सणसणीत जिजीविषा जागवणारा मूव्ही!!
------------------------
सध्या रोज रात्री 12 ते 2.30 पर्यंत मूव्ही बघत असतो मी! बहुतांशी 1940s/50s/60s मधले हाॕलीवूड क्लासिक्स!
आत्ताच एक अशक्य ग्रेट, अद्भूत, अफाट, विलक्षण मूव्ही पाहून तृप्त झालो!! 1946 सालचा "It's a wonderful life!"...खूप भरुन आलं!..रडलो याचा शेवट बघताना!...न राहवून या मूव्हीविषयी सांगावंसं वाटतंय! बोलावंसं वाटतंय! एका वाक्यात सांगायचं तर "कोणालाही डिप्रेशन विसरायला लावेल असा हा मूव्ही आहे!!!" ;-)
काळजात घुसणारा...आपल्या मनात आपल्या कुटुंबाविषयी, आपल्या जवळच्या सर्व मित्रमैत्रिणींविषयी, आपल्या परिचितांविषयी जबरदस्त प्रेम जागवणारा...नकळतच आपल्यातले अनुबंध जागवणारा...😍
याची सुरुवात एकदम हट-के! 'बेडफर्ड फाॕल्स' गावातली क्रिसमसची आदली रात्र! घराघरातनं जाॕर्ज बेलीसाठी प्रार्थना ऐकू येतायत. तो अडचणीत आहे, आपत्तीत आहे म्हणून त्याला वाचवण्यासाठी घराघरातनं परमेश्वराची विनवणी केली जात्येय...आणि तो सगळा प्रार्थनेचा आवाज अवकाशस्थ देवापर्यंत पोहोचतो. तो आपल्या सहाय्यकाला चित्रगुप्ताला...सिनेमा इंग्लीश तर इथे चित्रगुप्ताचं नाव जोसेफ! ;-) ...जोसेफला पृथ्वीवर काय गडबड चालल्ये ती बघायला सांगतो...जोसेफ सांगतो की जाॕर्ज बेली अडचणीत आहे..
देव म्हणतो,"हो तर..आजची रात्र त्याच्यासाठी आणीबाणीची रात्र आहे...पाठवू आपण कुणालातरी मदतीसाठी. कोण आहे अॕव्हलेबल?"...
"क्लॕरेन्स आहे सर"
"बोलव त्याला"
क्लॕरेन्स येतो.
"मला बोलावलंस देवा?"
"हो...पृथ्वीवर जा. जाॕर्ज बेलीला आपल्या मदतीची गरज आहे"
"ओके देवा. पण मी हे काम फत्ते केल्यावर मला पंख मिळतील ना?
"हो..हो..जरुर!आणि काये ते पुस्तक हातात?"
"अॕडव्हेंचर आॕफ टाॕम साॕयर देवा"
"ठीकै ठीकै..जा आणि कर मदत जाॕर्जला!"..
या संवादानंतर आपल्यासमोर जाॕर्ज बेलीचं (जेम्स स्ट्युअर्ट) बालपणापासूनचं आयुष्य उलगडत जातो. परोपकारी जाॕर्ज सततच दुस-यांच्या मदतीला धावून जाणारा..मोठा झाल्यावर लहान भावासाठी सॕक्रीफाईस करणारा...गरीबांना आपल्या कंपनीतर्फै कायमच पैशाची मादत करणारा...मेरीच्या (डाॕना रीड) प्रेमात पडून लग्न करुन संसार थाटतो..चार कच्चीबच्ची होतात...पण आर्थिक आपत्ती येते..गावातला श्रीमंत दुष्ट माणूस मदतीच्या बदल्यात जाॕर्जची कंपनी घशात घालू पाहतो...जाॕर्ज मनातनं उध्वस्त होतो...आणि पुलावरुन खालच्या उधाणलेल्या नदीत उडी मारुन जीव देणार तितक्यात देवदूत क्लॕरेन्स (त्याचा गार्डियन एंजल) तिथे पोहोचतो...
आणि मग एकाहून एक विलक्षण आणि अद्भूत प्रसंगांची मालिकाच तयार होते...त्यादरम्यान जाॕर्जने वैतागून उद्गारलेल्या वाक्यावर तथास्तू म्हणून देवदूत क्लॕरेन्स त्याचं पृथ्वीवरचं आयुष्य/ अस्तित्वच पुसून टाकतो..Erase करतो!...आणि जाॕर्जला धक्क्यामागून धक्के बसायला सुरुवात होते....त्याची ओळखच पुसली गेल्यामुळे अस्तित्वच, संपल्यामुळे ना त्याचे मित्र ओळखत ना गावातले कुणी.....मेरीचं त्याच्याशी लग्नच झालेलं दिसत नाही..अर्थातच चारही मुलांचं अस्तित्वच नसतं आयुष्यात...
पुढे काय प्रसंग गुदरतात? बायकोचं काय होतं? त्याची आयडेंटिटी परत मिळते का? मुलं भेटतात का?..आसपासचे भेटतात का? ओळखतात का?..त्याच्या कंपनीवरचं किल्मिष दूर होतं का? त्याची आत्महत्या वाचते का?..सिनेमाचा शेवट हेलावून टाकणारा....हृदयात घुसणारा...
जेम्स स्ट्युअर्टची अफाट भूमिका!..फ्रँक काप्राचा दिग्दर्शक म्हणून मास्टरपीस!!! चुरचुरीत डायलाॕग्ज! विशेषतः जाॕर्ज मेरीची भेट...प्रेम..लग्न...घडतानाचे प्रसंग धमालच!
मला या मूव्हीजचा जबरदस्त इंम्पॕक्टींग पार्ट काय वाटला असेल तर तो हा की कसलाही आव न आणता हा मूव्ही आपल्याला काही गोष्टी अगदी नकळत, अत्यंत सहजगत्या मनावर बिंबवतो - उदाहरणार्थ -
छोटं का असेना पण आयुष्यात चांगलं काम करा...आसपास वाईट माणसं असतात त्यांच्याकडे लक्ष न देता दुस-याला जमेल तशी मदत करा...चांगुलपणाने वागा...समोरच्यावर प्रेम करा...मग बघा आपलंही चांगलंच होईल, आपल्यालाही प्रेम मिळेल!..
No comments:
Post a Comment