एंजल आॕन माय शोल्डर
---------------
माणूस मेल्यावर काय होतं?..त्याबद्दलच्या काही कल्पनांमधली एक कल्पना म्हणजे खूपच पुण्यवान असू तर वर ढगात कुठेतरी स्वर्ग नामक छानछान ठिकाणी जाऊ किंवा फारच पापी असू तर पृथ्वीच्या पोटात, पाताळात...खूप उष्ण प्रदेशात हालहाल देणा-या नरकात जाऊ!
आणि मग यम, चित्रगुप्ताचे मजेशीर कारनामे ह्यांवर काही धमाल विनोदी नाटकं आली तसेच काही अफलातून सिनेमेही बनले. गेल्या वर्षी लाॕकडाऊनच्या काळात अशाच भन्नाट स्टोरीवर बनलेले - जिमी स्ट्युअर्टचा"इट्स अ वंडरफुल लाईफ" (https://www.facebook.com/100775571754831/posts/101112698387785/) आणि डेव्हिड निवेन चा "अ मॕटर आॕफ लाईफ अँड डेथ" (https://www.facebook.com/100775571754831/posts/101111768387878/) पाहिले होते. काल रात्री पाॕल म्युनीचा "एंजल आॕन माय शोल्डर" हा असाच वेगळ्या कथेवरचा सिनेमा पाहिला!
पाॕल म्युनी ह्या अफलातून अॕक्टरचा हा मी पाहिलेला पहिलाच मूव्ही! आता त्याचे एकेक करुन सगळेच गाजलेले मूव्हीज बघणार आहे. त्याच्याविषयी एक रंजक कथा ऐकली होती की एका सिनेमात त्याच्याबरोबर काम करणा-या अॕक्टरवर दडपण आलं होतं म्युनीसमोर उभं राहायचं म्हणजे काय? त्याचा रोल होता एका गरीब, कंगाल माणसाचा. त्या अॕक्टरने मग शूटींगच्या आधी जबरदस्त तयारी केली. आठवडाभर दाढीचे खुंट वाढवले..शहरातल्या एका घेट्टोमधे भिका-यांच्यात जाऊन राहिला...दोन दिवस उपाशी राहिला...वगैरे...शुटींगचा दिवस उजाडला. पाॕल म्युनीबरोबरचा सीन...पण पाॕलच्या सहजसुंदर अभिनयासमोर त्याची गाळण उडाली...रिटेक वर रिटेक व्हायला लागले. त्याने म्युनीलाच शेवटी विचारलं-"यार मी दोन दिवस उपाशी राह्यलो..हे बघ दाढीचे खुंट वाढवले...भिकारी वस्तीत राहून आलो...आंघोळही केलेली नाही...तरी काही जमत नाहीये ..काय कमी पडतंय?...आता आणखी काय करु?"....म्युनीने त्याच्याकडे पाहात मंद स्मित करत इतकंच म्हटलं-"आता अॕक्टींगही कर!" ;-)
पाॕल म्युनी होताच बाप्प अॕक्टर!..कुठल्याही रोलमधे स्वतःला झोकून देऊन काम करणारा! १९४६ सालच्या "एंजल आॕन माय शोल्डर" सिनेमात त्याच्याबरोबर आहे अत्यंत सहज अभिनय करणारा अभिनेता क्लाॕड रेन्स ('कॕसाब्लांका'वाला) आणि मोहक अभिनेत्री अॕन बॕक्स्टर!...आपल्या पदार्पणाच्या फिल्मसाठी आॕस्कर नाॕमिनेशन मिळवणा-या पाॕल म्युनीने अवघे २५ च सिनेमे केले पण त्यापैकी पाच सिनेमांसाठी त्याला अॕक्टींगचं आॕस्कर नाॕमिनेशन मिळालं होतं आणि एकदा त्याने ते जिंकलंही!..रोल जगणारा अभिनेता..आणि हो अॕन बॕक्स्टरही मोहक अभिनेत्री..तिचेही सिनेमे बघणारेय यापुढे मी!
तर आता - काल रात्री पाहिलेल्या या सिनेमाविषयी! --
एडी केगल (पाॕल म्युनी) हा खतरनाक गुंड तुरुंगातून सुटलाय. त्याला न्यायला त्याचा सहकारी स्माईली विल्यम्स (हार्डी आॕलब्राईट) आलाय. पण तो वरुन दोस्तीचं नाटक करत असला तरी त्याला एडी नकोसा झालाय आणि तो त्याला कारमधनं घेऊन जात असतानाच गोळ्या घालून ठार करतो. गुंड एडी आता पृथ्वीच्या पोटात.. पाताळातल्या नरकात पोहोचलाय...सर्वत्र आगीचे डोंब आणि तिथे सैतान निक चं (क्लाॕड रेन्स) साम्राज्य! ..एडीला आधी कळतच नाही की तो कुठे आलाय..पण जाणीव व्हायला लागल्यावर मात्र तो तिथल्या सैतानाच्या दूतांशी झटापट करु पाहतोय..त्याला स्माईलीचा सूड घेण्यासाठी परत जायचंय..
सैतान निक त्याला बघतो आणि त्याला जाणवतं की एडीचा चेहेरा हुबेहुब्ब जज्ज फ्रेडरिक पार्करशी जुळतोय जो कमालीचा सज्जन जज्ज आहे आणि अशी सज्जन माणसं काय कामाची जी चांगुलपणा पसरवतील? जितकी कुकर्मी माणसं तितकी त्याला नरकात भर हवी! म्हणून तो एडीला एक आॕफर देतो की तो त्याला स्माईलीला मारुन सूड घेण्याची संधी देईल पण ते काम त्याने जज्ज पार्करच्या देहात शिरुन करायचं...! एडीचा विश्वास बासत नाही पण तो तयार होतो..
सैतान निक एडीला (आत्म्याला) घेऊन पाताळातून आगीच्या मार्गानेच वर जमिनीवर येतो..तेव्हा एडीला जाणवतं की तो निकला पाहू शकत असला तरी त्या दोघांना पृथ्वीवर कुणीही पाहू शकत नाहीत...निक त्याला घेऊन जज्ज पार्करच्या घरी येतो जिथे जज्जला अतिश्रमानं बरं नसल्याने झोपवण्यात आलंय. निक एडीच्या आत्म्याला जज्जच्या शरीरात घुसवतो.
आता एडी जज्ज फ्रेडरिक पार्कर झालाय पण तरीही तो निकला पाहू शकतो आणि त्याच्याशी बोलू शकतोय. त्याला लवकरात लवकर स्माईलीचा बदला घ्यायचाय..पण त्याला निकच्या मनाप्रमाणे वागायला लागतं.
दरम्यान जज्ज पार्कर गव्हर्नर पदाची निवडणूक लढतोय आणि अर्थातच त्याचे विरोधक त्याच्याविरुद्ध कारवाया करु पाहतायत. तरुण जज्जची प्रेयसी बार्बरा फाॕस्टर (अॕन बॕक्स्टर) त्याच्या बरोबर त्याला साथ द्यायला आहे..पण तिला त्याचं अचानकच बदललेलं चमत्कारीक वागणं, काहीशी विचित्र रांगडी भाषा बुचकळ्यात पाडते आणि ती सायकीअॕट्रीस्टचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे जज्जचा त-हेवाईकपणा सहन करत त्याच्याबरोबर दौ-यावर जाते...
पण तिच्या मनात त्याच्याबरोबरच्या भावी सुखी संसाराची मधूर स्वप्नं आहेत जे ती एकांततात बोलून दाखवते...त्यांचं तयार होणारं घर...तिथल्या खोल्या...त्यांना हौणारी मुलं...जज्जच्या रुपातल्या एडीला तिचं हे रुप लुभावतं पण त्याला एकवार स्माईलाचाही निकाल लावायचाय...त्याची द्विधा मनःस्थिती...त्याला तिला फसवायचं नाहीये...पण सैतान निक सतत त्याच्या आसपास राहात त्याला त्याच्या वचनाची आठवण करुन देतोय...त्याच दोलायमान अवस्थेत तो बार्बराबरोबर फादरसमोर लग्न लावायला उभा असतानाहो ते मोडतो...का ते तो तिला सांगू शकत नाही..पण बिचारी इनोसंट बार्बरा त्याची उद्विग्नता समजून घेण्याचा प्रयत्न करत ते दुःख गिळत तरीही त्याच्याबरोबर जाते..
निकच्या चालींमुळे स्माईली आणि जज्जच्या रुपातला एडी समोरासमोर येऊन ठेपतात...एडीच्या मनात प्रचंड राग...पण जज्जच्या रुपात तो आहे...त्याने स्माईलीला ठार मारलं तर जज्जची नाचक्की...आणि बार्बराच्या स्वप्नांचा चक्काचूर...पण त्याने स्माईलीला नाही मारलं तर त्याचा सूड अधुरा राहील...आणि त्याने निकला दिलेली कमिटमेंटसुद्धा....काय करावं?...कुणाचं ऐकू? माझ्या मनाचं? ..निकच्या मनाचं?...
त्याला त्या लग्न लावणा-या फादरचे शब्द आठवतायत..."एंजल आॕन युअर शोल्डर"..त्या फादरचं ते सर्मन..तो प्रसंग खरं म्हणजे या सिनेमातला हायलाईट सीन!..तुमच्या आसपास तुमची दिशाभूल करणारा सैतान सतत कार्यरत असतो...तो तुम्हाला दुष्कृत्य करायला भाग पाडत असतो..तुमच्या कानात सतत कुजबुजत असतो..तुम्ही गोंधळलेले असता..अश्यावेळी तुम्ही मान दुसरीकडे वळवा आणि बघा तुमच्या खांद्यावर बसलेल्या तुमच्या गार्डीयन एंजलकडे..त्याचं ऐका...चांगलं वागा...चांगली कामं करा...मग सैतानाचं नाही चालणार काही.."
No comments:
Post a Comment