"How to murder your wife?"
---------------------
मला 1948 ते 1973 ह्या सुवर्णयुगातले सिनेमे बघायला आवडतात. हिंदी असो वा इंग्लीश!..काल रात्री 1965 सालचा जॕक लेमनचा धमाल मूव्ही पाहिला -"How to murder your wife?"
स्टॕन्ले फोर्ड (जॕक लेमन) हा मौजमजेचं धम्माल आयुष्य जगणारा एक कार्टुनिस्ट! बेट्याची अविवाहित राहिल्यामुळे मित्रमंडळींबरोबर धम्माल चालते. न्युयाॕर्कमधे पाॕश फ्लॕट आहे, ईमानी व्हॕले चार्ल्स (टेरी थाॕमस) आहे. स्टॕन्लेचं वैशिष्ट्य म्हणजे तो ज्या डिटेक्टिव्ह ब्रॕनिगनच्या आयुष्यातल्या नाट्यमय आणि थरारक घटना कार्टून स्ट्रीपमधून चितारतो, त्या आधी स्वतः अॕक्टर्सना घेऊन स्वतःवर चित्रीत करुन मगच त्या फोटोबरहुकूम कार्टून स्ट्रीप तयार करत असतो!
एका मित्राच्या बॕचलर पार्टीत दारु पिऊन टाईट असताना, त्या पार्टीत आणलेल्या एका भल्या मोठ्या केकमधननं बाहेर आलेल्या सेक्सी तरुणीवर (व्हीर्ना लिझी) तो फिदा होतो ...आणि...आणि...दुस-या दिवशी सकाळी जागा होतो तो तिला आपल्या बेडवर अनावृत्त झोपलेली पाहून! ..आपण तिला दारुच्या नशेत थेट लग्नाची अंगठी घालून रात्री आपल्या घरी घेऊन आल्याची जाणीव होऊन तो हादरतो! ..इथूनच सिनेमात रंगत यायला सुरुवात होते.
कारण स्टॕन्लेला आणि त्याच्या नोकराला, चार्ल्सला घरात बाईचं असणं मान्यच नसतं. त्यातून स्टॕन्लेने घरी आणलेली ती माॕडेल असते इटालियन आणि तिचे इंग्लीश बोलण्याचेही वांधे! ;-)
स्टॕन्ले दुस-याच दिवशी तिला घेऊन आपल्या वकील मित्राकडे जातो आणि घटस्फोट मिळवून देण्याची विनंती करतो...पण ठोस कारण असल्याखेरीज ते शक्य नसल्याचं त्याला कळतं. आता मोठाच प्राॕब्लेम! ..तिचं घरात राहणं नक्की झाल्यामुळे नोकर चार्ल्स वैतागून दुस-या घरी निघून जातो.
स्टॕन्लेचा त्या आता त्याची बायको झालेल्या इटालियन माॕडेलबरोबर पीडा संसार सुरु होतो आणि त्याचे परिणाम अर्थातच त्याच्या डिटेक्टिव्ह ब्रॕनिगनच्या रोजच्या काॕमिक स्ट्रीपमधनं दिसायला सुरुवात होते. हैराण झालेला स्टॕन्ले आपल्या "फक्त पुरुषांच्या" असलेल्या क्लबमधे आपली व्यथा मांडतो...आणि ..आणि बायकोचा काटा काढायचा ठरवतो. बायकोला ग्लासमधून ड्रग देऊन नंतर बाजूला चालू असलेल्या कन्स्ट्रक्शन साईटच्या सिमेंटच्या यंत्रात टाकून मारण्याची योजना आखतो..
पण त्याआधी तो अर्थातच त्याच्या पद्धतीने संपूर्ण सीन चार्ल्सच्या मदतीनं स्वतः एनॕक्ट करतो ...आणि...तिथेच घोळ होतो!!
No comments:
Post a Comment