चिट्टी चिट्टी बँग बँग!!
----------------
काल रात्री हा मजेशीर सिनेमा पाहिला. म्हटलं तर लहान मुलांसाठीचा...पण मी आहे बाबा लहान तसाही! ..म्हंजे पिंड जरी रोमँन्टिक किस्म का असला ( 😉 ) आणि म्हणून वाॕर फिल्म्स, काॕमेडीजपेक्षा रोमँन्टिक मूव्हीज/ लव्ह स्टोरीज जास्त संख्येनं बघत असलो तरी असे लहान मुलांचे मूव्हीजही आवडतात मला! म्हंजे आमच्या घरी - मी, दोन्ही मुलींइतकाच- हॕरी पाॕटरचा आणि त्या विझार्डिंग वर्ल्डचा इतका दिवाणा आहे की हॕरीची सातही पुस्तकं + Cursed child नाटक आणि आठही फिल्म्स घरी आहेतच, पण आता न्यूट स्कॕमँन्डर आणि त्याच्या फँटॕस्टिक बीस्ट्सची पुस्तकं पण घरी आहेत आणि दोन्ही मूव्हीज आमच्या कोथरुड सिटी प्राईडला अगदी धावत जाऊन फर्स्ट डे फर्स्ट शो बघून झालेत आणि तिस-या येणा-या मूव्हीचा बे-सब्री से इंतेझार आहे! ;-)
"प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे" असं केशवसूत म्हणाले होते. आता - मला कैय दुर्दैवाने कविता होत नाहीत. (हुश्श वाटलं नं?! ;-) ...मी पाडू शकतो बरं..!..) पण शप्पथ! कविता होणा-यांचं मला ज्याम कौतुक वाटतं! आणि त्यातसुद्धा माझं हिंदी भीषण असल्यामुळे, ज्यांना डायरेक्ट उर्दूमिश्रीत हिंदीत कविता होतात, त्यांचा तर आदरयुक्त हेवाच वाटतो!..असो :-D
तर थोडक्यात म्हणजे एकीकडे हाॕलीवूडचे सगळ्ळेच रोमँन्टिक मूव्हीज भक्तिभावानं बघणारा मी तितक्याच तन्मयतेनं - हॕना-बार्बराचे टाॕम & जेरी आणि वाॕल्ट डिझ्नीचे सगळेच अॕनिमेटेड मूव्हीज आणि शिवाय लाॕरेल-हार्डी (रड्या-जाड्या) यांचे मूव्हीज बघत असतो! काल रात्री बघितलेला "Chitty Chitty Bang Bang" हासुद्धा बच्चेकंपनीसाठीचा पण मोठ्यांचा मूव्ही!!
एका अद्भूत कार ची गोष्ट! सिनेमा सुरु झाल्यावर दिसतं की सलग तीन वर्षं ग्रां-प्री रेस जिंकणारी ही कार एका रेसमधे अपघात होऊन जळून खराब होते. तिचं वैभवच संपतं आणि मग एका गॕरेजमधे पडून राहते. तिथे जवळच एका टेकाडावरच्या घरात आपल्या उचापती-संशोधक बाबा कॕरॕक्टॕकस पाॕट्स (डिक व्हॕन डाईक) आणि आजोबांबरोबर (लायनल जेफ्री) राहणा-या जेरेमी (एड्रियन हाॕल) आणि जेमिमा (हीदर रिप्ले) या भावाबहिंणींना मात्र तिच्यावर चढून खेळण्यासाठी ती हक्काची कार असते.
एक दिवस ती कार भंगारात काढण्यासाठी खरेदी करायला एकजण आल्यावर मुलांना वाईट वाटतं आणि ते आपल्या संशोधक बाबांना आपण ती कार विकत घेऊया म्हणून मागे लागतात...एकाहून एक नित्य नवे शोध लावणा-या त्यांचा बाबा शिट्टी वाजणा-या फळांच्या टाॕफीज तयार करतो पण त्या विकत घ्यायला तयार होणा-या श्रीमंत माणसाच्या फॕक्टरीची, कुत्र्याच्या झुंडी ते खायला येऊन नासधूस झाल्यावर सगळंच फसतं...पण पुढच्याच पळापळीच्या गंमतीदार प्रसंगात नाचगाण्यात भाग घेतलेल्या बाबाला घसघशीत टिप मिळते आणि कार मुलांची होते.
दरम्यान त्यच श्रीमंत माणसाची तरुण मुलगी ट्रुली स्क्रम्शस (सॕली हाॕव्ज) ही जेरेमी-जेमिमाची दोस्त बनलेली असते..
आणि मग बाबा आणि मुलं आणि ती तरुण मुलगी कारने समुद्राकाठी फिरायला जातात...तिथे कार पळवायला आलेला दुष्ट बॕरन त्यांच्यावर हल्ला करतो तेव्हा ती कार चक्क हुवरक्राफ्ट बनून पाण्यातून पळायला लागते आणि त्यांची सुटका होते..पण बॕरन त्यांच्या मागावर संशोधक कॕरॕक्टॕकसला किडनॕप करण्यासाठी माणसं पाठवतो..ते गडबडीत आजोबांनाच उचलून हाॕट एअर बलूनच्या सहाय्यानं हवेमार्गे जायला सुरुवात करतात तेव्हा पुन्हा असंच फिरायला निघालेले कॕरॕक्टॕकस, ट्रुली आणि दोन्ही मुलः त्या बलूनचा पाठलाग करता करता कार कड्यावरनं कोसळते...आणि...
आणि.. अचानक कारला पंख फुटतात हेलिकाॕप्टरसारखा पंखाही येतो आणि कार हवेतून उडत ते त्या दुष्ट बॕरनच्या व्हल्गेरिया बेटावरच्या नगरात जातात..
त्या बेटावर वेगळंच दृश्य बघायला मिळतं. बॕरनने बेटावरच्या एक्कुणेक मुलांना पकडून तळघरात डांबून ठेवलेलं असतं...आणि त्याचे शिपाई जेरेमी-जेमिमालाही पकडून नेतात...
कॕरॕक्टॕकस आणि ट्रुली तिथल्या खेळणी तयार करणा-याच्या मदतीनं त्यांची आणि आजोबांची सुटका कशी करतात? त्या जादुई कारचं काय होतं? व्हल्गेरियातल्या मुलांचं काय होतं? ..याची उत्तरं अर्थात हा मूव्ही बघूनच मिळतील!
तब्बल 14 गाणी आसणारा हा म्युझिकल मूव्ही आणि कारच्या इंजिनचा तो विशिष्ट "चिट्टी चिट्टी बँग बँग" आवाज आणि त्यावरुनच बनलेलं टायटल साँन्ग तर धमालच!..डिक व्हॕन डाईकने धमाल आणल्येय...भरपूर गाणी..धमाल नाच...देखण्या फ्रेम्स...यामुळे आवडून जातो हा मूव्ही!..तुम्ही लहान मुलासारखे एंजाॕय करु शकत असाल तर बघाच!!..नाहीतर लहान मुलांसाठी त्यांच्याबरोबर बसून बघा!! :-D
No comments:
Post a Comment