवते! (पुरुष सहसा नाहीच विसरत गोड चेहेरे! :-) ) ..ट्रेनमधून उतरल्यावर तो तिला गाठतोच. आधी कुठेतरी बघितल्याचं सांगतो.."बुकस्टोअर" म्हटल्यावर मात्र तिची ट्यूब पेटते! "हो की..हाच तर होता तो!"..अत्यंत सहज गोड हसत तिने त्याला एक्नॉलेज करणं. त्याने तिची चौकशी केल्यावर निरागसपणे तिच्या तोंडून "माझं लग्न झालंय" असे उदगार येणं....मात्र तिला त्याच्याशी बोलायला आवडतंय... त्यांच्या ट्रेनमध्ये भेटी होत राहणं... त्यात त्याने सहजच तिला उद्या येणार का विचारणं आणि तिनेही ना राहवून हळूच हिंट देणं ..
"Will you be coming in tomorrow?
No.
I mean, I'm not... This is not... wasn't trying to, you know. I thought maybe we could ride in together..."
"I am sorry"
(ती काहीच उत्तर देत नाही. तो वळून जायला निघतो.)
......अचानकपणे ती पुटपुटते - "Friday. I think I'm coming in Friday"
"Friday?"
"On the 9:04, I usually..."
"This Friday?" ( तो हरखलाय!)
"Yes"
"Bye"
"Bye"
...आणि मग तो शुक्रवार उजाडलाय. तो बायकोबरोबर कारने निघालाय. तिच्या संथ ड्रायव्हींगने तो हैराण.
"मी चालवू का कार?"
"का काय झालं?"
"लेट होतोय मला. ट्रेन चुकेल माझी."
"मग लवकर निघायचं होतंस. उठलास तर होतास कधीचाच!" ... तो गप्प!...
आणि ट्रेन प्लॅटफॉर्मवर आल्ये. मॉली खिडकीतून अस्वस्थ होऊन फ्रॅंक दिसतोय का बघत्ये. तिच्या बघण्यात कमालीची ओढ...उत्सुकता. आणि तो येतो. शेजारी. ती सुखावते.
...दोघं बरोबर चालतायत...
"तू खूप सुंदर दिसतेस...अं ... आपण लंचला जाऊया?"
"लंच?"
"हो..म्हणजे...."
"माझं लग्न झालंय"
"माझंही लग्न झालंय.... आणि... लग्न झालेल्यांना भूकही लागतेच नं?"... आणि मग तिला गोड हसत लंचसाठी होकार द्यायलाच लागतो...
लंचदरम्यानचं त्याचं बडबडणं आवडतंय तिला... त्याला कळतंय की तो जरा ज्यास्तच बडबड करतोय..तो तसं बोलूनही दाखवतो तिला-
"याला काय अर्थ आहे? मीच बडबड करतोय. तू गप्पच आहेस?!!...आता मी गप्प बसतो. तू बोल..."
"काय बोलू? तुला काय समजून घ्यायचंय माझयाविषयी?"
"वजन काये गं तुझं ?"...या त्याच्या क्रेझी प्रश्नावर मग तिचं खळाळून गोड हसणं...
पुढे फ्रॅंक आपल्या दोस्ताला आणि मॉली आपल्या मैत्रिणीला या नवीन मैत्रीतल्या "गुंतण्याची" कबुली देतात. मॉली तर फारच छान शब्दांत सांगते मैत्रिणीला,"तो मित्र आहे बस्स. पण त्याच्याबरोबर असताना खूप छान वाटतं मला. आपण कुणीतरी भारी असल्याचं फिलिंग! त्याच्याबरोबर राहायला आवडतं. त्याच्याविषयी विचार करायला आवडतं. आम्ही काय काय धमाल करतो. खूप हसतो. खरं तर मी त्याला विशेष ओळखतही नाही. पण तरी त्याच्याबरोबर असायला आवडतं...."
गंमत म्हणजे दोघांचेही रिस्पेक्टिव्ह दोस्त त्यांना ती नवी 'रिलेशनशिप' मनापासून एन्जॉय करण्यासाठी प्रोत्साहन देतात...दोघांचं गुंतणं तरल...हळुवार होत जातं....
मॉलीचे वडील आजारी आहेत त्यांच्या हॉस्पिटल-घर अशा वाऱ्या चालू आहेत आणि त्यासाठी मॉलीचं शहरात येणंसुद्धा!!... पण तिला आता फ्रॅन्कला भेटण्याचीही ओढ आहे. सतत एकमेकांचा विचार असतोय दोघांच्याही डोक्यात! एका मोहभरल्या क्षणी दोघं एकांतात जवळही येतात. पण मॉलीला पूर्ण एकरूप होणं जमत नाही. त्यांचं एकमेकात गुंतणं...फोन्स मात्र सुरु.... त्याचं तिला विचारणं? आता पुन्हा भेट कधी? उद्या? परवा? पुढच्या आठवड्यात? आठवड्यातून किती वेळा? तो पागल झालाय..त्याला नाहीच राहवत तिला भेटल्याशिवाय....
पण दरम्यान मॉलीचे वडील आजारपणाने जातात. मॉली उध्वस्त. पण तिची बिघडलेली मनःस्थिती केवळ वडिलांच्या जाण्यामुळे नाहीये. तर तीही गुंतल्ये फ्रॅन्कमध्ये! खूप. खूप तीव्रतेनं!
ती तसं बोलूनही दाखवते मैत्रिणीला-
"मी सतत त्याचा विचार करत असते. सतत. रोज!! झोपताना शेवटी त्याचाच विचार असतो मनात! आणि सकाळी उठल्यावर पहिला विचारही त्याचाच! त्याच्याविषयी स्वतःशी बोलत असते मी दिवसभर! इतरांशी बोलत असते तेव्हाही तोच असतो मनात. आता तुझ्याशी बोलतानाही तो आहेच मनात. ब्रायनला वाटतंय बाबा गेल्याचा धक्का बसलाय. पण नाही. पण मला काही झालेलं नाही. फक्त प्रेमात आहे गं मी त्याच्या. खूप प्रेम करत्येय मी त्याच्यावर. आम्ही एकरूप व्हायला हवं. त्याने बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. मला वाटतं नियतीनेच आम्हाला एकत्र राहण्यासाठी जवळ आणलंय, तसं शक्य नसूनही!...." ---- हा सीन फारच सुंदर केलाय मेरील स्ट्रीपने!!
तिकडे फ्रॅंक हैराण. आणि त्याची उद्विग्नता बघून त्याची बायको हैराण. शेवटी एकदाचा तो तिच्यासमोर मॉली भेटल्याची कबुली देतो. पण त्यांच्यात "तसं काही घडलं नसल्याचं वारंवार सांगतो. अर्थातच त्याच्या बायकोला ते पटणं शक्यच नसतं. त्याच्या संसाराचं काय होतं?
मॉली न राहवून नवऱ्याला सांगते. मग तिच्या संसाराचं काय होतं?
फ्रॅंक आणि मॉली शेवटी एकत्र येऊ शकतात का?
No comments:
Post a Comment