मराठी प्रतिशब्द द्या रे..
-----------
मध्यंतरी एक पोस्ट होती कुठल्यातरी एका शब्दाच्या अर्थाचे "मराठीत पाहा कित्तीss शब्द आहेत आणि त्यासाठी इंग्लीशमधे बघा कित्ती कमी आहेत..." वगैरे..
अर्थातच मराठीसाठी काॕलर टाईट करुन घ्या हे गर्भित होतं...तर ती पोस्ट ज्या कुण्या थोर विद्वानाची होती त्याला हात जोडून कळकळीची विनंती - ह्या खालती दिलेल्या पाचसहा शब्दांनाही पर्यायी शब्द आपल्या मिडीयाला सूचवा रे....!!! डोस्कं फिरतं हे तेचतेच घिस्से आणि पिट्टे शब्द टीव्हीत ऐकताना -
१) चाकरमाने - (नोकरदार' फार फाल्तू असावा!)
२) बातचित- ('वार्तालाप' नको..उच्चारायला कठीण मिडीयावाल्यांना!)
३) ऐरणीवर - (एखादा प्रश्न दुस-या कशावर ठेवता येईल बरे?..मुळात ऐरण कशी हे किती मिडीयावाल्यांना चित्र काढून सांगता येईल?)
४) बळीराजा - (शेतकरी हा शब्द पुचाट असावा...बळीराजा म्हटलं की कसं नाडलेला, रंजलेला, गांजलेला, आत्महत्या करणारा डोळ्यांसमोर येतो..शेतकरी म्हटलं तर रस्त्यावर बदाबदा दूध ओतणारा, भाज्या, टोमॕटो, फळं फेकून नासाडी करणारा येईल का??)
५) कंठस्नान - (कंठ म्हणजे गळा आणि तो कापला/ चिरला जाऊन रक्ताची आंघोळ झाली तर कंठस्नान म्हणणं सयुक्तिक जे पूर्वीच्या काळी तलवारी, भाल्यांनी, दांडपट्ट्यांनी मुंडकी छाटताना घडायचं...आजकाल आतिरेक्यांना जवानांच्या बंदुकीची गोळी छातीत शिरुन रक्ताचा टिप्पूसही गळ्याला न लागता हे कंठस्नान घडतं म्हणे!)
६) पावसाची बॕटींग - ह्यावर मी वेगळी पोस्टच लिहिल्येय)
७) फज्जा - ('फजिती' च्या ह्या नव-याला दुसरा शब्द द्याच बुवा. मला खरं तर 'फज्जा उडाला' पेक्षा "पोपट झाला" ही चालेल!)
८) तुंबई/ तुंबापुरी - (केवळ मुंबई/ मुंबापुरीशी -हायमिंग म्हणून "तुंबणे"चं हे रुप? इतके टूकार गिळगिळीत शब्द?)
🙄😡😠😠😡
No comments:
Post a Comment