--------
"आज आवराआवरी करताना कपाटाच्या तळातून जुनी दुर्मिळ कात्रणं मिळाली आणि त्यातच चक्क होता "खास ३० अंक" ! १८ जून १९९२ ला माझ्या लाडक्या "म.टा" चा ३० व्वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने काढलेला तो "खास ३० अंक" !! "म.टा" वर भरभरून प्रेम करणाऱ्या "पु.लं, कुसुमाग्रज, शांताबाई, पाडगावकर, जॉर्ज फर्नांडीस, दि.वि .गोखले, अशोक शहाणे, वसंत बापट, ना. धो. महानोर, राम कापसे, भीमसेन जोशी, विठ्ठलराव गाडगीळ, वसंत गोवारीकर, मधुमंगेश कर्णिक, प्रमोद नवलकर, रजिया पटेल, सेतुमाधवराव पगडी, सुधीर रसाळ, गंगाधर पानतावणे, माधव गडकरी" अश्या अनेक थोर मान्यवरांचे "म.टा" विषयीच्या भावना आणि जिव्हाळा व्यक्त करणारे लेख असणारा हा अंक माझ्यासारख्या "म.टा" च्या पंख्यांसाठी 'किंमती ठेव' च आहे. .
माझ्या आठवणीतला "म.टा" म्हणजे माझ्या बाल्यावस्थेतला! माटुंगा रोडच्या घरात आमचं एकत्र कुटुंब होतं आणि अगदी पहिल्यापासून"म.टा" यायचा. पहाटे दारावरची बेल वाजली की "म.टा" हातात घेणाऱ्या पहिल्या माणसाभोवती सगळे चहासकट जमा व्हायचे आणि मग तो "म.टा"च्या बोल्ड टाईपचे मथळे मोठ्याने म्हणायचा - त्या पहिल्या कानावर पडणाऱ्या बातम्या होत्या! थोडक्यात म्हणजे मी, मला "वाचता" यायला लागण्याच्या खूप आधीपास्न "म.टा" 'ऐकायला' सुरुवात केली होती आणि तेव्हापासून आजतागायत माझा दिवस "म.टा"च्या साथीनेच उजाडतो! वसंत बापटांनी "म.टा" साठी अत्यंत समर्पक असं - "पत्र नव्हे मित्र" हे कॅप्शन दिलं आणि खरंच, हा असा एक मित्र आहे की जो मला आवडणाऱ्या प्रत्येक विषयावर माझ्याशी बोलतो.
"म.टा" बद्दल काव्यमय बोलायचं तर मी म्हणेन -
सोबत ह्याची मिळता जीवनी,
क्षण क्षण पुलकित झाला
हितगुज करण्या अलगद दारी,
'मित्र' पत्र होऊनी आला !!"...
कुसुमाग्रज "म.टा"चं वर्णन "वैचारिक व्यासपीठ" असं करायचे! तर पु.लं नी "म.टा"ला 'पत्रही आणि मित्रही' असं म्हणत! पु.लं नीच म्हटलं होतं की - "वर्तमानपत्रे निरनिराळ्या कारणांसाठी वाचली जातात पण अग्रलेख वाचण्यासाठी वाचक "महाराष्ट्र टाईम्स"च पसंत करतात", त्या दृष्टीने "म.टा" हे वृत्तपत्रही आहे आणि मतपत्रही!" आणि खरंच होतं ते. द्वा. भ. कर्णिक ह्यांच्यानंतर गोविंदराव तळवलकर यांनी "म.टा"ला जी उंची गाठून दिली ती अद्वितीयच म्हणावी लागेल! माझ्या आठवणीत कोरली गेलेली सदरे म्हणजे - "आयफेल टाॕवर, राजधानीतून, धावते जग, वाचता वाचता, जाणता अजाणता, नांदी, मी गेल्या वर्षात काय वाचले, गोविंदरावांचे अग्रलेख, विज्ञान पुरवणी, बहुतांची अंतरे, दाद-फिर्याद, साप्ताहिक मैफल...!! मला आठवतंय की माझे मित्रांशी "म.टा"ची बाजू घेऊन पुष्कळदा वाद-विवाद ही होत असत. "xxxx इज फॉर मासेस पण माझा "म.टा" इज फॉर क्लास पीपल" हे मी नेहमीच गर्वाने म्हणायचो. "म.टा"ची भाषा हे तर माझे आवडते हत्यार असायचं भांडण्यासाठी. इतकी समृद्ध, अभिजात, देखणी आणि उच्च मराठी कुठल्याच पेपरात नसायची! माझे आवडते सर्वच लेखक "म.टा"त नित्यनेमाने लिहायचे. आजकालच्या पेपरात दुर्दैवाने ते लेखकच हयात नसल्याने त्यांची उणीव प्रचंड जाणवते. "म.टा" विना सकाळ कित्ती सुनीसुनी वाटायची त्याकाळी. आणि तीच गोष्ट "म.टा"च्या दिवाळी अंकाबाबतही! शेकडो दिवाळी अंक वाचलेत पण "म.टा"चा दिवाळी अंक नाही वाचलात तर 'वोह जीना भी क्या जीना?' असाच म्हणावं लागे!
आजकाल आपल्याला "युट्यूब" मुळे विस्मरणात गेलेली सर्व जुनी B & W गाणी पुनःपुन्हा एन्जॉय करता येतात तसंच "म.टा"चे सर्व जुने अंक इंटरनेटमुळे पुन्हा वाचायला मिळाले तर? क्या, वोह सुबह कभी तो आयेगी?...."..
No comments:
Post a Comment