Monday, 14 June 2021

टू बी आॕर नाॕट टू बी

टू बी आॕर नाॕट टू बी
----------------
त्या भस्म्या का कुठल्याश्या रोगात नै का माणूस खा खा खात सुटतो?..तस्सा मला रोज मध्यरात्री एक असे हाॕलीवुडच्या सुवर्णयुगातले (१९३०~१९६० मधले) मूव्हीज बघायचा रोग जडलाय! आणि त्यातही गेले काही दिवस अर्न्स्ट लुबिश ह्या दिग्दर्शकानं झपाटलंयच जणू! गेल्या पाच रात्रींत अर्न्स्ट लुबिश ह्या अफलातून दिग्दर्शकाचा हा चौथा मूव्ही बघितला! कॕरोल लोम्बार्ड ह्या देखण्या अभिनेत्रीचा मूव्ही बघायचं कधीपास्नं डोक्यात होतंच तोही योग जुळून आला! 😍

हा मूव्ही संपला आणि चट्कन आठवलं ते अनेक वर्षांपूर्वी पुण्यात पाहिलेलं परेश मोकाशीचं धुमाकूळ, धतिंग "मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी" हे नाटक!! दुस-या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर जपानहून अणुबाँम्बचा फाॕर्म्युला न्यायला आलेल्या हिटलरचं विमान कोकण किनारपट्टीवर कोसळून तो बोंबिलवाडीत येतो, जिथे त्यावेळी ब्रिटीश अधिका-याचा अंमल आहे..आणि गावच्या नाटक कंपनीतली मंडळी त्याला बाँम्बने उडवायचा प्लॕन करतायत...हिटलर आणि त्या ब्रिटीश अधिका-याचं युरोपमधल्या एकाच युवतीवर प्रेम...हिटलरचं नाटकाच्या नेपथ्याच्या पेटा-यात लपून बसणं वगैरे...हृषिकेश जोशी, जितेंद्र जोशी/ गणेश पंडीत, चिन्मय केळकरची रंगमंचावरची धतिंग...धुमाकूळ नुस्ता!!..त्या फार्सची आठवण हा १९४२ सालचा अर्न्स्ट लुबिशचा "टू बी आॕर नाॕट टू बी" हा धम्माल मूव्ही करुन देतो! कथानकात किंचित सिमिलॕरिटी आहे! 😆

मूव्हीची कथा अशी - दुस-या महायुद्धाच्या सुरुवातीचा काळ, १९३९ साल! पोलंडच्या वाॕर्सामधला नाटकं करणारा पोल्स्की थिएटर ग्रुप! एकीकडे त्यांचे "हॕम्लेट"चे प्रयोग सुरु आहेत आणि दुसरीकडे नाझी आणि हिटलरवर बेतलेलं "गेस्टापो" नाटक बसवण्याचीही तयारी सुरु आहे! हिटलरच्या वेषातल्या कलाकारानं (टाॕम ड्युगन) गावात फिरत खळबळ उडवून देण्याच्या प्रसंगानं सुरुवात!...नाटक कंपनीच्या मुख्य कलाकारांमधे ट्युरा पतीपत्नी आहेत! जोसेफ ट्युरा (जॕक बेनी) आणि मारिया ट्युरा (कॕरोल लोम्बार्ड)!! त्यावेळी वाॕर्सात पोस्टींग असलेला ब्रिटीश लेफ्टनंट साॕबिन्स्की (राॕबर्ट स्टॕक) हा मारियावर लुब्ध झालाय. हॕम्लेटच्या भूमिकेत जोसेफचं लांबलचक स्वगत "टू बी आॕर नाॕट टू बी" सुरु झाल्यावर तो समोरच्या रांगेतनं उठून ग्रीनरुममधे मारियाला भेटायला जात असतो..आपल्या बाँम्बर विमानातनं मारियाला फिरवण्याचंही त्यांचं ठरतं...असं रुटीन..त्यांच्या भेटी..काही काळ चालू राहतं...आपल्या नेमक्या त्याच "टू बी आॕर नाॕट टू बी.." स्वगताला उठून जाणारा हा तरुण जोसेफच्या डोक्यात गेलेला असतो..लेफ्टनंट इंग्लंडमधे परतलेला असतानाच दुस-या महायुद्धाला सुरुवात होते....

गाफील पोलंडवर हिटलरच्या फौजा स्वारी करत वाॕर्सा ताब्यात घेतात...आणि सर्वत्र नाझी सैनिकांचा वावर सुरु होतो..मूळ पोलीश असणारा प्रोफेसर सिलेट्स्की (स्टॕन्ली रिजेस) इंग्लंडहून एका सिक्रेट मिशनसाठी पोलंडला रवाना होतो. ब्रिटीश एअर फोर्समधल्या मूळ पोलीश सैनिकांचे राहण्याचे पत्ते आणि त्यांनी दिलेले निरोप अशी मोठी लिस्ट त्याच्याकडे असते..पण तो प्रत्यक्षात हिटलरसाठी काम करणारा एजंट असतो. लेफ्टनंट सा़बिन्स्कीने मारिया ट्युरासाठी दिलेला गुप्त सांकेतिक मेसेज घेऊन तिला भेटणं हेही त्याचं काम असतं.!

दरम्यान प्रोफेसर सिलेट्स्की नाझींचा एजंट असल्याचा साॕबिन्स्कीचा संशय खरा ठरुन त्याच्याकडची कागदपत्रं नाझींच्या हातात पडण्याआधीच ती हस्तगत करण्यासाठी लेफ्टनंटला वाॕर्सामधे पॕराशूटच्या सहाय्याने उतरवण्यात येतं आणि तो ट्युरा पतीपत्नींच्या घरी रात्रीच्या अंधारात पोहोचतो...त्याला आपल्या बिछान्यात पाहून जोसेफा हैराण...😆

प्रोफेसर सिलेट्स्की मारियाला भेटून तिला हिटलरसाठी काम करायला उद्युक्त करतो. देशासाठी साहस करायला तयार असणारी मारिया आपल्या नाटकाच्या सहकलाकारांना साथीला घेऊन काय चाली खेळते? तिच्या नव-याची जोसेफची साथ कशी लाभते? नाटकाच्या कलावंतांमधल्याच एकाला हिटलरचा वेष धारण करुन वावरावं लागतं तो डाव यशस्वी होतो का? जोसेफला प्रोफेसरचं रुप घेऊन थेट नाझी कर्नल एर्हार्टच्या (सिग रुमान) आॕफिसमधे घुसावं लागतं, त्यांचे प्लॕन्स यशस्वी होतात का?...या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला हा धुमाकूळ मूव्ही बघाच!!...

स्टॕन्ली रिजेस, जॕक बेनी, सिग रुमन ने अक्षरशः धमाल उडवून दिल्येय...आणि मारियाच्या भूमिकेतली गोड, देखणी कॕरोल लोम्बार्ड तर घुसतेच मनात!!

No comments:

Post a Comment