Monday, 14 June 2021

सब्रिना

सब्रिना
-----
ह्याआधी दिग्दर्शक बिली वाईल्डरचे "सेव्हन ईयर इच्च" आणि "निनोच्का" पाहिले होते. विनोदी शैलीतला रोमॕन्स पेश करण्याची त्याची शैली धम्मालच! "सब्रिना" हा १९५४ सालचा मूव्ही त्याच जातकुळीतला! हंफ्रे बोगार्ट आणि आॕड्री हेपबर्नबरोबर विल्यम होल्डन, वाॕल्टर हेम्प्डन आणि जाॕन विल्यम्सची धमाल टीम! खुसखुशीत संवादांमधनं फुलत जाणारी एका अल्लड मुलीची प्रेमकथा!

आॕलीव्हर लॕरॕबी (वाॕल्टर हेम्प्डन) हा धनाढ्य उद्योगपती. त्याला दोन मुलं - मोठा अविवाहीत लायनस (हंफ्रे बोगार्ट) आणि धाकटा तीन वेळा घटस्फोटीत डेव्हीड (विल्यम होल्डन). मूव्ही सुरु होतो तेव्हा लॕरॕबीच्या भव्य इस्टेटवर पार्टी चालू आहे. लॕरॕबीच्या आठ गाड्यांची निगा राखणारा शोफर थाॕमस फेअरचाईल्ड (जाॕन विल्यम्स) आपली गोड, अल्लड मुलगी सब्रिनाबरोबर (आॕड्री हेपबर्न) तिथेच गॕरेजच्यावरच्या प्रशस्त खोल्यांमधे राहतोय. सब्रिना लहानपणापास्नं तिथेच वाढल्येय आणि सोनेरी केसांच्या डेव्हिडच्या प्रेमात आहे. त्याचं तीनवेळा लग्न होऊन घटस्फोट झाले असले तरी तिनं ते कधीच मनावर घेतलेलं नाही. तिच्या मनीचा डेव्हिडच राजकुमार आहे. भले तो उच्छृंखल आहे, बिझीनेसमधे लक्ष न घालता मुलींमागे पळणारा आहे तरी!..डेव्हीडचा मोठा भाऊ लायनस ने (हंफ्री बोगार्ट) मात्र पूर्णपणे लॕरॕबी फॕमिलीच्य प्रचंड उद्योगाची धुरा सांभाळल्येय. त्याला डेव्हिडची गुलझारवृत्ती पसंत नसली तरी त्याचं प्रेम आहे भावावर.

रात्रीची पार्टी गॕरेजजवळच्या झाडावरनं बघणारी सब्रिनाची नजर पार्टीतल्या डेव्हिडवर खिळून आहे...त्याचं पार्टीतल्या तरुण मुलीबरोबर नृत्य करणं, तिला चोरुन टेनिस कोर्टवर भेटून आलींगन देणं हे सगळं सगळं सब्रिना भान हरपून बघत्येय..तिचं डेव्हिडच्या प्रेमात असणं शोफर वडिलांना अर्थातच पसंत नाही.

आपल्यासारख्या गरीब नोकराच्या मुलीनं अशी स्वप्नं पाहणं चुकीचं हे तिला ते बोलून दाखवतात..,त्यांचे एक दोन डायलाॕग्ज भारी आहेत -"Democracy can be a wickedly unfair thing Sabrina! Nobody poor was ever called democratic for marrying somebody rich."...आपण त्शेवटी मालकाचे साधे नोकर आहोत हे सांगतानाही त्यांचं हे सिंम्पल वाक्य परिणामकारक आहे - "I like to think of life as a limousine. Though we are all riding together, we must remember our places. There's a front seat and a back seat and a window in between."...तिला डेव्हीडपास्नं दूर ठेवण्यासाठी त्यांनी तिला पॕरीसला "शेफ" च्या कोर्ससाठी पाठवायचं ठरवलंय! हे कळल्यावर सब्रिना तडकाबडकी गॕरेजमधे जाऊन धडाध्धड सगळ्या कार्सची इंजिन्स सुरु करुन येणा-या धुरातनं/ कार्बन डायाॕक्साईडनं गुदमरत आत्महत्येचा प्रयत्न करते..पण नेमका लायनस तिथे येऊन तिला वाचवतो...अर्थातच तिला पॕरीसला जावं लागतं...

...दोन वर्षं पॕरीसमधे राहून कोर्स संपवून सब्रिना परतते तीच एकदम कात टाकून! तिचा माॕडर्न आवतार, स्टायलीश राहणी ह्यामुळे आधी तिला कुणी ओळखतच नाही! स्टेशनवर ती वडिलांची वाट बघत ऊभी असताना, शहरात कुणी नवीनच आलेलं पाखरु समजून तिच्यावर डोरे टाकायला आलेला डेव्हिडही तिला ओळखू शकत नाही..आणि ओळख पटल्यावर मात्र पुरता गार होऊन तिच्यावर लट्टू होतो..आपलं चौथं लग्न एका धनाढ्य उद्योगपतीश्या मुलीशी ठरलेलं असूनही सब्रिनात गुंतून जातो...पुन्हा एकवार सब्रिनाचे वडिल तिला सावध करतात..पण आता सब्रिनाचा आत्मविश्वास वाढलाय -

सब्रिनाचे वडिल - "He's still David Larrabee, and you're still the chauffeur's daughter, and you're still reaching for the moon."

सब्रिना - "No, father. The moon's reaching for Me!"..

दरम्यान लायनसचा रोल ख-या अर्थानं सुरु होतो..वडीलालांना पसंत नसणारं हे डेव्हिड आणि सब्रिनाचं प्रेमप्रकरण खुबीने हाताळताना तो स्वतःच सब्रिनाच्या प्रेमात पडतो आणि प्रेमाचा त्रिकोण सुरु होतो...त्याला सब्रिना आवडल्येय पण तिचं प्रेम डेव्हिडवर...

मूव्ही पुढे सरकताना डेव्हिडने सब्रिनासाठी पॕंटच्या खिशात मागे वाईनचे ग्लासेस लपवून नेणं...पण नंतर खूर्चीवर बसताना त्या ग्लासेसचा चक्काचूर होत त्याचे कुल्ले जायबंदी होणं, सिनीयर लॕरॕबींची ग्लासमधलं आॕलीव्ह काढण्यासाठी चाललेली झटापट...पॕरिसहून परतल्यावर डेव्हिडबरोबर घरी येत असताना त्याने न ओळखल्यामुळे सब्रिनाने त्याची घेतलेली फिरकी... वगैरे हलकेफुलके प्रसंग धम्माल आणतात. (ती बिली वाईल्डरच्या दिग्दर्शनातली खासियत!)

पुढे मूव्ही काय वळण घेतो? वडिलांच्या इच्छेविरुद्ध लायनस आपलं प्रेम विसरुन धाकट्या भावाची जोडी सब्रिनाबरोबर लावून देण्यात यशस्वी होतो का? वडिलांना पसंत नसताना त्यांच्या घराण्यात एका शोफरची मुलगी सून म्हणून येते का?..याची उत्तरं मिळण्यासाठी सब्रिना पाहायलाच हवा! 

असं म्हणतात की शूटींगच्या काळात  बोगार्टचं आॕड्री आणि होल्डींग दोघांशीही फारसं जमत नव्हतं पण त्याचा परिणाम त्याने सीनमधे कुठेही होऊ दिला नाही..या मूव्हीदरम्यान आॕड्री आणि होल्डींग एकमेकांच्या प्रेमात पडले होते. आॕड्रीचं वय तेव्हा २४ होतं, होल्डींग ३५ चा होता तर बोगार्ट ५३ वर्षांचा!

कृश, हडकुळ्या शरीरयष्टीची आॕड्री हेपबर्न दिसल्येय मात्र कमालीची गोड आणि सब्रिनाचा अल्लडपणा...भावूक प्रेमात झोकून देणं..नटखटपणा तिने अफलातून रंगवलाय!..विल्यम होल्डींगचा गुलछबू डेव्हिड मस्त आणि हंफ्री बोगार्टचं काय विचारता?..मुळात कॕरी ग्रँन्टसाठी टेलरमेड असणारा हा रोल त्यच्याकडे चालत आला..त्याने रंगवलेला प्रौढ पण नेमक्या वेळेला गंमतीदार पंच टाकणारा मिश्कील लायनस बघण्यासारखाच!!

No comments:

Post a Comment