Monday, 14 June 2021

अर्नाळकर...

अर्नाळकरांच्या जयंतीदिनानिमित्तानं...
------------
माटुंग्याच्या लोकमान्य नगरातल्या 'माझे आज्जी-आजोबा, तीन काका आणि आम्ही अशा भल्यामोठ्या जाॕईंट फॕमिलीपैकी' सर्वात आधी माझे वडिल आम्हाला घेऊन बोरिवलीला शिफ्ट झाले! पण तरी माझी माटुंग्याची ओढ कायम होती. तर तिथे लोकमान्य नगरबाहेरच्याच फूटपाथवर उसाच्या रसाच्या गु-हाळासमोर एक पुस्तकविक्रेता बसलेला असायचा. त्याच्याकडे मी माझ्या लहानपणीच आजोबा, काकांबरोबर बोट धरुन फिरताना "चार आणे कथामाला"मधली बाबूराव अर्नाळकरांची पुस्तकं बघितल्याचं लख्खं आठवतंय! पुढे बोरिवलीला शिफ्ट होऊनही माटुंग्याला राहायला यायचो, तेव्हा बाबुराव अर्नाळकर वाचले ते मात्र त्याच फूटपाथच्या अपोझीट असणा-या "श्री सर्क्युलेटींग लायब्ररी"तनं!!..तसं माझ्या लहानपणापास्नंच प्रचंड पुस्तकांचा साठा घरी असला तरी डिटेक्टिव्ह/ रहस्यकथा घरच्या संग्रहात नव्हत्या!

पण त्या "श्री सर्क्युलेटींग लायब्ररी"नं अनंत उपकार केले!!..तिथली एक्झॕक्ट स्कीम आठवत नाही म्हंजे डिपाॕझीट किती होतं वगैरे पण जसं चार आणे/ आठ आणे तासाला सायकल भाड्यानं मिळायची तशीच छोटी डिटेक्टिव्ह पुस्तकं चार आणे दिले की वाचायला मिळायची! (सत्तरीच्या दशकात!). तिथे मी बाबुराव अर्नाळकरांचे झुंजार, धनंजय, काळापहाड तर वाचलेच पण त्याहीपेक्षा गुरुनाथ नाईकांचे गरुड उर्फ मेजर अविनाश भोसले, कॕप्टन दीप, शब्दवेधी सूरज, गोलंदाज उदयसिंग चौहान यांच्या रहस्यकथा तर शेकड्यांनी वाचल्या...पुस्तक घरी आणलं की दोन तासात फडशा पाडला की पुन्हा घरुन चार आणे घेऊन मी आपला सोसायटीसमोरच्या श्री सर्क्युलेटींग लायब्ररीत हजर!😊...लोकमान्यमधे राहायला असेपर्यंत हा उद्योग चालायचा. मग तिथेच एस.एम.काशीकर, वाळींबे वगैरे लेखकांच्याही रहस्यकथा वाचल्या...मग इतर कॕरॕक्टर्स धुमकेतू, रातराणी, तिरंदाज धर्मेंद्र, चकणा डोळा आस्मानात उडवणारा घंटाकर्ण वगैरेही जवळचे झाले. (मग ती सगळी डिटेक्टीव्हज 'संपवल्यावर' मी माझा मोर्चा "आर्चीज" "लोन रेंजर" "सॕड सॕक" च्या काॕमिक्सकडे वळवला होता!..आजतागायत सॕड सॕकची काॕमिक्स माझ्या प्रचंड आवडीची आहेत!)

त्याकाळात म्हणजे आजोबा असेपर्यंत आमचं आमच्या पेठ्यांच्या गावी (दापोलीतलं फणसू) ब-यापैकी जाणं व्हायचं! तिथे आजोबांच्या भावांची..म्हंजे माझ्या चुलत आजोबांची दोन घरं होती..एक वरच्या बाजूला गाडीरस्त्याजवळ आणि दुसरं खालती दरीत...तर तिथल्या खालच्या दरीतल्या जुन्या घराचं खूपच आकर्षण होतं.. तिथे एका सुट्टीत राहायला गेलो असताना  लाकडी अंधारा जिना चढून माळ्यावर (आजकालच्या भाषेत attic) चक्क एक पुस्तकांचं कपाट तेही डिटेक्टिव्ह पुस्तकांनी खच्चून भरलेलं मिळालं...मग काय?..त्या मे महिन्यात डोळ्यांसमोर सतत नाचणा-या केंबरांची (चिलटं) पर्वा न करता ते अख्खं कपाटभरुन असलेल्या डिटेक्टिव्हजचा फडशा पाडला होता...तिथेही अर्थातच कॕप्टन दीप, गरुड आणि सूरजचूया जोडीला झुंझार, काळापहाड होतेच्च!!

त्याच काळात हडपांच्या शिवकालातल्या ग्रेट गुप्तहेर बहिर्जी नाईकाच्याही रहस्यकथा आवडून गेल्या होत्या!!

पुढे काॕलेजकाळात मग इंग्लीश स्पाय थ्रीलर्सनी गारुड केलं...जाॕन ल करे, राॕबर्ट लडलम, जेम्स हॕडली चेस, फाॕरसिथ, मला खूप आवडणारा केन फाॕलेट आणि अर्थातच्च आॕल टाईम ग्रेट्ट अॕगथा ख्रिस्तीचे हर्क्युल प्वाॕरा आणि मिस्स जेन मार्पल.

आणि मग डिटेक्टिव्ह मूव्हीज बघितले ते फ्रेंच डिटेक्टिव्ह OSS117 आणि ब्रिटीश डिटेक्टिव्ह 007 आणि अमेरिकन डिटेक्टिव्ह टेलिव्हिजन सिरीयल रेमिंन्ग्टन स्टील सुद्धा भलतीच आवडलेली!

ह्या काही आठवणी तरळल्या डोळ्यांसमोर आज अर्नाळकरांच्या जयंतीनिमित्तानं...

No comments:

Post a Comment